वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ६/१५ पृ. २६-२९
  • आमच्या स्थानिक मिशनरी क्षेत्राला भेट देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या स्थानिक मिशनरी क्षेत्राला भेट देणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • भाषेचा प्रतिबंध पार करणे
  • आमचे वैविध्यपूर्ण सेवाकार्य
  • विविध संस्कृती
  • उज्ज्वल भवितव्य
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ६/१५ पृ. २६-२९

आमच्या स्थानिक मिशनरी क्षेत्राला भेट देणे

मी ज्या ख्रिस्ती मंडळ्यांच्या गटांना भेटी देतो त्यासाठी मला जणू पोर्तुगाल ते चीन असा प्रवास करावा लागतो. आणि खरं तर, मी आणि ऑलिव्ह, माझी पत्नी ब्रिटनच्या बाहेर कधी जात नाही.

संपूर्ण देशात विखुरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या वृद्धिंगत परभाषीय मंडळ्यांना आम्ही भेटी देतो. पोर्तुगीज गट असलेल्या, फ्रान्सच्या नर्मडी समुद्रकिनाऱ्‍यापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले जर्सीचे बेट ते उत्तर इंग्लंडमधील संदरलँडचे शहर यांदरम्यान राहणाऱ्‍या आस्थेवाईक चीनी-भाषिक लोकांना आम्ही भेटतो. आमच्याकडे भरभराट होत असलेले आध्यात्मिकरीत्या समृद्ध, अनेक भाषांचे क्षेत्र आहे. ही असामान्य नियुक्‍ती आम्हाला कशी मिळाही होती? आणि आमच्या स्थानिक मिशनरी क्षेत्रात काय होत आहे? मी तुम्हाला सांगतो.

ऑलिव्हने आणि मी प्रवासी कार्यात सुमारे २० वर्षे घालवली आहेत आणि या वर्षांच्या दरम्यान आम्ही प्रत्येक आठवडी वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी देत असू. आम्ही या प्रवासकार्यात ब्रिटनचा पूर्व-पश्‍चिम आणि उत्तर-दक्षिण असा सर्व प्रदेश पायाखाली घातला तसेच अलीकडे माल्टाच्या मेडीटेरिअन बेटावरील आपल्या ख्रिस्ती बांधवांनी आमचा जो पाहुणचार केला त्यात त्यांनी बोट दाखवायला देखील जागा ठेवली नाही. (पडताळा प्रेषितांची कृत्ये २८:१, २.) माल्टामध्ये तीन वर्षे घालविल्यानंतर आमची पुढील नियुक्‍ती कोणती असेल याविषयीचे विचार आमच्या मनात घोळू लागले. आम्हाला कदाचित इंग्लंडच्या ग्रामीण भागात पाठविण्यात येईल अशी आम्ही कल्पना केली होती आणि या शक्यतेनुसार आमच्या मनाची तयारी करण्यास आम्ही सुरवात देखील केली होती. २३ वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्‍या गटांच्या आणि मंडळ्यांच्या नवीन विभागात काम करण्याची नियुक्‍ती आम्हाला मिळाली तेव्हा आम्हाला आश्‍चर्याचा किती सुखद धक्का बसला होता!

आमच्यावर सोपविण्यात आलेले काम कसे पार पाडता येईल याचा आम्ही विचार करू लागलो. माल्टातील अनुभवाखेरीज आम्ही कधीही विभिन्‍न पार्श्‍वभूमी आणि संस्कृती असलेल्या लोकांमध्ये इतके मिसळलो नव्हतो. इंग्रजी इतक्या चांगल्या प्रकारे जाणत नसलेल्या लोकांना उत्तेजन देणे आम्हाला खरोखरच शक्य होते का? इतर भाषा येत नसताना आम्ही त्यांच्याशी दळणवळण कसे साधणार होतो? आणि त्यांच्या आहाराबद्दल आणि विविध संस्कृतींबद्दल काय? आम्हाला त्यांच्याशी खरोखरच जुळवून घेता येणार होते का? मासेदोनियातील या निमंत्रणाला उत्तर देण्यापूर्वी आम्ही प्रार्थनापूर्वक विचार केला तेव्हा आमच्या मनात अशाप्रकारचे अनेक प्रश्‍न आले.—प्रेषितांची कृत्ये १६:९, १०; १ करिंथकर ९:१९-२२.

भाषेचा प्रतिबंध पार करणे

ऑलिव्ह म्हणते: “मला त्यांच्या भाषांचा बिलकुल गंध नसल्यामुळे माझ्याच्याने हे होणारच नाही असे मला सुरवातीला वाटले होते. तेथील बहिणींना मी कशी मदत करू शकेल हे मला समजत नव्हते. कोणत्याही नियुक्‍तीला नाही म्हणू नये असे उत्तेजन आमचा बायबल अभ्यास घेतलेल्या दांपत्याने आम्हाला दिले होते, हे अद्यापही मला आठवते. यहोवा आपल्याला अशक्य असलेली गोष्ट करायला कधीही सांगत नाही, असे त्यांनी आम्हाला शिकवले होते.” म्हणून आम्ही हसतहसत ही नियुक्‍ती स्वीकारली.

या विचारांती आम्हाला हे पाहायला मिळते, की दुसऱ्‍या भाषेचे इतके ज्ञान नसल्यामुळे सर्वांना एकाच प्रकारची वागणूक देण्यास आम्हाला मदत झाली आहे. उदाहरणार्थ, इंग्रजी भाषेत होणारा सभांचा कार्यक्रम पूर्णपणे समजत नसतानाही शेवटपर्यंत सभांना बसत असलेल्या बांधवांची कदर आम्हाला तेव्हा कळली जेव्हा आम्ही प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या भाषेत होणाऱ्‍या सभांना जाऊ लागलो. सभांमध्ये काय सांगितले जाते ते समजण्यासाठी खरोखरच सभांची चांगली तयारी करणे आमच्यासाठी अगत्याचे होते. ऑलिव्ह सभेत नेहमी एकतरी उत्तर देते. ती इंग्रजीत उत्तर तयार करते आणि एक बहीण ते उत्तर तिला बोली भाषेत भाषांतरित करून देते. काहीशा आशंकेनेच आपण हात वर करतो, हे ती मान्य करते. काहीवेळा तिच्या उत्तराने मंडळीत हशा सुद्धा पिकतो. परंतु त्यामुळे ती हार मानत नाही. ती म्हणते: “माझ्या प्रयत्नांची बांधव कदर करतात हे मला माहीत आहे. आणि खरं तर माझ्या उत्तरामुळे भाषेशी अधिक परिचित असलेल्यांना उत्तेजनच मिळतं.”

भाषणे देणे देखील माझ्यासाठी थोडेसे वेगळे आहे कारण प्रत्येक वाक्यानंतर दुभाषिकासाठी मला वेळ द्यावा लागतो. यामुळे माझ्या विचारांची लिंक तुटण्याची जरा जास्तच शक्यता असते. मला असे दिसून येते, की मला अधिक लक्ष द्यावे लागते आणि भाषणाच्या पुष्कळ भागाची काटछाट देखील करावी लागते. पण तरीही त्यात मला आगळाच आनंद मिळतो.

आमचे वैविध्यपूर्ण सेवाकार्य

ब्रिटनमधील अनेक जन परभाषिक शहरी क्षेत्रांत दूरदूरवर विखुरलेले आहेत; एका रस्त्यावर तुम्हाला एखादा-दुसरा आभावानेच आढळेल आणि मग इतरांची भेट घेण्यासाठी तुम्हाला काही अंतर प्रवास करावा लागतो. तथापि, तुम्ही त्यांना त्यांच्या भाषेत अभिवादन करता तेव्हा त्यांची प्रतिक्रिया पाहून तुमच्या प्रयत्नांचे चीज झाल्याचे तुम्हाला पाहायला मिळते. माझ्यासोबत असलेला बांधव देवाच्या राज्याचा संदेश घरमालकाच्या भाषेत देतो तेव्हा घरमालकाची प्रतिक्रिया पाहून होणारा आनंद बहुतेकवेळा अवर्णनीय असतो.

खरोखरच, आमच्या ४० वर्षांच्या राज्य सेवेदरम्यान आमचे परकीय-भाषिक क्षेत्रातील सेवाकार्य फार रोमांचकारक राहिले आहे. वृद्धी होण्याची फार दाट शक्यता आहे. स्वतःच्या मातृभाषेत सत्य शिकल्यामुळे शिकलेल्या गोष्टींची अधिक कदर बाळगण्यासाठी लोकांना इतका वेळ लागत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. (प्रेषितांची कृत्ये २:८, १४, ४१) सभा संपल्यानंतर, काही बाबतींत तर मातृभाषेतील संपूर्ण कार्यक्रम पहिल्यांदाच समजल्यानंतर बंधुभगिनींच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहणे भावनात्मकरीत्या अगदी हेलावून टाकणारे आहे.

घरोघरचा प्रचार करतेवेळी आम्ही घरमालकाच्या भाषेत निदान प्रस्तावना करण्याचा प्रयत्न करतो; परंतु काही वेळा आमची त्रेधा उडते. उदाहरणार्थ, गुजरातीमध्ये केमछो या शब्दाने सामान्यपणे अभिवादन केले जाते; या शब्दाचा अर्थ “नमस्ते” असा होतो. परंतु एकदा मी या शब्दाचा उच्चार करताना चूक केली त्यामुळे जणू मी प्रसिद्ध कॉफीच्या नावाची जाहिरात करत असल्याचे लोकांना वाटत होते. तथापि, एकदा मी विवाहित दांपत्याच्या घरी गेलो आणि त्यांना गुजराती भाषेत अभिवादन केले. त्यांनी आम्हाला तत्काळ घरात बोलावले आणि मोठ्या आदराने आम्हाला कॉफी दिली—अर्थात चुकीच्या शब्दोच्चारामुळे नव्हे. आम्ही भेट देत असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या गटातील काहींचे ते नातेवाईक असल्याचे नंतर मला कळले आणि त्यांनी सत्यात मनःपूर्वक आस्था प्रकट केली.

इंग्रजी भाषिक बहीण एका चिनी भाषिक स्त्रीला कित्येक वर्षांपर्यंत वारंवार नियतकालिके देत असे. तिने त्या स्त्रीला मोफत गृह बायबल अभ्यास देखील सादर केला होतो; परंतु तिने तो स्वीकारला नाही. एके दिवशी या बहिणीसोबत, चिनी भाषा शिकत असलेल्या एका बहिणीने तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक चिनी भाषेत सादर केले आणि त्या महिला घरमालकाने ते लगेच घेतले देखील.a आपल्या स्वतःच्या भाषेत पुस्तक मिळाल्यामुळे त्या स्त्रीने बायबल अभ्यास स्वीकारला. त्या स्त्रीच्या मायबोलीत केवळ काही शब्द बोलल्यामुळे हा चमत्कार झाला होता.

विविध संस्कृती

काही संस्कृतींमध्ये स्त्रियांनी रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडलेले पुरुषांना आवडत नाही, याची कल्पना आम्हाला यापूर्वी कधीही नव्हती. त्यामुळे संध्याकाळच्या सुमाराला होणाऱ्‍या सभांना उपस्थित राहण्यासाठी अनेक बहिणींना दुरापास्त झाले होते. काही आशियाई समाजांमध्ये एखादी तरुणी अविवाहित आणि घरी राहण्याचे पसंत करते तेव्हा असे केल्याने घराचा अपमान होत असल्याचे मानले जाते. एकदा एका तरुण भगिणीच्या घरातील लोकांनी तिच्यासाठी नवरा मुलगा निवडला परंतु त्याच्याशी लग्न करण्यास ती तयार न झाल्यामुळे तिच्या वडिलांना चक्क विष घेऊन आत्महत्या कराविशी वाटली होती. होय, अशा बहिणींनी जे सहन केले आहे ते खरोखरच स्तुत्यपर आहे! असे असतानाही, कौटुंबिक जीवनावरील सत्याचा प्रभाव आणि अशा बहिणींची यहोवाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांचे पालक कशा प्रकारे प्रभावित होतात, हे पाहणे खरोखरच आश्‍चर्यकारक आहे.

या नेमणुकीचा स्वीकार करण्यासाठी आम्ही अनेक बदल केले आहेत. प्रवासी कार्याला सुरवात करण्यापूर्वी इंग्लंडमधील नेहमीचा आहार मी घेत असे, पण आता माझा आहार अधिक रूचकर, मसालेदार पदार्थांचा आहे. कच्च्या माशापासून ते मसालेदार पदार्थांपर्यंत—अशा विविध खाद्यपदार्थांचा आम्हाला यापूर्वी आस्वाद घेता आला नाही याचे आम्हाला दुःख होते.

उज्ज्वल भवितव्य

हा समय अनेक क्षेत्रांतील परकीय भाषिक क्षेत्रांसाठी भरभराटीचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आता विविध भाषांत अधिकाधिक प्रकाशने उपलब्ध आहेत. नवीन मंडळ्या संघटित होतात तेव्हा त्यांवर यहोवाचा आशीर्वाद असल्याचे तुम्ही अनुभवू शकता. इतर भाषांचे ज्ञान असलेले बांधव मदत करण्यासाठी फार दूरवरच्या मंडळ्यांमधून येत आहेत.

फ्रेंचमध्ये राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराला दाखविण्यात येणारा प्रतिसाद, हे याचे उल्लेखणीय उदाहरण राहिले आहे. झाईरे आणि इतर आफ्रिकी देशांतील अनेक फ्रेंच भाषिक शरणार्थी अलीकडील वर्षांत ब्रिटनमध्ये आले आहेत. लंडनमध्ये जेव्हा पहिली फ्रेंच भाषिक मंडळीची स्थापना झाली तेव्हा तीत सुमारे ६५ राज्य प्रचारक होते. एका वर्षानंतर त्यांची संख्या ११७ झाली होती आणि त्यांच्यापैकी ४८ जण नियमित पायनियर या नात्याने पूर्णवेळेची सेवा करत होते. वाढत्या आस्थेचा मागोवा घेण्यासाठी लवकरच आणखी एका मंडळीची स्थापना करण्यात आली. आता आस्थेवाईक लोकांकडे जास्त लक्ष देता येणे शक्य आहे; त्यांच्यापैकी १९९५ च्या स्मारकविधीला ३४५ जण उपस्थित होते. बेनिन, कोट डी आयव्हरी, मोरोक्को आणि झाईरे येथे काम केलेले भूतपूर्व गिलियड पदवीधर आपल्या अनुभवाचा उपयोग वाढत्या क्षेत्रासाठी आता करत आहेत आणि त्यामुळे मिळणारी प्रतिक्रिया देखील अद्‌भुत आहे.

एकदा फ्रेंच मंडळीला भेट देत असताना एका आफ्रिकी तरुणीसोबत बायबल अभ्यासासाठी गेलो. अभ्यास झाल्यानंतर तेथून निघणार तेव्हा तिने निग्रहाची विनंती केली: “कृपया जाऊ नका. थोडा वेळ आणखी थांबा.” तिला अधिक जाणून घेण्याची इच्छा होती. तिला पाहून मला पहिल्या शतकातील लुदियाची आठवण झाली.—प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५.

आमच्या आरंभीक कार्याने परकीय भाषांच्या छोट्या गटांचे रूपांतर मंडळ्यांमध्ये करण्यासाठी हातभार लावला आहे. जेथे बांधव साप्ताहिक मंडळीचा पुस्तक अभ्यास संचालित करत तेथे आम्ही त्यांना महिन्यातून एकदा संक्षिप्त ईश्‍वरशासित सेवा प्रशाला चालविण्याचे शिकवत असू. यामुळे त्यांना क्षेत्र सेवेत चांगल्याप्रकारे बोलण्यास मदत होते. ते हळूहळू मंडळीच्या पाचही साप्ताहिक सभा घेण्याच्या दिशेने कार्य करतात. आमच्याकडे नवीन मंडळ्या तर आहेत ज्यांमध्ये चिनी (कॅटोनिज), फ्रेंच, गुजराती, जपानी, पोर्तुगीज, पंजाबी, तामीळ आणि वेल्श भाषा बोलणारे लोक आहेत.

कर्णबधिर बांधवांसाठी असलेल्या सभांना उपस्थित राहण्याचा देखील विशेषाधिकार आम्हाला प्राप्त झाला. या बांधवांना आपल्या हाताच्या साह्‍याने गात असल्याचे पाहणे खरोखरच हेलावणारे आहे. ते सेवाकार्यात आपल्या हावभावांच्या साह्‍याने बोलतात हे जाणल्यानंतर राज्याच्या प्रचार कार्यात भाग घेण्यासाठी ते करत असलेल्या त्यांच्या सर्वोत्तम प्रयत्नांची मी कदर करतो. कर्णबधिर तसेच अंध असलेल्या इतर बांधवांसाठी भाषांतराचे काम करणारे काही अनुवादक देखील आहेत. कोणीही वगळला जाता कामा नये, याची यहोवा पूर्ण काळजी घेत असल्याचे दिसते.

आम्हाला काही मागायचे असल्यास, येशूची जी मागणी होती तीच आमची देखील असेल: “पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३८) अनेक बांधव त्यांच्या मंडळीच्या क्षेत्रातील वांशिक गटांच्या भाषा शिकण्याचे आव्हान स्वीकारत आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याच्या क्षमतेचे दान आम्हाला आश्‍चर्यकारकपणे प्राप्त होत नसले तरी यहोवा हे स्थानिक मिशनरी क्षेत्र निश्‍चितपणे आमच्यासाठी खुले करत आहे—हे क्षेत्र कापणीसाठी तयार आहे. (योहान ४:३५, ३६)—कॉलन सिमोर यांच्याद्वारे कथित.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा