फाजील धार्मिकतेपासून सांभाळा!
पहिल्या शतकात, परुश्यांनी देवाचे धार्मिक उपासक असल्याचे उत्तम नावलौकिक मिळवले. ते शास्त्रवचनांचे उत्सुक विद्यार्थी होते आणि त्यांनी वारंवार प्रार्थना केली. काही लोकांना ते सौम्य आणि समजूतदार वाटले. यहुदी इतिहासकार जोसेफसने लिहिले: “परुशी एकमेकांसोबत प्रेमाने वागतात आणि समाजासोबत सुसंगत नातेसंबंध विकसित करतात.” म्हणूनच तर ते कदाचित त्या काळी यहुदी समाजामध्ये सर्वात आदरणीय आणि उच्च प्रतिष्ठित लोक होते!
परंतु आज, “परुशी” हा शब्द आणि त्याजशी संबंधित असलेल्या संज्ञा, कमीपणा आणणाऱ्या, दांभीकपणा, फाजील धार्मिकता, अती धर्मपरायण, अतीधर्मनिष्ठता आणि नाममात्र सेवा यांच्याशी समानार्थक आहेत. परुशांनी त्यांचे चांगले नाव का गमावले?
कारण, येशू ख्रिस्त परुश्यांच्या बाह्यस्वरूपामुळे फसला नाही जसे यहुदी लोक फसले. त्याने त्यांची तुलना ‘चुना लावलेल्या कबरांशी’ केली कारण “त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या” असतात.—मत्तय २३:२७.
ते सार्वजनिक ठिकाणी उभे राहून लांबलचक प्रार्थना करत होते हे मात्र खरे आहे पण हे केवळ येशूने म्हटल्याप्रमाणे लोकांनी पाहावे म्हणून होते. त्यांची उपासना निव्वळ दिखावटी होती. संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी त्यांना प्रमुख बैठकींवर आणि सभास्थानातील पहिल्या रांगेत बसण्यास आवडत असे. सर्व यहुद्यांना त्यांच्या वस्त्रांवर गोंडे लावणे भाग होते, तेव्हा परुश्यांनी त्यांच्या वस्त्रांचे गोंडे प्रमाणापेक्षा जास्त मोठे करण्याद्वारे लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला. अम्युलेट्स म्हटल्या जाणाऱ्या त्यांच्या रूंद मंत्रपत्रांचा दिखावा करण्यास त्यांना अगदी विशेष वाटे. (मत्तय ६:५; २३:५-८) त्यांच्या दांभिकपणाने, त्यांच्या स्वार्थाने आणि त्यांच्या फाजील आत्मविश्वासाने सरतेशेवटी त्यांच्यावर कलंक लावला.
देवाने परुश्यांना धिक्कारले हे येशूने शब्दांकित केले: “अहो ढोंग्यांनो, तुम्हांविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की, हे लोक ओठांनी माझा सन्मान करितात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करितात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवितात ते असतात मनुष्याचे नियम.” (मत्तय १५:७-९) त्यांचा धार्मिकपणा खरोखरच फाजील होता. “तुम्ही आपणास परुश्यांच्या खमिराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी संभाळा,” असा इशारा येशूने त्याच्या शिष्यांना का दिला हे समजण्यायोग्य आहे. (लूक १२:१) आज, आपल्यालाही फाजील धार्मिकतेपासून ‘सांभाळले’ किंवा धार्मिक दांभिकपणापासून दक्ष राहिले पाहिजे.
असे करत असताना, आपण हे जाणले पाहिजे, की एक व्यक्ती एका रात्रीत फाजील धार्मिक होत नसते. तर, ही मनोवृत्ती काही काळामध्ये प्रगतीशीलपणे शिरते. एखादा मनुष्य निष्काळजीपणामुळे नको असलेले परुश्यांचे अनिश्चित गुण प्राप्त करू शकतो.
मिजासखोर मनोवृत्ती
असे काही गुण कोणते आहेत की ज्यांविषयी आपण ‘सांभाळून’ राहिले पाहिजे? फाजील धार्मिक लोक बहुधा असे “बोलतात, वागतात आणि पाहतात की जणू काय त्यांनी कधी कोणती चूक केलीच नाही,” असे द एन्सायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन ॲण्ड एथिक्स म्हणते. फाजील धार्मिक लोक फुशारकी मारणारे आणि स्वतःचेच म्हणणे पुढेपुढे करणारे असतात व परुश्यांची देखील हीच मोठी समस्या होती.
येशूने परुश्यांच्या या मनोवृत्तीचे वर्णन एक उदाहरण देऊन केले: “एक परुशी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले; परुश्याने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली: हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाहि मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानितो. मी आठवड्यातून दोनदा उपास करितो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो.” याच्या अगदी विरुद्धतेत, जकातदाराने नम्रपूर्वक त्याच्या चुका कबूल केल्या आणि तो फुशारकी मारणाऱ्या परुश्यापेक्षा अधिक धार्मिक ठरला. “आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानीत” अशा लोकांना उद्देशून येशूने हा दृष्टान्त सांगितला.—लूक १८:९-१४.
अपरिपूर्ण मानव या नात्याने कधीकधी आपल्याला आपल्या नैसर्गिक क्षमतांमुळे किंवा फायद्यांमुळे इतरांपेक्षा उच्च असल्यासारखे वाटेल. परंतु ख्रिश्चनांनी लगेचच अशा प्रकारच्या विचारांना मनातून घालवून दिले पाहिजे. तुम्हाला कदाचित ख्रिस्ती आचरणात पुष्कळ वर्षांचा अनुभव असेल. तुम्ही कदाचित एक कौशल्यपूर्ण बायबल शिक्षक असाल. किंवा कदाचित येशूबरोबर स्वर्गामध्ये राज्य करण्यासाठी तुम्हाला अभिषिक्त करण्यात आले आहे असा तुम्ही दावा करत असाल. मंडळीतील काही जण पूर्ण वेळेचे सेवक, वडील किंवा सेवा सेवक या खास विशेषाधिकारांचा आनंद उपभोगतात. स्वतःला विचारा, ‘यहोवाने मला जे काही दिले आहे त्याचा उपयोग मी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ असे वाटण्यास केला तर त्याला कसे वाटेल बरे?’ त्याला नक्कीच हे आवडणार नाही.—फिलिप्पैकर २:३, ४.
एखादा ख्रिस्ती, देवाने दिलेल्या क्षमता, विशेषाधिकार किंवा अधिकारामुळे स्वतःला श्रेष्ठ मानण्याचा आत्मा प्रदर्शित करतो तेव्हा तो वास्तविकतेत केवळ देव ज्या महिमेस आणि श्रेयास पात्र आहे तो महिमा व श्रेय स्वतः घेत असतो. “आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका” असे बायबल स्पष्टपणे ख्रिश्चनांना समजावते. ते आपल्याला आर्जवते, की “परस्पर एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका.”—रोमकर १२:३, १६.
‘दोष काढू नका’
एका बायबल विश्वकोषानुसार, फाजील धार्मिक मनुष्य “स्वतःला नैतिकरीत्या प्रामाणिक किंवा देवासमोर योग्य भूमिकेत असल्याचे समजतो. वैध जबाबदाऱ्यांचा खरा हेतू न पाळता केवळ त्याचे शब्द पाळून फाजील धार्मिक मनुष्य स्वतःला नैतिकरीत्या प्रामाणिक किंवा देवाबरोबर आपली भूमिका योग्य असल्याचे समजतो. आणखी एक ग्रंथ फाजील धार्मिकांचे वर्णन “दुसऱ्यांच्या चुका शोधण्यातच त्यांचा संपूर्ण वेळ खर्च करणारे अतिधार्मिक लोक” असे करतो.
परुश्यांवर हा दोष होता. कालांतराने त्यांचे मानव-निर्मित नियम देवाच्या नियमांपेक्षा आणि तत्त्वांपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण झालेत. (मत्तय २३:२३; लूक ११:४१-४४) त्यांनी स्वतःला न्यायाधीश नियुक्त केले आणि त्यांच्या फाजील धार्मिक दर्जांनुरूप नसलेल्या कोणालाही दोषी ठरवण्याची त्यांची प्रवृत्ती झाली होती. त्यांच्या मिजासखोर मनोवृत्तीने व फाजील स्वाभिमानाने इतरांवर नियंत्रण ठेवण्याची गरज उत्पन्न केली. येशूवर नियंत्रण ठेवण्याच्या त्यांच्या अक्षमतेमुळे ते क्रोधीत झाले म्हणून, त्यांनी त्याचा घात करण्यासाठी कट रचला.—योहान ११:४७-५३.
स्वतःला न्यायाधीश म्हणवून घेणारा, नेहमीच इतरांच्या चुका पाहणारा, त्याच्या आवतीभोवती असलेल्यांच्या बारीकसारीक गोष्टींचे निरीक्षण करणारा व त्यांच्यावर हक्क गाजवणारा असा कोणी मनुष्य असल्यास त्याच्याबरोबरचा सहवास किती निरुत्साहजनक असतो. होय, मंडळीतील कोणालाच इतरांवर स्वतःचे मत आणि स्व-निर्मित नियम लादण्याचा अधिकार नाही. (रोमकर १४:१०-१३) दररोजच्या जीवनातील अनेक पैलूंचा निर्णय प्रत्येक व्यक्तीला घ्यावयाचा असतो हे समतोल राखणाऱ्या ख्रिश्चनांना माहीत आहे. विशेषकरून, पूर्णतावादी बनण्याकडे कल असणारे आणि जास्त गोष्टींची अपेक्षा करणाऱ्यांनी इतरांचा दोष काढण्याचे टाळले पाहिजे.
होय, यहोवाच्या पार्थिव संघटनेच्या सुरळीत कार्याला हातभार लावण्यासाठी ख्रिस्ती मंडळीला मार्गदर्शकांचा उपयोग करण्याची परवानगी आहे. (इब्रीयांस १३:१७) परंतु काहींनी या मार्गदर्शकांचा विपर्यास केला आहे किंवा त्यात स्वतःच्या नियमांची भर घातली आहे. एका क्षेत्रामध्ये ईश्वरशासित सेवा प्रशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना भाषण देतेवेळी अंगात कोट घालून त्याची बटणे लावायाची होती. जो विद्यार्थी असे करत नव्हता तो भविष्यात भाषण देण्यास पात्र नाही असे ठरवण्यात येई. अशा प्रकारचे कडक नियम करण्यापेक्षा, दयाळुपणे व व्यक्तिगत मार्गदर्शन देणे देव वचनाच्या आत्म्याच्या सुसंगतेत ठरणार नाही का?
फाजील धार्मिकपणा, एखादा ख्रिस्ती अनेक व्यक्तिगत अडचणींना तोंड देत असल्यास तो नक्कीच आध्यात्मिक रीत्या उणा असला पाहिजे असे मत विकसित करण्यास प्रवृत्त करतो. नेमका तोच विचार फाजील धार्मिक अलीफज, बिल्दद आणि सोफर या तिघांनी विश्वासू ईयोबाविषयी केला. त्यांना नक्की परिस्थिती काय होती हे माहीत नव्हते, म्हणून ईयोबाने काहीतरी अपराध केला आहे असे गृहीत धरून त्याच्यावर दोष लावण्यात आला. ईयोबाच्या परीक्षांचा विपरीत निष्कर्ष काढल्याबद्दल यहोवाने त्यांना शिक्षा दिली.—ईयोब ४, ५, ८, ११, १८, २० अध्याय पहा.
गैर आवेश
फाजील धार्मिकता आणि आवेश बहुतेकवेळा परस्पर संबंधित असतात. प्रेषित पौल धार्मिकतेकडे कल असणाऱ्या यहुद्यांबद्दल बोलला, की त्यांना “देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. कारण त्यांना देवाच्या नीतिमत्त्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्त्व स्थापावयास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्त्वाला ते वश झाले नाहीत.” (रोमकर १०:२, ३) पौल स्वतः एक परुशी असल्यामुळे तो अतिशय आवेशी होता परंतु त्याचा आवेश गैर होता, यहोवाच्या धार्मिकतेवर आधारित नव्हता.—गलतीकर १:१३, १४; फिलिप्पैकर ३:६.
बायबल उचितपणे ताकीद देते: “फाजील धार्मिक होऊ नको; मर्यादेबाहेर शहाणपणा मिरवू नको; तू आपला नाश का करून घ्यावा?” (उपदेशक ७:१६) एखाद्या मंडळीत एखादा ख्रिस्ती नेकीने सुरवात करील परंतु मग त्याची ही नेकी आणि आवेश फाजील धार्मिकतेत सद्गुणभ्रष्ट होईल. यहोवाच्या धार्मिकतेऐवजी मानवी ज्ञानाचे मार्गदर्शन मिळाल्यावर धार्मिक आवेश इतरांना इजा पोहंचवू शकतो. ते कसे?
उदाहरणार्थ, पालक इतरांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यात अतिशय व्यग्र होतील पण तेव्हा त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या गरजांकडे ते दुर्लक्ष करतील. किंवा पालक इतके आवेशी असतील, की त्यांच्या मुलांच्या क्षमतेपलीकडे त्यांच्याकडून अपेक्षा करतील. (इफिसकर ६:४; कलस्सैकर ३:२१) अशी मुले मग अशा अवास्तव अपेक्षांना पूर्ण करू शकत नसल्यामुळे दुहेरी जीवन जगून प्रतिसाद देतात. एक समजूतदार पालक त्याच्या कुटुंबाच्या मर्यादांचा विचार करील व उचित सुधारणा करील.—पडताळा उत्पत्ति ३३:१२-१४.
फाजील आवेश इतरांसोबत व्यवहार करण्यासाठी आवश्यक असलेल्या युक्ती, समभावना आणि कोमलता या गुणांपासून आपल्याला वंचित करील. राज्याच्या आस्थेसाठी एखादी व्यक्ती खूप कष्ट करील. परंतु, त्याचा फाजील आवेश इतरांना इजा पोहंचू शकेल. पौलाने म्हटले: “मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीति नसली, तर मी काहीच नाही.”—१ करिंथकर १३:२, ३.
नम्र जनांना देव पसंत करतो
ख्रिस्ती या नात्याने आपल्याला फाजील धार्मिकतेची सुरवात होण्याआधीच त्याचा धोका ओळखण्याची गरज आहे. आपण मिजासखोर मनोवृत्ती, इतरांचा न्याय करण्याची सवय आणि मानवी ज्ञानावर आधारित असलेला अंध आवेश टाळला पाहिजे.
परुश्यांसारख्या मनोवृत्तींपासून ‘सांभाळून’ राहून इतरांना फाजील धार्मिक असे म्हणून त्यांचा न्याय करण्याऐवजी आपण आपल्याच प्रवृत्तींवर आणि मानसिक कल यावर लक्ष केंद्रित केले तर उत्तम होईल. होय, येशूने परुश्यांचा न्याय केला व सार्वकालिक नाशास पात्र असलेल्या “सापांच्या पिलांनो,” असे म्हणून त्यांचा धिक्कार केला. पण येशूला लोकांच्या अंतःकरणांत काय आहे ते समजू शकत होते. आपल्याला तसे करता येत नाही.—मत्तय २३:३३.
आपण आपली स्वतःची धार्मिकता मिळवण्याऐवजी देवाची धार्मिकता शोधू या. (मत्तय ६:३३) तेव्हाच आपल्याला यहोवाचा अनुग्रह प्राप्त होऊ शकेल कारण बायबल आपल्या सर्वांना ताकीद देते: “तुम्ही सर्व एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.”—१ पेत्र ५:५.