शांतीचे खरे संदेशवाहक कोण आहेत?
शांतीचा संदेश वाटणारी एक घोषणा मे ३१, १९९६ रोजी बातमीदारांच्या गोटांतून करण्यात आली. आदल्या दिवशी अधिकार सूत्रांनी अशा प्रकारचे प्रतिपादन केले, की इस्राएलचे पंतप्रधान होण्याच्या बेतात असणाऱ्या बेन्जामिन नेतानयाहू यांनी “इस्राएल देश आणि पॅलिस्टियनवासीयांसहित आपल्या सर्व शेजारच्या देशांसोबत शांती तसेच सुरक्षितता प्रस्थापित करण्याचा शांती करार पूर्ण करण्याचे वचन दिले.”
नेतानयाहूच्या मोठ्या निवडणूक प्रचारामुळे अनेक लोक असा विचार करू लागले, की मध्य पूर्वेतील शांती आता केवळ स्वप्न राहणार नाही. असे झाले तर, आपल्यांतील मदभेद विसरून इतर देश इस्राएलचे अनुकरण करतील का?
अर्थातच, शांती प्रस्थापित करण्यापेक्षा तिचे आश्वासन देणे सोपे आहे. हे ठाऊक असल्यामुळे शांतीविषयी अनेकांच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली. हेमी शालेव्ह या पत्रकाराने असे म्हटले: “लवकरच शांतीची पुनर्स्थापना होईल, असे इस्राएलच्या निम्म्या लोकांना वाटते आणि उरलेल्यांना वाटते, की इस्राएलला आता कोणीही मुक्तिदाता उरला नाही.” थोडक्यात, त्याने म्हटले: “काही जण आनंद करतात तर इतर अश्रू गाळतात.”
मानव शांतीसाठी प्रयत्न करतात तेव्हा असेच घडते. एका नेत्याचा आणि त्याच्या समर्थकांचा विजय होतो तेव्हा विरोधी पक्षाचा पराजय होतो. असमाधानामुळे भ्रमनिरास होतो आणि भ्रमनिरासामुळे अनेकदा बंड परिणीत होते. मध्य पूर्व, लॅटीन अमेरिका, पूर्व युरोप किंवा इतरत्र कोठेही—शांतीसाठी मानवजातीचे प्रयत्न अगदी भ्रामक आहेत.
लवकरच खरी शांती!
मध्य पूर्वेत खास शांतीच्या काळात आणखी एक शांतीचा संदेश ऐकविण्यात आला. परंतु तो संदेश राजकीय भाषणाचा नव्हता तसेच तो दोघा राष्ट्रांतील शांतीचा करार देखील नव्हता. उलटपक्षी, लवकरच देवाच्या राज्याद्वारेच शांती येईल, अशी या संदेशाने घोषणा केली. हा संदेश कोठे ऐकविण्यात आला? सन १९९६/९७ दरम्यान आयोजित केलेल्या संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांद्वारे १,९०० पेक्षा अधिक “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” प्रांतीय अधिवेशनांत हा संदेश ऐकविण्यात आला.
कोणतेही मानवी सरकार खरी शांती आणि सुरक्षितता आणू शकत नाही, असे या अधिवेशनांत स्पष्ट करण्यात आले. का बरे? कारण असे करण्यासाठी शांती हिरावून घेणाऱ्या दररोजच्या गोष्टींचा अंत करावा लागेल. खरी शांती म्हणजे युद्धाच्या आणि हिंसाचाराच्या दहशतीविना घराबाहेर पडणे. याचा असा अर्थ होतो, की यापुढे गुन्हेगारी नाही, दारांना कुलपे नाहीत, रस्त्यावर वावरण्याचे भय नाही, कुटुंबांची विभाजने नाहीत. पृथ्वीवरील कोणते सरकार या गोष्टी साध्य करू शकेल? खरोखर, पृथ्वीवरील कोणते सरकार या गोष्टींचे आश्वासन तरी देण्यास धजेल?
तथापि, देवाचे राज्य या गोष्टी साध्य करू शकते आणि ते लवकरच तसे करील. बायबल अभिवचन देते: “पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:३, ४) यामुळे पीडित मानवजातीला किती मोठे सांत्वन मिळेल!
यहोवा देवाचे अभिवचन वायफळ नाही. बायबल आपल्याला याची हमी देते: “देव काही मनुष्य नाही की त्यांने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?” (गणना २३:१९) होय, आपला पक्ष घेणाऱ्या सर्वांना आशीर्वाद देण्याचे देवाचे अभिवचन पूर्ण होईलच.
देवाचे शांतीचे संदेशवाहक
यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याच्या प्रचारातील आपल्या आवेशाबद्दल सर्वज्ञात आहेत. बायबलचा हृदयस्पर्शी संदेश इतरांना सांगण्यात ते दर वर्षी एक अरबपेक्षाही अधिक तास खर्च करतात. ही येशूच्या शब्दांची पूर्णता आहे: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) साक्षीदार जो संदेश देतात तो खरोखरच “सुवार्ता” आहे कारण मानवजातीसाठी एकमेव आशा या अर्थाने हा संदेश देवाच्या स्वर्गीय राज्याची घोषणा करतो. भवितव्यासाठी किती ही दृढ आशा!
देवाचे राज्य आता देखील त्याच्या प्रजाजनांमध्ये शांतीचे आणि बंधुप्रेमाचे खरे बंधन तयार करत आहे. येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) यहोवाचे साक्षीदार खऱ्या ख्रिस्ती विश्वासाच्या या मूलभूत गरजेनुरूप जगण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, त्यांचे उल्लेखनीय बंधुत्व ज्यू आणि अरबी, क्रोएशियन आणि सर्बियन, हुतू आणि तुत्सी यांमध्ये ऐक्य घडवत आहे. बहुतेक लोक अशा प्रकारच्या शांतीचे केवळ स्वप्न पाहू शकतात परंतु जगभरातील यहोवाचे लाखो साक्षीदार या शांतीचा सध्या अनुभव घेत आहेत.
बायबल तत्त्वांनुरूप यापुढेही जगण्याचे आणि देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत राहण्याचे उत्तजेन “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात देण्यात आले. लाखो जण आस्वाद घेत असलेल्या या तीन दिवसांच्या प्रेरक अधिवेशनाचा खालील अहवाल वाचण्याचे आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो.