‘तुम्ही पवित्र असावे कारण मी पवित्र आहे’
“तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे.” —लेवीय १९:२.
१. जगात पवित्र समजल्या जाणाऱ्यांपैकी काही लोक कोण आहेत?
जगाच्या अधिकांश धर्मांत, पवित्र समजले जाणारे काही जण आहेत. मदर तेरेसा या, भारतात केलेल्या त्यांच्या कार्यासाठी सुप्रसिद्ध आहेत; गरिबांच्या कल्याणासाठी स्वतःस वाहून घेतल्यामुळे त्यांना पुष्कळ जण पवित्र मानतात. पोप यांना “पवित्र पिता” म्हणून संबोधण्यात येते. अर्वाचीन कॅथलिक चळवळीचे प्रणेते, ओपस डेई, होसे मारीया एस्क्रीबा यांना काही कॅथलिक लोक, “पवित्रतेच्या बाबतीत आदर्श” मानतात. हिंदू धर्मातही स्वामी अर्थात पवित्र पुरुष आहेत. गांधींवर देखील पवित्र पुरुष म्हणून अनेकांची श्रद्धा होती. बौद्ध धर्मात पवित्र भिक्षुक, तर मुसलमान धर्मात पवित्र संदेष्टा आहे. तथापि, पवित्र असणे म्हणजे नेमके काय?
२, ३. (अ) “पवित्र” व “पावित्र्य” या शब्दांचा काय अर्थ होतो? (ब) कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे?
२ “पवित्र” या शब्दाच्या खालीलप्रमाणे विविध व्याख्या दिलेल्या आहेत. “१. . . . ईश्वरी शक्तीशी संबंधित; पूज्य. २. भक्तीयोग्य किंवा आराध्य समजलेले; अथवा प्रत्यक्ष भक्ती किंवा आराधना केलेले . . . ३. अत्यंत कडक अशा श्रेष्ठ नैतिक, धार्मिक अथवा आध्यात्मिक प्रणालीनुसार जगणे . . . ४. धार्मिक उद्दिष्टासाठी राखून ठेवलेले किंवा अलिप्त.” बायबलच्या संदर्भात, पावित्र्य म्हणजे “धार्मिक शुद्धता किंवा निर्माल्य; धार्मिकता.” शास्त्रवचनांवर सूक्ष्मदृष्टी, या बायबलच्या संदर्भ ग्रंथानुसार, “मूळ हिब्रू [शब्द] कोधेश हा देवासंबंधाने अलिप्तता, अनन्यता किंवा पवित्रीकरण, . . . देवाच्या सेवेसाठी राखून ठेवलेले असण्याची स्थिती, असा अर्थ ध्वनित करतो.”a
३ इस्राएल राष्ट्रास पवित्र राहण्याची आज्ञा देण्यात आली होती. देवाच्या नियमशास्त्राने विदित केले: “मी परमेश्वर तुमचा देव आहे म्हणून आपणास पवित्र करून पवित्र राहा, कारण मी पवित्र आहे.” पवित्रतेच्या उगमस्थानी कोण होते? अपरिपूर्ण इस्राएली कशाप्रकारे पवित्र होऊ शकत होते? शिवाय, पवित्र होण्यासंबंधी यहोवा देवाने केलेल्या आव्हानातून आज आपण कोणते धडे शिकू शकतो?—लेवीय ११:४४.
पावित्र्याच्या उगमाशी इस्राएलाचा संबंध
४. यहोवाचे पावित्र्य इस्राएलासमोर कशाप्रकारे एक आदर्श होते?
