राज्य घोषकांचा वृत्तान्त
पूर्वीचे शत्रू यहोवाची सेवा करण्यात एकत्रित होतात
ब्रांकॉ असे स्पष्टीकरण देतो, “मी सशस्त्र संरक्षक म्हणून बॉस्नियामध्ये काम करीत होतो तेव्हा प्रथमच यहोवाच्या साक्षीदारांबद्दल मी ऐकले होते.”a
जखमींवर उपचार केले जात असे, अशा एका रुग्णालयात ब्रांकॉ शिपायाचे काम करीत होता. तेथील एक डॉक्टर, साक्षीदारांबरोबर अभ्यास करत होते आणि एकदा रात्रपाळी करत असताना, बायबलबद्दल जे पुष्कळ काही ते शिकले होते ते त्यांनी ब्रांकॉला समजावून सांगितले.
त्या रात्री ब्रांकॉने जे काही ऐकले होते त्यामुळे त्याचा त्याच्यावर इतका परिणाम झाला, की त्याने ताबडतोब आपल्या शस्त्रांचा त्याग केला. अधिक शिकून घेण्याच्या उद्देशाने त्याने साक्षीदारांशी संपर्क साधला. काही काळानंतर युरोपमधील दुसऱ्या एका देशात स्थानांतर केल्यावर ब्रांकॉने राज्य सभागृहाचा पत्ता शोधून काढला व यहोवाच्या साक्षीदारांच्या युगोस्लाव्हियाच्या मंडळीतील एका सभेस तो उपस्थित राहिला. तेथेच ब्रांकॉची स्लॉबॉडानबरोबर भेट झाली.
स्लॉबॉडानदेखील बॉस्नियामधून आला होता आणि ब्रांकॉ ज्या युद्धात होता त्याच युद्धात—पण, विरुद्ध छावणीत त्याने स्वयंसेवक या नात्याने सेवा केली होती. स्लॉबॉडान, सर्बच्या वतीने क्रोएटविरुद्ध लढला होता. त्या दोघांची भेट झाली तोपर्यंत स्लॉबॉडान बाप्तिस्मा घेतलेला एक यहोवाचा साक्षीदारही झाला होता. त्याचा पूर्वीचा शत्रू ब्रांकॉ, याच्याबरोबर अभ्यास करण्याची त्याने तयारी दर्शविली. अभ्यास जसजसा प्रगमनशील होत गेला, तसतसा तो यहोवाबद्दल अधिक शिकला व त्याची देवावरील प्रीती वृद्धिंगत झाली. यानेच ब्रांकॉला आपले जीवन, निर्माणकर्त्याला समर्पित करण्यास प्रवृत्त केले. ऑक्टोबर १९९३ मध्ये समर्पणाचे द्योतक म्हणून त्याने पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.
स्लॉबॉडान यहोवाचा साक्षीदार कसा झाला? काही काळाआधीच त्याने बॉस्नियातील युद्धाचा विभाग सोडला होता. साक्षीदारांची काही प्रकाशने त्याने वाचली असली, तरी १९९२ च्या सुरवातीस दोन साक्षीदारांनी त्याच्या घरी भेट दिली तेव्हा मात्र देवाच्या वचनातील त्याची आस्था वाढली. स्लॉबॉडानला भेट देऊन बायबलचा अभ्यास करण्याचा प्रस्ताव कोणी मांडला? तो होता मूयो, तो देखील बॉस्नियामधून आला होता, परंतु मुस्लिम म्हणून त्याचे संगोपन करण्यात आले होते. बायबल अभ्यास जसजसा प्रगमनशील झाला तसतसा, मूयो आणि स्लॉबॉडान जे एके काळी शत्रू होते, ते आता एकमेकांचा विश्वास बळकट करण्यासाठी, दररोज काही वेळ खर्च करू लागले.
युगोस्लाव्हियामध्ये पूर्वी झालेल्या युद्धाने शेकडो हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. परंतु, ब्रांकॉ, स्लॉबॉडान आणि मूयो मात्र यहोवाच्या साक्षीदारांच्या त्याच मंडळीत सुवार्तेचे पूर्णवेळेचे प्रचारक म्हणून सेवा करतात. जातीय व वांशिक संघर्षावर मात करून ते आता निर्माणकर्ता यहोवाच्या अधीन राहून शांती अनुभवित आहेत.
परंतु, हे परिवर्तन कशामुळे घडून आले? ते म्हणजे, देवावरील त्यांची प्रीती, बायबलबद्दलचा त्यांचा आदर आणि बायबल सत्याला आपल्या जीवनांत लागू करण्याची त्यांची उत्कंठा, यामुळे. जसे पवित्र शास्त्रवचन म्हणते, “देवाचे वचन सजीव, सक्रिय . . . असून मनातील विचार व हेतु ह्यांचे परीक्षक असे आहे.”—इब्रीयांस ४:१२.
[तळटीपा]
a कल्पित नावांचा उपयोग केला आहे.