वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १२/१ पृ. २०-२३
  • शतायुषी पण तरी बळकट होत चाललेले

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शतायुषी पण तरी बळकट होत चाललेले
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विचारसरणीत बदल
  • परीक्षांना तोंड देणे
  • अनपेक्षित भेट
  • हानी सहन करणे
  • यहोवाची सेवा करण्यात मला नेहमीच आनंद मिळाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १२/१ पृ. २०-२३

शतायुषी पण तरी बळकट होत चाललेले

राल्फ मिशेलद्वारा निवेदित

मध्यम उंचीचे माझे वडील, मेथडिस्ट प्रचारक होते. प्रत्येक दोन किंवा तीन वर्षांतून बहुतेक लहान लहान गावांमधून लागोपाठ, त्यांना एका चर्चमधून दुसऱ्‍या चर्चमध्ये हलवण्यात येत. या गावांमध्ये ॲशवील, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका जेथे फेब्रुवारी १८९५ मध्ये माझा जन्म झाला होता, त्यांचा समावेश होतो. म्हणून लहानपणापासूनच मी ख्रिस्ती धर्मजगताशी चांगल्याचप्रकारे परिचित झालो.

मला आठवते मी लहान असताना, भावनात्मक सुवार्तिक सभांमध्ये (रिवायवल मीटिंग्ज) पवित्र आत्म्याने भरून जाण्यासाठी—ज्यास ते “धर्म मिळण्यासाठी” असे म्हणत असत त्या “शोक करणाऱ्‍यांचा बाक” (मॉर्नरझ बेंच) यावर बसवले जाई. मला माझ्या पापांची कबूली करण्यास, दशाज्ञा पाळण्यास व चांगले होण्यास सांगितले गेले. असे केल्याने मी मेल्यानंतर स्वर्गात जाऊ शकेन. ‘पण, मला वाटते मी नरकातच जाणार कारण स्वर्गात जाण्याइतपत मी चांगला होऊ शकत नाही’ असे मी स्वतःस म्हणालो. मला वाटायचे, की केवळ प्रौढच—विशेषकरून फक्‍त प्रचारक—बायबल दर्जांनुरूप वागत होते.

पण मी कुमारावस्थेत पोहंचण्याआधीच, मला धर्मातील दांभिकपणा समजू लागला. उदाहरणार्थ, सामान्य सभेमध्ये (जनरल कॉन्फरन्स) केवळ बिशपच्या निधीला भरपूर पैसे देण्यासाठी माझे बाबा स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजेला लागणारा पैसा वापरत असत. त्यांना वाटत असे, की असे केल्याने त्यांना एखाद्या मोठ्या चर्चमध्ये नियुक्‍त केले जाईल. मला एक स्थानिक प्रचारक आठवतो जो कपाशीचे पीक काढणारा एक शेतकरी देखील होता. त्याला चर्चमध्ये प्रमुख स्थान मिळण्याची उत्सुकता होती, म्हणून त्याने कापसाचे शंभर गठ्ठे विकले आणि मिळालेला तो सर्व पैसा घेऊन कॉन्फरन्सला गेला. तेथे जमलेल्या श्रोतेगणाकडून—जो बहुतेककरून प्रचारकांचा मिळून बनलेला होता—त्यांना जेवढा पैसा मिळवता आला तो सर्व त्यांनी मिळवल्यावर शेतकरी प्रचारक उडी मारून ओरडून म्हणाला: “हे इतकेच तुम्ही तुमच्या बिशपला देणार? प्रत्येक प्रचारक पाच डॉलर घेऊन येतो तर मी, दहा डॉलर देईन!” असे करता करता एक हजार डॉलर गोळा करण्यात आले आणि या माणसाला माझ्या बाबांपेक्षा वरचे स्थान म्हणजे पर्यवेक्षक वडील म्हणून बिशपनी नियुक्‍त केले. अशा प्रकारची नियुक्‍ती देवाकडून असेल असा मला मुळीच विश्‍वास होत नव्हता. तेव्हापासून धर्मासंबंधाने काही असले तरी मला संशय येत असे.

अमेरिकेने पहिल्या जागतिक युद्धात भाग घेतला तेव्हा मला सक्‍तीने लष्करी कामावर नाव नोंदवावे लागले. आपल्या देशासाठी निष्ठेने लढण्याबद्दल सैन्यातील पाळक आम्हा सैनिकांना प्रचार करत असल्याचे मला अजून आठवते. या गोष्टीमुळे धर्माबद्दल मला असलेला तिरस्कार आणखीनच तीव्र झाला. युद्धातून वाचणे, शिक्षण पूर्ण करणे आणि मग लग्न करणे, ही माझी ध्येये होती. भवितव्यासाठी मी केलेल्या योजनांमध्ये धर्माला काहीच स्थान नव्हते.

विचारसरणीत बदल

सन १९२२ मध्ये मी लुईज नावाच्या एका तरुण स्त्रीच्या प्रेमात पडलो. ती एक भक्‍तिमान कॅथलिक निघाली, आणि आम्ही लग्न करण्याचे ठरवले तेव्हा तिला कॅथलिक पद्धतीप्रमाणे लग्न करायचे होते. पण मला कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी नको असल्यामुळे, न्यूयॉर्क शहरातील नगरपालिकेतील इमारतीत लग्न करण्यास ती तयार झाली.

सुरवातीला आमच्यामध्ये कोणतेही धार्मिक वादविवाद नव्हते. मी तिला सरळ सांगितले की मला धर्मावर भरवसा नव्हता व आपल्या घरात जोपर्यंत धर्माचा उल्लेख होणार नाही तोपर्यंत सर्व काही सुरळीत चालेल. मग, १९२४ ते १९३७ या कालावधीत, आम्हाला मुले झाली—एकापाठोपाठ एक असे पाच मुलगे आणि पाच मुली झाल्या! मुलांनी कॅथलिक शाळेत जावे अशी लुईजची इच्छा होती. पण मुलांनी कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रशिक्षण घेऊ नये असे मला वाटत असल्यामुळे, आमच्या दोघांमध्ये वाद होऊ लागले.

सन १९३९ च्या सुरवातीस काहीतरी असे घडले ज्यामुळे धर्माकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. हेन्री वेब्बर आणि हॅरी पायट हे दोन यहोवाचे साक्षीदार, रोझल, न्यूजर्सी येथील माझ्या घरी आले. त्यांच्या बोलण्यावरून लगेचच हे स्पष्ट झाले, की त्यांना त्या विषयावर बोलायचे होते ज्यामध्ये मला तीळ मात्रही आवड नव्हती व तो म्हणजे—धर्म. सैन्यातील पाळक म्हणत, ‘आपल्या देशासाठी लढा,’ आणि चर्चमधील पाळक म्हणत, ‘तुम्ही खून करू नका,’ या वस्तुस्थितीमुळे माझ्या भावना अजूनही कटू होत्या. किती तो दांभिकपणा! या दोन साक्षीदारांनाच मी ताळ्यावर आणेन, असे मला वाटले. मी त्यांना म्हणालो, “थांबा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुमचा धर्म खरा आहे तर बाकीचे सर्व खोटे आहेत. आणि इतर धर्मांपैकी एकच खरा असला तर उरलेले सर्व म्हणजे तुमचा धर्मसुद्धा खोटा आहे. एकच खरा धर्म असू शकतो.” आणि काय आश्‍चर्य, ते माझ्याशी सहमत झाले!

त्यानंतर त्यांनी मला माझे बायबल आणण्यास व त्यामधून १ करिंथकर १:१० वचन काढण्यास सांगितले. तेथे मी वाचले: “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या नावाने मी तुम्हास विनंती करितो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.” या वचनामुळे माझे औत्सुक्य वाढले. त्याच वेळी, हे दोन पुरुष मला कोणत्या तरी खोट्या धर्मात गुंतवण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी सुद्धा मला भीती वाटत होती. पण मी काही तरी शिकलो होतो—की, ख्रिस्ती जनांमध्ये फुटी नसाव्यात. माझ्या मनात इतर पुष्कळ प्रश्‍न होते. जसे की, मृत्यूनंतर जिवाचे काय होते? त्या प्रश्‍नाची चर्चा त्यांच्यासोबत करण्यास मला किती आवडले असते! पण त्यामुळे घरामध्ये खूप धार्मिक वाद निर्माण होतील असे मला वाटले.

मग त्यांच्यापैकी एकाने मला म्हटले: “पुढील आठवडी तुमच्याकडे पुन्हा येऊन तुमच्यासोबत आणखी बोलायला आम्हाला आवडेल.” मी त्यांना चतुराईने कटवण्याचा प्रयत्न केला खरा, पण माझी पत्नी मध्येच मोठ्याने बोलली. ती म्हणाली, “राल्फ, ते पुन्हा कधी येऊ शकतात हे ते विचारत आहेत.” तिचे बोलणे ऐकून मला आश्‍चर्य वाटले कारण ती एक कट्टर कॅथलिक होती! तरीपण, ‘सरतेशेवटी आपले एकमत होईल असे धर्माच्या विषयावर काही मुद्दे मिळतीलच,’ असे मला वाटले. म्हणून, मी हेन्री वेब्बर आणि हॅरी पायट या दोघांना पुढच्या शुक्रवारी पुन्हा येण्यास सांगितले.

अशा प्रकारे मी यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करू लागलो. जास्त उशीर झाला नव्हता तोच, मला न्यूयॉर्क शहरातील मॅडिसन स्क्वेर गार्डन येथे भरलेल्या एका अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले. जोसफ एफ. रदरफोर्ड यांनी जून २५, १९३९ रोजी, “सरकार व शांती” या विषयावर दिलेले भाषण मला स्पष्टपणे आठवते. तेथे उपस्थित असलेल्या १८,००० लोकांपैकी मी एक होतो. खरे तर, रेडिओ-फोन लाईन्सचा वापर करून आंतरराष्ट्रीय हूकअपला जोडलेल्यांचा तुम्ही समावेश केला तर ७५,००० लोकांनी ते भाषण ऐकले.

पण तेव्हा सर्वकाही सुरळीत पार पडले असे नाही. चार्ल्स कॉगलीन या कॅथलिक पाळकाच्या अनुयायांनी संमेलनाचा भंग करण्याची धमकी दिली होती. बंधू रदरफोर्डचे निम्मे भाषण झाले तसे शेकडो संतप्त लोक गोंधळ करू लागले व “हेल हिटलर!” आणि “विवा फ्रॅन्को!” चा नारा नाचवू लागले. इतका मोठ्याने दंगा चालला होता की त्यांचा आवाज फोन लाईन्सवर सुद्धा ऐकू येत होता! जमावाला शांत करण्यासाठी द्वारपालांना सुमारे १५ मिनिटे लागली. या सर्व वेळेत, श्रोतेगणानी टाळ्यांचा कडकडाट करून बंधू रदरफोर्ड यांना आधार दिला तसे ते धीटपणे बोलत राहिले.

हे पाहून माझी उत्सुकता अजूनच वाढली. एक कॅथलिक पाळक यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध इतका द्वेष का चेतविल बरे? बंधू रदरफोर्ड जो प्रचार करीत होते त्यामध्ये जरूर सत्याचा अंश असावा—आणि माझ्यासारख्या लोकांनी तो ऐकू नये अशी पाळकाची इच्छा होती हे मी लगेचच ताडले. म्हणून मी माझा बायबलचा सतत अभ्यास व प्रगती करीत राहिलो. शेवटी, ऑक्टोबर १९३९ मध्ये पाण्याने बाप्तिस्मा घेऊन यहोवाला केलेले माझे समर्पण चिन्हांकित केले. त्याच्या दुसऱ्‍या वर्षी माझ्या काही मुलांनी बाप्तिस्मा घेतला आणि माझ्या पत्नीने, लुईजने १९४१ मध्ये बाप्तिस्मा घेतला.

परीक्षांना तोंड देणे

मी सत्याचा स्वीकार केल्यानंतर लगेचच माझ्या आईचा मृत्यू झाला व तिच्या अंत्यसंस्काराला मला उत्तर कॅलिफोर्नियाला परत जावे लागले. मेथडिस्ट चर्चमध्ये होणाऱ्‍या अंत्यसंस्काराला मी उपस्थित राहिलो तर शुद्ध विवेक राखू शकणार नाही असे मला वाटले. यास्तव तेथे जाण्याआधी मी माझ्या वडिलांना फोन करून सांगितले की शवपेटी अंत्यसंस्कार खोलीत ठेवावी. त्यांनी याला होकार दिला, पण तेथे पोहंचल्यावर ते चर्चला जाण्याच्या मार्गावर होते, कारण त्यांना वाटले, की मी त्यांना निश्‍चितच सामील होईन.

पण मी तसे केले नाही व यामुळे माझ्या कुटुंबात बरीच खळबळ माजली. माझी धाकटी बहीण एडना आणि माझ्यात खूप जवळीक होती, पण आईच्या अंत्यसंस्कार विधीनंतर ती माझ्याशी बोलेनासी झाली. मी तिला पत्रे लिहिली पण तिने त्यांना उत्तर दिले नाही. सिटी कॉलेजमध्ये ती दर उन्हाळ्यात शिक्षकांच्या कोर्सेससाठी न्यूयॉर्कला येत, तेव्हा मी तिला भेटण्याचे प्रयत्न केले. पण ती, मला वेळ नाही, असे म्हणून मला भेटण्याचे टाळत असे. कालांतराने मी तिला भेटण्याचा प्रयत्न सोडून दिला, कारण मग मी तिला त्रास देत असल्यासारखे ते वाटू लागले. मला तिच्याकडून अनेक वर्षांनंतर उत्तर मिळाले.

सन १९४१ मध्ये, अमेरिकेत आणि कॅनडामधील मुलांप्रमाणेच माझ्याही सहा मुलांना, झेंडावंदन न केल्यामुळे शाळेमधून काढून टाकण्यात आले. वैध शैक्षणिक गरज पूर्ण करण्यासाठी साक्षीदारांनी, राज्य शाळा नावाच्या स्वतःच्या शाळांची स्थापना केली. माझी मुले ज्या शाळेत जात होती ती शाळा न्यूजर्सी, लेकवूड येथे पूर्वी हॉटेल असलेल्या इमारतीत होती. पहिल्या मजल्यावर एक राज्य सभागृह, शाळेचा वर्ग, स्वयंपाकघर आणि एक डायनिंग हॉल होता. मुलींच्या झोपण्याच्या खोल्या दुसऱ्‍या मजल्यावर आणि मुलांच्या तिसऱ्‍या मजल्यावर होत्या. ती शाळा खरोखरीच खूप छान होती. तेथे शिकणारी बहुतेक मुले फक्‍त सप्ताहांतीच घरी जात असत. दूरवर राहणारी मुले एक सप्ताह सोडून दुसऱ्‍या सप्ताहांती जात असत.

सत्यामध्ये नवीन आल्यापासून मला यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्ण वेळेच्या सुवार्तिकांना जसे म्हणतात, अर्थात पायनियर व्हायची तीव्र इच्छा होती. सेंट. लुईस, मिसोरी येथे सन १९४१ मध्ये झालेल्या अधिवेशनातील कार्यक्रमात एका बांधवाने, १२ मुलांचे संगोपन करताना त्याने पायनियरींग कसे केले ते सांगितले. मी विचार केला, ‘जर तो १२ मुलांना सांभाळून पायनियरींग करू शकतो तर मग मी सुद्धा १० मुलांना सांभाळून करू शकतो.’ पण पुढे १९ वर्षांपर्यंत माझ्या परिस्थितींनी मला पायनियरींग करण्यास अनुमती दिली नाही. शेवटी, ऑक्टोबर १, १९६० या दिवशी मी नियमित पायनियर या नात्याने यहोवाची सेवा सुरु करू शकलो.

अनपेक्षित भेट

सन १९७५ मध्ये मला माझी बहीण एडनाकडून एक फोन आला. आता मी ८० वर्षांचा होतो व सुमारे २० वर्षांसाठी तिला पाहिले नव्हते की तिचा आवाज ऐकला नव्हता. ती विमानतळावरून बोलत होती. तिला आणि तिच्या पतीला घेण्यासाठी यावे म्हणून तिने फोन केला होता. एडनाला पाहून मला अतिशय आनंद झाला, पण सर्वात आश्‍चर्यचकित करणारी गोष्ट पुढे होती. घरी जात असताना, तिच्या पतीने म्हटले: “तुमच्यामध्ये एक धर्मांतरीत व्यक्‍ती आहे.” मला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. घरी आल्यावर पुन्हा एकवार तो म्हणाला, “तुमच्यामध्ये येथे एक धर्मांतरीत व्यक्‍ती आहे.” माझ्या पत्नीला ते लगेच कळाले. माझ्या बहिणीकडे वळून तिने विचारले, “एडना, तू साक्षीदार आहेस?” “होय अर्थातच,” एडना उत्तरली.

एडनाने सत्याचा स्वीकार कसा काय केला? त्याचे असे झाले, की आमचे तुटलेले संबंध पुन्हा जोडण्यासाठी सन १९७२ मध्ये मी तिला टेहळणीबुरूज नियतकालिकाची भेट वर्गणी पाठवली होती. एक वर्षांनंतर, एडना आजारी पडल्यामुळे ती घराबाहेर जाऊ शकत नव्हती. तिला आलेली नियतकालिके अजूनही तशीच तिच्या टेबलावर पडली होती. एडनाने जिज्ञासेपोटी एक नियतकालिक उघडले व वाचू लागली. नियतकालिक वाचून पूर्ण झाल्यावर ती स्वतःला म्हणाली, ‘हेच तर सत्य आहे!’ यहोवाचे साक्षीदार तिच्या घरी येईपर्यंत तिने टेहळणी बुरूज नियतकालिकांचा साठलेला संपूर्ण साठा वाचून काढला होता. तिने बायबल अभ्यास स्वीकारला आणि कालांतराने यहोवाची एक साक्षीदार झाली.

हानी सहन करणे

कालांतराने माझी पत्नी लुईजला मधुमेह झाला आणि १९७९ मध्ये तिची प्रकृती पूर्णपणे ढासळली व वयाच्या ८२ व्या वर्षी ती मरण पावली. लुईज गेल्यानंतर, माझ्यातील एक भाग मरण पावला. माझे सर्व जगच थांबले. मला काही सुचत नव्हते. मला भवितव्यासाठी काहीच योजना नव्हत्या आणि मला उत्तेजनाची अतिशय गरज होती. रिचर्ड स्मीथ नावाच्या एका प्रवासी पर्यवेक्षकाने मला माझ्या पायनियरींगमध्ये टिकून राहण्यासाठी उत्तेजन दिले. मला दिसून आले की मृत्यूमध्ये ज्यांनी आपले प्रियजन गमावले अशांना सांत्वन देण्यातच मला मोठे सांत्वन मिळत असे.

सन १९७९ मध्ये वॉच टावर संस्था इस्राएलच्या दौऱ्‍याची व्यवस्था करत होती, म्हणून मी माझेही नाव दिले. हा दौरा माझ्यासाठी खूपच प्रेरक होता. मी घरी आल्यावर पुन्हा एकदा पायनियर सेवेमध्ये कार्य करण्यास सुरवात केली. तेव्हापासून प्रत्येक वर्षी, देशाच्या दुसऱ्‍या भागात, न नेमलेल्या किंवा क्वचितच कधी कार्य केल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात जाऊन मदत करणे हा मी माझा उद्योग केला आहे. माझे उतरते वय असले, तरी अजूनही या सुहक्कासाठी मी स्वतःला उपलब्ध करू शकतो.

माझ्या अंदाजाप्रमाणे, या वर्षांमध्ये मला सुमारे ५० लोकांना जीवनाच्या मार्गावर आणण्याचा आनंद प्राप्त झाला आहे. माझी बहुतेक मुले सत्यात आहेत. दोन मुली नियमित पायनियर म्हणून कार्य करत आहेत. आणखी एक मुलगी लुईज ब्लॅनटन, तिचा पती जॉर्ज याच्यासोबत न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात कार्य करत आहे आणि माझ्या एका मुलाने अनेक वर्षांपर्यंत वडील या नात्याने कार्य केले आहे.

अर्थात, आपल्या पहिल्या मानवी पालकांकडून वारशाने मिळालेल्या अपरिपूर्णतेमुळे आपण सर्वजण आजारपण आणि मृत्यूच्या विळख्यात सापडलो आहोत. (रोमकर ५:१२) आणि माझेही जीवन दुखणी आणि वेदनांपासून मुक्‍त नाही. सध्या मला माझ्या डाव्या पायातील संधीवाताचा त्रास आहे. त्यामुळे कधीकधी मी खूप अस्वस्थ होतो, पण मी निष्क्रिय झालो नाही. आणि असे होणार नाही यासाठी मी प्रार्थना करतो. मला असेच सक्रिय राहायचे आहे. यहोवाचे नाव आणि त्याचे उद्देश घोषित करण्यासाठी होईल तितके करणे व शेवटपर्यंत पायनियर सेवेमध्ये टिकून राहणे ही माझी उत्कट इच्छा आहे.

[२३ पानांवरील चित्रं]

माझी मुलगी रिटा हिच्यासोबत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा