उत्तम जीवन—लवकरच!
हवामानाचा अंदाज लावणाऱ्या मनुष्याचा विचार करा ज्याची भाकिते नेहमीच सत्य होतात. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये त्याने जर सांगितले, की उद्या वर्षावृष्टी होणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी घराबाहेर पडताना तुम्ही नक्कीच छत्री सोबत घेता. त्याच्या गत नोंदींनी तुमचा विश्वास संपादला आहे. तो जे काही सांगतो त्यानुसार तुम्ही वागता.
आता, परादीस पृथ्वीवरील एका उत्तम जीवनाचे यहोवाने दिलेले अभिवचन केवढे विश्वसनीय आहे बरे? आणि त्याच्या गत नोंदी काय सूचित करतात? बायबल भविष्यवाण्यांची पूर्णता, स्पष्टपणे यहोवाच्या नोंदी शाबीत करतात. तो अचूक तंतोतंतपणाचा आणि सत्यतेचा देव आहे. (यहोशवा २३:१४; यशया ५५:११) यहोवा देवाची अभिवचने इतकी विश्वसनीय आहेत, की काही वेळा तो अभिवचन दिलेल्या भविष्यातील घटनांबद्दल अशा प्रकारे बोलतो जणू काय त्या पूर्णच झाल्या. उदाहरणार्थ, मृत्यू आणि शोक नसलेल्या एका नव्या जगाविषयी त्याने दिलेल्या अभिवचनानंतर आपण वाचतो: “[अभिवचनीय आशीर्वाद] झाले!” दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, “ते खरोखर आहेत!”—प्रकटीकरण २१:५, ६, तळटीप, NW.
होय, यहोवाच्या गत अभिवचनांची पूर्णता आम्हाला, मानवजातीकरता एका उत्तम जीवनाविषयी त्याने दिलेल्या अभिवचनाच्या पूर्णतेची हमी देते. पण हे उत्तम जीवन केव्हा येईल?
उत्तम जीवन—केव्हा?
एक अत्युत्तम जीवन लवकरच येईल! आपण याची खात्री बाळगू शकतो कारण, उत्तम जीवन असलेले परादीस येण्याआधी, पुष्कळ वाईट गोष्टी पृथ्वीवर घडतील असे बायबल म्हणते. त्या वाईट गोष्टी आता घडत आहेत.
उदाहरणार्थ, मोठमोठ्या लढाया होतील असे येशू ख्रिस्ताने भाकीत केले होते. तो म्हणाला होता: “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.” (मत्तय २४:७) ही भविष्यवाणी खरी झाली. सन १९१४ ते १९४५ या वर्षांदरम्यान, दोन जागतिक महायुद्धे झाली आणि त्यानंतर अशी अनेक युद्धे झाली ज्यामध्ये राष्ट्रे एकमेकांसोबत लढली. “वार्षिक सरासरीच्या आधारावर पाहिले तर, या काळात [दुसऱ्या जागतिक महायुद्धापासून] युद्धामध्ये मारले गेलेल्यांची संख्या १९ व्या शतकात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट व १८ व्या शतकात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येपेक्षा सातपट जास्त आहे.”—जागतिक सैनिकी आणि सामाजिक खर्च १९९३, (इंग्रजी).
रोगराईंचा फैलाव, परादीसमधील उत्तम जीवन नजीक असल्याचा आणखी एक पुरावा आहे. येशूने भाकीत केले, की “जागोजाग मऱ्या येतील.” (लूक २१:११) ही भविष्यवाणी खरी ठरली का? होय. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर, स्पॅनिश फ्ल्यूने जवळजवळ दोन कोटी लोकांचा बळी घेतला. तेव्हापासून, कर्करोग, हृदयविकार, मलेरिया, एड्स आणि इतर आजारांनी लाखोंना जीवे मारले आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये दूषित पाण्यामुळे झालेले आजार (यामध्ये अतिसार आणि आतड्यांना जंतूंचा संसर्ग यांचाही समावेश आहे) दरवर्षी कोट्यावधी प्राण घेतात.
येशू असेही म्हणाला: “जागोजागी दुष्काळ . . . होतील.” (मत्तय २४:७) आधीच्या लेखात पाहिल्याप्रमाणे, जगातील गरीबांकडे खाण्यासाठी पुरेसे अन्न नाही. परादीसमध्ये अधिक उत्तम जीवन लवकरच येईल याचा हा आणखी एक पुरावा आहे.
“मोठमोठे भूमीकंप होतील,” असे येशू म्हणाला. (लूक २१:११) हे देखील आपल्या काळात खरे ठरले आहे. १९१४ पासून उद्ध्वस्तक भूमीकंपांमुळे घडलेल्या नाशाने शेकडो हजारो लोकांचे प्राण घेतले आहेत.
लोकांमध्ये झालेल्या बदलाद्वारे ‘शेवटल्या काळाला’ चिन्हित केले जाईल, असे बायबल पुढे म्हणते. लोक “स्वार्थी” आणि “धनलोभी” होतील आणि मुले “आई बापास न मानणारी” होतील. सर्वसामान्यपणे लोक ‘देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारे’ असे होतील. (२ तीमथ्य ३:१-५) हे वर्णन पुष्कळांना लागू होते याजशी तुम्ही सहमत नाही का?
अधिकाधिक लोक वाईट गोष्टी आचरतात तशी अनीती अधिकच वाढत आहे. हेही भाकीत करण्यात आले होते. मत्तय २४:१२ नुसार येशू, ‘अनीतीच्या वाढीबद्दल’ बोलला. अनेक वर्षांपेक्षा आता, गुन्हेगारी अधिकच बिकट झाली आहे हे तुम्हाला कदाचित पटेलच. कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्यांना लुटले जाईल, फसवले जाईल, किंवा इजा पोहंचवली जाईल याची सगळीकडे लोकांना भीती लागून आहे.
युद्धे, सर्वत्र फैलावलेले आजार, अन्नटंचाई, भूमीकंप, वाढती गुन्हेगारी आणि सर्वात वाईट म्हणजे मानवी नातेसंबंधातील बदल—बायबलने भाकीत केल्याप्रमाणे हे सर्व आज स्पष्ट दिसत आहे. ‘परंतु या गोष्टी तर संपूर्ण इतिहासात होत आल्या नाहीत का?’ ‘मग आपल्या दिवसांमध्ये इतके वेगळे ते काय?’ असे तुम्ही कदाचित विचाराल.
आज जे काही घडत आहे त्याचे पुष्कळ काही महत्त्वपूर्ण पैलू आहेत. अन्नटंचाई यासारखे एखादे चिन्ह हेच, आपण शेवटल्या दिवसांमध्ये राहत आहोत व उत्तम जीवन नजीक असल्याचा पुरावा देते असे बायबल म्हणत नाही. अंत समयाबद्दलच्या बायबलच्या भविष्यवाण्या, एका अधार्मिक पिढीसंबंधाने पूर्ण होणार होत्या.—मत्तय २४:३४-३९; लूक १७:२६, २७.
शिवाय, येशूच्या भविष्यवाणीचे काही पैलू—विशेषकरून अन्नटंचाई आणि सर्वत्र फैलावलेल्या रोगराईबद्दलचे पैलू—आज खरे ठरत आहेत. का बरे? कारण वैज्ञानिक साध्यता केव्हाही अधिक महान नाहीत. वैज्ञानिक ज्ञान आणि उपचाराचे प्रकार इतके प्रगतीशील किंवा विस्तीर्ण नाहीत. केवळ देवच त्याच्या वचनात सांगू शकला असता, की अशा वेळेला रोगराई आणि अन्नटंचाई सुधारण्याऐवजी अधिक बिकट होत जाईल.
अंत समयाबद्दलच्या किंवा ‘शेवटल्या दिवसांबद्दलच्या’ सर्व बायबल भविष्यवाण्या खऱ्या ठरत असल्यामुळे, आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? हाच, की उत्तम जीवन नजीक आहे! परंतु ते कसे येईल?
उत्तम जीवन—कसे?
मनुष्य परादीस आणू शकेल असे तुम्हाला वाटते का? संपूर्ण इतिहासात आजपर्यंत अनेक प्रकारची मानवी सरकारे येऊन गेली. काहींनी लोकांच्या गरजांचे समाधान करण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. तरीदेखील, पुष्कळ समस्या आणखीनच चिघळत चालल्या आहेत. श्रीमंत आणि गरीब राष्ट्र दोन्हींमध्ये, सरकारे मादक पदार्थांचा दुरुपयोग, हलक्या प्रतीची घरे, दारिद्र्य, गुन्हेगारी, बेरोजगारी आणि युद्धे यांच्याविरुद्ध लढत देण्यास झटत आहेत.
या समस्यांपैकी काही समस्या सरकारे सोडवू शकले तरीही ते आजारपणातून पूर्णपणे मुक्तता कधीच देऊ शकणार नाहीत; किंवा वार्धक्य आणि मृत्यूचा कधीच अंत करू शकणार नाहीत. स्पष्टपणे मग, मानव पृथ्वीवर परादीस कधीच आणू शकणार नाहीत.
बायबल सूज्ञपणे म्हणते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका. मनुष्यावर भरवसा ठेवू नका. त्यांच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” तेव्हा, आपण कोणावर भरवसा ठेवावा? बायबल उत्तरते: “ज्याच्या साहाय्याकरिता याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर [यहोवा, NW] ह्यावर आहे तो धन्य.” (स्तोत्र १४६:३, ५) आपली आशा यहोवा देवावर ठेवली तर आपण कधीच निराश होणार नाही.
पृथ्वी, सूर्य, तारे निर्माण करण्यासाठी ज्याच्याकडे बुद्धी व सामर्थ्य आहे तो पृथ्वीलाही परादीस बनवू शकतो. मानवांना उत्तम जीवनाचा आनंद लुटण्यास तो शक्य करू शकतो. यहोवा देव जे काही काम हाती घेतो ते, तो पूर्ण करू शकतो व पूर्ण करील. “देवाला काहीच अशक्य होणार नाही,” असे त्याचे वचन म्हणते. (लूक १:३७) परंतु देव एक उत्तम जीवन कसे देऊ शकेल?
यहोवा, त्याच्या राज्याकरवी मानवजातीसाठी एक सर्वोत्तम जीवन देईल. देवाचे राज्य म्हणजे काय? ते एक खरे सरकार असून त्याचा देव-नियुक्त शासक येशू ख्रिस्त आहे. देवाचे राज्य स्वर्गात आहे, पण लवकरच ते परादीस पृथ्वीवरील रहिवाश्यांकरता अद्भुत आशीर्वाद व सर्वोत्तम जीवन आणणार आहे.—यशया ९:६, ७.
बायबलमधील मत्तय ६:९-१३ या वचनातील येशूची आदर्श प्रार्थना तुम्हाला कदाचित आधीच माहीत असेल. देवाला केलेल्या त्या प्रार्थनेतील एक भाग असा आहे: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” या प्रार्थनेच्या सुसंगतेत, देवाचे राज्य, पृथ्वीबद्दल यहोवा देवाचे उद्देश पूर्ण करण्यासाठी ‘येईल.’ पृथ्वीला परादीस बनवण्याचा त्याचा उद्देश आहे.
एक शेवटला प्रश्न उद्भवतो: येणाऱ्या परादीसमध्ये उत्तम जीवनाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही काय केले पाहिजे?
तुम्हाला काय करण्याची आवश्यकता आहे
यहोवा देव, त्याची इच्छा पूर्ण करणाऱ्या सर्वांसाठी परादीसमध्ये उत्तम जीवनाची आशा प्रेमळपणे पुरवतो. बायबल आपल्याला सांगते: “नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) परंतु, देवाच्या नजरेत एखाद्याला कोणती गोष्ट धार्मिक बनवते?
यहोवाला आनंदित करण्यासाठी तो आपल्याकडून काय इच्छितो याबद्दल आपण अधिक शिकून घेतले पाहिजे. आपण देवाचे ज्ञान घेऊन ते आपल्या दैनंदिन जीवनात लागू केले तर आपण अनंतकाळ जगू शकतो. देवाला प्रार्थना करताना येशू म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
आपल्याला यहोवा देव आणि येशू ख्रिस्ताबद्दल माहिती देणारे पुस्तक देवाचे वचन, बायबल हे आहे. ते यहोवाने दिलेल्या सर्वात मौल्यवान बक्षीसांपैकी एक आहे. बायबल, एखाद्या प्रेमळ पित्याने त्याच्या मुलांना लिहिलेल्या पत्राप्रमाणे आहे. ते आपल्याला, मानवजातीसाठी उत्तम जीवन आणण्याच्या देवाच्या अभिवचनाबद्दल सांगते व हे जीवन आपण कसे प्राप्त करू शकतो ते दाखवते. देवाने गतकाळात काय केले व तो भवितव्यात काय करणार आहे याची माहिती बायबल आपल्याला देते. आपण आपल्या समस्या आता यशस्वीरित्या कशा हाताळू शकतो यासाठी ते व्यावहारिक सल्ले देते. खरोखर, या त्रस्त जगात राहत असताना देखील आपण काही प्रमाणात आनंद कसा प्राप्त करू शकतो याबद्दल देवाचे वचन आपल्याला शिकवते.—२ तीमथ्य ३:१६, १७.
यहोवाचे साक्षीदार आनंदाने तुमच्यासाठी मोफत गृह बायबल अभ्यासाची व्यवस्था करतील. नजीकच्या भवितव्यातील एका उत्तम जीवनाची आशा मनी बाळगून तुम्ही आता आनंदी जीवन कसे प्राप्त करू शकाल हे शिका.
[५ पानांवरील चित्रं]
उत्तम जीवन नजीक असल्याचे बायबल भविष्यवाण्या सूचित करतात
[७ पानांवरील चित्रं]
देवाचे राज्य मानवजातीसाठी उत्तम जीवन आणील