त्यांनी प्रीतीठायी हे सर्व केले
कॅनडातील एक विश्वासू, आदरातिथ्य करणारी विधवा आपल्या चार मुलींचे खरे ख्रिस्ती या नात्याने संगोपन करीत होती. मंडळीतील वडिलांना दिसून आले, की तिच्या घराची पुष्कळ दुरुस्ती करावयाची होती. तिच्याकडे तेवढे पैसे नव्हते किंवा स्वतःहून करण्यासाठी कौशल्यही नव्हते. यास्तव, १ तीमथ्य ५:९, १० मध्ये दिलेल्या तत्त्वानुसार वडिलांनी सुज्ञपणे या स्त्रीसाठी हे काम करून देण्याची योजना आखली. कसे?
त्या विधवेला आणि तिच्या चार मुलींना पाच दिवसांसाठी दुसरीकडे राहण्याची सोय करण्यात आली. मंडळीतील ८० पेक्षा अधिक व्यक्तींनी आवश्यक त्या वस्तू, निधी आणि वेळ खर्च करून पूर्ण अंतःकरणाने याला हातभार लावला. हे कुटुंब आपल्या घरातून दुसरीकडे राहण्यास गेल्याबरोबर लगेचच उत्सुक कामकऱ्यांनी मधमाश्यांप्रमाणे घोळका केला. संपूर्ण घराच्या बाहेरील बाजूचा कायापालट केला. भिंतींना दुरुस्त करून रंगरंगोटी करण्यात आली. जुन्या आणि तुटक्या फरशा काढून नवीन टाईल्स बसवण्यात आल्या व त्यावर नवीन गालीचा देखील पसरवण्यात आला. सर्व आवश्यक इलेक्ट्रिकल आणि लायटनिंग फिक्सचर्सची तपासणी करून त्यांना सुव्यवस्थित करण्यात आले. जुने लाकडी सामान देखील बदलण्यात आले. संपूर्ण घराचे नविनीकरण अवघ्या पाच दिवसांत करण्यात आले!
उत्साह आणि कामाचे वातावरण पाहून शेजाऱ्यांवर प्रभाव पडला. शेजारचा ८० वर्षांचा एक मनुष्य साक्षीदारांचे प्रयत्न पाहून इतका प्रभावित झाला, की त्याने रंग लावण्याचा आपला ब्रश आणला आणि तोही मदत करू लागला. स्वयंसेवकांमधील एकाच्या मालकाने स्वयंपाकघरातील स्टोव्हसाठी एक धुराळे दिले. आणखी एका मालकाने स्वयंपाकघरात लावण्याची नवीन कपाटे दिली. एक मनुष्य इतका प्रभावित झाला, की त्याला यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणखीन शिकण्याची इच्छा होती. त्याने उत्सुकतेने तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे प्रकाशन स्वीकारले.
ती विधवा आणि तिच्या मुली पुन्हा घरी आल्यावर त्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्याचे भाव दिसून आले. काहींच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते तर काही आनंदाने हसत होते व काही आनंदाने एकमेकांना आलिंगन देत असल्याचे दृश्य सगळीकडे दिसत होते—ख्रिस्ती प्रेम आणि भावनेचा तो अविस्मरणीय क्षण होता. खरेच, मंडळीतील गरजू सदस्यांबद्दल खरे प्रेम आणि काळजी खऱ्या ख्रिस्ती धर्माचे चिन्ह आहे, कारण पौलाने लिहिले: “तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.”—गलतीकर ६:१०.