देवाला तुमची काळजी आहे
चाळीशीच्या उत्तरार्धातील एक ख्रिस्ती स्त्री, मेरी, हिने तिच्या जीवनात खूप सोसले आहे. तिच्या पतीच्या व्यभिचारामुळे दहा वर्षांपेक्षा अधिक काळापूर्वी त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, तिच्या चार मुलांची एकटी पालक या नात्याने तिची भूमिका पार पाडण्यासाठी ती झटली. पण ती अजूनही एकटीच आहे व काहीवेळा हा एकाकीपणा तिला असह्य होतो. मेरी विचार करते, ‘देवाला, माझी किंवा माझ्या अनाथ मुलांची काळजीच नाही, असे तर नाही?’
यासारख्या संकटमय स्थिती तुम्ही अनुभवल्या असतील किंवा नसतील तरीसुद्धा, तुम्हाला मेरीच्या भावनांविषयी निश्चितच सहानुभूती वाटू शकेल. आपण सर्वच कठीण परिस्थितींतून गेलो आहोत व अशा वेळेस, यहोवा आपल्यासाठी नेमके केव्हा व कसे कार्य करील याविषयी आपण विचार केला असेल. यांतील काही अनुभव, आपण देवाच्या नियमांचे पालन करतो याचे थेट परिणाम असतात. (मत्तय १०:१६-१८; प्रेषितांची कृत्ये ५:२९) इतर, आपण सैतानाच्या आधिपत्याखालील जगात राहात असलेले अपरिपूर्ण मानव आहोत या कारणाने घडतात. (१ योहान ५:१९) प्रेषित पौलाने लिहिले: “सबंध सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”—रोमकर ८:२२.
तथापि, तुमच्यासमोर एखादी कठीण परीक्षा उभी आहे याचा अर्थ असा होत नाही, की यहोवाने तुम्हाला त्यागले आहे किंवा तुमच्या कल्याणात त्याला रस नाही. तुम्ही याबाबतीत कशाप्रकारे खात्री बाळगू शकता? देवाला तुमची काळजी आहे हे कशावरून दिसते?
एक प्राचीन उदाहरण
बायबल, वैयक्तिक या नात्याने लोकांबद्दल यहोवाला काळजी आहे याला स्पष्ट पुरावा देते. दाविदास विचारात घ्या. यहोवाला या तरुण मेंढपाळाबद्दल वैयक्तिक आस्था होती व त्याला तो “आपल्या मनासारखा मनुष्य” वाटला. (१ शमुवेल १३:१४) कालांतराने, दावीद, राजा असताना यहोवाने त्याला हे अभिवचन दिले: ‘जिकडे तू जाशील तिकडे मी तुझ्याबरोबर राहीन.’—२ शमुवेल ७:९.
दावीद, सर्व अडचणींपासून मुक्त, “सुदैवी” असे जीवन जगला असा याचा अर्थ होतो का? नाही, दाविदाने त्याच्या राज्यकारकीर्दीआधी आणि तिच्या दरम्यानसुद्धा कठीण परीक्षांना तोंड दिले. राजा बनण्याआधी अनेक वर्षांपर्यंत, खूनी राजा शौलाद्वारे त्याचा निरंतर पाठलाग करण्यात आला. दाविदाच्या जीवनाच्या या काळात, त्याने लिहिले: “माझा जीव सिंहांमध्ये पडला आहे; ज्यांचे दात केवळ भाले व बाण आहेत . . . अशा जाज्वल्य मनुष्यांमध्ये देखील मी पडून राहीन.”—स्तोत्र ५७:४.
असे असतानाही, दाविदाला अशा संकटमय परिस्थितींत शेवटपर्यंत यहोवाच्या वैयक्तिक काळजीविषयी खात्री होती. त्याने प्रार्थनेत यहोवाला म्हटले, “माझी भटकण्याची ठिकाणे तू मोजिली आहेत.” होय, दाविदाच्या नजरेत जणू यहोवाने त्या संपूर्ण कठीण परीक्षेचा अहवाल ठेवला होता. दाविदाने मग पुढे म्हटले: ‘माझी आसवे तू आपल्या बुधलीत भरून ठेव. तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?’a (स्तोत्र ५६:८) दाविदाने या उदाहरणाचा उपयोग करून, यहोवाला केवळ परिस्थितीची नव्हे तर तिच्या भावनात्मक परिणामाचीसुद्धा जाणीव होती, यावर आपला विश्वास प्रदर्शित केला.
दाविदाच्या जीवनाच्या शेवटास, तो आपल्या व्यक्तिगत अनुभवामुळे असे लिहू शकला: “परमेश्वर [यहोवा, NW] मनुष्याची गति स्थिर करितो, आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही कारण परमेश्वर [यहोवा] त्याला हात देऊन सावरील.” (स्तोत्र ३७:२३, २४) तुम्हावर येत असलेल्या परीक्षा अंतहीन व अविरत असल्या तरीही, यहोवा तुमच्या धीराची दखल घेतो व त्याचे मोल जाणतो याविषयी तुम्ही आश्वासित असू शकता. पौलाने लिहिले: “तुमचे कार्य व तुम्ही पवित्र जनांची केलेली व करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास तो अन्यायी नाही.”—इब्रीयांस ६:१०.
त्याशिवाय, यहोवा तुम्हाला तुमच्या मार्गातील कोणत्याही समस्येपुढे धीर धरण्याची शक्ती देऊन तुमच्यासाठी कार्य करू शकतो. “नीतिमानाला फार कष्ट होतात,” असे दाविदाने लिहिले, “तरी परमेश्वर [यहोवा] त्या सर्वांतून त्याला सोडवितो.” (स्तोत्र ३४:१९) खरोखरच यहोवाचे नेत्र, “अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो,” असे बायबल आम्हास सांगते.—२ इतिहास १६:९.
यहोवाने तुम्हास आकर्षले आहे
यहोवा वैयक्तिक काळजी बाळगतो याचा अधिक पुरावा येशूच्या शब्दांत पहावयास मिळतो. “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही,” असे तो म्हणाला. (योहान ६:४४) होय, येशूच्या यज्ञार्पणाचे लाभ मिळवण्यासाठी यहोवा लोकांना व्यक्तिगतपणे साहाय्य करतो. कशाप्रकारे? प्रामुख्यत्वे, राज्याच्या प्रचार कार्यामार्फत. खरोखरच, हे कार्य ‘सर्व राष्ट्रांस साक्ष’ असे ठरते पण तरीसुद्धा, ते व्यक्तिगत स्वरूपात लोकांपर्यंत पोहंचते. तुम्ही सुवार्तेचा संदेश ऐकत आहात व त्यास प्रतिसाद देत आहात, हाच यहोवाला तुम्हाबद्दल असलेल्या वैयक्तिक कळकळीचा पुरावा आहे.—मत्तय २४:१४.
यहोवा, पवित्र आत्म्याद्वारे लोकांना त्याचा पुत्र व सार्वकालिक जीवनाची आशा यांकडे आकर्षतो. हे प्रत्येक जणास कोणत्याही उपजत मर्यादा व अपरिपूर्णता असल्या तरीसुद्धा, आध्यात्मिक सत्यांना आत्मसात करण्यास व त्यांचे अवलंबन करण्यास समर्थ करते. खरोखर, पवित्र आत्म्याच्या मदतीविना एखाद्याला देवाचे उद्देश समजू शकत नाहीत. (१ करिंथकर २:११, १२) पौलाने थेस्सलनीकाकरांस लिहिल्याप्रमाणे, “सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही.” (२ थेस्सलनीकाकर ३:२) यहोवाद्वारे आकर्षले जाण्याची स्वेच्छा प्रगट करणाऱ्यांनाच केवळ तो आपला आत्मा देऊ करतो.
यहोवा लोकांना आकर्षतो कारण तो त्यांच्यावर व्यक्तिशः प्रेम करतो व त्यांनी तारण साधावे अशी त्याची इच्छा आहे. यहोवा बाळगत असलेल्या वैयक्तिक काळजीचा केवढा हा भक्कम पुरावा! येशूने म्हटले: “ह्या लहानांतील एकाचाहि नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही.” (मत्तय १८:१४) होय, देवाच्या नजरेत प्रत्येक जण एक पृथक व्यक्ती या नात्याने महत्त्वपूर्ण आहे. या कारणास्तव पौल लिहू शकला: “तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.” (रोमकर २:६) तसेच प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५.
येशूचे चमत्कार
देवाला मानवांमध्ये असलेली वैयक्तिक आस्था, त्याचा पुत्र येशू, याने केलेल्या चमत्कारांतून मर्मभेदकपणे प्रदर्शित झाली. बरे करण्याच्या या कृत्यांच्या जोडीला कळकळ होती. (मार्क १:४०, ४१) “पित्याला जे काही करितांना पाहतो त्यावाचून,” येशूला “काहीहि स्वतः होऊन करिता येत” नसल्यामुळे त्याचा कळवळा यहोवाला आपल्या प्रत्येक सेवकाबद्दल वाटणाऱ्या चिंतेचे एक हृदयस्पर्शी चित्र रेखाटतो.—योहान ५:१९.
मार्क ७:३१-३७ येथे नमूद असलेल्या येशूच्या एका चमत्काराचा वृत्तान्त लक्षात घ्या. येथे येशूने एका बहिऱ्या-तोतऱ्या माणसास बरे केले. बायबल सांगते की, ‘त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेले.’ त्यानंतर, “वर स्वर्गाकडे पाहून त्याने उसासा टाकला व म्हटले, इप्फाथा, म्हणजे मोकळा हो.”
येशूने या माणसाला लोकांपासून एकीकडे का नेले बरे? बहिऱ्या-तोतऱ्या व्यक्तीला लोकांपुढे लाजल्यासारखे होण्याची शक्यता आहे. येशूला या माणसाची अडचण लक्षात आली असेल व या कारणास्तव त्याला एकांतात बरे करणे येशूला योग्य वाटले असावे. “ही सबंध घटना दाखवून देते की येशूने त्या माणसाकडे केवळ एक प्रकरण या दृष्टीने पाहिले नाही; त्याने त्यास एक व्यक्ती या दृष्टीने पाहिले” असे एक बायबल विद्वान निरीक्षण करतात. “त्या माणसाची एक खास गरज व एक खास समस्या होती आणि त्याच्या भावना दुखावू नये व त्याला समजावे अशा रितीने, येशू त्याजसोबत अत्यंत कोमलतेने वागला.”
येशूला लोकांसाठी वैयक्तिक कळवळा होता हे या वृत्तान्तावरून स्पष्ट होते. त्याला तुमच्या बाबतीतही तितकाच रस आहे याविषयी तुम्ही खात्री बाळगू शकता. त्याचा बलिदानरूपी मृत्यू, मुक्त करता येण्याजोग्या मानवजातीच्या सबंध जगाबद्दल त्याला असलेल्या प्रेमाची अभिव्यक्ती होता हे खरे. तथापि, तुम्ही पौलासारखे त्या कृत्याला व्यक्तिगत दृष्टीने पाहू शकता, त्याने लिहिले: ‘देवाच्या पुत्राने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.’ (गलतीकर २:२०) तसेच, “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे,” असे येशूने म्हटल्यामुळे यहोवाला त्याच्या सेवकांपैकी प्रत्येकाविषयी अशीच आस्था आहे याची आपण खात्री बाळगू शकतो.—योहान १४:९.
यहोवा प्रतिफळ देणारा बनतो
देवाला ओळखणे, यात बायबलमध्ये प्रगट केल्याप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पैलूबद्दल जाणून घेणे अंतर्भूत आहे. यहोवा या नावाचाच अर्थ, “तो व्हावयास लावतो” असा होतो, म्हणजेच स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी यहोवा त्याच्या मनाप्रमाणे काहीही होऊ शकतो. सबंध इतिहासात त्याने निरनिराळ्या भूमिका पार पाडल्या आहेत ज्यांत निर्माणकर्ता, पिता, सार्वभौम प्रभू, मेंढपाळ, सेनाधीश यहोवा, प्रार्थना ऐकणारा, शास्ता, महान शिक्षक व सोडविणारा या भूमिका समाविष्ट आहेत.b
देवाच्या नावाचा पूर्ण अर्थ जाणण्यासाठी आपण प्रतिफळ देणारा या भूमिकेतही यहोवाला ओळखले पाहिजे. पौलाने लिहिले: “विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्रीयांस ११:६.
यहोवाने, आज त्याची मनोभावे सेवा करण्याचे ठरवतात अशांना, परादीस पृथ्वीवर सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले आहे. त्या महान अभिवचनाच्या पूर्ततेची वाट पाहणे स्वार्थीपणाचे नाही तसेच स्वतःला तेथे राहात असल्याची कल्पना करणे देखील फाजील धाडसी होण्यासारखे नाही. मोशेची “दृष्टी प्रतिफळावर होती.” (इब्रीयांस ११:२६) पौलाने देखील अशाचप्रकारे, अभिषिक्त ख्रिश्चनांसाठी देवाने केलेल्या अभिवचनाच्या पूर्ततेची आस धरली. त्याने लिहिले: “ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो.”—फिलिप्पैकर ३:१४.
तुम्हीसुद्धा, धीर धरणाऱ्यांना यहोवा ज्या प्रतिफळाचे अभिवचन देतो त्याची आस धरू शकता. देवाची तुम्हाला असलेली ओळख व त्याच्या सेवेत तुमचा धीर, यांत त्या प्रतिफळाची वाट बघणे अविभाज्यपणे गोवलेले आहे. यास्तव, यहोवाने तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशीर्वादांवर दररोज मनन करा. सुरवातीला उल्लेखण्यात आलेल्या मेरीने असे करण्यासाठी विशेष प्रयास केले आहेत. ती म्हणते, “येशूचे खंडणी यज्ञार्पण मला लागू होते या गोष्टीचा मी अलीकडेच, माझ्या जीवनात पहिल्यांदा स्वीकार केला. यहोवा, माझी एक व्यक्ती या नात्याने काळजी घेतो असे मला वाटू लागले आहे. मी २० पेक्षा अधिक वर्षांपासून ख्रिस्ती आहे, पण यावर मात्र मी अलीकडेच विश्वास करू लागले आहे.”
यहोवा त्याच्या लोकांबद्दल, एक समूह या नात्यानेच नव्हे तर व्यक्तिशः सुद्धा काळजी करतो हे बायबलचा अभ्यास व त्यावर अंतःकरणपूर्वक मनन करण्याद्वारे मेरीला, तसेच इतर लाखो लोकांना समजू लागले आहे. प्रेषित पेत्राला याबद्दल एवढी खात्री होती की यामुळे त्याने लिहिले: “त्याच्यावर [देवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) होय, देवाला तुमची काळजी आहे!
[तळटीपा]
a बुधली म्हणजे पाणी, तेल, दूध, द्राक्षारस, लोणी व चीज ठेवण्यासाठी जनावरांच्या कातडीपासून तयार केलेले पात्र. जुन्या काळातील बुधल्या, आकार व प्रकारात वेगवेगळ्या होत्या, त्यातील काही, कातडीच्या पिशव्या होत्या व इतर, बूच असलेली निमूळती पात्रे होती.
b शास्ते ११:२७; स्तोत्र २३:१; ६५:२; ७३:२८; ८९:२६; यशया ८:१३; ३०:२०; ४०:२८; ४१:१४, पाहा; तसेच वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी द्वारा प्रकाशित, पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर—संदर्भांसहित, (इंग्रजी) पुरवणी 1J, पृष्ठ १५६८ देखील पाहा.
[६ पानांवरील चौकट]
पुनरुत्थान—देवाला काळजी आहे याचा पुरावा
देवाला प्रत्येक व्यक्तीबद्दल असलेल्या आस्थेचा खात्री देणारा पुरावा बायबलमध्ये योहान ५:२८, २९ [NW] या वचनांत आढळतो. त्यात म्हटले आहे: “ह्याविषयी आश्चर्य करू नका; कारण स्मृती कबरेतील सर्व माणसे [येशूची] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.”
येथे टेʹफोस (कबर) या शब्दाऐवजी, ने·मिʹऑन (स्मृती कबर) हा ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे ही बाब मनोवेधक आहे. टेʹफोस हा शब्द निव्वळ दफनविधीचा अर्थ ध्वनित करतो. परंतु, ने·मिʹऑन हा शब्द, मृत व्यक्तीच्या जीवनाचा अहवाल स्मरणात आहे असे सूचित करतो.
यासंबंधाने, पुनरुत्थानासाठी यहोवाला काय करावे लागेल याचा जरा विचार करा. एखाद्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी, त्याला या व्यक्तीबद्दल सर्वकाही माहीत असले पाहिजे—यात त्याची किंवा तिची उपजत वैशिष्ट्ये व संपूर्ण स्मरणशक्ती समाविष्ट आहे. हे शक्य झाले तरच या व्यक्तीला तिची पूर्वीची ओळख पुन्हा देता येईल.
अर्थात, हे मानवी दृष्टिकोनातून असंभव आहे, पण “देवाला सर्व काही शक्य आहे.” (मार्क १०:२७) कोणा व्यक्तीच्या हृदयात नेमके काय आहे हे सुद्धा तो ओळखू शकतो. एखादी व्यक्ती अनेक शतकांपासून मृत असली तरीसुद्धा, देवाला तिची अक्षय स्मृती आहे; ती कधीच विरत नाही. (ईयोब १४:१३-१५) म्हणूनच, अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा उल्लेख करताना, ते मृत्यू पावल्यानंतर कित्येक शतकांनंतरही येशू असे म्हणू शकला की, यहोवा “मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.”—(तिरपे वळण आमचे.) लूक २०:३८.
मृत झालेले कोट्यावधी लोक संपूर्ण तपशीलासह यहोवा देवाच्या स्मृतीत आहेत. यहोवाला मानवांबद्दल व्यक्तिशः काळजी आहे याचा हा केवढा सबळ पुरावा!
[७ पानांवरील चित्रं]
येशूने ज्यांना बरे केले त्या लोकांबद्दल त्याने वैयक्तिक आस्था बाळगली