“व्याकुळ चित्त”ग्रस्तांना सांत्वन
आज सैतानाचे जग “कोडगे” झाले आहे. (इफिसकर ४:१९; १ योहान ५:१९) व्यभिचार आणि जारकर्म सर्वत्र आहे. अनेक देशांमध्ये ५० प्रतिशत किंवा त्यापेक्षाही अधिक विवाह घटस्फोटामुळे संपुष्टात येतात. समलैंगिकता सर्वत्र स्वीकार्हार्य आहे. लैंगिक हिंसाचार—बलात्कार—बहुतेक वेळा बातम्यांत झळकतो. अश्लील साहित्य म्हणजे अब्जावधी डॉलरचा धंदाच आहे.—रोमकर १:२६, २७.
निरागस मुलांवरील लैंगिक अत्याचार अति अधम विकृतींपैकी आहे. सैतानाच्या जगाच्या ज्ञानाप्रमाणे, मुलांवरील लैंगिक अत्याचार ‘इंद्रियजन्य, सैतानाकडील’ आहे. (याकोब ३:१५) टाईम नियतकालिक म्हणते, की फक्त अमेरिकेमध्ये “दर वर्षी ४,००,००० पेक्षा अधिक वास्तविक लैंगिक गुन्हे शिक्षक आणि डॉक्टरांद्वारे संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदवले जातात.” या अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्ती प्रौढ झाल्यानंतरही त्यांपैकी अनेकांवर दुःखदायक घाव कायम असतात आणि हे घाव वास्तविक आहेत! बायबल म्हणते: “मनुष्याचे चित्त [मानसिक प्रवृत्ती, आंतरिक भावना आणि विचार] आपली व्याधि सहन करिते; पण व्याकुळ [जखमी, पीडित] चित्त कोणाच्याने प्रसन्न करवेल?”—नीतिसूत्रे १८:१४.
देवाच्या राज्याची सुवार्ता ‘भग्न हृदय’ आणि ‘खिन्न आत्मा’ असणाऱ्यांसहित सर्व तऱ्हेच्या लोकांना अपीलकारक वाटते. (यशया ६१:१-४) यात काही नवल नाही की, “तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो,” या निमंत्रणास भावनात्मक वेदनांचा अनुभव घेणारे अनेक जण प्रतिसाद देतात. (प्रकटीकरण २२:१७) ख्रिस्ती मंडळी अशा लोकांकरता सांत्वनाचे स्थान असू शकते. व्यथा लवकरच गतकाळात जमा झालेली असेल, हे जाणल्यामुळे ते हर्षित होतात. (यशया ६५:१७) तरी सुद्धा, तोपर्यंत त्यांना “सांत्वन” देण्याची आणि त्यांच्या जखमांवर ‘पट्ट्या बांधण्याची’ आवश्यकता असेल. पौलाने ख्रिश्चनांना उचितपणे सल्ला दिला: “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनीकाकर ५:१४.
“दडपलेल्या स्मृती”
अलीकडील वर्षांमध्ये अनेक जण अशा काही कारणांमुळे “भग्न हृदयी” आहेत, ज्याबद्दलची कारणे इतरांना समजावून घेण्यास अवघड जाते. ते प्रौढ आहेत, “दडपलेल्या स्मृती” या वर्णनाची कारणमीमांसा करताना ते म्हणतात की, ते लहान होते तेव्हा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता.a एखाद्या प्रौढाने (किंवा अनेक प्रौढ व्यक्तींनी) त्यांच्यावर लहानपणी अत्याचार केल्याची पूर्वदृश्ये आणि “स्मृती” अनपेक्षितपणे त्यांच्या मनांत येत नाहीत तोपर्यंत त्यांच्यावर जबरदस्ती झाली होती, हा विचार त्यांच्या मनांत येत नाही. ख्रिस्ती मंडळीमध्ये अशा प्रकारचे अस्वस्थ करणारे विचार कोणाला आहेत का? काही देशांमध्ये अशा व्यक्ती आहेत आणि या समर्पित व्यक्ती कदाचित अतिशय दुःखाचा, रोषाचा, दोषीपणाचा, लज्जेचा किंवा एकाकीपणाचा अनुभव घेत असतील. त्यांना दावीदाप्रमाणे देवापासून विविक्त झाल्यासारखे वाटत असेल आणि कदाचित ते आक्रोशही करत असतील: “हे परमेश्वरा, [यहोवा, NW] तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टीआड का होतोस?”—स्तोत्र १०:१.
मानसिक-आरोग्य तज्ज्ञांना या “स्मृतीं”चे अनेक पैलू पूर्णपणे समजत नाही. तरी देखील, अशा प्रकारच्या “स्मृतीं”चा समर्पित ख्रिश्चनांच्या आध्यात्मिकतेवर परिणाम होऊ शकतो. यास्तव त्यांना हाताळण्यासाठी मार्गदर्शनाकरता आपण देवाच्या वचनावर भिस्त ठेवतो. बायबल “सर्व गोष्टी समजून” देते. (२ तीमथ्य २:७; ३:१६) देवाचे वचन सर्व संबंधितांना, यहोवा “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव . . . आमच्यावरील सर्व संकटांत आमचे सांत्वन” करणारा यावर विश्वास ठेवण्यासही मदत करते.—२ करिंथकर १:३, ४.
तो खरोखरच घडला होता का?
या “स्मृती” काय आहेत आणि त्या, प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टींचे कितपत प्रतिनिधित्व करतात यांविषयी जगामध्ये बराच मतभेद आहे. यहोवाचे साक्षीदार ‘जगाचे भाग नाहीत’ त्यामुळे या मतभेदामध्ये कोणताही भाग घेत नाहीत. (योहान १७:१६) प्रकाशित झालेल्या अहवालांनुसार, “स्मृती” अचूक असल्याचे काहीवेळा सिद्ध झाले आहे. उदाहरणार्थ, विमा समायोजक फ्रँक फिट्झपॅट्रीक यास एका विशिष्ट पाळकाने त्याच्यावर जबरदस्ती केल्याचे “आठवले” त्यानंतर सुमारे शेकडो लोक असा दावा करण्यास पुढे आले की, त्यांच्यावरही याच पाळकाद्वारे लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. वृत्तानुसार, पाळकाने अत्याचार केल्याचे कबूल केले.
तथापि, कित्येक लोक त्यांच्या “स्मृतीं”ची खात्री देऊ शकत नाही, हे उल्लेखनीय आहे. याप्रकारे पीडित झालेल्या काही जणांकडे, अत्याचार करणारे विशिष्ट लोक किंवा अत्याचार झाल्याचे खास ठिकाण याबद्दलच्या ठळक आठवणी आहेत. पण त्याच्या विपरीत असणाऱ्या विधिसंमत पुराव्याने “आठवणीं”चा तपशील स्पष्ट असू शकत नाही हे नंतर स्पष्ट केले.
आश्रय देणे
तथापि, अशा “स्मृतीं”मुळे “व्याकुळ चित्त” झालेल्यांना सांत्वन कसे दिले जाऊ शकते? शेजारधर्मी शोमरोनी, हा येशूचा दाखला लक्षात ठेवा. एका माणसावर लुटाऱ्यांकडून हल्ला करण्यात आला, त्याला मारण्यात आले आणि त्याचे कपडे काढून घेण्यात आले. शोमरोनी तेथे आला तेव्हा त्याला त्या जखमी माणसाची दया आली. त्याने काय केले? त्याने हल्ल्याचा सविस्तर तपशील ऐकण्याचा आग्रह धरला का? अथवा शोमरोन्याने लुटारूंचे वर्णन विचारून त्यांचा लागलीच पाठलाग केला का? नाही. तो मनुष्य जखमी होता! यास्तव, शोमरोन्याने सौम्यपणे त्याच्या जखमांवर पट्ट्या बांधल्या आणि त्याला प्रेमळपणे सुरक्षित ठिकाणी म्हणजे जेथे तो बरा होऊ शकत होता त्या जवळच्या उतारशाळेत नेले.—लूक १०:३०-३७.
शारीरिक जखमा आणि प्रत्यक्षात बाल्यावस्थेतील लैंगिक अत्याचारामुळे झालेले “व्याकुळ चित्त” या दोन गोष्टींमध्ये फरक आहे, हे मान्य आहे. परंतु या दोन्ही गोष्टींमुळे अतिशय दुःख होते. यास्तव, पीडित सह-ख्रिश्चनासाठी काय करता येऊ शकते हे शोमरोन्याने जखमी यहुद्यासाठी केलेले कार्य दाखवून देते. प्रेमळ सांत्वन आणि त्यास बरे होण्यास मदत करणे यांस प्राथमिकता द्यावयाची आहे.
भावनात्मक किंवा शारीरिक दुःख ईयोबाच्या सचोटीचा भंग करील, असा दिखाऊ आत्मविश्वास बाळगून दियाबलाने विश्वासू ईयोबाला पीडित केले. (ईयोब १:११; २:५) तेव्हापासून, देवाच्या सेवकांचा विश्वास कमजोर करण्यास्तव—त्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या—अनेकदा त्रासाचा उपयोग केला आहे. (पडताळा २ करिंथकर १२:७-९.) आज दियाबल, बाल अत्याचाराचा आणि अनेक प्रौढ ज्यांनी यास सोसले (किंवा या अत्याचारामुळे दुःख झाल्याच्या “स्मृतीं”मुळे त्रस्त आहेत) अशांच्या ‘खिन्न आत्म्याचा’ ख्रिश्चनांचा विश्वास कमजोर करण्यासाठी उपयोग करत आहे याविषयी आपण साशंक असू शकतो का? सैतानाचा हल्ला होतो तेव्हा येशूप्रमाणे एखादा ख्रिस्ती जो दुःख भोगतो; पण त्याच्या सचोटीचा त्याग करण्यास डगमगत नाही, तो असे म्हणून नकार देतो: “अरे सैताना, चालता हो!”—मत्तय ४:१०.
आध्यात्मिकरीत्या प्रबळ असा
‘विश्वासू व बुद्धिमान दासाने‘ बाल अत्याचारामुळे होणाऱ्या आध्यात्मिक आणि भावनात्मक दुःखास तोंड देण्यासाठी माहिती प्रकाशित केली आहे. (मत्तय २४:४५-४७) अनुभव हे दाखवून देतो की, पीडित व्यक्तीने “देवाची सर्व शस्त्रसामग्री” धारण करून ‘प्रभूच्या शक्तीवर आणि त्याच्या पराक्रमी सामर्थ्यावर’ विसंबून राहिल्यास तिला मदत होते. (इफिसकर ६:१०-१७) या सामग्रीमध्ये बायबल ‘सत्याचा’ समावेश होतो. हे सत्य, सैतान प्रारंभिक शत्रू असल्याचे उघड करते व अशा अंधारास दूर करते ज्यामध्ये सैतान आणि त्यास पाठिंबा देणारे काम करतात. (योहान ३:१९) त्यानंतर, सामग्रीमध्ये “नीतिमत्त्वाचे उरस्त्राण” आहे. पीडित व्यक्तीने धार्मिक दर्जांना जडून राहण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, काहींमध्ये स्वतःस इजा पोहंचविण्याच्या किंवा अनैतिकता आचरण्याच्या प्रबळ इच्छा असतात. असे लोक दर वेळी अशा प्रबळ इच्छांना विरोध करतात तेव्हा विजय आपलासा करतात!
आध्यात्मिक सामग्रीमध्ये ‘शांतीच्या सुवार्तेचा’ देखील आंतर्भाव होतो. यहोवाच्या उद्देशांविषयी इतरांशी बोलल्यामुळे जो बोलतो त्यास आणि त्याचे जो कोणी ऐकतो त्यास सामर्थ्य प्राप्त होते. (१ तीमथ्य ४:१६) “व्याकुळ चित्त” असणाऱ्यांपैकी तुम्ही एक असल्यास सुवार्तेविषयी बोलणे तुम्हाला कठीण वाटेल; तेव्हा या महत्त्वपूर्ण कार्यात भाग घेण्याकरता दुसऱ्या ख्रिश्चनाच्या सोबतीसाठी प्रयत्न करा. ‘विश्वासाच्या ढालीचे’ विस्मरण होऊ देऊ नका. यहोवा तुमच्यावर प्रेम करतो आणि तुम्ही ज्यास मुकला आहात ते सर्व तो तुम्हाला परत देईल, असा विश्वास बाळगा. येशू सुद्धा तुमच्यावर प्रेम करतो, असा तुम्ही निःसंशये विश्वास बाळगा आणि तुमच्याकरता मरण पत्करण्याद्वारे त्याने याची प्रचिती दिली. (योहान ३:१६) यहोवा त्याच्या सेवकांची काळजी घेत नाही, असा खोटा दावा सैतानाने नेहमीच केला आहे. घोर, अतिदुष्ट लबाडींपैकी ही त्याची आणखी एक लबाडी होती.—योहान ८:४४; पडताळा ईयोब ४:१, १५-१८; ४२:१०-१५.
यहोवाला तुमची काळजी आहे, असा विश्वास बाळगण्यास मानसिक दुःखामुळे अवघड जात असल्यास त्याला नक्कीच काळजी वाटते, असा दृढपणे विश्वास बाळगणाऱ्या इतर ख्रिश्चनांशी सोबती करणे मदतदायी होईल. (स्तोत्र ११९:१०७, १११; नीतिसूत्रे १८:१; इब्रीयांस १०:२३-२५) जीवनाच्या बक्षिसापासून तुम्हाला हिरावून घेण्यास सैतानाला नकार द्या. हे ध्यानात ठेवा की, “तारणाचे शिरस्त्राण” सामग्रीचा एक भाग आहे; त्याचप्रमाणे “आत्म्याची तरवार” देखील. बायबल पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित आहे, ज्यावर सैतान मात करू शकत नाही. (२ तीमथ्य ३:१६; इब्रीयांस ४:१२) त्याचे आरोग्यप्रदायक शब्द भावनात्मक वेदनेस शमवू शकतात.—पडताळा स्तोत्र १०७:२०; २ करिंथकर १०:४, ५.
शेवटी, सहन करता यावे म्हणून सामर्थ्यासाठी अविरतपणे प्रार्थना करा. (रोमकर १२:१२; इफिसकर ६:१८) मनःपूर्वक प्रार्थनेने येशूला भावनात्मक असह्य व्यथेमध्ये टिकून ठेवले आणि मनःपूर्वक प्रार्थना तुम्हाला देखील मदत करू शकते. (लूक २२:४१-४३) प्रार्थना करणे तुमच्याकरता कठीण आहे का? इतरांना तुमच्यासह आणि तुमच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा. (कलस्सैकर १:३; याकोब ५:१४) पवित्र आत्मा तुमच्या प्रार्थनांना पाठिंबा देईल. (पडताळा, रोमकर ८:२६, २७.) वेदनामय शारीरिक आजाराप्रमाणे, काहींच्या सखोल भावनात्मक जखमा या व्यवस्थीकरणामध्ये कदाचित पूर्णतः बऱ्या होणार नाहीत. पण यहोवाच्या मदतीने आपण सहन करू शकतो आणि सहनशीलता विजयी होते, येशूच्या बाबतीत हेच झाले. (योहान १६:३३) “अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर [यहोवावर] भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे.”—स्तोत्र ६२:८.
अभिकथित अत्याचाऱ्याबद्दल काय?
मुलावर प्रत्यक्षात लैंगिक रीत्या अत्याचार करणारा मनुष्य बलात्कारी आहे आणि त्याकडे याच दृष्टीने पाहिले पाहिजे. अशा प्रकारे बळी पडलेल्या कोणासही, त्याच्यावर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध आरोप करण्याचा अधिकार आहे. तरी देखील, आरोप निव्वळ अत्याचाराच्या “दडपलेल्या स्मृतीं”वर आधारित असल्यास आरोपपत्र उतावीळपणे दाखल करता कामा नये. या बाबतीत पीडिताकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनात्मक स्थैर्याच्या प्रमाणाची पुनःप्राप्ती करणे. काही काळ उलटल्यानंतर तो, “स्मृतीं”चा पडताळा करून बघण्याच्या आणि त्यांविषयी काय करायचे याचा निर्णय घेण्याच्या उत्तम स्थितीत असेल.
डॉनाच्या उदाहरणाचा विचार करा. वृत्तानुसार, तिला आहार संबंधित विकार उद्भवत असल्यामुळे ती एका सल्लागाराकडे गेली—जो विशेष ख्यातीप्राप्त नव्हता. लवकरच अविवाह्य स्त्रीसंबंध ठेवले, असा आरोप डॉना स्वतःच्या वडिलांवर करू लागली त्यामुळे तिच्या वडिलांना न्यायालयात नेण्यात आले. न्यायसहायकाची कोंडी झाल्यामुळे तिचे वडील तुरुंगात गेले नाहीत, पण त्यांना $१,००,००० चे विधी बिल भरावे लागले. हे सर्व झाल्यानंतर शेवटी, डॉनाने तिच्या पालकांना सांगितले की, तिने लैंगिक अत्याचार झाला यावर कधी विश्वासच ठेवला नाही!
शलमोनाने समंजसपणे म्हटले: “फिर्याद करावयास जाण्याची उतावळी करू नको.” (नीतिसूत्रे २५:८) अनुचित कृत्य करणारी आरोपी व्यक्ती अजूनही मुलांवर लैंगिक अत्याचार करत आहे, असा संशय घेण्यास सबळ कारण असल्यास, त्या व्यक्तीस इशारा द्यावा लागेल. अशा बाबतीत मंडळीचे वडील मदत करू शकतात. परंतु उतावीळ होऊ नका. कालांतराने, संबंधित प्रकरणाचा त्याग करण्यात तुम्हाला आनंद होईल. तरी देखील, तुम्हाला अनुचित कृत्य करणाऱ्या आरोपी व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घ्यावयाची असल्यास (संभाव्य प्रतिक्रियांमुळे तुम्हाला कसे वाटेल याचा पहिल्यांदा अंदाज बांधून) तसे करण्याचा तुम्हास अधिकार आहे.
“स्मृती” येणाऱ्या व्यक्तीच्या बरे होण्याच्या काळामध्ये कदाचित विचित्र परिस्थिती उद्भवतील. उदाहरणार्थ, दररोजच्या पाहण्यातली एखादी व्यक्ती आपल्यावर जबरदस्ती करत असल्याची स्पष्ट मानसिक चित्रे त्याच्या किंवा तिच्या डोळ्यांसमोर स्पष्ट उभी राहू शकतात. ही बाब हाताळण्यासाठी कोणतेही नियम प्रस्थापित करता येत नाहीत. “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५) काहीवेळा नातेवाईक किंवा एखादा नजीकचा कौटुंबिक सदस्य गोवलेला आहे, असे एखाद्याला कदाचित वाटेल. अनुचित कृत्य करणाऱ्या संशयित व्यक्तीची ओळख पटविण्याची बाब येते तेव्हा काही “दडपलेल्या स्मृतीं”च्या संशयास्पद गुणलक्षणास लक्षात ठेवा. अशा परिस्थितीमध्ये प्रकरण दृढपणे प्रस्थापित होत नाही तोपर्यंत, कुटुंबाबरोबर निदान, अधूनमधून भेटी देण्याद्वारे, पत्राद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क ठेवण्याद्वारे—एखादी व्यक्ती शास्त्रवचनीय मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावरून दिसून येईल.—पडताळा इफिसकर ६:१-३.
वडील काय करू शकतात?
बाल अत्याचाराची पूर्व दृश्ये किंवा त्याच्या “दडपलेल्या स्मृतीं”चा अनुभव घेणारा असलेला मंडळीतील सदस्य वडिलांना येऊन भेटतो तेव्हा त्यांपैकी सामान्यपणे दोघेजण मदतीसाठी नियुक्त केले जातात. वडिलांनी या काळात भावनात्मक तणावास तोंड देण्यावर लक्ष केंद्रित करण्याद्वारे बळी पडलेल्या व्यक्तीला प्रेमळपणे उत्तेजन दिले पाहिजे. अत्याचार करणाऱ्या ‘आठवलेल्या’ व्यक्तींची नावे पूर्णतः गुप्त ठेवण्यात यावीत.
मेंढपाळ या नात्याने काम करणे, ही वडिलांची प्रमुख कामगिरी आहे. (यशया ३२:१, २; १ पेत्र ५:२, ३) त्यांनी “करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही [स्वतः] धारण” करण्याच्या बाबतीत विशेष दक्ष असले पाहिजे. (कलस्सैकर ३:१२) त्यांनी दयाळुपणे ऐकावे आणि त्यानंतर शास्त्रवचनांतून आरोग्यप्रदायक वचने लागू करावीत. (नीतिसूत्रे १२:१८) यातनामय “स्मृतीं”मुळे पीडित असलेल्यांनी वडिलांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. कारण ते कसे आहेत याची चौकशी करण्यासाठी वडिलांनी त्यांना नियमित भेटी दिल्या होत्या किंवा दूरध्वनीवरून त्यांचा संपर्कही साधला होता. असा संपर्क साधण्यास जास्त वेळ घेण्याची आवश्यकता नाही. तर यहोवाची संघटना काळजी घेते हे ते दाखवितात. ख्रिस्ती बांधव त्याच्यावर खरोखर प्रेम करतात, हे पीडिताला कळते तेव्हा भावनात्मक ताबा पुन्हा मिळविण्यासाठी त्याला विलक्षण प्रमाणात मदत होऊ शकते.
पीडित झालेला मनुष्य, आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतो तेव्हा काय?b अशा वेळी दोन वडील मत्तय १८:१५ च्या अनुषंगाने, त्याने आरोपीला व्यक्तिगत रीत्या भेटले पाहिजे, हा सल्ला संबंधित व्यक्तीला देऊ शकतात. आरोप करणारी व्यक्ती प्रत्यक्ष भेट घेण्यास भावनात्मक रीत्या तयार नसल्यास हा संपर्क दूरध्वनीद्वारे किंवा पत्राद्वारे साधण्यात येऊ शकतो. अशा प्रकारे आरोपीला, त्याच्यावर आरोप करणाऱ्याच्या प्रत्युत्तरात यहोवासमोर गांभीर्यपूर्वक विवरणपत्र सादर करण्याची संधी दिली जाते. त्याने अत्याचार केला नसता, असा पुरावाही कदाचित तो सादर करू शकेल. अथवा एखादा आरोपी कदाचित कबूल होईल आणि त्यामुळे समेट करता येईल. ते किती आशीर्वादाचे असेल! कबुली दिल्यास शास्त्रवचनीय तत्त्वांच्या आधारे दोन वडील पुढील बाबींना हाताळू शकतात.
आरोप फेटाळून लावल्यास न्यायिक मार्गाने आणखी काही करता येणे शक्य नाही, असे वडिलांनी आरोप करणाऱ्यास स्पष्ट केले पाहिजे. मंडळीद्वारे, आरोप करण्यात आलेल्या व्यक्तीला एक निरपराध व्यक्ती या दृष्टीने यापुढेही पाहण्यात येईल. न्यायिक कार्यवाही करण्याआधी दोन किंवा तीन साक्षीदार असलेच पाहिजे, असे बायबल सांगते. (२ करिंथकर १३:१; १ तीमथ्य ५:१९) एकापेक्षा अधिक लोकांना एका व्यक्तीकडून अत्याचार झाल्याचे ‘आठवते’ तरी त्याच्यावर न्यायिक निर्णयांची अंमलबजावणी करण्यास इतर पुष्टी देणारा पुरावा नसल्यामुळे या आठवणींचे स्वरूप फारच अनिश्चित असते. त्या “स्मृती” खोट्या आहेत, (किंवा त्या खऱ्या आहेत,) असा त्याचा अर्थ होत नाही. प्रकरण न्यायिक रीत्या हाताळताना बायबल तत्त्वांचे अनुसरण केलेच पाहिजे.
आरोपी मनुष्य—अपराध केल्याचे नाकारत असला तरी—खरोखर अपराधी असल्यास काय? तो जणू “शिक्षेपासून स्वतःची सुटका” करून घेतो का? निश्चितच नाही! त्याच्या दोषाचा किंवा निर्दोषीपणाचा प्रश्न यहोवाच्या हातांत आश्वस्तपणे सोपवला जाऊ शकतो. “कित्येक माणसांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरिता जातात, आणि कित्येकांची मागून जातात.” (१ तीमथ्य ५:२४; रोमकर १२:१९; १४:१२) नीतिसूत्राचे पुस्तक म्हणते: “धार्मिकांची आशा आनंदप्रद होईल, पण दुर्जनांची अपेक्षा नष्ट होईल.” “दुर्जन मेला म्हणजे त्याची अपेक्षा नष्ट होईल.” (नीतिसूत्रे १०:२८; ११:७) अखेरीस, यहोवा देव आणि येशू ख्रिस्त निःपक्षपातीपणे सार्वकालिक न्यायनिवाडा बजावतात.—१ करिंथकर ४:५.
दियाबलास विरोध करणे
समर्पित जीव प्रचंड शारीरिक आणि भावनात्मक वेदना असतानाही सहन करतात तेव्हा त्यांच्या आंतरिक सामर्थ्याचा आणि देवावरील त्यांच्या प्रेमाचा किती मोठा पुरावा मिळतो! त्यांना अविरत ठेवण्यास यहोवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याची किती मोठी साक्ष!—पडताळा २ करिंथकर ४:७.
पेत्राचे शब्द अशा लोकांस लागू होतात: “त्याच्याविरुद्ध [सैतानाविरुद्ध] विश्वासात असे उभे दृढ राहा.” (१ पेत्र ५:९) असे करणे कदाचित सोपे नसेल. काहीवेळा स्पष्टपणे आणि तर्कशास्त्रानुसार विचार करणेही कठीण होईल. परंतु हार मानू नका! लवकरच दियाबल आणि त्याच्या कुयुक्त्या नाहीशा होतील. खरोखरच, आपण अशा काळाची वाट पाहत आहोत जेव्हा “देव स्वतः . . . त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.
[तळटीपा]
a आपल्या सर्वांकडे असणाऱ्या खास वैशिष्ट्यपूर्ण स्मृतींपासून या स्मृती भिन्न आहेत, हे दाखविण्यासाठी “दडपलेल्या स्मृती” आणि त्यासारख्या अभिव्यक्ती अवतरण चिन्हांमध्ये अवतरीत केल्या आहेत.
b संबंधित बाब मंडळीतील सर्वांना ठाऊक झाली असल्यास परिच्छेदामध्ये दाखविलेल्या मार्गाचा अवलंब करणे सुद्धा आवश्यक असेल.