सौख्य—किती फसवे
राग, चिंता आणि निराशा या विषयांवर विज्ञान अनेक वर्षांपासून शोध करत आहे. परंतु अलीकडील वर्षांमध्ये, वैज्ञानिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वैज्ञानिकांनी, सौख्य या सकारात्मक व इष्ट मानवी अनुभवावर आपले संशोधन केंद्रित केले आहे.
लोकांना कशामुळे सौख्य मिळू शकेल? ते तरुण, श्रीमंत, निरोगी, उंच किंवा सडपातळ असल्यावर? खऱ्या सौख्याचे रहस्य काय आहे? बहुतेक लोकांना याचे उत्तर द्यायला अशक्य वाटत नसले तरी कठीण वाटते. सौख्य प्राप्त करण्यात हाती लागलेल्या व्यापक अपयशाचा विचार करता, सौख्य कशामुळे प्राप्त होत नाही याचे उत्तर देण्यास कदाचित काहींना सोपे वाटेल.
पुष्कळ वर्षांपर्यंत अग्रेसर मानसशास्त्रज्ञ, स्व-केंद्रित तत्त्वज्ञान सौख्याचे रहस्य आहे अशी शिफारस करीत राहिले. त्यांनी दुःखी लोकांना व्यक्तिगत गरजा पूर्ण करण्यावर पूर्णपणे आपले लक्ष केंद्रित करण्याचे उत्तेजन दिले. “व्यक्तिवादी बना,” “आपल्या आंतरिक भावना शोधून काढा,” “तुमच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वास जाणून घ्या,” यांसारखी आकर्षक वाक्ये मानसोपचारात वापरण्यात आली. तरी, या धोरणाला बढती देणारे काही तज्ज्ञ आता कबूल करतात, की अशा प्रकारची व्यक्तिवादी मनोवृत्ती बाळगल्याने चिरकालिक सौख्य मिळत नाही. अहंकारामुळे दुःख व निराशाच पदरी पडेल. स्वार्थीपणा सौख्याचे रहस्य नाही.
निराशेची कारणे
सुखविलासाच्या मागे धावून सौख्य प्राप्त करू इच्छिणारे खरे तर चुकीच्या ठिकाणी सौख्याचा शोध करीत असतात. प्राचीन इस्राएलमधील सुज्ञ राजा शलमोनाच्या उदाहरणाचा विचार करा. बायबलमधील उपदेशकाच्या पुस्तकात तो म्हणतो: “माझे नेत्र ज्याची म्हणून वांच्छा करीत ते मी त्यांच्यापासून वेगळे केले नाही; मी कोणत्याहि आनंदाच्या विषयापासून आपले मन आवरिले नाही; कारण ह्या सर्व खटाटोपाचा माझ्या मनास आल्हाद होत असे; ह्या सर्व खटाटोपापासून माझ्या वाट्यास एवढेच आले.” (उपदेशक २:१०) शलमोनाने स्वतःसाठी घरे बांधली, द्राक्षमळे लावले, बागबगिचे बनवले, पाण्याचे तलाव बांधले. (उपदेशक २:४-६) एकदा त्याने विचारले: “माझ्यापेक्षा कोण उत्तम भोजन करील, अथवा कोण अधिक सुखाचा उपभोग घेईल?” (उपदेशक २:२५, पं.र.भा.) सर्वात उत्तम गायक आणि संगीतज्ज्ञ त्याच्या दिमतीस होते व त्याने देशातील सर्वात रूपवान स्त्रियांचा सहवास भोगला.—उपदेशक २:८.
येथे मुद्दा असा आहे, की सुखविलासी कार्यांत शलमोनाने कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. जीवनात इतके सर्व सुख उपभोगल्यानंतर त्याने काय निष्कर्ष काढला? तो म्हणाला: “मग मी आपल्या हाताने केलेली सर्व कामे आणि परिश्रम ह्यांचे निरीक्षण केले; तो पाहा, सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग होता; भूतलावर हित असे कशातच नाही.”—उपदेशक २:११.
या सुज्ञ राजाने काढलेले ते निष्कर्ष आजही खरे ठरतात. संयुक्त संस्थानासारख्या धनसंपन्न राष्ट्राचेच उदाहरण घ्या. गेल्या ३० वर्षांदरम्यान, अमेरिकन लोकांनी वाहने व टेलिव्हिजन यांसारख्या भौतिक वस्तू दुप्पटीने खरेदी केल्या. तरीसुद्धा, मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते अमेरिकन लोक अजूनही सुखी नाहीत. एका नियतकालिकानुसार, “याच ३० वर्षांदरम्यान, अवसादाचे प्रमाण वाढले आहे. कुमारावस्थेतील तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण तिप्पट झाले आहे. घटस्फोटाचे प्रमाण दुप्पट झाले आहे.” अलीकडील संशोधकांनीसुद्धा ५० विविध राष्ट्रांतील लोकांमध्ये पैसा आणि सौख्य यांतील परस्परसंबंध अभ्यासल्यावर वरीलप्रमाणे निष्कर्ष काढले. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, तुम्ही सौख्य विकत घेऊ शकत नाही.
उलटपक्षी, धनसंपत्तीच्या मागे धावणे हे निराशेचे कारण आहे असेच उचितपणे म्हटले जाऊ शकते. प्रेषित पौलाने याप्रकारे इशारा दिला: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.
धनसंपत्ती, आरोग्य, तारुण्य, सौंदर्य, शक्ती किंवा यांतील कशाच्याही संयोगामुळे चिरकाल सौख्याची शाश्वती मिळत नाही. का नाही? कारण अरिष्टे टाळण्याचे सामर्थ्य आपल्या हातात नाही. राजा शलमोनाने उचितपणे म्हटले: “मनुष्याला स्वतःवर येणारा प्रसंग कळत नाही; अपायकारक जाळ्यात सापडणाऱ्या माशांप्रमाणे, पाशांत अडकणाऱ्या पक्ष्यांप्रमाणे, मानवपुत्रांवर अनिष्ट कालपाश अकस्मात पडतो; त्यांत ते सापडतात.”—उपदेशक ९:१२.
फसवे ध्येय
विज्ञानाने कितीही संशोधन केले असले तरीसुद्धा, ते सौख्याचे मानव-निर्मित तंत्र किंवा पद्धती सांगू शकत नाही. शलमोनाने असेही म्हटले: “मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांसच शर्यतीत यश व वीरासच युद्धांत विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.”—उपदेशक ९:११.
वरील शब्दांशी सहमत असलेल्यांचे म्हणणे आहे, की अस्सल सौख्यमय जीवनाची अपेक्षा अवास्तव आहे. एका प्रसिद्ध शिक्षकांनी म्हटले की, “सौख्य म्हणजे काल्पनिक मनःस्थिती.” इतरांना वाटते, की सौख्याचे रहस्य गूढ असून रहस्य जाणायची क्षमता, रहस्यवादाचे ज्ञान प्राप्त झालेल्या काही बुद्धिमानांमध्येच आहे.
तरीसुद्धा, विविध जीवन-शैली जगून लोक सौख्याचा शोध घेत राहतात. आपल्या पूर्वजांच्या हाती अपयश लागले असले तरीसुद्धा आज अनेक लोक निराशेवर मात करण्यासाठी धनसंपत्ती, सत्ता, आरोग्य किंवा सुखविलासाच्या पाठी धावतात. हा शोध असाच राहील, कारण पुष्कळ लोकांचा गाढ विश्वास आहे की चिरकालिक सौख्य काल्पनिक अवस्था नाही. सौख्य हे फसवे स्वप्न नसावे अशी ते आशा करतात. ‘मग मी ते कसे प्राप्त करू शकतो?’ असे कदाचित तुम्ही विचाराल.