तुमच्या जीवनावर दैवाचे नियंत्रण आहे का?
“आला नॉ डो.” पश्चिम आफ्रिकेतील, माली देशाच्या बांबारी भाषेत या वाक्प्रचाराचा अर्थ, “हे देवाचे कार्य आहे” असा होतो. जगाच्या त्या भागात यासारखी अनेक घोषवाक्ये बरीच प्रचलित आहेत. वोलॉफ भाषेत, “याल्ला मो को डेफ” (हे देवाने केले), अशी एक म्हण आहे. तसेच खेड्यात बोलल्या जाणाऱ्या डोगोन जमातीच्या पोटभाषेत “आमा बीरे” (हे देवाने करविले) असे म्हणतात.
इतर देशांमध्येही या अर्थाचे अनेक वाक्प्रचार आहेत. मृत्यू होतो किंवा एखादे संकट कोसळते तेव्हा, “त्याचे दिवस भरले होते” व “ही देवाची इच्छा होती” यासारख्या म्हणी सहसा ऐकावयास मिळतात. “मनुष्य एक ठरवतो, दैवात दुसरेच असते” यासारखी लक्षवेधक वाक्ये पश्चिम आफ्रिकेत सहसा, सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांवर रंगवलेली असतात व दुकानांतील फलकांवर सूचक म्हणून लावलेली असतात. अनेकांसाठी हे वाक्प्रचार म्हणजे निव्वळ भाषालंकार आहेत. तथापि, सहसा ते दैववादावर खोलवर रुजलेल्या विश्वासाच्या पडछाया असतात.
दैववाद म्हणजे नेमके काय? वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडियाच्या व्याख्येनुसार दैववाद म्हणजे, “सर्व घडामोडी मानवाच्या सामर्थ्यापलीकडील शक्तींनी ठरवल्या जातात असा सिद्धान्त.” या कोणत्या “शक्ती” आहेत? एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहांच्या सापेक्ष स्थितीचा तिच्या नशिबावर जबरदस्त पगडा असतो अशी हजारो वर्षांपूर्वी बॅबिलोनियन लोकांची समजूत होती. (पडताळा यशया ४७:१३.) एखाद्याचे नशीब हे जीवनाचा धागा विणणाऱ्या, मोजणाऱ्या व कापणाऱ्या तीन सामर्थ्यशाली देवतांच्या हाती असते, असा ग्रीक लोकांचा विश्वास होता. तथापि, एखाद्याचे नशीब स्वतः देव ठरवतो या कल्पनेची सुरवात मुळात ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मशास्त्रज्ञांनी केली!
उदाहरणार्थ, “संत” ऑगस्टीन यांनी फलज्योतिषींच्या “असत्य व अपायकारक अभिप्रायांचे” खंडन केले होते. तथापि, दुसरीकडे पाहता, “देवाच्या अस्तित्वास कबूल करणे व त्याच वेळेस, भविष्यातील घडामोडींचे त्याला पूर्वज्ञान आहे याचा अस्वीकार करणे म्हणजे धादांत मूर्खपणा आहे” असाही तर्क त्यांनी केला. त्यांचा दावा होता, की देव खऱ्या अर्थाने सर्वसमर्थ असल्यास, त्याला “सर्व घडामोडी घडून येण्यापूर्वीच माहीत असावयास हव्यात;” यातून “पूर्वनिश्चित नाही असे काहीही” वगळलेले नसेल. तथापि, जे काही घडते ते सर्व देवाला आधीपासून माहीत असले तरीसुद्धा मानवांठायी स्वतंत्र इच्छा असते हे मत देखील ऑगस्टीन यांनी ठामपणे मांडले.—देवाचे नगर (इंग्रजी), खंड पाचवा, अध्याय ७-९.
अनेक शतकांनंतर, प्रॉटेस्टंट धर्मशास्त्रज्ञ जॉन कॅल्विन यांनी या विषयास आणखी पुढे नेले; त्यांनी असे मत मांडले की काहींचे भविष्य, “स्वर्गीय राज्याची संतती व वारस होण्यास [देवाद्वारे] पूर्वनियोजित” आहे तर इतरांना “त्याच्या क्रोधाग्नीला तोंड द्यावे लागेल” असे त्यांच्याबद्दल पूर्वनियोजित केलेले आहे!
आज, जगातील बऱ्याचशा भागांत दैवावरील विश्वासाची गांभिर्याने दखल घेतली जाते. उदाहरणार्थ, पश्चिम आफ्रिकेत राहणारा एक तरुण, उसमान याचा अनुभव विचारात घ्या. तो त्याच्या शाळेतील सर्वात हुशार मुलांपैकी होता पण जेव्हा तो वार्षिक परीक्षेला बसला, तेव्हा नापास झाला! यामुळे त्याला आता आणखी एक वर्ष त्याच वर्गात तर बसावे लागणारच होते पण त्याशिवाय त्याच्या कुटुंबासमोर व मित्रांसमोर त्याची लाजिरवाणी स्थिती होणार होती. एका मित्राने, ही तर देवाचीच इच्छा होती असे म्हणून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. उसमानच्या आईने देखील त्याच्या अपयशाबद्दल नशीबास जबाबदार ठरवले.
सुरवातीला उसमानला त्यांच्या सहानुभूतीशील समजावण्याने बरे वाटले. शेवटी, त्याला अपयश यावे ही खरोखरच देवाची इच्छा असल्यास, असे होऊ नये म्हणून अर्थातच तो काहीही करू शकला नसता. तथापि, त्याच्या वडिलांचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यांनी उसमानला सांगितले, की परीक्षेत तो नापास झाला यासाठी तो स्वतः जबाबदार होता—देव नव्हे. उसमान नापास झाला याचे सरळसोपे कारण म्हणजे त्याने आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले होते.
दैवावरील त्याच्या विश्वासास असा हादरा बसल्यामुळे, उसमानने स्वतःच या बाबतीत शहानिशा करण्याचे ठरविले. आता पुढील लेखावर विचार करण्याद्वारे आम्ही तुम्हालाही तेच करण्यास आमंत्रित करतो.