भक्तिहीन परंपरांचा प्रतिकार करा!
येशू ख्रिस्त म्हणाला, “सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.” (योहान ८:३२) होय, ख्रिस्ती विश्वास—अंधविश्वासांच्या दास्यत्वातून, असत्य सिद्धान्त व उमेदींवरील विश्वासातून तसेच अपायकारक चालीरितींतून बंधमुक्त करतो.
तथापि, प्राचीन काळात घडत होते त्याप्रमाणेच, आधुनिक ख्रिस्तीजनही, ते पूर्वी पाळत असलेल्या परंपरांकडे परतण्याच्या दबावाला अनेकदा तोंड देतात. (गलतीकर ४:९,१०) सर्वच प्रचलित रूढी अपायकारक असतात असे नव्हे. खरे तर, ख्रिस्ती व्यक्ती, हितकारक व फायदेशीर असलेल्या स्थानिक रूढी पाळण्याचे ठरवू शकते. परंतु, रूढी देवाच्या वचनाच्या आड येतात तेव्हा, ख्रिस्तीजन तडजोड करत नाहीत. यहोवाचे साक्षीदार या कारणास्तवच, नाताळोत्सव, जन्मदिन व देवाच्या वचनाविरुद्ध असलेल्या इतर रूढी पाळण्यास नकार देण्याबद्दल प्रसिद्ध आहेत.
अनेकदा, ह्या निर्भय खंबीरपणामुळे, परिचित, शेजारी, व अविश्वासी आप्तेष्टांकडून बराच उपहास व विरोध झाला आहे. विशेषतः, जन्ममृत्युप्रसंगी व लग्नसमारंभात अनेक निरनिराळ्या परंपरा सर्वसाधारणपणे पाळल्या जातात अशा काही आफ्रिकी देशांत असे घडले आहे. ह्या परंपरा अनुसरण्यासाठी आणले जाणारे दडपण भीतीदायक असू शकते—ज्यात अनेकदा धमक्या व हिंसक कृत्ये समाविष्ट असतात. तेथील ख्रिस्तीजन अढळपणे कसे उभे राहू शकतात? तडजोड न करता सामना टाळणे शक्य आहे का? उत्तरासाठी, विश्वासू ख्रिस्तीजनांनी काही अशास्त्रवचनीय परंपरांना कसे तोंड दिले याचे आपण परीक्षण करू या.
अंधविश्वासू अंत्यसंस्कार रूढी
दक्षिण आफ्रिकेत अंत्यसंस्कार व दफनविधीशी संबंधित अनेक परंपरा अस्तित्वात आहेत. शोकित लोक सामान्यपणे संपूर्ण रात्र—किंवा अनेक रात्री—मृत्यू झालेल्या घरात घालवतात, जेथे एक अग्नी सतत जळत ठेवण्यात येतो. शोकितांना दफनविधी पार पडेपर्यंत स्वयंपाक करण्यास, केस कापण्यास किंवा अंघोळ करण्यासही मनाई असते. मात्र नंतर त्यांना औषधी वनस्पती घातलेल्या पाण्याने अंघोळ करावी लागते. अशा रूढी ख्रिस्तीजनांसाठी स्वीकारयोग्य आहेत का? नाही. त्या सर्व जीवाच्या अमरत्वावरील विश्वास व मृतांबद्दल दारूण भय प्रकट करतात.
उपदेशक ९:५ म्हणते: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही.” हे सत्य जाणून घेणे ‘मृतांच्या आत्म्यांचे’ भय बाळगण्यापासून बंधमुक्त करते. परंतु, त्याने किंवा तिने अशा संस्कारात भाग घ्यावा अशी मागणी जेव्हा हितचिंतक आप्तेष्ट करतात तेव्हा एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने काय करावे?
जेन नामक आफ्रिकेतील महिला साक्षीदाराच्या अनुभवाचा विचार करा, जिच्या पित्याचा मृत्यू झाला होता. अंत्यविधी चालला होता त्या घरी आल्यावर तिला लगेच सांगण्यात आले की तिला व कुटुंबातील बाकीच्या सदस्यांना, मृताच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी रात्रभर प्रेताभोवती नाचायचे होते. जेन म्हणते, “मी त्यांना सांगितले की मी यहोवाच्या साक्षीदारांपैकी एक असल्यामुळे अशा चालीरितींमध्ये सहभागी होऊ शकत नाही.” तरीसुद्धा, दफनविधी पार पडला त्याच्या दुसऱ्या दिवशी, वडीलधारी मंडळी म्हणाली की मृताच्या आत्म्यापासून अधिक संरक्षण मिळावे म्हणून ते शोकमग्न कौटुंबिक सदस्यांना अंघोळ घालणार होते. मी पुन्हा एकदा भाग घेण्यास नकार दिला. त्याच वेळेस आईला एका घरात एकान्तात ठेवण्यात आले होते. ज्या कोणाला तिला भेटायचे होते त्याला आधी मादक पेय प्यावे लागत असे जे मुद्दामहून त्याच उद्देशासाठी तयार करण्यात आले होते.
“मी यांपैकी कशातही सामील होण्यास नकार दिला. त्याऐवजी स्वयंपाक करण्यास मी घरी गेले व तयार केलेले जेवण आई राहत होती त्या घरी घेऊन गेले. यामुळे माझे कुटुंबीय खरोखर निराश झाले. त्यांच्या मते मी विचित्र होते.” याहून अधिक म्हणजे त्यांनी तिची टिंगल केली व “तू तुझ्या धर्मामुळे आमच्या परंपरेचा धिक्कार केला म्हणून तुझ्या पित्याचा आत्मा तुला त्रस्त करेल. खरे तर, तुला कदाचित मुलेही होणार नाहीत,” असा शाप दिला. तरीही, जेन घाबरली नाही. याचा परिणाम? ती म्हणते: “त्या वेळेस मला दोन मुले होती. आता सहा आहेत! यामुळे, मी मुलांना जन्म देऊच शकणार नाही असा शाप देणाऱ्यांची लाजिरवाणी स्थिती झाली आहे.”
लैंगिक “शुद्धीकरण”
आणखी एका रूढीत, विवाहजोडीदारांच्या मृत्यूनंतर विधीवत शुद्धीकरण सामील आहे. पत्नीचा मृत्यू होतो तेव्हा तिचे कुटुंब विधुराकडे त्याची मेहुणी किंवा मृत पत्नीची जवळची नातलग घेऊन येतात. त्याला तिच्यासोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले जाते. यानंतरच त्याची इच्छा असेल तिच्याशी तो लग्न करू शकतो. एखाद्या स्त्रीच्या पतीच्या मृत्यू होतो तेव्हाही असेच केले जाते. या रूढीमुळे मृत साथीदाराच्या “आत्म्यापासून” हयात असणाऱ्या विवाहजोडीदाराचे शुद्धीकरण होते असे समजले जाते.
जो कोणी असे शुद्धीकरण करून घेण्यास नकार देतो तो स्वतःवर आप्तेष्टांचा क्रोध ओढवण्याची जोखीम पत्करतो. त्याला किंवा तिला इतरांपासून विलग करण्यात येऊ शकते व त्यांची टिंगल करून त्यांचा नाश भाकीत करण्यात येतो. तरीसुद्धा, ख्रिस्तीजन ही रूढी अनुसरण्यास नकार देतात. त्यांना जाणीव आहे की विवाहबाह्य लैंगिक संबंध एक प्रकारचे “शुद्धीकरण” असणे तर दूरच पण देवाच्या दृष्टीने ते अशुद्ध देखील आहे. (१ करिंथकर ६:१८-२०) शिवाय, ख्रिस्तीजनांना “केवळ प्रभूमध्ये” लग्न करावयाचे आहे. (१ करिंथकर ७:३९)
झाम्बियातील वायलेट नामक एका ख्रिस्ती स्त्रीच्या पतीचा मृत्यू झाला. नंतर तिच्या नातेवाईकांनी तिच्याकडे एका पुरुषास आणले व तिने त्यासोबत लैंगिक संबंध ठेवावे असा आग्रह धरला. वायलेटने नकार दिला व याची शिक्षा म्हणून तिला सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास मनाई करण्यात आली. तिच्यावर संकट येईल या भीतीने तिला मुख्य रस्त्यावरून न चालण्याचीही ताकीद देण्यात आली. तरीसुद्धा, ती आप्तेष्ट किंवा गावकऱ्यांच्या धाकदपटशांनी घाबरून जाण्यास अजिबात तयार झाली नाही.
काही काळानंतर वायलेटला स्थानिक न्यायालयात उपस्थित होण्यास हुकूम देण्यात आला. तेथे तिने बेकायदेशीर असलेले लैंगिक कृत्य करण्यास नकार देण्यामागील तिची शास्त्रवचनीय कारणे निर्भीडपणे समजावून सांगितली. तिच्या विश्वासाविरुद्ध असणाऱ्या स्थानिक रूढीपरंपरा अनुसरण्यास ते तिला भाग पाडू शकत नाहीत असे म्हणून न्यायालयाने तिच्या बाजूने निर्णय दिला. तडजोड करण्यास तिने दिलेल्या खंबीर नकाराने, गावातील ज्या साक्षीदारांना कालांतराने याच वादविषयास सामोरे जावे लागले अशांवरील दडपण कमी करण्यास मदत केली, हे चित्तवेधक आहे.
मोनिका नामक आफ्रिकेतील साक्षीदार स्त्रीने, तिच्या पतीचे निधन झाल्यावर अशाच प्रकारच्या दबावाविरुद्ध तग धरला. तिच्या सासरच्या लोकांनी तिला दुसरा पती करून देण्याचा आग्रह धरला. मोनिका म्हणते: “१ करिंथकर ७:३९ मधील आदेशाचे पालन करण्याच्या दृढ निश्चयाने मी नकार दिला.” तथापि, दबाव संपुष्टात आला नाही. मोनिका आठवण करून सांगते, “त्यांनी मला धमकावले.” “ते म्हणाले: ‘जर तू लग्नाला तयार झाली नाहीस तर तुझे पुन्हा कधीच लग्न होऊ शकणार नाही.’ माझ्या सहख्रिस्तीजनांतील काहीजण अशाच प्रकारे गुप्तपणे विधीवत शुद्ध करण्यात आले होते असाही दावा त्यांनी केला.” तरीसुद्धा, मोनिका अढळपणे उभी राहिली. ती म्हणते. “दोन वर्षे अविवाहित राहिल्यानंतर मी ख्रिस्ती पद्धतीने पुनर्विवाह केला.” आता मोनिका एक नियमित पायनियर या नात्याने सेवा करते.
गर्भपतन व मृतप्रसव
दक्षिण आफ्रिकेतील ख्रिश्चनांना गर्भपतन व मृतप्रसवाशी संबंधित रूढींचाही सामना करावा लागतो. अशा दुःखद घटना दैवी शिक्षेमुळे नव्हे तर मानवी अपूर्णतेमुळे घडतात. (रोमकर ३:२३) तथापि, एखाद्या स्त्रीचे गर्भपतन झाल्यास, काही आफ्रिकेतील परंपरांनुसार तिला काही काळाकरता वर्ज समजले जाते.
नुकतेच गर्भपतन झालेल्या एका स्त्रीला तिच्या घराकडे एक साक्षीदार येत असल्याचे पाहून साहजिकच आश्चर्य वाटले. तो जवळ येऊ लागला असता तिने ओरडून त्यास सांगितले: “येथे येऊ नका! आमच्या रूढीप्रमाणे नुकतेच गर्भपतन झालेल्या स्त्रीला भेटत नसतात.” परंतु, त्या साक्षीदाराने तिला सांगितले की यहोवाचे साक्षीदार बायबलचा संदेश सर्व प्रकारच्या लोकांकडे घेऊन जातात व गर्भपतनासंबंधी अस्तित्वात असलेल्या स्थानिक रूढी ते पाळत नाहीत. नंतर त्याने तिला यशया ६५:२०, २३ वाचून दाखवले व देवाच्या राज्यात गर्भपतन व मृतप्रसव होणार नाहीत हेही समजावून सांगितले. परिणामी, त्या स्त्रीने गृह बायबल अभ्यास स्वीकारला.
मृतजात शिशुंच्या दफनविधीशी संबंधितही अनेक अंधविश्वासू रूढी असू शकतात. जोसेफ नामक एक साक्षीदार अशा एका दफनविधीला गेला तेव्हा, त्याला सांगण्यात आले की सर्व उपस्थितांना काही वनस्पतीत हात धुऊन ते औषध त्यांच्या छातीवर चोळायचे होते. असे केल्याने त्या शिशूचा आत्मा परत येऊन त्यांना अपाय करणार नाही असा समज होता. मृतजन जीवितांना अपाय करू शकत नाहीत ही बायबलची शिकवणूक माहीत असल्यामुळे जोसेफने असे करण्यास विनयशीलपणे नकार दिला. तथापि, काहींनी ते औषध लावण्यास त्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. जोसेफने पुन्हा नकार दिला. या ख्रिश्चनाची निर्भीड भूमिका पाहून उपस्थित असलेल्या इतरांनीही ह्या औषधाचा प्रयोग करण्यास नकार दिला.
सामना टाळा पण खंबीर रहा
जिवितांची भीती व वर्ज केल्या जाण्याबद्दल दहशत ही तडजोड करायला भाग पाडणारी जोरदार कारणे आहेत. नीतिसूत्रे २९:२५ म्हणते: “मनुष्याची भीति पाशरूप होते.” पूर्वलिखित अनुभव या वचनाच्या उर्वरित भागाची यथार्थपणा प्रदर्शित करतात, जे म्हणते: “पण जो परमेश्वरावर [यहोवा, NW] भाव ठेवितो त्याचे संरक्षण होते.”
तथापि, अनेकदा सामना टाळता येतो. उदाहरणार्थ, एखाद्या ख्रिश्चनास त्याच्या नातलगाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्याचे आमंत्रण असल्यास त्याने तडजोड करणे अपरिहार्य होईल अशा प्रसंगात सापडेपर्यंत वाट पाहू नये. “चतुर मनुष्य अरिष्ट येत आहे असे पाहून लपतो, पण भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.”—नीतिसूत्रे २७:१२.
नेमक्या कोणत्या रूढी पाळल्या जातील हे चातुर्याने विचारणे शहाणपणाचे ठरेल. त्या आक्षेपार्ह असल्यास तो ख्रिस्ती त्यामध्ये भाग का घेऊ शकत नाही हे समजावून सांगण्यास या संधीचा उपयोग करू शकतो; हे त्याने “सौम्यपणे व भीडस्तपणाने” करावे. (१ पेत्र ३:१५) एखादा ख्रिस्ती आधीच त्याची बायबल आधारित भूमिका विनयशीलपणे स्पष्ट करतो तेव्हा त्याचे आप्तेष्ट धमक्या देणे किंवा धाकदपटशा करण्यापेक्षा त्याच्या विश्वासांचा आदर करण्यास अधिक प्रवृत्त होतात.
आप्तेष्टांची प्रतिक्रिया काहीही असो, एखादा ख्रिस्ती देवाचा अनादर करणाऱ्या परंपरा पाळून, अजिबात तडजोड करू शकत नाही. मग त्याला कितीही धमकावले किंवा त्यासोबत गैरवर्तणूक केली तरी चालेल. आपण अंधविश्वासू भयापासून मुक्त झालो आहोत. प्रेषित पौलाने आर्जवले: “ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यात टिकून राहा, गुलामगिरीच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.”—गलतीकर ५:१.
[२९ पानांवरील चित्रं]
नुकतीच मरण पावलेली व्यक्ती मध्यस्थ होऊन फार पूर्वी मेलेल्या आप्तेष्टांपर्यंत संदेश पोहंचवू शकते असा अनेकांचा विश्वास आहे