अनीतीने भरलेल्या जगात सद्गुणी वर्तन टिकवून ठेवणे
“जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा; ह्यासाठी की, ह्या कुटिल व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे.”—फिलिप्पैकर २:१४, १५.
१, २. देवाने कनानी लोकांचे उच्चाटन करण्याचा आदेश का दिला?
यहोवाच्या आज्ञांच्या संबंधाने तडजोडीचा प्रश्नच उद्भवत नाही. वाग्दत्त देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना मोशेने इस्राएली लोकांना सांगितले: “तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांचा समूळ नाश कर.”—अनुवाद ७:२; २०:१७.
२ यहोवा तर एक दयाळू परमेश्वर आहे, मग त्याने कनान देशातील रहिवाशांचे उच्चाटन करण्याची आज्ञा का दिली? (निर्गम ३४:६) याचे एक कारण असे होते की ‘कनानी लोक आपआपल्या देवांची पूजा करिताना जी अमंगल कृत्ये करीत होते, त्यासारखी करावयाला त्यांनी इस्राएली लोकांना शिकवून तेणेकडून यहोवा परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप करू नये.’ (अनुवाद २०:१८) मोशे पुढे म्हणाला: “ह्या राष्ट्रांच्या दुष्टाईमुळे परमेश्वर त्यांना तुझ्यासमोरून घालवून देत आहे.” (अनुवाद ९:४) कनानी लोक म्हणजे अनीतीचे ज्वलंत उदाहरण होते. लैंगिक अनाचार आणि मूर्तीपूजा त्यांच्या उपासनेची ओळखचिन्हे होती. (निर्गम २३:२४; ३४:१२, १३; गणना ३३:५२; अनुवाद ७:५) गोत्रगमन, समलैंगिकता, आणि पशुगमन हे ‘कनान देशातील चालीरितींना अनुसरून’ होते. (लेवीय १८:३-२५) निष्पाप मुलांचे निष्ठुरपणे खोट्या देवतांसमोर बलिदान दिले जात असे. (अनुवाद १८:९-१२) हे सर्व लक्षात घेता, या राष्ट्रांचे अस्तित्वात राहणे आपल्या लोकांच्या शारीरिक, नैतिक आणि आध्यात्मिक कल्याणाला घातक आहे हे यहोवाने ताडले, यात काही आश्चर्य नाही!—निर्गम ३४:१४-१६.
३. इस्राएली लोकांनी कनानच्या रहिवाशांसंबंधाने देवाने दिलेले आदेश पूर्णपणे अंमलात न आणल्याचा कोणता परिणाम झाला?
३ देवाचे आदेश पूर्णपणे अंमलात न आणल्यामुळे, इस्राएली लोकांनी वाग्दत्त देशावर विजय मिळवला तेव्हा कनानमधील पुष्कळसे रहिवाशी जिवंत बचावले. (शास्ते १:१९-२१) कालांतराने, कनानी लोकांकरवी नकळत झालेला परिणाम जाणवू लागला आणि एक अशी वेळ आली की तेव्हा पुढीलप्रमाणे म्हटले जाऊ शकत होते: “त्यांनी [इस्राएली लोकांनी] त्याचे [यहोवाचे] नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यास पढविलेले त्याचे निर्बंध यांचा त्यांनी अव्हेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्रांप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यास बजाविले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले.” (२ राजे १७:१५) होय, काळाच्या प्रवाहात अनेक इस्राएली लोकांनी नेमकी तीच अनीतिमान कृत्ये आचरली की ज्यांमुळे देवाने कनानी लोकांचा उच्छेद करण्याचा आदेश दिला होता, अर्थात—मूर्तीपूजा, लैंगिक अतिरेक, आणि बालकांचे बलिदान सुद्धा!—शास्ते १०:६; २ राजे १७:१७; यिर्मया १३:२७.
४, ५. (अ) अविश्वासू इस्राएल आणि यहुदा यांचे काय झाले? (ब) फिलिप्पैकर २:१४, १५ येथे कोणता आग्रह करण्यात आला आहे, आणि कोणते प्रश्न उभे राहतात?
४ म्हणूनच संदेष्टा होशेय याने घोषित केले: “इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर या देशाच्या रहिवाश्यांबरोबर वाद करीत आहे. शपथ वाहून ती मोडणे, मनुष्यवध करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे यांस ऊत आला आहे; रक्तपातामागून रक्तपात होत आहेत; ह्यामुळे देश शोक करीत आहे व त्यांतील सर्व रहिवासी व त्यांच्याबरोबर वनपशु व आकाशातील पक्षी म्लान झाले आहेत; समुद्रातले मासेहि नाहीतसे झाले आहेत.” (होशेय ४:१-३) सा.यु.पू. ७४० मध्ये, उत्तरेकडील नीतिभ्रष्ट इस्राएल राष्ट्र अश्शूरी लोकांच्या हाती पराभूत झाले. सुमारे एका शतकानंतर, यहुदाचे अविश्वासू दक्षिणी राज्य बाबेलने हस्तगत केले.
५ आपण स्वतःला अनीतीला वश होऊ दिल्यास ते किती घातक ठरू शकते हे या घटनांवरून स्पष्ट होते. देवाला अधार्मिकतेचा तिटकारा आहे आणि तो ती आपल्या लोकांत खपवून घेणार नाही. (१ पेत्र १:१४-१६) आपण ‘सांप्रतच्या दुष्ट युगात,’ दिवसेंदिवस अधिकाधिक नीतिभ्रष्ट होत चाललेल्या जगात राहात आहोत हे खरे आहे. (गलतीकर १:४; २ तीमथ्य ३:१३) तरीसुद्धा, देवाचे वचन सर्व ख्रिश्चनांना अशा तऱ्हेने वागण्याचा आग्रह करते की ज्यामुळे त्यांनी ‘कुटिल व विपरीत पिढीत निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये ते जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसतात.’ (फिलिप्पैकर २:१४, १५) परंतु आपण अनीतीने भरलेल्या एका जगात सद्गुणी वर्तन कसे काय टिकवून ठेवू शकतो? हे खरोखर सुसाध्य आहे का?
अनीतीने भरलेले रोमी जग
६. सद्गुणी वर्तन टिकवून ठेवणे पहिल्या शतकातील ख्रिश्चनांसाठी एक आव्हान का होते?
६ पहिल्या शतकातील ख्रिश्चनांसाठी सद्गुणी वर्तन टिकवून ठेवणे एक आव्हान होते कारण रोमी समाजातील कणाकणात अनीती भिनलेली होती. रोमी तत्त्ववेत्ता सिनेका यांनी आपल्या समकालीन लोकांविषयी म्हटले: “माणसामाणसांत भयंकर दुष्टपणाची जणू चढाओढ चालली आहे. दिवसेंदिवस दुष्कृत्ये करण्याची इच्छा बळावतेय, आणि त्याविषयीची भीती कमी कमी होत चालली आहे.” त्याने रोमी समाजाची तुलना, “रानटी पशूंच्या समुदायाशी” केली. हे लक्षात घेता, रोमी लोक करमणुकीसाठी विकृत आनंद देणाऱ्या ग्लॅडियेटर्सच्या स्पर्धा आणि अश्लील नाट्यप्रयोगांच्या सतत शोधात असायचे यात नवल ते काय.
७. सा.यु. पहिल्या शतकातील कितीतरी लोकांमध्ये सर्वसामान्य असणाऱ्या अनीतिमान कृत्यांचे पौलाने कसे वर्णन केले?
७ पुढील शब्द लिहिताना प्रेषित पौलाच्या मनात पहिल्या शतकातील लोकांचे नीच वर्तन असावे, तो म्हणतो: “देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले. तसेच पुरुषांनीहि स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून परस्परे कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांबरोबर अनुचित कर्म केले आणि त्यांनी आपल्या भ्रांतीचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले.” (रोमकर १:२६, २७) रोमी समाज अशुद्ध शारीरिक वासनांनी झपाटलेला असल्यामुळे तो अनीतीत आकंठ बुडाला.
८. ग्रीक आणि रोमी समाजात सहसा मुलांचे कशाप्रकारे शोषण होत असे?
८ रोमी लोकांत समलैंगिकता किती प्रमाणात अस्तित्वात होती याविषयी इतिहासात सुस्पष्ट माहिती सापडत नाही. तथापि, त्यांच्या ग्रीक पूर्वजांत ती मोठ्या प्रमाणात प्रचलित होती आणि या पूर्वजांचा त्यांच्यावर प्रभाव असावा यात काही शंका नाही. वयस्क पुरुषांकरवी अल्पवयीन मुलांना भ्रष्ट केले जाणे सर्वसामान्य होते; सहसा या मुलांना शिष्य-गुरूच्या नातेसंबंधात घेऊन त्यांची विकृत लैंगिक वर्तनाकडे दिशाभूल केली जात असे. निर्विवादपणे, अशा अनीतीमागे आणि मुलांशी केलेल्या दुर्व्यवहारामागे सैतान आणि त्याच्या दुष्टात्म्यांचाच हात होता.—योएल ३:३; यहूदा ६, ७.
९, १०. (अ) वेगवेगळ्या प्रकारच्या अनीतिमान कृत्यांचा १ करिंथकर ६:९, १० येथे कशाप्रकारे निषेध करण्यात आला आहे? (ब) करिंथच्या मंडळीत काहींची पार्श्वभूमी कशाप्रकारची होती आणि त्यांच्यात कोणता बदल घडून आला?
९ देवाच्या प्रेरणेने लिहिताना, पौलाने करिंथ येथील ख्रिश्चनांना सांगितले: “अनीतिमान् माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही; आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान् ठरविलेले असे झाला.”—१ करिंथकर ६:९-११.
१० “जारकर्मी” लोकांना “देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही” असे म्हणून पौलाच्या प्रेरित पत्रात लैंगिक अनैतिकतेला अशा रितीने निंद्य ठरवण्यात आले. तथापि, बरीचशी अनैतिक कृत्ये सूचीबद्ध केल्यानंतर पौल म्हणाला: “तुम्हापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही . . . धुतलेले . . . असे झाला.” देवाच्या मदतीने, दुष्कृत्ये करणाऱ्यांना त्याच्या नजरेत निष्कलंक होणे सुसाध्य होते.
११. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांची त्यांच्या काळातील दुष्ट वातावरणात कशी स्थिती होती?
११ होय, पहिल्या शतकातील अनीतीने भरलेल्या जगातही ख्रिश्चनांचे सद्गुणी वर्तन उन्नत होत गेले. सत्य मानणाऱ्यांचे ‘मनाच्या नवीनीकरणाने रूपांतर’ झाले. (रोमकर १२:२) त्यांनी आपले ‘पूर्वीचे आचरण’ त्यागले आणि ते त्यांच्या ‘मनोवृत्तीत नवे केले गेले.’ अशा रितीने त्यांनी जगाच्या अनीतीकडे पाठ फिरवून ‘सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण केला.’—इफिसकर ४:२२-२४.
आजचे अनीतीने भरलेले जग
१२. सन १९१४ पासून जगात कोणता बदल घडून आला आहे?
१२ आपल्या काळाविषयी काय? आपण ज्या जगात राहात आहोत, त्यात तर अनीती पूर्वी कधी नव्हती इतकी बोकाळली आहे. विशेषतः १९१४ पासून सबंध जगाचा नैतिक ऱ्हास होत गेला आहे. (२ तीमथ्य ३:१-५) सद्गुणी वर्तन, नैतिकता, अब्रू, आणि नीतीतत्त्वे यांविषयीच्या पारंपरिक विचारांचा अव्हेर करून काही जणांची विचारसरणी आत्मकेंद्रित आणि ‘कोडगी’ झाली आहे आणि त्यांनी स्वतःला अशी ‘अशुद्धता करण्यासाठी वाहून घेतले आहे.’ (इफिसकर ४:१९) न्यूजवीक नियतकालिकाने म्हटल्यानुसार: “आपण नैतिक सापेक्षवादाच्या युगात राहात आहोत;” त्यात पुढे असे म्हटले होते की सध्याच्या नैतिक वातावरणाने “चांगले काय आणि वाईट काय याविषयीच्या कल्पनांना वैयक्तिक आवडीचे, भावनात्मक पसंतीचे आणि सांस्कृतिक निवडीचे मुद्दे बनवून टाकले आहे.”
१३. (अ) आजची पुष्कळशी करमणुकीची साधने अनीतीला कशाप्रकारे बढावा देतात? (ब) अवांच्छनीय करमणुकीचा लोकांवर कोणता वाईट परिणाम होऊ शकतो?
१३ पहिल्या शतकात होती त्याप्रमाणे नीच प्रकारची करमणूक आज सर्वसामान्य आहे. टीव्ही, रेडिओ, सिनेमा आणि व्हिडियो यांच्या माध्यमाने सतत उपलब्ध होणाऱ्या लैंगिक स्वरूपाच्या साहित्याला जणू अंतच नाही. अनीतीने संगणक जाळ्यांना देखील व्यापून टाकले आहे. सध्याच्या संगणक जाळ्यांवर बीभत्स चित्रे आणि लिखाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत; विविध वयोगटांतील व्यक्ती यांचा वापर करतात. या सर्व गोष्टींचा काय परिणाम घडून येतो? एका वर्तमानपत्रासाठी लिहिणारे लेखक म्हणतात, “रक्तपात, निरर्थक हिंसा आणि थिल्लर सेक्स यांचा आपल्या लोकसंस्कृतीवर सतत भडिमार होतो तेव्हा साहजिकच आपण त्यांना, अर्थात रक्तपात, निरर्थक हिंसा आणि थिल्लर सेक्स यांसारख्या प्रकारांना रुळून जातो. आपण निबर होत जातो. कालांतराने आपल्याला काहीही धक्कादायक वाटत नाही, नीतीभ्रष्टता अधिकाधिक सहनीय होत जाते.”—पडताळा १ तीमथ्य ४:१, २.
१४, १५. लैंगिक नैतिकतेचा सबंध जगात ऱ्हास झाला असल्याचा कोणता पुरावा आहे?
१४ द न्यूयॉर्क टाइम्स यामधील हे वृत्त विचारात घ्या: “पंचवीस वर्षांपूर्वी अविवाहित जोडप्यांचे एकत्र राहणे धक्कादायक वाटले असते, पण आता मात्र ही एक स्वीकृत जीवनपद्धती बनली आहे. [अमेरिकेत] १९८० ते १९९१ दरम्यान, लग्न करण्याऐवजी एकत्र राहणे अधिक पसंत करणाऱ्या जोडप्यांच्या संख्येत ८० टक्के वाढ झाली.” पण असले प्रकार फक्त उत्तर अमेरिकेतच घडू शकतात अशातला भाग नाही. एशियावीक नियतकालिकाच्या वृत्तानुसार: “सबंध [आशियात] देशोदेशी एका सांस्कृतिक वादाने खळबळ माजवली आहे. हा वाद लैंगिक स्वातंत्र्याविरुद्ध पारंपरिक मूल्ये यांमध्ये असून क्रांती घडवून आणण्याकरता दबाव सतत वाढतो आहे.” आकडेवारीनुसार पुष्कळशा देशांत व्यभिचार आणि विवाहपूर्व लैंगिक संबंधांना वाढत्या प्रमाणात मान्यता मिळू लागली आहे.
१५ आपल्या दिवसांत सैतानी कार्यांना ऊत येईल असे बायबलने पूर्वभाकीत केले होते. (प्रकटीकरण १२:१२) यामुळे अनीती धक्कादायक प्रमाणात फोफावलेली आहे याविषयी आपल्याला तरी नवल वाटायला नको. उदाहरणार्थ, लहान मुलांच्या लैंगिक शोषणाने तर जणू एका भयंकर महारोगाचे रूप धारण केले आहे.a युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड याचे असे वृत्त आहे की “जगातल्या जवळजवळ प्रत्येकच देशात, व्यावसायिक उद्देशांसाठी केलेल्या लैंगिक शोषणामुळे मुलांचे भयंकर नुकसान होत आहे.” दरवर्षी “जगभरात दहा लाखाहून अधिक मुलांना शरीरविक्रय करण्यास भाग पाडले जाते, त्यांची लैंगिक उद्देशांसाठी खरेदी-विक्री केली जाते, आणि अश्लील साहित्याच्या निर्मितीसाठी त्यांचा उपयोग केला जातो.” समलैंगिकता देखील सर्वसामान्य झाली आहे; काही राजकीय आणि धार्मिक पुढारीच, एक “वैकल्पिक जीवन-शैली” म्हणून समलैंगिकतेचा पुरस्कार करतात.
जगाच्या अनीतिमान गोष्टींना अव्हेरणे
१६. लैंगिक नैतिकतेच्या बाबतीत यहोवाचे साक्षीदार कोणती भूमिका घेतात?
