‘यहोवा आपल्या लोकांचा त्याग करणार नाही’
“नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो.”—स्तोत्र ३४:१९.
१, २. (अ) यहोवा आज आपल्या लोकांना आशीर्वादित कसे करीत आहे? (ब) अनेक ख्रिस्ती कशाचा सामना करीत आहेत, व कोणती प्रश्ने उद्भवतात?
बायबल भविष्यवाणीच्या पूर्णतेत, यहोवाच्या उपासकांचे आध्यात्मिक परादीसमध्ये वास्तव्य आहे. (२ करिंथकर १२:१-४) यहोवाचे साक्षीदार, प्रेम आणि ऐक्य ही वैशिष्ट्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय बंधुसमाजाचे भाग आहेत. (योहान १३:३५) त्यांना बायबल सत्यांचे सखोल आणि बहुव्यापक ज्ञान आहे. (यशया ५४:१३) यहोवा त्यांना त्याच्या आध्यात्मिक मंडपात पाहुणे होण्याचा सुहक्क देत आहे याबद्दल ते त्याचे खूप आभार मानतात!—स्तोत्र १५:१.
२ यहोवाच्या संघटनेतील सर्वच लोक आध्यात्मिक समृद्धता उपभोगत असले तरीसुद्धा असे दिसते, की काही जण सापेक्षरीत्या शांती व सुखात आहेत तर इतरांना या नाही तर त्या प्रकारच्या पिडा भोगाव्या लागतात. पुष्कळ ख्रिस्ती दीर्घकाळपर्यंत दयनीय स्थितीत असतात व या स्थितीतून त्यांना सुटका मिळेल असा आशेचा किरण त्यांना दिसत नाही. अशा परिस्थितीत निरुत्साहित होणे साहजिक आहे. (नीतिसूत्रे १३:१२) ही संकटे देवाच्या कोपाचा पुरावा आहेत का? यहोवा काही ख्रिश्चनांना खास संरक्षण देऊन इतरांकडे दुर्लक्ष करतो का?
३. (अ) यहोवाचे लोक अनुभवत असलेल्या संकटांसाठी यहोवा जबाबदार आहे का? (ब) यहोवाच्या विश्वासू उपासकांनासुद्धा मानवी दुःखाचा सामना का करावा लागतो?
३ बायबल म्हणते: “कोणाची परीक्षा होत असता, देवाने मला मोहांत घातले, असे त्याने म्हणू नये; कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहांत पाडीत नाही.” (याकोब १:१३) यहोवा त्याच्या लोकांचा संरक्षक व आधार आहे. (स्तोत्र ९१:२-६) “परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही.” (स्तोत्र ९४:१४) याचा अर्थ, विश्वासू उपासकांना दुःखाचा अनुभव कधी येणारच नाही असा होत नाही. सध्याच्या जगिक व्यवस्थीकरणावर, वारशाने अपरिपूर्णता मिळालेल्या लोकांचे शासन आहे. पुष्कळजण भ्रष्ट आहेत तर काही लोक प्रत्यक्षात दुष्ट आहेत. यांतील कोणालाही यहोवाकडील सुज्ञता नको. यामुळे बरेच मानवी दुःख उद्भवते. यहोवाचे लोक नेहमीच मानवी अपरिपूर्णतेचे व दुष्टाईचे दुःखद परिणाम टाळू शकत नाहीत हे बायबल स्पष्टपणे सांगते.—प्रेषितांची कृत्ये १४:२२.
एकनिष्ठ ख्रिस्ती दुःखाची अपेक्षा करतात
४. या दुष्ट व्यवस्थीकरणात जगत असताना सर्व ख्रिस्ती कशाची अपेक्षा करू शकतात व का?
४ येशूचे अनुयायी जगाचे भाग नसले तरीसुद्धा या व्यवस्थीकरणात राहतात. (योहान १७:१५, १६) सैतान या जगामागची वर्चस्व गाजवणारी शक्ती असल्याचे बायबलमध्ये उघडपणे सांगितले आहे. (१ योहान ५:१९) म्हणूनच सर्व ख्रिश्चन, आपल्याला केव्हा ना केव्हा तरी गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागेल अशी अपेक्षा करू शकतात. हे लक्षात ठेवून प्रेषित पेत्र म्हणाला: “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो; त्याच्याविरुद्ध विश्वासांत दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगांतील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” (१ पेत्र ५:८, ९) होय, ख्रिश्चनांचा अख्खा समाज दुःखाची अपेक्षा करू शकतो.
५. विश्वासू ख्रिश्चनांना जीवनात कटू अनुभव येतील हे येशूने कसे स्पष्ट केले?
५ आपण यहोवावर हृदयापासून प्रेम करीत असलो व त्याच्या तत्त्वांशी एकनिष्ठ असलो तरीसुद्धा आपल्या जीवनात कटू अनुभव येतीलच. याबद्दलचे स्पष्टीकरण येशूने मत्तय ७:२४-२७ मध्ये लिहून ठेवलेल्या त्याच्या दाखल्यात दिले. तेथे त्याने त्याच्या वचनांचे पालन करणाऱ्या व न करणाऱ्यांमधील फरक दाखवला. त्याने आज्ञाधारक शिष्यांची तुलना, खडकावर आपले घर बांधणाऱ्या सुज्ञ मनुष्याबरोबर केली. आज्ञा न मानणाऱ्यांची तुलना त्याने, आपले घर वाळूवर बांधणाऱ्या मूर्ख माणसाबरोबर केली. जोरदार वादळानंतर, खडकावर बांधलेल्याचेच घर टिकून राहते. सुज्ञ मनुष्याच्या घराच्या बाबतीत “पाऊस पडला, पूर आला, वाराहि सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही.” सुज्ञ मनुष्य नेहमीच शांतीसुखात राहील असे अभिवचन येशूने दिले नाही. उलट, त्या मनुष्याची सुज्ञता, सुसाट्याच्या वाऱ्याला तोंड देण्यास त्याला सज्ज करणार होती. बी पेरणाऱ्याच्या दाखल्यातही हाच विचार मांडला आहे. त्यात येशू म्हणतो, की ‘सालस व चांगल्या अंतःकरणाचे’ आज्ञाधारक उपासकही “धीराने फळ” देतील.—लूक ८:४-१५.
६. अग्नीरोधक वस्तूंबद्दल पौलाने दिलेल्या दाखल्यात कोणाची अग्नीपरीक्षा होते?
६ करिंथकरांना पत्र लिहिताना प्रेषित पौलाने, परीक्षांना तोंड देण्यात आपली मदत करू शकतील अशा टिकाऊ गुणांच्या गरजेचे स्पष्टीकरण देण्याकरता रूपक भाषा वापरली. सोने, रूपे, आणि मौल्यवान खड्यांसारख्या अग्नीरोधक धातुंचा ईश्वरी गुणांशी मेळ बसतो. (पडताळा नीतिसूत्रे ३:१३-१५; १ पेत्र १:६, ७.) दुसऱ्या बाजूला पाहता, शारीरिक गुणलक्षणांची तुलना शीघ्रज्वालाग्राही वस्तुंशी केली आहे. मग पौल म्हणतो: “बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल; तो दिवस ते उघडकीस आणील; कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल.” (१ करिंथकर ३:१०-१४) आपल्या सर्वांना कोणत्या ना कोणत्या तरी अग्नी परीक्षेला तोंड द्यावे लागेल असे बायबल येथे पुन्हा एकदा स्पष्ट करते.
७. रोमकर १५:४ नुसार शास्त्रवचने आपल्याला परीक्षांचा सामना करण्यास कशी मदत करू शकतात?
७ बायबलमध्ये देवाच्या एकनिष्ठ सेवकांचे अनेक अहवाल आहेत ज्यांना संकटांचा सामना करावा लागला, काहींना तर दीर्घकाळापर्यंत संकटे सोसावी लागली. तरीसुद्धा, यहोवाने त्यांचा त्याग केला नाही. प्रेषित पौलाच्या मनात बहुधा अशीच उदाहरणे असावीत जेव्हा त्याने म्हटले: “धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले.” (रोमकर १५:४) देवासोबत घनिष्ट नातेसंबंध राखून असतानाही पुष्कळ संकटांचा सामना करावा लागला अशा तीन मनुष्यांच्या उदाहरणांना विचारात घ्या.
बायबल अहवालांवरून आपण काय शिकतो
८. योसेफाच्या बाबतीत यहोवाने कशास अनुमती दिली व किती काळापर्यंत?
८ याकोबाच्या मुलावर अर्थात योसेफावर लहानपणापासूनच यहोवाचा लोभ होता. तरीसुद्धा, त्याची काहीएक चूक नसतानाही त्याच्यावर एकावर एक संकटे कोसळली. त्याच्या स्वतःच्या भावांनीच त्याला पळवून नेऊन क्रूरतेने वागवले. त्याला एका अनोळखी देशात दास म्हणून विकण्यात आले जेथे त्याच्यावर खोटा आरोप लावून “बंदिखान्यात” डांबण्यात आले. (उत्पत्ति ४०:१५) तेथे “त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली; त्याच्या गळ्यात लोखंडी कडे अडकविले.” (स्तोत्र १०५:१७, १८) योसेफाने दास्यत्वात व बंदिखान्यात असताना मुक्तीसाठी यहोवाकडे अनेक वेळा विनंती केली यात काहीच संशय नाही. यहोवाकडून विविध मार्गांनी बळकटी मिळालेली असतानाही जवळजवळ १३ वर्षांपर्यंत तो दास किंवा कैदी म्हणूनच राहिला.—उत्पत्ति ३७:२; ४१:४६.
९. दाविदाला अनेक वर्षांपर्यंत काय सहन करावे लागले?
९ दाविदाची अशीच कहाणी आहे. इस्राएलवर राज्य करण्याकरता यहोवा एका पात्र मनुष्याची निवड करत असताना तो म्हणाला: “इशायाचा पुत्र दावीद मला माझ्या मनासारखा मिळाला आहे.” (प्रेषितांची कृत्ये १३:२२) दाविदाने यहोवाचा लोभ संपादला असला तरी त्याला पुष्कळ दुःख सहन करावे लागले. जिवाला धोका असताना, तो अनेक वर्षांपर्यंत गुहांमध्ये, खिंडींत व अनोळखी देशात लपून राहिला. जंगली श्वापदाप्रमाणे त्याचा पिच्छा पुरविला जात असल्यामुळे तो निरुत्साहित झाला व घाबरून गेला. तरीसुद्धा, यहोवाच्या सामर्थ्यामुळे तो टिकला. दावीद यथायोग्यपणे आपल्या स्वानुभवावरून म्हणू शकला की: “नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो.”—स्तोत्र ३४:१९.
१०. नाबोथ आणि त्याच्या कुटुंबावर कोणते कठीण संकट ओढवले?
१० संदेष्टा एलीयाच्या दिवसांत, इस्राएलमध्ये केवळ ७,००० लोकांनी खोटे दैवत बआलापुढे गुडघे टेकले नव्हते. (१ राजे १९:१८; रोमकर ११:४) यांपैकी कदाचित नाबोथ होता ज्याच्यावर घोर अन्याय झाला. ईशनिंदा केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आल्यामुळे त्याची खूप अवहेलना करण्यात आली. दोषास्पद ठरल्यामुळे व राजसी हुकूमाप्रमाणे त्याला दगडमाराची शिक्षा झाली; कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून खाल्ले. त्याच्या पुत्रांनाही ठार मारण्यात आले! पण खरे तर तो निष्पाप होता. त्याच्याविरुद्ध साक्ष देणारे लबाड होते. नाबोथाच्या द्राक्षमळ्यावर राजाला आपला हक्क गाजवता यावा म्हणून ईजबेल राणीने त्याला ठार मारण्याचा हा डाव रचला होता.—१ राजे २१:१-१९; २ राजे ९:२६.
११. प्रेषित पौल आपल्याला बायबल इतिहासातील विश्वासू पुरूष व स्त्रियांविषयी काय सांगतो?
११ योसेफ, दावीद आणि नाबोथ हे बायबलमधील संकटे सहन केलेल्या अनेक विश्वासू पुरुष व स्त्रियांतील केवळ तीन जण आहेत. प्रेषित पौलाने कित्येक वर्षांपासून असलेल्या यहोवाच्या सेवकांचा ऐतिहासिक अहवाल लिहून काढला. त्यात तो त्यांच्याविषयी बोलला ज्यांना “टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाहि अनुभव आला; त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तरवारीच्या धारेने मेले; ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत; ते लाचार, पीडित, त्रासलेले, असे होते; त्यांना जग योग्य नव्हते; ते अरण्यांतून, डोंगरातून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत.” (इब्री लोकांस ११:३६-३८) पण यहोवाने त्यांचा त्याग केला नाही.
दुःख सहन करणाऱ्यांची यहोवा काळजी घेतो
१२. यहोवाच्या साक्षीदारांना आज कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे?
१२ आज यहोवाच्या लोकांविषयी काय? संघटना या नात्याने, आपण ईश्वरी संरक्षणाचा व शेवटल्या काळातून व महान संकटातून सुखरूप पार होण्याचा भरवसा ठेवू शकतो. (यशया ५४:१७; प्रकटीकरण ७:९-१७) परंतु, व्यक्ती या नात्याने आपण जाणले पाहिजे, की “आपत्तीचा काल” सर्व मानवांना येतो. (उपदेशक ९:११, सुबोध भाषांतर) आज दुःख सहन करणारे अनेक विश्वासू ख्रिस्ती आहेत. काही जण अठराविश्वे दारिद्र्यात आहेत. संकटात असलेल्या ‘अनाथ व विधवा’ ख्रिश्चनांविषयी बायबल बोलते. (याकोब १:२७) इतर जण नैसर्गिक आपत्ती, युद्धे, गुन्हेगारी, सत्तेचा दुरुपयोग, आजारपण व मृत्यू यामुळे दुःखी आहेत.
१३. कोणत्या वाईट अनुभवांचा अलिकडेच अहवाल देण्यात आला होता?
१३ उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाला १९९६ चा अहवाल देताना वॉच टावर शाखा कार्यालयांनी सांगितले, की आपले काही बंधू व भगिणी, बायबल तत्त्वांशी जडून राहिल्यामुळे शोचनीय परिस्थितीत बंदिवासात आहेत. एका दक्षिण अमेरिकन देशात, गनिमी गटांनी शेकडो साक्षीदारांना जागा खाली करून जाण्यास सांगितले तेव्हा तीन मंडळ्या रद्द करण्यात आल्या. एका पश्चिम आफ्रिकन देशात, यादवी युद्धाच्या चकमकीत सापडलेल्या काही साक्षीदारांना आपले प्राण गमवावे लागले. एका मध्य अमेरिकन देशात, काही बांधवांची आधीच कठीण असलेली आर्थिक परिस्थिती वादळाच्या तडाख्यामुळे आणखीनच बिकट झाली. इतर ठिकाणी, गरिबी व अन्नटंचाई गंभीर समस्या नसतील पण काहींवर नकारात्मक प्रभावांचा इतका परिणाम होईल, की त्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडेल. इतर आधुनिक दिवसांतील जीवनाच्या दबावांमुळे भारावून गेले आहेत. राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना जनतेची उदासीनता पाहून काहीजण निरुत्साहित होऊ शकतात.
१४. (अ) ईयोबाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? (ब) नकारात्मक विचार करण्याऐवजी, संकटाचा सामना करताना आपण काय केले पाहिजे?
१४ अशा परिस्थिती देवाच्या कोपाचा पुरावा आहेत असा आपण अर्थ लावू नये. ईयोब आणि त्याने सहन केलेल्या अनेक संकटांची आठवण करा. तो “सात्विक, सरळ” मनुष्य होता. (ईयोब १:८) अलीफजने ईयोबावर अपराध केल्याचा आरोप केला तेव्हा ईयोब किती निराश झाला असेल बरे! (ईयोब, अध्याय ४, ५, २२) आपण यहोवाला कोणत्यातरी मार्गाने निराश केल्यामुळे किंवा यहोवाने आपल्यावरून त्याचे आशीर्वाद काढून घेतल्यामुळे आपण संकटे अनुभवत आहोत अशा निष्कर्षाप्रत आपण मुळीच येऊ नये. संकटाच्या वेळी नकारात्मक विचार आपला विश्वास कमजोर करू शकतात. (१ थेस्सलनीकाकर ३:१-३, ५) विपत्तीत असताना काहीही झाले तरी, यहोवा आणि येशू धार्मिकांना आधार देतात या वस्तुस्थितीवर मनन करणे चांगले आहे.
१५. यहोवाच्या लोकांना ज्या विपत्तींना तोंड द्यावे लागते त्याबद्दल त्याला खूप चिंता वाटते हे आपल्याला कसे माहीत होते?
१५ “ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश, आपत्ती, छळणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्त करतील काय? . . . माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, बले, उंची खोली, किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही,” असे म्हणून प्रेषित पौल आपल्याला धीर देतो. (रोमकर ८:३५, ३८, ३९) यहोवाला अंतःकरणापासून आपली काळजी आहे व त्याला आपल्या दुःखांची जाणीव आहे. परागंदा असताना दाविदाने लिहिले: “परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात; त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” (स्तोत्र ३४:१५, १८; मत्तय १८:६, १४) आपला स्वर्गीय पिता आपली काळजी वाहतो व दुःख भोगणाऱ्यांची त्याला दया येते. (१ पेत्र ५:६, ७) आपल्यावर कसलेही दुःख ओढवले तरी तो आपल्याला सहन करायला जे आवश्यक ते पुरवतो.
यहोवाच्या देणग्या आपल्याला टिकवून ठेवतात
१६. यहोवाकडची कोणती तरतूद आपल्याला सहन करण्यास साहाय्य करते व कसे?
१६ या जुन्या व्यवस्थीकरणात संकट-मुक्त जीवनाची आपण अपेक्षा करू शकत नसलो तरीसुद्धा आपला “कोंडमारा झाला नाही.” (२ करिंथकर ४:८, ९) येशूने आपल्या अनुयायांना कैवारी पाठवण्याचे अभिवचन दिले. तो म्हणाला: “मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.” (योहान १४:१६, १७) सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ च्या दिवशी प्रेषित पेत्राने त्याच्या श्रोत्यांना सांगितले, की ते ‘पवित्र आत्म्याचे मोफत दान’ प्राप्त करू शकत होते. (प्रेषितांची कृत्ये २:३८) पवित्र आत्मा आज आपल्याला साहाय्य करीत आहे का? होय! यहोवाची कार्यकारी शक्ती आपल्याला विस्मयकारक फळ देते: “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन.” (गलतीकर ५:२२, २३) सहन करण्यास आपल्याला साहाय्य करणारे हे सर्व अमूल्य गुण आहेत.
१७. आपला विश्वास आणि यहोवावर धीराने विसंबून राहण्याकरता आपला दृढनिश्चय बळकट करणारी काही बायबलची सत्ये कोणती आहेत?
१७ सार्वकालिक जीवनाच्या प्रतिफळाशी तुलना केल्यास सध्याची संकटे ‘तात्कालिक व हलकी’ आहेत हेही समजण्यास पवित्र आत्मा आपले साहाय्य करतो. (२ करिंथकर ४:१६-१८) देव आपली कार्ये व आपण त्याच्याबद्दल दाखवत असलेली प्रीती विसरणार नाही याची आपल्याला खात्री आहे. (इब्री लोकांस ६:९-१२) बायबलची प्रेरित वचने वाचल्यावर, आपल्याला प्राचीन विश्वासू सेवकांच्या उदाहरणांवरून सांत्वन मिळते ज्यांना अनेक संकटे सहन केल्यावरही आनंदी असल्याचे घोषित करण्यात आले होते. याकोब लिहितो: “बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुखःसहन व त्यांचा धीर ह्यांविषयीचा कित्ता घ्या. पाहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो.” (याकोब ५:१०, ११) परीक्षा सहन करण्यास आपल्याला मदत मिळावी म्हणून बायबल आपल्याला ‘पराकोटीच्या सामर्थ्याचे’ अभिवचन देते. शिवाय, यहोवा आपल्याला पुनरुत्थानाच्या आशेचा आशीर्वादही देतो. (२ करिंथकर १:८-१०; ४:७) बायबलचे रोज वाचन केल्याने व या अभिवचनांवर मनन केल्याने, आपण आपला विश्वास व देवावर धीराने विसंबून राहण्याचा दृढनिश्चय बळकट करू शकतो.—स्तोत्र ४२:५.
१८. (अ) दुसरे करिंथकर १:३, ४ मध्ये आपल्याला काय करण्याचे उत्तेजन मिळते? (ब) ख्रिस्ती पर्यवेक्षक सांत्वन व तजेल्याचे स्रोत कसे बनू शकतात?
१८ यासोबतच, यहोवाने आध्यात्मिक परादीसची सोय केली आहे जेथे आपण आपल्या ख्रिस्ती बंधूभगिणींच्या खऱ्या प्रीतीचा आनंद लुटू शकतो. एकमेकांना सांत्वन देण्यात आपल्या प्रत्येकाचा वाटा आहे. (२ करिंथकर १:३, ४) विशेषतः ख्रिस्ती पर्यवेक्षक सांत्वन व तजेला देणारे मुख्य स्रोत बनू शकतात. (यशया ३२:२) ‘मानवरूपी देणग्या’ या नात्याने त्यांच्यावर दुःख सहन करणाऱ्यांची उभारणी करण्याची, जे “अल्पधीराचे आहेत त्यांना धीर” देण्याची व “अशक्तांना आधार” देण्याची कामगिरी सोपवली आहे. (इफिसकर ४:८, ११, १२; १ थेस्सलनीकाकर ५:१४) टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचा तसेच ‘विश्वासू व बुद्धिमान दासाने’ पुरवलेल्या इतर प्रकाशनांचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याचे उत्तेजन वडिलांना दिले जाते. (मत्तय २४:४५-४७) यांमध्ये भरपूर बायबल आधारित सल्ला आहे जो आपल्याला चिंतित करणाऱ्या काही समस्या सोडवण्यास—नव्हे टाळण्यास देखील—मदत करील. कठीण काळांत एकमेकांना सांत्वन व उत्तेजन देऊन आपण यहोवाचे अनुकरण करू या!
१९. (अ) काही विपत्ती टाळण्यास आपल्याला काय मदत करते? (ब) सरतेशेवटी आपण कोणावर भरवसा ठेवला पाहिजे व कोणती गोष्ट परीक्षांना तोंड देण्याकरता आपल्याला सामर्थ्य देईल?
१९ आपण जसजसे शेवटल्या दिवसांच्या अंतास जातो व सध्याच्या व्यवस्थीकरणातील परिस्थिती जसजशी बिकट होते तसतसे ख्रिस्ती जन संकटे टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. (नीतिसूत्रे २२:३) योग्य निर्णयशक्ती, समंजसपणा व बायबल तत्त्वांचे ज्ञान आपल्याला सुज्ञ निर्णय घेण्यास मदत करील. (नीतिसूत्रे ३:२१, २२) अनावश्यक चुका टाळण्याकरता आपण यहोवाच्या वचनाकडे कान देऊन त्याचे पालन करतो. (स्तोत्र ३८:४) तरीसुद्धा, आपल्या परीने आपण जितके परिश्रम करू त्याच्याने तर आपल्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होणार नाही याची आपल्याला जाणीव आहे. या व्यवस्थीकरणात अनेक धार्मिक जन कठीण संकटांना तोंड देतात. परंतु, “परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही,” या पूर्ण भरवशाने आपण आपल्या परीक्षांना तोंड देऊ शकतो. (स्तोत्र ९४:१४) आणि आपल्याला तर माहीतच आहे, की हे व्यवस्थीकरण व त्यातील पीडा लवकरच नाहीशा होणार आहेत. यास्तव, ‘यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल म्हणून चांगले करण्याचा कंटाळा न करण्याचा’ ठाम निश्चय आपण करू या.—गलतीकर ६:९.
आपण काय शिकलो?
◻ ख्रिस्ती जनांचा संपूर्ण समाज कोणत्या परीक्षा अनुभवतो?
◻ संकटे यहोवाच्या कोपामुळे घडत नाहीत हे समजण्यासाठी कोणती बायबल उदाहरणे आपली मदत करतात?
◻ आपल्या लोकांना विपत्तींचा सामना करावा लागतो याबद्दल यहोवाला कसे वाटते?
◻ परीक्षा सहन करण्यास आपली मदत करणाऱ्या यहोवाकडील काही देणग्या कोणत्या आहेत?
[१० पानांवरील चित्र]
दावीद, नाबोथ आणि योसेफ, या तिघांनी संकटे सोसली