भवितव्यात सुवार्ता!
व्यक्तिगत स्वरूपाची दुःखद वार्ता मिळते तेव्हा प्रत्येक वेळी आपण सर्वच दुःखी होतो. उलटपक्षी, आपल्याला अथवा आपल्या प्रियजनांना सुवार्ता—आनंदाची बातमी मिळते, तेव्हा आपण उल्लसित होतो. परंतु, दुःखद वार्ता स्वतःसंबंधी नसून इतरांसंबंधी असते तेव्हा सहसा लोकांच्या मनात कुतूहल निर्माण होते; काहींना तर इतरांच्या दुर्दैवांबद्दल जाणून अतिशय आनंद देखील होतो. यावरून, दुःखद वार्तांचा इतका जास्त खप का होतो याची काहीशी कल्पना येऊ शकेल!
दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या सुरवातीच्या काळादरम्यान, संकटाविषयी काही लोकांचे विकृत कुतूहल जिवंतपणे प्रत्ययास आले. ग्राफ श्पे नामक १०,०००-टन क्षमता असलेली युद्धनौका, १९३९ मध्ये जर्मनीच्या आरमार ताफ्याचे भूषण होती. या युद्धनौकेने, दक्षिण अटलांटिक व हिंद महासागरांतील दोस्त राष्ट्रांच्या व्यापार जहाजांच्या क्षेत्रांत अनेक आठवडे धुमाकूळ घातला होता. शेवटी, तीन वेगवान ब्रिटिश युद्धनौकांनी ग्राफ श्पे चा शोध लावून तिच्यावर हल्ला केला ज्यामुळे जिवित हानी झाली व नाईलाजास्तव तिला दुरुस्तीसाठी मॉन्टविडिओ या उरुग्वेन बंदरावर कसेबसे यावे लागले. उरुग्वेन सरकारने स्थानबद्ध करण्याच्या धमकीवर, या युद्धनौकेला ताबडतोब समुद्रात परत जाण्याचा हुकूम दिला. परिणामस्वरूप, एक झुंझार व काहीसे एकपक्षी युद्ध अटळ आहे असे भासले.
याची खबर मिळताच, अमेरिकेतील काही धनाढ्य उद्योगपतींनी, हे दारुण युद्ध पाहण्यास उरुग्वेला जाण्यासाठी दरडोई $२,५०० या किंमतीवर एक विमान भाड्याने घेतले. परंतु त्यांचा विरस झाला कारण ते युद्ध घडलेच नाही. अडॉल्फ हिटलर यांनी ग्राफ श्पे नौकेस बुडवून टाकण्याचे आदेश दिले. समुद्रातील भीषण युद्धाचे भयनाट्य पाहायला मिळेल या आशेने किनाऱ्यावर गर्दी केलेल्या हजारो दर्शकांना त्याऐवजी, ग्राफ श्पे नौकेवरील तिच्या स्वतःच्याच लोकांद्वारे तिला समुद्रतळाशी बुडविणारा एक कर्कश विस्फोट ऐकायला व पाहायला मिळाला. नौकेच्या कप्तानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.
काही लोकांत हा भयंकर विकृत अंश असला तरीसुद्धा, बव्हंशी लोक आपल्याला दुःखद वार्तांपेक्षा सुवार्ताच हव्याहव्याशा वाटतात हे कबूल करतील. तुम्हालासुद्धा तसे वाटत नाही का? तर मग, इतिहासात इतक्या अधिक दुःखद वार्ता व इतक्या कमी सुवार्ता का म्हणून अभिलिखित केल्या आहेत? या परिस्थितीला कधी पालटणे शक्य आहे का?
सर्व दुःखद वार्तांची कारणे
बायबल आपल्याला अशा काळाविषयी सांगते ज्या वेळेस केवळ सुवार्ता अस्तित्वात होत्या. दुःखद वार्ता अज्ञात होत्या व कधीच ऐकण्यात आल्या नव्हत्या. यहोवा देवाने त्याची निर्मिती कार्ये पूर्ण केली तेव्हा मानव व पशूपक्ष्यांच्या उपभोगासाठी पृथ्वी तयार होती. उत्पत्तीमधील अहवाल आपल्याला सांगतो: “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्पत्ति १:३१.
दुःखद वार्तांचा अभाव, मानवाच्या निर्मितीनंतर फार काळ टिकला नाही. आदाम व हवेला मुले होण्याआधीच, देवाच्या व त्याने केलेल्या चांगल्या गोष्टींच्या सुव्यवस्थित जागतिक तरतुदीविरुद्ध बंड करण्यात आल्याच्या दुःखद वार्तेचे वृत्त देण्यात आले. एका उच्चकोटीतील आत्मिक पुत्राने, त्याच्या भरवसालायक हुद्याशी विश्वासघात केला व आपला विद्रोही, विश्वासघातकी मार्ग अवलंबण्यासाठी पहिल्या मानवी दांपत्याला प्रेरित करण्यात तो यशस्वी झाला.—उत्पत्ति ३:१-६.
त्याच वेळेस मानवजातीने अनुभवलेल्या दुःखद वार्तांच्या विपुलतेची सुरवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत, जगव्याप्त दुःखद वार्तांमध्ये कपट, फसवेगिरी, खोटेपणा, असत्ये व अर्धसत्ये इतक्या ठळकपणे सादर करण्यात आली यात काहीच नवल नाही. येशू ख्रिस्ताने थेटपणे दियाबल सैतानावर दुःखद वार्तांचा उत्पन्नकर्ता असल्याचा दोष लावला; त्याने त्याच्या काळातील धार्मिक पुढाऱ्यांना सांगितले: “तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यात टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.”—योहान ८:४४.
लोकसंख्या वाढत गेली, तसे दुःखद वार्तांचे प्रमाणसुद्धा वाढत गेले. अर्थात, आनंद व सौख्याचे अवसरच नव्हते असा याचा अर्थ होत नाही; कारण जीवनात आनंदास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक गोष्टी होत्या. तरीसुद्धा, आजपर्यंत मानवजातीच्या प्रत्येक पिढीवर संकट व दुःखाचे सावट पसरलेले स्पष्टपणे आढळले आहे.
या दुःखद परिस्थितीचे आणखी एक मूलभूत कारण आहे. ते म्हणजे अपराध व संकटांकडे असलेला आपला जन्मजात कल. यहोवा स्वतः दुःखद वार्तांचे नेमके अपरिहार्य कारण दाखवताना म्हणतो: “मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात.”—उत्पत्ति ८:२१.
दुःखद वार्ता तीव्रतर होतात ते का?
तथापि, या २० व्या शतकात दुःखद वार्ता तीव्रतर का झाल्या आहेत यामागे कारण आहे. हे कारण बायबलमध्ये स्पष्टपणे विदित केले आहे जे असे पूर्वभाकीत करते, की २० व्या शतकात मानवजात, ‘शेवटला काळ’ किंवा ‘अंतसमय’ म्हटलेल्या एका विशेष काळात प्रवेश करील. (२ तीमथ्य ३:१; दानीएल १२:४) बायबल भविष्यवाद व बायबलचा कालक्रम, १९१४ मध्ये सुरू झालेल्या या ‘अंतिम काळाची’ ओळख करून देतात. याबद्दल तपशीलवार शास्त्रवचनीय पुराव्यासाठी, कृपया वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील अध्याय ११ पाहा.
पृथ्वीवरील दुःखद वार्तांना आपोआप तीव्रतर करणाऱ्या घटनेने शेवटले दिवस सुरू होणार होते. ती कोणती घटना होती? ती म्हणजे, दियाबल सैतान व त्याच्या दुरात्मिक सैन्याला स्वर्गातून खाली टाकून देण्याची घटना होती. दुःखद वार्तांच्या या अपरिहार्य वाढीचे स्पष्टीकृत वर्णन तुम्हाला प्रकटीकरण १२:९, १२ या वचनांत वाचता येईल, ते म्हणते: “मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले. . . . पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.”
तर मग, शेवटले दिवस त्यांच्या समाप्तीस येईपर्यंत राहिलेल्या काळात, दुःखद वार्ता कायम राहतील व त्यांच्या प्रमाणात तसेच तीव्रतेत वाढ होईल याची देखील आपण अपेक्षा करू शकतो.
हे असेच राहणार नाही
सुदैवाने, पृथ्वीच्या रहिवाशांसाठी, आज सर्वत्र फैलावलेल्या दुःखद वार्तांच्या पीडेस कारणीभूत ठरणारी दयनीय अवस्था नेहमीच अस्तित्वात राहणार नाही. खरे तर आपण खात्रीने म्हणू शकतो, की या सततच्या दुःखद वार्तांचे मोजकेच दिवस राहिलेले आहेत. वस्तुस्थिती वेगळी भासत असली तरीसुद्धा, परिस्थिती निरुपाय नाही. सर्व दुःखद वार्तांचा अंत समीप आहे व तो देवाच्या नियोजित वेळी निश्चितच येईल.
आपण याची खात्री बाळगू शकतो कारण भविष्यवादाप्रमाणे, देव दुःखद वार्तांच्या सर्व कारणांचा विनाश व त्यांचे निवारण करील तेव्हा शेवटले दिवस त्यांच्या कळसास किंवा अंतास पोहंचतील. आपल्या अपराधी मार्गातून परत फिरून परिवर्तन करण्यास नकार देतात, अशा संघर्षास वाव देणाऱ्या दुष्ट मानवांना तो नाहीसे करील. हे सरतेशेवटी, सामान्यपणे हर्मगिदोनाची लढाई म्हणण्यात येणाऱ्या सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धात परिणीत होईल. (प्रकटीकरण १६:१६) यानंतर लगेच, दियाबल सैतान व त्याच्या दुरात्मिक सैन्यांच्या समूहास निष्क्रिय करण्यात येईल. प्रकटीकरण २०:१-३ येथे सर्व दुःखद वार्तांचा उत्पन्नकर्ता सैतान यास बंदिस्त करण्याचे असे वर्णन दिले आहे: “नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्यास धरले, आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले; आणि ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांस आणखी ठकवू नये म्हणून वरून बंद करून त्यावर शिक्का मारला.”
या नाट्यमय घटनांच्या पाठोपाठ, पृथ्वी व तिच्या रहिवाशांकरता अभूतपूर्व सुवार्तांचा काळ येईल. या रहिवाशांमध्ये, हर्मगिदोनाच्या अंतिम लढाईतून बचावलेले व कबरांमध्ये मृत्यूच्या निद्रावस्थेतून पुनरुत्थित होणारे लक्षावधी लोक समाविष्ट असतील. ही सर्वश्रेष्ठ सुवार्ता बायबलच्या शेवटल्या पुस्तकात अशा प्रकारे वर्णिलेली आहे: “देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.
तुम्ही त्या आनंदी काळाची कल्पना करू शकता का? ते खरोखर एक उज्ज्वल भविष्य असेल जेथे दुःखद वार्ता अस्तित्वातच नसतील. होय, सर्व दुःखद वार्तांचा अंत झालेला असेल व त्या पुन्हा कधीही कानावर येणार नाहीत. तेव्हा सुवार्तांचे वर्चस्व असेल, व त्या सर्वकाळ विपुल प्रमाणात राहतील.