दंगलीदरम्यान—ख्रिस्ती विश्वासाचे कार्य
हेसर्व अचानक, एप्रिल १९९४ मधील एका दिवशी सुरू झाले. बुरुंडी आणि रवांडा देशाच्या राष्ट्रपतींचे एका विमान अपघातात निधन झाले. काही तासातच, रवांडात भयकारी हिंसेने उग्र स्वरूप धारण केले. सुमारे तीन महिन्यातच, पुरुष, स्त्रिया आणि मुले असे एकूण ५,००,००० पेक्षा अधिक रवांडातील लोक मृत्यूला बळी पडले. काही लोकांनी या काळाला “जातीसंहार” असे संबोधले.
रवांडाच्या ७५,००,००० रहिवाशांपैकी अर्ध्यांना आपापली घरेदारे सोडून पळ काढावा लागला. पळून गेलेल्यांमध्ये २४,००,००० लोकांचाही समावेश होतो ज्यांनी जवळपासच्या देशांत आश्रय घेतला. आधुनिक इतिहासातील हा निर्वासितांचा निर्गम सर्वात मोठा व जलद होता. झाइरेत (आता काँगो लोकशाही प्रजासत्ताक), टान्झानिया व बुरुंडी येथे त्वरित निर्वासित छावण्या तयार करण्यात आल्या. यांतील काही छावण्यांनी—ज्या जगातील सर्वात मोठ्या छावण्या होत्या—२,००,००० लोकांना आश्रय दिला.
निर्वासितांमध्ये, शांतीप्रिय व आपल्या जीवनांत बायबल तत्त्वांचे अनुकरण करणारे अनेक यहोवाचे साक्षीदारही होते. ते कोणत्याही राष्ट्रांत राहत असले तरी, पूर्णपणे तटस्थता राखतात व यशया २:४ च्या पुढील शब्दांतील तत्त्वाचे अनुकरण करतात: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील. यापुढे एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” यहोवाच्या साक्षीदारांचा असा एक धार्मिक गट आहे ज्याने रवांडातील जातीसंहारात मुळीच भाग घेतला नाही म्हणून सर्वत्र नावाजला गेला.
येशू ख्रिस्ताने म्हटले की त्याचे अनुयायी “जगाचे नाहीत.” परंतु, “ते जगात” असल्यामुळे राष्ट्रांत चालणाऱ्या दंगलींची त्यांनाही झळ पोहंचतेच. (योहान १७:११, १४) रवांडातील जातीसंहारादरम्यान, सुमारे ४०० साक्षीदारांना आपल्या जीवाला मुकावे लागले. सुमारे २,००० साक्षीदार आणि राज्य संदेशात आस्था दाखवणारे निर्वासित झाले.
जगाचा भाग न होण्याचा अर्थ, संकट ओढवते तेव्हा यहोवाचे साक्षीदार काहीच करत नाहीत असा होतो का? नाही. देवाचे वचन म्हणते: “भाऊ किंवा बहीण ही उघडी आहेत, त्यांना रोजच्या अन्नाची वाण आहे, आणि तुम्हांमधील कोणी त्यांना म्हणतो, ‘सुखाने जा, ऊब घ्या व तृप्त व्हा;’ पण त्यांच्या शरीराला पाहिजे ते त्यांना तुम्ही देत नाही तर त्यापासून काय लाभ? ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.” (याकोब २:१५-१७) शेजाऱ्यांबद्दलची प्रीती, दुसरे धर्म आचरणाऱ्यांनाही मदत करण्यास साक्षीदारांना प्रवृत्त करते.—मत्तय २२:३७-४०.
संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांना रवांडातील दुःखद परिस्थितीला तोंड देणाऱ्या त्यांच्या सहविश्वासूंना मदत करण्याची उत्कट इच्छा असली तरी, निवारणाच्या कामाला सहकार्य देण्यास पश्चिम युरोप शाखेला नेमण्यात आले. १९९४ च्या उन्हाळ्यात, युरोपमधील साक्षीदार स्वयंसेवकांची एक टीम आफ्रिकेतील आपल्या बंधूभगिनींचे साहाय्य करण्याकरता त्वरेने रवाना झाली. रवांडन निर्वासितांकरता सुसंघटित छावण्या व शुश्रूषा पथक [फिल्ड हॉस्पिटल्स] नेमण्यात आले. विमानाने किंवा इतर मार्गांनी मोठ्या प्रमाणावर कपडालत्ता, ब्लँकेट्स, शिधा आणि बायबल साहित्य पाठवण्यात आले. रवांडात तेव्हा असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संख्येपेक्षा तीन पट म्हणजे, ७,००० पेक्षा अधिक पीडितांना निवारणाचा फायदा झाला. त्या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत, बहुतेक यहोवाच्या साक्षीदारांसह हजारो निर्वासित परत रवांडात जाऊन स्थायिक झाले.
काँगोतील युद्ध
१९९६ मध्ये, काँगो लोकशाही प्रजासत्ताकाच्या पूर्वेत युद्ध भडकले. हे क्षेत्र रवांडा व बुरुंडीच्या सीमेवर आहे. पुन्हा तेथे बलात्कार व हत्येच्या घटना घडल्या. बेछूट गोळीबारात व गावांची राखरांगोळी होत असताना लोक आपला जीव मुठीत धरून तेथून पळाले. यहोवाचे साक्षीदार दंगलीत अडकले आणि जवळजवळ ५० जण मृत्यूमुखी पडले. काहींचा मृत्यू चुकून लागलेल्या गोळ्यांमुळे झाला. तर इतरांची, एखाद्या विशिष्ट जातीचे असल्यामुळे किंवा शत्रू म्हणून गैरसमज झाल्यामुळे कत्तल करण्यात आली. १५० साक्षीदार असलेल्या अख्ख्या गावाची होळी करण्यात आली. इतर गावांमधील अनेक घरे आणि काही राज्यसभागृह जाळण्यात आले. घरे आणि मालमत्ता हिरावल्यामुळे साक्षीदार दुसऱ्या ठिकाणी पळून गेले आणि तेथील सहउपासकांनी त्यांना आसरा दिला.
युद्धानंतर अन्नाची टंचाई जाणवू लागते कारण पीकांचा नाश झालेला आहे, अन्नसाठा लुटून नेला जातो आणि पुरवठ्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. उपलब्ध असलेले अन्न महाग होते. किसंगनीत, १९९७ च्या मे महिन्याच्या सुरवातीस, एक किलो बटाट्यांची किंमत शंभर रुपये इतकी होती, बहुतेक लोकांना ते परवडणारे नव्हते. पुष्कळ लोक दिवसातून एकदाच जेवू शकत होते. अन्नटंचाईनंतर रोगराई माजली. कुपोषणामुळे, मलेरिया, अतिसार आणि गॅसट्रिक यासारख्या आजारांचा प्रतिकार करण्यासाठी अंगात ताकत राहिली नाही. विशेषतः मुलांना लवकर यांचा त्रास होऊन ते बळी पडतात.
गरजेचा अंदाज लावणे
पुन्हा एकदा युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांनी त्वरित हालचाल केली. एप्रिल १९९७ पर्यंत साक्षीदारांची एक निवारण टीम, ज्यात दोन वैद्यकिय डॉक्टरांचा समावेश होता, औषधे आणि पैसा घेऊन तेथे गेले. गोमा येथील स्थानीय साक्षीदारांनी, त्वरित साहाय्य देता यावे म्हणून आधीच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी निवारण समितीची योजना केली होती. टीमने आल्या आल्या शहर आणि आजूबाजूच्या क्षेत्राची पाहणी केली. दूरच्या गावांकडून रिपोर्ट मिळण्याकरता निरोप्यांना पाठवण्यात आले. गोमाच्या पश्चिमेकडे १,००० किलोमीटर दूर वसलेल्या किसंगनी येथूनही माहिती मिळवण्यात आली. स्थानीय बांधवांनी, ७०० साक्षीदार राहत असलेल्या गोमातील निवारण कार्याला सहकार्य दिले.
गोमातील एक ख्रिस्ती वडील म्हणाले: “आम्हाला मदत करण्याकरता इतक्या लांबून आमचे बांधव आलेले पाहून आमची अंतःकरणं भरून आली. ते येण्याआधी आम्ही एकमेकांना मदत केली. बांधवांना ग्रामीण भाग सोडून गोमात आश्रय घ्यावा लागला. काहींनी त्यांची घरे गमावली होती, ते आपली शेते सोडून आले होते. आम्ही त्यांना आमच्या घरात घेतले, आणि आमच्याकडे असलेला कपडालत्ता त्यांना दिला, होते नव्हते तितके अन्न वाटून खाल्ले. तसे पाहिल्यास आम्ही फार कमी मदत करू शकलो. आमच्यातील काही जणांचे कुपोषणामुळे हाल होत होते.
“परंतु, युरोपवरून बांधवांनी आमच्यासाठी पैसे आणले ज्यामुळे आम्ही, अपुरे आणि महाग असलेले अन्न विकत घेऊ शकलो. आम्हाला अन्नसाठा अगदी वेळेवर मिळाला होता कारण आमच्यातील बहुतेकांच्या घरात खाण्यासाठी अक्षरशः काहीच उरले नव्हते. आम्ही साक्षीदार आणि गैर साक्षीदार असलेल्यांना अन्न वाटले. वेळेवर अन्न आले नसते तर पुष्कळजण मरण पावले असते, विशेषकरून मुले. यहोवाने त्याच्या लोकांना वाचवले. गैर साक्षीदारांवर याचा खूप प्रभाव पडला. अनेकांनी आपल्या ऐक्याची, प्रीतीची प्रशंसा केली. काहींनी तर हेही कबूल केले की तुमचाच धर्म खरा आहे.”
स्थानीय दुकानांतूनच अन्न घेऊन औषधांचे वाटप करण्यात आले असले तरी, आणखी पुष्कळ गोष्टींची आवश्यकता होती. अन्न आणि औषधांच्या भरपूर साठ्यासोबत कपडालत्ता, ब्लँकेट्सची देखील आवश्यकता होती. जमीनदोस्त झालेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठीही साहाय्याची आवश्यकता होती.
लोक उदारतेने देतात
युरोपमधील बंधू पुन्हा मदत करण्यासाठी तयार होते. फ्रान्स, लुविऑ येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयाने ऱ्होने व्हॅली, नॉरमन्डीतील मंडळ्यांना तसेच पॅरिसमधील काही मंडळ्यांना निवारण साहाय्याबद्दल कळवले. येथे आणखी एक शास्त्रवचनीय तत्त्व लागू होत होते: “जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.”—२ करिंथकर ९:६, ७.
हजारोंनी ह्या संधीचा फायदा उचलला. कपडे, बूट आणि इतर वस्तू असलेल्या खोक्यांचा आणि बॅगांचा राज्यसभागृहात ढीगच जमला; हे सर्व गोळा करून मग फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यालयात पाठवण्यात आले. तेथे, “झाईरे साहाय्य” प्रकल्पाचे पुढचे पाऊल उचलण्याकरता ४०० स्वयंसेवक हजर होते. देणगी म्हणून आलेले सर्व कपडे वेगवेगळे करून त्यांच्या घड्या घालून खोक्यांमध्ये भरून एका पॅलेटवर ३० असे रचण्यात आले. लहान मुलांनी आफ्रिकेतील त्यांच्या लहान बंधू आणि भगिणींचा विचार करून खेळण्या पाठवल्या होत्या—चमकणाऱ्या मोटारी, भोवरे, बाहुल्या आणि टेडीबेअर्स. जीवनावश्यक गोष्टींबरोबरच ही खेळणी बांधून देण्यात आले. ४० फूट उंचीच्या एकूण नऊ पेट्या भरून काँगोला पाठवण्यात आल्या.
बेल्जियम, फ्रान्स आणि स्वित्झर्लंड मधील हजारो साक्षीदारांच्या मदतीने मध्य आफ्रिकेला किती साहाय्य पाठवण्यात आले बरे? सर्व गोष्टींची एकूण संख्या अशाप्रकारे आहे: जून १९९७ पर्यंत, ५०० किलोग्रॅम औषधे, १० टन हाय-प्रोटीन बिस्किटे, २० टन इतर अन्नसामग्री, ९० टन कपडालत्ता, १८,५०० बूटांचे जोड आणि १,००० ब्लँकेट्स. याशिवाय बायबल साहित्यही पाठवण्यात आले. या सर्वांसाठी निर्वासितांनी मनापासून आभार मानले, त्यांना त्यांच्या परिक्षेत टिकून राहण्याकरता सांत्वन आणि साहाय्य मिळाले होते. एकूण जवळजवळ साडेतीन कोटी रुपये किंमतीचे साहाय्य पाठवण्यात आले होते. ही देणगी, यहोवाची सेवा करणाऱ्या बंधुवर्गाची व प्रीतीची ग्वाही देणारी होती.
काँगोत वितरण
काँगोत जसजसा माल पोहंचू लागला, फ्रान्समधून दोन बंधू आणि एक बहीण स्थानीय निवारण समितीबरोबर काम करण्यासाठी आले. काँगोवासी साक्षीदारांनी केलेल्या आभारप्रदर्शनाबद्दल जॉसलेन म्हणाली: “आम्हाला आभारप्रदर्शनाची अनेक पत्रे आली. एका गरीब बहिणीने मला मॅलॅकाइट दागिना दिला. इतरांनी आम्हाला त्यांचे फोटो दिले. निघताना, बहिणींनी माझे मुके घेतले, मला कवटाळले, त्या खूप रडल्या. मलाही रडू आवरले नाही. अनेकांनी असे उद्गार काढले, ‘यहोवा चांगला आहे. यहोवा आपली काळजी घेतो.’ म्हणजे, या सर्वाचे श्रेय यहोवाला दिले पाहिजे हे त्यांनी ओळखले. आम्ही अन्नाचे वाटप करीत होतो तेव्हा बंधू आणि भगिणींनी राज्य गीते गाऊन यहोवाची स्तुती केली. हे दृश्य मन हेलावणारे होते.”
लोईक नावाचा एक डॉक्टर त्या टीममध्ये होता. सर्व जण राज्य सभागृहात एकत्र जमले होते आणि आपली पाळी येईपर्यंत धीराने थांबून राहिले होते. एका काँगोवासी भगिनीला, आपणही काहीतरी करावे असे वाटल्यामुळे तिने ४० डोनट बनवले आणि डॉक्टरांना भेटण्यासाठी थांबलेल्यांना दिले. परंतु तेथे एकूण ८० लोक असल्यामुळे प्रत्येकाला अर्धे डोनट मिळाले.
गैर साक्षीदारांना साहाय्य
हे मानवकल्याण साहाय्य केवळ यहोवाच्या साक्षीदारांनाच देण्यात आले नाही. १९९४ मध्ये ज्याप्रमाणे अनेक लोकांना फायदा झाला होता तसा याहीवेळी इतरांचा फायदा झाला. हे गलतीकर ६:१० च्या सुसंगतेत आहे जेथे म्हटले आहे: “जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (तिरपे वळण आमचे.)
साक्षीदारांनी अनेक प्राथमिक शाळांना व गोमातील एका अनाथालयाला औषधे व कपडे पुरवले. या अनाथालयात ८५ मुले आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्याकरता सुरवातीला आलेल्या टीमने या अनाथालयाला भेट दिली आणि हाय-प्रोटीन बिस्किटांचे ५० डबे, कपड्यांच्या पेट्या, १०० ब्लँकेट्स, औषधे आणि खेळण्या देण्याचे आश्वासन दिले होते. अनाथालयातील मुले लाईनशीर उभी राहिली आणि पाहुण्यांसाठी गाणी गायिली. त्यांनी मग एक खास विनंती केली—त्यांना एक फुटबॉल मिळेल का?
पुष्कळ आठवड्यांनंतर, निवारण टीमने त्यांना दिलेल्या वचनानुसार माल आणून दिला. अनाथालयाचे संचालक, साक्षीदारांची उदारता पाहून व त्यांना दिलेले बायबल साहित्य वाचून इतके प्रभावित झाले, की आपणही एक यहोवाचा साक्षीदार बनण्याच्या मार्गावर आहोत असे ते म्हणाले. आणि मुलांना त्यांचा फुटबॉल मिळाला का? फ्रान्सवरून आलेल्या निवारण टीमचे संयोजक क्लॉड म्हणाले: “आम्ही त्यांना एक नव्हे तर दोन फुटबॉल दिले.”
निर्वासित छावण्या
साहाय्य केवळ काँगोलाच देण्यात आले नाही. हजारो निर्वासितांनी युद्ध होणाऱ्या ठिकाणाहून पळ काढून एका जवळच्या देशात गेले जेथे तीन निर्वासित छावण्या त्वरेने निर्माण करण्यात आल्या होत्या. साक्षीदारांनी तेथेही जाऊन, काही करता येईल का या उद्देशाने पाहणी केली. हा अहवाल तयार करण्यात आला तेव्हा, छावण्यांमध्ये २,११,००० निर्वासित आश्रयाला आले होते, बहुतेक जण काँगोतील होते. सुमारे ८०० साक्षीदार आणि त्यांची मुले तसेच राज्याच्या सुवार्तेबद्दल आस्था दाखवलेले लोक तेथे होते. छावण्यांमध्ये प्रत्यक्ष समस्या अन्नाच्या तुटवड्याची होती. एका छावणीत, फक्त तीन दिवसच पुरेल इतके अन्न होते, आणि तेही तीन वर्षांच्या जून शेंगा.
तरीसुद्धा, साक्षीदार आवेशी होते. त्यांच्याकडे कमी बायबल साहित्य असूनही त्यांनी स्वतःची आध्यात्मिकरीत्या उभारणी व्हावी म्हणून नियमितपणे सभा घेतल्या. याशिवाय, छावणीतील इतरांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्यात ते मग्न होते.—मत्तय २४:१४; इब्री लोकांस १०:२४, २५.
साक्षीदारांच्या अन्वेषण टीममध्ये एक वैद्यकीय डॉक्टर होते. अधिकाऱ्यांनी त्यांना प्रत्येक छावणीत काही दिवसच राहण्याची परवानगी दिली असली तरी, त्यांनी त्या कमी वेळात वैद्यकीय संमंत्रणा आयोजित केली. जाताना त्यांनी ख्रिस्ती वडिलांकडे औषधे व पैसे दिले. अशाप्रकारे, बंधू निभावू शकले. छावण्यांतील साक्षीदार लवकरच आपल्या मायदेशी परततील अशी या टीमने आशा बाळगली.
भवितव्याबद्दल काय? येशू ख्रिस्ताने भाकीत केले, की हा आपला समय मोठा खळबळजनक समय असेल, युद्धे आणि अन्नटंचाईचा समय असेल. (मत्तय २४:७) मात्र देवाचे राज्य पृथ्वीवरील दुःखांचा अंत करण्यास समर्थ आहे हे यहोवाच्या साक्षीदारांना माहीत आहे. या राज्य शासनाखाली आपले पार्थिव गृह आज्ञाधारक मानवजातीकरता शांती, विपुलता आणि सार्वकालिक सौख्यानंदाचे परादीस होईल. (स्तोत्र ७२:१, ३, १६) तोपर्यंत, साक्षीदार त्या स्वर्गीय राज्याची घोषणा करीत राहतील व गरजवंत सहउपासकांना तसेच इतरांना साहाय्य करीत राहतील.
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
एकट्या युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांनी १९९४ पासून, १९० टन पेक्षा अधिक अन्न, वस्त्र, औषधे आणि इतर निवारण साहाय्य आफ्रिकेच्या महासरोवरे भागांना पुरवले
[६ पानांवरील चौकट]
ख्रिस्ती प्रीती आचरणात
फ्रान्समधील “झाईरे साहाय्य” प्रकल्पात सक्रिय भाग घेतलेल्यांपैकी एक, रूथ डॅना होत्या. लहानपणी, ख्रिस्ती विश्वासामुळे त्यांना नात्सी छळछावण्यात डांबण्यात आले होते. त्या म्हणाल्या: “आफ्रिकेतील आपल्या बंधू व भगिणींसाठी आम्ही काही तरी करू शकलो याचा आम्हाला खूप आनंद झाला! पण आणखी एका गोष्टीने माझा आनंद द्विगुणित केला. १९४५ मध्ये आम्ही जर्मनीहून पुन्हा घरी आलो तेव्हा आमच्याकडे अक्षरशः काहीच नव्हते. आमच्या अंगावरील वस्त्रसुद्धा दुसऱ्याकडून मागितलेलीच होती. परंतु, अमेरिकेतील आपल्या आध्यात्मिक बांधवांकडून आम्हाला लगेचच आर्थिक मदत मिळाली. म्हणून या निवारण कार्यामुळे मी, फार वर्षांपूर्वी आम्हाला दाखवलेल्या दयेची परतफेड करू शकले. ख्रिस्ती प्रीती आचरणात आणणाऱ्या बांधवांच्या इतक्या मोठ्या कुटुंबाचे भाग होणे केवढा मोठा सुहक्क!”—योहान १३:३४, ३५.
[७ पानांवरील चित्र]
सर्वांकरता विपुल असलेले पार्थिव परादीस—लवकरच