पाप याविषयी तुमचे काय मत आहे?
“तुझ्याठायी कोणतेच पाप नाही, कोणतीच उणीव नाही; तू तर सर्वशक्तीमान सामर्थ्याचा भांडार आहेस.” सर्वविख्यात हिंदू तत्त्ववेत्ता विवेकानंद यांनी हिंदू धर्माचा पवित्र ग्रंथ भगवद्गीता यातून एका उताऱ्याचे स्पष्टीकरण करताना हे विधान केले होते. वेदान्ताचा उल्लेख करून ते असे प्रतिपादित करतात की, “तू दुर्बल आहेस, तू पापी आहेस असे म्हणणेच सर्वात मोठी चूक आहे.”a
तथापि, मानवाठायी कोणतेच पाप नाही हे खरे आहे का? आणि जन्माच्या वेळेस व्यक्तीला वारशाने नेमके काय प्राप्त होते? हिंदू धर्मगुरू निखिलानंद यांच्या म्हणण्यानुसार, केवळ “शारीरिक वैशिष्ट्ये आनुवंशिकतेने निश्चित केली जातात.” इतर गुणलक्षणे एखाद्याच्या “गत जन्मांतील कर्मांच्या” आधारावर ठरवली जातात. विवेकानंद यांच्या मते, “तुम्ही स्वतःच तुमचे नशीब घडवता.” हिंदू धर्मात मुळातच, वारशाने मिळालेल्या पापाविषयीची शिकवणूक नाही.
वारशाने मिळालेल्या पापाची संकल्पना पारशी, शिन्तो, कन्फुशियन आणि बौद्ध धर्मांतही पाहायला मिळत नाही. यहुदी-ख्रिस्ती धर्मांनी जरी पारंपरिकपणे वारशाने मिळालेल्या पापाचा सिद्धान्त शिकवला असला, तरीसुद्धा या धर्मांतही पापाविषयीचा दृष्टिकोन आज बदलतो आहे. आज वाढत्या संख्येने लोकांना, आपण पापी आहोत असे वाटतच नाही.
कॉर्नील्यस प्लॅन्टिंगा ज्युनियर या धर्मवेत्त्यांनी म्हटल्यानुसार, “आधुनिक विचारसरणी नैतिक धिक्काराचा पुरस्कार करीत नाही; विषेशतः ती आत्म-धिक्काराचा पुरस्कार करीत नाही.” पापाला एक क्षुल्लक बाब बनवण्याचा दोष काही प्रमाणावर ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चेसवर आहे. ड्यूक विद्यापीठाचे एक पाद्री म्हणतात, “पापाविषयी ऐकायचे असेल तर चर्चला जाऊ नका.” आणि प्लॅन्टिंगा यांच्या मते, काही चर्चेस सहसा केवळ सामाजिक वादविषयांच्या संबंधानेच पापाचा उल्लेख करतात.
हल्ली सामाजिक विपत्तींना उधाण आले आहे हे मान्य करावे लागते. हिंसाचार, गुन्हेगारी, युद्धे, वांशिक संघर्ष, मादक पदार्थांचा गैरवापर, फसवेगिरी, जुलूम आणि लहान मुलांवरील हिंसाचाराचे प्रकार बोकाळले आहेत. खरे पाहता, २० व्या शतकाला मानवजातीने पाहिलेले सर्वात रक्तरंजित शतक म्हणण्यात आले आहे. त्यातल्या त्यात आजारपण, वृद्धापकाळ आणि मृत्यू यांमुळे परिणीत होणाऱ्या वेदना आणि दुःख देखील आहेतच. आजच्या जगातील भयंकर समस्यांतून सुटकेसाठी कोण आसूसलेला नाही?
तर मग, पापाविषयी तुमचे मत काय? पाप वारशाने मिळते का? वेदना आणि दुःख यांतून आपण कधीतरी मुक्त होऊ का? पुढील लेख या प्रश्नांवर चर्चा करील.
[तळटीप]
a वेदान्त तत्त्वज्ञान हिंदू शास्त्रांच्या अर्थात वेदांच्या शेवटी आढळणाऱ्या उपनिशदांवर आधारलेले आहे.