यहोवाने आम्हाला केव्हाही त्यागले नाही
नाशो डोरी यांच्याद्वारे निवेदित
एमब्रेश्तान, हे ग्रीसपासून जवळच असणाऱ्या उत्तरेकडील अल्बेनियातील एक लहानसे डोंगराळ खेडे आहे. माझा त्या ठिकाणी १९०७ मध्ये जन्म झाला. पाच वर्षांचा असताना ग्रीक शाळेत जाण्यास मी सुरवात केली, परंतु पहिल्या जागतिक युद्धाच्या दरम्यान इटालियन सैन्याने अल्बेनियामध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्या शालेय शिक्षणात व्यत्यय आला. युद्धानंतर माझ्या शालेय शिक्षणास मी पुन्हा एकवार सुरवात केली, परंतु आता मी अल्बेनियन भाषेत शिक्षण घेत होतो.
माझ्या पालकांना धर्मामध्ये विशेष रस नव्हता, तरी देखील ते अल्बेनियन ऑर्थडॉक्स चर्चच्या परंपरांचे पालन करीत होते. माझे मोठे काका एमब्रेश्तान येथे पाळक असल्यामुळे मी तेथे काम केले आणि त्या ठिकाणी काय चालत होते याचे प्रथमदर्शन मला तेथे घडले. तेथील धार्मिक विधी अगदीच अर्थहीन होते आणि त्या ठिकाणचा दांभिकपणा मला त्रासदायक वाटू लागला.
माझ्या पालकांनी स्थानिक वहिवाटीनुसार माझ्या विवाहाकरता एका तरुण मुलीची निवड केली. ग्रॅबोव्हा नामक नजीकच्या खेड्यात ॲरजिरो राहत होती आणि १९२८ मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो, त्यावेळी ती १८ वर्षांची होती.
बायबल सत्य शिकणे
माझा चुलत भाऊ संयुक्त संस्थाने येथून भेट देण्यास आला होता त्यावेळी मी त्याच्याकडे ऑर्थडॉक्स चर्चविषयी तक्रार केली. त्यावर त्याने उत्तर दिले, “अमेरिकेत माझ्या घराच्या शेजारी लोकांचा असा एक गट आहे ज्यांचे चर्च नसून देखील ते बायबलचा अभ्यास करतात.” चर्चविना बायबल अभ्यास करण्याची कल्पना मला आवडली. मी त्याला काही बायबल साहित्य पाठविण्याकरता सांगितले.
सुमारे एक वर्षानंतर मला मिलवॉकी, विसकॉनसिन येथून एक पार्सल मिळाले, तोपर्यंत आमच्या या संभाषणाचा मला पूर्णपणे विसर पडला होता. त्या पार्सलमध्ये देवाचे तंतुवाद्य हे अल्बेनियन भाषेतील पुस्तक आणि ग्रीक भाषेतील टेहळणी बुरूज होते. ते पुस्तक मी वरवर चाळून पाहिले तेव्हा मला त्यात चर्चचा संदर्भ निदर्शनास आला. त्यामुळे मी हताश झालो. ‘मला चर्चबरोबर कोणतेही कर्तव्य नाही,’ मी स्वतःलाच म्हटले. त्यामुळे मी त्या पुस्तकाचे संपूर्ण वाचन केले नाही.
सन १९२९ मध्ये मी लष्करात भरती झालो आणि मला अल्बेनियाची राजधानी असलेल्या शहरात म्हणजे तिराना येथे पाठविण्यात आले. त्या ठिकाणी माझी भेट स्टॅथी मुसी याबरोबर झाली जो ग्रीक बायबलचे वाचन करीत होता. “तुम्ही चर्चला जाता का?” मी विचारले. “नाही,” त्याने उत्तर दिले. “मी चर्चला जाणे सोडून दिले आहे. मी आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांपैकी एक आहे.” रविवारी मी आणि आणखी एक सैनिक स्टॅथीसह सभेला गेलो. खरे चर्च एक इमारत किंवा धर्म नसून ते, ख्रिस्ताच्या अभिषिक्त सेवकांनी बनलेले आहे हे मी तेथे शिकलो. देवाचे तंतुवाद्य काय म्हणत होते, ते मला आता उमगले.
सन १९२० च्या दशकाच्या मध्यास नाशो आयड्रीझी आणि स्पायरो रूहो संयुक्त संस्थानांतून परत आले होते आणि ते तेथे शिकलेल्या सत्यांचा येथे प्रसार करत होते. तिराना येथे, बोटांवर मोजण्याइतक्या बायबल विद्यार्थ्यांबरोबर सभांना उपस्थित राहण्यास मी सुरवात केली. यहोवाची संघटना मला सापडली होती, याची स्पष्ट जाणीव मला लवकरच झाली. यास्तव ऑगस्ट ४, १९३० रोजी जवळच असणाऱ्या नदीमध्ये मी बाप्तिस्मा घेतला.
एमब्रेश्तान येथे परतल्यानंतर मी माझ्या चर्मकाराच्या उद्योगास लागलो. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शिकलेल्या सत्यांची सहभागिता इतरांसोबत करण्यासही मी सुरवात केली. मी त्यांना सांगत असे: “येशू ख्रिस्त चर्चमधील मूर्तींप्रमाणे नाही. तो जिवंत आहे!”
विरोध असतानाही प्रचार
अहमद बे जोग्ये याने १९२५ मध्ये कब्जा घेतला आणि स्वतःस राजा जोग पहिला असे घोषित करून १९३९ पर्यंत राज्य केले. मानव प्राधिकारासंदर्भात असणाऱ्या त्याच्या मंत्र्याने आमच्या ख्रिस्ती कार्यास अनुमती दिली. तरी देखील आमच्यासमोर समस्या होत्याच. रोममधील पोपबरोबर सलोख्याचे संबंध असणारा मुसॉ जुका, हा अंतर्गत व्यवस्था पाहणारा मंत्री याचे मूळ कारण होता. जुकाने केवळ तीन धर्म—मुस्लिम, ऑर्थडॉक्स आणि रोमन कॅथलिक मान्यताप्राप्त असल्याचा आदेश दिला. पोलिसांनी आमची पुस्तके ताब्यात घेण्याचा आणि आमचे प्रचार कार्य थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले.
सन १९३० च्या दशकाच्या दरम्यान अल्बेनियातील बरॉट नामक मोठ्या शहराला मी बहुतेक वेळा भेटी दिल्या ज्या ठिकाणाहून मिहल स्वेसी आमच्या प्रचार कार्याचे मार्गदर्शन करीत असत. आम्ही संपूर्ण देशात प्रचार दौऱ्यांची व्यवस्था केली. एकदा मला दोन सप्ताहांकरता श्कोडर नगरामध्ये पाठविण्यात आले ज्याठिकाणी मला पुष्कळ साहित्याचे वाटप करता आले. आमच्या गटाने १९३५ मध्ये कालसिरिया नगरात प्रचार करता यावा म्हणून एक बस भाड्याने घेतली. अल्बेनियात लांब पल्ल्याचा दौरा परमेट, लेस्कोविक, एर्सेकी, कॉरचा, पॉग्रॉडेट्स आणि एलबसॉन या नगरांसाठी आयोजित करण्यात आला होता. येशूच्या मृत्यूचा स्मारक दिन पाळण्याकरता आम्ही तिराना येथे हा दौरा अगदी वेळेवर संपविला.
आध्यात्मिकरीत्या मजबूत राहण्याकरता आम्हाला आध्यात्मिक अन्नाच्या पुरवठ्याने साह्य पुरविले. सन १९३० पासून १९३९ पर्यंत मला ग्रीक टेहळणी बुरूज नियमितरीत्या मिळाले प्रत्येक दिवशी किमान एक तास तरी बायबलचे वाचन करावे हे देखील माझे ध्येय होते आणि ते मी माझी दृष्टी कमजोर होण्यापूर्वी सुमारे ६० वर्षांपर्यंत केले. मी लहानपणीच ग्रीक भाषा शिकलो याबद्दल मला धन्य वाटते कारण अल्बेनियन भाषेतील संपूर्ण बायबल अगदी अलीकडेच उपलब्ध झाले आहे. संपूर्ण बायबलचे वाचन करता यावे म्हणून त्या दिवसांतील इतर अल्बेनियन साक्षीदारांनी सुद्धा ग्रीक भाषेचे वाचन करण्याचे शिकून घेतले.
ॲरजिरोचा बाप्तिस्मा १९३८ मध्ये झाला. सन १९३९ पर्यंत आमच्या दहा मुलांपैकी सात मुलांचा जन्म झाला होता. दुःखाची गोष्ट म्हणजे, आमच्या पहिल्या सात मुलांपैकी तीन मुले लहान असतानाच दगावली.
दुसऱ्या जागतिक युद्धाच्या दरम्यान हालअपेष्टा
दुसऱ्या जागतिक युद्धाला सुरवात होण्याच्या केवळ काही काळापूर्वी म्हणजे एप्रिल १९३९ मध्ये इटालियन फॅसिस्टच्या लष्करी तुकड्यांनी अल्बेनियावर हल्ला चढविला. त्यानंतर लवकरच यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी घालण्यात आली, तरी देखील राज्य उद्घोषकांचा सुमारे ५० जणांचा आमचा लहान गट प्रचार करीत होता. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या दरम्यान आमची सुमारे १५,००० पुस्तके आणि पुस्तिका जप्त करून त्यांचा नाश करण्यात आला.
जॅनी कोमिनो यांच्याकडे साहित्य ठेवण्याकरता त्यांच्या घराला लागूनच एक मोठी कोठी होती. पुस्तके संयुक्त संस्थानांमध्ये छापण्यात आली होती, हे इटालियन सैनिकांना समजले तेव्हा ते उद्विग्न झाले. “तुम्ही मतप्रसारक आहात! संयुक्त संस्थाने इटलीच्या विरोधात आहे!” त्यांनी म्हटले. थोमाई आणि व्हॅसिली या तरुण बांधवांना अटक करण्यात आली आणि ते वाटप करीत असलेली पुस्तके कोमिनो यांच्याकडून आली होती, हे समजल्यानंतर त्यांना देखील अटक करण्यात आली. लवकरच पोलिसांनी माझ्याबद्दल चौकशी करण्यासाठी मला बोलावले.
“तू या लोकांना ओळखतोस का?” त्यांनी विचारले.
“होय,” मी उत्तर दिले.
“तू त्यांच्याबरोबर काम करतो का?”
“होय,” मी उत्तर दिले. “आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत. आम्ही सरकारच्या विरोधात नाही. आम्ही तटस्थ आहोत.”
“तू या साहित्याचे वाटप करीत आहे का?”
मी होकारार्थी उत्तर दिल्यानंतर त्यांनी मला हातकड्या घातल्या आणि जुलै ६, १९४० रोजी मला तुरुंगात टाकण्यात आले. तेथे मी माझ्या गावातील—जोसेफ कॅसी, लूकान बारको, जॅनी कोमिनो आणि कामा या आणखी पाच बांधवांना भेटलो. तुरुंगात असताना आमची आणखी इतर तीन साक्षीदारांबरोबर भेट झाली—गोरी नॅसी, निकोधीम शायटी आणि लिऑनडस पोप. आम्हा सर्व नऊ जणांना १.८ बाय ३.७ मीटरच्या लहानशा कोठडीत कोंबण्यात आले होते!
काही दिवसांनंतर आम्हा सर्वांना एकमेकांच्या हातांना बांधून परमेट या शहरात नेण्यात आले. तीन महिन्यांनंतर आम्हाला तिराना येथील तुरुंगात हलविण्यात आले आणि कोणतीही सुनावणी न होता आम्हाला तेथे आणखी आठ महिने ठेवण्यात आले.
अखेरीस, आम्हाला लष्करी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. बंधू शायटी आणि मला २७ महिन्यांची, बंधू कोमिनो यांना २४ महिन्यांची शिक्षा झाली आणि इतरांना १० महिन्यांनंतर सोडून देण्यात आले. आम्हाला जिरकॉस्टर येथे नेण्यात आले जेथे बंधू गोले फ्रोको यांनी १९४३ मध्ये आमची सुटका केली. त्यानंतर आमचे कुटुंब परमेट या शहरात स्थायिक झाले ज्याठिकाणी एका लहान मंडळीचा मी पर्यवेक्षक बनलो.
आमच्या कार्यावर बंदी घालण्यात आली होती आणि आमच्या सभोवतालच्या देशांमध्ये दुसऱ्या जागतिक युद्धाचे खळबळजनक वातावरण होते, तरी देखील आम्ही आमच्या परीने राज्याचा संदेश प्रचार करण्याची आमची कामगिरी पार पाडत होतो. (मत्तय २४:१४) सन १९४४ मध्ये एकूण १५ साक्षीदार तुरुंगात होते. तरी देखील, या कठीण काळांमध्ये, यहोवाने आम्हाला त्यागले आहे असे आम्हाला केव्हाही वाटले नाही.
तटस्थतेच्या वादविषयावरून परीक्षा
सन १९४५ मध्ये युद्ध संपले, तरी आम्हाला होणारा उपद्रव कायम होता किंबहुना तो अधिकच वाढला होता. डिसेंबर २, १९४६ या निवडणुकीच्या दिवशी सक्तीचे मतदान करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. निवडणुकीपासून कोणी स्वतःस अलिप्त ठेवल्यास त्यास राज्याचा शत्रू म्हणून गृहीत धरले जात असे. परमेट येथील आमच्या मंडळीतील लोकांनी विचारण्यास सुरवात केली, “आम्ही काय करण्यास हवे?”
“तुमचा यहोवावर विश्वास असल्यास,” मी उत्तर दिले, “आता काय करायचे, असे मला विचारण्याची काहीएक गरज नाही. यहोवाचे लोक तटस्थ आहेत, हे तुम्हाला आधीपासूनच ठाऊक आहे. ते या जगाचे भाग नाहीत.”—योहान १७:१६.
निवडणुकीचा दिवस आला आणि सरकारी प्रतिनिधी आमच्या घरी आले. त्यांनी शांतपणे असे म्हणून सुरवात केली, “चला, आपण कॉफी घेऊ आणि थोडेसे बोलू या. आज काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?”
“होय, आज निवडणुका होणार आहेत,” मी उत्तर दिले.
“तुम्ही लवकरच निघालात तर उत्तम, नाहीतर तुम्हाला उशीर होईल,” एका अधिकाऱ्याने म्हटले.
“नाही, माझा जाण्याचा विचार नाही. आमचे मत यहोवाला आहे,” मी उत्तर दिले.
“ठीक आहे, तर मग विरोधी पक्षाला मत द्या.”
यहोवाचे साक्षीदार पूर्णपणे तटस्थ आहेत, असे मी स्पष्ट केले. आमच्या स्थितीची पूर्ण कल्पना आल्यानंतर आमच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात आला. आमच्या सभा बंद करण्याचा आम्हाला आदेश देण्यात आला त्यामुळे आम्ही गुप्तपणे एकत्र भेटण्यास सुरवात केली.
आमच्या मूळ गावी परतणे
सन १९४७ मध्ये माझे कुटुंब आणि मी एमब्रेश्तान येथे परत आलो. त्यानंतर थोड्याच कालावधीत, डिसेंबर महिन्यातील कडाक्याची थंडी असणाऱ्या एके दुपारी सिगुरीमी (गुप्त पोलिस) दफ्तरात मला बोलावण्यात आले. “मी तुला येथे का बोलावले आहे, हे तुला ठाऊक आहे का?” अधिकाऱ्याने विचारले.
“माझ्या विरोधातील आरोप तुम्ही ऐकले आहेत, असे मला वाटते,” मी उत्तर दिले. “परंतु जग तुमचा द्वेष करील, असे बायबल सांगते त्यामुळे आरोपांचे मला आश्चर्य वाटत नाही.”—योहान १५:१८, १९.
“बायबलविषयी माझ्याबरोबर काही बोलू नको,” तो माझ्यावर खेकसला. “मी तुला चांगला चोप देईन.”
मला बाहेर थंडीत उभे राहण्यास सांगून तो अधिकारी आणि त्याचे लोक दफ्तरातून निघून गेले. काही वेळानंतर त्याने मला त्याच्या दफ्तरामध्ये बोलावले आणि आमच्या घरात होणाऱ्या सभा थांबविण्याचा त्याने मला आदेश दिला. “तुझ्या गावात किती जण राहतात?” त्याने विचारले.
“एकशे वीस,” मी म्हटले.
“त्यांचा कोणता धर्म आहे?”
“अल्बेनियन ऑर्थडॉक्स.”
“आणि तुझा?”
“मी यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक आहे.”
“एकशे वीस जण एका बाजूस जातात आणि तू दुसऱ्या बाजूस जातो?” त्यानंतर त्याने मला चर्चमध्ये मेणबत्त्या जाळण्याचा आदेश दिला. मी तसे करणार नाही, असे मी त्याला सांगितल्यानंतर त्याने मला दंडुक्याने मारण्यास सुरवात केली. मला अखेरीस सोडून देण्यात आले, तेव्हा सुमारे पहाटेचा एक वाजला होता.
साहित्य पुरवठा खंडित
दुसरे जागतिक युद्ध संपल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा टपालाद्वारे टेहळणी बुरूज प्राप्त होऊ लागले, परंतु सरतेशेवटी ही नियतकालिके पोहंचते करणे बंद झाले. मग, एके रात्री दहा वाजता गुप्त पोलिसांद्वारे मला बोलविण्यात आले. “ग्रीक भाषेतील नियतकालिक आले आहे,” मला सांगण्यात आले, “त्यात काय लिहिले आहे, हे तू स्पष्ट करावे अशी आमची इच्छा आहे.”
“मला ग्रीक भाषा इतकी चांगली येत नाही,” मी म्हटले. “माझ्या शेजारी राहणाऱ्या मनुष्याला ती उत्तम येते. कदाचित तो तुमची मदत करू शकेल.”
अधिकाऱ्याने ग्रीक टेहळणी बुरूजच्या काही प्रती बाहेर काढत असताना म्हटले, “नाही, तूच याचे स्पष्टीकरण करावे असे आम्हाला वाटते.”
“ही तर माझीच नियतकालिके आहेत!” मी उद्गारलो. “अर्थातच, मी त्याचे स्पष्टीकरण देऊ शकतो. हे पाहा, ही नियतकालिके ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथून येतात. यहोवाच्या साक्षीदारांचे त्या ठिकाणी मुख्यालय आहे. मी यहोवाचा एक साक्षीदार आहे. परंतु त्यांचा पत्त्याच्या बाबतीत घोटाळा झाल्याचे दिसते. ही नियतकालिके मला पाठविण्यास हवी होती, तुम्हास नाही.”
ते मला नियतकालिके देत नसत आणि तेव्हापासून १९९१ पर्यंत, सुमारे ४० वर्षांपेक्षा जास्त काळापर्यंत आम्हाला अल्बेनियामध्ये कोणतेही बायबल साहित्य मिळाले नव्हते. या सर्व वर्षांच्या दरम्यान आमच्याकडील केवळ बायबलच्या साह्याने आम्ही प्रचार करीत होतो. सन १९४९ मध्ये सुमारे २० साक्षीदार तुरुंगात होते; काहींना पाच वर्षांची शिक्षा झाली होती.
कठीण परिस्थितींत वाढ
सन १९५० च्या दशकामध्ये, लोकांनी लष्कराला पाठिंबा दिला आहे, हे दर्शविणारा दस्तऐवज जवळ बाळगण्याचा आदेश त्यांना देण्यात आला. परंतु यहोवाच्या साक्षीदारांनी अशा प्रकारचे दस्तऐवज जवळ बाळगण्यास नकार दिला. या कारणामुळे बंधू कोमिनो आणि मला आणखी दोन महिने तुरुंगात काढावे लागले.
राज्याने काही विशिष्ट धर्मांचे पालन करण्यास मुभा दिली त्यावेळी आम्हाला काही प्रमाणात स्वातंत्र्य मिळाले. तथापि, सन १९६७ मध्ये सर्व धर्मांवर बंदी घालण्यात आली तेव्हा अल्बेनिया अधिकृतरीत्या पूर्णपणे नास्तिकवादी राष्ट्र झाले. साक्षीदार सभा भरविण्याचा प्रयत्न करीत होते, परंतु आता ते फारच कठीण झाले होते. आम्हांपैकी काहींनी आमच्या कोटाच्या आतील बाजूस खास पद्धतीचे खिसे शिवले जेणेकरून आम्हाला त्यात छोट्या आकाराचे बायबल लपविणे शक्य झाले. त्यानंतर आम्ही बायबलचे वाचन करण्यासाठी क्षेत्रात जात होतो.
टिरॅने येथील साक्षीदारांना पकडण्यात आले आणि तीन जणांना दूरच्या मजूर शिबिरांमध्ये पाच वर्षांची शिक्षा झाली. परिणामी त्यांच्या कुटुंबांना फार त्रास झाला. आम्हांपैकी विविक्त लहान गावांत राहणाऱ्यांना पाठविण्यात आले नाही कारण आमच्याकडे गंभीर धोका या दृष्टिकोनातून पाहण्यात आले नव्हते. परंतु आमच्या तटस्थतेमुळे शिधा याद्यांवरून आमची नावे कमी करण्यात आली. यास्तव, जीवन फारच कठीण होऊन बसले. त्यात आमच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. तरी देखील, यहोवाने आम्हाला त्यागले आहे, असे आम्हाला केव्हाही वाटले नाही.
अल्बेनियात भय सर्वत्र होते. प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष होते आणि राज्य करणाऱ्या पक्षापासून वेगळे मत व्यक्त करण्याचे धाडस केल्यास गुप्त पोलिस संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदवत होते. त्यामुळे आम्ही आमच्या कार्याच्या लेखी अहवालांना तयार करण्यात फार दक्ष होतो. आध्यात्मिक उत्तेजनासाठी दोन किंवा तीन जणांपेक्षा जास्त मोठ्या गटांनी आम्ही एकत्र होऊ शकत नव्हतो. तरी देखील, प्रचार करण्याचे आम्ही कधीही थांबविले नाही.
बांधवांमध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या प्रयत्नार्थ, तिरानामधील एक प्रमुख साक्षीदार हेर असल्याची अफवा गुप्त पोलिसांनी पसरवली. यामुळे काही जणांचा आत्मविश्वास नाहीसा झाला आणि काही प्रमाणात आमच्या एकतेचाही भंग झाला. बायबलचे कोणतेही चालू साहित्य नसल्यामुळे आणि यहोवाच्या दृश्य संघटनेसोबत कोणताही संपर्क नसल्यामुळे काही जण भयास बळी पडले.
याशिवाय, अल्बेनियातील अतिआदरणीय वडील, स्पायरो व्रुहो आत्महत्या केल्याची अफवा देखील अधिकाऱ्यांनी पसरविली. त्यांनी म्हटले, “हे पाहा, आता रूहो यांनी देखील हार मानली आहे.” बंधू रूहो यांची हत्या करण्यात आली होती, हे नंतर उघडकीस आले.
ॲरजिरो आणि मी १९७५ मध्ये तिराना येथील आमच्या मुलाकडे काही महिने राहिलो. निवडणुकीच्या काळात शहरातील अधिकाऱ्यांनी अशी धमकी देण्याद्वारे आमच्यावर दडपण आणले: “तुम्ही मतदान न केल्यास, आम्ही तुमच्या मुलाची नोकरी काढून घेऊ.”
“माझा मुलगा २५ वर्षांपासून नोकरी करीत आहे,” मी उत्तर दिले. “तुमच्याकडे त्याच्याविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी विस्तृत व्यक्तिगत अहवाल आहेत. मी ४० वर्षांपेक्षा अधिक काळापासून मतदान केलेले नाही. ही माहिती सामान्यतः व्यक्तिगत अहवालांमध्ये असते. ही माहिती तुमच्या अहवालांमध्ये नाही, तर तुमचे अहवाल व्यवस्थित नाहीत. तुमच्या अहवालांमध्ये ही माहिती आहे, तर मग त्याला अनेक वर्षांपर्यंत काम करण्यास अनुमती देण्याद्वारे तुम्ही पक्षाचे द्रोही झाला आहात.” हे सर्व ऐकल्यानंतर अधिकारी म्हणाले, की आम्ही एमब्रेश्तानला परतल्यास, ते या वादंगाचा ऊहापोह करणार नाहीत.
नाट्यमय बदल
सन १९८३ मध्ये आम्ही एमब्रेश्तान सोडले आणि लॅक शहरात राहण्यास गेलो. त्यानंतर थोड्याच अवधीत म्हणजे १९८५ मध्ये संचालक मरण पावला. त्याने पहिल्या बंधनकारक निवडणुकीपासून १९४६ पर्यंत राज्य केले होते. कालांतराने, तिराना शहराच्या मुख्य चौकात असणारा त्याचा आणि स्टॅलिनचा पुतळा काढून टाकण्यात आला.
आमच्या कार्यावर बंदी होती अशा दशकांमध्ये, अनेक साक्षीदारांना अमानुषपणे वागणूक देण्यात आली आणि काहींना तर ठारही मारण्यात आले. एका मनुष्याने रस्त्यावरील काही साक्षीदारांना सांगितले: “आम्ही सर्वांनी साम्यवादींच्या काळात देवाचा त्याग केला होता. केवळ यहोवाचे साक्षीदार परीक्षा आणि हालअपेष्टा असतानाही त्याच्याशी विश्वासू राहिले.”
स्वातंत्र्यास अधिक मुभा दिल्यानंतर जून १९९१ मध्ये नऊ जणांनी ख्रिस्ती सेवकपणातील कार्याचा अहवाल दिला. जून १९९२ मध्ये बंदी उठविण्यात आल्यानंतरच्या महिन्यामध्ये ५६ जणांनी प्रचार कार्यात सहभाग घेतला. त्या वर्षाआधी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारक विधीला ३२५ लोकांच्या उपस्थितीमुळे आम्हाला अत्यानंद झाला होता. तेव्हापासून प्रचार करणाऱ्यांच्या संख्येत ६०० पेक्षा अधिक जणांची वाढ झाली आहे आणि एप्रिल १४, १९९५ रोजी स्मारक विधीला ३,४९१ लोक उपस्थित होते! अलीकडील वर्षांमध्ये अनेक युवकांना आमच्या मंडळ्यांमध्ये येत असल्याचे पाहून मला होणारा आनंद अवर्णनीय आहे.
ॲरजिरो, यहोवास विश्वासू तसेच या अनेक वर्षांत माझ्याशी एकनिष्ठ राहिली आहे. मी तुरुंगात असताना किंवा प्रचार कार्याचा प्रवास करताना, तिने कोणतीही तक्रार न करता धीराने आमच्या कुटुंबाच्या गरजांची काळजी घेतली. आमच्या मुलांपैकी एकाचा आणि त्याच्या पत्नीचा १९९३ मध्ये बाप्तिस्मा झाला. त्यामुळे मला फार मोठा आनंद झाला.
केवळ देवाच्या राज्यासाठी
अल्बेनियामधील यहोवाच्या संघटनेतील ऐक्य आणि तिची होत असलेली आध्यात्मिक संपन्नता पाहून मला आनंद होतो. मला जेरूसलमेतील शिमोनाप्रमाणे वाटते ज्याला त्याच्या मृत्यूपूर्वी फार आधीपासून अभिवचनयुक्त मशीहा पाहण्याचा मौल्यवान विशेषाधिकार बहाल करण्यात आला होता. (लूक २:३०, ३१) तुम्ही कोणत्या प्रकारच्या सरकाराला प्राधान्य देता, असे मला विचारले जाते, त्यावेळी मी म्हणतो: “मी साम्यवादी किंवा भांडवलशाही यांपैकी कोणत्याही सरकाराला प्राधान्य देत नाही. लोक किंवा राज्य यांचा जमिनीवर ताबा आहे, हे महत्त्वाचे नाही. सरकार रस्ते बांधतात, दूरच्या गावांमध्ये वीज पोहंचवतात आणि काही प्रमाणात व्यवस्था राखतात. तथापि, अल्बेनिया तसेच उर्वरित जग ज्या कठीण समस्यांना तोंड देत आहे त्यावर यहोवाचे सरकार, त्याचे स्वर्गीय राज्यच एकमेव उपाय आहे.”
देवाचे सेवक संपूर्ण पृथ्वीवर देवाच्या राज्याचा प्रचार करण्याकरता जे काही करतात ते कोणा एका मनुष्याचे कार्य नव्हे. ते देवाचे कार्य आहे. आपण त्याचे सेवक आहोत. अल्बेनियामध्ये आम्हाला अनेक कठीण समस्या होत्या आणि दीर्घ काळापर्यंत यहोवाच्या दृश्य संघटनेसोबत आमचा कोणताही संबंध नव्हता तरी देखील त्याने आम्हाला केव्हाही त्यागले नाही. त्याचा आत्मा सदैव आमच्यासोबत होता. त्याने आम्हाला पावलागणिक मार्गदर्शन दिले. माझ्या संपूर्ण जीवनामध्ये मी याचा अनुभव घेतला आहे.