अल्प स्वातंत्र्य असलेला रुंद मार्ग
माता, पिता आणि एक लहान मुलगी—असे तीन जणांचे एक कुटुंब—ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील त्यांच्या घरी असताना घराला आग लागली. त्यांनी खिडक्यांतून बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या खिडक्यांना गज होते. सुरक्षा गजांमुळे अग्निशामक जवान त्यांना वाचवू शकले नाहीत. माता आणि पिता दोघेही धूर आणि ज्वालेत भस्म झाले. मुलगी नंतर इस्पितळात मरण पावली.
या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या सुरक्षा गजांमुळे त्यांचा मृत्यू झाला ही किती दुःखाची गोष्ट! गज आणि सुरक्षा कुलपे लावून आपले घर सुरक्षित ठेवणारे हे कुटुंब एकटेच नाही, हे आमच्या काळाबद्दल केलेले भाष्य आहे. अनेक शेजाऱ्यांची घरे आणि त्यांची मालमत्ता किल्ल्यांसारखी दिसतात. का बरे? त्यांना सुरक्षितता आणि मनःशांती हवी असते. लोकांना स्वतःच्या घरांमध्ये कैद्यांप्रमाणे कोंडून घेतल्यावरच सुरक्षित वाटते ही “मुक्त” समाजासाठी किती निराशजनक गोष्ट आहे! अधिकाधिक शेजारच्या परिसरांमध्ये, मुलांना पालकाविना किंवा कोणा इतर प्रौढ व्यक्तीच्या संरक्षणाविना जवळपासच्या बागेत किंवा शाळेला सुरक्षितपणे जाणे आता अशक्य झाले आहे. जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये, पहाटेच्या दवबिंदूप्रमाणे स्वातंत्र्याचे बाष्पीभवन होत आहे.
जीवनाचा बदललेला नमुना
आपल्या आजीआजोबांचे दिवस निराळेच होते. स्वतः मुले असताना, ते सामान्यपणे हवे तेथे भयाविना खेळू शकत होते. प्रौढ झाल्यावर त्यांचे लक्ष कुलपे आणि गजांकडे वेधले गेले नाही. त्यांना स्वतंत्र असल्यासारखे वाटत होते आणि काही प्रमाणात ते स्वतंत्र होतेच. परंतु आपल्या आजीआजोबांनी त्यांच्याच जीवनकाळात समाजाची मनोवृत्ती बदलत असल्याचे पाहिले आहे. ती मनोवृत्ती निरुत्साही व अतिशय स्वार्थी बनली आहे; अनेक ठिकाणी शेजाऱ्यांबद्दल प्रीतीऐवजी अनेकांच्या मनात त्यांच्याबद्दल भीती निर्माण झाली आहे ज्यांनी वर उल्लेखलेल्या दुःखद घटनेला हातभार लावला आहे. स्वातंत्र्याच्या या वाढत्या उणीवेसोबत नैतिक मूल्यांचा एकसारखा ऱ्हास होत आहे. समाज “नवीन नैतिकता” यासोबत प्रेमासक्त झाला आहे, पण वास्तविकतेत परिस्थिती अशा थरास पोहंचली आहे की कोठेही कोणत्याही प्रकारची नैतिकता पाहणे असंभाव्य आहे.
क्विन्सलँडच्या विद्यापीठात शैक्षणिक क्षेत्रातील भूतपूर्व प्राध्यापक डॉ. रुपर्ट गुडमन लिहितात: “तरुण लोक आता एका वेगळ्याच, सुखापेक्षक . . . जीवनशैलीच्या सामोरे येतात जेथे ‘स्वतःला’ केंद्रस्थानी ठेवले जाते: भोगासक्ती, आत्म-जागृतता, आत्म-पूर्णता, स्वार्थी.” ते असेही म्हणतात, की “आत्मसंयम, स्वार्थत्याग, काबाडकष्ट, काटकसर, अधिकाराबद्दलचा आदर, प्रेम आणि पालकांचा सन्मान ही मूल्ये . . . अनेकांसाठी परकीय कल्पना आहेत.”
निश्चितच एक रुंद मार्ग
बायबल भविष्यवाण्यांशी परिचित असलेल्यांना सर्वत्र दिसणारी आत्मनिष्ठा पाहून आश्चर्य वाटत नाही, कारण येशू ख्रिस्ताने त्याच्या श्रोत्यांना ताकीद दिली: “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत.” (मत्तय ७:१३, १४) अनेक प्रवाश्यांसाठी भरपूर जागा असणारा पहिला मार्ग “रुंद” आहे, कारण तेथे नैतिकतेवर आणि दररोजच्या जीवनावर ताबा असलेल्या बायबल तत्त्वांचे निर्बंध नाहीत. त्यांना आवडणाऱ्या गोष्टी ते करू शकतात व हवे तसे जीवन व्यतीत करू शकतात असा विचार करणाऱ्यांनाच तो मार्ग—कोणतेही नियम नसलेला, कोणतेही बंधन नसलेला मार्ग अपीलकारक वाटतो.
हा रुंद मार्ग स्वीकारलेले, त्यांच्या स्वातंत्र्याचा आनंद लुटत असल्याचा दावा करतात हे खरे. पण बहुतेकजण स्वार्थीपणाच्या एका सामान्य मनोवृत्तीने प्रवृत्त होतात. ते ‘आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याच्या’ ताब्याखाली असल्याचे बायबल म्हणते. हा आत्मा त्यांना “दैहिक वासनांना अनुरूप असे” वागण्यास प्रवृत्त करतो ज्यामुळे ते ‘देहाच्या इच्छांप्रमाणे’ वागू लागतात मग ती अनैतिकता, मादक पदार्थांचा दुरुपयोग किंवा धनसंपत्ती, नावलौकिक अथवा शक्तीचा निरर्थक पाठलाग असो.—इफिसकर २:२, ३.
रुंद मार्ग नाशाकडे नेतो
रुंद मार्गावर प्रवास करणाऱ्यांना ‘देहाच्या इच्छा’ करण्याकडे नेले जाते याची नोंद घ्या. यावरून ते मुळीच स्वतंत्र नाहीत—त्यांचा एक धनी आहे हे दाखवले जाते. ते देहाचे दास आहेत. या धन्याची चाकरी केल्याने कदाचित पुष्कळ समस्या सहन कराव्या लागतील—काही परिणाम सांगायचे झाल्यास, लैंगिक संक्रमित रोग, मोडलेली घरे, मादक पदार्थ आणि मद्यपानाच्या दुरुपयोगामुळे विटलेली शरीरे आणि मन यांची साथ. तसेच या मुक्त रुंद मार्गावर चालना दिल्या जाणाऱ्या स्वार्थी विचारसरणीत, हिंसाचाराची कृत्ये, चोरी आणि बलात्कार यांची मूळे रुजलेली आढळून येतात. “नाशाकडे” नेणारा हा मार्ग अस्तित्वात आहे तोपर्यंत त्याची फळे पूर्वीपेक्षा अधिक हानीकारक होतील.—नीतिसूत्रे १:२२, २३; गलतीकर ५:१९-२१; ६:७.
ऑस्ट्रेलियातील दोन वास्तविक उदाहरणांचा विचार करा. मेरी, मादक पदार्थांचा गैरवापर तसेच अनैतिकतेच्या मोहात पडली.a परंतु तिने जो आनंद मिळवला होता त्या आनंदाने तिची फसवणूक केली. दोन मुले झाल्यावरही तिला तिचे जीवन शून्य वाटत होते. तिला एड्सची लागण झाल्याचे कळाल्यावर ती अगदीच हताश झाली.
टॉमला एका वेगळ्या प्रकारे हानी पोहंचली होती. तो लिहितो: “मी उत्तर क्विन्सलँडच्या एका चर्च मिशनमध्ये वाढलो होतो. १६ वर्षांचा असताना मी अतिशय मद्यपान करू लागलो. माझे वडील, चुलते आणि मित्र सर्व दारूडेच असल्यामुळे मीही तेच करणे स्वाभाविक होते. मी अशा अवस्थेत पोहंचलो, की मी बिअर पासून मेथलेटेड स्पिरीट्स पर्यंत काहीही पित होतो. मी घोड्यांवर पैज लावण्यासही सुरवात केली, आणि काहीवेळा कष्टाने मिळवलेला बहुतेक पैसा गमावला. गमावलेला पैसा काही थोडा नव्हता, कारण ऊस तोडण्याच्या माझ्या कामाला चांगलेच पैसे मिळत होते.
“मग माझा विवाह झाला आणि आम्हाला मुले झाली. माझ्या जबाबदाऱ्या हाताळण्याऐवजी माझे मित्र जे करत होते तेच मीही केले—मद्यपान, जुगार आणि भांडणे. मला बहुतेक वेळा स्थानिक तुरुंगात डांबून ठेवले जात होते. पण याचाही माझ्यावर काहीच प्रभाव पडला नाही. माझे जीवन निकृष्ठावस्थेप्रत जात होते. ते समस्यांनी भरले होते.”
होय, चुकीच्या मनसांच्या आहारी गेल्याने टॉम आणि मेरीने केवळ स्वतःलाच इजा करून घेतली नाही तर त्यांच्या कुटुंबाला देखील इजा पोहंचवली. दुःखाची गोष्ट म्हणजे, अनेक इतर तरुण लोक रुंद मार्गावर सादर केल्या जाणाऱ्या मुक्त, दिशाभूल करणाऱ्या स्वातंत्र्याच्या आत्म्याद्वारे फसले जातात. तरुण लोक या स्वातंत्र्याच्या भपकेदार, फसव्या स्वरूपाला पाहू शकले असते तर किती बरे झाले असते. अरुंद मार्गाच्या वास्तविकता—त्यावर प्रवास करणाऱ्यांना कालांतराने भरावेच लागणारे कठोर जकात त्यांनी पाहिले तर किती बरे होईल. हा मार्ग रुंद आहे आणि त्यावर चालणे सोपे आहे हे खरे. परंतु त्याची ती रुंदीच एक शाप आहे. “जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल,” ही सुज्ञतेची वास्तविकता गांभीर्याने घेण्यात बुद्धिमत्ता आहे.—गलतीकर ६:८.
परंतु याहीपेक्षा एक उत्तम निवड आहे. तो अरुंद मार्ग आहे. पण ह्या मार्गावर किती निर्बंध आहेत, तो किती संकुचित आणि अरुंद आहे? आणि हा मार्ग एखाद्याला कोठे नेतो?
[तळटीपा]
a नावे बदलण्यात आली आहेत.