वाचकांचे प्रश्न
“ही पिढी” याबद्दल येशूने जे म्हटले त्यावर नोव्हेंबर १, १९९५ च्या “टेहळणी बुरूज” अंकाने जोर दिला, जसे आपण मत्तय २४:३४ येथे वाचतो. तर मग, १९१४ मध्ये देवाच्या राज्याची स्वर्गात स्थापना झाली किंवा नाही याविषयी आपण शंका घ्यावी, असा याचा अर्थ होतो का?
या टेहळणी बुरूज अंकाच्या चर्चेने आपल्या १९१४ च्या मूलभूत शिकवणुकीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. येशूने राज्य शक्तीनिशी आपल्या उपस्थितीचे चिन्ह प्रकट केले. सन १९१४ पासून या चिन्हाची पूर्णता होत आहे, याचे आपल्याकडे पुष्कळ पुरावे आहेत. युद्धे, दुष्काळ, मऱ्या, भूकंप आणि इतर पुराव्यांच्या वास्तविकता हे दाखवून देतात, की १९१४ पासून येशू देवाच्या राज्याचा राजा या नात्याने कार्यरत राहिला आहे. यावरून हे सूचित होते, की आपण तेव्हापासून व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळात आहोत.
तर मग, हा टेहळणी बुरूजाचा अंक काय स्पष्ट करत होता? मत्तय २४:३४ येथे येशूने कोणत्या अर्थाने “पिढी” या शब्दाचा प्रयोग केला याविषयी त्या अंकाने स्पष्टीकरण दिले. वरील वचन म्हणते: “मी तुम्हास खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही.” येशूने “पिढी” असे म्हणण्यामागे त्याच्या आणि आपल्या दिवसांसाठी काय अर्थ होता?
अनेक शास्त्रवचने आपल्याला या गोष्टीची खात्री पटवून देतात, की येशूने यहुदी नेत्यांसारख्या किंवा त्याच्या एकनिष्ठ शिष्यांसारख्या छोट्या आणि भिन्न स्वरूपाच्या गटाला उद्देशून “पिढी” हा शब्द वापरला नव्हता. उलटपक्षी, त्याला नाकारलेल्या मोठ्या यहुदी लोकसमुहाचे खंडण करण्यासाठी त्याने “पिढी” या शब्दाचा उपयोग केला होता. पेन्टेकॉस्टच्या दिवशी पेत्राने जे आर्जवले ते अनेकांना करणे शक्य आहे अर्थात पश्चात्ताप आणि ‘ह्या कुटिल पिढीपासून स्वतःचा बचाव.’—प्रेषितांची कृत्ये २:४०.
त्या विधानामध्ये पेत्र स्पष्टपणे कोणत्याही निश्चित वयोगटाला किंवा कालावधीला तसेच कोणत्याही प्रकारच्या ठराविक तारखेला सूचित करण्यासाठी “पिढी” या शब्दाचा उपयोग करत नव्हता. येशूचा ज्या वर्षी जन्म झाला त्याच वर्षी जन्म झालेल्या पिढीतील लोकांचा किंवा सा.यु. २९ मध्ये जन्म झालेल्या पिढीतील लोकांचा बचाव झाला पाहिजे, असे पेत्राने म्हटले नव्हते. त्या काळातील अविश्वासू यहुद्यांबद्दल पेत्र बोलत होता—त्यांपैकी कदाचित काही जण तरुण राहिले असतील तर काही जण वृद्ध असले असतील—या लोकांना येशूची शिकवण माहीत होती, त्यांनी येशूचे चमत्कार पाहिले होते किंवा त्यांच्याविषयी ऐकले होते आणि तरीही त्यांनी त्याचा मशिहा म्हणून स्वीकार केला नव्हता.
पेत्र आणि इतर तीन प्रेषित जैतूनांच्या डोंगरावर येशूसोबत होते तेव्हा येशूने उपयोग केलेला “पिढी” हा शब्द पेत्राला अशा प्रकारे समजला होता. येशूच्या भविष्यवादित विधानानुसार त्या काळातील यहुदी—मूलभूतपणे, येशूचे समकालीन लोक—युद्धे, भूकंप, दुष्काळ आणि यहुदी व्यवस्थीकरणाचा शेवट जवळ होता याचे इतर पुरावे लवकरच अनुभवणार होते किंवा त्यांविषयी ऐकणार होते. खरे तर, सा.यु. ७० मध्ये नाश येईपर्यंत ती पिढी नाहीशी झाली नव्हती.—मत्तय २४:३-१४, ३४.
हे मान्य केलेच पाहिजे, की आपण येशूच्या शब्दांना त्या अर्थाने नेहमीच घेतले नाही. शेवट केव्हा येईल याची निश्चित तारीख जाणणे ही अपरिपूर्ण मानवाची मनोवृत्ती आहे. प्रेषितांनी देखील निश्चित स्पष्टीकरण जाणण्याचा प्रयत्न केला होता हे लक्षात ठेवा: “प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्राएलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार का?” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये १:६.
अशाच प्रकारच्या प्रांजळ हेतुंनी आधुनिक काळातील देवाच्या सेवकांनी येशूने “पिढी”बद्दल जे म्हटले त्याच्या साह्याने १९१४ पासून गणती करून निश्चित समय ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, एक वाद असा राहिला आहे, तो म्हणजे एक पिढी ७० किंवा ८० वर्षांची असू शकते आणि पहिल्या महायुद्धाचे आणि इतर चिन्हांचे महत्त्व समजण्यासाठी लोकांना पुरेसे मोठे व्हावयाचे असल्यास त्यावरून शेवट केव्हा येईल याचा ढोबळ अंदाज आपण बांधू शकतो.
अशा प्रकारचा केलेला तर्क कितीही यथायोग्य असला तरी येशूने दिलेल्या सल्ल्याला तो अनुसरून होता का? येशूने म्हटले: “त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतांस नाही, पुत्रालाहि नाही. . . . म्हणून जागृत राहा; कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येईल हे तुम्हास ठाऊक नाही.”—मत्तय २४:३६-४२.
यास्तव “ही पिढी” यावरील टेहळणी बुरूज अंकातील अलीकडील माहितीने १९१४ मध्ये जे घडले त्याबद्दल असलेल्या आपल्या समजेत कोणताही बदल केलेला नाही. परंतु येशूने “पिढी” ही संज्ञा कशा प्रकारे वापरली याविषयी स्पष्ट माहिती या अंकाने दिली, त्यामुळे शेवट आणखी किती दूरवर आहे हे जाणण्यासाठी १९१४ पासून गणना करावी म्हणून कोणताही आधार येशूच्या शब्दप्रयोगातून मिळत नसल्याचे आपल्याला पाहण्यास मिळते.