वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ६/१५ पृ. १४-१९
  • ‘नर आणि नारी अशी ती त्याने निर्माण केली’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘नर आणि नारी अशी ती त्याने निर्माण केली’
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरे पुरुषत्व व खरे स्त्रीत्व
  • बाह्‍यस्वरूप
  • ख्रिस्ती पुरुष व स्त्रिया —खरे पुरुष व स्त्रिया
  • मी हे विचार कसे काढून टाकू शकतो?
    सावध राहा!—१९९५
  • यहोवाच्या उद्देशात स्त्रियांची भूमिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • देवाच्या आरंभीच्या सेवकांमध्ये स्त्रियांची प्रतिष्ठित भूमिका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • तुमची वेशभूषा आणि केशभूषा—यांमुळे देवाला काही फरक पडतो का?
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ६/१५ पृ. १४-१९

‘नर आणि नारी अशी ती त्याने निर्माण केली’

“देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर आणि नारी अशी ती निर्माण केली.”—उत्पत्ति १:२७.

यहोवाच्या लोकांपैकी असणे तसेच देवावर प्रीती करण्यास व त्याच्या आज्ञेचे पालन करण्यास आपल्या जीवनात प्राथमिकता देणारे पुरुष व स्त्रिया तसेच मुले व मुली यांसोबत सहवास राखणे किती मनोरम आहे! सत्य आपल्याला यहोवा देवास नाखुश करणाऱ्‍या मनोवृत्तींपासून व वर्तणुकीपासून मुक्‍त करते; तसेच ख्रिश्‍चनांनी कशाप्रकारे जीवन जगणे अगत्याचे आहे तेही शिकवते. (योहान ८:३२; कलस्सैकर ३:८-१०) उदाहरणार्थ, पुरुषांनी आपले पुरुषत्व आणि स्त्रियांनी आपले स्त्रीत्व कसे दाखवावे याविषयी सगळीकडील लोकांच्या वेगवेगळ्या परांपरा किंवा समज आहेत. पुरुष जन्मतः पौरुषीय व स्त्रिया स्त्रैण असतात एवढेच यात आहे का? की विचारात घेतली पाहिजेत अशी इतरही कारणे आहेत?

२ ख्रिश्‍चनांनी व्यक्‍तिगत, सांस्कृतिक किंवा पारंपरिक दृष्टिकोन प्राप्त केलेले असले तरीसुद्धा, देववचनाच्या अधीन राहिले पाहिजे. (मत्तय १५:१-९) पुरुषत्वाच्या आणि स्त्रीत्वाच्या सर्वच पैलूंवर बायबल सविस्तर माहिती देत नाही. उलट, आपण भिन्‍न संस्कृतींमध्ये पाहतो त्याप्रमाणे विविध मार्गांनी पुरुषत्व व स्त्रीत्व प्रकट करण्यासाठी ते मोकळीक देते. पुरुषांनी पौरुषीय व स्त्रियांनी स्त्रैण असावे म्हणून देवाने त्यांना तसे निर्माण केले. का बरे? कारण, पुरुष आणि स्त्री शारीरिकरीत्या एकमेकांसाठी संपूरक असण्यासोबत त्यांना एकमेकांच्या पौरुषीय व स्त्रैण गुणांद्वारे एकमेकांचे संपूरक असावयाचे होते. (उत्पत्ति २:१८, २३, २४; मत्तय १९:४, ५) तरीसुद्धा, लैंगिक संबंधाबद्दलच्या दृष्टिकोनांचा विपर्यास करण्यात आला आहे. पुष्कळ जण पुरुषत्वाची तुलना कठोर वर्चस्व, निर्दयीपणा किंवा पौरुषत्वाचा फाजील गर्व यांजशी करतात. काही संस्कृतींमध्ये पुरुषाने, जाहीरपणे अथवा खाजगीत रडणे त्याच्याकरता लाजिरवाणे असू शकते. पण, लाजरच्या थडग्याबाहेर लोकसमुदायात “येशू रडला.” (योहान ११:३५) परिपूर्ण पौरुषत्व असलेल्या येशूचे हे वर्तन अनुचित नव्हते. आज पुष्कळांनी स्त्रीत्वाविषयी टोकाची भूमिका घेतली आहे, निव्वळ शारीरिक व लैंगिक आकर्षण म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते.

खरे पुरुषत्व व खरे स्त्रीत्व

३ खरे पुरुषत्व आणि खरे स्त्रीत्व काय आहे? द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणते: “बहुतेक पुरुष आणि स्त्रिया केवळ शरीरानेच नव्हे तर वर्तन आणि आवडीनिवडी यांतही एकमेकांपासून भिन्‍न आहेत. यांतील काही भिन्‍नता जैवशास्त्रावर निर्धारित असतात. . . . परंतु असे दिसून येते, की अनेक अशारीरीय भिन्‍नता, प्रत्येक व्यक्‍ती शिकत असलेल्या लैंगिक भूमिकेवर आधारित असतात. लोकांचा नर किंवा नारी म्हणून जन्म होतो पण नंतर ते पौरुषीय किंवा स्त्रैण होण्यास शिकतात.” आपली जननिक घडण पुष्कळ गोष्टींचे स्पष्टीकरण देऊ शकेल, पण उचित पुरुषत्वाचा किंवा स्त्रीत्वाचा विकास, देव काय अपेक्षितो आणि आपण जीवनात कशाचा पाठलाग करण्याचे निवडतो हे शिकण्यावर अवलंबून आहे.

४ आपली पत्नी व मुले यांचा मस्तक या नात्याने पुढाकार घेण्याची आदामाची भूमिका होती हे बायबल इतिहास प्रकट करतो. तसेच त्याला, पृथ्वीला व्यापून तिला सत्तेखाली आणून सर्व पार्थिव कनिष्ठ सृष्टीला आपल्या अधीनतेत आणण्याविषयी देवाची इच्छा पूर्ण करावयाची होती. (उत्पत्ति १:२८) आदामाची “साहाय्यक” आणि “अनुरूप” होण्याची, त्याच्या मस्तकपदाच्या अधीन राहण्याची, दोघांसाठी देवाने उद्देशिलेला उद्देश पूर्ण करण्यासाठी आदामाला सहकार्य देण्याची हव्वेची स्त्रीत्वाची कौटुंबिक भूमिका होती.—उत्पत्ति २:१८; १ करिंथकर ११:३.

५ पण आदामाने आपली जबाबदारी पूर्ण केली नाही आणि हव्वेने, स्वतःसोबत आदामाला देवाची आज्ञा मोडण्यासाठी त्याला भुलविण्याकरता स्त्रीत्वाचा उपयोग केला. (उत्पत्ति ३:६) चूक असल्याचे माहीत असूनही ते करण्याद्वारे आदाम खरे पुरुषत्व प्रदर्शित करू शकला नाही. आपल्या पित्याचा व निर्माणकर्त्याचा शब्द राखण्याऐवजी त्याने दुर्बळ होऊन फसवणूक झालेल्या आपल्या पत्नीचे ऐकले. (उत्पत्ति २:१६, १७) लगेचच, हे पहिले दांपत्य, आज्ञाभंगाद्वारे होणाऱ्‍या परिणामाविषयी देवाने अगोदर जे पाहिले होते ते अनुभवू लागले. आपल्या पत्नीचे आलंकारिक, काव्यात्मक वर्णन करणारा आदाम आता, ‘तू मला दिलेली सोबतीण’ असे म्हणून नामानिराळा झाला. त्याच्या अपरिपूर्णतेने आता त्याचे पुरुषत्व बिघडवून टाकले व चुकीची दिशा दाखवली ज्यामुळे तो आपल्या पत्नीवर ‘स्वामित्व चालवू लागला.’ आणि हव्वेला कदाचित फाजील किंवा अनियंत्रित मार्गाने आपल्या पतीची ‘ओढ’ लागणार होती.—उत्पत्ति ३:१२, १६.

६ जलप्रलय येण्याआधी, पुरुषत्वाचा आणि स्त्रीत्वाचा दुरुपयोग ढळढळीतपणे दिसू लागला. स्वर्गामधील आपले मूलस्थान सोडलेल्या देवदूतांनी स्त्रियांसोबत रतिसुख उपभोगण्यासाठी मानवी रूपे धारण केली. (उत्पत्ति ६:१, २) अहवालानुसार, त्या अनैसर्गिक संयोगामुळे केवळ नर जन्माला आले. आणि असे दिसते, की ती संतती, संकरित संतती, प्रजोत्पादन करू न शकणारी संतती होती. ते शूरवीर, नेफिलीम किंवा इतरांना पाडत असल्यामुळे पाडणारे म्हणून प्रसिद्ध झाले. (उत्पत्ति ६:४; NW तळटीप) उपलब्ध पुराव्यानुसार ते हिंसक, आक्रमक, कोमल दया प्रदर्शित न करणारे होते.

७ खरेच शारीरिक रूपलावण्य, शरीरयष्टी, आकार, किंवा शक्‍ती स्वीकारयोग्य पुरुषत्व अथवा स्त्रीत्व दाखवत नाही. देह धारण केलेले देवदूत बहुधा रूपवान होते. आणि नेफिलीम उंच आणि कणखर होते पण त्यांची मानसिक मनोवृत्ती विकृत होती. आज्ञाभंजक देवदूतांनी व त्यांच्या संततीने संपूर्ण पृथ्वीला लैंगिक अनैतिकतेने आणि हिंसाचाराने व्यापून टाकले. यास्तव, यहोवाने त्या जगाचा नाश केला. (उत्पत्ति ६:५-७) परंतु, या जलप्रलयाने दुरात्मिक प्रभावाचे किंवा आदामाच्या पापाच्या परिणामांचे उच्चाटन केले नाही. जलप्रलयानंतर, पुरुषत्वाचा व स्त्रीत्वाचा अनुचित प्रतिबिंब पुन्हा डोकावू लागला. याविषयी आपण शिकू शकू असे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारची उदाहरणे बायबलमध्ये आहेत.

८ योसेफ आणि पोटीफराच्या पत्नीचा अहवाल, उचित पुरुषत्व आणि जगिक स्त्रीत्व यांतील भेददर्शक भिन्‍नता दर्शवतो. पोटीफराची पत्नी, देखण्या योसेफाला पाहून मोहित झाली व त्याला फुसलावण्याचा तिने प्रयत्न केला. त्यावेळी, जारकर्म किंवा व्यभिचार यांना मनाई करणारा कोणताही लिखित नियम नव्हता. तरीसुद्धा, योसेफ त्या अनैतिक स्त्रीपासून पळून गेला व त्याने देवाची स्वीकृती असलेले पुरुषत्व प्रदर्शित करणारा देवाचा खरा पुरुष असल्याचे स्वतःला सिद्ध केले.—उत्पत्ति ३९:७-९, १२.

९ एस्तेर आणि राणी वश्‍ती यांनी स्त्रियांसाठी असलेला परस्परांमधील उल्लेखनीय फरक दाखवून दिला. उपलब्ध पुराव्यानुसार, वश्‍तीला वाटले की ती रूपवती असल्यामुळे अहश्‍वेरोश राजा नेहमीच तिच्या मर्जीचा मान राखेल. परंतु, आज विकल्या जाणाऱ्‍या अनेक त्वचेच्या क्रिम्सप्रमाणे तिचे ते सौंदर्य वरवरचे होते. तिच्यात शालीनतेचा व स्त्रीत्वाचा अभाव असल्यामुळे, तिचा पती व राजा याला अधीनता दाखवण्यात ती अपयशी ठरली. राजाने तिला नाकारले व खरे स्त्रीत्व असलेल्या आणि वास्तविकतेत यहोवाचे भय मानणाऱ्‍या एका स्त्रीला आपली राणी होण्यास निवडले.—एस्तेर १:१०-१२; २:१५-१७.

१० एस्तेर, ख्रिस्ती स्त्रियांकरता चांगले उदाहरण आहे. ती “सुंदर व रूपवती होती,” तरीसुद्धा तिने “सौम्य व शांत आत्मा . . . अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा” दाखवली. (एस्तेर २:७; १ पेत्र ३:४) तिने दिखाऊ शोभेला प्रामुख्य दिले नाही. एस्तेरने चतुरपणा व संयम दाखवला, तिच्या लोकांचे जीव धोक्यात असतानाही ती आपला पती अहश्‍वेरोशच्या अधीन राहिली. शांत राहणे सुज्ञतेचे होते तेव्हा ती शांत राहिली पण आवश्‍यक व उचित समयी ती निर्भयतेने बोलली. (एस्तेर २:१०; ७:३-६) तिने तिचा प्रौढ चुलत भाऊ मर्दखयचा सल्ला मानला. (एस्तेर ४:१२-१६) तिने आपल्या लोकांप्रती प्रेम व निष्ठा प्रदर्शित केली.

बाह्‍यस्वरूप

११ उचित स्त्रीत्व कसे ओळखता येते? एका आईने म्हटले: “सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्‍वराचे भय बाळगणाऱ्‍या स्त्रीची प्रशंसा होते.” (नीतिसूत्रे ३१:३०) यास्तव, देवाबद्दल आदरयुक्‍त भय आवश्‍यक आहे व शारीरिक सौंदर्यापेक्षा, प्रेम-दया, गोडवा, शालीनता आणि सौम्यता स्त्रीत्वाला अधिक सुशोभित करतात.—नीतिसूत्रे ३१:२६.

१२ पण दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेक पुरुषांच्या किंवा स्त्रियांच्या तोंडी सुज्ञता नाही किंवा त्यांच्या जीभेवर प्रेम-दया नाही. त्यांची भाषा निंदात्मक, उपरोधिक, अश्‍लील व अविचारीपणाची आहे. काही पुरुषांना वाटते की अश्‍लील भाषा पुरुषत्वाचे चिन्ह आहे व काही स्त्रिया मूर्खपणे त्यांचे अनुकरण करतात. एखादी स्त्री देखणी परंतु निर्बुद्ध व वाद घालणारी, उपरोधिक किंवा हट्टी आहे तर ती पूर्णार्थाने सुंदर, खरोखरचे स्त्रीत्व असलेली ठरू शकेल का? “डुकराच्या नाकांत जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.”—नीतिसूत्रे ११:२२.

१३ कुणी स्त्रीसौंदर्याचा कितीही दिखावा केला तरीसुद्धा त्याच्या जोडीला घाणेरडी भाषा, उपरोधिकपणा किंवा अविचारीपणा असल्यास, हे गुण त्या सौंदर्याला शोभणार नाहीत. वास्तविक पाहता, अशा प्रकारचे अधम वर्तन शारीरिकरीत्या आकर्षक असलेल्या व्यक्‍तीला कुरूप बनवू शकते. एखाद्या पुरुषाचे अथवा स्त्रीचे शारीरिक सौंदर्य, रागाचा उद्रेक, आरडाओरडा किंवा निंदात्मक भाष्याची भरपाई किंवा समर्थन करू शकत नाही हे आपण सहजपणे समजू शकतो. सर्व ख्रिश्‍चन स्वतःला, आपल्या बायबल आधारित भाषा व वर्तनाद्वारे देव आणि सहमानवांसाठी आकर्षक बनवू शकतात आणि बनवले पाहिजे.—इफिसकर ४:३१.

१४ योग्य स्त्रीत्व व पुरुषत्व आध्यात्मिक गुणांवर आधारित असताना, आपली शारीरिक वागणूक व आपले स्वरूप तसेच आपण जो पोशाख धारण करतो व ज्याप्रकारे तो धारण करतो आपल्याविषयीचा संदेश देतात. प्रेषित पेत्राने ख्रिस्ती स्त्रियांना: “तुमची शोभा केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे, किंवा उंची पोषाक करणे ह्‍यात बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी. कारण ह्‍याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणाऱ्‍या पवित्र स्त्रियाहि आपआपल्या पतीच्या अधीन राहून आपणांस शोभवीत असत,” असा सल्ला दिला तेव्हा त्याच्या मनात पहिल्या शतकातील पेहराव व केशसंभाराच्या विशिष्ट स्टाईल्स होत्या यात काहीच शंका नाही.—१ पेत्र ३:३-५.

१५ पहिले तीमथ्य २:९, १० मध्ये आपल्याला स्त्रीच्या पेहरावाविषयी पौलाचे विचार कळतात: “स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; . . . देवभक्‍ति स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे.” तेथे त्याने मर्यादशीलपणा प्रतिबिंबित करणारा भिडस्तपणा आणि योग्य प्रकारचा पेहराव धारण करण्याच्या गरजेवर जोर दिला.

१६ एखादा पुरुष किंवा स्त्री, मुलगा किंवा मुलगी लैंगिक इच्छा जागृत करणाऱ्‍या रीतीने वागल्यास किंवा पेहराव केल्यास पुरुषत्व किंवा स्त्रीत्व उठून दिसत नसते आणि त्यामुळे देवाचाही आदर होत नाही. जगातील अनेक लोक पेहरावात आणि वर्तनात पौरुषीय किंवा स्त्रैण लैंगिकतेचा फाजील दिखाऊपणा करतात. इतर जण अनैतिक उद्देशास्तव लिंगांतील भेदांना दुर्बोध करतात. परंतु, बायबल देवाचा विचार प्रकट करते त्याबद्दल आपण ख्रिश्‍चनांनी किती कृतज्ञ असावयास हवे! यहोवाने प्राचीन इस्राएलास सांगितले: “स्त्रीने पुरुषाचे कोणतेहि वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेहि वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्‍वर ह्‍याला तसे करणाऱ्‍या प्रत्येकाचा वीट आहे.”—अनुवाद २२:५.

१७ तुम्हाला कदाचित याबाबतीत नोव्हेंबर १, १९८९ च्या टेहळणी बुरूज ने पृष्ठ १७ वर काय म्हटले त्याची उजळणी करावयास आवडेल: “एखादी पद्धत अगदीच भपकेबाज आहे का हा तो प्रश्‍न नाही, तर तो पेहराव देवाचा सेवक म्हणणाऱ्‍यांसाठी साजेसा आहे का हा आहे. (रोमकर १२:२; २ करिंथकर ६:३) अगदीच सैल कपडे तसेच अगदीच तंग कपडे लोकांचे लक्ष आमच्या संदेशापासून दूर नेतील. जे कपडे घातल्यामुळे पुरुष स्त्री असल्याचा आणि स्त्री ही पुरुष असल्याचा आभास निर्माण केला जातो तसे कपडे घालणे हे निश्‍चितपणे चुकीचे आहे. (पडताळा अनुवाद २२:५.) अर्थातच हवामान तसेच व्यावसायिक गरजा इत्यादि कारणामुळे स्थानिक प्रथांमध्ये भिन्‍नता असेल, यामुळेच ख्रिस्ती मंडळी बंधूंनी जागतिकपणे अमूकच पेहराव घातला पाहिजे असा कडक व बंधनशील नियम करणार नाही.”

१८ केवढा संतुलित व उचित सल्ला! परंतु दुःखाची गोष्ट अशी आहे की काही ख्रिस्ती, पुरुष आणि स्त्रिया, पेहराव आणि केशसंभाराच्या बाबतीत जग जे काही सादर करते त्याचे आंधळेपणाने अनुकरण करतात, यहोवा आणि ख्रिस्ती मंडळीवर ते कसे प्रतिबिंबित होईल याचा जराही विचार करीत नाहीत. आपल्यावर जगाच्या विचारसरणीचा प्रभाव तर पडला नाही ना हे पाहण्यासाठी आपल्यातील प्रत्येकजण आत्मपरीक्षण करू शकतो. किंवा, एखाद्या आदरणीय, अनुभवी बंधू वा बहिणीला, आपल्या पेहरावात आपल्याला काही फेरफार करावा लागेल का याबद्दल त्यांचे काय मत आहे ते विचारू शकतो आणि मग दिलेल्या सल्ल्याला गंभीरतेने तोलून पाहू शकतो.

ख्रिस्ती पुरुष व स्त्रिया —खरे पुरुष व स्त्रिया

१९ या युगाचे दैवत सैतान आहे व लिंगाबद्दलच्या गोंधळाद्वारे आपल्याला त्याचा प्रभाव दिसून येतो व पेहरावाव्यतिरिक्‍त इतर बाबतीतही तो गोंधळ स्पष्ट आहे. (२ करिंथकर ४:४) काही देशांत स्त्रिया बायबल तत्त्वांना कानामागे टाकून पुरुषांच्या मस्तकपदासाठी चढाओढ करतात. दुसऱ्‍या बाजूला पाहता, आदामाने केले त्याप्रमाणे अनेक पुरुष आपल्या मस्तकपदासंबंधाने असलेल्या जबाबदाऱ्‍यांचा त्याग करतात. जगामध्ये असेही काही आहेत जे जीवनांतील आपली लैंगिक भूमिका बदलवून टाकतात. (रोमकर १:२६, २७) बायबल, देवाची मान्यता असलेल्या कोणत्याही पर्यायी जीवन-शैलीबद्दल सांगत नाही. व ख्रिस्ती होण्याआधी आपल्या विविध भूमिकांविषयी किंवा लैंगिक आवडीनिवडींविषयी संभ्रमात असणारे हा भरवसा बाळगू शकतात, की देवाच्या दर्जांनुरुप जीवन जगण्यातच त्यांचे चिरंतन कल्याण आहे व अशा दर्जांना मानवी परिपूर्णतेप्रत पोहंचणारे सर्व जण नक्कीच मौल्यवान समजतील.

२० ख्रिस्ती पुरुष व स्त्रियांना, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन ही देवाच्या पवित्र आत्म्याची फळे विकसित करून ती प्रदर्शित करावी असे शास्त्रवचने दाखवतात. (गलतीकर ५:२२, २३) देवाने आपल्या थोर सुज्ञतेमुळे, वरील गुण विकसित करण्याद्वारे पुरुषांस आपले पौरुषत्व आणि स्त्रियांस आपले स्त्रीत्व उठून दिसावयास शक्य केले. आत्म्याची फळे विकसित करणाऱ्‍या पुरुषाचा आदर करणे सोपे जाते व जी स्त्री असे करते तिच्यावर प्रीती करणे सोपे जाते.

२१ सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य येशू ख्रिस्त होता आणि ख्रिश्‍चनांनी त्याच्या जीवनशैलीचे अनुकरण केले पाहिजे. (१ पेत्र २:२१-२३) येशूप्रमाणेच, पुरुषांनी व स्त्रियांनी देवाशी एकनिष्ठ शाबीत व्हावे व त्याच्या वचनाच्या आज्ञेत राहावे. येशूने प्रीती, कोमलता आणि दया यांसारखे सुंदर गुण दाखवले. खरे ख्रिस्ती या नात्याने, आपण त्याचे शिष्य आहोत हे शाबीत करण्याकरता त्याचे अनुकरण करावे अशी आपल्याकडून अपेक्षा केली जाते.—योहान १३:३५.

२२ येशू ख्रिस्त अस्सल पुरुष होता, शास्त्रवचनांमधील त्याच्या जीवनचरित्र्याचा अभ्यास करताना आपल्याला त्याचे पौरुषीय गुण दिसून येतात. तो अविवाहित होता पण बायबल दाखवते, की स्त्रियांसोबत त्याची संतुलित संगती होती. (लूक १०:३८, ३९) पुरुष आणि स्त्रियांसोबतचे त्याचे नातेसंबंध नेहमीच शुद्ध व आदरणीय होते. तो पुरुषत्वाचा परिपूर्ण नमुना आहे. त्याने पुरुष, स्त्री किंवा आज्ञाभंजक देवदूत, यापैकी कोणालाही आपले ईश्‍वरी पुरुषत्व व यहोवाप्रती असलेला विश्‍वासूपणा लुबाडण्यास वाव दिला नाही. तो आपल्या जबाबदाऱ्‍या स्वीकारण्यास कचरला नाही, विनातक्रार त्याने त्या पूर्ण केल्या.—मत्तय २६:३९.

२३ यहोवाच्या लोकांमध्ये असणे व ज्या पुरुष आणि स्त्रियांच्या तसेच मुलामुलींच्या जीवनात यहोवा देवावर प्रीती करणे व त्याची आज्ञा मानणे प्रथम आहे अशांसोबत संगती करणे केवढे आल्हाददायक आहे! देवाच्या वचनाचे पालन केल्याने आपण बंदिस्त होत नाही. उलट, आपण जगापासून आणि लिंगाचे सौंदर्य, त्याचा उद्देश आणि वेगवेगळ्या भूमिकांना हिणकस बनवणाऱ्‍या त्याच्या मार्गांपासून मुक्‍त होतो. जीवनात देवाने दिलेली भूमिका, मग ती पुरुषाची असो वा स्त्रीची असो, पार पाडल्यावर मिळणारे खरे सुख आपण उपभोगू शकतो. होय, निर्माणकर्त्या यहोवा देवाने आपल्यासाठी केलेल्या सर्व प्रेमळ तरतुदींबद्दल तसेच आपल्याला पुरुष आणि स्त्री असे निर्माण केल्याबद्दल आपण त्याचे किती आभार मानतो!

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ पुरुष व स्त्रियांसाठी बायबल कोणत्या उचित भूमिकांविषयीचे वर्णन देते?

◻ जलप्रलयाआधी पुरुषत्वाचा विपर्यास कसा करण्यात आला व आपल्या काळात पुरुषत्वाचा आणि स्त्रीत्वाचा विपर्यास कसा झाला आहे?

◻ स्वरूपाविषयी कोणता बायबल सल्ला तुम्ही लागू करण्याचा प्रयत्न कराल?

◻ ख्रिस्ती पुरुष व स्त्रिया स्वतःला खरे पुरुष व स्त्रिया कसे शाबीत करू शकतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

१. सत्य हे ख्रिस्ती पुरुष व स्त्रियांना आशीर्वाद कसे आहे?

२. (अ) कशाच्या आधारावर आपण पुरुषत्व आणि स्त्रीत्व याबद्दलचा दृष्टिकोन ठरवला पाहिजे? (ब) लिंगाबद्दलच्या दृष्टिकोनांना काय झाले आहे?

३. पुरुष व स्त्रियांमध्ये फरक कसा आहे?

४. पुरुष आणि स्त्रीच्या भूमिकांविषयी बायबल काय प्रकट करते?

५. पुरुष आणि स्त्रीमधील नातेसंबंध कसा बिघडला?

६, ७. (अ) जलप्रलयाआधी पुरुषत्वाचा कोणता विपर्यास विकसित झाला? (ब) जलप्रलयाआधीच्या परिस्थितीतून आपण काय शिकू शकतो?

८. योसेफाने पुरुषत्वाचे कोणते उत्तम उदाहरण मांडले?

९, १०. (अ) वश्‍ती राणीने आपल्या स्त्रीत्वाचा गैरवापर कसा केला? (ब) एस्तेरने स्त्रीत्वाचे कोणते उत्तम उदाहरण आपल्यासमोर मांडले?

११. बाह्‍यस्वरूपाबद्दल आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१२, १३. (अ) दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेकांची भाषा कशी आहे? (ब) नीतिसूत्रे ११:२२ चा अर्थ काय आहे?

१४. पहिले पेत्र ३:३-५ मध्ये कोणत्या प्रकारच्या शोभेची प्रशंसा करण्यात आली आहे व तुम्हाला त्याविषयी कसे वाटते?

१५. ख्रिस्ती स्त्रियांनी आपल्या पेहरावावरून काय प्रदर्शित केले पाहिजे?

१६, १७. (अ) आज अनेक पुरुष व स्त्रियांनी पेहरावाचा दुरुपयोग कसा केला आहे? (ब) अनुवाद २२:५ मधील सल्लावरून आपण कोणता निष्कर्ष काढला पाहिजे?

१८. पेहराव आणि केशसंभाराविषयीचा बायबल सल्ला लागू करण्याकरता आपण कोणती पावले उचलू शकतो?

१९. कोणत्या अनिच्छित प्रभावाविरूद्ध आपण लढले पाहिजे?

२०. पुरुषत्व आणि स्त्रीत्वाच्या आपल्या दृष्टिकोनावर गलतीकर ५:२२, २३ चा कोणता परिणाम झाला पाहिजे?

२१, २२. (अ) जीवन-शैलींच्या बाबतीत येशूने कोणता नमुना घालून दिला? (ब) येशूने आपले पुरुषत्व कसे प्रकट केले?

२३. लिंगांच्या भूमिकेच्या बाबतीत पाहता, खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर वेगळेपणाने आशीर्वाद कसा दिला जातो?

[१७ पानांवरील चित्र]

एस्तेर दिसायला सुंदर होती तरीसुद्धा तिच्या शालीनतेसाठी व शांत व सौम्य स्वभावासाठी तिची विशेष आठवण केली जाते

[१८ पानांवरील चित्र]

आंतरिक सौंदर्यावर जास्त जोर देताना केशभूषेकडे योग्य लक्ष द्या

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा