वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 १०/१५ पृ. २३-२८
  • मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दाखल्यातील व्यक्‍ती
  • मेंढरे आणि शेरडे कोण आहेत?
  • प्रत्येक गटासाठी काय भवितव्य?
  • याचा आपल्याकरता काय अर्थ होतो?
  • खऱ्‍या उपासकांचा मोठा लोकसमुदाय—ते कोठून आले आहेत?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • ख्रिस्ताच्या बांधवांशी एकनिष्ठ राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • तुम्ही न्यायासनासमोर कसे उभे राहणार?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 १०/१५ पृ. २३-२८

मेंढरे आणि शेरडे यांच्यासाठी कोणते भवितव्य आहे?

“मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करितो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील.” —मत्तय २५:३२.

१, २. मेंढरे आणि शेरडे हा दाखला आपल्या आस्थेचा का असला पाहिजे?

येशू ख्रिस्त निश्‍चितच, पृथ्वीवरील सर्वश्रेष्ठ शिक्षक होता. (योहान ७:४६) त्याची शिकवण्याची एक पद्धत दाखल्यांचा किंवा दृष्टांतांचा वापर ही होती. (मत्तय १३:३४, ३५) गहन आध्यात्मिक आणि भविष्यसूचक सत्य सांगण्यासाठी ते साधेच पण शक्‍तिशाली होते.

२ मेंढरे आणि शेरडांच्या दाखल्यात, येशूने तो एका विशेष क्षमतेत कार्य करील अशा काळाला सूचित केले: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने . . . येईल.” (मत्तय २५:३१) याबद्दल आपल्याला आस्था वाटली पाहिजे, कारण याच दृष्टांतात येशूने, “आपल्या येण्याचे व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय?,” या प्रश्‍नाच्या उत्तराचा समारोप केला आहे. (मत्तय २४:३) पण आपल्यासाठी याचा काय अर्थ होतो?

३. येशूने आधी आपल्या व्याख्यानात, मोठ्या संकटानंतर लगेच कशाचा विकास होईल असे म्हटले होते?

३ येशूने, मोठ्या संकटाची अचानक सुरवात झाल्यावर “लागलेच” चित्तवेधक विकास घडून येतील असे भाकीत केले, त्या विकासाची आपण वाट पाहत आहोत. त्याने म्हटले, की तेव्हा “मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह” प्रकट होईल. त्याचा मोठा परिणाम, ‘पृथ्वीवरील सर्व जातीच्या लोकांवर’ होईल, जे “मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील.” मनुष्याच्या पुत्रासोबत ‘त्याचे देवदूत’ असतील. (मत्तय २४:२१, २९-३१)a मेंढरे आणि शेरडे या दाखल्याबद्दल काय? आधुनिक बायबल २५ व्या अध्यायात सांगतात, पण हा येशूच्या प्रत्युत्तराचा भाग असून तो त्याच्या वैभवाने येण्याबद्दल आणि ‘सर्व राष्ट्रांवर’ आपला न्याय केंद्रित करण्याबद्दल आणखी सविस्तर माहिती देतो.—मत्तय २५:३२.

दाखल्यातील व्यक्‍ती

४. मेंढरे आणि शेरडे या दाखल्याच्या सुरवातीला येशूबद्दल काय उल्लेख आला आणि यात आणखी कोणाचा उल्लेख आढळतो?

४ येशू या दाखल्याची सुरवात असे म्हणून करतो: ‘जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो.’ “मनुष्याचा पुत्र” कोण आहे, हे संभवत: तुम्हाला माहीत असावे. शुभवर्तमान लेखकांनी ही अभिव्यक्‍ती अनेकदा येशूला लागू केली. स्वतः येशूने देखील ती लागू केली; “प्रभुत्व, वैभव व राज्य” मिळावे म्हणून “मानवपुत्रासारखा कोणी” पुराणपुरुषाकडे येत असल्याचे दानीएलाचे दृश्‍य त्याच्या मनात होते यात काही संशय नाही. (दानीएल ७:१३, १४; मत्तय २६:६३, ६४; मार्क १४:६१, ६२) या दाखल्यात येशू प्रमुख असला तरी तो एकटाच नाही. मत्तय २४:३०, ३१ मध्ये उद्धृत केल्याप्रमाणे आधीच्या या व्याख्यानात ‘मनुष्याचा पुत्र आपल्या सामर्थ्याने आणि वैभवाने येतो तेव्हा’ त्याचे देवदूत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे त्याने सांगितले. अशाच रितीने, मेंढरे आणि शेरडांचा दाखला, न्याय करण्यासाठी ‘येशू आपल्या वैभवी राजासनावर बसतो’ तेव्हा त्याच्यासोबत देवदूत असल्याचे दाखवतो. (पडताळा मत्तय १६:२७.) पण न्यायाधीश आणि देवदूत स्वर्गात असल्यामुळे या दाखल्यात मानवांची चर्चा केली आहे का?

५. आपण येशूच्या ‘बांधवांना’ कसे ओळखू शकतो?

५ या दाखल्यावरील दृष्टिक्षेप, तीन गट प्रकट करतो, ज्यांना ओळखण्याची गरज आहे. मेंढरे व शेरडांशिवाय, मनुष्याच्या पुत्राने अशा तिसऱ्‍या गटाची भर घातली, जो मेंढरे आणि शेरडांची ओळख पटण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. येशू या तिसऱ्‍या गटाला त्याचे आध्यात्मिक बंधू असे संबोधतो. (मत्तय २५:४०, ४५) ते खरे उपासक असले पाहिजे, कारण येशूने म्हटले: “जो कोणी माझ्या . . . पित्याच्या इच्छेप्रमाणे करितो तोच माझा भाऊ, बहीण व आई.” (मत्तय १२:५०; योहान २०:१७) पौलाने “अब्राहामाचे संतान” आणि देवाचे पुत्र असलेल्या ख्रिश्‍चनांबद्दल जे लिहिले ते अधिक प्रसंगोचित्त आहे. त्याने यांना येशूचे ‘बंधू’ आणि ‘स्वर्गीय पाचारणाचे भागीदार’ असे संबोधले.—इब्रीयांस २:९–३:१; गलतीकर ३:२६, २९.

६. येशूच्या बंधूपैकी ‘कनिष्ट’ कोण आहेत?

६ येशूने त्याच्या बांधवांचा उल्लेख “कनिष्ठ” असा का केला? प्रेषितांनी त्याला आधीच्या प्रसंगी जे म्हटल्याचे ऐकले त्याची पडसाद या शब्दांनी होते. येशूच्या आधी मरण पावल्यामुळे पार्थिव आशा असलेल्या बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाची तुलना स्वर्गीय जीवन मिळणाऱ्‍यांसोबत करताना येशूने म्हटले: “योहान ह्‍याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही; तरी स्वर्गाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” (मत्तय ११:११) स्वर्गात जाणारे काही जण मंडळीमध्ये प्रेषितांसारखे प्रमुख असतील व इतर जण कनिष्ठ असतील, पण ते सर्व येशूचे आध्यात्मिक बांधव आहेत. (लूक १६:१०; १ करिंथकर १५:९; इफिसकर ३:८; इब्रीयांस ८:११) अशाप्रकारे, पृथ्वीवर काही जण क्षुल्लक वाटत असले, तरी ते त्याचे बांधव होते आणि यामुळे त्यानुसार त्यांना वागवले जाण्यास हवे होते.

मेंढरे आणि शेरडे कोण आहेत?

७, ८. येशूने मेंढरांविषयी काय सांगितले म्हणून त्यांच्याबद्दल आपण काय समारोप करू शकतो?

७ मेंढरांच्या न्यायाबद्दल आपण असे वाचतो: “[येशू] आपल्या उजवीकडच्यांस म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या; कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यावयास दिले? तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की, ज्याअर्थी तुम्ही ह्‍या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्याअर्थी ते मला केले आहे.”—मत्तय २५:३४-४०.

८ येशूच्या सन्मान आणि अनुग्रहाच्या उजव्या बाजूला पात्र असल्याचा न्याय झालेली मेंढरे, मानवाच्या एका गटाचे प्रतिनिधीत्व करतात. (इफिसकर १:२०; इब्रीयांस १:३) त्यांनी काय केले आणि केव्हा? येशूने म्हटले, की त्यांनी त्याला दयाळुपणे, आदराने आणि उदारपणे अन्‍न, पाणी आणि वस्र दिले आणि आजारी असताना अथवा बंदिशाळेत असताना त्याची साहायता केली. येशूला त्यांनी वैयक्‍तिकपणे असे केले नाही असे मेंढरे सांगतात, तेव्हा तो त्याच्या आध्यात्मिक बांधवांना, अभिषिक्‍तांच्या शेष ख्रिश्‍चनांना साहाय्य केल्याचे दर्शवतो, म्हणून त्या अर्थाने त्यांनी हे त्याला केले.

९. हा दाखला हजार वर्षांदरम्यान का लागू होत नाही?

९ येशूचा दाखला हजार वर्षांदरम्यान लागू होत नाही, कारण अभिषिक्‍त तेव्हा भूक, तहान, आजारपण किंवा तुरुंगवास अनुभवणारे मानव असणार नाहीत. तथापि, त्यांच्यातील अनेकांनी याचा अनुभव व्यवस्थीकरणाच्या समाप्तीदरम्यान घेतला आहे. सैतानाला पृथ्वीवर टाकल्यापासून त्याने शेषांवर थट्टा, छळणूक आणि मृत्यू आणून त्यांना क्रोधाचे खास शिकार बनवले आहे.—प्रकटीकरण १२:१७.

१०, ११. (अ) येशूच्या बांधवांसाठी एखादे दयाळू कृत्य करणाऱ्‍या प्रत्येकाचा समावेश मेंढरांमध्ये होतो, असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत का नाही? (ब) मेंढरे उचितपणे कोणाचे प्रतिनिधीत्व करतात?

१० येशूच्या बांधवांपैकी कोणा एकास प्रत्येक जनाने दयाळुपणा दाखवला जसे की, भाकरीचा तुकडा किंवा प्यालाभर पाणी दिले तर तो यापैकीचे मेंढरु होण्यासाठी लायक आहे, असे येशू बोलत होता का? अशी दया दाखवल्याने मानवी दयाळुपणा प्रदर्शित होत असेल हे मान्य आहे, पण खरे पाहता, या दाखल्यातील मेंढरांच्या बाबतीत अधिक काही समाविष्ट आहे, असे दिसते. येशू, त्याच्या एका बांधवाला योगायोगाने एखादे दयाळू कृत्य दाखवलेल्या नास्तिक किंवा पाळकांसारख्यांचा उल्लेख निश्‍चितच करत नव्हता. उलटपक्षी, येशूने मेंढरांना दोनदा “नीतिमान” असे म्हटले. (मत्तय २५:३७, ४६) यास्तव, विशिष्ट कालावधीत ख्रिस्ताच्या बांधवांच्या मदतीला आलेली—सक्रिय पाठिंबा दिलेली—व देवासमोर नीतिमान भूमिका मिळवण्याप्रत विश्‍वास प्रदर्शित केलेली अशी ही मेंढरे असली पाहिजेत.

११ अनेक शतकांमध्ये, अब्राहामाप्रमाणे अनेकांनी नीतिमान भूमिकेचा आनंद लुटला आहे. (याकोब २:२१-२३) देवाच्या राज्यात परादीसमध्ये जीवन मिळेल अशी “दुसरी मेंढरे” यापैकी असलेल्या नोहा, अब्राहाम आणि इतर विश्‍वासूंचा समावेश होतो. अलीकडील काळात दुसरी मेंढरे या नात्याने आणखी लाखोंनी खरी भक्‍ती करण्यास आरंभ केला आणि ते अभिषिक्‍तांसोबत “एक कळप” असे झाले आहेत. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९) हे पार्थिव आशा असलेले, येशूच्या बांधवांना राज्याचे राजदूत म्हणून ओळखतात व यास्तव त्यांनी, वास्तविकपणे व आध्यात्मिकपणे—त्यांची मदत केली आहे. येशू, दुसरी मेंढरे पृथ्वीवरील त्याच्या बांधवांसाठी काय करतात, हे त्याला केल्यासारखे आहे असे समजतो. राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी तो येतो तेव्हा अशा जिवंत असलेल्यांचा मेंढरे म्हणून न्याय केला जाईल.

१२. मेंढरांनी येशूला कसा दयाळुपणा दाखवला होता, याची विचारणा ते का करतील?

१२ दुसरी मेंढरे आता अभिषिक्‍तांसोबत राज्याच्या सुवार्तेचा प्रचार व त्यांना साहाय्य करत असल्यास, ते असे का विचारतील: “प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले? केव्हा तान्हेले पाहून प्यावयास दिले?” (मत्तय २५:३७) याची विविध कारणे असू शकतात. हा एक दाखला आहे. याद्वारे येशू आपल्या आध्यात्मिक बांधवांबद्दल सखोल काळजी दाखवतो; त्यांना वाटते त्याप्रमाणेच त्याला वाटते व त्यांच्यासोबत दुःख सोसतो. येशूने आधी सांगितले होते: “जो तुम्हास स्वीकारितो, तो मला स्वीकारितो आणि जो मला स्वीकारितो तो ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारितो.” (मत्तय १०:४०) या दाखल्यात, येशूने त्याच्या बांधवांकरता जे (चांगले किंवा वाईट) केले ते स्वर्गात देखील पोहंचते; ते जणू स्वर्गात त्याला केल्यासारखे आहे, असे दाखवून या तत्त्वाचा विस्तार करतो. त्याचप्रमाणे येशू येथे न्याय करण्याच्या यहोवाच्या दर्जांवर जोर देतो, तो अनुकूल किंवा प्रतिकूल असलेला यहोवाचा न्यायदंड महत्त्वाचा आणि न्याय्य असल्याचे स्पष्ट केले. शेरडे, ‘आम्ही तुला प्रत्यक्ष पाहिले असते तर’ अशी कोणतीही सबब सांगू शकत नाहीत.

१३. शेरडासमान लोक येशूला “प्रभो” म्हणून का संबोधतील?

१३ दाखल्यात नमूद केलेला न्यायदंड कधी बजावला जातो हे समजल्यावर, शेरडे कोण आहेत याचा दृष्टिकोन आपल्याला स्पष्टरित्या कळतो. याची पूर्णता, “मनुष्याच्या पुत्राचे चिन्ह आकाशात प्रगट होईल; मग पृथ्वीवरील सर्व जातीचे लोक शोक करितील, आणि ते मनुष्याच्या पुत्राला . . . पराक्रमाने व मोठ्या वैभवाने येताना पाहतील,” तेव्हा होईल. (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २४:२९, ३०) मोठ्या बाबेलवर आलेल्या संकटातून बचावलेले व राजाच्या बांधवांना तिरस्करणीयपणे वागवलेले, आपले प्राण वाचवण्याची आशा बाळगून न्यायाधीशाला आता उद्विग्न होऊन “प्रभो” असे संबोधतील.—मत्तय ७:२२, २३; पडताळा प्रकटीकरण ६:१५-१७.

१४. येशू, मेंढरे आणि शेरडांचा न्याय कशाच्या आधारावर करील?

१४ तथापि, येशूचा न्यायदंड पूर्वी चर्चला जाणारे, नास्तिक किंवा इतरांच्या अविचारी दाव्यांवर आधारित असणार नाही. (२ थेस्सलनीकाकर १:८) त्याऐवजी, हा न्यायाधीश अंतःकरणाची स्थिती आणि लोकांनी ‘कनिष्ठांपैकी [त्याच्या बांधवांपैकी] एकासाठी’ केलेल्या गतकाळातील कृत्यांचा पुनर्विचार करील. हे मान्य आहे, की पृथ्वीवर उरलेल्या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांच्या संख्येत घट होत आहे. तथापि, जोवर ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ वर्गाचा भाग असलेले अभिषिक्‍त जन आध्यात्मिक अन्‍न आणि मार्गदर्शन देत राहतील तोवर ज्याप्रमाणे ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोकांमधील मोठ्या लोकसमुदायाने’ केले त्याचप्रमाणे भावी मेंढरांना दास वर्गाला काही चांगले करण्याची सुसंधी आहे.—प्रकटीकरण ७:९, १४.

१५. (अ) अनेकांनी स्वतःला शेरडासमान असल्याचे कसे दाखवले आहे? (ब) एखादी व्यक्‍ती मेंढरु की शेरडू आहे, असे मत मांडण्याचे आपण का टाळले पाहिजे?

१५ ख्रिस्ताचे बांधव आणि यांच्याशी एक कळप म्हणून संयुक्‍त असलेले लाखो दुसरी मेंढरे यांना कशी वागणूक मिळत आहे? अनेक लोकांनी ख्रिस्ताच्या बांधवांवर व्यक्‍तीशः हल्ला चढवला नसला तरी, त्यांनी या लोकांना प्रेमळपणे देखील वागवले नाही. दुष्ट जगाची निवड करून, शेरडांसमान असलेले राज्याचा संदेश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ऐकला असला, तरी ते नाकारतात. (१ योहान २:१५-१७) अर्थातच, न्यायदंडाची अंमलबजावणी करण्यासाठी अंती येशूलाच नियुक्‍त केले आहे. मेंढरे आणि शेरडे कोण आहेत हे ठरवणे आपले काम नाही.—मार्क २:८; लूक ५:२२; योहान २:२४, २५; रोमकर १४:१०-१२; १ करिंथकर ४:५.

प्रत्येक गटासाठी काय भवितव्य?

१६, १७. मेंढरांकरता कोणते भवितव्य असेल?

१६ येशूने मेंढरांबद्दल आपला न्यायदंड सुनावला: “अहो माझ्या पित्याचे आशीर्वादितहो या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या.” “या,” हे केवढे हार्दिक आमंत्रण! पण कशाचे? सार्वकालिक जीवनाचे, जसे की त्याने सारांशात सांगितले: “नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगावयास जातील.”—मत्तय २५:३४, ४६.

१७ येशूसोबत स्वर्गात राज्य करतील अशांकडून कशाची मागणी केली जाते याबद्दल त्याने रुपयाच्या दाखल्यात दाखवले, पण या दाखल्यात तो राज्याच्या प्रजेकडून कशाची अपेक्षा केली जाते हे दाखवतो. (मत्तय २५:१४-२३) येशूच्या बांधवांनी संपूर्ण अंतःकरणाने दिलेल्या पाठिंब्यामुळे त्याच्या राज्याच्या पार्थिव भागात मेंढरे पृथ्वीचे वतन पावतात, हे योग्य आहे. देवाने मुक्‍त केलेल्या मानवांसाठी “जगाच्या स्थापनेपासून” तयार केलेले भवितव्य—परादीस पृथ्वीवर जीवनाचा आनंद ते घेतील.—लूक ११:५०, ५१.

१८, १९. (अ) येशू शेरडांवर कोणता न्यायदंड बजावील? (ब) शेरडांना सार्वकालिक यातना भोगाव्या लागणार नाहीत, याची खात्री आपण कशी बाळगू शकतो?

१८ शेरडांवर बजावलेला न्यायदंड याच्या किती विपरीत आहे! “मग डावीकडच्यासहि तो म्हणेल, अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्‍यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले नाही, परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही; उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही, आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेहि त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हाला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की, ज्याअर्थी ह्‍या कनिष्ठांपैकी एकालाहि केले नाही, त्याअर्थी ते मला केले नाही.”—मत्तय २५:४१-४५.

१९ याचा अर्थ, शेरडासमान लोकांचा अमर जीव अनंतकाळच्या अग्नीत दुःख भोगणार असा होत नाही, हे बायबल विद्यार्थ्यांना माहीत आहे. कारण मानव स्वतः जीव आहेत; त्यांच्याठायी अमर जीव नाही. (उत्पत्ति २:७; उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४) न्यायाधीशाने शेरडांना ‘सार्वकालिक अग्नीची’ शिक्षा देण्याचा अर्थ, भविष्यातील आशेचा समावेश नसलेला नाश तसेच तो दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांचा कायमचा शेवट देखील असेल. (प्रकटीकरण २०:१०, १४) या कारणास्तव, यहोवाचा न्यायाधीश विरुद्ध न्यायदंडाची सुरवात करतो. तो मेंढरांना “या;” तर शेरडांना “माझ्यापुढून निघा” असे म्हणतो. मेंढरांना “सार्वकालिक जीवन” मिळेल. शेरडांचा ‘सार्वकालिक नाश’ केला जाईल.—मत्तय २५:४६.b

याचा आपल्याकरता काय अर्थ होतो?

२०, २१. (अ) ख्रिश्‍चनांना कोणते महत्त्वपूर्ण काम करावयाचे आहे? (ब) आता कोणते विभाजन चालू आहे? (क) मेंढरे आणि शेरडे या दाखल्याची पूर्णता घडू लागते तेव्हा लोकांची स्थिती कशी असेल?

२० येशूच्या उपस्थितीचे आणि युगाच्या समाप्तीच्या चिन्हाविषयी येशूचे उत्तर ऐकलेल्या चार प्रेषितांना विचार करण्यासारखे पुष्कळ होते. त्यांना जागृत व सावध राहण्याची गरज होती. (मत्तय २४:४२) मार्क १३:१० मध्ये उद्धृत केल्याप्रमाणे त्यांना साक्षकार्य देखील करण्याची आवश्‍यकता होती. यहोवाचे साक्षीदार आज त्या कार्यात आवेशाने भाग घेत आहेत.

२१ तथापि, आपल्यासाठी मेंढरे आणि शेरडे या दाखल्याच्या नव्या समजूतीचा अर्थ काय होतो? लोक आधीच कोणती एक बाजू घेत आहेत. काही लोक ‘नाशाकडे जाणाऱ्‍या पसरट मार्गावर’ आहेत, तर काही ‘जीवनाकडे जाणाऱ्‍या अरुंद मार्गावर’ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. (मत्तय ७:१३, १४) परंतु, दाखल्यात वर्णन केल्याप्रमाणे, मेंढरे आणि शेरडे याविषयी येशू अंतीम न्यायदंडाची घोषणा करील, हे अजून भवितव्यात आहे. मनुष्याचा पुत्र न्यायाधीशाच्या भूमिकेत येतो तेव्हा तो अनेक खऱ्‍या ख्रिश्‍चनांना—समर्पित लोकांचा वास्तविक ‘मोठा लोकसमुदाय’—‘मोठ्या संकटाच्या’ शेवटल्या भागातून नवीन जगात जाण्याच्या पात्र असल्याचे ठरवील. ते भवितव्य आज आनंदाचा उगम असले पाहिजे. (प्रकटीकरण ७:९, १४) दुसऱ्‍या बाजूला पाहता, ‘सर्व राष्ट्रातील’ बहुसंख्यांक लोकांनी स्वतःला शेरडासमान हट्टी असल्याचे शाबीत केलेले असेल. त्यांचा ‘सार्वकालिक नाश’ केला जाईल. हा पृथ्वीकरता केवढा दिलासा असेल!

२२, २३. दाखल्याची पूर्णता अजून भवितव्यात असल्यामुळे, आपले प्रचारकार्य आज महत्त्वाचे का आहे?

२२ दाखल्यात वर्णन केलेला न्याय नजीकच्या भवितव्यात होणार असला तरी, आता देखील काही महत्त्वपूर्ण घडत आहे. आपण ख्रिस्ती या नात्याने, लोकांमध्ये विभाजन करणाऱ्‍या संदेशाची घोषणा करण्याच्या जीवन बचावणाऱ्‍या कार्यात गोवलेलो आहोत. (मत्तय १०:३२-३९) पौलाने लिहिले: “कारण ‘जो कोणी प्रभुचे [यहोवा] नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’ तर ज्याच्यावर त्यांनी विश्‍वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्‍वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्‍यांवाचून ते कसे ऐकतील?” (रोमकर १०:१३, १४) आपली जाहीर सेवा देवाचे नाव व तारणाच्या त्याच्या संदेशासह २३० देशांपेक्षा अधिक देशांतील लोकांप्रत पोहंचत आहे. ख्रिस्ताचे अभिषिक्‍त बांधव अजूनही या कार्याचे नेतृत्त्व करीत आहेत. आता जवळपास ५० लाख दुसऱ्‍या मेंढरांची साथ त्यांना मिळाली आहे. येशूच्या बांधवांनी घोषित केलेल्या संदेशाला संपूर्ण जगभरातील लोक प्रतिसाद देत आहेत.

२३ आपण घरोघर किंवा अनौपचारिकरित्या प्रचार करतो तेव्हा अनेकांना आपला संदेश माहीत होत आहे. इतर लोक, यहोवाच्या साक्षीदारांविषयी आणि आपण कशाचे प्रतिनिधीत्व करतो हे आपल्याला अज्ञात असणाऱ्‍या मार्गांनी कदाचित शिकतील. न्यायाचा दिवस आल्यावर, येशू सामाजिक जबाबदारी आणि कौटुंबिक प्रतिष्ठा याचा विचार कोठवर करील? हे आपल्याला सांगता येणार नाही, आणि यावर तर्क करणे वायफळ असेल. (पडताळा १ करिंथकर ७:१४.) आज अनेक जण देवाच्या लोकांकडे दुर्लक्ष करतात, त्यांची थट्टा करतात किंवा त्यांचा निखालस छळ करण्यात भाग घेतात. या कारणास्तव, हा निर्णायक काळ आहे; अशांचा विकास येशू ज्यांचा शेरडे म्हणून न्याय करील त्यांच्यात कदाचित होत असेल.—मत्तय १०:२२; योहान १५:२०; १६:२, ३; रोमकर २:५, ६. 

२४. (अ) वैयक्‍तिकांनी आपल्या प्रचारकार्याला अनुकूल प्रतिसाद द्यावा हे महत्त्वाचे का आहे? (ब) या अभ्यासाने तुम्हाला वैयक्‍तिकरित्या सेवेबद्दल कोणती मनोवृत्ती बाळगण्यासाठी मदत केली आहे?

२४ तथापि, अनेक जण अनुकूल प्रतिसाद देतात, देवाच्या वचनाचा अभ्यास करतात आणि यहोवाचे साक्षीदार होतात, हे आनंदाचे आहे. सध्या शेरडासमान वाटत असलेले काही जण बदलून मेंढरासमान होऊ शकतात. मुद्दा असा, की प्रतिसाद देत असलेले आणि ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांना सक्रिय साहाय्य देत असलेले, नजीकच्या भवितव्यात येशू न्याय करण्यासाठी आपल्या राजासनावर बसतो तेव्हा त्यांना उजवीकडे ठेवण्यासाठी आधार पुरवील असा पुरावा सध्या देत आहेत. अशांना आता व पुढेही आशीर्वादित करण्यात येईल. यास्तव, या दाखल्याने आपल्याला ख्रिस्ती सेवेत अधिक कार्य करण्यास उत्तेजित करण्यास हवे. खूप उशीर होण्याआधी, राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी होता होईल तितके करण्याची आपली इच्छा आहे आणि या रितीने इतरांना प्रतिसाद देण्याची संधी दिली पाहिजे. मग प्रतिकूल किंवा अनुकूल न्याय बजावणे हे येशूवर अवलंबून आहे.—मत्तय २५:४६.

[तळटीपा]

a टेहळणी बुरूज फेब्रुवारी १५, १९९४ पृष्ठे १६-२१ पाहा.

b एल एव्हॉनहेलीयो डी मॉटिओ सांगते: “सार्वकालिक जीवन हे निश्‍चित जीवन आहे; त्याच्या विपरीत निश्‍चित शिक्षा आहे. एऑनिअस हे ग्रीक विशेषण प्रामुख्याने अवधी नव्हे तर दर्जा सूचित करते. निश्‍चित शिक्षा, सार्वकालिक मृत्यू होय.”—सेवानिवृत्त प्राध्यापक युवन मॉटेऑस (पॉन्टिफिकल बिब्लिकल इन्स्टिट्युट, रोम) आणि प्राध्यापक फरनॅन्डो कॉमॉचो मॅड्रीड (थियोलॉजिकल सेंटर, सवील), स्पेन, १९८१.

तुम्हाला आठवते का?

◻ मेंढरे आणि शेरडे हा दाखला भवितव्यात लागू होतो असे मत्तय २४:२९-३१ आणि मत्तय २५:३१-३३ मधील कोणत्या समांतरता दाखवतात आणि ते केव्हा घडेल?

◻ येशूच्या बांधवांपैकी “कनिष्ठ” कोण आहेत?

◻ येशूच्या “नीतिमान” या अभिव्यक्‍तीचा वापर, ते कोणाचे प्रतिनिधीत्व करतात आणि कोणाचे करीत नाहीत हे ओळखण्यास आपली कशी मदत करतो?

◻ या दाखल्याची पूर्णता भवितव्यात होत असली तरी, आपले प्रचारकार्य आता महत्त्वपूर्ण आणि तातडीचे का आहे?

[२४ पानांवरील चौकट]

समांतरतांकडे लक्ष द्या

मत्तय २४:२९-३१ मत्तय २५:३१-३३

मोठे संकट सुरू झाल्यावर, मनुष्याचा पुत्र येतो

मनुष्याचा पुत्र येतो

मोठ्या वैभवाने येतो वैभवाने येतो आणि त्याच्या गौरवी

राजासनावर बसतो

त्याच्यासह देवदूत आहेत

देवदूत त्याच्यासोबत येतात

पृथ्वीवरील सर्व जाती त्याला पाहतात सर्व राष्ट्रे जमा

होतात; शेरडांचा न्याय होतो शेवटी (मोठे संकट संपते)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा