वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ४/१५ पृ. १६-२१
  • खऱ्‍या उपासनेला देवाचा आशीर्वाद का प्राप्त होतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खऱ्‍या उपासनेला देवाचा आशीर्वाद का प्राप्त होतो
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खऱ्‍या धर्माने कोणते फळ उत्पन्‍न करावे?
  • प्रीतीचा धर्म, द्वेषाचा नव्हे
  • देव वर्तन आणि शिकवणींच्या शुद्धतेवर आशीर्वाद देतो
  • “सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील”
  • विभिन्‍न असलेले नाव
  • देवाला मान्य असलेली उपासना
    बायबल नेमके काय शिकवते?
  • खरा धर्म ओळखणे
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • तुमचा धर्म देवास खरोखरी संतुष्ट करतो का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८६
  • देवाची उपासना करण्याचा योग्य मार्ग
    बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ४/१५ पृ. १६-२१

खऱ्‍या उपासनेला देवाचा आशीर्वाद का प्राप्त होतो

“हालेलूया! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत; कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत.”—प्रकटीकरण १९:१, २.

१. मोठ्या बाबेलचा नाश कशा प्रकारे करण्यात येईल?

“मोठी बाबेल” देवाच्या दृष्टीत पडली आहे व लवकरच विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. बायबल भविष्यवाणी सूचित करते, की ही जागतिक धार्मिक वेश्‍या लवकरच तिच्या राजकीय जारांच्या हातून न्यायदंड भोगणार आहे; तिचा नाश अचानक आणि जलदरीतीने होईल. “नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला आणि तो समुद्रांत भिरकावून म्हटले: ‘अशीच ती मोठी नगरी बाबेल झपाट्याने टाकली जाईल व ह्‍यापुढे कधीहि सापडणार नाही,’” हे भविष्यसूचक शब्द येशूने योहानाला दिलेल्या प्रकटीकरणात होते.—प्रकटीकरण १८:२, २१.

२. बॅबिलोनच्या नाशाबद्दल यहोवाचे सेवक कशी प्रतिक्रिया दाखवतील?

२ मोठ्या बाबेलच्या नाशाबद्दल सैतानाच्या जगाचे काही घटक तिच्यासाठी विलाप करतील; पण देवाचे स्वर्गीय किंवा पार्थिव सेवक निश्‍चितच विलाप करणार नाहीत. ते आनंदाने देवासमोर गजर करतील: “हालेलूया! तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत. कारण त्याचे न्यायनिर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत; ज्या मोठ्या कलावंतिणीने आपल्या जारकर्माने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा न्यायनिवाडा त्याने केला आहे, आणि आपल्या दासांच्या रक्‍ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.”—प्रकटीकरण १८:९, १०; १९:१, २.

खऱ्‍या धर्माने कोणते फळ उत्पन्‍न करावे?

३. कोणते प्रश्‍न उत्तरांची अपेक्षा करतात?

३ पृथ्वीवरून खोट्या धर्मांना काढून टाकण्यात येणार आहे तर कोणत्या प्रकारची उपासना पृथ्वीवर राहील? सैतानाच्या खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याच्या होणाऱ्‍या नाशापासून कोणता धार्मिक गट बचावेल हे आपण आज कसे ठरवू शकतो? या गटाने कोणते धार्मिक फळ उत्पन्‍न केले पाहिजे? यहोवाच्या खऱ्‍या उपासनेला ओळखण्यासाठी किमान दहा अभिलक्षणे आहेत.—मलाखी ३:१८; मत्तय १३:४३.

४. खऱ्‍या उपासनेसाठी पहिली अपेक्षा कोणती, व याबाबतीत येशूने उत्तम उदाहरण कसे मांडले?

४ सर्वात प्रथम, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी येशू ज्याच्यासाठी मरण पावला त्या सार्वभौमत्वाला—त्याच्या पित्याच्या सार्वभौमत्वाला उंचावले पाहिजे. येशूने, कोणत्याही राजकीय, जातीय, वांशिक किंवा सामाजिक उद्देशासाठी त्याचे जीवन देऊ केले नाही. सर्व यहुदी राजकीय अथवा क्रांतीकारक आकांक्षांआधी त्याने आपल्या पित्याच्या राज्याला प्रथम स्थान दिले. सैतान जेव्हा त्याला जगीक सत्ता देत होता तेव्हा त्याने अशा शब्दांत त्याला उत्तर दिले: “अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्‍वर [यहोवा, NW] तुझा देव ह्‍याला नमन कर, व केवळ त्याचीच उपासना कर.’” यहोवा संपूर्ण पृथ्वीचा खरा सार्वभौम आहे हे त्याला हिब्रू शास्त्रवचनांमधून कळाले. या जगाच्या राजकीय व्यवस्थांऐवजी कोणता धार्मिक गट यहोवाच्या प्रभुत्वाला निश्‍चितार्थाने पाठबळ देत आहे?—मत्तय ४:१०; स्तोत्र ८३:१८.

५. (अ) खऱ्‍या उपासकांनी देवाच्या नावाला कसे लेखले पाहिजे? (ब) यहोवाचे साक्षीदार त्या नावाचा आदर करतात हे कशावरून दिसून येते?

५ खऱ्‍या उपासनेने देवाच्या नावाचा महिमा केला पाहिजे आणि त्यास पवित्र केले पाहिजे, ही दुसरी अपेक्षा होय. सर्वसमर्थ देवाने त्याच्या इस्राएल लोकांना स्वतःचे यहोवा (काही बायबलमध्ये याव्हे असे अनुवादित करण्यात आलेले) हे नाव प्रकट केले आणि हिब्रू शास्त्रवचनांमध्ये त्याचा हजारो वेळा उल्लेख केलेला आहे. त्याही आधी, आदाम, हव्वा आणि इतरांनी त्या नावाचा नेहमीच आदर केला नसला तरी देखील त्यांना ते नाव ठाऊक होते. (उत्पत्ति ४:१; ९:२६; २२:१४; निर्गम ६:२) ख्रिस्ती धर्मजगताच्या आणि यहुदी भाषांतरकारांनी त्यांच्या बायबलमधून बहुतेक वेळा ईश्‍वरी नाव काढून टाकले असले तरी, यहोवाच्या साक्षीदारांनी पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर (इंग्रजी), यामध्ये त्या नावाला त्याचे यथायोग्य स्थान आणि त्याचा आदर दिला आहे. आरंभीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे ते त्या नावाचा आदर करतात. याकोबाने त्याच्याविषयी साक्ष दिली: “परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून देवाने त्यांची भेट कशी घेतली हे शिमोनाने सांगितले आहे; आणि ह्‍याच्याशी संदेष्ट्यांच्या उक्‍तीचाहि मेळ बसतो . . . ‘ह्‍यासाठी की शेष राहिलेल्या माणसांनी व ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा [यहोवाचा] शोध करावा.’” (तिरपे वळण आमचे.)—प्रेषितांची कृत्ये १५:१४-१७; आमोस ९:११, १२.

६. (अ) खऱ्‍या उपासनेसाठी तिसरी अपेक्षा कोणती? (ब) येशूने व दानीएलाने राज्य शासनावर कशा प्रकारे जोर दिला? (लूक १७:२०, २१)

६ खऱ्‍या उपासनेसाठी तिसरी अपेक्षा, प्रभुत्वाबद्दल मानवजातीच्या समस्यांवर एकमात्र कायदेशीर आणि कार्यक्षम उपाय म्हणून देवाच्या राज्याला उंचावणे ही आहे. येशूने स्पष्टतः त्याच्या अनुयायांना ते राज्य यावे, देवाच्या राज्याधिकाराने पृथ्वीवरील ताबा आपल्या हाती घ्यावा अशी प्रार्थना करण्यास शिकवले. शेवटल्या दिवसांबद्दल दानीएल अशी भविष्यवाणी करण्यास प्रेरित झाला: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; . . . ते या सर्व [जगीक, राजकीय] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.” या राज्याला आपला अखंड पाठिंबा आहे, असे २० व्या शतकात आपल्या कृत्यांनी कोणी दाखवले—मोठ्या बाबेलच्या धर्मांनी की यहोवाच्या साक्षीदारांनी?—दानीएल २:४४; मत्तय ६:१०; २४:१४.

७. खरे उपासक बायबलकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात?

७ देवाची स्वीकृती प्राप्त करण्यासाठी चौथी अपेक्षा म्हणजे, देवाच्या खऱ्‍या सेवकांनी बायबल, देवाचे प्रेरित वचन आहे असे मान्य केले पाहिजे. यास्तव ते उच्च समीक्षाचे बळी होणार नाहीत, कारण उच्च समीक्षा, बायबल हे सर्व चुकांचा समावेश असलेले केवळ एक मानवी साहित्यिक ग्रंथ आहे, असे म्हणून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करते. बायबल देवाचे प्रेरित वचन आहे असा यहोवाचे साक्षीदार विश्‍वास बाळगतात. पौलाने देखील असाच विश्‍वास बाळगून तीमथ्याला लिहिले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे, ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”a यास्तव, यहोवाचे साक्षीदार, बायबलला त्यांचे मार्गदर्शक, त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी नियमपुस्तिका आणि भवितव्यासाठी आशेचा उगम म्हणून स्वीकारतात.—२ तीमथ्य ३:१६, १७.

प्रीतीचा धर्म, द्वेषाचा नव्हे

८. खऱ्‍या उपासनेसाठी पाचवी अपेक्षा कोणती?

८ येशूने त्याचे खरे अनुयायी वेगळे आहेत हे कसे दाखवले? त्याचे उत्तर आपल्याला खऱ्‍या उपासनेच्या पाचव्या महत्त्वपूर्ण ओळख चिन्हाद्वारे मिळते. येशू म्हणाला: “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हावर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहा.” (तिरपे वळण आमचे.) (योहान १३:३४, ३५) येशूने कशा प्रकारे त्याची प्रीती दाखवली? स्वतःचे जीवन खंडणी बलिदान म्हणून अर्पण करण्याद्वारे. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) खऱ्‍या ख्रिश्‍चनांसाठी खऱ्‍या प्रीतीचा हा गुण महत्त्वपूर्ण का आहे? योहानाने त्याचे वर्णन दिले: “प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीति करावी, कारण प्रीति देवापासून आहे; . . . जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे.“—१ योहान ४:७, ८.

९. कोणत्या लोकांनी खरी प्रीती प्रदर्शित केली, व कशी?

९ जातीय, राष्ट्रीय आणि वांशिक द्वेष असतानाही आपल्या काळात अशा प्रकारची प्रीती कोणी प्रदर्शित केली आहे? कोण असे आहेत जे मृत्यूपर्यंत पराकाष्ठेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या प्रीतीचा विजय झाला? ते, १९९४ मध्ये रवांडा येथे घडलेल्या जातीय संहारासाठी काही प्रमाणात जबाबदार असलेले सर्वमान्य कॅथलिक पाळक आणि जोगिणी आहेत असे आपण म्हणू शकतो का? ते, बाल्कन्समध्ये चाललेल्या यादवी युद्धात “जातीय शुद्धीकरणामध्ये” आणि इतर अख्रिस्ती कृत्यांमध्ये भाग घेतलेल्या सर्बियाचे कर्मठवादी किंवा क्रोएशियाचे कॅथलिक आहेत का? की ते, उत्तरेकडील आयर्लंडमध्ये गेल्या काही दशकांमध्ये कलुषितपणा आणि द्वेष भडकवणारे कॅथलिक वा प्रोटेस्टंट पाळक आहेत? निश्‍चितच, यहोवाच्या साक्षीदारांवर अशा प्रकारच्या कोणत्याही झगड्यांमध्ये भाग घेतल्याचा आरोप करता येणार नाही. त्यांच्या ख्रिस्ती प्रीतीचा विश्‍वासघात करण्याऐवजी त्यांनी कारागृहांमध्ये आणि छळछावण्यांमध्ये मृत्यूपर्यंत सर्व काही सहन केले आहे.—योहान १५:१७.

१०. खरे ख्रिस्ती तटस्थ का राहतात?

१० या जगाच्या राजकीय बाबींविषयी तटस्थता ही देवाला स्वीकारयोग्य उपासना देण्यासाठी सहावी अपेक्षा आहे. ख्रिश्‍चनांनी राजकारणात तटस्थ का असले पाहिजे? पौल, याकोब आणि योहान आपल्याला त्या भूमिकेसाठी ठोस कारण देतात. प्रेषित पौलाने लिहिले, की सैतान ‘ह्‍या युगाचा दैवत’ आहे जो विश्‍वास न ठेवणाऱ्‍या लोकांची मने शक्य त्या सर्व मार्गांनी, ज्यामध्ये विभाजक राजकारणाचा समावेश होतो, आंधळी करत आहे. शिष्य याकोबाने म्हटले, की “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे” आणि प्रेषित योहान म्हणाला, की “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” यास्तव, एक खरा ख्रिस्ती, सैतानाच्या भ्रष्ट जगाचे राजकारण आणि सत्ता यांत गोवून देवाला देणाऱ्‍या आपल्या भक्‍तीबाबत हातमिळवणी करू शकत नाही.—२ करिंथकर ४:४; याकोब ४:४; १ योहान ५:१९.

११. (अ) ख्रिस्ती युद्धाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात? (ब) या भूमिकेसाठी कोणता शास्त्रवचनीय आधार आहे? (२ करिंथकर १०:३-५)

११ मागील दोन अपेक्षांना लक्षात ठेवल्यावर सातवी अपेक्षा स्पष्ट होते व ती म्हणजे, खऱ्‍या ख्रिस्ती उपासकांनी युद्धांत भाग घेऊ नये. खरा धर्म, प्रीतीवर आधारित असलेले जागतिक बंधुत्व असल्यामुळे, कोणतीही गोष्ट “जगातील . . . बंधुवर्गाला” विभाजित करू शकत किंवा उलथून पाडू शकत नाही. येशूने द्वेष नव्हे तर प्रीती करण्यास शिकवले; युद्ध नव्हे तर शांती राखण्यास शिकवले. (१ पेत्र ५:९; मत्तय २६:५१, ५२) काईनाला हाबेलाचा खून करण्यास प्रवृत्त करणाऱ्‍या त्या ‘दुष्ट’ सैतानाचे, मानवजातीमध्ये द्वेषाचे बीज पेरणे व राजकारण, धर्म आणि वांशिक विभाजने यांच्या आधारावर झगडे आणि रक्‍तपात चिथावणे चालूच आहे. खरे ख्रिस्ती कोणत्याही किंमतीवर ‘युद्धकला शिकत नाहीत.’ लाक्षणिकपणे त्यांनी केव्हाच “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ . . . आपल्या भाल्याच्या कोयत्या” केल्या आहेत. ते देवाच्या आत्म्याची शांतीकारक फळे उत्पन्‍न करतात.—१ योहान ३:१०-१२; यशया २:२-४; गलतीकर ५:२२, २३.

देव वर्तन आणि शिकवणींच्या शुद्धतेवर आशीर्वाद देतो

१२. (अ) आठवी अपेक्षा कोणती आहे, पण तुम्ही कोणती धार्मिक विभाजने उद्धृत करू शकता? (ब) पौलाने कशा प्रकारे या आठव्या अपेक्षेवर जोर दिला?

१२ ख्रिस्ती ऐक्य खऱ्‍या उपासनेची आठवी अपेक्षा आहे. परंतु, ख्रिस्ती धर्मजगताच्या विभाजक धर्मांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत केली नाही. अनेक तथाकथित प्रमुख पंथ, लहान लहान विविध संप्रदायांमध्ये विभाजित झाले आहेत व त्याचा परिणाम गोंधळच गोंधळ आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेतील बॅप्टिस्ट धर्मच पहा. या धर्माचे नॉर्दन बॅप्टिस्ट (अमेरिकेतील अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चेस) आणि सदन बॅप्टिस्ट (दक्षिण बॅप्टिस्ट सभा), तसेच धार्मिक गोष्टींतील मताभिन्‍नत्वामुळे आणखी डझनभर बॅप्टिस्ट गट निर्माण झाले आहेत. (वर्ल्ड ख्रिश्‍चन एन्सायक्लोपिडिआ, पृष्ठ ७१४) शिकवणींमधील फरकामुळे किंवा चर्च सरकारामुळे अनेक विभाजने (जसे की, प्रिसबिटेरियन, एपिस्कोपलियन, कॉन्ग्रीगेशनल) तयार झाली आहेत. ख्रिस्ती धर्मजगतातील विभाजने, ख्रिस्ती धर्मजगताच्या बाहेरील धर्मांच्या समान आहेत—मग तो बौद्ध धर्म, मुसलमान धर्म किंवा हिंदू धर्म असो. प्रेषित पौलाने आरंभीच्या ख्रिश्‍चनांना कोणता सल्ला दिला? “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या नावाने मी तुम्हास विनंती करितो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.”—१ करिंथकर १:१०; २ करिंथकर १३:११.

१३, १४. (अ) “पवित्र व्हा” याचा अर्थ काय? (ब) खऱ्‍या उपासनेला कशा प्रकारे शुद्ध राखले जाते?

१३ देव-स्वीकृत धर्माची नववी अपेक्षा कोणती आहे? लेवीय ११:४५ मध्ये एक बायबल तत्त्व व्यक्‍त करण्यात आले आहे: “मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीहि पवित्र व्हा.” प्रेषित पेत्राने पुन्हा एकदा या अपेक्षेचा असे लिहिताना उल्लेख केला की, “तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीहि सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा.” (तिरपे वळण आमचे.)—१ पेत्र १:१५.

१४ पवित्र असण्याच्या या गरजेवरून काय सूचित होते? की यहोवाच्या उपासकांनी आध्यात्मिकरीत्या आणि नैतिकरीत्या शुद्ध असले पाहिजे. (२ पेत्र ३:१४) आपल्या वर्तनाद्वारे ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाला तुच्छ लेखणाऱ्‍या कोणाही अपश्‍चात्तापी व्यक्‍तीसाठी, जाणूनबुजून पाप करणाऱ्‍यांसाठी येथे थारा नाही. (इब्री लोकांस ६:४-६) ख्रिस्ती मंडळी शुद्ध आणि पवित्र राखली जावी अशी यहोवा अपेक्षा करतो. हे कसे साध्य केले जाते? अंशतः, मंडळीला कलंकित करणाऱ्‍यांना, बहिष्कृतीकरणाच्या न्यायिक प्रक्रियेद्वारे हे साध्य केले जाते.—१ करिंथकर ५:९-१३.

१५, १६. अनेक ख्रिश्‍चनांनी आपल्या जीवनांमध्ये कोणते बदल केले आहेत?

१५ ख्रिस्ती सत्य जाणण्याआधी पुष्कळ जण दुर्व्यसनी, सुखापेक्षक कर्मवादी, आत्म-केंद्रित जीवन जगत होते. पण ख्रिस्ताच्या वचनाने त्यांच्यात परिवर्तन केले व आता त्यांना त्यांच्या पापांची क्षमा प्राप्त झाली आहे. “अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका; जारकर्मी, मूर्तिपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुषसंभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त हरण करणारे ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही; आणि तुम्हांपैकी कित्येक तसे होते. तरी तुम्ही . . . धुतलेले, . . . झाला,” असे लिहिण्याद्वारे पौलाने अगदी ठामपणे व्यक्‍त केले. (तिरपे वळण आमचे.)—१ करिंथकर ६:९-११.

१६ आपल्या अशास्त्रीय वर्तनाचा पश्‍चात्ताप करून मागे वळणाऱ्‍या व ख्रिस्त आणि त्याच्या शिकवणींचे खरे अनुयायी होणाऱ्‍या सर्वांचा यहोवा स्वीकार करतो हे स्पष्ट आहे. असे लोक खरोखरच स्वतःप्रमाणेच त्यांच्या शेजाऱ्‍यावर प्रेम करतात व हे ते अनेक मार्गांनी दाखवून देतात जसे की, जे कोणी कान देऊन ऐकतात अशांना जीवनाचा संदेश सांगण्याच्या सेवा कार्यामध्ये ते चिकाटीने भाग घेतात.—२ तीमथ्य ४:५.

“सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील”

१७. खऱ्‍या उपासनेसाठी दहावी अपेक्षा कोणती? उदाहरणे द्या.

१७ यहोवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करणाऱ्‍यांकडून तो दहावी अपेक्षा करतो व ती आहे—शुद्ध शिकवण. (योहान ४:२३, २४) येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला: “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्‍त करील.” (योहान ८:३२) बायबलविषयीचे सत्य आपल्याला, अमर जीव, नरकाग्नी आणि मरणोत्तर प्रायश्‍चित्त भूमी यांसारख्या देवाचा अनादर करणाऱ्‍या शिकवणींपासून मुक्‍त करते. (उपदेशक ९:५, ६, १०; यहेज्केल १८:४, २०) ते आपल्याला “परम पवित्र त्रैक्य” या ख्रिस्ती धर्मजगताच्या बॅबिलोनी रहस्यापासून मुक्‍त करते. (अनुवाद ४:३५; ६:४; १ करिंथकर १५:२७, २८) बायबल सत्यांना आज्ञाधारक राहिल्यामुळे लोक प्रेमळ, काळजी वाहणारे, नम्र व दयाशील होतात. खऱ्‍या ख्रिस्ती धर्माने टोमस डी टॉरक्यूमाडा सारख्या खुनशी, असहिष्णू धर्मविचारिणी सभेला किंवा धर्मयुद्ध करणाऱ्‍या पोपच्या प्रवर्तकांप्रमाणे द्वेषपूर्ण युद्धखोरांना कधीच पोसलेले नाही. पण, मोठ्या बाबेलने अशा प्रकारचे फळ संपूर्ण इतिहासभरात, निम्रोदाच्या काळापासून आत्तापर्यंत तरी उत्पन्‍न केले आहे.—उत्पत्ति १०:८, ९.

विभिन्‍न असलेले नाव

१८. (अ) खऱ्‍या उपासनेसाठी असलेल्या दहा अपेक्षा कोण पूर्ण करतात व कसे? (ब) आपल्या समोर असलेला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण व्यक्‍तिगतपणे काय केले पाहिजे?

१८ खऱ्‍या उपासनेच्या या दहा अपेक्षा आज खरोखरच कोण पूर्ण करीत आहेत? सत्व राखणारे व शांतीकारक लोक म्हणून ख्याती मिळवलेले व प्रसिद्धी मिळालेले कोण आहेत? संपूर्ण पृथ्वीवर यहोवाचे साक्षीदार, ‘जगाचे भाग नसल्याचे’ ओळखले जातात. (योहान १५:१९; १७:१४, १६; १८:३६) येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे त्याच्या पित्याचा विश्‍वासू साक्षीदार होता त्याचप्रमाणे यहोवाच्या लोकांना त्याचे नाव धारण करण्याचा व त्याचे साक्षीदार होण्याचा सन्मान देण्यात आला आहे. ते पवित्र नाव ज्याचे प्रतिनिधीत्व करते त्यानुसार जीवन जगण्याची आपली जबाबदारी आहे ह्‍या जाणीवेने आपण ते नाव धारण करतो. त्याचे साक्षीदार ह्‍या नात्याने, आपल्यासमोर केवढी भव्य आशा आहे! संयुक्‍त, आज्ञाधारक मानवी कुटुंबाचा भाग होऊन पृथ्वीवरील पुनर्स्थापित परादीसमध्ये विश्‍वाच्या सार्वभौम राजाची उपासना करण्याची आशा आपल्यासमोर आहे. अशा प्रकारचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी, आपण खऱ्‍या उपासनेच्या बाजूने आपली ओळख देत राहू या व यहोवाचे “न्यायनिर्बंध सत्याचे व नीतीचे” असल्यामुळे त्याचे साक्षीदार हे नाव गर्वाने धारण करू या!—प्रकटीकरण १९:२; यशया ४३:१०-१२; यहेज्केल ३:११.

[तळटीपा]

a बायबल अनुवाद स्वतः ईश्‍वर प्रेरित नाहीत. स्वभावतः, बायबल ज्या मूळ भाषांमध्ये लिहिले होते त्यांना समजण्यामध्ये अनुवाद फरक दाखवू शकतात.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ यहोवाचे साक्षीदार मोठ्या बाबेलच्या नाशाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात?

◻ खऱ्‍या उपासनेसाठी कोणत्या प्रमुख अपेक्षा आहेत?

◻ सत्य तुम्हाला बंधमुक्‍त कसे करते?

◻ यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला कोणता बहुमान मिळालेला आहे?

[१७ पानांवरील चित्रं]

यहोवाचे साक्षीदार देव राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत आहेत नी शिकवत आहेत

[१८ पानांवरील चित्रं]

खरे ख्रिस्ती नेहमीच जगिक राजकारण आणि युद्धांच्या बाबतीत तटस्थ राहिले आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा