“मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय”
“मीअसे बोललो नसतो तर बरे झाले असते,” असे तुम्ही खेदाने किती वेळा म्हणाला आहात? तथापि, तुम्हाला असेही प्रसंग आठवत असतील जेव्हा तुमचे विचार बोलून दाखवण्यात तुम्ही अपेशी ठरला असाल. पुनर्विचार करताना तुम्हाला वाटले असेल, ‘मी निदान काहीतरी बोलायलाच हवे होते.’
बायबल म्हणते की, “मौन धरण्याचा समय व बोलण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:७) येथेच समस्या उद्भवते, अर्थात केव्हा बोलावे व केव्हा मौन राहावे हे ठरवणे. आपला अपरिपूर्ण मानवी स्वभाव आपल्याला वारंवार अयोग्य क्षणी कृती करण्यास व बोलण्यास भाग पाडतो. (रोमकर ७:१९) आपल्या बेशिस्त जिव्हेवर आपण कशाप्रकारे नियंत्रण ठेवू शकतो?—याकोब ३:२.
जिव्हेला अंकुश लावण्याचे मार्ग
केव्हा बोलावे व केव्हा उगे राहावे हे ठरवण्यास आपल्याला साहाय्य करण्यासाठी, प्रत्येक संभाव्य प्रसंगाला विचारात घेणाऱ्या एका लांबलचक यादीची गरज नाही. याऐवजी, आपण ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वात स्वाभाविकपणे गोवलेल्या गुणांद्वारे मार्गदर्शित होणे अगत्याचे आहे. हे कोणते गुण आहेत?
येशू ख्रिस्ताने स्पष्ट केले की प्रेम हा त्याच्या शिष्यांना प्रेरित करणारा प्रमुख गुण आहे. तो म्हणाला, “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) जसजसे आपण अशा प्रकारचे बंधुप्रेम प्रदर्शित करू तसतसा आपण आपल्या जिव्हेवर अधिक ताबा मिळवू.
एकमेकांशी संबंधित असलेले दोन गुण देखील अत्यंत सहायक ठरतील. यांपैकी एक म्हणजे नम्रता. ‘इतरांना आपणापेक्षा श्रेष्ठ मानण्यास’ नम्रता आपली मदत करते. (फिलिप्पैकर २:३) दुसरा गुण म्हणजे, सौम्यता व ती आपल्याला “सहनशील” राहाण्यास साहाय्य करते. (२ तीमथ्य २:२४, २५) हे गुण कशाप्रकारे कृतीत आणावेत याचे अप्रतिम उदाहरण येशू ख्रिस्त आहे.
आपण दबावाखाली असतो तेव्हा आपल्या जिव्हेवर ताबा राखणे फारच कठीण असल्यामुळे आपण येशूच्या मृत्यूची आदली रात्र, म्हणजेच तो “अति कष्टी” होता अशी वेळ विचारात घेऊ या. (मत्तय २६:३७, ३८) येशूची अशी मानसिक स्थिती होती यात काहीच नवल नव्हते कारण सबंध मानवजातीचे अनंत भवितव्य त्याच्या देवाला विश्वासू राहाण्यावर अवलंबून होते.—रोमकर ५:१९-२१.
निश्चितच, येशूसाठी आपल्या स्वर्गीय पित्यासोबत बोलण्याची ही घटका होती. म्हणून आपल्या शिष्यांपैकी तिघांना जागे राहण्यास सांगून तो प्रार्थना करण्यास निघून गेला. काही वेळाने तो परत आला व ते झोपत असल्याचे त्यास दिसले. यावर तो पेत्रास म्हणाला: “काय! तुमच्याने घटकाभरहि माझ्याबरोबर जागवत नाही?” या प्रेमळ ताडनेसह उद्गारलेले शब्द, येशूला त्यांच्या दुर्बलतेबद्दल असलेली जाणीव प्रदर्शित करतात. तो म्हणाला: “आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे.” नंतर येशू पुन्हा आला तेव्हादेखील त्याला शिष्य झोपेत असल्याचे दिसले. तो त्यांच्यासोबत दयेने बोलला व “जाऊन तिसऱ्यांदा . . . प्रार्थना केली.”—मत्तय २६:३६-४४.
तिसऱ्यांदा शिष्यांना झोपत असल्याचे पाहून येशू कठोरपणे वागला नाही तर त्याऐवजी तो म्हणाला: “अशा घटकेस तुम्ही झोपता व विसावा घेता! पाहा! मनुष्याच्या पुत्राला पापी लोकांच्या हाती धरून दिली जाण्याची घटका आली आहे.” (मत्तय २६:४५, NW) केवळ प्रीतीने ओतप्रोत भरलेले हृदय असलेली व खऱ्या अर्थाने सौम्य व नम्र वृत्तीची व्यक्तीच इतक्या कठीण घटकेला अशा प्रकारे जिव्हेचा वापर करू शकत होती.—मत्तय ११:२९; योहान १३:१.
यानंतर लगेच, येशूला अटक करण्यात आली व त्याची चौकशी करण्यात आली. आपल्या ख्रिस्ती सेवेत कार्य करत असताना देखील विशिष्ट वेळी शांत राहाणेच उत्तम असते हा धडा आपण येथे शिकतो. येशूला कचाटीत पकडण्यासाठी टपून बसलेल्या मुख्य याजकांना सत्य शिकण्याची मुळीच इच्छा नव्हती. म्हणून अशा स्फोटक परिस्थितीत, येशू उगाच राहिला.—पडताळा मत्तय ७:६.
तथापि महायाजकाने, “मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हास सांग,” असे फर्मावले तेव्हा मात्र येशू शांत बसला नाही. (मत्तय २६:६३) येशूला शपथ घालण्यात आल्यामुळे ही बोलण्याची वेळ होती. या कारणास्तव त्याने उत्तर दिले: “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी तुम्हास सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले व आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.”—मत्तय २६:६४.
त्या महत्त्वपूर्ण दिवशी, येशूने आपल्या जिव्हेला पूर्णतः ताब्यात ठेवले. त्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, प्रेम, सौम्यता व नम्रता हे गुण त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वाभाविक अंग होते. आपण दबावाखाली असताना या गुणांचा, आपल्या जिव्हेला ताब्यात ठेवण्यासाठी कसा उपयोग करू शकतो?
रागावलेले असताना जिव्हेला ताब्यात ठेवणे
आपण रागावतो तेव्हा, सहसा आपल्या जिव्हेवरील ताबा सुटतो. उदाहरणार्थ, एकदा पौल व बर्णबा यांत मतभेद उत्पन्न झाला. “बर्णबाची इच्छा होती की, ज्याला मार्कहि म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे; परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले.”—प्रेषितांची कृत्ये १५:३७-३९.
मायकलनेa काही वर्षांपर्यंत बांधकाम प्रकल्पांवर काम केले होते, तो सांगतो: “बांधकामाच्या ठिकाणी एक जण माझ्या चांगल्या परिचयाचा होता व मी त्याचा आदरही करत होतो. पण तो सतत माझ्या कामात दोष दाखवत असे. मला दुखावल्यासारखे वाटे व चीड येई, पण मी माझ्या भावना मनातच ठेवल्या. एके दिवशी मी नुकत्याच पूर्ण केलेल्या कामाविषयी त्याने टीका केली तेव्हा तर कहरच झाला.
“मी माझ्या सर्व कोंडून ठेवलेल्या भावना मोकळ्या केल्या. त्या रागाच्या भरात आमच्या सभोवती असलेल्या लोकांवर याचा किती वाईट प्रभाव पडला असेल याचे मला भानच नव्हते. या घटनेनंतर दिवसभर मला त्याच्यासोबत बोलावेसे वाटेना की त्याला पाहावेसेही वाटेना. आता मला जाणीव होते की मी ती समस्या योग्यप्रकारे हाताळली नाही. मी शांत राहिलो असतो व राग मावळल्यावर बोललो असतो तर फार बरे झाले असते.”
सुदैवाने, ख्रिस्ती प्रेमापोटी या दोघांना आपले मतभेद सोडवण्याची चालना मिळाली. मायकल स्पष्टीकरण देतो: “आमच्या मतांची मनमोकळी घेवाणदेवाण केल्यावर, आम्ही एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे समजू लागलो व आता आम्ही घनिष्ट मित्र आहोत.”
मायकलने शिकलेल्या धड्याप्रमाणे, आपण रागात आहोत असे भासल्यास काही वेळा शांत राहणे सुज्ञपणाचे ठरते. “ज्याची वृत्ति शांत तो समंजस असतो,” असे नीतिसूत्रे १७:२७ म्हणते. समंजसपणा व बंधुप्रेम हे, अविचारीपणे दुखावणारे शब्द बोलण्याच्या अनावर इच्छेवर ताबा मिळवण्यास आपल्याला मदत करतील. आपल्याला दुखावण्यात आले असल्यास आपण समेट करण्याच्या उद्देशाने केवळ संबंधित व्यक्तीसोबत सौम्य व नम्र आत्म्याने बोलू या. परंतु, रागाचा उद्रेक आधीच झालेला असेल तर काय? अशा वेळेस प्रेम आपल्याला आपला अहंकार दडपून नम्रपणे सलोखा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त करील. ही बोलण्याची, नाराजी व्यक्त करण्याची व प्रांजळपणे विचारांची देवाणघेवाण करण्यामार्फत दुखावलेल्या भावनांच्या जखमा भरून काढण्याची वेळ आहे.—मत्तय ५:२३, २४.
मौन हे उत्तर नसते तेव्हा
राग किंवा चीड आल्यामुळे आपण कदाचित आपल्याला राग आणविणाऱ्या व्यक्तीला अबोल्याची वागणूक देऊ. हे अत्यंत घातक ठरू शकते. मरियाb कबूल करते, “आमच्या विवाहाच्या पहिल्या वर्षी, काही वेळा मी माझ्या पतीसोबत कित्येक दिवस बोलत नसे. सहसा हे मोठ्या समस्यांमुळे नव्हे तर लहानसहान तक्रारी मनात साठवल्यामुळे होत असे. मी या सर्व चीड आणणाऱ्या गोष्टींबद्दल इतका विचार करत बसे की त्या एक मोठा पर्वतरूपी अडथळा बनत. शेवटी अशी वेळ येई की मी आणखी सहन करू शकत नसे आणि म्हणून माझा संताप ओसरून जाईपर्यंत मी त्यांच्यासोबत बोलतच नसे.”
मरिया पुढे म्हणते: “बायबलमधील, खासकरून ‘तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये’ या वचनाने मला माझ्या विचारात फेरबदल करण्यात मदत केली. माझ्या पतीने व मी, समस्या वाढू नये म्हणून आमच्यातील दळणवळण अधिक चांगले करण्यासाठी अथक प्रयत्न केले. हे सोपे नव्हते, पण विवाहित जीवनाच्या दहा वर्षांनंतर मला समाधान वाटते की निष्ठुर अबोल्याचे ते काळ आता बरेच विरळ झाले आहेत. तथापि मी कबूल केलेच पाहिजे की मी अद्याप या प्रवृत्तीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहे.”—इफिसकर ४:२६.
मरिया हिला उमगल्याप्रमाणे, दोन व्यक्तींमध्ये तणाव असल्यास दळणवळणात खंड पाडणे हा उपाय नव्हे. अशा परिस्थितीत राग वाढून नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. येशूने म्हटले की आपण ‘सलोखा करण्यास तत्पर’ असावयास हवे. (मत्तय ५:२५) “समयोचित भाषण,” “शांतीच्या प्राप्तीसाठी” आपणास सहायक ठरू शकते.—नीतिसूत्रे २५:११; १ पेत्र ३:११.
तसेच आपल्याला मदतीची गरज असते तेव्हा ते बोलून दाखवणे आवश्यक आहे. आपण एखाद्या आध्यात्मिक समस्येमुळे दुःखात असल्यास त्याचे ओझे इतरांवर टाकण्यास कदाचित आपण मागेपुढे पाहू. परंतु, आपण काही न बोलल्यास समस्या आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. नेमलेल्या ख्रिस्ती वडिलांना आपल्याबद्दल काळजी असते व आपण त्यांना संधी दिल्यास ते आपली मदत करण्यास उत्सुक असतात यात शंकाच नाही. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण बोलले पाहिजे.—याकोब ५:१३-१६.
या सर्वाहून अधिक महत्त्वाचे म्हणजे येशूने केल्याप्रमाणे आपण यहोवाशी नियमितपणे प्रार्थनेद्वारे बोलण्यास हवे. खरोखर आपण आपल्या स्वर्गीय पित्यापुढे “आपले मन मोकळे” करू या.—स्तोत्र ६२:८; पडताळा इब्री लोकांस ५:७.
देवाच्या राज्याबद्दल “बोलण्याचा समय”
ख्रिस्ती सेवा एक ईश्वरी नेमणूक आहे जी शेवट येण्याआधी पूर्ण करावयाची आहे. या कारणास्तव, यहोवाच्या सेवकांनी राज्याची सुवार्ता गाजवावी हे कधी नव्हते इतके अगत्याचे आहे. (मार्क १३:१०) प्रेषितांप्रमाणे, खऱ्या ख्रिश्चनांसाठी ‘जे त्यांनी पाहिले व ऐकले ते न बोलणे हे शक्य नाही.’—प्रेषितांची कृत्ये ४:२०.
अर्थात, सर्वांनाच सुवार्ता ऐकण्याची इच्छा नसते. येशूने आपल्या शिष्यांना प्रचार करण्यास पाठविले तेव्हा त्यांस “कोण योग्य आहे हे शोधून काढा” असा सल्ला दिला. यहोवा कोणालाही आपली उपासना करण्यास भाग पाडत नसल्यामुळे, हेकेखोरपणे राज्य संदेशाचा अव्हेर करणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत आपण अडेल होऊन बोलत राहू नये. (मत्तय १०:११-१४) तथापि, “सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले” आहेत अशा लोकांसोबत यहोवाच्या राजपदाविषयी बोलण्यास आपल्याला आनंद होतो.—प्रेषितांची कृत्ये १३:४८; स्तोत्र १४५:१०-१३.
अविचारीपणे बोलण्याच्या अथवा तणावपूर्ण अबोला धरण्याच्या आपल्या अपरिपूर्ण प्रवृत्तीवर नियंत्रण राखण्यासाठी प्रेम, सौम्यता व नम्रता हे गुण आपली मदत करू शकतात. जसजसे आपण हे गुण आपल्यात विकसित करू तसतसे आपण बोलण्याचा योग्य समय व अयोग्य समय यांत फरक करण्यास अधिक प्रवीण होऊ.
[तळटीपा]
a त्याचे खरे नाव नाही.
b तिचे खरे नाव नाही.
[२३ पानांवरील चित्रं]
चांगल्या दळणवळणाने समस्या सोडवता येतात