वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ३/१ पृ. ८-१३
  • “माझी वाट पाहा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माझी वाट पाहा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सफन्या—एक धैर्यवान साक्षीदार
  • यहोवाच्या संतप्त क्रोधाची कारणे
  • यहोवाच्या दिवसाबद्दल शंका
  • “परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे”
  • इतर राष्ट्रांचा न्याय होतो
  • “वाट पाहा”
  • “तुझे हात गळू देऊ नको”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाच्या न्यायाचा दिवस जवळ आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • यहोवाच्या क्रोधाचा दिन येण्याआधी त्याला शोधा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • संदेष्ट्यांचे अनुकरण करा—सफन्या
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ३/१ पृ. ८-१३

“माझी वाट पाहा”

“परमेश्‍वर [यहोवा, NW] म्हणतो, ‘मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा.’”—सफन्या ३:८.

१. सफन्याद्वारे कोणता इशारा देण्यात आला होता व आज जिवंत असलेल्या लोकांसाठी तो कोणती आस्था राखून आहे?

“परमेश्‍वराचा [यहोवाचा] मोठा दिवस समीप आहे.” सा. यु. पू. सातव्या शतकाच्या मध्याला संदेष्टा सफन्याने हा इशारा दिला होता. (सफन्या १:१४) ४० किंवा ५० वर्षांच्या कालावधीत, जेरूसलेमवर तसेच यहोवाच्या लोकांना गैरवागणूक देऊन त्याच्या सार्वभौमत्वाला धुडकावून लावणाऱ्‍या राष्ट्रांवर यहोवाचा न्यायदंड बजावण्याचा दिवस आला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली. २० व्या शतकाच्या अखेरीस जगणाऱ्‍या लोकांना ही गोष्ट आस्थेची का आहे बरे? आपण अशा काळात जगत आहोत ज्यामध्ये यहोवाचा “मोठा दिवस” वेगाने जवळ येत आहे. सफन्याच्या काळाप्रमाणेच, यहोवाचा “संतप्त क्रोध” आधुनिक दिवसातील जेरूसलेम—ख्रिस्ती धर्मजगतावर—तसेच यहोवाच्या लोकांना गैरवागणूक देणाऱ्‍या व त्याच्या विश्‍वाच्या सार्वभौमत्वाला धुडकावणाऱ्‍या राष्ट्रांवर भडकणार आहे.—सफन्या १:४; २:४, ८, १२, १३; ३:८; २ पेत्र ३:१२, १३.

सफन्या—एक धैर्यवान साक्षीदार

२, ३. (अ) आपल्याला सफन्याबद्दल काय माहीत आहे व तो यहोवाचा एक धैर्यवान साक्षीदार होता हे कशावरून सूचित होते? (ब) कोणत्या वस्तुस्थिती आपल्याला सफन्याने केलेल्या भविष्यवाणीचा काळ आणि ठिकाण याचा पत्ता लावण्यास साहाय्य करतात?

२ संदेष्टा सफन्याविषयी अल्प माहिती आहे; (इब्री, त्सेफन·याहʹ) “यहोवाने लपवून ठेवलेले आहे (जपून ठेवले आहे)” असा त्याच्या नावाचा अर्थ होतो. परंतु इतर संदेष्ट्यांपासून वेगळे, सफन्याने चौथ्या पिढीपर्यंत, “हिज्कीया” पर्यंतच्या त्याच्या वंशावळीची माहिती दिली आहे. (सफन्या १:१; पडताळा यशया १:१; यिर्मया १:१; यहेज्केल १:३.) हे अतिशय असामान्य असल्यामुळे, बहुतेक विवेचनकर्ते त्याच्या खापर पणजाची ओळख विश्‍वासू राजा हिज्कीया अशी करतात. असे आहे तर मग, सफन्या राजघराण्यातला होता व यामुळे यहुदाच्या राजकुमारांसाठी त्याने उच्चारलेली शिक्षा अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावकारी ठरली असावी व हे दाखवले असेल, की तो यहोवाचा एक धैर्यवान साक्षीदार व संदेष्टा होता. जेरूसलेमच्या प्रदेश वर्णनाच्या ज्ञानाशी आणि राजसी न्यायालयात काय चालले होते त्याजशी त्याची सुपरिचितता हेच सुचवते, की त्याने कदाचित यहोवाचा न्यायदंड राजधानीतच घोषित केला असावा.—पहा सफन्या १:८-११, तळटिपा, NW.

३ सफन्याने यहुदाचे नागरी “राजपुत्र” (सरदार किंवा जनजाती प्रमुख) आणि “सरदार” यांच्याविरुद्ध ईश्‍वरी न्यायदंड घोषित केले तेव्हा त्याने स्वतः राजाचा त्याच्या टीकेत कधीही उल्लेख केला नाही, ही वास्तविकता उल्लेखनीय आहे.a (सफन्या १:८; ३:३) सफन्याने तीव्र अस्वीकृती दर्शवलेली परिस्थिती लक्षात घेता, तरुण राजा योशियाने शुद्ध भक्‍तीसाठी आधीच आपला कल दाखवला होता हे खरे असले तरीसुद्धा, त्याने धार्मिक सुधारणांना अद्याप सुरवात केली नव्हती हे स्पष्ट आहे. या सर्व गोष्टी हेच सूचित करतात, की यहुदामध्ये सा. यु. पू. ६५९ ते ६२९ पर्यंत राज्य केलेल्या योशियाच्या कारकिर्दीच्या सुरवातीच्या वर्षांदरम्यान सफन्याने भविष्यवाणी केली होती. सफन्याच्या जोशपूर्णरीत्या भविष्यवाणीने निःसंशये, तरुण योशियाला यहुदामध्ये चालू असलेली मूर्तिपूजा, हिंसाचार आणि भ्रष्टाचार यांविषयी अधिकच जागृत केले आणि मूर्तिपूजेविरुद्धच्या त्याच्या नंतरच्या मोहिमेस उत्तेजन दिले.—२ इतिहास ३४:१-३.

यहोवाच्या संतप्त क्रोधाची कारणे

४. यहुदा आणि जेरूसलेमवर यहोवाने कोणत्या शब्दांत त्याचा क्रोध प्रकट केला?

४ यहुदाचे नेते आणि रहिवाशांबद्दल तसेच यहुदाची राजधानी जेरूसलेमबद्दल संताप प्रकट करण्यासाठी यहोवाकडे उचित कारण होते. त्याचा संदेष्टा सफन्या याच्याद्वारे त्याने म्हटले: “मी आपला हात यहूदावर, यरूशलेमेच्या सर्व रहिवाश्‍यांवर चालवीन; या स्थलांतून बआलमूर्तीचे शेष नाहीतसे करीन, आणि मूर्तीचे पुजारी व याजक यांचे नावहि नाहीसे करीन; जे धाब्यांवर आकाशांतील सैन्याची पूजा करितात, जे उपासक परमेश्‍वराची शपथ वाहतात व मिलकोम मूर्तीचीहि शपथ वाहतात.”—सफन्या १:४, ५.

५, ६. (अ) सफन्याच्या काळात यहुदातील आध्यात्मिक परिस्थिती कशी होती? (ब) यहुदाच्या नागरी नेत्यांची आणि त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्‍यांची काय अवस्था होती?

५ यहुदा, बआल उपासनेच्या सुफलतेचे हिणकस विधी, दुरात्मिक ज्योतिषशास्त्र आणि खोटे दैवत मिलकोमाच्या उपासनेने मलिन झाले होते. काही सुचवतात त्याप्रमाणे मिलकोम हाच मोलख आहे तर, यहुदाच्या खोट्या उपासनेत मुलांचा बळी देण्याची किळसवाणी प्रथा देखील समाविष्ट होती. यहोवाच्या नजरेत अशा प्रकारचे धार्मिक विधी उबग आणणारे होते. (१ राजे ११:५, ७; १४:२३, २४; २ राजे १७:१६, १७) हे मूर्तिपूजक अद्यापही यहोवाच्या नावाने शपथा घेत असल्यामुळे त्यांनी त्याचा क्रोध आणखीनच स्वतःवर ओढवून घेतला. अशा प्रकारची धार्मिक अशुद्धता तो आणखी सहन करणार नव्हता व खोट्या आणि धर्मत्यागी याजकांना ठार मारणार होता.

६ शिवाय, यहुदाचे नागरी नेते भ्रष्ट होते. तिचे राजपुत्र ‘गर्जना करणाऱ्‍या अधाशी सिंहाप्रमाणे’ होते व तिचे न्यायाधीश हवऱ्‍या ‘लांडग्यांच्या’ तुल्य होते. (सफन्या ३:३) ‘धन्याचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून’ टाकल्याचा त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्‍यांवर आरोप होता. (सफन्या १:९) भौतिकवाद प्रचलित होता. पुष्कळ जण संपत्ती साठवण्यासाठी परिस्थितीचा फायदा घेत होते.—सफन्या १:१३.

यहोवाच्या दिवसाबद्दल शंका

७. सफन्याने ‘परमेश्‍वराच्या मोठ्या दिवसाची’ भविष्यवाणी किती काळ आधी केली व अनेक यहुद्यांची आध्यात्मिक स्थिती काय होती?

७ आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, सफन्याच्या दिवसांत प्रचलित असलेली नाशकारक धार्मिक परिस्थिती सूचित करते, की त्याने सा. यु. पू. ६४८ च्या सुमारास योशिया राजाने मूर्तिपूजेविरुद्धच्या मोहिमेची सुरवात करण्याआधी साक्षीदार व संदेष्टा या नात्याने कार्य केले. (२ इतिहास ३४:४, ५) यास्तव, बहुतेककरून यहुदाच्या राज्यावर “परमेश्‍वराचा [यहोवाचा] मोठा दिवस” येण्याआधी सफन्याने निदान ४० वर्षांपूर्वी भविष्यकथन केले. मध्यंतरात, अनेक यहुद्यांनी शंका बाळगल्या व निराश होऊन यहोवाची सेवा करण्यापासून “पराङमुख” झाले. “ज्यांनी परमेश्‍वराचे [यहोवाचे] चरण धरिले नाहीत व त्याचा शोध केला नाही” अशा लोकांबद्दल सफन्या बोलतो. (सफन्या १:६) स्पष्टपणे, यहुदातील लोक उदासीन होते, ते देवासोबत संबंध ठेवत नव्हते.

८, ९. (अ) यहोवा, ‘खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावलेल्या’ लोकांचे निरीक्षण का करणार होता? (ब) यहोवा यहुदाच्या रहिवाशांकडे आणि त्याच्या नागरी व धार्मिक नेत्यांकडे कोणत्या मार्गांनी लक्ष देणार होता?

८ जे लोक स्वतःला यहोवाचे लोक म्हणवून घेतात अशांचे निरीक्षण करण्याचा त्याचा उद्देश आहे हे त्याने प्रकट केले. त्याचे उपासक असल्याचा दावा करणाऱ्‍यांपैकी जे लोक मानवी कारभारांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या त्याच्या क्षमतेविषयी किंवा उद्देशांविषयी हृदयात शंका बाळगतात अशांना तो शोधून काढणार होता. त्याने म्हटले: “त्या समयी असे होईल की मी दिवट्या घेऊन यरूशलेमेची तपासणी करीन; व जे खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे मंदावले आहेत आणि आपल्या मनात म्हणतात की ‘परमेश्‍वर [यहोवा] बरे करीत नाही व वाईटहि करीत नाही,’ त्यांचा मी समाचार घेईन.” (सफन्या १:१२) ‘खाली गाळ असलेल्या द्राक्षारसासारखे (द्राक्षारस बनवण्याच्या संदर्भात) मंदावलेले’ लोक ही अभिव्यक्‍ती, पिंपाच्या तळाशी असलेल्या गाळाप्रमाणे खाली साठलेल्या व मानवजातीच्या कारभारांमध्ये जवळ येऊन ठेपलेल्या ईश्‍वरी हस्तक्षेपाच्या कोणत्याही घोषणेने विचलित न होऊ इच्छिणाऱ्‍या लोकांना सूचित करते.

९ यहूदा आणि जेरूसलेमच्या रहिवाशांकडे तसेच यहोवाच्या उपासनेत खोट्या उपासनेची भेसळ करणाऱ्‍या याजकांकडे यहोवा लक्ष देणार होता. जेरूसलेमच्या भिंतींआड, जणू काय रात्रीच्या काळोखात त्यांना सुरक्षित वाटत असेल तर तो, त्यांनी जेथे आसरा घेतला आहे त्या आध्यात्मिक अंधकारात शिरून लख्ख प्रकाश असलेल्या दिवट्यांनी त्यांना शोधून काढणार होता. पहिल्यांदा न्यायदंडाचे भयानक संदेश देऊन व मग ते न्यायदंड बजावून तो त्यांच्या धार्मिक उदासीनतेचा भंग करणार होता.

“परमेश्‍वराचा मोठा दिवस समीप आहे”

१०. ‘परमेश्‍वराच्या मोठ्या दिवसाचे’ वर्णन सफन्याने कसे केले?

१० यहोवाने सफन्याला असे घोषित करण्याची प्रेरणा दिली: “परमेश्‍वराचा [यहोवाचा] मोठा दिवस समीप आहे; तो येऊन ठेपला आहे, वेगाने येत आहे; ऐका! परमेश्‍वराचा दिवस!” (सफन्या १:१४) इशाऱ्‍याकडे कान देण्यास व शुद्ध भक्‍तीकडे परतण्यास नकार देणाऱ्‍या—याजक, राजपुत्र आणि लोक—या सर्वांसाठी निश्‍चितच कटू दिवस येणार होते. न्यायदंड बजावण्याच्या त्या दिवसाचे वर्णन करताना भविष्यवाणी पुढे म्हणते: “हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे. अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे. तटबंदीच्या नगरांविरुद्ध व उंच बुरुजांविरुद्ध रणशिंगाचा व रणशब्दाचा हा दिवस आहे.”—सफन्या १:१५, १६.

११, १२. (अ) जेरूसलेमविरुद्ध कोणता न्यायदंड पुकारण्यात आला? (ब) भौतिक धनसंपत्ती यहुद्यांना वाचवणार होती का?

११ अल्प शतकांमध्येच, बॅबिलोनचे सैन्य यहुदावर चाल करून येणार होते. जेरूसलेम त्यांच्या तावडीतून सुटणार नव्हते. त्याचे निवासी आणि व्यापारी विभाग नाश होणार होते. “‘त्या दिवशी मासळीदरवाजातून ओरडण्याचा आवाज होईल, दुसऱ्‍या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल’ असे परमेश्‍वर [यहोवा] म्हणतो. मक्‍तेशच्या [जेरूसलेमचा एक विभाग] रहिवाश्‍यांनो, आक्रंदन करा, कारण कनानाचे सर्व लोक नाश पावले आहेत, चांदीने लादलेले सर्व नाश पावले आहेत.”—सफन्या १:१०, ११, तळटीप, NW.

१२ यहोवाचा दिवस समीप होता हा विश्‍वास ठेवण्यास नकार देणारे अनेक यहुदी किफायतशीर व्यापारी साहसांमध्ये पूर्णपणे बुडाले होते. पण यहोवाने त्याच्या विश्‍वासू संदेष्ट्याद्वारे, त्यांची संपत्ती ‘लुटली जाईल, त्यांची घरे उजाड होतील,’ असे भाकीत केले. त्यांनी उत्पन्‍न केलेला द्राक्षारस ते पिणार नव्हते किंवा “परमेश्‍वराच्या [यहोवाच्या] क्रोधदिवशी त्यांच्या सोन्यारुप्याने त्यांचा बचाव होणार” नव्हता.—सफन्या १:१३, १८.

इतर राष्ट्रांचा न्याय होतो

१३. मोआब, अम्मोन आणि असेरियाविरुद्ध सफन्याने कोणता न्यायदंड पुकारला?

१३ यहोवाने त्याचा संदेष्टा सफन्या याच्याद्वारे, त्याच्या लोकांशी गैरवागणूक केलेल्या राष्ट्रांविरुद्ध देखील त्याचा क्रोध व्यक्‍त केला. त्याने घोषित केले: “यवाबाने केलेली निंदा मी ऐकली आहे, अम्मोन वंशजांनी केलेली निर्भर्त्सना मी ऐकली आहे, त्यांनी माझ्या लोकांची निंदा केली आहे आणि त्यांच्या सरहद्दीवर त्यांनी आपल्या महत्त्वाचा तोरा मिरविला आहे; म्हणून सेनाधीश परमेश्‍वर, इस्राएलचा देव, [यहोवा] आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, ‘मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोऱ्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; . . . . तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्‍शूरचा नाश करील. निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील.’”—सफन्या २:८, ९, १३.

१४. इस्राएल लोकांना आणि त्यांचा देव यहोवा याला परराष्ट्रीयांनी ‘तुच्छ लेखले’ याबद्दलचा कोणता पुरावा आहे?

१४ मोआब आणि अम्मोन इस्राएलचे जुने वैरी होते. (पडताळा शास्ते ३:१२-१४.) पॅरिसमधील लुवेअर संग्रहालयातील एका मोआबी शिलेवर, मोआबी राजा मेशा याचे एक बढाईखोर वाक्य कोरलेले आहे. त्याचा देव खेमोश याच्या साहाय्याने त्याने पुष्कळ इस्राएली शहरे जिंकल्याचे तो गर्वाने सांगतो. (२ राजे १:१) अम्मोन्यांनी त्यांचा देव मिलकोमच्या नावाने गाद या इस्राएलच्या क्षेत्रावर ताबा मिळवल्याचे सफन्याच्या समकालीन यिर्मयाने म्हटले आहे. (यिर्मया ४९:१) सफन्याच्या दिवसाच्या एक शतकाआधी, असेरियाच्या बाबतीत, पाचव्या शल्मनेसर राजाने समारियाला वेढा घालून त्यावर कब्जा मिळवला होता. (२ राजे १७:१-६) थोड्या वेळानंतरच, सन्हेरीब राजाने यहुदावर हल्ला केला, तटबंदी असलेली अनेक शहरे घेतली आणि जेरूसलेमला धमकी देखील दिली. (यशया ३६:१, २) असेरियाच्या राजाच्या प्रवक्‍त्‌याने, जेरूसलेमला स्वाधीन करण्याची मागणी करताना खरोखरच यहोवाविरुद्ध त्याच्या लोकांना तुच्छ मानले.—यशया ३६:४-२०.

१५. यहोवा त्याच्या लोकांना तुच्छ मानणाऱ्‍या राष्ट्रांच्या दैवतांचा कशाप्रकारे पाणउतारा करणार होता?

१५ स्तोत्र ८३, अनेक राष्ट्रांचा उल्लेख करते ज्यामध्ये मोआब, अम्मोन आणि असेरियाचा देखील समावेश होतो, त्यांनी इस्राएलला तुच्छ मानले व घमेंडीने म्हटले: “चला, आपण त्यांचा असा विध्वंस करू की, ते राष्ट्र म्हणून राहणार नाहीत; म्हणजे इस्राएलाच्या नावाची आठवण पुढे राहणार नाही.” (स्तोत्र ८३:४) सेनाधीश यहोवा ह्‍या सर्व घमेंडी राष्ट्रांचा आणि त्यांच्या दैवतांचा पाणउतारा करील हे संदेष्टा सफन्याने धैर्याने घोषित केले. “त्यांनी सेनाधीश परमेश्‍वराच्या [यहोवाच्या] लोकांस तुच्छ मानिले व त्यांजवर तोरा मिरविला म्हणून त्यांच्या गर्वाचे त्यांस हे प्रतिफळ मिळेल. परमेश्‍वर त्यांस भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपआपल्या स्थानी त्याला भजेल.”—सफन्या २:१०, ११.

“वाट पाहा”

१६. (अ) यहोवाचा समीप येणारा दिवस कोणासाठी आनंदाचा स्रोत होता व का? (ब) या विश्‍वासू शेषांना कोणती प्रेरक आज्ञा देण्यात आली?

१६ यहुदा आणि जेरूसलेमच्या नेत्यांमध्ये व अनेक रहिवाशांमध्ये आध्यात्मिक निरुत्साह, संशयवाद, मूर्तिपूजा, भ्रष्टाचार आणि भौतिकवाद चालू होता तरीदेखील काही विश्‍वासू यहुद्यांनी सफन्याच्या इशारेवजा भविष्यवाणींकडे कान दिला. यहुदाचे सरदार, राजपुत्र आणि याजक ज्या किळसवाण्या प्रथा आचरित होते त्यामुळे ते दुःखित होते. या निष्ठावान लोकांना सफन्याचे अभिप्राय सांत्वनाचे स्रोत ठरले. यहोवाचा जवळ येणारा दिवस, त्यांच्यासाठी चिंतेचे कारण नसून आनंदाचा स्रोत होता कारण त्यामुळे अशा प्रकारच्या घृणास्पद प्रथा थांबवल्या जाणार होत्या. या विश्‍वासू शेषांनी यहोवाची ही प्रेरक आज्ञा ऐकली: “परमेश्‍वर [यहोवा] म्हणतो ‘मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा कारण राष्ट्रे एकत्र जमवावी, राज्ये एकत्र मिळवावी; त्यावर माझा क्रोध, माझा संतप्त क्रोध पाडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.’”—सफन्या ३:८.

१७. सफन्याने घोषित केलेले न्यायदंडाचे संदेश राष्ट्रांवर कधी आणि कसे पूर्ण होऊ लागले?

१७ ज्यांनी या इशाऱ्‍याकडे कान दिला त्यांना याबद्दल आश्‍चर्य वाटले नाही. पुष्कळ जण सफन्याची भविष्यवाणी पूर्ण होईपर्यंत जिवंत होते. सा. यु. पू. ६३२ मध्ये, निनवेवर कब्जा मिळवण्यात आला व बॅबिलोनी, मेद तसेच उत्तरेकडील टोळक्यांच्या, कदाचित सायथियन लोकांच्या युतीद्वारे त्याचा नाश करण्यात आला. इतिहासकार विल ड्युरंट कथन करतात: “सायसरेझच्या अधिकाराखालील मेदच्या सैन्याशी संयुक्‍त असलेले नबोपोलास्सरच्या अधिकाराखालील बॅबिलोनचे कोणतेही सैन्य तसेच कॉकसस येथील सायथियनची युती यांनी अगदी सहज व जलदगतीने उत्तरेतील नगरदुर्ग हस्तगत केले. . . . एकाच तडाख्यात असेरिया इतिहासातून नाहीसे झाले.” सफन्याने अगदी हेच भविष्यकथन केले होते.—सफन्या २:१३-१५.

१८. (अ) जेरूसलेमवर कशा प्रकारे न्यायदंडाची अंमलबजावणी झाली व का? (ब) मोआब आणि अम्मोनविषयी सफन्याची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

१८ यहोवाची वाट पाहणारे अनेक यहुदी, यहुदा व जेरूसलेमवर त्याच्या न्यायदंडाची अंमलबजावणी पाहण्यासाठी देखील जिवंत राहिले. सफन्याने जेरूसलेमविषयी भविष्यकथन केले होते: “ती बंडखोर, भ्रष्ट व बलात्कारी नगरी, तिला धिक्कार असो! तिने वचन मानिले नाही, बोध घेतला नाही; परमेश्‍वरावर [यहोवावर] श्रद्धा ठेविली नाही; ती आपल्या देवासमीप आली नाही.” (सफन्या ३:१, २) जेरूसलेमच्या अविश्‍वासूपणामुळे, त्याला दोन वेळा बॅबिलोनी लोकांनी वेढा घातला आणि सरतेशेवटी सा. यु. पू. ६०७ मध्ये हस्तगत करून त्याचा नाश करण्यात आला. (२ इतिहास ३६:५, ६, ११-२१) मोआब आणि अम्मोनच्या बाबतीत, यहुदी इतिहासकार जोसफसनुसार जेरूसलेमचा पाडाव झाल्याच्या पाचव्या वर्षी, बॅबिलोनी लोकांनी त्यांच्याबरोबर युद्ध केले व त्यांच्यावर विजय मिळवला. भविष्यकथन केल्याप्रमाणे तेही नंतर अस्तित्वविरहित झाले.

१९, २०. (अ) यहोवाची वाट पाहणाऱ्‍यांना त्याने प्रतिफळ कसे दिले? (ब) या घटनांचा संबंध आपल्याशी का आहे आणि पुढील लेखात कशावर चर्चा करण्यात येईल?

१९ सफन्याच्या भविष्यवाणीच्या या आणि इतर तपशीलांची पूर्णता, जे यहोवाची वाट पाहत राहिले त्या यहुदी आणि गैरयहुद्यांसाठी विश्‍वास बळकट करणारा अनुभव ठरला. यहूदा आणि जेरूसलेमवर गुजरेल्या नाशातून जे बचावले त्यांच्यापैकी यिर्मया, इथियोपियन एबद-मलेख आणि रेखाब वंशातील योनादाबाचे घराणे हे होत. (यिर्मया ३५:१८, १९; ३९:११, १२, १६-१८) यहोवावर कायम थांबून राहणारे यहुदी आणि त्यांची मुले त्या आनंदी शेषांचा भाग बनले ज्यांची सा. यु. पू. ५३७ मध्ये बॅबिलोनमधून सुटका करण्यात आली व जे शुद्ध उपासनेची पुनर्स्थापना करण्यासाठी यहुदाला परतले.—एज्रा २:१; सफन्या ३:१४, १५, २०.

२० या सर्वांचा आपल्या काळाशी काय संबंध? सफन्याच्या दिवसांतील परिस्थिती अनेक मार्गांनी आज ख्रिस्ती धर्मजगतात होत असलेल्या घृणास्पद गोष्टींच्या समानतेत आहे. शिवाय, त्या काळातील यहुद्यांनी दाखवलेली मनोवृत्ती आज कधीकधी यहोवाच्या लोकांमध्ये सुद्धा आढळणाऱ्‍या मनोवृत्तीच्या सदृश्‍य आहे. त्या अशा बाबी आहेत ज्यांची चर्चा पुढील लेखात केली जाईल.

[तळटीपा]

a असे दिसत होते, की “सरदार” ही संज्ञा सर्व राजसी राजपुत्रांना सूचित होते, कारण योशियाचे स्वतःचे पुत्र त्यावेळी अतिशय लहान होते.

उजळणीद्वारे

◻ सफन्याच्या दिवसांमध्ये यहुदातील धार्मिक स्थिती काय होती?

◻ नागरी नेत्यांमध्ये कोणत्या परिस्थिती होत्या व अनेक लोकांची मनोवृत्ती काय होती?

◻ राष्ट्रांनी यहोवाच्या लोकांना कशा प्रकारे तुच्छ मानले?

◻ सफन्याने यहुदा आणि इतर राष्ट्रांना कोणता इशारा दिला?

◻ यहोवाची वाट पाहणाऱ्‍यांना कशा प्रकारे प्रतिफळ देण्यात आले?

[९ पानांवरील चित्रं]

मोआबचा राजा मेशाने प्राचीन इस्राएलविरुद्ध दूषणास्पद शब्द उच्चारल्याची खात्री मोआबी शिला देते

[१० पानांवरील चित्रं]

सफन्याच्या भविष्यवाणीला पाठिंबा देत, बॅबिलोनी इतिहासाचा हा शिलालेख, सैन्यांच्या युतीने केलेल्या निनवेच्या नाशाचा अहवाल देतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा