विश्वभर आनंदी स्तुतीकर्ते होण्याकरता वेगळे केलेले
“परमेशाचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा; परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा.”—स्तोत्र ११३:१.
१, २. (अ) स्तोत्र ११३:१-३ च्या सुसंगतेत, आपल्या उत्साही स्तुतीस कोण पात्र आहे? (ब) कोणता प्रश्न विचारणे उचित आहे?
यहोवा देव स्वर्ग आणि पृथ्वीचा महान निर्माणकर्ता, विश्वाचा अनाद्यनंत सार्वभौम राजा आहे. आपल्या उत्साही स्तुतीच्या तो पूर्णपणे पात्र आहे. म्हणूनच स्तोत्र ११३:१-३ आपल्याला अशी आज्ञा करते: “परमेशाचे स्तवन करा. परमेश्वराचे सेवकहो, तुम्ही त्याचे स्तवन करा; परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. येथून पुढे सर्वकाळ परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद होवो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे.”
२ देवाचे साक्षीदार या नात्याने, आपल्याला असे करण्यास आनंद वाटतो. आज, आपण सर्व जण गात असलेल्या आनंदाच्या स्तुतीगीताने यहोवा देव संपूर्ण पृथ्वी लवकरच भरून टाकील हे किती रोमहर्षक आहे! (स्तोत्र २२:२७) या भव्य जागतिक गायकसमूहात तुमचा आवाज ऐकू येतो का? असल्यास, या विभक्त, निराश जगापासून तुम्ही वेगळे असल्यामुळे तुम्हाला केवढा आनंद झाला पाहिजे!
३. (अ) कशामुळे यहोवाचे लोक निराळे, अद्वितीय ठरतात? (ब) कोणत्या मार्गांनी आपण वेगळे ठरतो?
३ संयुक्त होऊन यहोवाची स्तुती केल्याने आपण निश्चितच निराळे, अद्वितीय दिसतो. आपण एकमताने बोलतो व शिकवतो आणि ‘यहोवाच्या परमदयेची’ घोषणा करण्यासाठी सारख्याच पद्धतींचा वापर करतो. (स्तोत्र १४५:७) होय, यहोवाचे समर्पित लोक या नात्याने आपल्याला आपला देव, यहोवा याच्या सेवेकरता वेगळे करण्यात आले आहे. देवाने आपल्या प्राचीन समर्पित लोकांना अर्थात इस्राएलांना, आजूबाजूच्या राष्ट्रांपासून वेगळे राहण्यास व त्यांच्या प्रथांपासून निष्कलंक राहण्यास सांगितले. (निर्गम ३४:१२-१६) असे करण्यासाठी त्याने आपल्या लोकांना नियम दिले. त्याचप्रकारे आजही, यहोवाने आपल्याला त्याचे पवित्र वचन, बायबल दिले आहे. त्यातील बोध दाखवून देतो, की आपण स्वतःला या जगापासून वेगळे कसे ठेवू शकतो. (२ करिंथकर ६:१७; २ तीमथ्य ३:१६, १७) मोठ्या बाबेलच्या जोगी आणि जोगिणींना मठांत व कॉन्व्हेन्ट्समध्ये जसे वेगळे ठेवले जाते तसे आपल्याला वेगळे ठेवण्यात आलेले नाही. येशू ख्रिस्ताच्या उदाहरणाचे अनुसरण करून आपण यहोवाचे जाहीर स्तुतीकर्ते आहोत.
यहोवाच्या प्रमुख स्तुतीकर्त्याचे अनुकरण करा
४. यहोवाची स्तुती करण्यात येशूने कसे उदाहरण मांडले?
४ येशू, यहोवाची स्तुती करण्याच्या आपल्या उद्देशापासून केव्हाही विचलित झाला नाही. यामुळेच तो जगापासून वेगळा ठरला. जेरुसलेममधील सभास्थानांत व मंदिरात त्याने देवाच्या पवित्र नामाची स्तुती केली. डोंगरमाथ्यावर असो वा सुमद्रकिनाऱ्यावर असो, जेथे जेथे लोकसमुदाय जमत असत तेथे तेथे येशू यहोवाच्या सत्यांचा जाहीर प्रचार करीत असे. त्याने घोषित केले: “हे पित्या स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करितो.” (मत्तय ११:२५) पंतय पिलातासमोर परीक्षा होत असतानाही येशूने अशाप्रकारे साक्ष दिली: “मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३७) येशूने आपल्या कार्याचे महत्त्व जाणले. येशू जेथे कोठे होता तेथे त्याने यहोवाची साक्ष दिली व जाहीरपणे त्याची स्तुती केली.
५. स्तोत्र २२:२२ कोणाला लागू होते व आपली मनोवृत्ती काय असली पाहिजे?
५ स्तोत्र २२:२२ मध्ये आपल्याला यहोवाच्या प्रमुख स्तुतीकर्त्याविषयीचे हे भविष्यसूचक वाक्य आढळते: “मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नावाची कीर्ति वर्णीन; मंडळीत तुझे स्तवन करीन.” तसेच, प्रेषित पौल इब्री लोकांस २:११, १२ ही वचने प्रभू येशूला व स्वर्गीय वैभवाकरता यहोवा देवाने ज्यांना पवित्र केले आहे त्यांना लागू करतो. ख्रिस्ताप्रमाणे यांनाही मंडळीमध्ये यहोवाच्या नावाची स्तुती करण्यास लाज वाटत नाही. आपल्या मंडळीच्या सभांना उपस्थित राहताना तुमची देखील हीच मानसिक मनोवृत्ती असते का? सभांमध्ये, मानसिकरीत्या व मुखाने उत्साहाने भाग घेतल्याने यहोवाची स्तुती होते. पण आपली आनंदी स्तुती येथेच समाप्त होते का?
६. येशूने आपल्या शिष्यांवर कोणती कामगिरी सोपवली व प्रकाशाचे चाहते देवाचे गौरव कसे करतात?
६ मत्तय ५:१४-१६ नुसार, प्रभू येशूने आपल्या अनुयायांवर इतरांसमोर आपला प्रकाश परावर्तित करण्याची कामगिरी सोपविली जेणेकरून इतरही यहोवाची स्तुती करतील. तो म्हणाला: “तुम्ही जगाचा प्रकाश आहा; . . . त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” प्रकाशाचे चाहते देवास गौरव आणतात. फक्त चांगल्या गोष्टी बोलण्याद्वारे व माणुसकीने वागवण्याद्वारे ते असे करतात का? नाही, उलट ऐक्याने यहोवाचे गौरव करण्याद्वारे ते असे करतात. होय, प्रकाशाचे चाहते स्वतःस देवाला समर्पित करतात व त्याचे आनंदी स्तुतीकर्ते बनतात. तुम्ही हे आनंदी पाऊल उचलले आहे का?
यहोवाची स्तुती केल्याने आनंद मिळतो
७. यहोवाचे स्तुतीकर्ते इतके आनंदी का आहेत व सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ च्या दिवशी ते प्रसन्न का झाले?
७ यहोवाचे स्तुतीकर्ते इतके आनंदी का आहेत? कारण आनंद देवाच्या पवित्र आत्म्यातील एक फळ आहे. गलतीकर ५:२२ मध्ये प्रीती नंतर लगेचच आनंदाचा उल्लेख आहे. पहिल्या शतकातील येशूच्या शिष्यांनी यहोवाच्या आत्म्याचे हे फळ प्रदर्शित केले. सा.यु. पेन्टेकॉस्ट ३३ च्या दिवशी देवाने येशूच्या सुमारे १२० शिष्यांवर आपला पवित्र आत्मा ओतला तेव्हा सर्व जण भिन्नभिन्न भाषांमध्ये यहोवाची स्तुती करू लागले. अनेक राष्ट्रांमधून जेरुसलेममध्ये आलेले भक्तीमान यहुदी ‘गोंधळून जाऊन आश्चर्याने थक्क’ झाले. ते म्हणाले: “आपण त्यांना आपआपल्या भाषांत देवाची महत्कृत्ये सांगताना ऐकतो”! (प्रेषितांची कृत्ये २:१-११) अनेक भाषांतील यहोवाच्या या आश्चर्यकारक स्तुतीचा परिणाम काय झाला? सुमारे ३,००० यहुदी व यहुदीयमतानुसारी लोकांनी मशीहाबद्दलच्या राज्य सुवार्तेचा स्वीकार केला. त्यांनी बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्मा प्राप्त केला आणि यहोवाचे आनंदी स्तुतीकर्ते म्हणून सुरात सूर मिळवला. (प्रेषितांची कृत्ये २:३७-४२) काय तो आशीर्वाद!
८. पेन्टेकॉस्टनंतर ख्रिश्चनांनी आपला आनंद वाढवण्यासाठी काय केले?
८ अहवाल पुढे म्हणतो: “ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुति करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभु तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.” (प्रेषितांची कृत्ये २:४६, ४७) मात्र एकत्र संगती केल्यामुळे व एकत्र भोजन केल्यामुळे त्यांना प्रसन्नता प्राप्त झाली होती का? नाही, यहोवा देवाची दररोज स्तुती केल्यामुळे प्रामुख्याने ते प्रसन्न झाले. शिवाय, तारणाच्या संदेशाला हजारो लोक प्रतिसाद देत असल्याचे पाहून त्यांचा आनंद आणखी वाढला. आज आपल्याबाबतीत हेच खरे आहे.
सर्व राष्ट्रांतील आनंदी स्तुतीकर्ते
९. (अ) देवाने सर्व राष्ट्रांतील लोकांस त्याची सुवार्ता ऐकण्याची संधी केव्हा व कशी देण्यास सुरवात केली? (ब) कर्नेल्य व त्याच्या साथीदारांचा बाप्तिस्मा होण्याआधीच त्यांच्यावर पवित्र आत्मा का ओतण्यात आला?
९ आपल्या सेवकांचे प्रकाश पाडण्याचे कार्य केवळ एका राष्ट्रापुरतेच असावे असे यहोवा इच्छित नव्हता. म्हणूनच, सा.यु. ३६ पासून त्याने सर्व राष्ट्रांतील लोकांना त्याची सुवार्ता ऐकण्याची सुसंधी देण्यास सुरवात केली. देवाच्या मार्गदर्शनानुसार, पेत्र कैसरीया येथील एका विदेशी शताधिपतीच्या घरी गेला. तेथे त्याला कर्नेल्य आपल्या मित्र परिवारासोबत असल्याचे दिसले. पेत्राचे बोलणे लक्ष देऊन ऐकत असताना त्यांनी अंतःकरणातच येशूवर विश्वास ठेवला. हे आपल्याला कसे माहीत होते? कारण देवाचा पवित्र आत्मा, विश्वास करणाऱ्या त्या परराष्ट्रीय लोकांवर उतरला. सहसा, देवाच्या पवित्र आत्म्याचे दान बाप्तिस्मा झाल्याच्या नंतर दिले जाई पण या प्रसंगी यहोवाने या गैर-यहुदी लोकांच्या बाप्तिस्म्याच्या आधीच आपली स्वीकृती दर्शवली. यहोवाने असे केले नसते तर, देव आता परराष्ट्रीय लोकांना आपले सेवक म्हणून स्वीकारत आहे व पाण्याच्या बाप्तिस्म्याकरता तेही पात्र आहेत याची खातरी पेत्राला पटली नसती.—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५, ४७, ४८.
१०. सर्व राष्ट्रांतील लोक यहोवाची स्तुती करणार होते हे प्राचीन काळीच कसे भाकीत करण्यात आले होते?
१० सर्व राष्ट्रांतील लोक आपली स्तुती करतील हे प्राचीन काळापासून यहोवाने भाकीत केले. प्रत्येक देशात त्याचे आनंदी स्तुतीकर्ते असणार होते. हे शाबीत करण्यासाठी प्रेषित पौलाने इब्री शास्त्रवचनांमधून भविष्यवाण्या उद्धृत केल्या. त्याने रोममधील ख्रिश्चनांच्या आंतरराष्ट्रीय मंडळीला सांगितले: “म्हणून देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीहि एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी असे म्हणतो की, देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; असे की, पूर्वजांस दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावी आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचे गौरव करावे. शास्त्रात [स्तोत्र १८:४९ मध्ये] असे लिहिले आहे की, म्हणून परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन व तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन. परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा, असे [अनुवाद ३२:४३ येथे] तो पुन्हा म्हणतो. सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा; आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत, असेहि [स्तोत्र ११७:१ मध्ये] तो पुन्हा म्हणतो.” (तिरपे वळण आमचे.) —रोमकर १५:७-११.
११. देवाने सर्व राष्ट्रांतील लोकांस त्याचे सत्य शिकण्यास कशी मदत केली आहे व याचा परिणाम काय झाला?
११ सर्व राष्ट्रांतील लोकांवर राज्य करण्यासाठी देवाने ज्याला नियुक्त केले आहे त्या येशू ख्रिस्तावर लोक जोपर्यंत आशा ठेवत नाहीत तोपर्यंत त्यांना यहोवाची ऐक्याने स्तुती करता येणार नाही. सार्वकालिक जीवनाकडे नेणारे त्याचे सत्य समजण्यास लोकांना मदत करण्याकरता देवाने एक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्यक्रम आखला आहे. तो त्याच्या विश्वासू दास वर्गाद्वारे मार्गदर्शन देत आहे. (मत्तय २४:४५-४७) याचा परिणाम? ५० लाखापेक्षा अधिक आनंदी लोक २३० पेक्षा अधिक देशांत यहोवाची स्तुती गात आहेत. शिवाय, आणखी लाखो जन असे करण्यासाठी आस्था दाखवत आहेत. १९९६ मध्ये किती जण स्मारक विधीला उपस्थित होते पाहा: १,२९,२१,९३३. अतिउत्तम!
आनंदी स्तुतीकर्त्यांच्या मोठ्या लोकसमुदायाविषयी भाकीत
१२. प्रेषित योहानाने कोणता प्रेरणादायक दृष्टान्त अनुभवला व तो दृष्टान्त सत्यात कसा उतरला?
१२ एका दृष्टान्तात प्रेषित योहानाने सर्व राष्ट्रांतून आलेला एक “मोठा लोकसमुदाय” पाहिला. (प्रकटीकरण ७:९) हा मोठा लोकसमुदाय देवाच्या अभिषिक्त शेषांबरोबर गात असलेल्या स्तुतीचा विषय कोणता आहे बरे? योहान आपल्याला सांगतो: “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.” (प्रकटीकरण ७:१०) जगाच्या हरएक भागात हे निडरपणे घोषित केले जात आहे. जणू काय हातात झावळ्या फडकवत आपण ऐक्याने देवाची विश्वाचा सार्वभौम राजा म्हणून स्तुती करतो व स्वर्ग आणि पृथ्वीसमोर आनंदाने कबूल करतो, की त्याच्याकडून व त्याचा पुत्र जो कोकरा आहे तो येशू ख्रिस्त याच्याकडून आपल्याला तारण ‘मिळणार आहे.’ खरेच, प्रेषित योहानाने मोठ्या लोकसमुदायाचा हा प्रेरणादायक दृष्टान्त पाहिल्यावर किती स्फुरण अनुभवले! शिवाय, योहानाने जो दृष्टान्त पाहिला त्याला सत्यात उतरताना पाहणे व त्याचा एक भाग होणे किती स्फुर्तीदायक आहे!
१३. कशामुळे यहोवाचे लोक जगापासून वेगळे होतात?
१३ यहोवाचे सेवक या नात्याने आपण गर्वाने त्याचे नाव धारण करतो. (यशया ४३:१०, १२) यहोवाचे साक्षीदार झाल्यामुळे आपण या जगापासून वेगळे होतो. देवाचे हे विशिष्ट नाव धारण करण्यात व त्याच्या ईश्वरी कार्याला आपल्या जीवनाचा उद्देश बनवण्यात केवढा आनंद आहे! आपल्या पवित्र नावाचे पवित्रीकरण करण्याच्या तसेच राज्याकरवी त्याच्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाचे समर्थन करण्याच्या यहोवाच्या महान उद्देशाने आपल्या जीवनास अर्थ दिला आहे. त्याचे नाव आणि राज्य यासंबंधाने असलेल्या त्याच्या ईश्वरी उद्देशात आपल्याला स्थान मिळावे म्हणून त्याने आपले साहाय्य केले आहे. हे त्याने तीन मार्गांद्वारे केले आहे.
सत्य बहाल केले आहे
१४, १५. (अ) देवाचे नाव आणि त्याचे राज्य याबाबतच्या त्याच्या ईश्वरी उद्देशात आपल्यालाही एक स्थान मिळण्यास मदत व्हावी असा एक मार्ग कोणता? (ब) सा.यु. १९१४ मध्ये स्थापित केलेले राज्य सा.यु.पू. ६०७ मध्ये उलथून पाडण्यात आलेल्या राज्यापेक्षा भिन्न कसे आहे?
१४ पहिले, यहोवाने आपल्या लोकांना सत्य बहाल केले आहे. त्याचे राज्य १९१४ पासून शासन करू लागले, हे सर्वात मनोरंजक प्रकटीकरण होय. (प्रकटीकरण १२:१०) हे स्वर्गीय सरकार, दाविदाच्या राजघराण्यातील राजे ज्यात सिंहासनाधिष्ठीत केले जात त्या जेरुसलेममधील प्रतिरूपी राज्यापासून भिन्न आहे. ते प्रतिरूपी राज्य उलथून पाडण्यात आले, व सा.यु.पू. ६०७ पासून जेरुसलेमवर परराष्ट्रीयांनी पूर्णपणे सत्ता गाजवली. १९१४ मध्ये यहोवाने स्थापन केलेले नवे राज्य स्वर्गीय सत्ता आहे जे यहोवाशिवाय कोणाच्याही हाती लागणार नाही किंवा त्याचा नाश केला जाणार नाही. (दानीएल २:४४) तसेच, त्याचे शासनही वेगळ्यापद्धतीचे आहे. कसे बरे? प्रकटीकरण ११:१५ उत्तरते: ‘स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या: जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.’
१५ ‘आमच्या प्रभूचे व त्यांच्या ख्रिस्ताचे राज्य’ मानवजातीच्या संपूर्ण जगावर आपला अधिकार चालवते. यहोवाची सार्वभौम सत्ता ही नवीन संज्ञा, ज्यात त्याचा मशिही पुत्र आणि येशूचे १,४४,००० बंधू ज्यांपैकी बहुतेकांचे स्वर्गीय वैभवात पुनरुत्थान झाले आहे समावेश होतो, केवळ विद्यार्थ्यांना चर्चा करावयास आवडेल अशा तात्त्विक ज्ञानाची अर्थात निव्वळ विद्याविषयक आस्थेची गोष्ट नाही. हे स्वर्गीय राज्य एक वास्तविक सरकार आहे. या शासनामुळे परिपूर्णतेत चिरकालासाठी जगण्याची आपली आनंदी आशा आपल्याला हर्ष करीत राहण्यासाठी भरपूर कारण देते. यहोवाच्या वचनातील अशी सत्ये आपल्याला बहाल केल्यामुळे त्याच्याविषयी नेहमी बोलत राहण्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते. (स्तोत्र ५६:१०) देवाचे मशिही राज्य आता स्वर्गामध्ये राज्य करीत आहे असे सर्वांना सांगून तुम्ही तसे नियमितरीत्या करीत आहात का?
पवित्र आत्म्याचे साहाय्य व जागतिक बंधूसमाज
१६, १७. देवाने कोणत्या दुसऱ्या व तिसऱ्या पद्धतींनी त्याच्या ईश्वरी उद्देशात आपल्याला स्थान मिळवून दिले आहे?
१६ देवाने त्याच्या ईश्वरी उद्देशात आपल्याला स्थान मिळावे म्हणून आपली मदत करण्याकरता पुरविलेला दुसरा मार्ग म्हणजे, त्याने आपल्याला त्याचा पवित्र आत्मा दिला आहे जो आपल्याला आपल्या जीवनात त्याचे सुंदर फळ उत्पन्न करण्यास व त्याची स्वीकृती प्राप्त करण्यास शक्य करतो. (गलतीकर ५:२२, २३) तसेच, पौलाने अभिषिक्त ख्रिश्चनांना लिहिले: “आपल्याला . . . देवापासून निघणारा आत्मा मिळाला आहे; ह्यासाठी की, जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे.” (१ करिंथकर २:१२) यहोवाच्या आत्म्याला प्रतिसाद दिल्याने त्याने आपल्याला दिलेल्या उत्तम गोष्टी जसे की—त्याची अभिवचने, नियम, तत्त्वे आणि अशाच आणखी गोष्टी आपल्याला माहीत होऊ शकतात व आपण समजू शकतो.—पडताळा मत्तय १३:११.
१७ देव आपली मदत करतो तो तिसरा मार्ग म्हणजे, आपला जागतिक बंधूसमाज व उपासनेकरता असलेली यहोवाची मनमोहक संघटनात्मक व्यवस्था. प्रेषित पेत्राने जेव्हा “बंधुवर्गावर प्रीति करा,” असे आपल्याला आर्जवले तेव्हा तो याविषयी बोलला. (१ पेत्र २:१७) बंधूभगिणींचे आपले प्रेमळ, आंतरराष्ट्रीय कुटुंब, आनंदी अंतःकरणाने यहोवाची सेवा करण्यास आपली मदत करते. याबद्दल स्तोत्र १००:२ अशी आज्ञा देते: “हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या.” ४ वचन पुढे म्हणते: “त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा.” म्हणून आपण जाहीरपणे प्रचार करीत असताना किंवा सभांना उपस्थित राहताना देखील आनंद उपभोगू शकतो. यहोवाच्या आध्यात्मिक मंदिराच्या सुखावह अंगणात आपण किती शांती व सुरक्षितता प्राप्त केली आहे!
हर्षाने यहोवाची स्तुती करा!
१८. छळ किंवा इतर समस्यांना तोंड देत असतानाही आपण यहोवाची स्तुती करण्यात आनंद का मानू शकतो?
१८ आपल्यावर कठीण परिस्थिती, छळ किंवा इतर समस्या ओढवल्या तरीसुद्धा, आपण यहोवाच्या उपासना घरात आहोत हा आनंद मानू या. (यशया २:२, ३) लक्षात ठेवा, आनंद अंतःकरणाचा गुण आहे. आरंभीचे ख्रिस्ती बंधूभगिणी, हालअपेष्टांत व नुकसानीतही यहोवाचे आनंदी स्तुतीकर्ते होते. (इब्री लोकांस १०:३४) आपले आजचे सहविश्वासू त्यांच्यासारखेच आहेत.—मत्तय ५:१०-१२.
१९. (अ) वारंवार दिलेल्या कोणत्या आज्ञा यहोवाची स्तुती करण्यास आपल्याला उत्तेजन देतात? (ब) आपले चिरकालिक जीवन कशावर अवलंबून आहे व आपला दृढनिश्चय काय आहे?
१९ यहोवाची सेवा करणाऱ्या आपल्या सर्वांना, त्याची स्तुती करण्याविषयी बायबलच्या आज्ञेचे पालन करण्यास आनंद वाटतो. देवाच्या स्तुतीच्या प्रत्येक अभिव्यक्तीनंतर “हालेलूया” या संज्ञेचा वापर प्रकटीकरणाच्या पुस्तकात वारंवार करण्यात आला आहे. (प्रकटीकरण १९:१-६) स्तोत्र १५० च्या सहा वचनांमध्ये आपल्याला १३ वेळा यहोवाची स्तुती करण्यास सांगितले आहे. यहोवाची स्तुती आनंदाने गाण्यास सर्व सृष्टीला हे सार्वत्रिक आवाहन आहे. आपले चिरकालिक जीवन, या महान हालेलूया ध्रुपदात आपलाही सूर मिळवण्यावर अवलंबून आहे. होय, यहोवाची अखंड स्तुती करणारे लोकच अनंतकाळ जगतील. याच कारणास्तव, अंत जवळ येत आहे तसा आम्ही त्याच्या निष्ठावान जगव्याप्त मंडळीशी जडून राहण्याचा ठाम निश्चय केला आहे. मग, आपण स्तोत्र १५० च्या शेवटल्या शब्दांची पूर्ती पाहण्याची आशा धरू शकतो: “प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा.”
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ कशामुळे यहोवाचे लोक निराळे, अद्वितीय ठरतात?
◻ यहोवाचे सेवक इतके आनंदी का आहेत?
◻ कशामुळे आपण जगापासून वेगळे ठरतो?
◻ यहोवाने कोणत्या तीन मार्गांद्वारे आपल्याला त्याच्या ईश्वरी उद्देशात स्थान मिळण्यास मदत केली आहे?
[१७ पानांवरील चित्र]
येशू जेथे कोठे होता तेथे त्याने यहोवाची साक्ष दिली आणि जाहीरपणे त्याची स्तुती केली