कौटुंबिक जीवनात ईश्वरी शांती अनुसरणे
“अहो मानवकुलांनो; परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.”—स्तोत्र ९६:७.
१. यहोवाने कौटुंबिक जीवनाची कोणत्या प्रकाराने सुरवात करून दिली?
यहोवा देवाने पहिल्या पुरुषाचा व पहिल्या स्त्रीचा विवाह लावून त्यांना एकत्र आणले तेव्हा कौटुंबिक जीवन शांतीमय व सुखी होते. खरे पाहता, आदाम इतका सुखी होता, की त्याने लिहून ठेवलेल्या सर्वात पहिल्या काव्यात आपला आनंद अशा प्रकारे व्यक्त केला: “आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनविली आहे.”—उत्पत्ति २:२३.
२. आपल्या मानवी मुलांना आनंद मिळवून देण्यासोबत देवाच्या मनात विवाहाच्या बाबतीत आणखी काय होते?
२ देवाने विवाह आणि कौटुंबिक व्यवस्थेची सुरवात केली तेव्हा मानवी मुलांना सुख मिळावे केवळ हाच उद्देश त्याच्या मनात नव्हता. त्यांनी त्याची इच्छा पूर्ण करावी असे त्याला वाटत होते. देवाने पहिल्या जोडप्यास म्हटले: “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) ही निश्चितच एक मौल्यवान नेमणूक होती. आदाम आणि हव्वेने आज्ञाधारकपणे यहोवाची इच्छा पूर्ण केली असती तर ते दोघे आणि त्यांची संतती सुखात नांदली असती!
३. ईश्वरी भक्तीने जीवन व्यतित करण्याकरता कुटुंबांकडून काय अपेक्षिले जाते?
३ परंतु आजही, कुटुंबे देवाची इच्छा ऐक्याने पूर्ण करतात तेव्हा ती सुखाने नांदतात. अशा आज्ञाधारक कुटुंबांसाठी केवढी भव्य आशा! प्रेषित पौलाने लिहिले: “सुभक्ती [ईश्वरी भक्ती] तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.” (१ तीमथ्य ४:८) खऱ्या ईश्वरी भक्तीने जीवन व्यतित करणारी कुटुंबे यहोवाच्या वचनातील तत्त्वे अनुसरतात व त्याची इच्छा पूर्ण करतात. ते ईश्वरी शांती अनुसरतात व याद्वारे ‘आताच्या जीवनात’ सुख मिळवतात.
कौटुंबिक जीवन धोक्यात
४, ५. संपूर्ण जगभरात कौटुंबिक जीवन धोक्यात आहे असे का म्हणता येते?
४ स्वाभाविकपणे, प्रत्येक कुटुंबामध्ये आपल्याला शांती व सुख दिसणार नाही. पॉप्युलेशन काऊन्सल नामक एका लोकसंख्याशास्त्र संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालाचा उल्लेख करीत द न्यूयॉर्क टाईम्स म्हणते: “श्रीमंत आणि गरीब राष्ट्रांमध्ये कौटुंबिक जीवनाच्या सांगाड्यात आमूलाग्र बदल होत आहेत.” या अहवालाच्या लेखिकेने असे म्हटल्याचे उद्धृत करण्यात आले: “स्थिर व संयुक्त समाज असलेले कुटुंब, ज्यात पिता आर्थिक गोष्टी पुरवतो व माता भावनिक काळजी घेते, ही कल्पना एक मिथ्या आहे. वास्तविकता ही आहे, की विवाहपूर्व मातृत्व, घटस्फोटाचे वाढते प्रमाण, [व] लहान कुटुंबे यांसारख्या गोष्टी . . . जगभरात घडत चालल्या आहेत.” अशा प्रकारच्या प्रवृत्तींमुळे लाखो कुटुंबांमध्ये स्थिरतेची, शांतीची तसेच सुखाची उणीव आहे आणि अनेक कुटुंबे मोडकळीस येत आहेत. विसाव्या शतकाच्या अंतिम दशकाच्या सुरूवातीपर्यंत स्पेनमध्ये घटस्फोटाचे प्रमाण ८ विवाहांमध्ये १ इतके वाढले—केवळ २५ वर्षांपूर्वी १०० मध्ये १ या प्रमाणातील ही अचानक वाढ होती. युरोप, इंग्लंडमध्ये घटस्फोटाचे सर्वाधिक प्रमाण मिळते असे सांगितले जाते—१० पैकी ४ विवाह अपयशी ठरतात. शिवाय, त्या राष्ट्रामध्ये एक पालकीय कुटुंबांच्या संख्येतही वाढ झाली आहे.
५ असे दिसते की काही लोक तर घटस्फोट होईपर्यंत थांबू इच्छित नाहीत. पुष्कळ जण जपान, टोकियो जवळील “बंधन तोडण्याचे मंदिर” नामक मंदिरात झुंडीने जात आहेत. हे शिन्टो मंदिर घटस्फोटाकरता व इतर अनिच्छित नातेसंबंध तुटण्याकरता केलेल्या विनंत्या स्वीकारते. प्रत्येक भक्त आपली विनंती एका पातळ लाकडी फळीवर लिहितो व ती फळी मंदिरात अडकवून उत्तरासाठी प्रार्थना करतो. टोकियोतील एक बातमीपत्र म्हणते, की एक शतकाआधी या मंदिराची स्थापना झाली तेव्हा, “स्थानीय अमीर व्यापाऱ्यांच्या पत्नींनी प्रार्थना लिहिल्या की त्यांच्या पतींनी त्यांच्या रखेल्यांना सोडून त्यांच्याकडे यावे.” परंतु, आज बहुतेक विनंत्या समेटासाठी नव्हे तर घटस्फोटाच्या आहेत. खरेच, संपूर्ण जगात कौटुंबिक जीवन धोक्यात आहे. ख्रिश्चनांना याबद्दल आश्चर्य वाटावे का? नाही, कारण आज कुटुंबावर ओढवलेल्या संकटाविषयी बायबल सूक्ष्मदृष्टी पुरवते.
कुटुंबावर संकट, का बरे?
६. आजच्या कौटुंबिक संकटाशी १ योहान ५:१९ चा काय संबंध आहे?
६ “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे,” हे आजच्या कौटुंबिक संकटाचे एक कारण आहे. (१ योहान ५:१९) या दुष्ट दियाबल सैतानाकडून आपण काय अपेक्षू शकतो? तो दुष्ट, नीतीहीन लबाड आहे. (योहान ८:४४) म्हणूनच तर त्याचे जग फसवणूक आणि अनैतिकतेत इतके गर्क झाले आहे, की कौटुंबिक जीवनाचा ऱ्हास होत चालला आहे! देवाच्या संघटनेबाहेरील सैतानी प्रभाव, यहोवाच्या विवाह व्यवस्थेला नाश करण्यासाठी व सुखी वैवाहिक जीवनाचा अंत करण्यासाठी भेडसावत आहे.
७. या शेवटल्या काळी अनेक लोकांच्या लक्षणांचा परिणाम कुटुंबांवर कसा होऊ शकतो?
७ मानवजातीला पिडीत करणाऱ्या कौटुंबिक समस्यांचे आणखी एक कारण २ तीमथ्य ३:१-५ मध्ये दर्शवले आहे. तेथील पौलाचे लिखित भविष्यसूचक शब्द दाखवून देतात, की आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत. कुटुंबातील सदस्य “स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी,” अशी असल्यास कुटुंबे कधीच सुखाने किंवा आनंदाने नांदू शकणार नाहीत. ज्या कुटुंबातील एखादा सदस्य ममताहीन किंवा विश्वासघातकी असेल तर ते कुटुंब पूर्णपणे आनंदी असू शकत नाही. घरातील एखादी व्यक्ती क्रूर व शांतताद्वेषी असल्यास कौटुंबिक जीवन कसे काय सुखी होऊ शकेल? याहूनही बिकट तर, कौटुंबिक सदस्य देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी असतील तर त्या घरात शांती व आनंद कसा असेल? सैतानाचे अधिपत्य असलेल्या या जगातील लोकांची ही लक्षणे आहेत. म्हणूनच तर या शेवटल्या काळामध्ये कौटुंबिक आनंद मृगजळासारखा आहे!
८, ९. मुलांच्या वर्तनाचा कोणता परिणाम कौटुंबिक सौख्यानंदावर होऊ शकतो?
८ मुलांचे गैरवर्तन कुटुंबांमध्ये शांती व आनंदाच्या अभावाचे आणखी एक कारण होय. पौलाने शेवटल्या काळाची परिस्थिती भाकीत केली तेव्हा, अनेक मुले आईवडिलांच्या आज्ञेत राहणार नाहीत असे भाकीत केले. तुम्ही तरुण आहात तर तुमचे वर्तन तुमच्या कुटुंबांस शांतीपूर्ण व आनंदी होण्यास हातभार लावते का?
९ काही मुले त्यांच्या वर्तनात मुळीच अनुकरणीय नाहीत. जसे की, एका मुलाने आपल्या बापास अशा प्रकारचे अभद्र पत्र लिहिले: “मला तुम्ही अलेझॅन्ड्रीयाला नेले नाहीत तर मी तुम्हाला पत्र लिहिणार नाही, तुमच्याशी बोलणार नाही, तुम्हाला टाटा करणार नाही आणि तुम्ही एकटेच अलेझॅन्ड्रीयाला गेलात तर तुमचा हात धरणार नाही किंवा कधीच तुम्हाला नमस्कार करणार नाही. मला नेले नाही तर मी असंच वागणार आहे . . . पण मी तुम्हाला विनंती करतो मला एक वीणा पाठवा. पाठवली नाहीत ना तर मी काहीही खाणार नाही, पिणार नाही. बघाच तुम्ही!” हे आधुनिक दिवसांतील असल्यासारखे वाटते का? हे पत्र, सुमारे २,००० वर्षांपूर्वी प्राचीन इजिप्तमधील एका मुलाने आपल्या बापाला लिहिले होते.
१०. तरुण जन ईश्वरी शांती अनुसरण्यास आपल्या कुटुंबांना कशा रीतीने मदत करू शकतात?
१० त्या इजिप्शियन तरुणाच्या मनोवृत्तीने कौटुंबिक शांतीला हातभार लावलेला नाही. अर्थातच, या शेवटल्या काळामध्ये तर याहूनही भयंकर घटना घडतात. पण, तुम्ही तरुणांनो, तुमच्या कुटुंबाला ईश्वरी शांती अनुसरण्यास मदत करू शकता. ते कसे? “मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा; हे प्रभूला संतोषकारक आहे,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करून.—कलस्सैकर ३:२०.
११. पालक आपल्या मुलांना यहोवाचे विश्वासू सेवक होण्यास कसे मदत करू शकतात?
११ पालकांनो, तुमच्याविषयी काय? यहोवाचे विश्वासू सेवक होण्यास आपल्या मुलांना प्रेमळपणे मदत करा. नीतिसूत्रे २२:६ म्हणते: “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीहि तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” सर्वोत्तम शास्त्रवचनीय शिकवण मिळालेले व उत्तम पालकीय उदाहरणे ज्यांच्यासमोर आहेत अशी मुले व मुली वृद्धपणीही योग्य मार्गापासून भरकटत नाहीत. परंतु, बायबल प्रशिक्षणाचा प्रकार व प्रमाण तसेच तरुणाचे हृदय यांवरही बरेच काही अवलंबून असते.
१२. ख्रिस्ती घर शांतीमय का असले पाहिजे?
१२ आपल्या कुटुंबातील सर्वच सदस्य यहोवाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर आपण निश्चितच ईश्वरी शांतीचा उपभोग घेऊ. ख्रिस्ती घरात “शांतिप्रिय” लोक असले पाहिजेत. लूक १०:१-६ दाखवून देते, की येशूने जेव्हा ७० शिष्यांना सेवक म्हणून पाठवून दिले व त्यांना, “ज्या कोणत्या घरांत जाल, तेथे ह्या घरास शांति असो, असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांति त्याच्यावर राहील,” असे सांगितले तेव्हा तो शांतिप्रिय लोकांचाच विचार करीत होता. यहोवाचे सेवक ‘शांतीची सुवार्ता’ घेऊन घरोघरी शांतीने जातात तेव्हा ते शांतीप्रिय लोकांना शोधत असतात. (प्रेषितांची कृत्ये १०:३४-३६; इफिसकर २:१३-१८) निश्चितच, शांतीप्रिय लोकांनी मिळून बनलेले ख्रिस्ती घराणे शांतीमय असावयास हवे.
१३, १४. (अ) रूथ आणि अर्पाविषयी नामीची काय इच्छा होती? (ब) ख्रिस्ती घर कोणत्या प्रकारचे आश्रयस्थान असले पाहिजे?
१३ घर कसे शांती व विश्रामाचे ठिकाण असले पाहिजे. वृद्ध विधवा नामीला आशा होती, की देव तिच्या तरुण विधवा सुनांना अर्थात रूथ आणि अर्पा यांना चांगले पती व चांगले घर मिळाल्यावर सुख व सांत्वन देईल. नामी म्हणाली: “परमेश्वर करो आणि तुम्हास पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो.” (रूथ १:९) नामीच्या इच्छेविषयी एका विद्वानाने लिहिले, की अशा घरांमध्ये रूथ व अर्पाला “अस्वस्थता व चिंता यांपासून मुक्ती मिळणार होती. त्यांना मनशांती मिळणार होती. ते एक असे ठिकाण असणार होते जेथे त्या राहू शकत होत्या व जेथे त्यांच्या सर्वात कोमल भावनांना आणि सर्वात आदरणीय इच्छांना समाधान व प्रसन्नता मिळणार होती. . . . या इब्री शब्दाचा विशिष्ट जोर, [यशया ३२:१७, १८] मधील संबंधित आविर्भावाच्या प्रकाराद्वारे उत्तमरीत्या प्रदर्शित करण्यात आला आहे.”
१४ यशया ३२:१७, १८ च्या या संदर्भाकडे लक्ष द्या. तेथे आपण वाचतो: “नीतिमत्तेचा परिणाम शांति व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल; आणि माझे लोक शांत स्थळी, निर्भय वसतिस्थानात व सुखाश्रमात राहतील.” ख्रिस्ती घर, धार्मिकता, शांती, सुरक्षितता व ईश्वरी शांतीचे आश्रयस्थान असावयास हवे. परंतु परीक्षा, मतभेद किंवा इतर समस्यांचे वादळ उठते तेव्हा? तेव्हा आपल्याला खासकरून कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य जाणण्याची गरज आहे.
चार आवश्यक तत्त्वे
१५. कौटुंबिक सौख्यानंदाच्या रहस्याची व्याख्या तुम्ही कशी कराल?
१५ पृथ्वीवरील प्रत्येक कुटुंबास, कुटुंबांचा निर्माणकर्ता यहोवा देवावरून नाव देण्यात आले आहे. (इफिसकर ३:१४, १५) यास्तव, कौटुंबिक सौख्यानंद प्राप्त करू इच्छिणाऱ्यांनी त्याचे मार्गदर्शन मिळवून त्याची स्तुती केली पाहिजे. स्तोत्रकर्त्यानेही असेच केले: “अहो मानवकुलांनो; परमेश्वराचे गौरव करा; परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा.” (स्तोत्र ९६:७) कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये तसेच त्यातील तत्त्वांचे अनुसरण करण्यामध्ये आढळते. ही तत्त्वे अनुसरणारे कुटुंब सुखी असेल व ईश्वरी शांतीचा उपभोग घेईल. तेव्हा, ती चार महत्त्वपूर्ण तत्त्वे आपण पाहू या.
१६. आत्मसंयम कौटुंबिक जीवनात कोणती भूमिका निभावतो?
१६ या तत्त्वांपैकी एक यावर केंद्रित आहे: कौटुंबिक जीवनातील ईश्वरी शांतीसाठी आत्मसंयम आवश्यक आहे. राजा शलमोन म्हणाला: “ज्या मनुष्याचे चित्त स्वाधीन नाही, तो गावकुसू नसलेल्या पडक्या गावासारखा आहे.” (नीतिसूत्रे २५:२८) सुखी व आनंदी कुटुंब हवे असल्यास स्वतःला आळा घालणे—आत्मसंयम राखणे आवश्यक आहे. अपूर्ण असलो तरी, आपण देवाच्या पवित्र आत्म्याचे फळ असलेले आत्मसंयम राखले पाहिजे. (रोमकर ७:२१, २२; गलतीकर ५:२२, २३) आत्मसंयम या गुणासाठी प्रार्थना केल्यास, या गुणासंबंधित बायबल सल्ला लागू केल्यास व हा गुण प्रदर्शित करणाऱ्यांसोबत संगती केल्यास आत्मा आपल्यामध्ये तो गुण विकसित करील. यामुळे आपल्याला “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ” काढण्यास मदत होईल. (१ करिंथकर ६:१८) आत्मसंयम आपल्याला हिंसाचाराचा धिक्कार करण्यास, मद्यप्राशन टाळण्यास अथवा त्यावर मात करण्यास व कठीण समस्यांना अधिक शांतीपूर्णरीतीने हाताळण्यास मदत करील.
१७, १८. (अ) पहिले करिंथकर ११:३ ख्रिस्ती कौटुंबिक जीवनास कसे लागू होते? (ब) मस्तकपदाच्या मान्यतेमुळे कुटुंबांतील ईश्वरी शांतीचा उत्कर्ष कसा होतो?
१७ दुसरे महत्त्वपूर्ण तत्त्व या प्रकारे निवेदित केले जाऊ शकते: मस्तकपदाला मान्यता दिल्यास आपल्या कुटुंबांत ईश्वरी शांती टिकून ठेवण्यास मदत होईल. पौलाने लिहिले: “प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.” (१ करिंथकर ११:३) म्हणजे, पुरुष आपल्या कुटुंबात पुढाकार घेतो, त्याची पत्नी निष्ठेने त्याला पाठींबा देते व मुले त्यांच्या आज्ञेत राहतात. (इफिसकर ५:२२-२५, २८-३३; ६:१-४) अशा प्रकारच्या वर्तनामुळे कौटुंबिक जीवनात ईश्वरी शांतीचा उत्कर्ष होईल.
१८ ख्रिस्ती पतीने हे लक्षात ठेवणे अगत्याचे आहे, की शास्त्रीय मस्तकपण म्हणजे हुकूमशाही नव्हे. त्याने त्याचे मस्तक अर्थात येशूचे अनुकरण करावे. येशूला “सर्वांवर मस्तक” असे व्हावयाचे होते तरी, “सेवा करुन घ्यावयास नाही, तर सेवा करावयास” तो आला होता. (इफिसकर १:२२; मत्तय २०:२८) त्याचप्रकारे, ख्रिस्ती पुरुष प्रेमळरीत्या आपले मस्तकपद चालवतो जे त्याला त्याच्या कुटुंबाच्या हिताची योग्य काळजी घेणे शक्य करते. मग, ख्रिस्ती पत्नीला निश्चितच आपल्या पतीला सहकार्य द्यावेसे वाटेल. त्याची “साहाय्यक” व “अनुरूप” या नात्याने ती, तिच्या पतीमध्ये ज्या गुणांची उणीव असते त्यांना भरून काढते व याद्वारे त्याला हवा असणारा पाठिंबा देते. (उत्पत्ति २:२०; नीतिसूत्रे ३१:१०-३१) मस्तकपदाचा योग्य वापर पतींना व पत्नींना एकमेकांस आदराने वागण्यास मदत करतो व मुलांस त्यांच्या आज्ञेत राहण्यास प्रवृत्त करतो. होय, मस्तकपदास मान्यता दिल्यामुळे कौटुंबिक जीवनात ईश्वरी शांतीचा उत्कर्ष होतो.
१९. कौटुंबिक शांती व आनंदासाठी उत्तम दळणवळण आवश्यक का आहे?
१९ तिसरे महत्त्वपूर्ण तत्त्व या शब्दांद्वारे व्यक्त केले जाऊ शकते: चांगले दळणवळण कौटुंबिक शांती व सौख्यानंदाकरता आवश्यक आहे. याकोब १:१९ आपल्याला सांगते: “प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” कौटुंबिक सदस्यांनी एकमेकांचे ऐकून घेतले पाहिजे व एकमेकांशी बोलले पाहिजे कारण कौटुंबिक दळणवळण दोनमार्गी रस्ता आहे. आपल्याला एखादी गोष्ट सांगावयाची आहे पण जर आपण ती क्रूर, गर्विष्ठ किंवा असंवेदनशील पद्धतीने सांगितली तर आपले म्हणणे खरे असूनही काही फायदा होणार नाही. आपले बोलणे चवदार, “मिठाने रुचकर केल्यासारखे असावे.” (कलस्सैकर ४:६) शास्त्रवचनीय तत्त्वांचे अनुकरण करणारी व उत्तम दळणवळण असलेली कुटुंबे ईश्वरी शांती अनुसरतात.
२०. कौटुंबिक शांतीकरता प्रीती आवश्यक आहे असे तुम्ही का म्हणाल?
२० चौथे तत्त्व: कौटुंबिक शांती व सौख्यानंदासाठी प्रीतीची आवश्यकता आहे. कदाचित रोमॅन्टिक प्रेम, विवाहात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते आणि एखाद्या कुटुंबाच्या सदस्यांमध्ये अतिशय प्रीती विकसित होऊ शकते. परंतु, याहूनही महत्त्वाचे ग्रीक शब्द अगापे ज्याला सूचित करते ती प्रीती आहे. ही प्रीती आपण यहोवा, येशू आणि आपल्या शेजाऱ्यांसाठी विकसित करतो. (मत्तय २२:३७-३९) देवाने “आपला एकुलता एक पुत्र” देऊन मानवजातीवर अशाच प्रकारची प्रीती व्यक्त केली, जेणेकरून “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) आपल्या कौटुंबिक सदस्यांनाही आपण अशाच प्रकारचे प्रेम दर्शवू शकतो ही केवढी विस्मयकारक गोष्ट! ही सर्वश्रेष्ठ प्रीती “पूर्णता करणारे बंधन” आहे. (कलस्सैकर ३:१४) ही प्रीती विवाहित जोडप्याला एकत्र आणते व एकमेकांच्या तसेच आपल्या मुलांच्या हितासाठी जे सर्वोत्तम आहे ते करण्यास त्यांना प्रवृत्त करते. समस्या येतात तेव्हा एकत्र मिळून त्या सोडवण्यासाठी प्रीती त्यांना मदत करते. आपण ही खात्री बाळगू शकतो कारण, प्रीती “स्वार्थ पाहत नाही, . . . ती सर्व काही सहन करिते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:४-८) यहोवाबद्दलच्या प्रीतीने, एकमेकांमधील प्रीतीला मजबूत केलेली कुटुंबे निश्चितच आनंदी आहेत!
ईश्वरी शांती अनुसरत राहा
२१. तुमच्या कुटुंबातील शांती व आनंद कदाचित कशामुळे द्विगुणीत होऊ शकतो?
२१ आपण अगोदर पाहिलेली तत्त्वे आणि बायबलमधील तत्त्वे, यहोवाने दयाळूपणे ‘विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी’ पुरवलेल्या प्रकाशनांमध्ये वर्णित आहेत. (मत्तय २४:४५) उदाहरणार्थ, संपूर्ण जगभरात १९९६/९७ दरम्यान यहोवाच्या साक्षीदारांच्या “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” प्रांतीय अधिवेशनांत प्रकाशित झालेल्या १९२ पानी कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य नामक पुस्तकात अशा प्रकारची माहिती आढळते. या प्रकाशनाच्या साहाय्याने शास्त्रवचनांच्या व्यक्तिगत तसेच कौटुंबिक अभ्यासामुळे पुष्कळ लाभ मिळू शकतात. (यशया ४८:१७, १८) होय, शास्त्रवचनांतील सल्ला लागू केल्यास तुमच्या कुटुंबातील शांती व आनंद नक्कीच द्विगुणीत होईल.
२२. आपल्या कौटुंबिक जीवनाला आपण कशावर केंद्रित केले पाहिजे?
२२ यहोवाची इच्छा पूर्ण करणाऱ्या कुटुंबांसाठी त्याने विस्मयकारक गोष्टी राखून ठेवल्या आहेत आणि तो आपल्या स्तुतीस व सेवेस पात्र आहे. (प्रकटीकरण २१:१-४) तेव्हा, आपले कुटुंब त्यांचे जीवन खऱ्या देवाच्या उपासनेवर केंद्रित करो. तसेच, आपला स्वर्गीय पिता यहोवा, तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात ईश्वरी शांती अनुसरत असताना तुमच्यावर सुखाचा वर्षाव करो!
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ कुटुंबांना ईश्वरी भक्तीनुसार जीवन व्यतित करावयाचे आहे तर त्यांच्याकडून काय अपेक्षिले जाते?
◻ आज कुटुंबांवर संकट का ओढवले आहे?
◻ कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य काय आहे?
◻ कौटुंबिक जीवनात शांती व आनंदाचा उत्कर्ष होण्यास मदत करण्याकरता काही तत्त्वे कोणती आहेत?
[२४ पानांवरील चित्र]
उत्तम प्रकारचे दळणवळण कौटुंबिक जीवनात ईश्वरी शांती अनुसरण्यास मदत करते