१६ यहोवाचे साक्षीदार लैंगिक नैतिकतेविषयी स्वैराचारी दर्जे पत्करणाऱ्यांच्या होस हो देत नाहीत. तीत २:११, १२, १३ म्हणते: “सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे; तो आपल्याला असे शिकवितो की . . . आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने, व सुभक्तीने वागावे.” होय, आपण विवाहपूर्व लैंगिक संबंध, व्यभिचार आणि समलैंगिक कृत्यांसारख्याb अनीतिमान गोष्टींविषयी खऱ्या अर्थाने तिरस्कार, द्वेष विकसित करतो. (रोमकर १२:९; इफिसकर ५:३-५) पौल आपल्याला आग्रह करतो: “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर राहावे.”—२ तीमथ्य २:१९.
१७. खऱ्या ख्रिश्चनांचा मद्यार्कयुक्त पेये घेण्याविषयी कसा दृष्टिकोन आहे?
१७ खरे ख्रिस्तीजन क्षुल्लक भासणाऱ्या अनीतिमान गोष्टींविषयी जगाच्या दृष्टिकोनाचा अव्हेर करतात. उदाहरणार्थ, आज अनेक लोक मद्याच्या दुरुपयोगाविषयी कानाडोळा करतात. पण यहोवाचे लोक मात्र इफिसकर ५:१८ येथे दिलेला सल्ला मनावर घेतात: “द्राक्षारसाने मस्त होऊ नका, द्राक्षारसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा.” एखाद्या ख्रिश्चनाला मद्यपान करायचे असल्यास तो ते संतुलित प्रमाणात करतो.—नीतिसूत्रे २३:२९-३२.
१८. कौटुंबिक सदस्यांशी व्यवहार करताना यहोवाच्या सेवकांना बायबलच्या तत्त्वांकरवी कशाप्रकारे मार्गदर्शन मिळते?
१८ पतिपत्नी यांचे एकमेकांवर किंवा मुलांवर ओरडाओरड करणे अथवा खोचक शब्दांनी अपमान करणे हे चालण्यासारखे आहे असा जगात काहींचा दृष्टिकोन आहे, पण यहोवाचे साक्षीदार या नात्याने, आपण याही दृष्टिकोनाचा अव्हेर करतो. सद्गुणी मार्गात चालत राहण्याचा निर्धार करून, ख्रिस्ती पती आणि पत्नी, “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीहि एकमेकांना क्षमा करा,” हा पौलाचा सल्ला आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात.—इफिसकर ४:३१, ३२.
१९. व्यापारी जगात अनीती केवढ्या प्रमाणात अस्तित्वात आहे?
१९ अप्रामाणिकता, दगलबाजी, लबाडी, व्यापारातील गळेकापू डावपेच, आणि चोरी देखील आज सर्वसामान्य बनली आहे. सीएफओ नावाच्या एका व्यापारविषयक नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका लेखातील वृत्तानुसार: “४,००० कर्मचाऱ्यांच्या एका सर्वेक्षणातून . . . असे दिसून आले की सहभाग घेतलेल्यांपैकी ३१ टक्के जणांनी गत वर्षादरम्यान ‘गंभीर दुर्वर्तन’ होताना स्वतः पाहिलेले होते.” या दुर्वर्तनात लबाडी, अफरातफर, लैंगिक छळ आणि चोरी यांचा समावेश होता. आपल्याला यहोवाच्या लेखी नैतिकदृष्ट्या निष्कलंक राहायचे असल्यास आपण अशाप्रकारचे वर्तन टाळून आपल्या सर्व आर्थिक व्यवहारांत प्रामाणिक राहिले पाहिजे.—मीखा ६:१०, ११.
२०. ख्रिश्चनांनी ‘द्रव्याच्या लोभापासून’ मुक्त असणे का आवश्यक आहे?
२० एका आर्थिक जोखिमेत आपल्याला आकस्मिक धनलाभ झाल्यास देवाच्या सेवेकरता आपल्याला जास्त वेळ मिळू शकेल असे समजणाऱ्या एका माणसाचे काय झाले ते पाहा. त्याने भावी नफ्याविषयी अतिशयोक्ती करून इतरांनाही एका गुंतवणुकीच्या योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त केले. पण मोठा नफा मिळण्याच्या त्याच्या कल्पना साकार होऊ शकल्या नाहीत तेव्हा, जे प्रचंड नुकसान झाले, त्याची भरपाई करण्यासाठी तो इतका उतावीळ झाला की त्याच्याजवळ विश्वासाने ठेवलेले पैसेच त्याने चोरून वापरले. त्याच्या कृत्यांमुळे आणि अपश्चात्तापी वृत्तीमुळे त्याला ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करण्यात आले. “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे,” या बायबलच्या इशाऱ्यात खरोखर किती सत्य आहे!—१ तीमथ्य ६:९, १०.
२१. जगातील सत्ताधारी माणसांचे आचरण सहसा कसे असते, पण ख्रिस्ती मंडळीत जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांचे वर्तन कसे असावे?
२१ ज्यांच्या हातात सत्ताधिकार आहे अशा जगिक माणसांत सहसा सद्गुणांचा अभाव आढळतो; ‘सत्ता आली की सत्त्व जाते,’ या उक्तीची सत्यता ते पटवून देतात. (उपदेशक ८:९) काही देशांत, लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे इतर प्रकारही न्यायाधीश, पोलिस अधिकारी आणि राजकारण्यांच्या अंगवळणी पडले आहेत. तथापि, ख्रिस्ती मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांनी सद्गुणी असले पाहिजे, त्यांनी इतरांवर अधिकार गाजवू नये. (लूक २२:२५, २६) वडील, तसेच सहायक सेवक देखील “द्रव्यलोभाने” सेवा करीत नाहीत. श्रीमंत बनविण्याचे आमिष दाखवून त्यांचे निर्णय फिरवण्याचा किंवा विशिष्ट निर्णय घेण्याकरता त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास, अशा प्रयत्नांचा त्यांनी स्वतःवर कोणताही परिणाम होऊ देऊ नये.—१ पेत्र ५:२; निर्गम २३:८; नीतिसूत्रे १७:२३; १ तीमथ्य ५:२१.
२२. पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?
२२ सर्वसामान्यपणे, ख्रिस्तीजन या अनीतिमान जगात सद्गुणी वर्तन टिकवून ठेवण्याच्या सद्यकाळातील आव्हानाला यशस्वीपणे तोंड देत आहेत. तरीसुद्धा, सद्गुणी वर्तनात दुष्कर्म टाळण्याव्यतिरिक्त आणखीही पुष्कळ गोष्टींचा समावेश आहे. सद्गुण विकसित करण्यासाठी खरे पाहता काय आवश्यक आहे याविषयी पुढील लेखात चर्चा करण्यात येईल.
[तळटीपा]
a सावध राहा! ऑक्टोबर ८, १९९३ (इंग्रजी) अंकातील, “तुमच्या मुलांचे संरक्षण करा!,” ही लेखश्रृंखला पाहा.
b पहिल्या शतकातील काहींनी केल्याप्रमाणे, गतकाळात ज्यांनी समलैंगिक कृत्ये केलेली आहेत, ते आपल्या वर्तनात परिवर्तन करू शकतात. (१ करिंथकर ६:११) सावध राहा! मार्च २२, १९९५ (इंग्रजी) अंकात २१-३ पृष्ठांवर याविषयी उपयोगी माहिती सादर करण्यात आली होती.
उजळणीचे मुद्दे
◻ देवाने कनानी लोकांचे उच्चाटन करण्याचा आदेश का दिला?
◻ पहिल्या शतकात कोणती अनीतिमान कृत्ये सर्वसामान्य होती, आणि अशा वातावरणात ख्रिश्चनांची काय स्थिती होती?
◻ सन १९१४ पासून जगव्याप्त प्रमाणावर नैतिक ऱ्हास झाला आहे यासाठी कोणता पुरावा आहे?
◻ यहोवाच्या लोकांनी कोणत्या सर्वसामान्य अनीतिमान कृत्यांचा अव्हेर केला पाहिजे?
[९ पानांवरील चित्र]
सभोवतालचे जग अनीतीने भरलेले असले तरीसुद्धा पहिल्या शतकातील ख्रिस्तीजन सद्गुणी होते
[१० पानांवरील चित्र]
अनीतीने संगणक जाळ्यांना देखील व्यापून टाकले आहे, ज्यामुळे आता अनेक तरुणांना आणि इतरांनाही अश्लील साहित्य सहज प्राप्त करता येते
[१२ पानांवरील चित्र]
ख्रिस्तीजनांनी सद्गुणी वर्तन टिकवून ठेवले पाहिजे, त्यांनी इतरांच्या अप्रामाणिक डावपेचांचे अनुकरण करू नये