त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
क्षमा करण्यास तत्पर असणारा पिता
या गोष्टीला सर्वश्रेष्ठ लघुकथा म्हणण्यात आले आहे—ते योग्यच आहे. हरवलेल्या मुलाप्रती असलेल्या वडिलांच्या प्रेमाविषयीचा येशूचा दाखला एखाद्या झरोक्याप्रमाणे आहे ज्यातून आपल्याला पश्चात्तापी पातक्यांबद्दल देवाच्या दयेचा महान दृष्टिकोन पाहता येतो.
हरवला आणि सापडला
कोणा एका मनुष्याला दोन मुले होती. त्यांतील धाकट्याने आपल्या पित्याला म्हटले: ‘मला माझा वारसा आताच्या आता हवाय, तुमच्या मरणाची वाट पाहण्याइतका माझ्याजवळ वेळ नाहीए.’ त्याच्या वडिलांनी त्याचे म्हणणे मान्य केले आणि आपल्याकडील सर्व मालमत्तेचा एक तृतीयांश भाग—दोघा मुलांतील धाकट्याकरता असलेला कायदेशीर वाटा त्याला दिला. (अनुवाद २१:१७) आपली मालमत्ता घाईघाईने गोळा करून हा मुलगा दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजीचे जीवन जगण्यात त्याच्या सर्व पैशांची उधळपट्टी केली.—लूक १५:११-१३.
काही काळानंतर त्या देशात फार मोठा दुष्काळ पडला. त्या मुलाने नाईलाजाने यहुद्यांकरता निषिद्ध असलेले—डुकरे राखण्याचे काम स्वीकारले. (लेवीय ११:७, ८) अन्नाची इतकी मारामार होती की डुकरे ज्या शेंगा खात होती त्या शेंगा खाऊन पोट भरावे असे त्याला वाटले! शेवटी हा मुलगा ताळ्यावर आला. त्याने स्वतःशी विचार केला: ‘माझ्या वडिलांच्या घरी तर चाकरांना देखील माझ्यापेक्षाही चांगले जेवण मिळतं. मी त्यांच्याकडे जाऊन माझे पाप कबूल करीन आणि रोजनदार म्हणून आपल्याला कामाला ठेवावं अशी त्यांना विनंती करीन.’a—लूक १५:१४-१९.
यानंतर या मुलाने घरचा रस्ता धरला. त्याचा अवतार भिकार झाला होता, हे काही सांगायला नको. तरी सुद्धा “तो दूर” होता तेव्हाच त्याच्या वडिलांनी त्याला ओळखले. त्यांना त्याचा कळवळा येऊन ते त्याच्याकडे धावत गेले, त्याला कवटाळले आणि “त्याचे मुके घेतले.”—लूक १५:२०.
या प्रेमळ स्वागतामुळे या मुलाला आपले मन मोकळे करण्यास सुकर झाले. त्याने म्हटले, “बाबा मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे; आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही.” परंतु वडिलांनी त्यांच्या दासांना बोलावून त्यांना आज्ञा दिली: “लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला, आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू; कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.”—लूक १५:२१-२४.
या मोठ्या मेजवानीला संगीताची आणि नृत्याची देखील जोड होती. शेतावरून घरी परतत असताना थोरल्या मुलाला ही सर्व गडबड ऐकू आली. आपला भाऊ घरी आल्यामुळे ही आनंदाची उधळण चालली आहे, हे समजल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकाला भिडली. त्याने त्याच्या वडिलांना तक्रारीच्या सुरात म्हटले: ‘मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी केली आणि तुमची एकही आज्ञा मी कधीही मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण तुमच्या संपत्तीची ज्याने उधळपट्टी केली तो हा मुलगा आल्यावर तुम्ही त्याच्यासाठी मेजवानी ठेवली.’ त्याच्या पित्याने त्याला प्रेमळपणे उत्तर दिले, ‘बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे; तरी आनंद करणे योग्य आहे कारण तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे.’—लूक १५:२५-३२.
आपल्याकरता धडे
येशूच्या दाखल्यातील पिता आपल्या दयाळू यहोवा देवाला सूचित करतो. हरवलेल्या पुत्राप्रमाणे काही लोक काही काळासाठी देवाच्या घराण्याचे संरक्षण त्यागतात परंतु नंतर परतही येतात. यहोवा अशा लोकांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो? प्रांजळ पश्चात्तापानिशी यहोवाकडे परतणाऱ्यांनी या गोष्टीची खात्री बाळगण्यास हवी, “तो सर्वदाच दोष देत राहणार नाही; तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही.” (स्तोत्र १०३:९) या दाखल्यात, पिता आपल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी अक्षरशः धावला. त्याचप्रमाणे, पश्चात्तापी पातक्याला क्षमा करण्यासाठी यहोवा केवळ इच्छुकच नाही, तर उत्सुक देखील आहे. तो ‘क्षमा करण्यात तत्पर’ आहे आणि तो “भरपूर” प्रमाणात क्षमा सुद्धा करतो.—स्तोत्र ८६:५; यशया ५५:७; जखऱ्या १:३.
येशूच्या दाखल्यातील पित्याच्या खऱ्या प्रेमामुळे त्याच्या मुलाला घरी परत येण्याचे धैर्य एकवटण्यास मदत झाली. परंतु विचार करा: पित्याने त्याच्या मुलाला स्वीकारलेच नसते किंवा घरी परत कधीही येऊ नको अशी मोठ्या रागाने त्याला तंबी दिली असती तर काय झाले असते? अशा वागण्यामुळे त्यांच्या दोघांत कायमचीच दरा निर्माण झाली असती.—पडताळा २ करिंथकर २:६, ७.
तर मग थोडक्यात सांगायचे झाल्यास, पित्याच्या प्रांजळ प्रेमाने त्याच्या मुलाला घरी परतण्याचा मार्ग सुकर केला होता. काही वेळा, आजही ख्रिस्ती वडिलांनी अपश्चात्तापी पातक्यांना मंडळीच्या बाहेर काढले पाहिजे. (१ करिंथकर ५:११, १३) असे करताना, पुनःस्वीकार होण्यासाठी पातक्याने काय करण्यास हवे हे प्रेमळपणे दाखविण्याद्वारे ख्रिस्ती वडील पातक्याचा परत येण्याचा मार्ग सुकर करू शकतात. वडिलांनी, अशा मनःपूर्वक केलेल्या विनंतीची आठवण केल्यामुळे आध्यात्मिकरीत्या हरवलेल्यांना पश्चात्ताप करण्यास चालना मिळाली आहे आणि देवाच्या घराण्याकडे परत येण्यास उत्तेजन मिळाले आहे.—२ तीमथ्य ४:२.
दाखल्यातील पित्याने मुलगा परत आल्यानंतर दया देखील व्यक्त केली होती. आपल्या मुलाचा प्रामाणिक पश्चात्ताप ओळखण्यास त्याला जास्त वेळ लागला नाही. आपल्या मुलाच्या पातकांची बारीकसारीक विचारणा करत बसण्याऐवजी त्याने निव्वळ त्याचे स्वागत केले आणि असे करत असताना त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता. ख्रिस्ती या उदाहरणाचे अनुकरण करू शकतात. हरवलेली व्यक्ती मिळाली आहे म्हणून त्यांनी आनंद केला पाहिजे.—लूक १५:१०.
पित्याच्या वर्तनावरून हे स्पष्ट दिसते, की मार्गभ्रष्ट झालेला आपला मुलगा परत येईल अशी त्यांची फार काळापासून आशा होती. अर्थात या पित्याची उत्कंठा, स्वतःचे घराणे सोडलेल्यांसाठी यहोवाला लागलेल्या उत्कंठेची पडछाया आहे. “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.” (तिरपे वळण आमचे.) (२ पेत्र ३:९) यास्तव, स्वतःच्या पातकांबद्दल पश्चात्ताप करणारे या गोष्टीची खात्री बाळगू शकतात, की त्यांना ‘यहोवाच्या सक्षमतेपासून विश्रांतीच्या समयाने’ आशीर्वादित केले जाईल.—प्रेषितांची कृत्ये ३:१९.
[तळटीप]
a दासाला कुटुंबाचा एक भाग म्हणून गणले जात असे परंतु, रोजनदाराला दररोज पगार दिला जात असे आणि त्याला कोणत्याही वेळी नोकरीवरून काढले जाऊ शकत होते. आपल्या वडिलांच्या घरातील सर्वात खालच्या जागेवर काम करण्याची या मुलाने मनाची तयारी केली होती.