देवावर प्रीती करणे याचा काय अर्थ होतो?
सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी, मानवजातीतील पहिले बाळ जन्मास आले. त्याच्या जन्मानंतर त्याची आई हव्वा, म्हणाली: “परमेश्वराच्या साहाय्याने मला पुरुषसंतान लाभले आहे.” (उत्पत्ति ४:१) तिच्या या विधानावरून हे स्पष्ट होते की हव्वा व तिचा पती आदाम यांना त्यांच्या विद्रोहामुळे मृत्युदंड ठोठावण्यात आला तरीदेखील यहोवाच्या देवत्वाची त्यांना जाणीव होती. कालांतराने, त्यांनी आणखी एका पुत्रास जन्म दिला. या मुलांची काइन व हाबेल अशी नावे ठेवण्यात आली.
ती मुले लहानाची मोठी होत गेली तसतशी यहोवाच्या निर्मितीचे केवळ निरीक्षण करण्याद्वारेच त्याच्या प्रीतीविषयी पुष्कळ काही शिकली यात काहीच शंका नाही. त्यांनी निसर्गातील निरनिराळ्या सुंदर रंगांचा तसेच विविध पशुपक्ष्यांचा व वनस्पतींचा आनंद लुटला. देवाने त्यांना केवळ जीवनच नव्हे तर जीवनाचा पुरेपूर आनंद लुटण्याची कुवतही दिली.
त्यांना कळून आले, की आपल्या आईवडिलांना परिपूर्ण अवस्थेत निर्माण करण्यात आले होते व मानवांनी सर्वकाळ जगावे असा यहोवाचा उद्देश होता. कदाचित आदाम व हव्वा यांनी सुंदर एदेन बागेचे वर्णन करून त्यांना सांगितले होते व आपल्याला अशा सुंदर परादीसमय निवासातून का घालवण्यात आले होते हे देखील त्यांना कसे तरी समजावून सांगावे लागले असावे. उत्पत्ति ३:१५ येथे अभिलिखित ईश्वरी भविष्यवाद देखील काइन व हाबेल यांना कदाचित माहीत असावा. त्या भविष्यवादाद्वारे यहोवाने आपल्यावर प्रीती करणाऱ्या व आपल्याला निष्ठावान राहणाऱ्या लोकांच्या लाभासाठी एका नियोजित वेळी पुन्हा एकदा सर्वकाही व्यवस्थित करण्याचा आपला उद्देश व्यक्त केला.
यहोवाविषयी व त्याच्या गुणांविषयी शिकल्यामुळे काइन व हाबेल यांच्या मनात देवाची स्वीकृती मिळवण्याची इच्छा जागृत झाली असेल. यामुळेच, ते अर्पणे घेऊन यहोवासमोर आले. बायबल वृत्तान्त म्हणतो: “काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणिले. हाबेलानेहि आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, म्हणजे त्यांतल्या पुष्टांतून काही अर्पण आणिले.”—उत्पत्ति ४:३, ४.
देवाची स्वीकृती मिळवण्याच्या त्यांच्या या इच्छेने, देवासोबतच्या एका नातेसंबंधाचा पाया घातला. शेवटी काइनाने देवाविरुद्ध विद्रोह केला; त्याउलट हाबेल, पुढेही देवाबद्दलच्या खऱ्या प्रीतीने प्रेरित होत राहिला. हाबेलाने यहोवाच्या व्यक्तिमत्त्वाविषयी व त्याच्या उद्देशांविषयी प्रथम ज्ञान संपादन केले नसते तर तो देवासोबत अशाप्रकारचा नातेसंबंध कधीच विकसित करू शकला नसता.
तुम्ही देखील यहोवाला जाणून घेऊ शकता. उदाहरणार्थ, देव खरोखरची व्यक्ती असून, संयोगाच्या बळावर निर्मिती करणारी एक निर्विकार शक्ती नाही, हे बायबलमधून तुम्ही शिकू शकता. (पडताळा योहान ७:२८; इब्री लोकांस ९:२४; प्रकटीकरण ४:११.) याशिवाय, बायबल असेही शिकविते की यहोवा, “दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” आहे.—निर्गम ३४:६.
“यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे”
काइन व हाबेल यांच्या वृत्तान्तातून स्पष्ट झाल्याप्रमाणे, देवाचे ज्ञान असावे व त्याच्याबरोबर एक घनिष्ट नातेसंबंध असावा अशी निव्वळ इच्छा बाळगणे पुरेसे नाही. दोघेही भाऊ देवासमोर अर्पणे घेऊन आले हे खरे आहे. तथापि, “परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला; पण काइन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले.”—उत्पत्ति ४:३-५.
देवाने काइनाच्या बलिदानाचा अव्हेर का केला? त्याच्या अर्पणाच्या गुणवत्तेत काही दोष होता का? पशूचे अर्पण आणण्याऐवजी “शेताच्या उत्पन्नापैकी” अर्पण आणल्यामुळे यहोवा नाराज झाला होता का? ही कारणे नसावीत. काही काळ लोटल्यावर, देवाने आपल्या अनेक उपासकांकडून, धान्याची व इतर शेतीच्या उत्पन्नाची अर्पणे आनंदाने स्वीकारली. (लेवीय २:१-१६) तर मग स्पष्टपणे, काइनाच्या अंतःकरणात काहीतरी वावगे होते. यहोवाला काइनाच्या अंतःकरणात काय चालले आहे ते उमगले व त्याने काइनास ताकीद दिली: “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुजवर आहे.”—उत्पत्ति ४:६, ७.
देवाबद्दल खरी प्रीती म्हणजे निव्वळ बलिदानांचे अर्पण करणे एवढेच नव्हे. याच कारणास्तव काइनास, यहोवाने ‘बरे ते करण्याचे’ उत्तेजन दिले. देवाला आज्ञापालन हवे होते. देवाला आज्ञाधारक राहिल्याने, काइनास आपल्या निर्मात्यासोबत एका प्रेमळ नातेसंबंधाचा भक्कम पाया घालण्यासाठी मदत मिळू शकली असती. बायबल आज्ञापालनाच्या महत्त्वास पुढील शब्दांनी पाठपुरावा देते: “परमेश्वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा! यज्ञांपेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे.”—१ शमुवेल १५:२२.
नंतर ही विचारधारणा, १ योहान ५:३ येथे दिलेल्या या शब्दांमुळे आणखीनच दृढपणे प्रस्थापित झाली: “देवावर प्रीति करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय; आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” यहोवाबद्दल आपल्याठायी असलेले प्रेम दाखविण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे त्याच्या अधिकारास अधीन असणे. याचाच अर्थ, बायबलच्या नैतिक नियमावलीचे पालन करणे होय. (१ करिंथकर ६:९, १०) अर्थात, चांगल्यावर प्रेम करणे व वाईटाचा द्वेष करणे.—स्तोत्र ९७:१०; १०१:३; नीतिसूत्रे ८:१३.
शेजाऱ्यावरील आपली प्रीती ही, देवावर आपल्याला असलेल्या प्रीतीची महत्त्वपूर्ण अभिव्यक्ती आहे. बायबल आपल्याला सांगते: “मी देवावर प्रीति करितो, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीति करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीति करिता येणे शक्य नाही.”—१ योहान ४:२०.
देवासोबत जवळीक शक्य आहे
काही जण म्हणतील, ‘मी यहोवाची उपासना करतो. मी त्याच्या नियमांचे पालन करतो. माझ्या सोबत्यांना मी न्यायाची वागणूक देतो. हे सर्व मी करतो. तरीसुद्धा, मला देवाच्या जवळ असल्यासारखे वाटत नाही. मला त्याच्याविषयी उत्कट प्रीती जाणवत नाही व यामुळे मला दोषी असल्यासारखे वाटते.’ काहींना, यहोवासोबत अशा प्रकारचा घनिष्ट नातेसंबंध मिळविण्यास आपण पात्र नाही असे वाटत असेल.
तब्बल ३७ वर्षे यहोवाची समर्पित सेवा केल्यानंतर, एका ख्रिश्चनाने लिहिले: “माझ्या जीवनात अनेकदा मला असे वाटले आहे की मी यहोवाची केलेली सेवा वरकरणी होती, माझे अंतःकरण देखील कदाचित त्यात पूर्णपणे वाहिलेले नव्हते. परंतु, यहोवाची सेवा करणे योग्य आहे हे मला ठाऊक होते व म्हणून मी त्यात खंड पडू देत नसे. तथापि, ‘यहोवाच्या प्रेमाने माझे हृदय भरून आले,’ असे कोणी म्हटले की प्रत्येक वेळेस मी स्वतःशीच विचार करीत असे, ‘माझ्यात काय उणीव आहे, कारण मला तर असे कधीच वाटलेले नाही?’” आपण देवासोबत जवळीक कशाप्रकारे राखू शकतो?
तुम्ही एखाद्यावर खरोखर प्रेम करता तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल वारंवार विचार करता. तुम्हाला तो प्रिय असल्यामुळे त्याच्या सान्निध्यात असण्याची तुम्ही तीव्र इच्छा बाळगता. जसजसे तुम्ही त्याला अधिक वेळा भेटता, त्याच्याशी बोलता, त्याच्याविषयी विचार करता, तसतशी त्याच्याविषयीची तुमची प्रीती वाढते. हाच सिद्धांत देवाविषयी प्रीती वाढविण्याबाबतही लागू होतो.
स्तोत्र ७७:१२, या वचनात प्रेरित लेखक म्हणतो: “मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.” देवाविषयी मनात प्रीती वाढविण्यासाठी मनन करणे अत्यावश्यक आहे. तो अदृश्य आहे ही बाब लक्षात घेता, हे आणखी खरे आहे. तथापि, तुम्ही त्याचा जितका अधिक विचार कराल तितका अधिक तो तुमच्यासाठी वास्तविक बनेल. केवळ असे करण्याद्वारे तुम्ही त्याच्यासोबत एक जिवाभावाचा व प्रेमळ नातेसंबंध विकसित करू शकाल—कारण तो तुमच्यासाठी वास्तविक आहे.
यहोवाचे मार्ग व त्याचे व्यवहार यांविषयी वारंवार मनन करण्याची तुमची इच्छा, तुम्ही त्याचे बोलणे किती वेळा ऐकता यावर अवलंबून असेल. त्याच्या वचनाच्या अर्थात बायबलच्या नियमित वाचनाद्वारे व अभ्यासाद्वारे तुम्ही त्याचे बोलणे ऐकू शकता. स्तोत्रकर्ता अशा मनुष्यास धन्य म्हणतो जो, “परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करितो.”—स्तोत्र १:१, २.
आणखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे प्रार्थना. यास्तव, बायबल पुन्हापुन्हा आपल्याला प्रार्थना करण्यास, अर्थात “सर्व प्रसंगी,” ‘प्रार्थनेसाठी प्रसंग मिळवा,’ “प्रार्थनेत तत्पर राहा” व “निरंतर प्रार्थना करा” असे आवर्जून सांगते. (इफिसकर ६:१८; १ करिंथकर ७:५; रोमकर १२:१२; १ थेस्सलनीकाकर ५:१७) आपल्या निरंतर प्रार्थनांमुळे आपण यहोवाच्या पसंतीस उतरू व तो आपल्या प्रार्थना ऐकतो हे अभिवचन आपल्याला त्याच्या जवळ आणील. स्तोत्रकर्त्याने पुढील शब्द घोषित केले तेव्हा याबद्दल खात्री पटवून दिली: “मी परमेश्वरावर प्रेम करितो कारण तो माझी विनवणी ऐकतो. त्याने आपला कान माझ्याकडे लाविला आहे, म्हणून मी जन्मभर त्याचा धावा करीन.”—स्तोत्र ११६:१, २.
प्रीतीच्या देवाचे अनुकरण करणे
यहोवा आपल्याला चांगुलपणा दाखवितो. सबंध विश्वाचा निर्माता असल्यामुळे, त्याला निश्चितच अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात व अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तथापि, बायबल आपल्याला सांगते की इतका महान असूनही तो आपण निर्माण केलेल्या मानवांची काळजी घेतो. तो आपल्यावर प्रीती करितो. (१ पेत्र ५:६, ७) स्तोत्रकर्ता पुढील शब्दांत याची खात्री पटवून देतो: ‘हे यहोवा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. आकाश जे तुझे अंगुलीकार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे ह्यांच्याकडे पहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी? मानव तो काय की तू त्याची काळजी घ्यावी?’—स्तोत्र ८:१, ३, ४.
यहोवाने कशाप्रकारे मर्त्य मानवास आठवणीत ठेविले आहे? बायबल उत्तर देते: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे; ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीति प्रगट झाली. प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापाचे प्रायश्चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.”—१ योहान ४:९, १०.
प्रायश्चित्त व्हावे म्हणून दिलेले हे बलिदान देवाच्या प्रीतीचा सर्वात महान पुरावा कशाप्रकारे आहे? याकरता, एदेन बागेत जे घडले त्यावर आपण अंमळ विचार करू या. यहोवाच्या नियमाला अधीन होऊन सर्वकाळासाठी परिपूर्ण जीवनाचे भवितव्य मिळवावे, किंवा यहोवाविरुद्ध बंड करून परिणामी मृत्यूला तोंड द्यावे असे दोन पर्याय आदाम व हव्वा यांच्यासमोर होते. त्यांनी बंड करण्याचा मार्ग निवडला. (उत्पत्ति ३:१-६) असे केल्यामुळे त्यांनी संपूर्ण मानवजातीला दोषी ठरवून मृत्यूच्या अधीन केले. (रोमकर ५:१२) त्यांनी मगरूरीने आपल्याला स्वतःचे निर्णय घेण्याच्या संधीपासून वंचित केले. आपल्यापैकी कोणालाही मत मांडण्याची संधी मिळाली नाही.
तथापि, मर्त्य मानवाची दशा लक्षात घेऊन यहोवाने प्रेमळपणे त्यास आठवणीत ठेविले आहे. यहोवाने आपला पुत्र, येशू ख्रिस्त याच्या बलिदानरूपी मृत्यूकरवी आपल्यापैकी प्रत्येकाला जीवन किंवा मृत्यू, आज्ञापालन किंवा बंड निवडता यावे म्हणून कायदेशीर आधार पुरवला आहे. (योहान ३:१६) यहोवाने आपल्याला न्यायालयात स्वतः उभे राहण्याची—जणू काही पुन्हा एकदा एदेनला जाऊन स्वतःचा निर्णय घेण्याची संधी दिली आहे. हे प्रेमाचे अभूतपूर्व असे महान प्रकटन आहे.
यहोवाने आपल्या ज्येष्ठपुत्रास अपमानित होताना, छळले जाताना व एखाद्या गुन्हेगारासारखे वधस्तंभावर खिळले जाताना पाहिले तेव्हा त्याला सोसाव्या लागलेल्या यातनांची जरा कल्पना करा; आणि आपल्यासाठी यहोवाने ते सारे सोसले. आपल्यावर प्रीती करण्यात यहोवाने घेतलेल्या पुढाकाराची जाणीव राखल्यामुळे, आपण त्याच्यावर प्रीती करण्यास प्रेरित व्हावे व आपल्याला त्याचा शोध घेण्याची चालना मिळावी. (याकोब १:१७; १ योहान ४:१९) बायबल आपल्याला आमंत्रण देते, “परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा. त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा. त्याने केलेली अद्भुतकृत्ये, त्याचे चमत्कार, व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.”—स्तोत्र १०५:४, ५.
देवासोबत एक व्यक्तिगत जिव्हाळ्याचा व प्रेमाचा नातेसंबंध असणे, त्याचे मित्र असणे अवास्तविक नाही. ते सुसाध्य आहे. निःसंशये, आपण देवाबद्दल असलेल्या आपल्या प्रीतीची जशीच्या तशी बरोबरी, इतर कोणत्याही मानवी नातेसंबंधांशी करू शकत नाही. आपला वैवाहिक सोबती, आपले आईवडील, आपली भावंडे, मुले किंवा आपले इष्टमित्र यांबद्दल आपल्याला वाटणारी प्रीती, देवाबद्दल आपल्याला वाटत असणाऱ्या प्रीतीपेक्षा वेगळी आहे. (मत्तय १०:३७; १९:२९) यहोवावर प्रीती करण्यात आपला एकनिष्ठपणा, आपली उपासना व एक बिनशर्त समर्पण समाविष्ट आहे. (अनुवाद ४:२४) हे सारे इतर कोणत्याही नातेसंबंधात गोवलेले नाही. तरीसुद्धा, भीतियुक्त आदरभावाने आपण देवाविषयी उत्कट व गाढ भावना विकसित करू शकतो.—स्तोत्र ८९:७.
अपरिपूर्ण असतानाही, काइन व हाबेल यांच्याप्रमाणे तुमच्यापाशी देखील तुमच्या निर्मात्यावर प्रीती करण्याची कुवत आहे. काइन याने आपली निवड केली; तो सैतानास जाऊन मिळाला व पहिला मानवी खुनी ठरला. (१ योहान ३:१२) उलटपक्षी, यहोवा हाबेलास एक विश्वासू व नीतिमान पुरुष म्हणून आठवणीत ठेवील आणि येणाऱ्या परादीसमध्ये त्याला जीवनाचे प्रतिफळ लाभेल.—इब्री लोकांस ११:४.
तुम्हाला देखील निवड करावयाची आहे. देवाचा आत्मा व त्याच्या वचनाच्या साहाय्याने तुम्हालाही खरोखर देवावर “पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने” प्रीती करणे, शक्य आहे. (अनुवाद ६:५) परिणामी, यहोवा देखील तुमच्यावर प्रीती करीत राहील, कारण “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.
[७ पानांवरील चित्रं]
हाबेलाचे अर्पण देवाच्या दृष्टीने स्वीकारणीय होते