वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ६/१५ पृ. ५-८
  • संपूर्ण जगभरात द्वेषाचा अंत

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • संपूर्ण जगभरात द्वेषाचा अंत
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • छळछावणीमध्ये द्वेषावर विजय मिळवणे
  • द्वेष करण्याचा समय
  • द्वेषरहित जग
  • द्वेषाचा कधी अंत होईल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • द्वेषाचं हे चक्र का सुरू आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • लवकरच द्वेष कायमचा संपेल!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
  • आपण द्वेषावर विजय मिळवू शकतो!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ६/१५ पृ. ५-८

संपूर्ण जगभरात द्वेषाचा अंत

सुमारे दोन हजार वर्षांआधी, एक लहानसा गट द्वेषाला बळी पडला होता. आरंभीच्या ख्रिश्‍चनांबद्दल रोमी लोकांच्या सार्वत्रिक मनोवृत्तीचे वर्णन टर्टुलियन अशाप्रकारे देतात: “आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली नाही अथवा भूमिकंप झाला, अन्‍नटंचाई किंवा रोगराईची साथ आली तर, ‘सर्व ख्रिश्‍चनांना सिंहापुढे टाका!’ असा लगेचच आरडाओरडा होत असे!”

द्वेषाला बळी पडूनही, आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी या अन्यायाचा बदला घेण्याचा मोह टाळला. येशू ख्रिस्त त्याच्या डोंगरावरील प्रसिद्ध प्रवचनात म्हणाला: “‘आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीति कर व आपल्या वैऱ्‍याचा द्वेष कर,’ असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्‍यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.”—मत्तय ५:४३, ४४.

‘शत्रूचा द्वेष करणे’ उचित गोष्ट होती असे यहूद्यांच्या मौखिक सांप्रदायात मानले जात होते. परंतु आपण केवळ आपल्या मित्रावर प्रीती करू नये तर शत्रूवरही करावी असे येशूने म्हटले. हे कठीण आहे जरूर, पण अशक्य नाही. शत्रूवर प्रीती करण्याचा अर्थ त्याच्या सर्व मार्गांची किंवा कृत्यांची आवड बाळगणे असा होत नाही. मत्तयाच्या अहवालात आढळलेला ग्रीक शब्द अ·गाʹपे, यातून तयार झाला आहे जो तत्त्वाच्या सुसंगतेत कृती करणाऱ्‍या प्रीतीचे वर्णन करतो. जी व्यक्‍ती अ·गाʹपे, म्हणजेच तत्त्वावर आधारित प्रीती प्रदर्शित करते ती, आपला द्वेष करणाऱ्‍या व आपल्याला गैरवागणूक देणाऱ्‍या शत्रूसोबतही चांगली वागते. का बरे? कारण हाच ख्रिस्ताला अनुसरण्याचा आणि द्वेषावर विजय मिळवण्याचा मार्ग आहे. एका ग्रीक विद्वानाने असे निरीक्षण केले: “[अ·गाʹपे] आपल्याला क्रोध आणि कटुताकडे आपली जी स्वाभाविक ओढ असते त्यावर विजय मिळवण्यास मदत करते.” परंतु ही गोष्ट द्वेषाने भरलेल्या आजच्या जगात कामी येईल का?

ख्रिस्ती असल्याचा दावा करणारे सर्वच ख्रिस्ताचे उदाहरण अनुसरण्याचा निश्‍चय करत नाहीत हे सर्वमान्य आहे. रवांडातील अलीकडचे अत्याचार, अशा जातीय गटांनी केले ज्याचे बहुतेक सदस्य ख्रिस्ती असल्याचा दावा करत होते. २० वर्षांपर्यंत रवांडात काम करणाऱ्‍या पिलॉर डिझ एस्पेलोसीन नावाच्या एका रोमन कॅथलिक ननने एक घटना आठवून सांगितली. एक माणूस हातात भाला घेऊन चर्चजवळ आला. तेव्हा तिने त्याला विचारले: “तू लोकांना ठार मारत काय चालला आहेस? तू ख्रिस्ताचा विचार करत नाहीस का?” तेव्हा तो म्हणाला की तो विचार करतो, आणि तो सरळ चर्चमध्ये गेला आणि गुडघे टेकून कळकळीने प्रार्थना करू लागला. परंतु प्रार्थना संपल्यावर तो लोकांची पुन्हा कत्तल करत निघून गेला. “आपण शुभवर्तमान योग्य प्रकारे शिकवत नाही हे यावरून दिसून येते” असे ती नन कबूल करते. पण येशूचा संदेश अपुरा आहे असा या अपयशांचा अर्थ होत नाही. खऱ्‍या ख्रिस्ती विश्‍वासाचे आचरण करणारे द्वेषावर विजय मिळवू शकतात.

छळछावणीमध्ये द्वेषावर विजय मिळवणे

मॅक्स लिबस्टर एक स्वाभाविक यहुदी आहे जो दुसऱ्‍या महायुद्धादरम्यान झालेल्या सर्वनाशातून बचावला. त्याच्या आडनावाचा अर्थ “प्रिय” असा होत असला तरी त्याने जादा प्रमाणात द्वेष पाहिला आहे. नात्सी जर्मनीत प्रीती आणि द्वेष याबद्दल तो काय शिकला त्याचे तो वर्णन करतो.

“सन १९३० च्या दशका दरम्यान मॅनहिम, जर्मनीजवळ मी लहानाचा मोठा झालो. सर्व यहुदी, भरमसाट फायदा मिळवणारे श्रीमंत व्यापारी होते व ते जर्मन लोकांची पिळवणूक करत होते असा हिटलरने दावा केला. परंतु सत्य परिस्थिती अशी होती की माझे वडील एक गरीब चर्मकार होते. तथापि, नात्सी प्रचाराच्या प्रभावामुळे आमचे शेजारी आमच्याशी वैरभावाने वागू लागले. मी किशोरावस्थेत होतो तेव्हा तर एका गावकऱ्‍याने माझ्या कपाळावर जबरदस्तीने डुकराचे रक्‍त फासले. हा घोर अपमान पुढे आमच्यावर जे गुदरणार होते त्याची केवळ आगामी झलक होती. सन १९३९ मध्ये मला गेस्टापोंनी अटक केली आणि माझे सर्व सामान जप्त केले.

“जानेवारी १९४० पासून मे १९४५ पर्यंत मी झॉकसनहाऊसन, नॉइन्गॅमे, ऑश्‍वीट्‌स, बुनॉ आणि बुशेनवाल्ड या पाच वेगवेगळ्या छळछावण्यांमध्ये जीवन जगण्यास झटत होतो. माझ्या वडिलांना सुद्धा झॉकसनहाऊसन येथे पाठवण्यात आले होते आणि १९४० च्या भयंकर हिवाळ्यात त्यांचा मृत्यू झाला. मी माझ्या हातांनी त्यांचा मृतदेह दहनभूमीपर्यंत उचलून नेला, आणि तेथे मी पाहिले की जाळण्यासाठी मृतदेहांचा ढीग लागला होता. माझ्या कुटुंबातील एकूण आठ जणांचा छावण्यांमध्ये मृत्यू झाला.

“कैद्यांपैकी कॉपोस यांचा, एसएस गार्डपेक्षा अधिक द्वेष करण्यात येत होता. कॉपोस, एसएस गाड्‌र्सना सहकार्य देणारे कैदी होते आणि म्हणून त्यांना विशिष्ट सवलती मिळत होत्या. त्यांना अन्‍न वितरणाच्या कामावर देखरेख करण्यासाठी नेमण्यात आले होते, शिवाय ते इतर कैद्यांना क्रूरतेने मारत असत. बहुधा ते अनुचितपणे व मनाला येईल तसे वागत असत. एसएस गार्ड आणि कॉपोस या दोघांचा द्वेष करण्यासाठी माझ्याकडे पुष्कळ कारण होते असे मला वाटत होते, परंतु प्रीती द्वेषापेक्षा अधिक शक्‍तिशाली आहे ही गोष्ट मी माझ्या तुरुंगवासात शिकलो.

“यहोवाचे साक्षीदार असलेल्या धैर्यशील कैद्यांनी, त्यांचा विश्‍वास शास्त्रवचनांवर आधारित असल्याची मला खात्री पटवून दिली—म्हणून मी स्वतः एक साक्षीदार झालो. नॉइन्गॅमे छळछावणीत मला भेटलेल्या अर्नस्ट वॉऊअर या साक्षीदाराने मला ख्रिस्ताची मानसिक वृत्ती विकसित करण्यास आर्जवून सांगितले. ‘त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले,’ असे बायबल म्हणते. (१ पेत्र २:२३) मीही तेच करण्याचा प्रयत्न केला, सर्वांचा शास्ता असलेल्या देवाच्या हाती बदला घेण्याचे सोपवून दिले.

“लोक अनेक वेळा अजाणतेत वाईट गोष्टी करतात हे मी छावण्यांमध्ये जितक्या वर्षांसाठी होतो त्याकाळात शिकलो. सर्वच एसएस गार्ड वाईट नव्हते—एकाने तर माझा जीव वाचवला. मला एकदा अतिसार होत होते आणि मी जेथे काम करत होतो तेथून छावणीपर्यंत चालण्यासाठी माझ्यामध्ये त्राण उरले नव्हते. दुसऱ्‍या दिवशी सकाळी मला ऑश्‍वीटस्‌च्या वायू कक्षात पाठवले जाणार होते, पण मी जर्मनीच्या ज्या भागात राहत होतो तिथलाच एक एसएस गार्ड होता आणि तो माझ्यावतीने गेला. त्याने एसएस कॅफेटेरियामध्ये माझ्या कामाची व्यवस्था केली, आणि तेथे मी बरा होईपर्यंत थोडा आराम घेऊ शकलो. एके दिवशी त्याने आपल्या मनातली गोष्ट मला सांगितली: ‘मॅक्स मला वाटते, की मी एका भरधाव आणि अनियंत्रित ट्रेनमध्ये आहे. मी उडी मारली तर ठार होईन. आणि ट्रेनमध्येच राहिलो तरी माझा चक्काचूर होईल!’

“माझ्याप्रमाणेच ह्‍या लोकांनाही प्रीती हवी होती. खरे पाहता, प्रीती, दया आणि देवावरील माझ्या विश्‍वासाने या पीडादायक परिस्थितीला व वध होण्याच्या रोजच्या भीतीला तोंड देण्यास मदत दिली. मी काहीही इजा न होता वाचलो असे मुळीच म्हणू शकत नाही, परंतु माझे भावनिक व्रण फार कमी आहेत.”

मॅक्स ५० वर्षांनंतर आता देखील जो उबदारपणा व कृपाळुपणा प्रदर्शित करतो त्यावरून त्याच्या शब्दातील जोरदारपणा खरा असल्याचे सूचित होते. मॅक्सचा अनुभव असाधारण नाही. द्वेषावर मात करण्यासाठी त्याच्याजवळ एक ठोस कारण होते—त्याला ख्रिस्ताचे अनुकरण करायचे होते. ज्या इतरांच्या जीवनाला शास्त्रवचनांनी मार्गदर्शित केले त्यांनी अशाच प्रकारे कृती केली आहे. फ्रान्समधील एक यहोवाची साक्षीदार जिचे नाव सिमोन आहे, ती निःस्वार्थ प्रीतीचा काय अर्थ होतो हे कसे शिकली त्याचे वर्णन करते.

“दुसरे महायुद्ध सुरू होण्याच्या काही काळाआधी माझी आई एमा, साक्षीदार झाली आणि तिने मला, लोक त्यांच्या अज्ञानामुळे बहुधा वाईट कामे करतात असे शिकवले. आपण त्यांचा उलट द्वेष केला तर आपण खरे ख्रिस्ती नाही, कारण आपण आपल्या शत्रूंवर प्रीती व आपला छळ करणाऱ्‍यांसाठी प्रार्थना केली पाहिजे असे येशूने म्हटल्याचे तिने मला सांगितले.—मत्तय ५:४४.

“या मताला परीक्षेत पाडणारी एक अगदी खडतर परिस्थिती मला आठवते. नात्सी सैन्याने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा, आईने आमच्या इमारतीत राहणाऱ्‍या एका शेजारणीकडून पुष्कळ त्रास सहन केला. तिने आईचे नाव गेस्टापोंना सांगितले आणि त्यामुळे माझ्या आईला जर्मन छळछावण्यांमध्ये जवळजवळ दोन वर्षे घालवावी लागली. तेथे तिची तब्येत इतकी बिघडली की ती अक्षरशः मरायला टेकली होती. युद्धानंतर फ्रेंच पोलिसांनी आईला सही करण्यासाठी एक कागद दिला ज्यावर, तिला त्रास देणारी ती स्त्री जर्मन सहयोगी होती असे लिहिले होते. परंतु माझ्या आईने ‘देव शास्ता आहे आणि चांगल्या किंवा वाईटासाठी प्रतिफळ देणारा आहे’ असे म्हणून सही करण्यास नकार दिला. काही वर्षांनंतर त्याच शेजारणीला प्राणघातक कर्क झाला. तिच्या या दुर्दैवावर आनंदी होण्याऐवजी माझ्या आईने त्या स्त्रीच्या उरलेल्या शेवटल्या महिन्यांमध्ये तिला होता होईल तितकी मदत केली. द्वेषावर मिळवलेला हा विजय मी कधीच विसरणार नाही.”

ही दोन उदाहरणे, अन्यायाला तोंड देत असताना तत्त्वावर आधारित असलेल्या प्रीतीचे सामर्थ्य प्रदर्शित करतात. परंतु “प्रेम करण्याचा समय व द्वेष करण्याचा समय” असतो असे बायबल स्वतः म्हणते. (उपदेशक ३:१, ८) ते कसे होऊ शकते?

द्वेष करण्याचा समय

देव सर्व प्रकारच्या द्वेषाचा नकार करत नाही. येशू ख्रिस्ताविषयी बायबल म्हणते: “तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे.” (इब्रीयांस १:९) परंतु, वाईटाचा द्वेष करणे आणि जी व्यक्‍ती वाईट कृत्ये करते तिचा द्वेष करणे यामध्ये पुष्कळ फरक आहे.

येशूने प्रीती आणि द्वेष यामधील योग्य समतोलपणाचे उदाहरण ठेवले. त्याने दांभिकपणाचा द्वेष केला परंतु दांभिक लोकांची विचारसरणी बदलविण्यासाठी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. (मत्तय २३:२७, २८; लूक ७:३६-५०) त्याने हिंसेचा धिक्कार केला, परंतु त्याला ठार मारणाऱ्‍यांसाठी त्याने प्रार्थना केली. (मत्तय २६:५२; लूक २३:३४) जगाने विनाकारण त्याचा द्वेष केला तरी जगाला जीवन प्राप्त व्हावे म्हणून त्याने आपले स्वतःचे जीवन अर्पण केले. (योहान ६:३३, ५१; १५:१८, २५) त्याने आपल्यासाठी तत्त्वावर आधारित प्रीती आणि ईश्‍वरी द्वेष याचे परिपूर्ण उदाहरण मांडले.

अन्यायाने येशूमध्ये ज्याप्रमाणे व्यावहारिक संताप उत्तेजित केला त्याप्रमाणे तो आपल्यामध्येही उत्तेजित करू शकतो. (लूक १९:४५, ४६) परंतु ख्रिश्‍चनांना स्वतः बदला घेण्याचा काहीच अधिकार नाही. पौलाने रोममधील ख्रिश्‍चनांना सल्ला दिला: “वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. . . . सूड उगवू नका . . . वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्‍याने वाईटाला जिंक.” (रोमकर १२:१७-२१) आपण व्यक्‍तिगतरीत्या द्वेष बाळगण्यास किंवा बदला घेण्यास नकार देतो तेव्हा प्रीती विजय मिळवते.

द्वेषरहित जग

जगव्याप्त प्रमाणावर द्वेष नाहीसा होण्यासाठी लाखो लोकांच्या मनात खोलवर रूजलेली मनोवृत्ती बदलली पाहिजे. ते कसे साध्य केले जाऊ शकते? प्राध्यापक एरवन स्टुब पुढील प्रमाणे शिफारस करतात: “आपण ज्यांना इजा पोहंचवतो त्यांचे अवमूल्यन करतो आणि ज्यांना मदत करतो त्यांचा आदर करतो. आपण मदत करणाऱ्‍यांबद्दल जितका उच्च आदर बाळगतो आणि मदत केल्याने मिळणारे समाधान अनुभवतो तेव्हा आपल्याला असेही दिसून येते, की आपण किती काळजी वाहणारे व साहाय्यकारी आहोत. इतरांचे भले करण्यात होता होईल तितका व्यापक भाग घेणारा समाज बनवणे हा आपला हेतू असला पाहिजे.”—दुष्टतेची मुळे (इंग्रजी).

दुसऱ्‍या शब्दात सांगायचे तर, द्वेष काढून टाकण्यासाठी एक असा समाज निर्माण होणे आवश्‍यक आहे ज्यामध्ये लोक एकमेकांना मदत करण्याद्वारे प्रीती करण्यास शिकतात, एक असा समाज जेथे लोक कलुषितपणा, राष्ट्रवाद, वंशवाद आणि जमातीवादामुळे होणारा वैरभाव विसरून जातात. अशा प्रकारचा समाज अस्तित्वात आहे का? चीनमधील सांस्कृतिक क्रांती दरम्यान व्यक्‍तिगतपणे द्वेषाला तोंड दिलेल्या एका माणसाच्या अनुभवाचा विचार करा.

“सांस्कृतिक क्रांती सुरू झाली तेव्हा, ‘वर्ग कलहात’ हातमिळवणी करण्यासाठी काही थारा नाही, असे आम्हाला शिकवण्यात आले. द्वेष तेव्हाची प्रबळ प्रवृत्ती होती. मी एक रेड गार्ड झालो आणि सगळीकडे—माझ्या स्वतःच्या कुटुंबात देखील वर्ग शत्रूंना शोधू लागलो. मी त्या वेळी केवळ किशोरवयीन असल्यामुळे घरांची झडती घेण्यात भाग घेऊ लागलो, त्यामध्ये आम्ही ‘प्रतिगामी कलाचा’ पुरावा शोधत होतो. मी एक जाहीर सभा देखील घेतली ज्यामध्ये ‘प्रतिक्रांतीकारकाचा’ धिक्कार करण्यात आला. अर्थात, हे आरोप अनेकवेळा राजकीय गोष्टींऐवजी व्यक्‍तिगत वैरभावावर आधारित असत.

मी अनेक लोकांना—तरुण आणि वृद्ध, पुरुष आणि स्त्रियांना—शारीरिक शिक्षा देताना पाहिले आणि ही शिक्षा दिवसानुदिवस अधिकच क्रूर होत गेली. शाळेतील माझे एक शिक्षक अतिशय चांगले होते परंतु त्यांची एका गुन्हेगाराप्रमाणे गल्लीतून मिरवणूक काढण्यात आली. दोन महिन्यांनंतर माझ्या शाळेतील आणखी एक शिक्षकांचा मृतदेह सुचाऊ नदीत सापडला आणि माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांना जबरदस्तीने गळफास घेण्यास लावले. हे सर्व पाहून मला धक्का बसला आणि मी गोंधळून गेलो. हे प्रेमळ लोक होते. आणि त्यांना असे वागवणे चुकीचे होते! म्हणून मी रेड गार्ड्‌स सोबतचा माझा सर्व संबंध तोडून टाकला.

संपूर्ण चीनला गिळून टाकणाऱ्‍या या द्वेषाच्या काळाची घटना एकच होती असे मला वाटत नाही. या शतकाने द्वेषाचे अनेक उद्रेक पाहिले आहेत. परंतु प्रेम द्वेषावर विजय मिळवू शकते याची मला खात्री पटली आहे. कारण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. मी यहोवाच्या साक्षीदारांसोबत सहवास करण्यास सुरवात केली तेव्हा, विविध वंशाच्या आणि पार्श्‍वभूमीच्या लोकांना खरी प्रीती दाखवत असलेले पाहून मी प्रभावीत झालो. बायबल एका अशा काळाचे अभिवचन देते जेव्हा सर्व लोकांना एकमेकांवर प्रेम करण्यास शिकवले जाईल आणि मी त्या काळाची वाट पाहून आहे.”

होय, यहोवाच्या साक्षीदारांची आंतरराष्ट्रीय संस्था, द्वेष पूर्णपणे नाहीसा केला जाऊ शकतो याचा ज्वलंत पुरावा आहे. त्यांची पार्श्‍वभूमी कोणतीही असो, साक्षीदार कलुषितपणाऐवजी परस्पर आदर निर्माण करण्यास व जमातीवाद, वंशवाद आणि राष्ट्रवादाचा कोणताही मागमूस काढून टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यांच्या यशाचा एक आधार, तत्त्वबद्ध प्रीती दाखवण्यामध्ये येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचा त्यांचा ठामनिश्‍चय हा आहे. दुसरा एक आधार म्हणजे, ते कोणत्याही अन्यायाला तोंड देत असले तरी त्याचा अंत करण्यासाठी देवाच्या राज्याची वाट पाहतात.

द्वेषरहित जग, जेथे द्वेष करण्यासाठी दुष्टता देखील नसेल असे जग साध्य करण्याचा एकमात्र उपाय देवाचे राज्य आहे. या स्वर्गीय सरकाराचे वर्णन बायबलमध्ये “नवे आकाश” असे केले आहे. हे सरकार अन्यायापासून मुक्‍त असलेल्या जगाची हमी देते. ते सरकार ‘नव्या पृथ्वीवर’ किंवा लोकांच्या एका नव्या समाजावर राज्य करील जेथे लोकांना एकमेकांवर प्रेम करण्यास शिकवलेले असेल. (२ पेत्र ३:१३; यशया ५४:१३) मॅक्स, सिमोन आणि इतर अनेकांचे अनुभव साक्ष देतात त्याप्रमाणे हे शिक्षण प्रगतीपथावर आहे. हे शिक्षण, द्वेष आणि त्याच्या कारणांना काढून टाकणाऱ्‍या जगव्याप्त कार्यक्रमाची एक झलक आहे.

यहोवाने त्याचा संदेष्टा यशया याच्याद्वारे परिणामांचे वर्णन अशाप्रकारे केले: “माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्‍वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यशया ११:९) देव स्वतः द्वेष थांबवील. तो खरोखरच प्रीती व्यक्‍त करण्याचा काळ असेल.

[७ पानांवरील चित्रं]

नात्सींनी मॅक्स लिब्स्टर यांच्या डाव्या हातावर कैदी नंबर गोंदला

[८ पानांवरील चित्रं]

लवकरच द्वेष गतकाळात जमा होईल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा