वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ८/१५ पृ. १७-२२
  • “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • सोयीचे जू
  • हलके ओझे
  • “तुमच्या जिवास विसावा”
  • येशूने तजेला दिला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • तणावापासून मुक्‍त होण्याचा—व्यवहार्य उपाय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • “कष्ट करणाऱ्‍या . . . लोकांनो, माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • “माझे जू आपणावर घ्या”
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ८/१५ पृ. १७-२२

“माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे”

“माझे जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका.”—मत्तय ११:२९.

१, २. (अ) तुम्हाला विसावा देणारे असे जीवनात तुम्ही काय अनुभवले आहे? (ब) येशूने अभिवचन दिलेला विसावा मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीने काय केले पाहिजे?

उष्ण आणि दमट दिवसानंतर थंड पाण्याची अंघोळ किंवा लांबच्या आणि थकवा आणणाऱ्‍या प्रवासानंतर रात्रीची चांगली झोप—खरेच, किती तजेलादायक! जेव्हा जड ओझे उतरवले जाते किंवा पाप आणि अपराधांची क्षमा केली जाते तेव्हा देखील असेच वाटते. (नीतिसूत्रे २५:२५; प्रेषितांची कृत्ये ३:१९) विसाव्यामुळे आलेले आनंददायक अनुभव आपल्याला टवटवी आणतात आणि अधिक करण्यासाठी आपल्यामध्ये उत्साह उत्पन्‍न करतात.

२ भाराक्रांत आणि थकलेले येशूकडे येऊ शकतात कारण त्याने त्यांना—विसावा—देण्याचे वचन दिले आहे. तथापि, अधिक इष्ट असणारा विसावा मिळवण्यासाठी एक अशी गोष्ट आहे जी करण्यासाठी त्यांनी इच्छुक असले पाहिजे. येशूने म्हटले, “माझे जू आपणांवर घ्या व माझ्यापासून शिका म्हणजे तुमच्या जिवास विसावा मिळेल.” (मत्तय ११:२९) हे कोणते जू आहे? त्यामुळे कशाप्रकारे विसावा मिळतो?

सोयीचे जू

३. (अ) बायबल काळात कोणकोणत्या प्रकारचे जू वापरले जात असे? (ब) जुवासोबत कोणता लाक्षणिक अर्थ संबंधित आहे?

३ कृषीप्रधान समाजात राहत असल्यामुळे, येशू आणि त्याच्या ऐकणाऱ्‍यांना जुवाबद्दल बरेच काही माहीत होते. मूलतः जू लाकडाची लांब तुळई असते जिच्या खालील दोन्ही बाजूस कामासाठी निवडलेल्या दोन प्राण्यांच्या, बहुधा बैलांच्या, माना उचितपणे बसतील अशी खोलगट जागा असते; जुवाचा वापर त्यांना एकत्र जुंपून नांगरण्यास, गाडी ओढण्यास किंवा इतर ओझी वाहण्यासाठी केला जातो. (१ शमुवेल ६:७) मानवांसाठी देखील जू वापरले जात असे. त्या साध्या तुळया किंवा बांबू असत, ज्याच्या दोन्ही टोकाला ओझी लावून खांद्यावर वाहून नेली जात असे. यांच्या साहाय्याने कामकऱ्‍यांना जड ओझी वाहून नेता येऊ शकत होती. (यिर्मया २७:२; २८:१०, १३) जुवाचा संबंध ओझी आणि कष्ट याच्याशी असल्यामुळे बायबलमध्ये त्याचा लाक्षणिकरित्या वापर अंमल आणि नियंत्रणाचे प्रतीक म्हणून अनेकदा केला आहे.—अनुवाद २८:४८; १ राजे १२:४; प्रेषितांची कृत्ये १५:१०.

४. येशू त्याच्याजवळ येणाऱ्‍यांना देत असलेल्या जुवाद्वारे काय सूचित होते?

४ मग विसावा मिळावा म्हणून येशूने आपल्याकडे आमंत्रित केलेल्यांनी घ्यावयाचे जू म्हणजे काय होते बरे? त्याने जे म्हटले त्याची आठवण करा: “माझे जू आपणांवर घ्या आणि माझ्यापासून शिका.” (मत्तय ११:२९) शिकणारा शिष्य असतो. या कारणास्तव, येशूचे जू घेण्याचा सरळ अर्थ त्याचे शिष्य बनणे होय. (फिलिप्पैकर ४:३) तथापि, त्याच्या शिकवणींना केवळ मानसिकरित्या मान्यता देण्यापेक्षा अधिक गोष्टींची आवश्‍यकता आहे. यांच्या एकवाक्यतेत कार्याची जरूरी आहे—त्याने केलेले कार्य करणे आणि त्याने ज्या रीतीने जीवन व्यतीत केले त्याप्रमाणे जीवन जगणे होय. (१ करिंथकर ११:१; १ पेत्र २:२१) त्याच्या अधिकाराला आणि ज्यांना तो अधिकार सोपवतो अशांप्रती स्वेच्छेने अधीनता दाखवण्याची आवश्‍यकता आहे. (इफिसकर ५:२१; इब्रीयांस १३:१७) याचा अर्थ, समर्पित बाप्तिस्मा घेतलेला ख्रिस्ती बनणे आणि अशा समर्पणामुळे येणारे सर्व विशेषाधिकार व जबाबदाऱ्‍यांचा स्वीकार करणे होय. येशू सांत्वन आणि विसावा मिळावा म्हणून त्याच्याजवळ येणाऱ्‍यांना हेच जू देतो. तुम्ही ते स्वीकारावयास तयार आहात का?—योहान ८:३१, ३२.

५. येशूचे जू घेणे हा कठीण अनुभव का नसेल?

५ जू घेऊन विसावा मिळवणे—हे विसंगतीचे नाही का? खरे पाहता नाही, येशूने म्हटले की त्याचे जू “सोयीचे” आहे. या शब्दाचा अर्थ सौम्य, सुखद आणि अनुकूल असा आहे. (मत्तय ११:३०; लूक ५:३९; रोमकर २:४; १ पेत्र २:३) पेशेवाईक सुतार या नात्याने, येशूने नांगर आणि जू बनवले होते याची अधिक शक्यता आहे आणि अधिक काम आरामात करणे शक्य होण्यासाठी ते योग्यरित्या बसावे म्हणून त्यांना कसा आकार द्यावा हे त्याला माहीत असेल. कदाचित, जुवांच्या आतील बाजुला तो कपडा किंवा चामडे लावत असेल. अनेक लोक असे करतात जेणेकडून मान अधिक घासली जाणार नाही. अशाच रितीने, येशू देत असलेले लाक्षणिक जू “सोयीचे” आहेत. त्याचे शिष्य होण्यात विशिष्ट बंधने आणि जबाबदाऱ्‍यांचा समावेश होत असला तरी, हा काही कठोर किंवा त्रासदायक अनुभव नव्हे, तर विसावा देणारा आहे. त्याचप्रमाणे त्याचा स्वर्गीय पिता, यहोवा याच्या आज्ञा देखील कठीण नाहीत.—अनुवाद ३०:११; १ योहान ५:३.

६. येशूने, “माझे जू आपणावर घ्या,” असे म्हटले तेव्हा त्याचा कोणता अर्थ असावा?

६ येशूचे जू “सोयीचे” किंवा वाहून नेण्यास हलके बनवणारी आणखी एक गोष्ट आहे. “माझे जू आपणांवर घ्या,” असे त्याने म्हटले तेव्हा त्याचा अर्थ दोन गोष्टींपैकी एक गोष्ट, असा असावा. त्याच्या मनात जर दुहेरी जू, म्हणजे ओझे वाहून नेण्यासाठी दोन प्राण्यांना एकत्र जुंपणारे जू होते तर, त्याच्यासोबत त्याच जुवाखाली येण्याचे आमंत्रण तो देत होता. आपले ओझे वाहण्यासाठी आपल्यासोबत दुसऱ्‍या बाजूला येशू असणे—हा केवढा आशीर्वाद असेल! दुसऱ्‍या बाजूला पाहता, येशूच्या मनात सामान्य कामकरी वापरत असलेल्या जुवाचा दांडा होता, तो आपल्याला कोणते तरी साहाय्य देत होता ज्याद्वारे आपण वाहिले पाहिजे असे कोणतेही ओझे हलके किंवा अधिक कह्‍यात ठेवता येण्याजोगे सोपे बनवू शकतो. कोणत्याही प्रकारे, त्याचे जू खरा विसावा मिळण्याचा उगम आहे; कारण तो आपल्याला हमी देतो: “मी . . . मनाचा सौम्य व लीन आहे.”

७, ८. काही लोकांना दबावाखाली असल्याचे वाटते तेव्हा ते कोणती चूक करतात?

७ जीवनातील समस्यांचे आपण वाहत असलेले ओझे अधिक असह्‍य होत असल्याचे आपल्याला वाटत असल्यास व त्यामुळे अतिशय ताण पडत असल्यास काय करावे? दैनंदिन जीवनातील काळजी हे काहींच्या ओझ्यांचे कारण असले, तरी ते चुकीने असा विचार करतील की येशू ख्रिस्ताचे शिष्य असण्याचे जू फारच कठीण किंवा अधिक मागणी करणारे आहे. कदाचित जरा मुक्‍तता मिळेल या भावनेने अशा परिस्थितीत असणारे काही लोक सभांना उपस्थित राहण्याचे बंद करतात किंवा सेवेत भाग घेण्यापासून परावृत्त होतात. तथापि, ती गंभीर चूक ठरेल.

८ येशू देत असलेले जू “सोयीचे” असल्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगतो. ते जू आपण योग्य रीतीने बसवले नसल्यास, आपली त्वचा सोलली जाईल. या बाबतीत आपल्या खांद्यावरील जुवाचे जवळून परीक्षण करण्यास हवे. जर काही कारणामुळे हे जू नादुरूस्त झाल्यास किंवा ते अयोग्य रितीने बसवल्यास त्याचा वापर करण्यास आपल्याला केवळ अधिक प्रयत्नच करावे लागणार नाहीत तर त्यामुळे वेदना देखील होतील. दुसऱ्‍या शब्दात सांगावयाचे तर, ईश्‍वरशासित कार्य तुम्हाला ओझ्याप्रमाणे भासू लागल्यास, आपण योग्य रितीने ते हाताळतो का याचे परीक्षण करण्यास हवे. आपण जे काही करत आहोत त्याबद्दल आपला हेतू कोणता आहे? आपण सभेला जातो तेव्हा पुरेशी तयारी करतो का? आपण क्षेत्र सेवेत असतो तेव्हा शारीरिक आणि मानसिकरित्या तयारीत असतो का? मंडळीत इतरांसोबत आपण घनिष्ट आणि चांगल्या नातेसंबंधाचा आनंद घेतो का? सरतेशेवटी, यहोवा देव आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त यांच्यासोबत आपला वैयक्‍तिक नातेसंबंध कसा आहे?

९. ख्रिस्ती जू कधीही असह्‍य ओझे का नसावे?

९ येशू देत असलेले जू आपण संपूर्ण अंतःकरणाने स्वीकारतो आणि योग्य रीतीने वाहण्याचे शिकतो तेव्हा ते असह्‍य ओझे वाटण्याचे काहीच कारण नाही. वस्तुतः, येशू आपल्यासोबत त्याच जुवाखाली असणाऱ्‍या परिस्थितीचे चित्र आपण डोळ्यासमोर उभे करू शकत असल्यास—खरे पाहता अधिक ओझे कोण वाहत आहे हे समजणे आपल्याला कठीण जाणार नाही. ही गोष्ट, बाबागाडीत बसणारे मूल जसे गाडीच्या हँडलवर झुकते व जणू तेच गाडीला पुढे ढकलत आहे असा विचार करते, पण खरे पाहता ती गाडी पालक ढकलत असतात त्याप्रमाणे हे आहे. प्रेमळ पिता या नात्याने, यहोवा देवाला आपल्या मर्यादांची आणि कमकुवतपणाची जाणीव चांगल्या प्रकारे आहे व येशू ख्रिस्ताद्वारे तो आपल्या गरजांना प्रतिसाद देतो. पौलाने म्हटले: “देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील.”—फिलिप्पैकर ४:१९; पडताळा यशया ६५:२४.

१०. शिष्यत्त्वाची जबाबदारी गंभीरपणे घेणाऱ्‍याचा काय अनुभव आहे?

१० पुष्कळ समर्पित ख्रिस्ती याची गुणग्राहकता वैयक्‍तिक अनुभवाद्वारे बाळगू लागले आहेत. उदाहरणार्थ, दर महिन्याला साहाय्यक पायनियर या नात्याने कार्य करणे सोबतच अधिक मागणी करीत असलेले पूर्ण वेळेचे ऐहिक काम करणे यामुळे जेनीवर अधिक तणाव येत असल्याचे तिला वाटते. तथापि, पायनियर कार्य तिचा समतोल राखण्यास मदत करत असल्याचे तिला वाटते. लोकांना बायबल सत्य समजण्यास मदत करणे तसेच त्याद्वारे देवाची मर्जी संपादण्याकरता ते त्यांचे जीवन बदलत असल्याचे पाहणे—हीच गोष्ट तिच्या व्यग्र जीवनात अत्याधिक आनंद आणते. नीतीसूत्रातील शब्दांना ती संपूर्ण अंतःकरणाने सहमती दर्शवते, जे म्हणते: ‘परमेश्‍वराचा [यहोवा, NW] आशीर्वाद—समृद्धि देतो, त्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.’—नीतिसूत्रे १०:२२.

हलके ओझे

११, १२. येशूने, “माझे ओझे हलके आहे,” असे म्हटले तेव्हा त्याचा अर्थ काय होता?

११ येशू ‘सोयीच्या’ जुवाचे अभिवचन देण्याव्यतिरिक्‍त “माझे ओझे हलके आहे,” याचे देखील आपल्याला आश्‍वासन देतो. “सोयीचे” असलेले जू, कार्य करण्यास अधिकच सोपे बनवते; ओझे हलकेच असेल तर खरेपणाने कार्य अधिकच सुखद असते. परंतु, येशूच्या या विधानाचा अर्थ काय होता?

१२ एखाद्या शेतकऱ्‍याला त्याच्या प्राण्यांच्या कामात, उदाहरणार्थ नांगराऐवजी बैलगाडी चालवणे असा बदल करावयाचा असल्यास तो काय करील, याचा विचार करा. प्रथम, तो नांगर काढील मग गाडी जुंपेल. नांगर आणि गाडी या दोन्हीसोबत प्राण्यांना जुंपणे असमंजसपणाचे असेल. अशाचप्रकारे लोक वाहत असलेल्या ओझ्यांवरच त्यांनी येशूचे आणखी ओझे लादावे असे तो सांगत नव्हता. आपल्या शिष्यांना तो म्हणाला: “कोणत्याहि चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करिता येत नाही.” (लूक १६:१३) अशाप्रकारे, येशू लोकांना निवड करण्याची संधी देत होता. ते त्यांच्याजवळ असलेले जड ओझे वाहत राहतील की ते खाली ठेवून येशू देत असलेले ओझे स्वीकारतील? येशूने त्यांना प्रेमळ उत्तेजन दिले: “माझे ओझे हलके आहे.”

१३. येशूच्या दिवसातील लोक कोणत्या प्रकारचे ओझे वाहत होते आणि काय परिणाम झाला?

१३ येशूच्या दिवसात, जुलमी रोमी शासक आणि फाजील शिष्टाचारपालन करणाऱ्‍या दांभिक धार्मिक नेत्यांनी लादलेल्या जड ओझ्यापासून मुक्‍त होण्यासाठी ते धडपडत होते. (मत्तय २३:२३) रोमी नियमांपासून मुक्‍त होण्यासाठी काही लोक बाबींना स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करत होते. ते राजनैतिक झगड्यात पडले आणि शेवटी त्यांचा अनर्थकारक अंत झाला. (प्रेषितांची कृत्ये ५:३६, ३७) इतरजण भौतिक गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात खोलवर बुडून आपली परिस्थिती सुधारण्याकरता दृढ निश्‍चयी होते. (मत्तय १९:२१, २२; लूक १४:१८-२०) येशूने आपले शिष्य बनण्याचे आमंत्रण त्यांना देण्याद्वारे मुक्‍ततेचा मार्ग सांगितला तेव्हा त्याचा स्वीकार करावयास सर्वच तयार नव्हते. ते वाहत असलेले ओझे जड असतानाही ते खाली ठेवून त्याचे ओझे घेण्यास कुचराई करत होते. (लूक ९:५९-६२) केवढी ही भयंकर चूक!

१४. जीवनाच्या चिंता आणि भौतिक अभिलाषा आपल्यावर ओझे कसे लादू शकतात?

