दुःखद वार्तांचे वाढते प्रमाण
वृत्तपत्रात छापून आलेल्या सुखद वार्तांपेक्षा दुःखद वार्ता घोषित करणारे ठळक मथळे, वाचकांचे अधिक कुतूहल जागृत करतात याकडे कधी तुमचे लक्ष गेले आहे का? नैसर्गिक आपत्तीचा ठळक मथळा असो अथवा नियतकालिकाच्या भपकेबाज मुखपृष्ठावर लक्षवेधकपणे मांडलेली खळबळजनक चहाडी असो, सुखद वार्तांपेक्षा दुःखद वार्तांचाच जास्त खप होतो असे दिसून येते.
आज दुःखद वार्तांची काहीच कमी नाही. परंतु, सगळ्या चांगल्या वार्ता सोडून—वार्ताहार व पत्रकारांना, दुःखद वार्तांच्याच मागावर राहण्याचे व त्या शोधून काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते की काय, असा कधीकधी मनात विचार येतो.
सबंध इतिहासात विपुल
खरोखर, कोणत्याही चांगल्या वार्तांना मागे टाकून, दुःखद वार्ता शतकानुशतके, विपुल प्रमाणात अस्तित्वात राहिल्या आहेत. ऐतिहासिक वृत्तान्तात, मानवजातीच्या वाट्याला आलेले दुःख, निराशा व वैफल्य यांचेच पारडे जड राहिले आहे.
केवळ काही निवडक उदाहरणे लक्षात घेऊ या. झॉक लग्रॉन यांनी कल्पिलेले जगाचा इतिहास (इंग्रजी) नामक पुस्तक, वृत्तांचा एक संग्रह प्रस्तुत करते ज्यातील प्रत्येक वृत्त, घटना घडल्याच्या विशिष्ट तारखेसाठी, परंतु अशाप्रकारे लिहिण्यात आले आहे जणू घटनेचा अहवाल देणारा एखादा आधुनिक पत्रकार ते वृत्त कथित करत आहे. आपल्याला या उत्तमप्रकारे संशोधित वृत्तांतून, मानवाने पृथ्वीवर त्याच्या प्रक्षुब्ध अस्तित्वाच्या सबंध कालावधीत ऐकलेल्या सार्वत्रिक दुःखद वार्तांचे एक सर्वेक्षणात्मक दृश्य प्राप्त होते.
प्रथम, सा. यु. पू. ४२९ मधील ग्रीसचे हे जुने वृत्त लक्षात घ्या. ते अथेन्स व स्पार्टा यांमध्ये त्यावेळेस सुरू असलेल्या युद्धाबद्दल अहवाल देत आहे: “पॉटडिय नगरराज्यातील लोक भुकेने एवढे व्याकूळ झाले, की आपल्याच मृत लोकांचे शव खाण्याची वेळ त्यांच्यावर आली व यामुळे वेढा घालणाऱ्या अथेनकरांना शरण जाण्यास त्यांना भाग पाडण्यात आले आहे.” निःसंशये, एक दुःखद वार्ता!
पुढे, सामान्य युग पूर्व पहिल्या शतकाकडे वळल्यास रोम, मार्च १५, सा. यु. ४४ अशी तारीख व स्थानाची नोंद असलेले, ज्युलियस कैसर यांच्या मृत्यूचे सादृश्य वर्णन करणारे वृत्त आम्हाला आढळते. “ज्युलियस कैसर यांची हत्या करण्यात आली आहे. आज मार्चच्या पंधराव्या दिवशी सिनेट गृहात आपले आसन ग्रहण करत असताना, त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्रांचा समावेश असलेल्या कारस्थान्यांच्या गटाने त्यांना भोसकून ठार मारले.”
यानंतरच्या शतकांत, दुःखद वार्तांचे उधाण कायम राहिले. याचे एक धक्कादायक उदाहरण म्हणजे १४८७ ची मेक्सिकोतील ही वार्ता: “ॲझ्टेक राजधानी, टेनॉख्टिट्लॉनमध्ये एक अभूतपूर्व बलिदान दृश्य पाहण्यात आले ज्यात २०,००० लोकांनी त्यांचे हृदय, युद्ध दैवत वीट्झीलॉपॉकट्ली यास अर्पण केले.”
मानवाच्या क्रूरतेने तर दुःखद वार्ता पुरवल्या आहेतच, परंतु त्याच्या निष्काळजीपणामुळे त्यांत आणखी भर पडली आहे. लंडनमध्ये झालेली विशाल अग्नी दुर्घटना बहुधा अशीच एक आपत्ती असावी असे दिसते. लंडन, इंग्लंड येथील, सप्टेंबर ५, १६६६ या तारखेचे वृत्त असे आहे: “चार दिवस व चार रात्रींनंतर सरतेशेवटी लंडनची आग यॉर्कच्या ड्यूकद्वारे विझवण्यात आली, ज्यांनी अग्नीलोळांच्या मार्गात येणाऱ्या इमारती उडवून लावण्यासाठी नाविक दारूगोळ्याच्या दलांना कामास लावले. एकूण ८७ चर्चच्या इमारती व १३,००० पेक्षा अधिक घरे जमीनदोस्त झाली असून सुमारे ४०० एकर जमीन नष्ट झाली आहे. चमत्कार म्हणजे, फक्त नऊ लोक मृत्युमुखी पडले.”
दुःखद वार्तांच्या या उदाहरणांसोबत, अनेक खंडांत धुमाकूळ घालणाऱ्या साथीच्या रोगांचाही समावेश केला पाहिजे—उदाहरणार्थ, १८३० या दशकाच्या सुरवातीस पसरलेली पटकीची साथ. त्या वृत्ताचे छापील शीर्षक होते: “पटकीचे पिशाच्च युरोपास झपाटते.” याखालील वास्तविक अहवाल दुःखद वार्तांचे अत्यंत भयावह रूप चित्रित करते: “युरोपात १८१७ या वर्षापर्यंत अज्ञात असलेली पटकी, आशियातून पश्चिमेकडे पसरत आहे. मॉस्को व सेंट पीटर्सबर्ग यांसारख्या रशियन शहरांच्या लोकसंख्येतील पुष्कळसा भाग आधीच नष्ट झाला आहे—बळी पडलेल्यांतील अधिकांश जण शहरात राहणारे गरीब लोक आहेत.”
अलीकडील वर्षांत तीव्रतर होणे
सबंध अभिलिखित इतिहासात दुःखद वार्ता जीवनाच्या वास्तविकता राहिल्या असल्या तरीसुद्धा, २० व्या शतकाची अलीकडील दशके, दुःखद वार्ता वाढत आहेत, एवढेच नव्हे तर त्या वेगाने तीव्रतर होत आहेत याचा पुरावा देतात.
युद्धाच्या वार्ता, विद्यमान शतकातील दुःखद वार्तांपैकी सर्वात वाईट प्रकारच्या वार्ता ठरल्या आहेत यात शंका नाही. पहिले जागतिक महायुद्ध व दुसरे जागतिक महायुद्ध, असे अगदी योग्यपणे म्हणण्यात आलेल्या—इतिहासातील दोन सर्वात मोठ्या युद्धांच्या काळात—दुःखद वार्तांचे खरोखरच अतिभयंकर प्रमाणात वृत्त देण्यात आले. तथापि, या शोकग्रस्त शतकाने पुरवलेल्या दुःखद वार्तांचा हा खरे पाहता केवळ एक अल्प अंश राहिला आहे.
सहज निवडलेले काही ठळक मथळे विचारात घ्या:
सप्टेंबर १, १९२३: भूकंप टोकियोस जमीनदोस्त करतो—३,००,००० ठार; सप्टेंबर २०, १९३१: आपत्ती—ब्रिटनने पाऊंडचे अवमूल्यन केले; जून २५, १९५०: उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियावर आक्रमण; ऑक्टोबर २६, १९५६: हंगेरीच्या जनतेचे सोविएत शासनाविरुद्ध बंड; नोव्हेंबर २२, १९६३: डॅलस येथे जॉन केनडी यांच्यावर प्राणघातक गोळीबार; ऑगस्ट २१, १९६८: प्रागचे बंड धुळीस मिळवण्यास रशियन रणगाड्यांचे आगमन; सप्टेंबर १२, १९७०: अपहृत जेट विमाने वाळवंटात उडवून देण्यात आली; डिसेंबर २५, १९७४: ट्रॉसी वादळ डार्विन शहराला नष्ट करते—६६ ठार; एप्रिल १७, १९७५: कम्युनिस्ट शक्तींकडून कंबोडिया पराभूत; नोव्हेंबर १८, १९७८: गुयाना येथे सामुहिक आत्महत्या; ऑक्टोबर ३१, १९८४: श्रीमती गांधी यांची गोळ्या घालून हत्या; जानेवारी २८, १९८६: उड्डाणानंतर लगेचच अवकाश यानाचा विस्फोट; एप्रिल २६, १९८६: सोविएत अणुभट्टीला आग; ऑक्टोबर १९, १९८७: शेअर बाजार कोलमडला; मार्च २५, १९८९: अलास्कात तेल सांडल्याने भारी नुकसान; जून ४, १९८९: टीन्मन चौकात लष्कराकडून विरोधकांची कत्तल.
होय, इतिहास स्पष्ट करतो, की दुःखद वार्ता नेहमीच विपुल प्रमाणात अस्तित्वात राहिल्या आहेत पण त्यांच्या तुलनेत चांगल्या वार्तांचा तुटवडा राहिला आहे. अलीकडील शतकांत एकीकडे दुःखद वार्तांचे प्रमाण तीव्रतर झाले आहे तर दुसरीकडे पाहिल्यास, उलटणाऱ्या प्रत्येक वर्षात चांगल्या वार्तांमध्ये घट झाली आहे.
असे का व्हावे बरे? हे कायम असेच राहील का?
पुढील लेख या दोन प्रश्नांना विचारात घेईल.