देव वचनाच्या विद्यार्थ्यांना पदवीदान
पहिल्या शतकातील ख्रिश्चनांचे अनुकरण करणारे यहोवाचे साक्षीदार जगभरात त्यांच्या दारोदारच्या प्रचार कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. या कार्यावर, वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या १०२ वर्गाच्या पदवीदान कार्यक्रमाच्या उद्घाटन अभिप्रायांदरम्यान जोर देण्यात आला.
मार्च १, १९९७ रोजी, यहोवाच्या साक्षीदाराच्या नियमन मंडळाचे सभासद, अल्बर्ट श्रोडर यांनी ली प्वा नामक एका फ्रेन्च नियतकालिकातील एका अलीकडील लेखाकडे लक्ष वेधले. त्यात म्हटले होते, की रोमन कॅथलिक इटलीत घरोघरचे प्रचार कार्य चालू करण्याची योजना करीत आहेत. त्या लेखाने असेही म्हटले: “[व्हॅटिकन मिशनऱ्यांनी] यहोवाच्या साक्षीदारांच्या क्षेत्रांत चढाओढ करताना मोकळ्या हाताने जाऊ नयेत म्हणून व्हॅटिकनने सेंट मार्क शुभवर्तमानाच्या दहा लाख प्रती छापण्याचीही योजना केली, जेणेकरून जेव्हा व्हॅटिकनच्या मिशनऱ्यांचा तज्ज्ञांशी [साक्षीदारांशी] दारोदारी सामना होईल तेव्हा त्यांच्याकडेही सुवार्तेच्या पत्रिकांचे ‘वाटप’ करण्यासाठी काही असेल.”
देववचनाचा प्रसार करण्याकरता येशूच्या कुशल प्रचार पद्धतींचे अनुकरण करणाऱ्यांमध्ये या ४८ पदवीधरांचाही समावेश होतो. हे पदवीधर आठ देशांतून, न्यूयॉर्कमधील पॅटरसन येथील वॉचटावर शैक्षणिक केंद्रात आले होते. त्यांच्या पाच महिन्यांच्या प्रशालेदरम्यान त्यांनी बायबलचा अथपासून इतिपर्यंत अभ्यास केला. देवाच्या संघटनेचा इतिहास, मिशनरी जीवनाचे व्यावहारिक पैलू व देवाच्या आत्म्याची फळे या सर्वांचा त्यांच्या अभ्यास सत्रात समावेश होता. हे सर्व एकाच उद्देशास्तव होते—ज्या १७ देशांमध्ये विदेशी मिशनरी सेवेकरता त्यांना पाठवले जाणार होते त्याकरता त्यांना तयार करण्यासाठी. पदवीदान समारंभाच्या वेळी ५,०१५ आंतरराष्ट्रीय श्रोत्यांनीही त्या समारंभाचा आनंद लुटला. या गिलियड विद्यार्थ्यांना कोणता अखेरचा व्यावहारिक सल्ला मिळाला?
नवीन मिशनऱ्यांकरता समयोचित उत्तेजन
अध्यक्षांच्या सुरवातीच्या अभिप्रायांनंतर, नियमन मंडळाच्या सभासद समितीचे साहाय्यक, राल्फ वॉल्स यांनी लहानसे भाषण दिले ज्यात त्यांनी नवीन मिशनऱ्यांसाठी व्यावहारिक सल्ला दिला. “प्रीती करण्याची आठवण ठेवा,” हा त्यांच्या भाषणाचा विषय होता. बायबलने २ तीमथ्याच्या ३ ऱ्या अध्यायात भाकीत केले, की जग मोठ्या प्रमाणावर प्रीतीहीन होईल हे त्यांनी दर्शवले. १ करिंथकर १३:१-७ मधील प्रीतीच्या वर्णनाच्या सुसंगतेत त्यांनी नवीन मिशनऱ्यांना ही समयोचित स्मरणिका पेश केली: “तुम्ही मिशनरी या नात्याने तुमचा तासांचा कोटा वाढवाल. गिलियड प्रशिक्षणामुळे तुमच्याकडे विपुल ज्ञान असेल. किंवा आपल्या शाखा नेमणुकींमध्ये आपण आवेशाने जादा वेळ काम करू. परंतु, जर आपण प्रीती करण्यास विसरून गेलो तर आपले सर्व परिश्रम व त्याग कवडीमोलाचे ठरेल.”
कार्यक्रमात नंतर, नियमन मंडळाचे कॅरी बार्बर यांनी “यहोवा आपल्याला विजय मिळवण्यास मार्ग दाखवत आहे” हा विषय हाताळला. पहिल्या महायुद्धानंतर लहानशा सुरवातींद्वारे यहोवा देवाने आपल्या विश्वासू सेवकांना छळ होत असतानाही त्याच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यात विजय मिळवण्यासाठी मार्ग दाखवला. १९३१ मध्ये, तेव्हा बायबल विद्यार्थी या नावाने ज्ञात असलेल्यांनी, ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांचा कडवा विरोध असतानाही यहोवाचे साक्षीदार हे नाव अंगीकारले. “गिलियड प्रशिक्षित मिशनऱ्यांच्या १०२ वर्गाला, ते पवित्र नाम शिकून घेण्याची होता होईल तितक्यांना संधी देण्याच्या वैभवी कार्यात मोठा भाग घेण्याचा महान सुहक्क आहे,” असे बंधू बार्बर म्हणाले. गिलियड प्रशालेत आजपर्यंत प्रशिक्षण मिळालेल्या तसेच १९४३ मध्ये ५४ देशांपासून ते आजपर्यंत २३३ देशांमध्ये देवाच्या वचनाचा प्रचार करण्यास हातभार लावलेल्या ७,१३१ मिशनऱ्यांच्या यादीत यांचाही समावेश केला जात आहे.
नियमन मंडळाचे आणखी एक सभासद, लॉयड बॅरी पुढील वक्ते होते. ते गिलियडच्या ११ व्या वर्गाचे पदवीधर होते व जपानमध्ये २५ पेक्षा अधिक वर्षांपर्यंत मिशनरी या नात्याने त्यांनी कार्य केले होते. त्यांनी, “त्यातच टिकून राहा,” असा विषय असलेल्या भाषणाद्वारे उत्तेजन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, “टिकून राहण्यातच तुम्हाला पुष्कळसा आनंद मिळेल.” मिशनरी कार्यात किंवा इतर कोणत्याही ईश्वरशासित नेमणुकीत टिकून राहिल्याने कोणते प्रतिफळ मिळते? “सर्वांहून विशेष म्हणजे, आपण टिकून राहिल्यामुळे यहोवाचे हृदय प्रमोदित होते . . . परीक्षेच्या वेळी एकनिष्ठ राहण्यात मोठे समाधान मिळते . . . मिशनरी सेवेला तुमच्या जीवनाचा पेशा बनवा . . . आणि प्रेमळ ‘शाबासकी’ तुमचे प्रतिफळ असेल.” (मत्तय २५:२१; नीतिसूत्रे २७:११) आपल्या भागाचा समारोप करताना, बंधू बॅरी यांनी अशी मनापासून शिफारस केली, की नवीन मिशनऱ्यांनी, मिशनरी क्षेत्राला आपले जीवन बनवण्याचा निश्चय करून ‘त्यातच टिकून राहावे.’—१ तीमथ्य ४:१६.
पुष्कळ गिलियड वर्गांना प्रशिक्षण देण्यात सहभाग असणाऱ्या कार्ल ॲड्म्सनी, “तुम्ही काय पाहाल?” असा प्रश्न विचारला. त्यांनी दाखवून दिले, की नवीन मिशनरी त्यांच्या नेमणुकीत जे काही पाहतील ते केवळ त्यांच्या शारीरिक दृष्टीवरच नव्हे तर त्यांच्या अंतःचक्षुंवर अवलंबून आहे. (इफिसकर १:१८) हे उदाहरणाद्वारे समजावण्यात आले, की इस्राएली हेरांनी वाग्दत्त देशाची पाहणी केली तेव्हा त्यांना काय दिसून आले. सर्व १२ हेरांनी एका शारीरिक दृष्टिकोनातून त्याचत्याच गोष्टी पाहिल्या, परंतु केवळ दोघांनी वाग्दत्त देशाकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहिले. मिशनरी देखील वेगळ्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहू शकतात. त्यांना जेथे सेवा करावी लागेल अशा काही देशांमध्ये गरिबी, दुःख व निराशा आढळून येईल. पण नकारात्मक प्रतिक्रिया दाखवून त्यांनी तो देश सोडून येऊ नये. बंधू ॲड्म्सनी अलीकडील वर्गातील एका मिशनरीबद्दल सांगितले जिने असे म्हटले: “या अनुभवांनी मला याची जाणीव करून दिली की मी येथेच राहिले पाहिजे. या लोकांना भवितव्यासाठी एक आशा हवी आहे. मला त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचं आहे.” नवीन मिशनऱ्यांना ज्या देशांत नेमण्यात आले ते क्षेत्र यहोवाने आपल्या विश्वव्यापी परादीसचा भाग बनवण्याचे ठरवले आहे या दृष्टीने त्या देशाकडे पाहण्याचे तसेच तेथील लोक नवीन जग समाजाचे भावी सदस्य आहेत या दृष्टीने त्यांच्याकडे पाहण्याचे उत्तेजन बंधू ॲड्म्सनी नवीन मिशनऱ्यांना देऊन आपले भाषण समाप्त केले.
या कार्यक्रमातील शेवटले भाषण वॉलेस लिवरेन्स यांनी दिले; गिलियड शिक्षक होण्याआधी त्यांनी अनेक वर्षे मिशनरी क्षेत्रात सेवा केली होती. त्यांच्या भाषणाचा विषय “देवाच्या अद्भुत कार्यांमध्ये सूक्ष्मदृष्टी बाळगून कार्य करा,” हा होता. सूक्ष्मदृष्टी बाळगून कार्य करण्यामध्ये चाणाक्षपणे, दक्षतेने व सामान्य व्यवहारज्ञानाने कार्य करण्याचा समावेश होतो. इस्राएलच्या राजा शौलाने हेच तर केले नव्हते.—१ शमुवेल १३:९-१३; १५:१-२२.
सूक्ष्मदृष्टी बाळगून कार्य करण्याचा एक मार्ग म्हणजे, नवीन जीवन-शैलीशी स्वतःला जुळवून घेण्याचे आव्हान झेलणे तसेच नवीन भाषा शिकणे व लोकांशी परिचित होणे. मिशनऱ्यांना, आव्हाने झेलताना व अडथळ्यांवर मात करताना आलेले अनुभव अगदी त्याचप्रकारे त्यांना आध्यात्मिकरीत्या दृढ बनवू शकतील ज्याप्रकारे यहोशू व कालेबला, देवाने सांगितलेल्या देशावर विजय मिळवल्यावर मजबूत करण्यात आले.
मुलाखती
कार्यक्रमातील पुढील भागात मुलाखती घेण्यात आल्या. हेरॉल्ड जॅक्सननी, आता ८५ वर्षांचे असलेले व गिलियड प्रशालेचे रेजिस्ट्रार आणि जुने शिक्षक ऊलसेझ ग्लास यांची मुलाखत घेतली. क्षेत्रातील अनेक मिशनऱ्यांना अजूनही यांची विश्वासूपणे शिकवण्याची व प्रशिक्षणाची वर्षे आठवतात. त्यानंतर, गिलियड प्रशाला कर्मचारी वर्गात सामील होण्याआधी आफ्रिकेत विदेशी सेवेत अनेक वर्षांपर्यंत कार्य केलेले गिलियड शिक्षक मार्क न्यूमर आले. त्यांनी विद्यार्थ्यांची त्यांच्या प्रशालेच्या पाच महिन्यांदरम्यानच्या सेवेबाबत मुलाखत घेतली. स्थानिक क्षेत्रातील लोकांना देवाच्या वचनात आस्था असल्याचे त्यांच्या अनुभवांवरून स्पष्टपणे निदर्शनास आले.
रॉबर्ट सायरनको आणि चार्ल्स मॉलहन मग, तेथेच आणखी एका प्रशालेसाठी म्हणजे शाखा सभासदासाठी असलेल्या प्रशालेकरता उपस्थित असलेल्या अनुभवी लोकांसोबत बोलले. पदवीधर वर्गासाठी त्यांनी दिलेल्या सल्ल्यात, नम्रतेची गरज आणि मंडळीच्या ऐक्यास हातभार लावण्याची गरज यांचाही समावेश होता. पदवीधरांनी मिशनरी कार्यात काय घडेल याविषयी आगाऊ तर्क न करता, येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यास तयार असले पाहिजे असे त्यांनी त्यांना सुचवले. या सल्ल्याचे अनुकरण केल्यास नवीन मिशनऱ्यांना, देवाच्या वचनाचे शिक्षक म्हणून त्यांना मिळालेली नेमणूक पार पाडण्यास नक्कीच मदत होईल.
शेवटी, नियमन मंडळाचे सभासद थिओडोर झाराक्झ यांनी “कोणावर कोणता प्रभाव पडत आहे?” हे भाषण श्रोत्यांना उद्देशून दिले. ख्रिश्चन या नात्याने आपण आत्म्याची फळे प्रदर्शित करतो तेव्हा इतरांवर आपला चांगला प्रभाव पडतो याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ते म्हणाले, “यहोवाच्या संघटनेद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मिशनऱ्यांनी हितकारक, आध्यात्मिक मार्गाने लोकांवर प्रभाव पाडण्यात प्रशंस्य नाव कमवले आहे.” मग त्यांनी काही लोकांच्या उद्गारांचा उल्लेख केला ज्यांना मिशनऱ्यांच्या चांगल्या उदाहरणामुळे देवाची सेवा करण्यास मदत झाली होती. शेवटी ते म्हणाले: “यहोवाच्या लोकांनी कमावलेले नाव तुम्ही असेच टिकून ठेवा व तुमच्या विदेशी नेमणुकीत योग्य जनांना शोधत राहा . . . शिवाय, तुमच्या प्रामाणिक, शुद्ध वर्तनाद्वारे या जगाच्या आत्म्याचा प्रतिकार करा व यहोवाच्या स्तुतीकरता व सन्मानाकरता चांगला प्रभाव पाडा.”
कार्यक्रमाचा सारांश देताना, अध्यक्षांनी चोहीकडून आलेल्या शुभेच्छा घोषित केल्या आणि मग प्रत्येक मिशनऱ्याचा डिप्लोमा सादर करून त्यांच्या नेमणुकींची घोषणा केली. त्यानंतर, वर्गाच्या वतीने एका पदवीधारकाने, त्यांना दिलेल्या प्रशिक्षणाबद्दल आभार व्यक्त करणारा एक कृतनिश्चय वाचून दाखवला. होय, १०२ वर्गाच्या पदवीदान कार्यक्रमाने, उपस्थित असलेल्या सर्वांना देवाचे वचन जाहीर करण्यासाठी पुढे जाण्यास आणखी दृढनिश्चयी बनवले.
[३१ पानांवरील चित्र]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधारकांचा १०२ वर्ग
खाली दिलेल्या यादीत, रांगांना पुढून मागे क्रमांक देण्यात आले आहेत आणि प्रत्येक ओळीत डावीकडून उजवीकडे नावांची यादी दिली आहे.
(१) डफी, सी.; अलेक्सीस, डी.; हार्फ, आर.; ली, जे.; कोरी, व्ही.; नॉर्टम, टी.; मोरा, एन.; जोरनेट, एफ. (२) युपवीक, एल.; सिंग, के.; हार्ट, बी.; किरकोरियन, एम.; ली, एस.; रॉस्टल, एस.; झुलन, के.; कोलट, के. (३) सिंग, डी.; पिटलू, जे.; पिटलू, एफ.; बोकॉक, एन.; टॉर्मा, सी.; मसलो, ए.; रिचर्डसन, सी.; नॉर्टम, डी. (४) हार्फ, जे.; जोरनेट, के.; बार्बर, ए.; लोबर्टो, जे.; लोबर्टो, आर.; मसलो, एम.; मोरा, आर.; हार्ट, एम. (५) टॉर्मा, एस.; रॉस्टल, ए.; डायस, आर.; डायस, एच.; वायझर, एम.; वायझर, जे.; किरकोरियन, जी.; झुलन, ए. (६) अलेक्सीस, आर.; बार्बर, डी.; युपवीक, एच.; डफी, सी.; कोलट, टी.; रिचर्डसन, एम.; बोकॉक, एस.; कोरी, जी.