राज्य घोषकांचा वृत्तान्तखऱ्या
ख्रिस्ती लोकांचा छळ होईल
हाबेलाच्या काळापासून यहोवाच्या अनेक सेवकांनी धार्मिक छळ सोसला आहे. (लूक ११:४९-५१) शिवाय यात काही नवल नाही कारण बायबल ताकीद देते की, “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल”! (२ तीमथ्य ३:१२) त्याच्या बरहुकूम, आज २५ पेक्षा अधिक देशांत, यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी आहे व ते छळ सोसत आहेत.
जेथे यहोवाच्या साक्षीदारांवर केवळ बंदीच नसून त्यांचा धार्मिक गटांद्वारे छळ देखील होतो अशा एका देशात, सुवार्तेचे १२,००० पेक्षा अधिक प्रचारक १५,००० पेक्षा अधिक लोकांसोबत बायबलचा अभ्यास करीत सातत्याने आवेशी कार्य करत आहेत. अर्थात, त्यांचे प्रचार कार्य दक्षतेने केले जाते. त्यांच्या ख्रिस्ती सभा बहुतेक खाजगी घरातच घेण्यात येतात व आस्थेवाईकांना अशा सभांना आमंत्रित करताना ते सावध असतात.
शासनाने अलीकडेच साक्षीदारांप्रती एक सौम्य भूमिका स्वीकारली आहे व आता ते त्यांचे पुष्कळसे कार्य हल्लेखोर हस्तक्षेपाशिवाय करतात. तरी देखील, विविध धार्मिक गटांनी आपला प्रभाव पाडून संकट उभे केले आहे.
एका शहरात तर जवळजवळ २०० धर्मवेड्यांची टोळी एका घरावर चालून आली जेथे साधारण ५० यहोवाचे साक्षीदार असलेल्या मंडळीची सभा सुरू होती. टोळीतील काहींच्या हातात मोठे दगड होते व ते मोठ्याने ओरडून धार्मिक घोषणा करत होते. स्पष्टपणे त्यांचा इरादा साक्षीदारांवर हल्ला करून त्या घराचा नाश करणे हा होता. काही काळापासून धार्मिक पुढारी सभांवर पाळत ठेवून होते व हल्ला करण्यासाठी योग्य संधीसाठी थांबून होते. हा जमाव घरात प्रवेश करणार तोच तेथे १५ पोलीस आले व त्यांनी हुकूम देऊन गर्दीस पिटाळून लावले. साक्षीदारांसाठी हे एक आश्चर्यच होते कारण त्यांच्यातील कोणालाही पोलिसांना सूचना देण्यास सुद्धा वेळ मिळाला नव्हता.
परंतु इतर प्रसंगी, विरोधक अधिक सफल झाले आहेत. अनेक साक्षीदारांची न्यायचौकशी करण्यात आली व त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. एक खटला कित्येक वर्षांपासून अनिर्णित होता व स्पष्टपणे फिर्यादींना त्यात काही रस उरला नव्हता. तरीसुद्धा, स्थानिक पाळकवर्गाच्या चिथावणीने हा विषय पुन्हा एकदा न्यायालयात आणण्यात आला व त्या साक्षीदाराला तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
दुसऱ्या एका ठिकाणी साक्षीदारांचा एक समुह प्रभूच्या सांज भोजनाचे स्मारक पाळण्यासाठी एका खासगी घरात एकत्र झाला. नंतर त्या संध्याकाळी, काही पोलीसांनी घरमालकाला व ज्यांनी सभा चालवली त्या वडिलास अटक केली. पोलीस ठाण्यात त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. एक अमानुष चौकशी कित्येक तास लांबली. साक्षीदारांतील, एकाला गार पाण्याच्या विहिरीत टाकण्यात आले असतानाही त्याने तग धरला.
पोलिस असा हल्ला का करत होते? पुन्हा एकदा, या पोलिस कारवाईमागे स्थानिक पाळकवर्गाची मदत घेतलेल्या धर्मवेड्यांच्या एका गटाचा हात होता. नंतर पोलिसांच्या प्रमुखाने स्पष्ट केले की साक्षीदारांना त्यांच्या संमतीविना अटक करण्यात आली होती. एक क्षमायाचना काढण्यात आली व मारहाणीसाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली.
सबंध जगात यहोवाचे साक्षीदार, हिंसक विरोध असतानाही सतत देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत आहेत. “पाहा! लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हाला पाठवितो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा,” या येशूच्या सल्ल्याचे ते पालन करतात.—मत्तय १०:१६.
[३१ पानांवरील चित्रं]
सर्वात प्रथम हाबेलाचा छळ करण्यात आला होता