जीवनाच्या मार्गावर नेणारा दिवा
“हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) संदेष्टा यिर्मयाच्या या शब्दांनी दाखवून दिले, की मदतीशिवाय जीवनाच्या मार्गावर यशस्वीपणे वाटचाल करणे मानवाला अशक्य आहे. तर मग, ही मदत कोठे मिळू शकेल? यहोवा देवाला केलेल्या आपल्या प्रार्थनेत स्तोत्रकर्ता या प्रश्नाचे उत्तर देतो: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाश आहे.”—स्तोत्र ११९:१०५.
पवित्र बायबलचा अर्थात देवाच्या वचनाचा अभ्यास करणारे आणि त्यात सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणणारे लोक भल्या पहाटे प्रवासाला निघणाऱ्या मनुष्याप्रमाणे आहेत. सुरवातीला, अंधार असल्यामुळे त्याला इतके स्पष्ट दिसू शकत नाही. परंतु जसजसे सूर्य आपले डोके वर काढतो तसतसे त्याला अधिक स्पष्ट दिसायला लागते. अखेरीस, सूर्य त्याच्या डोक्यावर तळपू लागतो. आता त्याला सर्व गोष्टी अगदी स्पष्टपणे दिसू लागतात. अशा प्रकारच्या उदाहरणामुळे आपल्याला बायबलमधील एका नीतिसूत्राची आठवण येते: “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदयप्रकाशासारखा आहे.”—नीतिसूत्रे ४:१८.
परंतु देवाच्या मार्गदर्शनाचा अव्हेर करणाऱ्यांबद्दल काय? बायबल म्हणते: “दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्याला कशाची ठेच लागते हे त्यांस कळत नाही.” (नीतिसूत्रे ४:१९) होय, दुर्जन अंधारात ठेचाळणाऱ्या मनुष्याप्रमाणे आहेत. त्यांना कितीही यश मिळाल्याचे वाटले तरी ते क्षणभंगूर आहे कारण “परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धि व युक्ति ही मुळीच चालत नाहीत.”—नीतिसूत्रे २१:३०.
यास्तव, बायबलचे म्हणजे देवाच्या वचनाचे मार्गदर्शन अनुसरा. तुम्ही असे केल्यास तुम्हाला नीतिसूत्रे ३:५, ६ येथील शब्द खरे असल्याचे दिसून येईल: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”