स्वातंत्र्याकडे नेणारा अरुंद मार्ग
नैसर्गिक नियम विश्वावर नियंत्रण ठेवतात, यावर बुद्धिमान लोकांपैकी फार अल्पजण वादविवाद करतात. हे नियम, रेणूंपासून हजारो करोडो तारे असलेल्या प्रचंड आकाशगंगेपर्यंत सर्वांवर ताबा ठेवतात. नैसर्गिक नियम नसते तर योजना नसती; समज नसती; जीवनच अस्तित्वात राहू शकले नसते. नैसर्गिक नियम पूर्णपणे समजून त्यांच्यानुसार वागल्याने, चंद्रावर चालणे, पृथ्वीच्या कोणत्याही ठिकाणाहून किंवा पृथ्वीच्या वातावरणाच्या पलीकडील रंगीत चित्रे आपल्या घरांमध्ये दूरचित्रवाणीच्या पडद्यावर प्रक्षेपित करणे या सारखे चकित करणारे पराक्रम मनुष्य साध्य करू शकला.
परंतु नैतिक नियमांबद्दल काय? त्यांचे पालन करणे तितकेच लाभदायक आणि प्रतिफलदायी आहे का? नैतिक नियम नाहीतच असे अनेकांना वाटते असे दिसते व त्यामुळे ते त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वैर तत्त्वज्ञान किंवा धर्माची निवड करतात.
परंतु काही लोक दुसरा मार्ग निवडतात म्हणजेच, बायबलमध्ये म्हटलेला ‘जीवनाकडे नेणारा अरुंद मार्ग’ निवडतात. अल्प लोकच ही निवड करतात हे ऐकून आपल्याला नवल वाटण्याची गरज नाही, कारण या अरुंद मार्गाबद्दल येशू म्हणाला: “ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१४) थोडकेच का बरे?
कारण अरुंद मार्गावर देवाच्या नियमांचे आणि तत्त्वांचे निर्बंध आहेत. देवाच्या दर्जांनुरूप स्वतःचे जीवन प्रामाणिकपणे जुळवून घेणाऱ्यालाच तो अपीलकारक वाटतो. स्वातंत्र्य असल्याच्या भ्रमात पाडून वास्तविकतेत दास्यत्वात ठेवणाऱ्या रुंद मार्गाच्या अगदीच विरुद्धतेत, निर्बंध असल्यासारखा वाटणारा अरुंद मार्ग सर्व महत्त्वपूर्ण बाबतीत एखाद्याला स्वतंत्र करतो. त्याच्या सीमा ‘स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांद्वारे’ ठरवण्यात आल्या आहेत.—याकोब १:२५.
अरुंद मार्ग मुक्त कसे करतो
अरुंद मार्गावर टिकून राहणे नेहमीच इतके सोपे नाही हे खरे आहे. प्रत्येक जीवधारी मनुष्य अपरिपूर्ण आहे आणि त्याच्याजवळ चुका करण्याची वारशाने मिळालेली प्रवृत्ती आहे. म्हणून एखादा मार्गापासून थोडेसे भटकण्यास प्रवृत्त होऊ शकतो. तरीसुद्धा, ‘संकोचित मार्गाला’ चिकटून राहिल्याने मिळणारे लाभ, आवश्यक असलेली आत्म-शिस्त किंवा सुधारणांच्या योग्यतेचे आहेत कारण देव ‘आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याला शिकवतो.’—यशया ४८:१७; रोमकर ३:२३.
उदाहरणासाठी: सुज्ञ पालक त्यांच्या मुलांसाठी आहाराचा ‘संकोचित मार्ग’ ठरवतात. याचा अर्थ काहीवेळेस जेवणाच्या वेळी कडक असावे लागते. पण मग मुले मोठी झाल्यावर, त्यांच्या पालकांच्या प्रेमळ शिस्तीची ते गुणग्राहकता बाळगतील. प्रौढ या नात्याने त्यांनी पौष्टिक अन्नासाठी रुची निर्माण केलेली असेल. पौष्टिक अन्नाची विविधता असल्यामुळे त्यांना बंधनकारक असल्यासारखे वाटणार नाही.
एका आध्यात्मिक मार्गाने देवही, जीवनाकडे नेणाऱ्या अरुंद मार्गावरील लोकांसोबत असाच व्यवहार करतो. तो नम्र लोकांमध्ये आनंद आणि खऱ्या स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या इच्छांचा विकास करतो. आपले वचन बायबल पुरवण्याद्वारे तो असे करतो. शिवाय, आपल्याला त्याच्या आत्म्याच्या मदतीसाठी प्रार्थना करण्याचे देखील तो आमंत्रण देतो आणि अरुंद मार्गावर टिकून राहण्याचे उत्तेजन देणाऱ्या सहख्रिश्चनांसोबत सहवास राखण्याची आज्ञा देतो. (इब्रीयांस १०:२४, २५) होय, देव प्रीती आहे व त्याचे मनोदय आणि त्याच्या सर्व पद्धतींमागे हाच सर्वश्रेष्ठ गुण आहे.—१ योहान ४:८.
प्रीती, शांती, चांगुलपणा, आत्मसंयम आणि देवाच्या आत्म्याची इतर फळे सर्वत्र असल्यावर अरुंद मार्ग बंधनकारक भासत नाही. शास्त्रवचन म्हणते त्याप्रमाणे, “अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.” (गलतीकर ५:२२, २३) “जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे.” (२ करिंथकर ३:१७) आताही खऱ्या ख्रिश्चनांना या स्वातंत्र्याचा मासला मिळत आहे. आज अनेक जण पीडित असलेल्या भवितव्याची भीती आणि मृतांबद्दलच्या अंधश्रद्धेच्या भयापापासून मुक्त आहेत. “सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या [यहोवा, NW] ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण” होईल त्या भवितव्याचे मनन करणे किती रोमहर्षक असेल! (यशया ११:९) तेव्हा, हिंसाचाराची भीती देखील नसेल. कुलपे आणि गज राहणार नाहीत. सर्वांना दिवसरात्र, घरात आणि घराबाहेर—मुक्त आणि सुरक्षित वाटेल. तेच खरोखरचे स्वातंत्र्य असेल!
आपल्याला देवाच्या साहाय्याची खात्री आहे
देवाच्या दर्जांनुरूप जीवन व्यतीत करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे खरी, पण तरीदेखील अपरिपूर्ण मानवांसाठी सुद्धा “त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.” (१ योहान ५:३) अरुंद मार्गावर चालण्यासाठी आपण सुधारणा करतो आणि त्यावरून चालल्याने येणाऱ्या फायद्यांची आपल्याला जाणीव होते तेव्हा, रुंद मार्गाची गुणलक्षणे असणाऱ्या कृत्यांबद्दल आणि विचारसरणीबद्दल आपल्यामध्ये अधिक नापसंती निर्माण होते. (स्तोत्र ९७:१०) आपल्या विवेकाला देवाच्या नियमांचे पालन करणे अपीलकारक वाटते. अनेकांची गुणलक्षणे म्हणजे ‘खिन्न चित्त’ आणि ‘भग्नहृदयाऐवजी’ देव अभिवचन देतो: “पाहा, माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करितील.” यहोवाकडून प्रशिक्षण मिळालेले अंतःकरण आनंदी आणि मुक्त असते.—यशया ६५:१४.
वास्तविक स्वातंत्र्य आपल्यासाठी शक्य व्हावे म्हणून येशू मरण पावला. बायबल म्हणते: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा या नात्याने आता येशू त्या बलिदानाचे लाभ पुरवत आहे. रुंद मार्ग आणि त्याच्यावरील प्रवाश्यांचा नाश झाल्यानंतर, म्हणजे ‘मोठ्या संकटानंतर’ लगेचच तो आज्ञाधारक मानवजातीला धीराने अरुंद मार्गावरील शेषांसोबत शेवटपर्यंत मानवी परिपूर्णतेप्रत मार्गदर्शित करण्यास सुरवात करील. (प्रकटीकरण ७:१४-१७; मत्तय २४:२१, २९-३१) सरतेशेवटी आपण, “सृष्टीहि स्वतः नश्वरतेच्या दास्यांतून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी ह्या आशेने वाट पाहते” या भव्य अभिवचनाची पूर्णता अनुभवू. देवाने दिलेल्या या स्वतंत्रतेपेक्षा कोणतीही गोष्ट वरचढ नाही. मृत्यूला देखील नाहीसे केले जाईल.—रोमकर ८:२१; प्रकटीकरण २१:३, ४.
अरुंद मार्ग एखाद्याला कोठे नेतो हे स्पष्टपणे पाहिल्याने व समजल्याने एखादा मनुष्य हा मार्ग योग्यपणे निवडू शकतो आणि त्यानुसार चालत राहू शकतो. विशेषकरून तरुणांना अदूरदर्शी नसण्यास आणि ज्यांना ते निर्बंध समजतात अशा देवाच्या दर्जांद्वारे लादण्यात आलेल्या गोष्टींचा त्यांना संताप येऊ नये म्हणून मदत केली जाते. हे देवाच्या प्रीतीचा एक पुरावा आहेत व रुंद मार्गावरील दुष्टाविरुद्धचे संरक्षण करणारे आहे हे त्यांना कळते. (इब्रीयांस १२:५, ६) एखाद्या फळझाडाला चांगले फळ देण्यासाठी जसा वेळ लागतो त्याच प्रकारे ईश्वरी गुण आणि इच्छा विकसित करण्यासाठी वेळ लागतो याची आठवण ठेवून एखाद्याला धीर दाखवणे जरूरीचे आहे. परंतु झाडाची योग्य काळजी घेऊन पाणी घातल्यास ते जरूर चांगले फळ देईल.
यास्तव, देवाच्या वचनाचा अभ्यास करा, इतर ख्रिश्चनांसोबत सहवास राखा आणि पवित्र आत्म्यासाठी “निरंतर प्रार्थना करा.” (१ थेस्सलनीकाकर ५:१७) तुमच्या “वाटा नीट” करण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी देवावर भाव ठेवा. (नीतिसूत्रे ३:५, ६, पंडिता रमाबाई भाषांतर) पण हे सर्व व्यावहारिक आहे का? ते खरोखरच उपयोगी ठरते का? होय, आधीच्या लेखात उल्लेखलेल्या टॉम आणि मेरीसाठी ते उपयोगी पडले.
रुंद मार्गावर चालण्याचे त्यांनी सोडून दिले
टॉम लिहितो: “७० रीच्या मध्याला, यहोवाच्या एका साक्षीदाराने आम्हाला भेट दिली तेव्हा त्यांच्याशी आमचा संपर्क आला. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळे आम्ही बायबल अभ्यास करू लागलो. हळूवारपणे मी माझे जीवन सुधारू लागलो. सन १९८२ मध्ये माझा बाप्तिस्मा झाला आणि आता मी स्थानिक मंडळीत सेवा करीत आहे. आमच्या मुलाचा देखील बाप्तिस्मा झाला आहे. मी सत्य शिकण्याआधी माझ्यासोबत इतकी वर्षे सहनशील असल्याबद्दल मी माझ्या पत्नीचे आभार मानतो. त्याहूनही अधिक म्हणजे, यहोवा आणि त्याचा पुत्र ख्रिस्त येशूने जे काही दिले आहे आणि भवितव्यातील जी आशा आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.”
तसेच मेरीबद्दल काय? देव कधीही क्षमा करणार नाही असे तिला वाटत होते, परंतु तरीपण, तिच्या मुलांसाठी तिला त्याच्याविषयी आणखी शिकण्याची इच्छा होती. तिच्या शेजाऱ्यांना यहोवाचे साक्षीदार बायबल शिकवत होते हे तिला कळाल्यावर तिनेही मदतीसाठी विनंती केली. परंतु, तिच्यामध्ये खोलवर रुजलेल्या वाईट सवयींमुळे तिला प्रगती करण्यास कठीण गेले. तिचा अभ्यास कधी प्रगतीशीलपणे होत होता तर कधी थांबत होता. पण तिची सात वर्षांची मुलगी तिला सतत उत्तेजन देत असे. “आई हार मानू नकोस, तू ते करू शकतेस!” असे ती म्हणत असे. तेव्हा मेरी आणखी जास्त प्रयत्न करीत असे.
अलिखित कायद्याप्रमाणे असलेला तिचा पती, जो स्वतःही मादक पदार्थांचा दुरुपयोग करणारा होता, घरी परतल्यावर तोही अभ्यासाला बसू लागला. कालांतराने दोघांनीही त्यांच्या वाईट सवयींवर मात केली. त्यानंतर, त्यांचा विवाह कायदेशीर केल्यानंतर व बाप्तिस्मा घेतल्यानंतर, त्यांना पहिल्यांदा खूप आनंद झाला आणि एका खऱ्या कुटुंबासारखे वाटले. दुःखाची गोष्ट म्हणजे, एड्सने मेरीचा जीव घेतला, पण ती, रुंद मार्गाचा प्रत्येक मागमूस काढून टाकल्यावर पुनरुत्थान आणि परादिस पृथ्वीवरील जीवनाबद्दलचे बायबल अभिवचन अंतःकरणात कायम ठेवून मरण पावली.
होय, नाशाकडे नेणाऱ्या रुंद आणि पसरट मार्गावरून बाजूला होता येते. ख्रिस्त येशू म्हणाला: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) तेव्हा जीवनाकडे नेणाऱ्या अरुंद मार्गावर चालण्याचा ठामनिश्चय का करू नये बरे? देवाच्या वचनातून तुम्ही जे काही शिकता ते मान्य करून त्यास लागू केल्याने तुम्ही व्यक्तिगतपणे “तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील,” या बायबलच्या आनंददायक अभिवचनाचा अनुभव घेऊ शकाल.—योहान ८:३२.