सुखदुःखात देवाच्या सेवेत एकत्रित
मीशेल व बाबेट म्यूलर द्वारे कथित
“मला तुम्हाला वाईट बातमी द्यायची आहे,” डॉक्टर म्हणाले. “आफ्रिकेतील मिशनरी जीवनाचे स्वप्न आता विसरून जा.” आणि माझी पत्नी बाबेट हिच्याकडे पाहात ते म्हणाले, “तुम्हाला स्तनाचा कर्करोग आहे.”
आम्ही किती स्तंभित झालो ते सांगताच येणार नाही. क्षणार्धात, आमच्या मनात कितीतरी विचारांनी गर्दी केली. डॉक्टरांकडे आमची ही भेट अंतिम तपासणीसाठी असेल असे आम्हाला वाटले होते. पश्चिम आफ्रिकेतील, बेनिन या शहरी परत जाण्यासाठी आमच्या प्रवासाची तिकीटे काढलेली होती. आम्हाला त्या आठवड्यातच तेथे परतता येईल असे आम्हाला वाटले होते. आमच्या विवाहाच्या २३ वर्षांत आम्ही अनेक सुखदुःखे अनुभवली होती. गोंधळलेल्या व घाबरलेल्या अवस्थेत आम्ही, आता कर्करोगाशी लढत देण्यास सज्ज झालो.
आपण सुरवातीपासून पाहू या. मीशेलचा जन्म सप्टेंबर १९४७ या वर्षी व बाबेटचा जन्म ऑगस्ट १९४५ या वर्षी झाला. आम्ही फ्रान्समध्ये लहानाचे मोठे झालो व १९६७ या वर्षी विवाहबद्ध झालो. आम्ही पॅरिस शहरात राहात होतो. सन १९६८ च्या सुरवातीला एके सकाळी, बाबेटला कामाला जाण्यास उशीर झालेला होता. तेवढ्यात, एक स्त्री दारावर आली व तिने बाबेटला एक धार्मिक माहितीपत्रक सादर केले; बाबेटने ते स्वीकारले. मग ती स्त्री म्हणाली: “मी, तुम्हा पतीपत्नींशी बोलण्यासाठी माझ्या पतीसोबत परत आले तर चालेल का?”
बाबेट तिच्या कामाच्या विचारात होती. या स्त्रीने जावे असे तिला वाटत होते व म्हणून ती म्हणाली, “हो, हो चालेल.”
मीशेल सांगतात: “मला धर्मात मुळीच रस नव्हता, पण या माहितीपत्रकाने माझे लक्ष वेधले व मी ते वाचले. काही दिवसांनी जोसलिन लेम्वान त्यांचे पती क्लॉड यांच्यासोबत परत आल्या. ते बायबलचा वापर करण्यात फार कुशल होते. त्यांच्याकडे माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे होती. मी प्रभावित झालो.
“बाबेट एक प्रांजळ कॅथलिक असूनही तिच्याकडे बायबल नव्हते, पण ही गोष्ट कॅथलिक लोकांत अगदीच असामान्य नव्हती. देवाचे वचन पाहण्यास व ते वाचण्यास तिला फारच आनंद झाला. आम्हाला शिकवण्यात आलेल्या धार्मिक समजुतींपैकी पुष्कळशा समजुती खोट्या होत्या असे आम्ही आमच्या अभ्यासातून शिकलो. या शिकत असलेल्या गोष्टींबद्दल, आम्ही आमच्या नातेवाईक व मित्रांसोबत बोलण्यास सुरवात केली. जानेवारी १९६९ या वर्षी, आम्ही यहोवाचे बाप्तिस्मा प्राप्त साक्षीदार बनलो. आमच्या नातेवाईक व मित्रांपैकी नऊ जणांचा यानंतर थोड्याच काळाने बाप्तिस्मा झाला.”
प्रचारकांची गरज असलेल्या ठिकाणी सेवा करणे
आमच्या बाप्तिस्म्याच्या थोड्याच काळानंतर आम्ही विचार केला, ‘आपल्याला मुले नाहीत. मग पूर्ण-वेळेची सेवा करण्यास काय हरकत आहे?’ अशाप्रकारे १९७० या वर्षी आम्ही आपापली नोकरी सोडली, नियमित पायनियर म्हणून नाव नोंदविले व फ्रान्सच्या मध्यभागी, नेव्हर्स जवळील मान्यी-लोर्म या लहानशा गावात आलो.
ही एक कठीण नेमणूक होती. बायबलचा अभ्यास करू इच्छिणारे लोक भेटणे कठीण होते. आम्हाला नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत ज्यामुळे आमच्याजवळ फार कमी पैसे होते. कधीकधी आम्हाला फक्त बटाटे खावे लागत. हिवाळ्यात तापमान शून्य सेल्सियस पेक्षा २२ अंश खाली घसरत असे. तेथे घालवलेल्या त्या दिवसांना आम्ही सात दुबळ्या गाईंचा काळ म्हणत होतो.—उत्पत्ति ४१:३.
पण यहोवाने आमचा सांभाळ केला. एके दिवशी आमच्याकडे खाण्यासाठी जवळजवळ काहीच उरले नव्हते तेव्हा, पोस्टमनने बाबेटच्या बहिणीने पाठवलेला चीजचा मोठा डबा आणून दिला. दुसऱ्या एके दिवशी, प्रचार कार्यावरून परतल्यावर आम्ही पाहतो तो काय, आम्हाला भेटण्यास आमचे काही मित्र मोटारीने ५०० किलोमीटरचा प्रवास करून आले होते. आमच्या अडचणींबद्दल ऐकल्यावर या बांधवांनी आमच्यासाठी दोन मोटारी भरून खाद्य पदार्थ आणले होते.
दीड वर्षाने, संस्थेने आम्हाला खास पायनियर म्हणून नेमले. पुढील चार वर्षांत आम्ही नेव्हर्स, त्यानंतर ट्रॉयस व शेवटी मोनटीन्यी-लॉ-मेट्स येथे सेवा केली. मीशेल यांना १९७६ या वर्षी, फ्रान्सच्या नैर्ऋत्य भागात विभागीय पर्यवेक्षक या नात्याने सेवा करण्यासाठी नेमण्यात आले.
दोन वर्षांनंतर, विभागीय पर्यवेक्षकांची एक प्रशाला सुरू असताना आम्हाला मिशनरी या नात्याने विदेशात जाण्याचे निमंत्रण देणारे, वॉच टावर संस्थेचे पत्र आले; आम्ही चॅड व बुर्किना फॉसो (तेव्हाचे अप्पर वोल्टा) यांपैकी कोणतेही निवडू शकतो असे पत्रात म्हटले होते. आम्ही चॅड निवडले. लवकरच, आम्हाला ताहिती शाखेच्या देखरेखीखाली काम करण्यास नेमण्यात आले होते असे सांगणारे आणखी एक पत्र आले. आम्ही एक मोठा खंड, अर्थात आफ्रिका निवडला होता पण लवकरच आम्ही आलो, एका लहानशा बेटावर!
दक्षिण पॅसिफिक येथे सेवा करणे
ताहिती हे दक्षिण पॅसिफिकमधील, उष्णकटिबंधातील सुंदर बेट आहे. आम्ही पोहंचलो तेव्हा जवळजवळ शंभर बांधव आम्हाला भेटण्यास विमानतळावर आले होते. त्यांनी पुष्पहारांनी आमचे स्वागत केले व फ्रान्सपासून येथपर्यंतच्या लांब प्रवासाने थकलेले असूनही आम्ही फार आनंदी होतो.
ताहितीला येऊन चार महिने झाल्यांनंतर आम्ही सुकलेले नारळ वाहून नेणाऱ्या छोट्याशा नावेतून प्रवासाला निघालो. पाच दिवसांनी आम्ही आमची नवीन नेमणूक—मॉरकेझझ बेटांवरील नुका हीवा बेट, येथे पोहंचलो. या बेटावर जवळजवळ १,५०० लोक राहात होते पण येथे कोणीही बांधव नव्हते. फक्त आम्ही होतो.
तेव्हाची परिस्थिती मागासलेली होती. आम्ही काँक्रीट व बांबूने बांधलेल्या लहानशा घरात राहात होतो. वीजपुरवठा नव्हता. नळ होता, मात्र त्याला क्वचितच पाणी येत असे व पाणीसुद्धा गढूळ असे. आम्ही सहसा, एका टाकीत साठणारे पावसाचे पाणीच वापरत होतो. पक्के रस्ते नव्हते, फक्त मातीच्या पायवाटा होत्या.
बेटावरील लांब अंतरांवर जाण्यासाठी आम्हाला भाड्याने घोडे घ्यावे लागत. घोड्यांवरील खोगीर लाकडाचे असत—त्यावर बसणे फार त्रासदायक वाटे व पूर्वी कधीही घोड्यावर न बसलेल्या बाबेटला तर फारच त्रास होई. रस्त्याच्या आड येणारे बांबू कापून वाट करण्यासाठी आम्ही सोबत एक सुरा नेत होतो. फ्रान्स मधील जीवन येथे येऊन पार बदलले होते.
आम्ही दोघेच उपस्थित होत असलो तरीसुद्धा रविवारच्या सभा आम्ही चालवत होतो. दोघेच असल्यामुळे सुरवातीला आम्ही इतर सभा चालवत नव्हतो. त्याऐवजी आम्ही एकत्र बसून सभेचे साहित्य वाचून काढत होतो.
काही महिन्यांनंतर, असेच चालू देत राहाणे योग्य नाही असे आम्ही ठरवले. मीशेल सांगतात: “मी बाबेटला म्हणालो, ‘आपण व्यवस्थित पेहराव केला पाहिजे. तू तेथे बस व मी येथे बसतो. मी प्रार्थनेने सुरवात करीन आणि मग आपण ईश्वरशासित सेवा प्रशाला व सेवा सभा घेऊ. मी प्रश्न विचारीन व माझ्याशिवाय खोलीत तू एकटीच असली तरीसुद्धा तू उत्तरे दे.’ आम्ही असे केले हे फार बरे झाले कारण मंडळी नसल्यास आध्यात्मिकपणे ढिले पडणे फार सोपे असते.”
आमच्या ख्रिस्ती सभांना लोकांना यायला लावण्यास फार वेळ लागला. सुरवातीचे आठ महिने आम्ही दोघेच होतो. नंतर, आमच्या सोबतीला इतर एक, दोन किंवा कधीकधी तीन लोकही येऊ लागले. एका वर्षी, प्रभूच्या सांज भोजनाचा वार्षिक सण आम्ही दोघांनीच सुरू केला. दहा मिनिटांनी, काही लोक आले म्हणून मी भाषण मध्येच थांबविले व पुन्हा सुरू केले.
आज मॉरकेझझ बेटांवर ४२ प्रचारक व ३ मंडळ्या आहेत. सर्वाधिक कार्य आमच्या मागाहून येणाऱ्यांनी केले असले तरीही, आम्ही ज्यांच्यासोबत तेव्हा संपर्क साधला होता त्यांपैकी काही, आता बाप्तिस्मा घेतलेले आहेत.
आपले बांधव बहुमोल आहेत
नूका हीवा येथे आम्ही धीर धरणे शिकलो. सर्वात मुलभूत गरजांव्यतिरिक्त आम्हाला सर्वच गोष्टींसाठी थांबावे लागत असे. उदाहरणार्थ, एखादे पुस्तक हवे असल्यास, त्या पुस्तकासाठी लिहावे लागत असे, त्यानंतर ते येईपर्यंत दोन किंवा तीन महिने थांबून राहावे लागत असे.
आपले बांधव बहुमोल आहेत हा आम्ही शिकलेला आणखी एक धडा होता. आम्ही ताहितीला आलो व एका सभेत बांधवांना गाताना ऐकले तेव्हा आम्हाला अक्षरशः गहिवरून आले. आपल्या काही बांधवाशी जुळवून घेणे कठीण आहे हे खरे, परंतु एकटे राहावे लागते तेव्हा, बंधुत्वात असणे किती चांगले असते याची जाणीव होते. संस्थेने, आम्ही ताहितीला परत जाऊन विभागीय कार्यात सेवा करावी असे १९८० या वर्षी ठरवले. तेथे बांधवांच्या स्नेहपूर्ण आदरातिथ्याने व प्रचार कार्याबद्दल असलेल्या त्यांच्या प्रेमाने आम्ही फारच प्रोत्साहित झालो. ताहिती बेटावर विभागीय कार्यात आम्ही तीन वर्षे होतो.
एका बेटावरून दुसऱ्या बेटावर
यानंतर, आम्हाला आणखी एक पॅसिफिक बेट राइएटिया येथील मिशनरी गृहाची नेमणूक देण्यात आली व आम्ही तेथे जवळजवळ दोन वर्षे राहिलो. राइएटियानंतर, आम्हाला टुआमोटू द्वीपसमूहात विभागीय कार्याची नेमणूक देण्यात आली. आम्ही ८० बेटांपैकी २५ बेटांवर नावेने गेलो. बाबेटला हे जड जात असे. ती नावेने प्रवास करी त्या प्रत्येक वेळी तिला समुद्रप्रवासाने मळमळ होत असे.
बाबेट म्हणते: “ते खरोखरच मनःस्ताप आणणारे होते! आम्ही नावेवर जितका वेळ असायचो तितका वेळ मला मळमळत राहत असे. आम्ही पाच दिवस समुद्रावर असलो, तर मला पाचही दिवस मळमळत असे. शिवाय मला कोणतेही औषध उपयोगी पडत नव्हते. मला असे सतत मळमळत असले तरीसुद्धा, समुद्र मात्र अत्यंत सुंदर होता. तो एक विलक्षण देखावा असे. नावेसोबत डॉल्फिनही येत असत. कधीकधी तर, आपण टाळी वाजवली की ते पाण्यातून बाहेर उडी मारत!”
पाच वर्षें विभागीय कार्य केल्यानंतर, आम्हाला पुन्हा ताहितीला नेमण्यात आले व आम्ही पुन्हा प्रचार कार्याचा आनंद लुटला. दीड वर्षातच आमच्या मंडळीतील प्रचारकांची संख्या दुप्पट होऊन, ३५ ची ७० झाली. ज्या लोकांसोबत आम्ही बायबलचा अभ्यास केला त्यांपैकी बारा जणांचा आम्ही तेथून जाण्याआधी बाप्तिस्मा झाला. त्यांपैकी काही जण आता मंडळीत वडील आहेत.
आम्ही दक्षिण पॅसिफिकमध्ये एकूण १२ वर्षे राहिलो. यानंतर आम्हाला, बेटांवरील मंडळ्या आता मजबूत असल्यामुळे तेथे मिशनऱ्यांची गरज नाही असे सांगणारे पत्र संस्थेकडून आले. आम्ही ताहितीला आलो तेव्हा ४५० प्रचारक होते व आम्ही ते सोडले तेव्हा १,००० झाले होते.
शेवटी आफ्रिका!
आम्ही फ्रान्सला परतलो व दीड महिन्याने संस्थेने आम्हाला बेनिन, पश्चिम आफ्रिका ही नवीन नेमणूक दिली. आम्हाला १३ वर्षांपूर्वीच आफ्रिकेला जाण्याची इच्छा होती, म्हणून आम्ही फार आनंदात होतो.
आम्ही नोव्हेंबर ३, १९९०, या दिवशी बेनिन येथे आलो व राज्य प्रचार कार्यावर १४-वर्षीय बंदी उठवल्यावर तेथे जाणाऱ्या पहिल्या मिशनऱ्यांपैकी आम्ही होतो. येथे येणे फार उत्साहवर्धक होते. येथील जीवन पॅसिफिक बेटांवरील जीवनासारखेच असल्यामुळे आम्हाला रुळायला फारसे कठीण गेले नाही. येथील लोक मनमिळावू व त्यांना पाहुणचार करण्याची हौस आहे. रस्त्यावर थांबून कोणासोबतही बोलता येते.
बेनिनला आल्यानंतर काही आठवड्यांतच, बाबेटला तिच्या स्तनात एक गाठ आढळली, व म्हणून आम्ही अलीकडेच प्रस्थापित झालेल्या शाखा दफ्तराजवळ असलेल्या लहानशा रुग्णालयात गेलो. डॉक्टरांनी तिला तपासले व तिची लगेच शस्त्रक्रिया केली पाहिजे असे ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या एका रुग्णालयात गेलो जेथे आम्ही एका युरोपियन डॉक्टरांची भेट घेतली. त्या फ्रान्सहून आलेल्या स्त्रीरोग विशेषज्ञ होत्या. बाबेटच्या शस्त्रक्रियेसाठी आम्ही लवकरात लवकर फ्रान्सला गेले पाहिजे असे त्यासुद्धा म्हणाल्या. दोन दिवसांनी आम्ही फ्रान्सला जाणाऱ्या विमानात होतो.
बेनिन सोडण्यास आम्हाला दुःख झाले. धार्मिक स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त झाल्यामुळे बांधव नवीन मिशनरी आल्याबद्दल आनंदात होते व आम्ही सुद्धा तेथे असण्याबद्दल फार आनंदी होतो. यामुळे, या देशात केवळ काहीच आठवडे राहून परतावे लागले याबद्दल आम्ही खेदित होतो.
आम्ही फ्रान्सला आल्यावर शल्यचिकित्सकांनी तिला तपासले व तिला शस्त्रक्रियेची गरज आहे हे त्यांनीसुद्धा खात्रीपूर्वक सांगितले. डॉक्टरांनी लवकरच हालचाल केली. त्यांनी लहानशी शस्त्रक्रिया करून दुसऱ्या दिवशी बाबेटला रुग्णालयातून जाण्याची परवानगी दिली. हे प्रकरण येथेच संपले असे आम्हाला वाटले.
आठ दिवसांनंतर आम्ही त्या शल्यचिकित्सकांना भेटण्यास गेलो. तेव्हाच त्यांनी बाबेटला स्तनाचा कर्करोग असल्याची वाईट बातमी सांगितली.
त्यावेळेस तिला कसे जाणवले याची आठवण करून बाबेट सांगते: “पहिल्यांदा मी मीशेलसारखी फार अस्वस्थ झाले नाही. परंतु ही वाईट बातमी मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी निर्विकार झाले. मी रडू शकत नव्हते. मी हसू शकत नव्हते. मी मरणार आहे असे मला वाटत होते. कर्करोग म्हणजे मृत्यूच अशी माझी कल्पना होती. जे करायचे आहे ते तर करावेच लागणार, अशी माझी मनोवृत्ती होती.”
कर्करोगाविरुद्ध लढत
ही वाईट बातमी आम्हाला शुक्रवारी मिळाली आणि मंगळवारी बाबेटची दुसरी शस्त्रक्रिया करण्याचे ठरले होते. आम्ही बाबेटच्या बहिणीकडे राहात होतो, परंतु तीसुद्धा फार आजारी असल्यामुळे आम्ही तिच्या छोट्याशा घरात आणखी राहू शकत नव्हतो.
आम्ही कोठे जावे याचा विचार करू लागलो. तेव्हा आम्हाला ईव व ब्रीझीट मर्डा यांची आठवण झाली, या जोडप्यासोबत आम्ही पूर्वी राहिलो होतो. त्यांनी आमचे खूप आदरातिथ्य केले होते. यामुळे, आम्ही ईवसोबत दूरध्वनीद्वारे बोललो व बाबेटची शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे आणि कोठे राहावे हा आमच्यासमोर प्रश्न आहे असे आम्ही त्यांना सांगितले. मीशेलला नोकरीची गरज असल्याचे देखील आम्ही सांगितले.
ईवने मीशेलला त्यांच्या घरातील वरवरची कामे करण्यास दिली. बांधवानी आम्हाला दयाळुपणाच्या अनेक कृतींनी आधार व प्रोत्साहन दिले. त्यांनी आम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत केली. संस्थेने बाबेटचा वैद्यकीय खर्च उचलला.
शस्त्रक्रिया मोठी होती. डॉक्टरांना लसिका पिंड व स्तन काढून टाकावे लागले. त्यांनी लगेच रसायनोपचार सुरू केला. एका आठवड्यानंतर बाबेटने रुग्णालय सोडले पण पुढील उपचारासाठी तिला दर तीन आठवड्यांनी यावे लागत असे.
बाबेटच्या उपचारादरम्यान मंडळीच्या बांधवांनी फारच साहाय्य केले. बाबेटप्रमाणेच स्तनाचा कर्करोग असलेल्या एका भगिनीनेसुद्धा बरेच प्रोत्साहन पुरवले. काय काय होऊ शकेल हे तिने बाबेटला सांगितले व तिला खूप सांत्वन दिले.
तथापि, आम्ही आमच्या भविष्याबद्दल चिंतेत होतो. हे ताडून, मीशेल व झॉनेट सेलेर्य आम्हाला बाहेर जेवायला घेऊन गेले.
आम्हाला मिशनरी सेवा सोडायची असून आम्ही कधीच आफ्रिकेला परत जाऊ शकणार नाही असे आम्ही त्यांना सांगितले. तथापि बंधू सेलेर्य म्हणाले: “काय? तुम्हाला मिशनरी सेवा सोडण्यास कोणी सांगितले? नियमन मंडळाने? फ्रान्समधील बांधवांनी? कोणी सांगितले?”
“सांगितले कोणी नाही,” मी उत्तर दिले, “मीच म्हणतोय.”
“नाही, नाही!” बंधू सेलेर्य म्हणाले. “तुम्ही नक्कीच परत जाल!”
रसायनोपचारानंतर, किरणोत्सर्जन सुरू करण्यात आले व हे ऑगस्ट १९९१ च्या शेवटापर्यंत पूर्ण झाले. बाबेट नियमित तपासणींसाठी फ्रान्सला परत जात राहिली तर आमच्या आफ्रिकेला परतण्याबद्दल डॉक्टरांना काहीच हरकत नव्हती असे त्यांनी आम्हाला सांगितले.
परत बेनिनला
मग आम्ही ब्रुकलिनमधील मुख्यालयाला पत्र लिहून, मिशनरी सेवेत परतण्याची परवानगी मागितली. त्यांचे उत्तर जाणण्यासाठी आम्ही अधीर झालो होतो. दिवसांमागून दिवस रेंगाळत गेले. शेवटी, मीशेलला राहावलेच नाही व यामुळे त्याने ब्रुकलिनला फोन केला व त्यांना आमचे पत्र मिळाले किंवा नाही हे विचारले. त्यांनी आमच्या पत्रावर विचार केल्याचे सांगितले—आम्ही बेनिनला परत जाऊ शकत होतो! आम्ही यहोवाचे किती आभारी होतो!
मर्डा कुटुंबाने या बातमीबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजला. नोव्हेंबर १९९१ मध्ये, आम्ही बेनिनला परतलो व बांधवांनी आमचे एका मेजवानीने स्वागत केले!
बाबेट आता बरी आहे. संपूर्ण वैद्यकीय चाचणींसाठी आम्ही वेळोवेळी फ्रान्सला गेलो आहोत व डॉक्टरांना कर्करोगाचे कोणतेच चिन्ह आढळत नाही. आम्ही परत आमच्या मिशनरी नेमणुकीत आहोत याचा आम्हाला आनंद वाटतो. बेनिनमध्ये आमची गरज आहे असे आम्हास जाणवले व यहोवाने आमचे कार्य आशीर्वादित केले आहे. आम्ही परतलो तेव्हापासून १४ जणांना बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत केली आहे. त्यांपैकी पाच जण आता नियमित पायनियर आहेत व एकास सेवा-सेवक या पदावर नेमण्यात आले आहे. आमच्या लहानशा मंडळीचा विस्तार होऊन तिच्या दोन मंडळ्या झाल्या आहेत.
या सर्व काळांत, आम्ही पती पत्नी या नात्याने यहोवाची सेवा केली आहे, अनेक आशीर्वाद उपभोगले आहेत व आम्हाला अनेक चांगल्या लोकांची ओळख झाली आहे. परंतु, कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी आम्हाला यहोवाद्वारे प्रशिक्षित व बळकट करण्यात आले आहे. ईयोबाप्रमाणे, घटना का घडताहेत हे आम्हाला पुष्कळदा कळत नसे पण यहोवा आम्हाला मदत करण्यासाठी नेहमी असेल हे आम्हाला माहीत होते. देवाच्या वचनात म्हटल्याप्रमाणे: “पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा [यहोवा, NW] हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.”—यशया ५९:१.
[२३ पानांवरील चित्रं]
मीशेल व बाबेट म्यूलर, बेनिनच्या पारंपारिक पोशाखात
[२५ पानांवरील चित्रं]
उष्ण कटिबंधातील ताहितीच्या पॉलीनेशियन लोकांमधील मिशनरी कार्य