वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ४/१५ पृ. ८-१०
  • ग्रीसमध्ये साक्षकार्याची एक यशस्वी मोहीम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ग्रीसमध्ये साक्षकार्याची एक यशस्वी मोहीम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • सरकारी अधिकारी प्रतिसाद देतात
  • सरकारी अभियोक्‍ते प्रतिसाद देतात
  • ग्रंथपाल प्रतिसाद देतात
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ४/१५ पृ. ८-१०

ग्रीसमध्ये साक्षकार्याची एक यशस्वी मोहीम

यहोवाच्या साक्षीदारांनी ग्रीसमध्ये अनेक वर्षांपासून विरोध सहन केला आहे. पोलीस, न्यायालय व सरकारच्या काही अधिकाऱ्‍यांनी, अनेकदा ग्रीक ऑर्थोडॉक्स पाळक वर्गाच्या दबावाखाली येऊन साक्षीदारांचा छळ केला आहे. काहीवेळेस, ग्रीसच्या धर्मांतरविरोधी कायद्याचे, तर इतर वेळेस साक्षीदारांनी युद्धात भाग घेण्यास किंवा रक्‍त संक्रमण घेण्यास बायबल-आधारित कारणांमुळे नकार दिल्याचे निमित्त करण्यात आले आहे.—यशया २:२-५; प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९.

ग्रीसमधील प्रांजळ मनोवृत्तीच्या अधिकाऱ्‍यांमध्ये अधिक समजूतदारपणास चालना देण्यासाठी, ग्रीक सरकारद्वारे धार्मिक सेवक म्हणून ओळखले जाणारे जवळजवळ २०० साक्षीदार तसेच विधी व्यवसायातील काही सदस्यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्तरावर चालवण्यात आलेल्या एका मोहिमेत भाग घेतला. त्यांनी ग्रीसमधील यहोवाचे साक्षीदार (इंग्रजी) या शीर्षकाचे खास निर्माण केलेले माहितीपत्रक व यहोवाचे साक्षीदार—देवाच्या राज्याचे उद्‌घोषक (इंग्रजी) हे पुस्तक प्रस्तुत केले. तसेच, त्यांनी काही कागदपत्रे देखील सादर केली जी दाखवतात, की यहोवाच्या साक्षीदारांना होणाऱ्‍या छळासाठी कोणताही ठोस कायदेशीर आधार नाही. साक्षीदारांनी, पोलीस प्रमुख, महापौर, सरकारी अभियोक्‍ते व इतर अधिकाऱ्‍यांना भेटी दिल्या.

यास प्रतिसाद? शेकडो चांगले अनुभव. त्यांतील काही विचारात घ्या.

पश्‍चिम मासेदोनियातील एका पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्‍याने बांधवांचे स्वागत करून म्हटले: “मी तुम्हा लोकांना फार पूर्वीपासून ओळखतो, . . . व माझ्या मते तुमची सुव्यवस्था वाखाणण्याजोगी आहे. . . . धर्मांतराच्या कायद्याच्या मी विरोधात आहे, व माझ्या हातात असते तर मी तो रद्द केला असता.”

अनेक शहरांतील विविध पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्‍यांनी खालीलप्रमाणे अभिप्राय मांडले: “तुम्ही करत असलेल्या समाज सेवेबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.” “तुमचा समाज पोलिसांची गरजच पडू देत नाही; तुम्ही एक सामाजिक कार्य साध्य करत आहात.” “आम्हाला तुमच्याकडून अजिबातच त्रास नाही. आम्ही तुमचा आदर करतो व तुमची प्रशंसा करतो.”

पायरीयस शहरातील पोलिसांच्या संरक्षण खात्यातील एका मुख्य अधिकाऱ्‍याने आपल्याला येशू ख्रिस्ताच्यामार्फत यहोवा देवास नाव घेऊन प्रार्थना करता येते असे सांगितले व असे म्हणताना त्याच्या डोळ्यांत पाणी होते. साक्षीदारांना हर्मगिदोनापूर्वी छळ अपेक्षित असल्याचे आपल्याला माहीत आहे व त्यावेळी त्यांना मदत करण्यासाठी देव आपला उपयोग करील अशी आपण आशा करतो असे सांगून तर त्याने साक्षीदारांना आणखीनच चकित केले! अधिक चर्चा करण्याचे बांधवांनी दिलेले आमंत्रण त्याने स्वीकारले.

सरकारी अधिकारी प्रतिसाद देतात

थेस्सली येथील एका महापौरांनी उद्‌घोषक पुस्तकाविषयी असे म्हटले: “या पुस्तकाला नगरपालिकेच्या ग्रंथालयात स्थान मिळाले पाहिजे—आद्य स्थान!” असे म्हणून त्यांनी शेल्फवरील काही पुस्तके काढली व त्यांच्या जागी उद्‌घोषक पुस्तक, त्याचे मुखपृष्ठ दिसेल अशा प्रकारे ठेवले.

उत्तर ग्रीसमध्ये एका महापौरांनी बांधवांच्या भेटीचे हार्दिक स्वागत केले व ते म्हणाले: “मला माझ्या नगरपालिकेत हवे आहेत असे सर्वोत्कृष्ट लोक तुम्ही आहात.” उत्तर यूबिया येथील एका विनयशील महापौरांनी बांधवांना सांगितले: “मी एक भूतपूर्व सैन्य अधिकारी आहे. पण तुम्ही—तुम्ही माझ्या मते खरंच प्रशंसनीय आहात.” साक्षीदारांनी मांडलेल्या मुद्यांशी ते उत्साहीपणे सहमत झाले. जेव्हा साक्षीदारांनी वॉच टावर सोसायटीची निवडक पुस्तके सादर केली, तेव्हा ते म्हणाले: “मी ही सर्व वाचून काढण्याचे वचन दिल्यास तुम्ही ही मला द्याल का?” साक्षीदारांनी उत्तर दिले: “हो—ही तुमचीच आहेत!” त्यांना फार आनंद झाला व ते बांधवांना जाऊ देईनात.

ॲटिका येथील एका उपनगरात, एका महापौरांनी, बांधवांनी दिलेली प्रकाशने आनंदाने स्वीकारली व आपल्यासाठी सोसायटीची प्रकाशने आणत राहावी अशी विनंती केली. त्यांनी, बांधव परत जाण्यास निघाले तेव्हा सांगितले: “लोक राजनैतिक पुढाऱ्‍यांकडून फार निराश झाले आहेत व ते खऱ्‍या सत्याचा इतर ठिकाणी शोध घेतात. मला खात्री आहे, की तुमच्याजवळ सत्य असल्यामुळे तुम्ही यापुढे फारच व्यस्त राहाल.”

सरकारी अभियोक्‍ते प्रतिसाद देतात

उत्तर ग्रीसमधील सरकारी उपाभियोक्‍त्‌याची भेट घेतलेले बांधव आठवण करून सांगतात: “आमची प्रकाशने व प्रस्तुती तसेच रक्‍त संक्रमणाच्या गंभीर वादाचा सामना करताना आमचे लोक असाह्‍य नाहीत याची खात्री करण्याचे आमचे प्रयत्न पाहून ते फार प्रभावित झाले. शेवटी त्यांनी आमचे आभार मानले तसेच त्यांना भेट देण्यास व माहिती देण्यास आम्ही पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आमचे मनापासून कौतुक केले. नंतर, आम्हाला असे समजले, की चार वर्षांपूर्वी त्यांनी पोलिसांना बोलावून क्षेत्र सेवा करत असलेल्या दोन बांधवांना अटक करण्याचा हुकूम दिला होता.”

अथेन्समधील सरकारी अभियोक्त्यांच्या कार्यालयांना भेट देत असलेल्या दोन साक्षीदार वकिलांकडे एक नावाजलेले व सन्मानित वयोवृद्ध सरकारी अभियोक्‍ते स्वतःहून आले तेव्हा त्या बांधवांना आश्‍चर्य झाले. त्यांनी बांधवांना एका बाजूला घेऊन सांगितले, की धर्मांतरविरोधी कायद्याला काहीच आधार नाही व तो ग्रीक न्यायालयीन पद्धतीत अनावश्‍यक गोंधळ निर्माण करतो. त्यांनी सस्नेह हस्तांदोलन करून बांधवांचे आभार मानले.

उत्तर ग्रीसमधील एक सरकारी अभियोक्‍ता फार मैत्रिपूर्ण होते व त्यांनी साहित्य स्वीकारले. तरुण लोक विचारत असलेले प्रश्‍न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) हे पुस्तक चाळत असताना, अनुक्रमणिकेतील वैविध्यपूर्ण अध्याय पाहून त्यांना फार आश्‍चर्य झाले. ते म्हणाले: “या पुस्तकाने प्रस्तुत केलेली माहिती मला सबंध ऑर्थोडॉक्स पंथात आढळलेली नाही.”

साक्षीदारांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रक्‍त संक्रमण देण्याचे आपण पूर्वी हुकूम दिले असल्याचे बीयोशियातील एका सरकारी अभियोक्‍त्‌यांनी कबूल केले. परंतु, बांधवांनी त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा केली असता, ते ठामपणे म्हणाले: “मी भविष्यात कधीही असा हुकूम जारी करणार नाही!” रक्‍ताच्या सर्व पर्यायांविषयी माहिती मिळावी म्हणून त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय इस्पितळ सहकार्य समितीशी सल्लामसलत करण्याचे ठरवले. त्यांनी तरुण लोक विचारत असलेले प्रश्‍न हे पुस्तक आनंदाने स्वीकारले.

ग्रंथपाल प्रतिसाद देतात

हे साहित्य अनेक ग्रंथपालांनासुद्धा प्रस्तुत करण्यात आले. अथेन्समधील एका ग्रंथालयात एका विनयशील ग्रंथपालांनी साहित्य स्वीकारले व पुढील अभिप्राय दिला: “तुम्ही आमच्यासाठी तुमची पुस्तके आणली ते फार बरे केले कारण आमच्याकडे असलेली अधिकांश पुस्तके तुमचा निषेध करणारी आहेत. . . . ग्रंथालयात तुमची पुस्तके पाहून एक पाळक फार चिडले. . . . काही हरकत नाही. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.”

क्रीट येथील नगरपालिकेच्या ग्रंथालयातील एका अधिकाऱ्‍याची यहोवाच्या साक्षीदारांशी एका लष्करी शिबिरात ओळख झाली होती; साक्षीदारांनी युद्धात भाग घेण्यास नकार दिल्याने ते प्रभावित झाले होते असे त्यांनी बांधवांना सांगितले. ते स्वतःशीच विचार करत राहिले, ‘या लोकांनी का म्हणून छळ सोसावा?’ त्यांनी बांधवांजवळचे साहित्य स्वीकारले व त्यांच्या चालू मोहिमेबद्दल ते म्हणाले: “तुम्ही उत्कृष्ट कार्य केले आहे; हे तर तुम्ही फार पूर्वीच केले पाहिजे होते. . . . ग्रीसमध्ये फार पूर्वग्रह आहेत.” बांधवांनी लवकरच त्यांना पुन्हा भेट द्यावी अशी त्यांनी विनंती केली.

या विशेष मोहिमेदरम्यान, बांधवांनी १,००० पेक्षा अधिक उद्‌घोषक पुस्तके, १,६०० पेक्षा अधिक ग्रीसमधील यहोवाचे साक्षीदार ही माहितीपत्रके, तसेच शेकडो पुस्तके व नियतकालिकांचे वाटप केले. विशेष म्हणजे, ते शेकडो ग्रीक अधिकाऱ्‍यांशी प्रत्यक्ष बोलले. आता ग्रीसमधील प्रांजळ अधिकारी यहोवाच्या साक्षीदारांकडे अधिक निःपक्षपाती दृष्टिकोनातून पाहतील, अशी ग्रीसमधील व सबंध जगातील यहोवाच्या विश्‍वासू सेवकांची आशा आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा