यहोवासमोर स्वीकारयोग्य यज्ञ अर्पिणे
इतिहासाच्या एके समयी, एदेन बागेच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारापाशी एक विलक्षण गोष्ट दिसत होती.a शक्तिशाली करुब, बागेची राखण करीत होते; त्यांच्या दिव्य स्वरुपावरून हे स्पष्ट दिसत होते, की कोणीही बागेत प्रवेश करण्याची हिंमत करू शकत नव्हता. बागेत प्रवेश करण्यापासून मज्जाव करणारी एक गरगर फिरणारी ज्वालारुपी तलवार देखील तेथे होती; रात्रीच्यावेळी आसपासच्या झाडांमध्ये तिचा भयाण प्रकाश पडत असावा. (उत्पत्ति ३:२४) एखाद्याला हे सर्व पाहण्याची उत्सुकता असली तरी, तो जरा लांबूनच पाहत.
काइन आणि हाबेलने कदाचित अनेकवेळा हे ठिकाण पाहिले असावे. बागेच्या बाहेर आदाम आणि हव्वेच्या पोटी जन्माला आलेले हे दोघे जण, आपले आईवडील एकेकाळी जेथे राहत होते त्या परादीसमधील जीवन कसे असेल याची फक्त कल्पनाच करू शकत होते; पूर्वी तेथे हिरवीगार वनराई, भरघोस फळांनी लगडलेली झाडे आणि भाजीपाला विपुल होता. पण, आता एदेन पडीक आणि जंगलासारखी वाटत असावी.
बागेची कोणी काळजी का घेत नव्हते व त्यांना बागेतून का हाकलून लावण्यात आले होते याचे कारण आदाम आणि हव्वेने नक्कीच आपल्या मुलांना सांगितले असावे. (उत्पत्ति २:१७; ३:६, २३) काइन आणि हाबेल किती निराश झाले असावेत! ते बाग पाहू शकत होते पण तिच्यात प्रवेश करू शकत नव्हते. ते परादीसच्या अगदी जवळ असूनही अगदी दूर होते. त्यांच्यावर अपरिपूर्णतेचा बट्टा लागला होता व याबाबतीत ते काहीच करू शकत नव्हते.
त्यांच्या पालकांच्या आपापसातील नातेसंबंधामुळेसुद्धा परिस्थिती सुधारणार नव्हती. हव्वेला शिक्षा देताना देवाने म्हटले: “तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” (उत्पत्ति ३:१६) या भविष्यवाणीनुसार, आदाम आपल्या बायकोवर वर्चस्व गाजवू लागला असावा; कदाचित तो तिला आता सोबती किंवा मदतनीस म्हणून वागवत नसावा. आणि हव्वा त्याच्यावर प्रमाणापेक्षा जास्तच अवलंबून राहू लागली असावी. तिचा “ओढा” “एखाद्या रोगासारखा” होता असे वर्णन एक भाष्य करते.
या वैवाहिक नातेसंबंधाचा परिणाम, या दोन मुलांना आपल्या पालकांबद्दल असलेल्या आदरावर कितपत झाला हे मात्र बायबल आपल्याला सांगत नाही. एवढे मात्र खरे, की आदाम आणि हव्वेने आपल्या मुलांसमोर चांगले उदाहरण मांडले नाही.
वेगवेगळे मार्ग निवडणे
हाबेल मोठा होऊन मेंढपाळ बनला आणि काइन शेतकरी. (उत्पत्ति ४:२) आपल्या कळपांची राखण करताना हाबेलाला निश्चितच, आपल्या पालकांना एदेनातून हाकलून लावण्याआधी, “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडिशील” या उच्चारलेल्या खास भविष्यवाणीवर मनन करायला भरपूर वेळ मिळाला. (उत्पत्ति ३:१५) ‘सर्पाचे डोके फोडणाऱ्या संतानाबद्दलचे देवाचे अभिवचन कसे काय पूर्ण होईल व या संतानाची टाच कशी काय फोडण्यात येईल’ यावर त्याने विचार केला असावा.
काही दिवसांनंतर, म्हणजे जेव्हा काइन आणि हाबेल प्रौढ झाले तेव्हा प्रत्येकाने यहोवाला एक एक अर्पण चढवले. हाबेल मेंढपाळ असल्यामुळे त्याने “आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, म्हणजे त्यातल्या पुष्टांतून” अर्पण केले यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. याउलट, काइनाने “शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण” केले. यहोवाने हाबेलाचे अर्पण स्वीकारले, पण “काइन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही.” (उत्पत्ति ४:३-५) का नाही?
काहींचे म्हणणे आहे, की हाबेलाचे अर्पण त्याच्या “कळपातील प्रथम जन्मलेल्यातून” होते आणि काइनाचे अर्पण साधे, म्हणजे “शेताच्या उत्पन्नापैकी काही” होते. परंतु प्रश्न, काइनाने सादर केलेल्या उत्पन्नाच्या प्रकाराचा नव्हता, कारण अहवाल म्हणतो, की यहोवाने ‘हाबेल व त्याचे अर्पण’ स्वीकारले आणि “काइन व त्याचे अर्पण” नाकारले. म्हणजे यहोवाने प्रामुख्याने उपासकाचे अंतःकरण पाहिले. त्याला काय दिसून आले? इब्री लोकांस ११:४ म्हणते, की हाबेलाने आपले अर्पण “विश्वासाने” अर्पिले. याचाच अर्थ, हाबेलाचे अर्पण ज्यामुळे स्वीकारयोग्य ठरले त्यासारखा विश्वास काइनाकडे नव्हता. (तिरपे वळण आमचे.)
याबाबतीत एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, की हाबेलाच्या अर्पणात रक्ताचे वाहणे समाविष्ट होते. ज्याची टाच फोडली जाणार होती त्या संतानाविषयी देवाने केलेल्या अभिवचनात एका जीवाचे अर्पण समाविष्ट आहे असा निष्कर्ष त्याने उचितरीत्या काढला असावा. यास्तव, हाबेलाचे अर्पण प्रायश्चित्ताची विनंती असावी; आणि त्याच्या या कृतीतून, देव उचित समयी एक प्रायश्चित्त बलिदान पुरवील असा विश्वास व्यक्त झाला.
याउलट, काइनाने जे अर्पण केले त्याचा त्याने वरवर विचार केला असावा. “त्याचे अर्पण, देव उपकारकर्ता आहे केवळ याची कबुली होते,” असे १९ व्या शतकातील एका बायबल भाष्यकाराचे म्हणणे आहे. “त्याला, आपल्यामध्ये आणि निर्माणकर्त्यामध्ये काही संबंध आहे असे मुळीच वाटत नव्हते, किंवा पापाच्या कबुलीची गरज आहे अथवा प्रायश्चित्ताची गरज आहे असेही मुळीच वाटत नव्हते हे स्पष्ट दिसत होते.”
शिवाय, ज्येष्ठपुत्र म्हणून काइनाने मगरुरपणे गृहीत धरले असावे, की सर्पाचा अर्थात सैतानाचा नाश करणारा वचनयुक्त संतान म्हणजे आपणच. कदाचित हव्वेनेपण आपल्या ज्येष्ठपुत्राबद्दल अशा महत्त्वाकांक्षा बाळगल्या असतील. (उत्पत्ति ४:१) पण, काइन आणि हव्वेने या अपेक्षा बाळगल्या असतील तर त्या चुकीच्या होत्या.
यहोवाने हाबेलाच्या अर्पणाला स्वीकृती कशी दाखवली त्याच्याबद्दल बायबल आपल्याला काही सांगत नाही. काहींचे म्हणणे आहे, की स्वर्गातून अग्नी येऊन त्याचे अर्पण भस्म झाले. काहीही असो, काइनाला जेव्हा कळले, की आपले अर्पण नाकारण्यात आले तेव्हा तो “संतापला व त्याचे तोंड उतरले.” (उत्पत्ति ४:५) काइन नाशाच्या मार्गावर वाटचाल करू लागला.
यहोवाचा सल्ला आणि काइनाची प्रतिक्रिया
यहोवाने काइनाशी तर्क केला. त्याने त्याला विचारले: “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले?” यामुळे काइनाला आपल्या भावनांचे आणि हेतुंचे परिक्षण करण्याची भरपूर संधी मिळाली. यहोवा पुढे त्याला म्हणाला: “तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुजवर आहे. करिता तू त्यास दाबात ठेव.”—उत्पत्ति ४:६, ७. (पृष्ठ २३ वरील चौकोन पाहा.)
काइनाने ऐकले नाही. उलट त्याने हाबेलाला शेतात नेऊन ठार मारले. नंतर जेव्हा यहोवाने त्याला हाबेलाचा ठावठिकाणा विचारला तेव्हा काइन आपले पाप लपवण्याकरता लबाड बोलला. उलट उत्तर देत तो म्हणाला: “मला ठाऊक नाही; मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”—उत्पत्ति ४:८, ९.
हाबेलला ठार मारण्याआधी आणि ठार मारल्यानंतरही काइनाने “बरे” करण्यास नकार दिला. त्याने पापाला स्वतःवर स्वामित्व गाजवू दिले आणि याच कारणासाठी मानवी कुटुंब जिथे राहत होते त्या क्षेत्रातून त्याला हद्दपार करण्यात आले. हाबेलाच्या मृत्यूचा बदला घेण्याकरता काइनाचा खून कोणी करू नये म्हणून एक “खूण,” कदाचित एक गंभीर आज्ञा देण्यात आली.—उत्पत्ति ४:१५.
काइनाने नंतर एक शहर स्थापन केले आणि त्याला आपल्या पुत्राचे नाव दिले. यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही की त्याची संतती त्यांच्या दांडगाईसाठी कुप्रसिद्ध झाली. शेवटी, नोहाच्या दिवसातील जलप्रलयाने सर्व अधार्मिक लोकांचा नाश केला तेव्हा त्यात काइनाच्या वंशाचाही अंत झाला.—उत्पत्ति ४:१७-२४; ७:२१-२४.
काइन आणि हाबेल यांच्याबद्दलचा बायबलमधील अहवाल निव्वळ करमणुकीसाठी म्हणून टिकून राहिला नाही. तर, तो “आपल्या शिक्षणाकरिता” लिहिण्यात आला होता व “सद्बोध, दोष दाखविणे,” यांसाठी उपयोगी आहे. (रोमकर १५:४; २ तीमथ्य ३:१६) या अहवालावरून आपण काय शिकू शकतो?
आपल्यासाठी धडा
काइन आणि हाबेलप्रमाणे, ख्रिश्चनांना आज देवाला एक अर्पण चढवण्याचे आमंत्रण दिले जात आहे; हे खरोखरचे होमार्पण नाही तर ‘स्तुतीचा यज्ञ, अर्थात त्याच्या नावाची जाहीर घोषणा करणाऱ्या ओठांचे फळ’ आहे. (इब्री लोकांस १३:१५) यहोवाचे साक्षीदार २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करून हे जागतिक प्रमाणावर साध्य करीत आहेत. (मत्तय २४:१४) तुमचाही या कार्यात भाग आहे का? मग तुम्ही ही खात्री बाळगू शकता, की “तुमचे कार्य व तुम्ही . . . करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्री लोकांस ६:१०.
काइन आणि हाबेल यांच्या अर्पणांप्रमाणे तुमच्या अर्पणाचे बाह्य स्वरुप पाहून—जसे की, क्षेत्र सेवेत आपण किती तास खर्च करतो त्यावरून न्याय केला जाणार नाही. यहोवा खोलवर पाहतो. यिर्मया १७:१० म्हणते, की तो “हृदय चाळून पाहतो” शिवाय “अंतर्याम” म्हणजेच एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचे खोल विचार, भावना आणि हेतू पारखतो. तेव्हा खरा प्रश्न संख्या नव्हे तर हेतू हा आहे. खरेच, एखादे अर्पण, मग ते मोठे असो अथवा छोटे असो, प्रीतीने प्रवृत्त होऊन पूर्ण मनाने केलेले असले तर ते देवाला मौल्यवान वाटते.—मार्क १२:४१-४४ ची तुलना १४:३-९ याच्याशी करा.
याचबरोबर आपल्याला याही गोष्टीचे भान असले पाहिजे, की यहोवाने जसे काइनाचे अर्ध्या मनाने अर्पिलेले अर्पण स्वीकारले नाही तसेच लंगडी अर्पणे तो स्वीकारणार नाही. (मलाखी १:८, १३) तुम्ही तुमचे सर्वात उत्तम ते यहोवाला द्यावे, तुमच्या पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने व शक्तीने त्याची सेवा करावी अशी तो तुमच्याकडून मागणी करतो. (मार्क १२:३०) तुम्ही तसे करत आहात का? जर होय तर तुम्हाला तुमच्या अर्पणावर समाधान मानायला पुरेसे कारण असेल. पौलाने लिहिले: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”—गलतीकर ६:४.
काइन आणि हाबेलाचे संगोपन एकाच प्रकारचे होते. पण समय आणि परिस्थितीने प्रत्येकाला विशिष्ट गुण विकसित करण्याची संधी दिली. काईनाच्या मनोवृत्तीत काही बदल न होता तो अधिकच मत्सरी, रागीट आणि क्रोधीत होत गेला.
याच्या उलट, हाबेल एक धार्मिक मनुष्य म्हणून देवाच्या आठवणीत राहिला. (मत्तय २३:३५) काहीही झाले तरी, देवाला संतुष्ट करण्याच्या त्याच्या निश्चयामुळे हाबेल आपल्या कृतघ्न कुटुंबापासून—आदाम, हव्वा आणि काइन यांच्यापासून वेगळा ठरला. बायबल म्हणते, की हाबेल जरी मरण पावला असला तरी तो “अद्यापि बोलत आहे.” त्याने देवाची विश्वासूपणे केलेली सेवा बायबलमधील ऐतिहासिक अहवालाचा कायमचा भाग आहे. देवाला स्वीकारयोग्य अर्पणे सतत वाहण्याद्वारे आपण हाबेलाच्या उदाहरणाचे अनुकरण करू या.—इब्री लोकांस ११:४.
[तळटीपा]
a काहींना वाटते, की एदेन बागेचे ठिकाण आधुनिक दिवसांतील टर्कीच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात असावे.
[२३ पानांवरील चौकट/चित्र]
ख्रिस्ती सल्लागारांसाठी एक नमुना
“तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले?” असा प्रश्न विचारून यहोवा काइनाशी दयाळुपणे तर्क करीत होता. त्याने काइनावर बदलण्याची सक्ती केली नाही कारण काइन स्वतंत्र नैतिक प्राणी होता. (पडताळा अनुवाद ३०:१९.) तरीसुद्धा काइनाच्या स्वच्छंदी मार्गाक्रमणाचा परिणाम काय होईल हे यहोवाने त्याला सरळ सरळ सांगितले. त्याने काइनाला ताकीद दिली: “तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुजवर आहे.”—उत्पत्ति ४:६, ७.
इतका कडक सल्ला दिल्यानंतरही यहोवाने काइनाला ‘वाया गेलेला’ असे लेखले नाही. उलट त्याने काइनाला सांगितले, की जर तो बदलला तर त्याला आशीर्वाद मिळतील आणि काइनाने तशी इच्छा दाखवल्यास तो आपल्या समस्येवर मात करु शकेल असा भरवसाही यहोवाने दाखवला. यहोवा म्हणाला: “तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय?” काइनाच्या खुनशी रागाबद्दल यहोवाने त्याला असेही विचारले: ‘तू त्यास दाबात ठेवशील काय?’
आज ख्रिस्ती मंडळीतील वडिलांनी यहोवाच्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे. २ तीमथ्य ४:२ मध्ये लिहिल्याप्रमाणे त्यांनी वेळोवेळी, चूक करणाऱ्याच्या स्वच्छंदी मार्गाक्रमणाचे परिणाम काय होतील हे सडेतोडपणे सांगून “दोष” दाखवले पाहिजेत व “निषेध” केला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी “बोध” देखील केला पाहिजे. पॉरॉकॉलेओ या ग्रीक शब्दाचा अर्थ “उत्तेजन देणे” असा होतो. थिओलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टमेंट म्हणते, “सल्ला हा तीक्ष्ण नसतो, खेकसून दिला जात नाही किंवा टीकात्मकही नसतो. या शब्दाचा आणखी एक अर्थ सांत्वन असा होऊ शकतो ही वस्तुस्थितीच हे दाखवून देते.”
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, असाच आणखी एक ग्रीक शब्द पॉरॉक्लेटोस एखाद्या मदतनीसाला किंवा कायदेशीर बाबीतील एखाद्या न्यायाधिशाला सूचित होऊ शकतो. यास्तव, वडील जेव्हा मुद्याला धरून दोष दाखवतात तेव्हा देखील त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ते, ज्याला सल्ल्याची आवश्यकता आहे त्या व्यक्तीला मदत देणारे आहेत, त्याचे शत्रू नाहीत. यहोवाप्रमाणे वडिलांनी सकारात्मक असले पाहिजे, ज्याला सल्ला दिला जात आहे तो त्याच्या समस्येवर मात करू शकतो असा भरवसा दाखवला पाहिजे.—पडताळा गलतीकर ६:१.
पण, शेवटी मात्र सल्ला अनुसरायचा की नाही हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. (गलतीकर ६:५; फिलिप्पैकर २:१२) काइनाने जसा निर्माणकर्त्याकडून आलेला सल्ला नाकारला तसेच सल्लागारांना दिसून येईल की काही जण त्यांचा सल्ला मानत नाहीत. तरीपण, वडील जेव्हा ख्रिस्ती सल्लागारांसाठी असलेला परिपूर्ण नमुना अर्थात यहोवाचे अनुकरण करतात तेव्हा ते ही खात्री बाळगू शकतात की त्यांनी, त्यांना जे करायचे होते ते केले.