४ इस्राएल राष्ट्रातील यहोवा देवाच्या उपासनेशी जे काही संबंधित होते त्यास पवित्र मानून हाताळायचे होते. असे का बरे? कारण यहोवा स्वतः पावित्र्याचा कर्ता व उगम आहे. पवित्र निवासमंडप तसेच याजकांनी घालावयाची वस्त्रे व त्यांचा साजश्रृंगार यांच्या तयारीबद्दल मोशेचा अहवाल या शब्दांनी संपुष्टात येतो: “त्यांनी पवित्र मुकुटाची पट्टी शुद्ध सोन्याची केली व मुद्रा कोरितात तशी तिच्यावर ही अक्षरे कोरिली: परमेश्वरासाठी पवित्र.” ही शुद्ध सोन्याची पट्टी मुख्य याजकाच्या मंदिलावर लावण्यात आली; त्याद्वारे, याजक हा विशेष पावित्र्याच्या सेवेसाठी निवडलेला होता हे सूचित करण्यात आले. ही पट्टी सूर्यप्रकाशात चकाकताना पाहून इस्राएल लोकांना वेळोवेळी यहोवाच्या पावित्र्याचे स्मरण होत असे.—निर्गम २८:३६; २९:६; ३९:३०.
५. अपरिपूर्ण इस्राएल लोकांना कशाप्रकारे पवित्र समजले जाऊ शकत होते?
५ तथापि, इस्राएल लोक कशाप्रकारे पवित्र होऊ शकत होते? केवळ, यहोवासोबतच्या त्यांच्या घनिष्ट नातेसंबंधाद्वारे व त्याची शुद्ध उपासना करण्याद्वारे. ‘परमपवित्राची’ उपासना पावित्र्याने, तसेच शारीरिक व आध्यात्मिक शुद्धतेने करण्यासाठी त्याजविषयी अचूक ज्ञान संपादन करणे हे त्यांच्यासाठी अगत्याचे होते. (नीतिसूत्रे २:१-६; ९:१०) यास्तव, इस्राएल लोकांना देवाची उपासना निर्मळ हेतूने व निर्मळ अंतःकरणाने करावयाची होती. उपासनेत कोणत्याही प्रकारचा दांभिकपणा यहोवाच्या नजरेत घृणास्पद ठरणार होता.—नीतिसूत्रे २१:२७.
यहोवाने इस्राएलचा अव्हेर करण्याचे कारण
६. मलाखीच्या काळातील यहुद्यांची यहोवाच्या मेजाविषयी कशी मनोवृत्ती होती?
६ इस्राएल लोक मंदिरात हलक्या प्रतीची, सदोष बलिदाने आणत होते तेव्हा हे स्पष्टपणे प्रत्ययास आले. यहोवाने आपला संदेष्टा मलाखी याच्याद्वारे त्यांच्या निकृष्ट अर्पणांचा धिक्कार करीत म्हटले: “तुमच्यात मला मुळीच संतोष नाही; तुमच्या हातचे यज्ञार्पण मला मान्य नाही. . . . . तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज विटाळिले आहे, त्याचे उत्पन्न, त्याचे अन्न ही तुच्छ आहेत; अशाने तुम्ही माझ्या नामाची अप्रतिष्ठा करिता. तुम्ही असेहि म्हणता, काय पीडा ही! तुम्ही नाक मुरडिता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; लुटून आणिलेला, लंगडा किंवा रोगी, असा पशु आणून तुम्ही अर्पिता; तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय, असे परमेश्वर म्हणतो.”—मलाखी १:१०, १२, १३.
७. यहुदी लोक सा. यु. पू. पाचव्या शतकात कोणती अपवित्र कृत्ये करीत होते?
७ कदाचित सा. यु. पू. पाचव्या शतकादरम्यान यहुद्यांच्या खोट्या प्रथांचा धिक्कार करण्यासाठी, देवाने मलाखी यास नियुक्त केले होते. याजक हे अजिबातच अनुकरणीय नव्हते व त्यांचे आचरण मुळीच पवित्र नव्हते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून, लोक देखील तत्त्वांना धाब्यावर बसवू लागले; ते इतक्या खालच्या पातळीवर गेले की कदाचित मूर्तिपूजक लोकांतील तरुण स्त्रियांशी विवाह करता यावा म्हणून, त्यांनी सर्रास आपल्या बायकांना घटस्फोट दिला. मलाखीने लिहिले: “तुझ्यामध्ये व तुझ्या तारुण्यातल्या स्त्रीच्यामध्ये परमेश्वर साक्षी आहे; ती तर तुझी सहकारिणी व तुझी कराराची पत्नी असून तिजबरोबर विश्वासघातानेb वर्तला आहेस. . . . याकरिता आपल्या आत्म्याला जपावे; व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये. . . . परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे.”—मलाखी २:१४-१६.
८. घटस्फोटाविषयीच्या आधुनिक दृष्टिकोनाचा ख्रिस्ती मंडळीतील काहींवर कसा परिणाम झाला आहे?
८ आधुनिक काळात, सहजासहजी घटस्फोट मिळतो अशा देशांत घटस्फोटाचे प्रमाण विकोपास गेले आहे. ख्रिस्ती मंडळीवर देखील याचा परिणाम झाला आहे. विवाहातील अडचणींवर मात करण्यासाठी व त्याकरवी आपला विवाह सफल करण्याच्या उद्देशाने वडिलांची मदत घेण्याऐवजी, काही जणांनी अविचारीपणे त्यास निकालात काढले आहे. सहसा मुलांनाच याचे गंभीर भावनात्मक परिणाम भोगावे लागतात.—मत्तय १९:८, ९.
९, १०. आपण यहोवाला सादर करत असलेल्या उपासनेविषयी कशाप्रकारे विचार करण्यास हवा?
९ आपण आधी पाहिल्याप्रमाणे, मलाखीच्या काळातील दयनीय आध्यात्मिक परिस्थितीला अनुलक्षून यहोवाने स्पष्ट शब्दांत यहूदाच्या वरकरणी उपासनेचा निषेध केला; शिवाय आपण केवळ शुद्ध उपासनेचाच स्वीकार करू हे देखील त्याने सांगितले. या माहितीने आपल्यालाही, आपण यहोवा देवास अर्थात सबंध विश्वाचा सार्वभौम प्रभू व यथार्थ पावित्र्याचा उगम यास कशा प्रकारची उपासना देत आहोत यावर विचार करण्यास प्रवृत्त करू नये का? आपण खरोखरच देवास पवित्र सेवा सादर करत आहोत का? आपण स्वतःस सतत आध्यात्मिकरित्या शुद्ध अवस्थेत राखतो का?
१० आपण परिपूर्ण तर होऊ शकत नाही; यास्तव आपण परिपूर्ण व्हावे किंवा आपण इतरांसोबत स्वतःची तुलना करावी असा याचा अर्थ होत नाही. तथापि, प्रत्येक ख्रिश्चनाने आपापल्या परिस्थितीला अनुलक्षून सर्वोत्तम अशी उपासना देवाला सादर करावी असा मात्र याचा अर्थ नक्कीच होतो. हे, आपल्या उपासनेच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. आपण सादर करत असलेली पवित्र सेवा ही आपल्या परिस्थितींनुसार सर्वोत्तम अशीच असण्यास हवी. ते कसे साध्य करता येते?—लूक १६:१०; गलतीकर ६:३, ४.
शुद्ध अंतःकरणे ही शुद्ध उपासनेस चालना देतात
११, १२. अपवित्र आचरण कशातून उत्पन्न होते?
११ एखाद्याच्या अंतःकरणात जे आहे ते त्याच्या शब्दांतून व कृतींतून दिसून येईल असे येशूने सुस्पष्टपणे शिकवले. स्वतःला धार्मिक म्हणविणाऱ्या, तथापि, अपवित्र असणाऱ्या परुशांना येशूने म्हटले: “अहो सापांच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हाला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.” त्याने नंतर सांगितले की दुष्ट कार्ये ही अंतःकरणात किंवा आंतरिक मनुष्यात दडलेल्या दुष्ट कल्पनांतून साकार होतात. तो म्हणाला: “जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात.”—मत्तय १२:३४; १५:१८-२०.
१२ यामुळे, अपवित्र कृत्ये ही अचानक, म्हणजेच कोणतीही पार्श्वभूमी नसताना घडत नाहीत हे समजण्यास आपल्याला मदत होते. उलटपक्षी, ही कृत्ये अंतःकरणात घर करून बसलेल्या विटाळविणाऱ्या कल्पनांमुळे अर्थात गुप्त इच्छांमुळे व कदाचित व्यर्थ मनोरथांमुळे घडून येतात. याच कारणास्तव येशू म्हणू शकला: “‘व्यभिचार करू नको’ म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” दुसऱ्या शब्दांत बोलायचे झाल्यास, कोणतीही कृती घडण्याच्या आधीच जारकर्म व व्यभिचार यांनी अंतःकरणात मूळ धरले आहे. मग, अनुकूल संधी येताच या अपवित्र कल्पनांचे अपवित्र आचरणात रूपांतर होते. यामुळे ओघाओघाने जारकर्म, व्यभिचार, पुरुषगमन, चोरी, निंदा व धर्मत्याग अशी कृत्ये परिणीत होतात.—मत्तय ५:२७, २८; गलतीकर ५:१९-२१.
१३. अपवित्र कल्पना कशाप्रकारे अपवित्र कृत्यांत परिणीत होऊ शकतात याची काही उदाहरणे कोणती आहेत?
१३ हे वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट करता येते. काही देशांमध्ये कॅसिनोंच्या अर्थात जुगार अड्ड्यांच्या संख्येला भलतेच उधाण आले आहे; व यामुळे जुगार खेळण्याच्या पुष्कळ संधी मिळू लागल्या आहेत. एखाद्याला आपल्या आर्थिक समस्यांचे निवारण करण्यासाठी या भ्रामक उपायाची मदत घ्यावयाचा मोह होऊ शकेल. लाघवी युक्तिवादामुळे, एखादा बांधव त्याच्या बायबल तत्त्वांना अव्हेरण्यास किंवा त्याच्या बुद्धीला पटेल तसे त्यांत फेरफार करण्यास प्रवृत्त होईल.c दुसरे उदाहरण पाहू जाता, दूरचित्रवाणी, व्हिडियो, कंप्युटर किंवा पुस्तके यांपैकी कोणत्याही माध्यमातून सहजगत्या उपलब्ध असलेले अश्लील साहित्य देखील अपवित्र आचरणास कारणीभूत ठरू शकते. एखाद्याने आपल्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीविषयी किंचितही दुर्लक्ष केले की मग नकळत अनैतिकतेच्या पाशास बळी पडण्यास त्याला फारसा वेळ लागत नाही. तथापि, अधिकांश प्रकरणांच्या बाबतीत पापात वाहवत जाण्याची सुरवात मनातूनच होते. होय, अशा परिस्थितींमध्ये याकोबाचे शब्द खरे ठरतात: “प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहांत पडतो. मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते.”—याकोब १:१४, १५; इफिसकर ६:११-१८.
१४. अनेकजण त्यांच्या अपवित्र आचरणापासून कशाप्रकारे मागे फिरले आहेत?
१४ सुदैवाने, कमतरतांमुळे पाप करणारे अनेक ख्रिश्चन खरा पश्चात्ताप प्रदर्शित करतात व अशांच्या आध्यात्मिक स्थितीस पुनःस्थापित करणे वडिलांना शक्य होते. एवढेच नव्हे तर, पश्चात्तापाच्या अभावामुळे बहिष्कृत करण्यात आलेल्यांचे देखील कालांतराने डोळे उघडतात व त्यांना मंडळीत पुनःस्थापित करण्यात येते. त्यांनी अपवित्र कल्पनांना अंतःकरणात घर करू दिले तेव्हा सैतानाने त्यांना किती सहजपणे कह्यात घेतले याची त्यांना जाणीव होते.—गलतीकर ६:१; २ तीमथ्य २:२४-२६; १ पेत्र ५:८, ९.
आपल्या कमतरतांना तोंड देण्याचे—आव्हान
१५. (अ) आपण आपल्या कमतरतांना का तोंड देण्यास हवे? (ब) आपल्या कमतरता कबूल करण्यासाठी आपल्याला कशी मदत मिळू शकेल?
१५ आपण आपल्या अंतःकरणास वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करावयास हवा. आपण आपल्या कमतरतांना तोंड देण्यास, त्या कबूल करण्यास व त्यांवर मात करण्यासाठी झटण्यास तयार आहोत का? आपण कशाप्रकारे सुधारणा करू शकू याबद्दल एखाद्या प्रामाणिक मित्र किंवा मैत्रिणीला विचारून, आपल्याला दिला जाणारा सल्ला ऐकून घेण्यास आपण तयार आहोत का? पवित्र राहण्यासाठी आपल्या त्रुटींवर मात करणे अगत्याचे आहे. का बरे? कारण सैतान आपल्या कमतरतांना ओळखून आहे. तो आपल्याला पाप व अपवित्र आचरण करण्यासाठी उत्तेजन देण्याच्या उद्देशाने त्याचे धूर्त डावपेच उपयोगात आणील. आपण यहोवाच्या उपासनेसाठी पवित्र व योग्य राहू नये म्हणून, तो त्याच्या कुयुक्त्यांद्वारे आपल्याला देवाच्या प्रीतीपासून विलग करण्याचा आतोनात प्रयत्न करतो.—यिर्मया १७:९; इफिसकर ६:११; याकोब १:१९.
१६. पौल कोणती लढाई लढत होता?
१६ पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्रांत कबूल केल्याप्रमाणे, त्याच्यावरही अनेक मोह व परीक्षा आल्या; तो म्हणाला: “मला ठाऊक आहे की, माझ्या ठायी म्हणजे माझ्या देहस्वभावात काही चांगले वसत नाही; कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करीत नाही; तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करितो. . . . माझा अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो; तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातल्या नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.”—रोमकर ७:१८-२३.
१७. कमतरतांविरुद्धच्या लढाईत पौल कशाप्रकारे विजयी झाला?
१७ पौलाच्या उदाहरणातून शिकण्यासारखा महत्त्वपूर्ण धडा असा की त्याने आपल्या कमतरतांना कबूल केले. या कमतरता असूनही तो म्हणू शकला: “माझा [आध्यात्मिक] अंतरात्मा देवाच्या नियमशास्त्रामुळे हर्ष करितो.” पौलाने चांगुलपणाची आवड धरली; त्याला वाईटाचा तिटकारा होता. तरीसुद्धा तो सतत एक लढाई लढत होता व आपण सर्व देखील हीच लढाई, अर्थात सैतान, जग व देह यांविरुद्ध लढत आहोत. असे असताना, आपण स्वतःला पवित्र तसेच या जगापासून व त्याच्या विचारसरणीपासून अलिप्त राखण्याच्या लढाईत कशाप्रकारे विजयी होऊ शकतो?—२ करिंथकर ४:४; इफिसकर ६:१२.
आपण कशाप्रकारे पवित्र राहू शकतो?
१८. आपण कशाप्रकारे पवित्र राहू शकतो?
१८ कमीतकमी प्रतिकार करण्याचा मार्ग पत्करल्याने किंवा आत्मकेंद्रित राहिल्याने पावित्र्य संपादन करता येत नाही. तशा प्रकारची व्यक्ती नेहमीच आपल्या आचरणासाठी सबबी देईल व दुसऱ्यांच्या डोक्यावर खापर फोडेल. कदाचित आपल्याला आपल्या कृतींची जबाबदारी पत्करण्यास शिकावे लागेल; शिवाय कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे किंवा आनुवंशिकतेमुळे, आमच्यावर नशिबानेच पारडे फिरविले आहे असे म्हणणाऱ्या काही लोकांसारखे असावयाचे देखील टाळण्यास शिकले पाहिजे. याबाबतीत मूळ मुद्दा आहे, एखाद्या व्यक्तीचे अंतःकरण. तो किंवा ती नीतिमत्तेवर प्रेम करते का? पावित्र्याची लालसा बाळगते का? देवाचे आशीर्वाद मिळविण्यास इच्छुक आहे का? पावित्र्य केवढे अगत्याचे आहे ते स्पष्ट करताना स्तोत्रकर्त्याने पुढीलप्रमाणे म्हटले: “वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.” प्रेषित पौलाने लिहिले: “प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बऱ्याला चिकटून राहा.”—स्तोत्र ३४:१४; ९७:१०; रोमकर १२:९.
१९, २०. (अ) आपण आपल्या मनाची कशाप्रकारे उभारणी करू शकतो? (ब) सफल व्यक्तिगत अभ्यासात काय समाविष्ट आहे?
१९ आपण सर्व बाबींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केल्यास व आपल्याठायी ख्रिस्ताचा मनोभाव असल्यास, आपण ‘बऱ्याला चिकटून राहू’ शकतो. (१ करिंथकर २:१६) हे कसे साध्य करता येते? देवाच्या वचनाचा नियमित अभ्यास व त्यावर मनन करण्याद्वारे. हा सल्ला कितीतरी वेळा देण्यात आला आहे! तथापि, आपण त्याकडे पुरेशा गांभिर्याने लक्ष देतो का? उदाहरणार्थ, तुम्ही या नियतकालिकाचा खऱ्या अर्थाने, म्हणजे सभेला येण्याच्या आधीच बायबल वचनांना पडताळून अभ्यास करता का? अभ्यास करणे असे म्हणताना, प्रत्येक परिच्छेदातील काही मोजक्या शब्दांना रेखांकित करणे हा आमचा अर्थ नव्हे. अभ्यासाचा एखादा लेख जवळजवळ १५ मिनिटांतच ओझरता वाचून रेखांकित करता येतो. पण त्यामुळे आपण त्या लेखाचा अभ्यास केला आहे असे म्हणता येईल का? खरे पाहता, प्रत्येक लेखात सादर केलेला आध्यात्मिक लाभ आत्मसात करण्यास एक किंवा दोन तास लागू शकतील.
२० कदाचित आपल्याला प्रत्येक आठवड्यातील काही तास टीव्हीकडे पाठ फिरवून, आपल्या वैयक्तिक पावित्र्यावर खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला शिस्त लावावी लागेल. नियमित अभ्यास आपली आध्यात्मिक उभारणी करतो; तो उचित निर्णय अर्थात ‘पवित्र वर्तणुकीस’ कारणीभूत ठरणारे निर्णय घेण्यास आपल्या मनोवृत्तीत बदल घडवून आणतो.—२ पेत्र ३:११; इफिसकर ४:२३; ५:१५, १६.
२१. कोणत्या प्रश्नाचे उत्तर देणे अद्याप बाकी आहे?
२१ आता प्रश्न उद्भवतो, आपल्या कार्यहालचालींच्या व आचरणाच्या आणखी कोणकोणत्या क्षेत्रांत आपण ख्रिश्चन या नात्याने, यहोवाप्रमाणे पवित्र होऊ शकतो? पुढील लेखात आणखी काही विचार्यविषय सादर करण्यात येतील.
[तळटीपा]
a हा दोन-खंडांचा संदर्भ ग्रंथ, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे.
b “विश्वासघाताने” या शब्दाच्या अधिक व्यापक स्पष्टीकरणासाठी, सावध राहा! (इंग्रजी) याच्या फेब्रुवारी ८, १९९४ अंकातील पृष्ठ २१ वरील “देवाला कोणत्या प्रकारच्या घटस्फोटाचा तिटकारा आहे?” हा लेख पाहा.
c जुगार कोणत्या कारणांमुळे अपवित्र आचरणात मोडतो, याबद्दल अधिक माहितीसाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित सावध राहा! (इंग्रजी) च्या ऑगस्ट ८, १९९४ अंकातील पृष्ठे १४-१५ पाहा.
तुम्हाला आठवते का?
◻ इस्राएलात पावित्र्याच्या उगमाची कशाप्रकारे ओळख करून देण्यात आली होती?
◻ मलाखीच्या काळात इस्राएली उपासना कोणकोणत्या प्रकारे अपवित्र होती?
◻ अपवित्र आचरण कोठून सुरू होते?
◻ पवित्र होण्यासाठी आपल्याला कशाची जाणीव असली पाहिजे?
◻ आपण कशाप्रकारे पवित्र राहू शकतो?