‘खाली पडलो, तरी नाश झाला नाही’
उल्फ हेल्गसनद्वारा निवेदित
जुलै १९८३ मध्ये मला वाकून पाहत असलेले डॉक्टर विस्मित होऊन उद्गारले: “तो जागा आहे!” १५ तास चाललेल्या किचकट शस्त्रक्रियेत, माझ्या मणक्यातून १२ सेंटीमीटर लांबीची गाठ काढण्यात आली. मी पूर्णपणे हतबल झालो.
काही दिवसांनी, मला स्वीडनच्या दक्षिण भागात, माझे गाव हॉल्सिंबर्गपासून जवळजवळ ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या इस्पितळात हलवण्यात आले. तेथे मी एका पुनर्वसन कार्यक्रमात सामील झालो. हा कार्यक्रम अत्यंत त्रासदायक असेल असे फिजिओथेरपिस्टने सांगितले तरीसुद्धा मी सुरवात करण्यास उत्सुक होतो. मला कसेही करून पुन्हा चालायचे होते. दिवसाला-पाच-तास याप्रमाणे व्यायामाचा नित्यक्रम नेमाने पाळल्यामुळे, मी जलद प्रगती केली.
महिनाभराने, प्रवासी पर्यवेक्षकांनी आमच्या मंडळीला भेट दिली तेव्हा, ते व इतर ख्रिस्ती वडील, इस्पितळातील माझ्या खोलीत वडिलांची सभा घेण्यासाठी लांबचा प्रवास करून आले. बंधुप्रेमाचा हा पुरावा पाहून माझे हृदय केवढे उल्लसित झाले! वॉर्डातील परिचारिकांनी सभेनंतर सर्वांना चहा व फराळ दिला.
सुरवातीला माझी प्रगती पाहून डॉक्टर चकित झाले. तीन महिन्यांनंतर मी माझ्या व्हीलचेअरवर बसू शकत होतो व काही सेकंद उभाही राहू शकत होतो. मी आनंदी होतो व पुन्हा चालू लागण्यासाठी दृढनिश्चयी होतो. माझे कुटुंबीय व सहख्रिस्ती बांधव यांनी त्यांच्या भेटींच्या वेळी मला खूप प्रोत्साहन दिले. मी अल्प कालावधींसाठी घरीसुद्धा जाऊ शकत होतो.
खरी पिछेहाट
त्यानंतर मात्र मी आणखी प्रगती केली नाही. लवकरच फिजियोथेरपिस्टने, “तुम्ही यापेक्षा अधिक बरे होऊ शकणार नाही” ही दुःखद माहिती मला दिली. व्हीलचेअरवर बसून हालचाल करण्यासाठी मला धैर्य देणे हेच आता त्यांचे ध्येय बनले. माझे काय होईल याचा मी विचार केला. माझी पत्नी कशी सांभाळून घेईल? तिच्या स्वतःवर देखील मोठी शस्त्रक्रिया झाली होती व तिला माझ्या मदतीची गरज होती. मला वैद्यकीय संस्थेच्या काळजीची गरज कायम लागेल का?
मी अतिशय खिन्न झालो. माझी ताकद, धैर्य व शक्ती ऱ्हास पावली. दिवस उलटले व मी तसाच निष्क्रिय राहिलो. मी केवळ शारीरिकरित्याच हतबल नव्हे तर भावनिक व आध्यात्मिकदृष्ट्या देखील बधिर झालो होतो. मी “खाली पडलेलो” होतो. मी नेहमी स्वतःला आध्यात्मिकरित्या खंबीर समजले होते. देवाच्या राज्यावर खोलवर रुजलेला विश्वास माझ्याठायी होता. (दानीएल २:४४; मत्तय ६:१०) देवाच्या धार्मिक नवीन जगात सर्व आजार व अपंगत्व बरे करण्यात येतील व तेथे सर्व मानवजातीला परिपूर्ण जीवनाची पुनःप्राप्ती होईल या बायबलच्या प्रतिज्ञेबद्दल मला खात्री होती. (यशया २५:८; ३३:२४; २ पेत्र ३:१३) आता मला केवळ शारीरिकदृष्ट्या नव्हे तर आध्यात्मिकरित्या सुद्धा हतबल झाल्यासारखे वाटले. मला माझा “नाश झाला” आहे असे वाटले.—२ करिंथकर ४:९.
पुढे काही सांगण्याआधी, मी तुम्हाला माझ्या पार्श्वभूमीबद्दल थोडे सांगतो.
सुखी कुटुंब
माझा जन्म १९३४ या वर्षी झाला. माझी प्रकृती नेहमी चांगली असायची. १९५० या दशकाच्या सुरवातीला माझी भेट इंग्रडशी घडली व १९५८ साली आम्ही लग्न करून मध्य स्वीडनमध्ये, अस्टरसंड या शहरात स्थायिक झालो. आम्ही १९६३ या वर्षी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागलो तेव्हा आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली. तोवर आम्हाला तीन मुले झालेली होती—एवा, ब्यॉन व लीना. लवकरच आमचे सबंध कुटुंब बायबल सत्यांच्या ज्ञानाचा अभ्यास करत व त्यात वृद्धिंगत होत होते.
अभ्यास सुरू केल्यानंतर लवकरच, आम्ही आमचे शहर सोडून हॉल्सिंगबर्गला गेलो. तेथे माझ्या पत्नीने व मी, स्वतःस यहोवाला समर्पित केले व १९६४ या वर्षी आमचा बाप्तिस्मा झाला. आमची सर्वात थोरली मुलगी, एवा हिचा १९६८ साली बाप्तिस्मा झाला तेव्हा आमचा आनंद द्विगुणित झाला. सात वर्षांनी, १९७५ मध्ये ब्यॉन व लीनाचासुद्धा बाप्तिस्मा झाला, व त्याच्या पुढच्या वर्षी मला ख्रिस्ती मंडळीत वडील म्हणून नियुक्त करण्यात आले.
माझ्या प्रापंचिक कार्यामुळे, मी माझ्या कुटुंबाच्या भौतिक गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकत होतो. म्हणूनच ब्यॉन व लीनाने पूर्ण-वेळेची सेवा सुरू केली तेव्हा आम्हाला आणखीन आनंद झाला. लवकरच ब्यॉनला, ऑर्ब्यूग येथे असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. सगळे काही कसे सुरळीत चालले होते. मग, १९८० सालाच्या सुरवातीस, मला त्या गाठीचे शारीरिक परिणाम जाणवू लागले जी शेवटी १९८३ मध्ये त्या मोठ्या शस्त्रक्रियेत काढून टाकण्यात आली.
आध्यात्मिक हतबलतेवर मात करणे
मी पुन्हा चालू शकणार नाही हे मला सांगण्यात आले तेव्हा, जीवनात आशाच नाही असे मला वाटू लागले. मग, मी माझी आध्यात्मिक शक्ती परत कशी मिळवली? मला वाटले त्यापेक्षा ते सोपे होते. मी फक्त माझे बायबल उचलले व वाचणे सुरू केले. मी जितके जास्त वाचले, तितकी जास्त आध्यात्मिक शक्ती मला मिळाली. सर्वात अधिक मला येशूच्या डोंगरावरील प्रवचनाचे मोल कळले. मी ते पुन्हा पुन्हा वाचले व त्यावर मनन केले.
जीवनाबद्दलचा माझा आनंदी दृष्टिकोन पूर्ववत झाला. वाचन व मनन केल्यामुळे, मी अडथळ्यांऐवजी संधी शोधू लागलो. इतरांसोबत बायबल सत्यांची सहभागिता करण्याची माझी इच्छा पुन्हा जागृत झाली, व इस्पितळाच्या कर्मचाऱ्यांना आणि मला भेटतील त्या इतरांना साक्ष देण्याकरवी मी ही इच्छा पूर्ण केली. माझ्या कुटुंबाने मला पूर्ण सहकार्य दिले व माझी काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण सुद्धा घेतले. शेवटी मी इस्पितळ सोडू शकलो.
मी एकदाचा घरी आलो. तो आम्हा सर्वांसाठी केवढ्या आनंदाचा दिवस होता! माझ्या कुटुंबातील सदस्यांनी आराखडा तयार केला ज्यात माझी काळजी घेणे समाविष्ट होते. माझा मुलगा ब्यॉन याने यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातले काम सोडायचे ठरवले व तो माझी काळजी घेण्यासाठी घरी परतला. माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रेमाचे व काळजीचे केंद्र बनणे फारच सांत्वनदायक होते.
आणखी एका पीछेहाटीला तोंड देणे
तथापि, जसजसा काळ उलटला तसतशी माझी तब्येत खालावत गेली, व मला हालचाल करणेही कठीण होऊन बसले. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असतानाही, घरी माझी काळजी घेणे शेवटी त्यांना अशक्य झाले. या कारणास्तव, एखाद्या शुश्रूषा गृहात दाखल होणे मला सर्वात सोयीचे वाटले. पुन्हा एकदा बदल व नवीन दिनक्रम सुरू होणार होता. पण मी यास एक आध्यात्मिक पीछेहाट बनू दिले नाही.
मी बायबल वाचन व संशोधनात खंड पडू दिला नाही. मी काय करू शकत नव्हतो यावर नव्हे, तर काय करू शकत होतो यावर विचार करत राहिलो. सर्व यहोवाच्या साक्षीदारांना मिळतात त्या आध्यात्मिक आशीर्वादांवर मी मनन केले. मी प्रार्थनेमार्फत यहोवासोबत जवळीक राखली व इतरांना प्रचार करण्याच्या प्रत्येक संधीचा उपयोग केला.
आता मी पूर्ण रात्री, व दिवसांतला काही वेळ शुश्रूषा गृहात घालवतो. संध्याकाळ व दुपार मी एकतर घरी किंवा मग आमच्या ख्रिस्ती सभांमध्ये घालवतो. एक समाज सेवी संस्था, सभा व माझ्या घरी येण्याजाण्यासाठी नियमित वाहतुकीची व्यवस्था करते. माझे निष्ठावान कुटुंब, मंडळीतील बांधव व शुश्रूषा गृहातील कर्मचारी माझी कमालीची काळजी घेतात.
मला जे जमते ते करणे
मी स्वतःला अपंग समजत नाही व माझे कुटुंबीय तसेच माझे ख्रिस्ती बांधवसुद्धा मला तसे वागवत नाहीत. माझी प्रेमळपणे काळजी घेतली जाते ज्यामुळे मी प्रभावीपणे वडील या नात्याने सेवा करत राहू शकतो. मी दर आठवड्याला मंडळीचा पुस्तक अभ्यास चालवतो, तसेच राज्य सभागृहात मंडळीचा आठवड्याचा टेहळणी बुरूज अभ्याससुद्धा चालवतो. बायबलची पाने उलटविणे मला कठीण जाते व यामुळे सभांमध्ये मला मदत करण्यासाठी कोणालातरी नेमण्यात येते. मी माझ्या व्हीलचेअरमध्ये बसून सभा चालवतो व भाषणे देतो.
अशारितीने मला पूर्वी आवडत होत्या अशा अनेक गोष्टी मी अजूनही करू शकतो, ज्यात मेंढपाळकत्वाच्या भेटी देणेही समाविष्ट आहे. (१ पेत्र ५:२) असे मी, बंधू व भगिनी मदत किंवा सल्ला मागण्यास माझ्याकडे येतात तेव्हा करतो. मी दूरध्वनीचासुद्धा उपयोग करतो, व इतरांना फोन करण्याद्वारे पुढाकार घेतो. यातून परस्परांना प्रोत्साहन मिळते. (रोमकर १:११, १२) माझा एक मित्र अलीकडेच म्हणाला: “मला उदास वाटत असते अशा वेळेस नेमका मला हसवायला तू फोन करतोस.” पण यहोवा माझ्या प्रयत्नांना यश देत आहे हे जाणून मी सुद्धा उत्तेजित होतो.
सभांच्या आधी व नंतर, मी मुलांच्या आल्हादक संगतीचा उपभोग घेतो. मी व्हीलचेअरवर बसलेलो असल्यामुळे, आम्ही डोळ्याला डोळा भिडवून बोलतो. त्यांच्या प्रामाणिकपणाची व स्पष्टवक्तेपणाची मी कदर करतो. एक लहान मुलगा एकदा मला म्हणाला: “मी तुझ्यासारखा देखणा अपंग पाहिलेला नाही!”
मी काय करू शकत नाही याचे रडगाणे गात बसण्यापेक्षा, मी काय करू शकतो यावर लक्ष केंद्रित करण्याद्वारे मी आनंदाने यहोवाची सेवा करत आलो आहे. मला जे झाले त्यावरून मी पुष्कळ काही शिकलोय. मला कळले आहे, की आपण ज्या परीक्षांमधून जातो, त्यांमुळे आपल्याला प्रशिक्षण व बळ मिळते.—१ पेत्र ५:१०.
अनेक निरोगी लोक, आपल्या स्वर्गीय पित्याची उपासना गंभीरपणे घेत नाहीत हे माझ्या पाहण्यात आले आहे. आपण तसे केले नाही तर आपला अभ्यासाचा, सभांचा व क्षेत्र सेवेचा आराखडा केवळ एक नित्यक्रम बनेल. माझ्या मते या जगाच्या अंतातून बचावून देवाच्या वाग्दत्त पार्थिव परादीसमध्ये प्रवेश करण्यासाठी ह्या तरतुदी महत्त्वाच्या आहेत.—स्तोत्र ३७:९-११, २९; १ योहान २:१७.
आपण देवाच्या येणाऱ्या नवीन जगातील जीवनाची आशा आपल्या अंतःकरणात नेहमी ज्वलंत ठेवली पाहिजे. (१ थेस्सलनीकाकर ५:८) निरुत्साही होण्याच्या कोणत्याही प्रवृत्तीसोबत लढा देताना हार मानू नये हेही मी शिकलो आहे. मी यहोवाला माझा पिता व त्याच्या संघटनेला माझी आई या दृष्टीने पहावयास शिकलो आहे. आपण प्रयास केल्यास, यहोवा आम्हापैकी कोणाचाही, त्याचा प्रभावी सेवक होण्यासाठी उपयोग करू शकतो हे मला कळून आले आहे.
मला अनेकदा जणू मी ‘खाली पडलेलो आहे’ असे वाटले असले तरीही, माझा ‘नाश झालेला नाही.’ यहोवा देव व त्याची संघटना, तसेच माझे कुटुंब व माझ्या ख्रिस्ती बांधवांद्वारेसुद्धा मला कधीही टाकून देण्यात आले नाही. बायबल घेऊन ते वाचू लागल्यामुळे, मी आध्यात्मिक शक्ती परत मिळवली. आपण भाव ठेवतो तेव्हा यहोवा देव आपल्याला “पराकोटीचे सामर्थ्य” देतो. त्याचा मी खरोखर आभारी आहे.—२ करिंथकर ४:७.
यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून व पूर्ण खात्री बाळगून, मी उत्सुकतेने भविष्याकडे डोळे लावून आहे. यहोवा देवाने, या पृथ्वीवर पुनर्स्थापित परादीस व त्याच्याद्वारे येणाऱ्या सर्व विलक्षण आशीर्वादांबद्दल केलेली प्रतिज्ञा तो फार लवकर पूर्ण करील याची मला खात्री आहे.—प्रकटीकरण २१:३, ४.