१४ खबरदारी न घेतल्यास आज तीच चूक आपणही करू शकतो. येशूचे शिष्य होणे ही गोष्ट, जगिक लोक जसे आपल्या ध्येयांचा पाठलाग करतात आणि त्यांना महत्त्व देतात यापासून आपल्याला मुक्‍त करते. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला आणखी परिश्रमपूर्वक काम करावे लागत असले तरी, आपण या गोष्टींना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवत नाही. तरीही, जीवनाच्या चिंता आणि भौतिक सुखसोयींच्या आमिषाची आपल्यावर शक्‍तिशाली पकड बसू शकते. अशा इच्छांना अनुमती दिल्यास आपण उत्सुकतेने स्वीकारलेले सत्य दाबून टाकले जाऊ शकते. (मत्तय १३:२२) या इच्छांची पूर्ती करण्यासाठी आपण त्यामध्ये इतके गढून जात असू की ज्यामुळे आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्‍या कंटाळवाणी बंधने बनतात ज्यांना होईल तितक्या लवकर पार पाडून मोकळे व्हावे असे वाटते. देवाची सेवा अशा मनोवृत्तीने केली जात असल्यास, त्यापासून कोणताही विसावा मिळण्याची अपेक्षा आपण निश्‍चितच करू शकणार नाही.

१५. येशूने भौतिक अभिलाषांबद्दल कोणता इशारा दिला?

१५ येशूने दाखवले की समाधानाचे जीवन, आपल्या गरजा केवळ पूर्ण करण्यामुळे मिळत नाही तर जीवनातील अधिक महत्त्वाच्या गोष्टींची खातरी करण्यापासून मिळते. त्याने सल्ला दिला: “आपण काय खावे व काय प्यावे; आणि काय पांघरावे ह्‍याची चिंता करीत बसू नका. अन्‍नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही?” मग त्याने आकाशातील पाखरांकडे लक्ष आकर्षित करून म्हटले: “ती पेरणी करीत नाहीत, कापणी करीत नाहीत की कोठारात साठवीत नाहीत; तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो.” रानातील फुलांचा उल्लेख करून त्याने पुढे म्हटले: “ती कष्ट करीत नाहीत व सूत कातीत नाहीत; तरी मी तुम्हांस सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारिखा सजला नव्हता.”—मत्तय ६:२५-२९.

१६. भौतिक गोष्टींसाठी केलेल्या पाठलागाच्या परिणामांबद्दल अनुभवाने काय दाखवले आहे?

१६ या सोप्या वस्तुपाठापासून आपण काही शिकू शकतो का? एखादी व्यक्‍ती भौतिकरित्या जीवन सुधारण्यासाठी जितकी अधिक झटते तितकी जगिक उद्योगधंद्यात अधिक गुंतते आणि तिच्या खांद्यावरील ओझे अधिकच जड होत जाते. हे जग व्यावसायिक लोकांनी भरलेले आहे ज्यांनी भौतिक यश मिळवण्यासाठी मोडकळीस आलेली कुटुंबे, तुटलेले विवाह, बिघडलेले आरोग्य आणि इतर गोष्टींची किंमत दिली आहे. (लूक ९:२५; १ तीमथ्य ६:९, १०) नोबल पारितोषिकाचे मानकरी अल्बर्ट आइनस्टाईन यांनी एकदा म्हटले: “संपत्ती, बाहेरील यशप्राप्ती, प्रसिद्धी, ऐषआराम—मला या गोष्टी नेहमीच तिरस्करणीय वाटल्या आहेत. माझा विश्‍वास आहे की प्रत्येकासाठी साधी आणि नम्र जीवन पद्धत उत्तम आहे.” हे विधान प्रेषित पौलाच्या साध्या सल्ल्याचे केवळ पुनरुच्चार करतात: “चित्तसमाधानासह [ईश्‍वरी] भक्‍ति हा तर मोठाच लाभ आहे.”—१ तीमथ्य ६:६.

१७. बायबल कोणत्या प्रकारच्या जीवनशैलीची शिफारस करते?

१७ आपण दुर्लक्ष करू नये असा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. “साधी आणि नम्र जीवन पद्धत” याचे अनेक फायदे असले तरी, केवळ यामुळेच समाधान मिळत नाही. असे अनेक लोक आहेत ज्यांची जीवनशैली परिस्थितीच्या दबावामुळे साधी असली तरी ते कदापि समाधानी किंवा आनंदी नाहीत. बायबल आपल्याला भौतिक गोष्टींचा आनंद घेण्याचे सोडून वैराग्याचे जीवन जगण्याचे आर्जवत नाही. चित्तसमाधानावर नव्हे, तर ईश्‍वरी भक्‍तीवर जोर दिला आहे. या दोन्ही गोष्टींना एकत्र केल्यावरच आपल्याला ‘मोठा लाभ आहे.’ कोणता लाभ? त्याच पत्रात पुढे पौल, ज्यांनी ‘आपली आशा चंचल धनावर नव्हे तर देवावर ठेवली आहे’ ते “खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी,” करतील असे दाखवतो.—१ तीमथ्य ६:१७-१९.

१८. (अ) एखाद्याला खरा विसावा कसा मिळू शकतो? (ब) आपल्याला कराव्या लागणाऱ्‍या बदलांकडे आपण कसे पाहावयास हवे?

१८ आपण वैयक्‍तिकरित्या वाहत असलेले जड ओझे खाली ठेवून येशू देत असलेले हलके ओझे घेण्यास शिकलो तर आपल्याला विसावा मिळेल. राज्य सेवेत पूर्ण रीतीने भाग घेता येण्यासाठी आपले जीवन सुसंघटीत केलेल्या पुष्कळांना आनंदी आणि समाधानी जीवनाचा मार्ग सापडला आहे. अर्थातच, असे करण्यासाठी एखाद्याला विश्‍वास आणि धैर्य लागते तसेच मार्गावर अनेक अडथळे असू शकतील. परंतु, बायबल आपल्याला आठवण करून देते: “जो वारा पाहत राहतो तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो तो कापणी करणार नाही.” (उपदेशक ११:४) खरे पाहता, आपण आपल्या मनाशी निश्‍चय केल्यास अनेक गोष्टी कठीण नाहीत. सर्वात कठीण कार्य म्हणजे, आपले मन तयार करणे होय. आपण कठीण कार्याविरूद्ध लढा देऊन किंवा या कल्पनेचा विरोध करून स्वतः थकून जाऊ. आपण मानसिक तयारी केली आणि आव्हान स्वीकारले, तर हा केवढा आशीर्वाद ठरेल हे पाहून आपल्याला कदाचित आश्‍चर्य वाटेल. स्तोत्रकर्त्याने आर्जवले: “परमेश्‍वर [यहोवा] किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा.”—स्तोत्र ३४:८; १ पेत्र १:१३.

“तुमच्या जिवास विसावा”

१९. (अ) जगिक परिस्थितींचा ऱ्‍हास होत असता, आपण कशाची अपेक्षा करू शकतो? (ब) येशूच्या जुवाखाली असताना आपल्याला कशाची हमी देण्यात आली आहे?

१९ प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील शिष्यांना आठवण करून दिली: “आपणाला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.” (प्रेषितांची कृत्ये १४:२२) आजही ते सत्य आहे. जागतिक परिस्थितींचा ऱ्‍हास होत असता, धार्मिकता आणि ईश्‍वरी भक्‍तीने जीवन व्यतीत करू पाहणाऱ्‍या सर्वांवर अधिक दबाव येतील. (२ तीमथ्य ३:१२; प्रकटीकरण १३:१६, १७) तरीपण, आपल्याला पौलाने जे म्हटले त्याप्रमाणेच वाटते, त्याने म्हटले: ‘आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही; आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही; आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही; आम्ही खाली पडलेले आहो तरी आमचा नाश झाला नाही.’ याचे कारण, पराकोटीचे सामर्थ्य देण्यासाठी आपण येशू ख्रिस्तावर अवलंबून राहू शकतो हे आहे. (२ करिंथकर ४:७-९) शिष्यत्वाच्या जबाबदारीच्या जुवाचा संपूर्ण अंतःकरणाने स्वीकार करून, “तुमच्या जिवास विसावा मिळेल,” येशूच्या या अभिवचनाच्या पूर्णतेचा आनंद घेऊ.—मत्तय ११:२९.

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल?

◻ येशूने दिलेले सोयीचे जू काय आहे?

◻ आपल्या जुवाचे ओझे अधिक होत असल्याचे वाटल्यास आपण काय करावे?

◻ येशूने, “माझे ओझे हलके आहे,” असे म्हटले तेव्हा त्याचा अर्थ काय होता?

◻ आपले ओझे हलकेच राहील याची खातरी आपण कशी करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा