वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w95 ६/१ पृ. ६-१०
  • दुःखित असलो तरी आपण आशेविना नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दुःखित असलो तरी आपण आशेविना नाही
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत्यू मानवी कुटुंबात प्रवेश करतो
  • दुःख केलेले विश्‍वासू लोक
  • येशूच्या काळातील दुःख
  • मृतांसाठी कोणती आशा?
  • दुःख करणाऱ्‍यांसाठी व्यावहारिक मदत
  • मरण पावलेल्या तुमच्या प्रिय जनांसाठी खरी आशा
    बायबल नेमके काय शिकवते?
  • आपल्या मृत प्रियजनांचे काय होते?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • “तुझा भाऊ उठेल!”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?
    मृत प्रिय जनांसाठी कोणती आशा?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
w95 ६/१ पृ. ६-१०

दुःखित असलो तरी आपण आशेविना नाही

“झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्‍यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये.” —१ थेस्सलनीकाकर ४:१३.

१. मानवजात सर्वसामान्यपणे कशाचा अनुभव घेते?

तुम्ही तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्‍तीला मृत्यूमध्ये गमावले आहे का? आपल्यातील बहुतेक, कितीही वयाचे असोत, एखाद्या नातेवाईकाला किंवा मित्राला गमावल्यामुळे दुःखित झाले आहेत. कदाचित ते आजी आजोबा, पालक, वैवाहिकसोबती किंवा एखादे मूल असेल. वार्धक्य, आजारपण आणि अपघात नेहमीच मृत्यूला कारणीभूत ठरतात. गुन्हेगारी, हिंसा व युद्धे, पीडा आणि दुःखात आणखी भर घालतात. संपूर्ण जगभरात दरवर्षी, सरासरी पाच कोटी पेक्षा अधिक लोक मरण पावतात. सन १९९३ ची दररोजची सरासरी १,४०,२५० इतकी होती. मृत्युमुळे होणाऱ्‍या नुकसानीचा परिणाम मित्रांवर आणि कुटुंबावर होतो आणि मुकल्याची भावना अनावर होते.

२. मुलांचा मृत्यू होणे हे सामान्य का नाही?

२ कॅलिफोर्निया, अमेरिका येथील एका पालकांनी त्यांच्या गरोदर असलेल्या मुलीला एका विचित्र कार अपघातात गमावले म्हणून त्यांच्याविषयी आपण सहानुभूती दाखवू नये का? एका झटक्यातच त्यांनी त्यांची एकुलती एक मुलगी आणि जन्माला येण्यापूर्वीच त्यांचे पहिले नातवंड गमावले. बळी पडलेल्याच्या पतीने त्याची पत्नी आणि त्याच्या पहिल्या मुलाला की मुलीला गमावले. मूल लहान असो किंवा मोठे, पालकांना ते गमावण्याचे दुःख अनैसर्गिक असते. पालकांच्या आधी मुलांचा मृत्यू असामान्य आहे. आपल्या सर्वांना जीवन आवडते. म्हणूनच मृत्यू खरोखर एक शत्रू आहे.—१ करिंथकर १५:२६.

मृत्यू मानवी कुटुंबात प्रवेश करतो

३. हाबेलाच्या मृत्यूचा आदाम व हव्वेवर कसा परिणाम झाला असेल?

३ आपले पहिले मानवी पालक, आदाम व हव्वा यांनी बंड केल्यापासून पाप आणि मृत्यूने, मानवी इतिहासाच्या सुमारे सहा हजार वर्षांपासून राजांप्रमाणे राज्य केले आहे. (रोमकर ५:१४; ६:१२, २३) त्यांनी, त्यांचा पुत्र हाबेलाचा त्याच्या भावाने, काईनाने केलेल्या खूनाबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली त्याबद्दल बायबल आपल्याला काही सांगत नाही. अनेक कारणांसाठी, तो त्यांच्यासाठी हानीकारक अनुभव असेल. येथे, सर्वात प्रथम त्यांनी त्यांच्या पोटच्या पुत्राच्या चेहऱ्‍यावर, मानवी मृत्यूच्या वास्तविकतेचे प्रतिबिंब प्रत्यक्षात पाहिले. त्यांनी त्यांच्या बंडाचे आणि सातत्याने इच्छा स्वातंत्र्याच्या दुरूपयोगाचे प्रतिफळ पाहिले. काईनाला देवाकडून ताकीद मिळाली होती तरी त्याने भ्रातृहत्या करण्याचे निवडले. हाबेलच्या मृत्यूचा हव्वेवर बराच खोल परिणाम झाला असावा कारण शेथाला जन्म देतेवेळी ती म्हणाली: “काइनाने हाबेलाचा घात केला म्हणून देवाने त्याच्या जागी मला दुसरे अपत्य दिले आहे.”—उत्पत्ती ४:३-८, २५.

४. जीवाच्या अमरत्वाच्या दंतकथेने हाबेलाच्या मृत्यूनंतर काहीच सांत्वन कसे पुरवले नसावे?

४ आपल्या पहिल्या मानवी पालकांनी देवाने त्यांना ठोठावलेल्या शिक्षेची वास्तविकता देखील पाहिली—त्यांनी बंड व आज्ञाभंग केल्यास, ते ‘खचित मरतील.’ सैतानाने लबाडी केली असतानाही, जीवाच्या अमरत्वाची दंतकथा अद्याप विकसित झाली नव्हती; यास्तव त्यांना त्यातून कोणतेही खोटे सांत्वन प्राप्त होऊ शकले नाही. देवाने आदामाला म्हटले: “तू . . . अंती पुनः मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे, तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” भविष्यामध्ये, स्वर्ग, नरक, लिंबो, परगेटरी किंवा आणखी कोठेही अमर जीव म्हणून अस्तित्वात राहण्याचा त्याने उल्लेख केला नाही. (उत्पत्ती २:१७; ३:४, ५, १९) आदाम आणि हव्वेने जिवंत जीव या नात्याने पाप केल्यामुळे कालांतराने ते मृत होऊन अस्तित्वविरहीत होतील. राजा शलमोनाला असे लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ती व्हावयाची नसते; त्यांचे स्मरण कोणास राहत नाही. त्यांचे प्रेम, त्यांचे वैर व त्यांचा हेवादावा ही नष्ट होऊन गेली आहेत; ह्‍या भूतलावरील व्यवहारात त्यांचा भाग कधीहि असणार नाही.”—उपदेशक ९:५, ६.

५. मृतांसाठी खरी आशा कोणती आहे?

५ हे शब्द किती खरे आहेत! खरेच, दोनशे किंवा तीनशे वर्षांआधीचे पूर्वज कोणाच्या लक्षात राहू शकतील? त्यांच्या कबरा कोणाला माहीत देखील नसतात किंवा त्यांच्याकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. मग आपल्या मृत प्रियजनांसाठी काही आशा नाही असा याचा अर्थ होतो का? नाही, मुळीच नाही. मार्थाने तिचा मृत भाऊ लाजर याच्याविषयी येशूला म्हटले: “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानासमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” (योहान ११:२४) इब्री लोकांचा विश्‍वास होता की देव भविष्यकाळात मृतांना पुनरुत्थित करील. परंतु, यामुळे त्यांनी एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू झाल्यावर दुःख करण्याचे थांबवले नाही.—ईयोब १४:१३.

दुःख केलेले विश्‍वासू लोक

६, ७. अब्राहाम व याकोब या दोघांनी मृत्यूबद्दल कशी प्रतिक्रिया दाखवली?

६ सुमारे चार हजार वर्षांपूर्वी, अब्राहामाची पत्नी सारा मरण पावली तेव्हा “अब्राहाम तिजसाठी शोक व विलाप करण्यास आला.” देवाच्या त्या विश्‍वासू सेवकाने त्याची प्रिय व निष्ठावान पत्नी गमावल्यामुळे तीव्र भावना व्यक्‍त केल्या. तो एक शूरवीर होता तरीदेखील, अश्रू ढाळून त्याचे दुःख व्यक्‍त करण्यास त्याला लाज वाटली नाही.—उत्पत्ती १४:११-१६; २३:१, २.

७ याकोबाची परिस्थिती देखील अशीच होती. त्याचा पुत्र योसेफ याला जंगली प्राण्याने ठार मारले असा विश्‍वास ठेवण्यास त्याची फसवणूक केली तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? आपण उत्पत्ती ३७:३४, ३५ मध्ये वाचतो: “तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणताट गुंडाळिले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस दुःख केले. त्याचे मुलगे व मुली ही सर्व त्याचे सांत्वन करावयास त्याच्याजवळ गेली, पण तो काही केल्या समाधान न पावता म्हणाला, मी शोक करीत करीत अधोलोकी आपल्या मुलाकडे जाईन. असा त्याच्या बापाने त्याजसाठी शोक केला.” होय, एखादी प्रिय व्यक्‍ती मरण पावते तेव्हा दुःख व्यक्‍त करणे मानवी व स्वाभाविक आहे.

८. इब्री लोक त्यांचे दुःख बहुधा कसे व्यक्‍त करीत?

८ आधुनिक किंवा स्थानिक रीतीरिवाजांप्रमाणे याकोबाची प्रतिक्रिया अतिशयोक्‍ती व प्रक्षोभक होती असा काही जण विचार करतील. परंतु तो एका वेगळ्या काळात व संस्कृतीत वाढला होता. दुःख व्यक्‍त करण्याची त्याची अभिव्यक्‍ती, म्हणजे गोणताट गुंडाळण्याच्या अशा पद्धतीचा बायबलमध्ये पहिल्यांदाच उल्लेख करण्यात आला आहे. परंतु, इब्री शास्त्रवचनांमध्ये वर्णिल्याप्रमाणे दुःख, आक्रोश करून, शोकगीत तयार करून व राखेत बसून व्यक्‍त केले जात होते. उपलब्ध असलेल्या पुराव्यानुसार, इब्री लोकांना त्यांचे वास्तविक दुःख व्यक्‍त करण्यासाठी मनाई नव्हती.a—यहेज्केल २७:३०-३२; आमोस ८:१०.

येशूच्या काळातील दुःख

९, १०. (अ) येशूने लाजरच्या मृत्यूवर कशी प्रतिक्रिया दर्शवली? (ब) येशूची प्रतिक्रिया आपल्याला त्याच्याविषयी काय सांगते?

९ येशूच्या आरंभीच्या शिष्यांविषयी आपण काय म्हणू शकतो? उदाहरणार्थ, लाजरचा मृत्यू झाला तेव्हा मार्था व मरीया या त्याच्या बहिणींनी अश्रू ढाळून दुःख केले. परिपूर्ण मनुष्य येशू घटनास्थळी पोहंचला तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? योहानाचा अहवाल सांगतो: “येशू होता तेथे मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला, आणि म्हणाला तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे? ते त्याला म्हणाले, प्रभुजी, येऊन पाहा. येशू रडला.”—योहान ११:३२-३५.

१० “येशू रडला.” हे शब्दच येशूच्या मानवतेचा, त्याच्या सहानुभूतीचा आणि भावनांचा भरपूर पुरावा देतात. पुनरुत्थानाच्या आशेची पूर्ण जाणीव असतानाही “येशू रडला.” (योहान ११:३५) प्रेक्षकांच्या उद्‌गाराविषयी तोच अहवाल पुढे म्हणतो: “पाहा, ह्‍याचे त्याच्यावर [लाजरावर] कितीतरी प्रेम होते!” खरेच, परिपूर्ण मनुष्य येशू एका मित्रासाठी रडला तर आज एका स्त्रीने किंवा पुरुषाने दुःख करणे किंवा रडणे यात लाजिरवाणे असे काही नाही.—योहान ११:३६.

मृतांसाठी कोणती आशा?

११. (अ) दुःख करण्याच्या बायबलमधील उदाहरणांपासून आपण काय शिकतो? (ब) आशा नसलेल्यांप्रमाणे आपण दुःख का करीत नाही?

११ बायबलमधील या उदाहरणांतून आपण काय शिकू शकतो? दुःख करणे साहजिक व स्वाभाविक आहे आणि आपल्याला दुःख व्यक्‍त करण्याची लाज वाटू नये. पुनरुत्थानाच्या आशेने आपले दुःख सुसह्‍य केले असले तरी, एखाद्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू अविस्मरणीय नुकसान आहे ज्याचा खोलवर परिणाम होतो. अनेक वर्षांच्या किंवा दशकांच्या निकट सहवासाचा वा सहभागितेचा अचानक व दुःखद अंत होतो. आशा नसलेल्यांप्रमाणे किंवा खोटी आशा बाळगणाऱ्‍यांप्रमाणे आपण दुःख करत नाही हे खरे आहे. (१ थेस्सलनीकाकर ४:१३) तसेच, आपण मानवाचा जीव अमर असतो किंवा पुनर्जन्माद्वारे तो पुन्हा अस्तित्वात येतो यासारख्या कोणत्याही दंतकथांमुळे ठकवले जात नाही. यहोवाने ‘नीतिमत्व वास करिते अशा नव्या आकाशाचे व नव्या पृथ्वीचे’ अभिवचन दिले आहे हे आपल्याला ठाऊक आहे. (२ पेत्र ३:१३) देव “[आपल्या] डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.

१२. पौलाने पुनरुत्थानावरील त्याचा विश्‍वास कसा प्रकट केला?

१२ मृतांसाठी कोणती आशा आहे?b ख्रिस्ती लेखक पौल याला आपल्याला सांत्वन आणि आशा देण्यासाठी प्रेरणा मिळाली तेव्हा त्याने असे लिहिले: “जो शेवटला शत्रु नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.” (१ करिंथकर १५:२६) द न्यू इंग्लिश बायबल म्हणते: “सरतेशेवटी जो शत्रू नष्ट केला जाईल तो मृत्यू आहे.” पौलाला त्याची इतकी खात्री का होती? कारण मृतातून उठलेल्या येशू ख्रिस्ताने त्याचे मतांतर केले होते व त्याला शिक्षण दिले होते. (प्रेषितांची कृत्ये ९:३-१९) म्हणूनच पौल हे देखील म्हणू शकला: “कारण मनुष्याच्या [आदामाच्या] द्वारे मरण आहे, म्हणून मनुष्याच्या [येशूच्या] द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानहि आहे. कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील.”—१ करिंथकर १५:२१, २२.

१३. लाजरचे पुनरुत्थान समक्ष पाहिलेल्यांनी कशी प्रतिक्रिया दाखवली?

१३ येशूची शिकवण आपल्याला पुष्कळ सांत्वन आणि भवितव्यासाठी आशा पुरवते. उदाहरणार्थ, लाजरच्या बाबतीत त्याने काय केले? लाजरचे शरीर चार दिवसांसाठी जेथे होते त्या थडग्याजवळ तो गेला. त्याने प्रार्थना केली व असे बोलून “मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रूमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले ह्‍याला मोकळे करून जाऊ द्या.” मार्था व मरीयेच्या चेहऱ्‍यावर उमटलेले आश्‍चर्याचे आणि आनंदाचे भाव यांची तुम्ही कल्पना करू शकता का? हा चमत्कार पाहिल्यावर शेजाऱ्‍यांना किती आश्‍चर्य वाटले असेल! म्हणूनच तर पुष्कळ प्रेक्षकांनी येशूवर विश्‍वास ठेवला. परंतु, त्याचे धार्मिक शत्रू त्याला “जिवे मारण्याचा आपसात निश्‍चय” करू लागले.—योहान ११:४१-५३.

१४. लाजरचे पुनरुत्थान कशाचे सूचक होते?

१४ येशूने ते अविस्मरणीय पुनरुत्थान अनेक लोकांच्या समक्ष केले. “ह्‍याविषयी आश्‍चर्य करू नका; कारण कबरेतील सर्व माणसे त्याची [देवाच्या पुत्राची] वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे,” असे येशूने आधीच्या प्रसंगी भाकीत केलेल्या भविष्यावाणीतील पुनरुत्थानाची ही सूचकता होती.—योहान ५:२८, २९.

१५. पौल व हनन्याकडे येशूच्या पुनरुत्थानाचा कोणता पुरावा होता?

१५ आधी उल्लेख केल्याप्रमाणे, प्रेषित पौलाचा पुनरुत्थानावर विश्‍वास होता. कोणत्या आधारावर? तो पूर्वी ख्रिश्‍चनांचा छळ करणारा विख्यात शौल होता. त्याचे नाव आणि लौकिकता ऐकूनच विश्‍वासू लोक घाबरत असत. ख्रिस्ती हुतात्मा झालेल्या स्तेफनावर मृत्यू होईतोवर दगडमार करण्यास त्यानेच तर परवानगी दिली नव्हती का? (प्रेषितांची कृत्ये ८:१; ९:१, २, २६) तरीसुद्धा, दिमिष्काच्या मार्गावर पुनरुत्थित ख्रिस्ताने शौलाला ताळ्यावर आणले व त्याला तात्पुरते आंधळे केले. शौलाने आपणाबरोबर बोलताना एक वाणी ऐकली: “शौला शौला माझा छळ का करितोस? तेव्हा तो म्हणाला, प्रभो, तू कोण आहेस? त्याने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करितोस तोच मी आहे.” त्याच पुनरुत्थित ख्रिस्ताने दिमिष्कामध्ये राहणाऱ्‍या हनन्याला शौल जेथे प्रार्थना करीत होता तेथे जाऊन त्याला त्याची दृष्टी पुन्हा प्राप्त करून देण्यास सांगितले. अशाप्रकारे, शौल व हनन्या या दोघांकडे स्वतःच्या अनुभवामुळे पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवण्यासाठी सबळ कारण होते.—प्रेषितांची कृत्ये ९:४, ५, १०-१२.

१६, १७. (अ) अंतर्वर्ती मानवी जीवाच्या अमरत्वाच्या ग्रीक शिकवणीवर पौल विश्‍वास करत नव्हता हे आपल्याला कसे समजते? (ब) बायबल कोणती सबळ आशा पुरवते? (इब्रीयांस ६:१७-२०)

१६ प्रेषित पौल झालेल्या शौलाला छळग्रस्त ख्रिस्ती या नात्याने फेलिक्स सुभेदारासमोर आणल्यावर त्याने कसे उत्तर दिले ते पाहा. प्रेषितांची कृत्ये २४:१५ मध्ये आपण असे वाचतो: “आणि नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल अशी जी आशा . . . मी देवाकडे पाहून धरितो.” अंतर्वर्ती मानवी जीव अमर होऊन दंतकथेतील पाताळात जातो, या मूर्तिपूजक ग्रीक शिकवणीवर पौलाचा निश्‍चितच विश्‍वास नव्हता. तो पुनरुत्थानावर विश्‍वास करत होता नि त्याची शिकवण देत होता. याचा अर्थ काहींना स्वर्गामध्ये ख्रिस्तासोबत आत्मिक प्राणी म्हणून अमर जीवनाचे बक्षीस, तर बहुतांशी लोकांना एका परिपूर्ण पृथ्वीवर पुन्हा जीवन असा होतो.—लूक २३:४३; १ करिंथकर १५:२०-२२, ५३, ५४; प्रकटीकरण ७:४, ९, १७; १४:१, ३.

१७ अशाप्रकारे, पुनरुत्थानाकरवी अनेक जण एका वेगळ्या परिस्थितीत या पृथ्वीवर त्यांच्या प्रियजनांना पुन्हा भेटतील असे स्पष्ट अभिवचन आणि ठोस आशा बायबल आपल्याला देते.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-४.

दुःख करणाऱ्‍यांसाठी व्यावहारिक मदत

१८. (अ) “ईश्‍वरी भय” अधिवेशनांमध्ये कोणते मदतदायी साधन प्रकाशित करण्यात आले होते? (चौकोन पाहा.) (ब) आता कोणत्या प्रश्‍नांची उत्तरे दिली पाहिजेत?

१८ आता आपल्याजवळ केवळ आठवणी आणि आपले दुःख तेवढे बाकी राहिले आहे. मृत्यूमुळे झालेल्या या परीक्षामय वियोगाच्या काळात टिकाव धरण्यासाठी आपण काय करू शकतो? दुःख करणाऱ्‍यांना मदत करण्यासाठी इतर जण काय करू शकतात? शिवाय, खरी आशा नसलेले व दुःख करणारे आपल्याला क्षेत्र सेवेमध्ये भेटतात तेव्हा अशा प्रामाणिक लोकांना आपण कशी मदत करू शकतो? मृत्यूमध्ये झोपी गेलेल्या आपल्या प्रियजनांच्याबाबतीत आपण बायबलमधून आणखी कोणते सांत्वन प्राप्त करू शकतो? पुढील लेख आपल्याला काही सूचना पुरवील.

[तळटीपा]

a बायबल काळामध्ये दुःख करण्याविषयीच्या अधिक माहितीसाठी, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, इंकाने प्रकाशित केलेले शास्त्रवचनांवर सूक्ष्म दृष्टी (इंग्रजी) खंड २, पृष्ठे ४४६-७ पहा.

b बायबलमध्ये मिळणाऱ्‍या पुनरुत्थानाच्या आशेविषयी अधिक माहितीसाठी शास्त्रवचनांवर सूक्ष्म दृष्टी (इंग्रजी) खंड २, पृष्ठे ७८३-९३ पहा.

तुम्ही उत्तर देऊ शकाल का?

▫ मृत्यू हा शत्रू आहे असे का म्हणता येऊ शकते?

▫ बायबल काळातील देवाच्या सेवकांनी त्यांचे दुःख कसे व्यक्‍त केले?

▫ मृत प्रियजनांसाठी कोणती आशा आहे?

▫ पुनरुत्थानावर विश्‍वास ठेवण्यासाठी पौलाकडे कोणता आधार होता?

[८, ९ पानांवरील चौकट]

दुःख करणाऱ्‍यांसाठी व्यावहारिक मदत

१९९४-९५ च्या दरम्यान झालेल्या “ईश्‍वरी भय” अधिवेशनांमध्ये वॉचटावर संस्थेने तुमची प्रिय व्यक्‍ती मरते तेव्हा (इंग्रजी) हे नवे माहितीपत्रक प्रकाशित करण्याची घोषणा केली. हे प्रोत्साहनदायक माहितीपत्रक सर्व राष्ट्रांच्या व भाषेच्या लोकांना सांत्वन देण्यासाठी तयार केले आहे. तुम्ही आधी पाहिल्याप्रमाणे, ते मृत्यूचे व मृतांच्या स्थितीविषयी बायबलचे सोपे स्पष्टीकरण सादर करते. त्याहूनही अधिक म्हणजे, एका स्वच्छ परादीसमय पृथ्वीवर ख्रिस्त येशूद्वारे पुनरुत्थानाचे देवाने दिलेले अभिवचन ते ठळकपणे मांडते. दुःख करणाऱ्‍यांसाठी ते खरोखरच सांत्वन देते. यास्तव, ते ख्रिस्ती सेवेतही मदतदायी साधन असले पाहिजे; शिवाय पुष्कळ गृह बायबल अभ्यास करण्यासाठी आस्था जागृत करणारे माहितीपत्रक ठरले पाहिजे. प्रत्येक विभागाच्या शेवटच्या चौकोनात अभ्यासासाठी प्रश्‍नांची मांडणी सुज्ञपणे करण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रामाणिक शोकग्रस्त व्यक्‍तीसोबत चर्चा केलेल्या मुद्यांची सहज उजळणी करता येऊ शकेल.

[८ पानांवरील चित्रं]

लाजरचा मृत्यू झाला तेव्हा येशू रडला

[९ पानांवरील चित्रं]

येशूने लाजरला मृतातून उठवले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा