तुम्ही मशीहाला ओळखले असते का?
येशू ख्रिस्ताने साडेतीन वर्षे इस्राएल लोकांमध्ये देववचनाचा प्रचार केला. परंतु त्याचे पार्थिव सेवकपण संपण्याची वेळ जवळ आली तेव्हा त्याच्या काळातील बहुतेक लोकांनी मशीहा किंवा देवाचा वचनयुक्त “अभिषिक्त जन” म्हणून त्याचा स्वीकार केला नाही. का?
पहिल्या शतकातील यहुद्यांनी येशूला मशीहा म्हणून मान्य का केले नाही, याची अनेक कारणे ओळखण्यास बायबल आपल्याला मदत करते. यांपैकी तीन अशी कारणे आहेत जी अनेकांना मशीही राजा या नात्याने येशूचे वर्तमान स्थान स्वीकारण्यास अटकाव करतात.
“चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे”
पहिल्या शतकातील यहुद्यांनी येशूला ओळखले नाही याचे एक कारण म्हणजे त्याच्या मशीहीपदाकडे अंगुली दर्शविणारी शास्त्रवचनीय चिन्हे स्वीकारण्यास त्यांनी दाखवलेला नकार. आपण देवाकडून आहोत हे सिद्ध करण्यासाठी येशूचे ऐकणाऱ्यांनी त्याने चिन्ह दाखवावे अशी मागणी त्याच्याकडे वेळोवेळी केली. उदाहरणार्थ, मत्तय १२:३८ अहवाल देतो, की काही शास्त्री आणि परूशी म्हणाले: “गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे.” येशूने त्यांना यापूर्वीच चिन्हे दाखविली नव्हती का? अर्थातच त्याने दाखविली होती.
त्यावेळेपर्यंत येशूने अनेक चमत्कार केले होते. त्याने द्राक्षारसाचे रूपांतर पाण्यामध्ये केले होते, मरणाच्या पंथाला टेकलेल्या मुलास बरे केले होते, पेत्राच्या आजारी सासूला बरे केले होते, एका कुष्ठरोग्याला शुद्ध केले होते, पक्षघाती मनुष्याला त्याच्यामुळे चालता येऊ लागले, ३८ वर्षांपासून आजारी असलेल्या माणसाला निरोगी स्वास्थ्य दिले होते, एका मनुष्याचा सुकलेला हात बरा केला होता, अनेक लोकांना यातनामय रोगांतून मुक्त केले होते, शताधिपतीच्या चाकराला बरे केले होते, एका विधवेच्या मुलास मेलेल्यातून उठवले होते तसेच अंध आणि मुका असलेल्या मनुष्याला बरे केले होते. हे चमत्कार काना, कफर्णहूम, जेरुसलेम आणि नाईन यांठिकाणी घडले होते. शिवाय, अशा प्रकारच्या चमत्कारांच्या बातम्या संपूर्ण यहुदीया आणि आसपासच्या देशात पसरल्या.—योहान २:१-१२; ४:४६-५४; मत्तय ८:१४-१७; ८:१-४; ९:१-८; योहान ५:१-९; मत्तय १२:९-१४; मार्क ३:७-१२; लूक ७:१-१०; ७:११-१७; मत्तय १२:२२.
येशू मशीहा होता हे सिद्ध करणाऱ्या चिन्हांचा कोणताही तुटवडा नव्हता. त्याने लोकांसमोर अनेक चिन्हे प्रकट केली तरी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. देवाद्वारे येशूला पाठविण्यात आले होते याचा पुरावा ज्यांनी पाहिला होता त्यांनी देखील त्याला मशीहा म्हणून मान्य केले नाही कारण ते आध्यात्मिकरीत्या अंध होते. त्यांची अंतःकरणे कठीण होती आणि सत्याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नव्हता.—योहान १२:३७-४१.
आपल्या दिवसांबद्दल काय? काही लोक असा दावा करतात, की “माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी मी जे पाहतो त्यावरच मी विश्वास ठेवतो.” परंतु असे म्हणणे खरोखरच सुज्ञतेचे आहे का? बायबल भविष्यवाणी हे दाखवून देते, की येशू, मशीही राज्यात याआधीच स्वर्गीय राजा म्हणून सिंहासनाधिष्ठ झाला आहे. तो अदृश्य असल्यामुळे त्याचे राजत्व ओळखण्यासाठी आपल्याला चिन्हाची गरज आहे, या चिन्हाची सुरवात या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटल्या काळाने होते. हे चिन्ह तुम्ही ओळखले आहे का?—मत्तय २४:३.
बायबलच्या अनुसार, मशीही राजा या नात्याने ख्रिस्ताच्या राजत्वाची सुरवात अभूतपूर्व प्रमाणात युद्ध, भूकंप, अन्नटंचाई आणि मऱ्या यांद्वारे चिन्हांकित होणार होती. ‘शेवटल्या काळी’ स्वार्थ, लोभ आणि आत्मसंयमनातील कमी या गोष्टी मानवी व्यवहारांतील विशेष लक्षणे असणार होत्या. (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:६, ७; लूक २१:१०, ११) कालक्रमाला धरून असणाऱ्या पुराव्याखेरीज, शेवटल्या काळाचे २० पेक्षा अधिक विभिन्न पैलू १९१४ मध्ये मशीही राज्यास सुरवात झाल्याकडे अंगुली दर्शवितात.—मार्च १, १९९३ टेहळणी बुरूज (इंग्रजी) पुष्ठ ५ पाहा.
“धनलोभी”
येशूला मशीहा म्हणून यहुद्यांनी का नाकारले याचे आणखी एक कारण होते ते म्हणजे भौतिकवाद. भौतिक संपत्तीस जास्त महत्त्व दिल्यामुळे येशूचे अनुकरण करण्यात अनेकांना अटकाव झाला. उदाहरणार्थ परूशी “धनलोभी” म्हणून ज्ञात होते. (लूक १६:१४) येशूकडे येऊन सार्वकालिक जीवन कसे प्राप्त करावे, याविषयी विचारणा करणाऱ्या श्रीमंत तरुण अधिकाऱ्याच्या उदाहरणाचा विचार करा. “आज्ञा पाळ,” असे येशूने प्रत्युत्तर दिले. “मी हे सर्व पाळिले आहे; माझ्या ठायी अजून काय उणे आहे?” असे त्या तरुणाने विचारले, त्याने विचारलेल्या प्रश्नावरून हे स्पष्ट दिसते, की विशिष्ट नियमांचे पालन करण्याशिवाय आणखी काहीतरी करण्याची आवश्यकता होती, याची त्याला जाणीव होती. “तुझे असेल-नसेल ते विकून दारिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये,” असे येशूने त्याला म्हटले. मशीहाचा शिष्य होण्याची—किती महान संधी! परंतु तो शासनकर्ता खिन्न होऊन तेथून निघून गेला. का? कारण स्वर्गातील संपत्तीपेक्षा पृथ्वीवरील संपत्ती त्याच्यासाठी अधिक महत्त्वाची होती.—मत्तय १९:१६-२२.
या परिस्थितीत बदल झालेला नाही. मशीही राजाचा खरा अनुयायी होणे म्हणजे सर्व गोष्टींपेक्षा, त्याचप्रमाणे पार्थिव चीजवस्तूपेक्षांही आध्यात्मिक आस्थांना प्राधान्य देणे. भौतिकवादी दृष्टिकोन असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी हे एक आव्हान आहे. उदाहरणार्थ, पूर्वेकडील देशातील एका मिशनरी दांपत्याने एका स्त्रीला बायबलविषयी सांगितले. त्या स्त्रीला यहोवा देव आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांविषयी अधिक शिकण्यास आवडेल, असा विश्वास बाळगून त्या दांपत्याने तिला टेहळणी बुरूज आणि सावध राहा! सादर केले. तिने कशी प्रतिक्रिया दाखविली? “अधिक पैसे मिळविण्यासाठी ही नियतकालिकं मला मदत करतील का?” तिने विचारले. त्या स्त्रीला आध्यात्मिक बाबींपेक्षा भौतिक गोष्टींमध्ये अधिक रस होता.
याच दांपत्याने एका तरुणाशी बायबल अभ्यास केला आणि तो राज्य सभागृहात होणाऱ्या सभांना उपस्थित देखील राहू लागला. “तू तुझा वेळ वाया घालवतोयस,” त्याच्या पालकांनी त्याला सांगितले. “खरं तर, तू संध्याकाळी दुसरी नोकरी करून आणखी पैसा मिळवायला पाहिजे.” पालक आपल्या मुलांना मशीही राजाविषयी शिकण्यापेक्षा भौतिक गोष्टींस प्राधान्य देण्यासाठी उत्तेजन देतात तेव्हा ते किती खेदाचे आहे! “राज्यकर्ता आपली सर्व संपत्ती देऊन सुद्धा जीवनाची दहा हजार वर्षे विकत घेऊ शकत नाही,” अशी चिनी भाषेत एक म्हण आहे.
मशीही राजाबद्दल शिकणे आणि त्याचे अनुकरण करणे ही गोष्ट पैशावर प्रेम करण्याची अनुमती देत नाही, हे अनेकांनी जाणले आहे. एक यहोवाची साक्षीदार होती जिचा चांगली मिळकत करून देणारा स्वतःचा व्यापर होता, तिने म्हटले: “विपुल पैसा असणे सुखावह आहे परंतु आवश्यक नाही. एखाद्या मनुष्यास आनंदी करणारी गोष्ट पैसा नव्हे.” ती स्त्री आता वॉच टावर सोसायटीच्या युरोपीय शाखेतील एक सदस्या आहे.
‘यहुद्यांचे भय’
मनुष्याचे भय, हे येशूला मशीहा म्हणून स्वीकार न करण्याचे आणखी एक कारण होते. जाहीरपणे त्याचे मशीहत्व मान्य करणे म्हणजे त्यांच्या ख्यातीस जोखीमेत टाकणे. काहींसाठी हे मोल फार होते. निकदेमचाच विचार करा; जो न्यायसभा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या यहुदी उच्च न्यायालयाचा सदस्य होता. येशूची चिन्हे आणि त्याच्या शिकवणी यांनी प्रभावित होऊन त्याने मान्य केले: “गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहा हे आम्हाला ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाहि करिता येत नाहीत.” असे असतानाही इतर यहुद्यांनी आपणास ओळखू नये म्हणून निकदेम येशूकडे काळोख पडल्यानंतर गेला.—योहान ३:१, २.
येशूचे बोलणे ज्या अनेकांनी ऐकले होते त्यांच्यासाठी देवापेक्षा मनुष्याची स्वीकृती अधिक महत्त्वाची होती. (योहान ५:४४) येशू सा. यु. ३२ मध्ये मंडपाच्या सणासाठी जेरुसलेममध्ये होता तेव्हा “त्याच्याविषयी बरीच कुजबुज सुरू” होती. (तिरपे वळण आमचे.) “यहूद्यांच्या भीतीमुळे” कोणीही येशूविषयी उघडपणे बोलले नाही. (योहान ७:१०-१३) येशूने एका अंधाला बरे केले होते त्याचे पालक देखील हा चमत्कार देवाच्या प्रतिनिधीद्वारे करण्यात आला होता हे उघडपणे मानण्यास तयार नव्हते. त्यांना सुद्धा “यहूद्यांचे भय होते.”—योहान ९:१३-२३.
येशू, मशीही राजा या नात्याने स्वर्गात राज्य करीत असल्याचे काही जण आज ओळखतात, परंतु हे उघडपणे मान्य करण्यास त्यांना भय वाटते. इतरांसोबत असणारे त्यांचे स्थान गमावणे, ही किंमत त्यांच्यासाठी फार मोठी आहे. उदाहरणार्थ, जर्मनीमध्ये एका यहोवाच्या साक्षीदाराने एका मनुष्याशी चर्चा केली, त्याने हे मान्य केले: “तुम्ही साक्षीदार बायबलचा जो प्रचार करता ते सत्य आहे. परंतु मी आज साक्षीदार झालो तर उद्यापर्यंत याविषयी सर्वांना कळेल. माझ्या कामाच्या ठिकाणचे, आसपासचे तसेच मी आणि माझे कुटुंब ज्या क्लबचे आहोत तेथील लोक काय विचार करतील? ते मी सहन करू शकत नाही.”
मनुष्याच्या भयास काय कारणीभूत आहे? गर्व, कुटुंबामध्ये आणि मित्रांमध्ये आवडते होणे, उपहास व मानखंडणा होण्याचे भय, बहुसंख्य लोकांपासून वेगळे होण्याची चिंता. अशा प्रकारच्या भावना विशेषतः अशा लोकांसाठी परीक्षा शाबीत होतात ज्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसमवेत बायबल अभ्यास करण्यास सुरवात केली आहे. उदाहरणार्थ, येशू ख्रिस्ताच्या राज्याधिकाराखाली मशीही राज्य पृथ्वीवर परादीसची स्थापणा करील, हे शिकल्यानंतर एक तरुणी रोमांचित झाली. परंतु ती डिस्कोची अतिउत्साही शौकीन होती आणि मिळालेल्या या आशेबद्दल इतरांशी बोलण्यापासून तिला मनुष्याच्या भयाने आडकाठी आणली. अखेरीस, बायबलबद्दल इतरांशी मुक्तपणे बोलण्यासाठी तिने धैर्य एकवटले. तिच्या डिस्को मित्रांनी तिला सोडून दिले, परंतु तिचा पती आणि तिचे पालक यांनी मात्र आस्था दाखविली. त्या स्त्रीने आणि तिच्या आईने कालांतराने बाप्तिस्मा घेतला तसेच तिचा पती व तिचे वडील यांनी बायबल अभ्यास आरंभ केला. मनुष्याच्या भयावर मात केल्याने मिळालेले किती मोठे प्रतिफळ!
तुम्ही मशीहाला खरोखर ओळखता का?
येशू वधस्तंभावर मरणाच्या पंथास टेकला होता तेव्हा त्याठिकाणी त्याचे काही शिष्य उपस्थित होते. पूर्वभाकीत मशीहा या नात्याने त्यांनी त्याला ओळखले होते. तेथे यहुदी अधिकारी देखील होते ते जणू अजूनही त्याच्याकडून चिन्हाची मागणी करीत होते. “जर तो देवाचा ख्रिस्त [किंवा मशीहा], त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःस वाचवावे.” (लूक २३:३५) चिन्हाची मागणी करण्याचे ते कधी थांबवणार होते का? येशूने अनेक चमत्कार केले होते. खेरीज, त्याचा जन्म, सेवाकार्य, परीक्षा, मृत्युदंड आणि पुनरुत्थान या सर्व गोष्टींनी अनेक हिब्रू शास्त्रवचनांची पूर्णता केली.—वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित ‘प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित व लाभदायक आहे,’ (इंग्रजी) पृष्ठे ३४३-४ पाहा.
जवळून जाणारे लोक येशूच्या मशीहत्वाच्या पुराव्यास नाकारून त्याची निंदा करीत होते. (मत्तय २७:३९, ४०) शिपायांनी भौतिकवादीपणे येशूचे कपडे आपसांत वाटून घेतले तसेच त्यांनी त्याच्या अंगरख्यावर चिठ्या टाकल्या. (योहान १९:२३, २४) काहींच्या बाबतींत मनुष्याचे भय हे एक कारण होते. उदाहरणार्थ, न्यायसभेचा सदस्य असलेल्या अरिमथाईकर योसेफाचा विचार करा. तो “येशूचा एक शिष्य असूनही यहूद्यांच्या भयामुळे गुप्त शिष्य होता.” मशीहाच्या मृत्यूनंतर योसेफ आणि निकदेम यांनी येशूच्या शरीराची काळजी घेतली. अशा प्रकारे योसेफाने मनुष्याच्या भयावर मात केली.—योहान १९:३८-४०.
तुम्ही पहिल्या शतकात राहत असला असता तर तुम्ही येशूला मशीहा म्हणून ओळखले असते का? असे करण्यासाठी शास्त्रवचनीय पुराव्याचा स्वीकार, भौतिकवादी विचारसरणीचा त्याग आणि मनुष्याच्या भयास बळी न पडणे या गोष्टी तुम्हासाठी आवश्यक असल्या असत्या. या शेवटल्या दिवसांत आपल्यांतील प्रत्येक जणाने स्वतःस विचारले पाहिजे, ‘स्वर्गीय मशीही राजा म्हणून मी आज येशूला ओळखतो का?’ लवकरच तो पृथ्वीवरील अधिकारसूत्रे हाती घेईल. जेव्हा असे होईल तेव्हा अभिवचनयुक्त मशीहा या नात्याने वास्तविकरीत्या येशूला ओळखणाऱ्यांमध्ये तुम्ही असाल का?
[२८ पानांवरील चित्रं]
येशू मशीही राजा आहे, या पुराव्याकडे कानाडोळा करू नका
[३१ पानांवरील चित्रं]
मशीहाबद्दल शिकण्याचा बहुतेकवेळा होणारा अर्थ म्हणजे इतर जण काय म्हणतील या मनुष्याच्या भयावर मात करणे