विश्वासू घराणी श्रीलंकेतील वृद्धीस वेग आणतात
सन १९७२ पर्यंत सीलोन म्हणून ओळखले जाणारे श्रीलंका, किनाऱ्यावर माडांनी सुशोभित असलेले समुद्रकिनारे, पर्वत रांगा व अनेक लहान-लहान वाळवंट असलेले, एक अत्यंत सुंदर बेट आहे. पठारावरील प्रदेशात, २,२४३ मीटर उंचावर असलेले ॲडम्स पीक, चार प्रमुख धर्मांचे पवित्र ठिकाण आहे.a जवळच, वर्ल्ड्स एन्ड आहे, एक असे उतरण जेथील खडकाळ कडा सुळक्यासारखा १,५०० मीटर पेक्षा अधिक खाली घसरतो. हे ठिकाण श्रीलंकेतील सर्वात नेत्रदीपक देखाव्यांमधील एक आहे.
श्रीलंकेच्या १.८ कोटी रहिवाश्यांची एक मनोरंजक पार्श्वभूमी आहे. सा. यु. पूर्व. पाचव्या शतकापासून, मुळात इंडो-युरोपियन असलेल्या, उत्तर भारतातील लोकांनी या बेटाला व्यापले आहे. ते लोक सध्या, लोकसंख्येतील तीन चतुर्थांश भाग असलेले सिन्हाली आहेत. नंतर सुमारे १२ व्या शतकादरम्यान, दक्षिण भारतातून तामीळ लोकांचा लोंढा आला; हे आता प्रामुख्याने बेटाच्या उत्तर व पूर्व दिशेस राहतात. वसाहती काळापासून, पोर्तुगीज, डच, व ब्रिटिश लोकसुद्धा आपली खूण करून गेले. शिवाय अरबी व मालेयी द्वीपकल्पांतून आलेले समुद्रव्यापारी स्थानिक लोकांमध्ये स्थायिक झाले आहेत. येथे युरोपिय, पारशी, चीनी व इतरांच्या लहानमोठ्या वसाहती पण आहेत.
संमिश्र जातींशिवाय, श्रीलंकेतील भाषा व धर्म येथील पार्श्वभूमींची विविधता प्रतिबिंबित करतात. ह्या बेटातील प्रमुख भाषा सिन्हाली, तामीळ व इंग्रजी आहेत. श्रीलंकेतील अनेक लोक ह्या तीन भाषांतील कमीतकमी दोन भाषा बोलतात. जातीविषयक पार्श्वभूमीदेखील लोकांच्या धर्मांत मुख्य भूमिका बजावतात. बहुतेक सिन्हाली बौद्ध आहेत, तर बहुतेक तामीळ लोक हिंदू आहेत. अरबी किंवा मालेयन अनुबंध असलेले सहसा इस्लाम धर्म अनुसरतात व युरोपियन पार्श्वभूमी असलेले बहुधा ख्रिस्तीधर्मजगताच्या कॅथलिक व प्रॉटेस्टंट चर्चचे सभासद आहेत.
आव्हानास सामोरे जाणे
ह्या सर्व गोष्टी, श्रीलंकेतील यहोवाच्या साक्षीदारांसमोर एक जबरदस्त आव्हान प्रस्तुत करतात. “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल,” ही येशूची आज्ञा पूर्ण करण्याकरता ते कठोर परिश्रम करतात. (मत्तय २४:१४) सुवार्तेच्या प्रचारकांना अनेक भाषांचा सामना करण्याशिवाय, प्रचाराच्या काही तासांतच, बौद्ध, हिंदू, ख्रिस्ती धर्मजगताच्या चर्चचे सभासद व नास्तिकांशी सुद्धा बोलावे लागते.
आपल्या सेवेत प्रभावी होण्यासाठी, प्रचारकांनी तामीळ, सिन्हाली व इंग्रजीतून, टेहळणी बुरूज व सावध राहा! मासिके व इतर बायबल साहित्य स्वतःजवळ ठेवले पाहिजे. जे समर्थ आहेत ते या भाषांमधील बायबलही घेऊन जातात. देव खरोखरी आपली काळजी करतो का? व आपल्या समस्या—त्या सोडवण्यास आपल्याला कोण मदत करील? ही माहितीपत्रके तसेच या जगाचा बचाव होईल का? ही हस्तपत्रिका अलीकडेच, या तीनही भाषांमध्ये एकाचवेळी प्रकाशित झाल्याने प्रचारक अत्यंत हर्षित झाले. कार्यासाठी अधिक साधने हा याचा अर्थ होता.
सन १९१२ मध्ये जेव्हा, आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थी संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष चार्ल्स टेझ रस्सेल यांनी सीलोनला एक धावती भेट दिली होती, तेव्हापासून साक्षीदार कठोर परिश्रम करीत आहेत. तथापि, अपूर्व वाढ, १९४७ मध्ये वॉचटावर बायबल गिलीयड प्रशालेच्या पदवीधरांचे आगमन झाल्यानंतरच होणार होती. त्यावेळेपासून, श्रीलंकेतील प्रचारकांनी त्यांच्या प्रचार कार्याच्या उत्तम परिणामांचा आनंद अनुभवला आहे. सन १९९४ मध्ये एकूण १,८६६ राज्य प्रचारकांनी सरासरी २,५५१ गृह बायबल अभ्यास दर महिन्याला चालवले. तसेच, स्मारक विधीची ६,९३० एवढी उपस्थिती एकूण मंडळ्यांतील प्रचारकांच्या संख्येच्या जवळजवळ चौपट होती. केवढा हा अद्भूत आशीर्वाद!
इतर काही देशांच्या तुलनेत श्रीलंकेतील प्रगती मंद असल्याचे जाणवू शकेल. घनिष्ट कौटुंबिक नातेसंबंध ह्याचे एक कारण असल्याचे दिसून येते. तथापि, काही वेळेस ते उलटपणे, फायदेशीरही ठरू शकतात. रोमी सेनेतील शताधिपती कर्नेल्याने जेव्हा सत्याचा स्वीकार केला, तेव्हा त्याच्या घराण्यानेही त्याच्याबरोबर तसेच केले. (प्रेषितांची कृत्ये १०:१, २, २४, ४४) प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक इतर बळकट ख्रिस्ती घराण्यांचाही उल्लेख करते ज्यामध्ये लुदिया, क्रिस्प तसेच पौल आणि सिला यांच्या बंदिशाळेच्या नायकाच्या घराण्यांचा समावेश होतो.—प्रेषितांची कृत्ये १६:१४, १५, ३२-३४; १८:८.
खरोखर, जेथे सुसंघटितपणा व खरी चिकाटी आहे तेथे घनिष्ट कौटुंबिक नातेसंबंध फायदेकारक ठरू शकतात. यशया ६०:२२ मनात बाळगून दीर्घकालिन मिशनरी रे मॅथ्यूजने निरीक्षिले: “असे प्रतीत होते की, यहोवा केवळ वैयक्तिकांकडूनच नव्हे तर घराण्यांद्वारे देखील, योग्य वेळेस कार्य त्वरेने घडवून आणत आहे.”
संघटित कुटुंब स्तुती आणते
निश्चितपणे, अशी विश्वासू घराणी श्रीलंकेत अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ, श्रीलंकेचे प्रमुख शहर कोलंबो येथील कोटाहेना नामक प्रदेशात राहणारे सुसंघटित सिनप्पा कुटुंब आहे. या कुटुंबाचे प्रमुख मेरियन यांचा मृत्यू होऊन फार काळ झाला नसला तरीही, त्यांची पत्नी अन्नम्मा व १३ ते ३३ वयोगटातील त्यांच्या १५ मुलांबाळांपैकी १२ जण, एक घराणे म्हणून अखंडपणे यहोवाची सेवा करीत आहेत. हा लेख लिहिण्याच्या वेळेपर्यंत त्यांच्या आठ मुलांचा बाप्तिस्मा झाला होता व त्यांतील तिघे पूर्ण वेळेच्या सेवेत नियमित पायनियर म्हणून सेवा करत होते. इतर तिघांनी साहाय्यक पायनियर सेवेसाठी वेळोवेळी आपले नाव नोंदवले होते. या घराण्यातील बालकांमध्ये चार बाप्तिस्मा न घेतलेल्या प्रचारकांचा समावेश होता. सोबतच, चार नातवंडे अद्याप कोवळ्या वयांची असूनही बायबलचा अभ्यास करीत होते व यहोवाच्या साक्षीदारांच्या कोलंबो नॉर्थ मंडळीत ख्रिस्ती सभांना उपस्थित राहत होती.
अन्नम्माने पहिल्यांदा १९७८ मध्ये राज्याची सुवार्ता ऐकली ज्यावेळेस तिने टेहळणी बुरूजची एक प्रत स्वीकारली. बायबल अभ्यास सुरू करण्यात आला व सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते या बायबल अभ्यास साधनाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर अन्नम्माने आपले जीवन यहोवा देवाला समर्पित केले व बाप्तिस्मा घेतला आणि अशाच प्रकारे तिच्या घराण्यातील कित्येकांसाठी प्रारंभिक उदाहरण ठेवले.
सेनेतील अधिपती कर्नेल्यासारखेच अन्नम्माच्या घराण्यातही सुसंघटितपणा आहे. अन्नम्मा आठवणींना उजाळा देते, “आम्हाला ख्रिस्ती सभांसाठी व संमेलनांसाठी तरतूद करावी लागत असे, शाळेचे तर विचारूच नका.” “कपड्यालत्त्यांची समस्या होती, पण यहोवाच्या आशीर्वादाने आम्ही प्रत्येक संमेलनासाठी निदान काही नवीन कपडे करू शकत होतो. कुटुंबातील सारे, चांगले कपडे घालून पोटभर जेवून—हसतमुखाने येत असत.”
मुलेही त्यांची घरगुती व्यवस्था प्रेमाने स्मरतात. सबंध कुटुंबास ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्यास मदत करण्यासाठी, थोरल्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात येत असत. उदाहरणार्थ मंगला कपडे धूत असे व विनीफ्रेडा इस्त्री करत असे. विनीफ्रेडा, जी धाकट्यांना कपडे घालून तयार होण्यासही मदत करत असे ती म्हणते: “घरून निघतांना सगळेच खरंच छान दिसायचे.”
आध्यात्मिक तरतुदीपण तेवढ्याच सुसंघटित होत्या. अन्नम्माची कन्या पुष्पम जी आता एक नियमित पायनियर आहे तिला आठवते: “दररोज आमचे कुटुंब बायबल वाचन व दैनंदिन वचनाची एकत्र मिळून उजळणी करण्याचा आनंद घेत असे.” अन्नम्मा पुढे म्हणते: “मुलांमधील प्रत्येकाजवळ बायबल, टेहळणी बुरूज व इतर प्रकाशनांची वैयक्तिक प्रत आहे. मी सभेत त्यांची विवेचने लक्षपूर्वक ऐकते. जेथे गरज भासते तेथे घरी परतल्यावर उत्तेजन देते व चुकांची दुरुस्ती करते. रात्री कौटुंबिक प्रार्थनेद्वारे दिवसाचे समापन करण्यास आम्ही एकत्र येतो.”
कुटुंबातील सर्वांसाठी उत्तम ख्रिस्ती शिक्षण पुरविण्यात अन्नम्माची मदत करण्याच्यादृष्टीने थोरली मुले बहुमोल आहेत. त्यांचा व्यस्त आराखडा, घराबाहेर सुवार्ता सांगण्याच्या त्यांच्या इच्छेच्या आड येत नाही. सर्व मिळून कुटुंबातील विविध सदस्य, त्यांच्या घराच्या आसपास ५७ गृह बायबल अभ्यास चालवतात. जावई राजन म्हणतो, “हे कुटुंब प्रगतीशील अभ्यास चालवते. माझी पत्नी पुष्पम हिला तर तिच्या विद्यार्थिनींपैकी एकीने यहोवाला आपले जीवन समर्पित केल्याचे पाहण्याची सुसंधी सुद्धा प्राप्त झाली.”
एवढ्या मोठ्या कुटुंबाने रोमन कॅथलिक चर्च सोडले तेव्हा कोटाहेनामध्ये चांगलीच खळबळ माजली. पाळकाने कारण जाणून घेण्यासाठी ह्या कुटुंबाला कधीच भेट दिली नसली तरी त्याने सामान्य सभासदांना मात्र शोध लावण्यास सांगितले होते. परिणामी अनेक वादविवाद झाले जे बहुतेक त्रैक्य या शिकवणीबद्दल होते. अन्नम्मा आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यासाठी नेहमी यहोवा व बायबलवर अवलंबून राहिली. या वादविवादांमध्ये तिचे आवडते वचन योहान १७:३ हे होते.
सुसंघटितपणा व अढळ प्रयास संतोषजनक परिणाम आणू शकतात हे सिन्नप्पा घराणे स्पष्टपणे दाखवून देते. त्यांच्या उत्साही प्रयत्नांमुळे, केवळ यहोवाच्या गौरवाकरता राज्य प्रचारकांच्या एका नवीन पीढीची वाढ होत आहे.
विरोध खऱ्या भक्तीत कुटुंबाला एकत्रित करतो
नरेहनपित्य या कोलंबोच्या अन्य एका प्रदेशात, सिन्नप्पा यांच्या घरापासून काही किलोमीटर अंतरावर रत्नम कुटुंब राहते. ते सुद्धा पुर्वी रोमन कॅथलिक होते. सन १९८२ मध्ये घरोघरची सेवा करत असलेल्या साक्षीदारांची भेट, फातिमा या सर्वात थोरल्या मुलीचे यजमान बलेंद्रन यांच्याशी झाली. सबंध कुटुंबासोबत एक बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. लगेचच त्यांची तीन मुले त्यांची आजी इग्नासेमाल हिला देवाच्या नावासंबंधी प्रश्न विचारु लागली. जेव्हा मुलांनी “यहोवा” हे उत्तर असल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी आजीच्या मनात आस्था जागृत केली व तिजसोबत बायबल अभ्यास सुरू करण्यात आला. कालांतराने तिच्या मुलींपैकी दोघी, जीवकला व स्टेला याही अभ्यास करू लागल्या आणि १९८८ पर्यंत तिघींचा बाप्तिस्मा झाला होता.
या दरम्यान, बलेंद्रन व फातिमा यांनी फातिमाची दुसरी एक बहीण मल्लिका व तिचे पती योगनाथन यांनाही सत्य दिले. सन १९८७ पर्यंत ह्या दांपत्याचाही बाप्तिस्मा झाला व त्यांनी आपल्या दोन मुलांच्या मनात यहोवासाठी वाढत जाणारी प्रीती बिंबवली आहे. यानंतर, फातिमाची आणखी एक बहीण पुष्पा सत्यात आली. तिने समर्पण केले व १९९० मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला. टोकियोला असताना एका हे नाव असलेले पुष्पाचे पती इंग्रजी मंडळीसोबत सेवा करीत व ती त्यांचा लहान मुलगा अल्फ्रेड ह्यास यहोवाच्या मार्गात लहानाचा मोठा करण्यासाठी मदत करत होती.
आतापर्यंत, रत्नम कुटुंबातील दहापैकी चौघांनी खऱ्या उपासनेची बाजू घेतली आहे. आनंदाची बाब ही की आणखीन तिघे त्यांच्या वैयक्तिक बायबल अभ्यासात प्रगती करत आहेत. एकूण ११ नातवंडांतील एक मुलगी, प्रदीपा हिचा तर बाप्तिस्माही झालेला आहे. इतर सात लहान मुलांना, त्यांच्या कौटुंबिक बायबल अभ्यासामार्फत नियमितपणे शिक्षण दिले जात आहे. यासोबतच शेजारपाजारातील आस्थेवाईक लोकांबरोबर एकूण २४ गृह बायबल अभ्यास चालविण्यात येत आहेत.
हे सारे सहजासहजी घडून आले नाही. सुरवातीस कुटुंबाकडून विरोध झाला. कुटुंबातील कोणाचेही सभांना उपस्थित राहणे व जाहीर प्रचार कार्यात सहभागी होणे याला वडील मुथुपिल्लई व थोरल्या भावांचा अतिशय विरोध होता. अंशतः याचा संबंध वैयक्तिक सुरक्षिततेसोबत असला तरी, मुथुपिल्लई पुढे म्हणतात: “मी संतांना पूर्णपणे वचनबद्ध होतो व माझ्या कुटुंबीयांचे कॅथलिक चर्च सोडणे मला पसंत पडले नाही.” आता मात्र आपण खऱ्या देवाची उपासना करीत आहोत यावर त्यांचा विश्वास आहे कारण त्यांच्या विश्वासाने त्यांना दिलेली प्रतिफळे ते पाहू शकतात.
उदाहरणार्थ, एकदा त्यांच्या बौद्ध घरमालकाने त्यांच्यावर जादूटोण्याचा प्रयोग करून त्यांना त्याच्या मालकीच्या जागेवरून घालवून देण्याचा प्रयत्न केला. एके रात्री तो आला व “मंतरलेली” लिंब घरा सभोवताली ठेवली. अंधविश्वासी असलेले शेजारी घाबरून गेले. रत्नम घराण्यावर काहीतरी अनर्थ ओढावणार अशी अपेक्षा ते सारे करीत होते. जेव्हा इग्नासेमालला याचा पत्ता लागला तेव्हा तिने व मुलांनी मिळून कोणतीही भिती न बाळगता ती लिंब फेकून दिली—व त्यांना काहीएक अनिष्ट झाले नाही. त्यांची निर्भीड कृती, त्यांच्या परिसरात एक चांगली साक्ष ठरली ज्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल मोठा आदर वाटू लागला. स्टेला घराशेजारच्या चाळींमध्ये दोन गृह बायबल अभ्यास सुरू करू शकली. याने प्रोत्साहित होऊन, नजीरा, या सुनेने सुद्धा बायबल अभ्यास स्वीकारला.
तिच्या कुटुंबाला प्राप्त झालेल्या अनेक आशीर्वादांकडे मागे वळून पाहत इग्नासेमाल निरीक्षते: “कुटुंबातील आध्यात्मिक वाढ पाहून मी अत्यंत आनंदी आहे. आम्ही यहोवाद्वारे आशीर्वादित आहोत कारण विरोध निवळला आहे व आमच्या कुटुंबातील ऐक्य वाढले आहे.”
ही मोठी घराणी केवढे वरदान ठरली आहेत. श्रीलंका अर्थात “प्रदीप्त प्रदेशात” राज्य सुवार्तेच्या घोषणेस वेग देण्यासाठी कठोर संघर्ष करीत असलेले लहान कुटुंब, एक-पालकीय कुटुंब व अविवाहित ख्रिश्चनांच्या आवाजात त्यांनी भर पाडली आहे. जगभरातील आपल्या सहख्रिश्चनांसोबतच, श्रीलंकी साक्षीदारसुद्धा परादीसच्या पुनःस्थापनेची आतुरतेने वाट पाहत आहेत ज्याची कल्पना आजही मोहक श्रीलंकेचे समुद्रकिनारे व पर्वत पाहून करता येते.
[तळटीपा]
a तेथील एक मोठा खळगा, आदाम, बुद्ध, शिवा व “संत” थोमा यांच्या पावलांचा ठसा असल्याचा दावा क्रमशः मुस्लिम, बौद्ध, हिंदू व चर्च दंतकथा करतात.
[२४, २५ पानांवरील चित्रं]
श्रीलंकेतील अनेक लोक ख्रिस्ती प्रचार व शिक्षण कार्यास प्रतिसाद देत आहेत