तुम्ही देवाच्या नजरेत मौल्यवान आहात!
“मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.”—यिर्मया ३१:३.
१. सामान्य लोकांच्या बाबतीत येशूची मनोवृत्ती त्याच्या दिवसातील परूश्यांच्या मनोवृत्तीपासून वेगळी कशी होती?
ती प्रेमळ काळजी त्याच्या नेत्रांमध्ये ते पाहू शकत होते. येशू हा मनुष्य त्यांच्या धार्मिक नेत्यांप्रमाणे नव्हता; तो काळजी वाहणारा होता. त्याला या लोकांवर दया आली कारण, “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) त्यांचे धार्मिक नेते दयापूर्ण प्रेमळ देवाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रेमळ मेंढपाळ असावयाचे होते. त्याउलट त्यांनी सामान्य लोकांना खालच्या वर्गाचे लोक म्हणून तुच्छ—व शापग्रस्त मानले!a (योहान ७:४७-४९; पडताळा यहेज्केल ३४:४.) स्पष्टपणे, अशाप्रकारचा कुरुप, अशास्त्रीय दृष्टिकोन यहोवा त्याच्या लोकांकडे पाहत असलेल्या दृष्टिकोनापासून फारच वेगळा होता. त्याने आपल्या इस्राएल राष्ट्रास सांगितले होते: “मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो.”—यिर्मया ३१:३.
२. ईयोबाच्या तीन सोबत्यांनी तो देवाच्या नजरेत कवडीमोल असल्याचे पटविण्याचा प्रयत्न कसा केला?
२ परंतु, यहोवाची प्रिय मेंढरे निरूपयोगी आहेत हे त्यांना पटवून देण्यात परूशी नक्कीच प्रथम नव्हते. ईयोबाच्या उदाहरणाचा विचार करा. यहोवासमोर तो धार्मिक आणि निर्दोष होता, परंतु त्या तीन “सांत्वनकर्त्यांनी” सुचवले की ईयोब एक अनैतिक, दुष्ट धर्मत्यागी होता आणि आपले मागमूस मागे न ठेवता तो मरेल. त्यांनी ठामपणे सांगितले की, ईयोबाने दाखवलेल्या धार्मिकतेला देव मुळीच किंमत देणार नाही, कारण देवाला त्याच्या स्वतःच्या देवदूतांवरही विश्वास नव्हता आणि स्वर्ग अशुद्ध आहे असा त्याचा दृष्टिकोन होता!—ईयोब १:८; ४:१८; १५:१५, १६; १८:१७-१९; २२:३.
३. लोक निरुपयोगी आणि अप्रिय आहेत हे त्यांना पटविण्यासाठी सैतान आज कोणत्या माध्यमांचा वापर करतो?
३ आज सैतान, या ‘डावपेचाचा’ अजूनही उपयोग करून लोकांना असे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहे की, ते नावडते आणि निरूपयोगी आहेत. (इफिसकर ६:११) हे खरे की, तो नेहमी लोकांचा पोकळ डौल आणि अहंकार वेधक बनवून त्यांना फसवतो. (२ करिंथकर ११:३) परंतु, त्याला दुबळ्या व्यक्तीच्या स्वाभिमानाचा चुराडा करण्यात देखील आनंद होतो. हे खासकरून या ‘शेवटल्या काळातील’ कठीण दिवसांमध्ये होते. आज अनेक जण “ममताहीन” कुटुंबामध्ये वाढतात; अनेकांना दररोज क्रूर, स्वार्थी आणि हूड लोकांचा सामना करावा लागतो. (२ तीमथ्य ३:१-५) वर्षानुवर्षांपासून मिळालेली गैरवागणूक, जातीयवाद, द्वेष किंवा दुर्व्यवहार यामुळे कदाचित ते निरूपयोगी आणि नावडते असल्याचे अनेकांना वाटत असावे. एका मनुष्याने लिहिले: “मला कोणावर प्रेम करावेसे किंवा माझ्यावर कोणी प्रेम करावे असे वाटत नाही. देवाला माझ्याबद्दल थोडीसुद्धा काळजी असेल असा विश्वास करणे देखील मला कठीण जाते.”
४, ५. (अ) निरुपयोगीपणाची व्यक्तिगत कल्पना शास्त्रवचनांच्या विरोधात का आहे? (ब) आपल्या कोणत्याही प्रयत्नांना काही किंमत नाही असा विचार करण्याचा एक गंभीर परिणाम कोणता आहे?
४ व्यक्तिगत निरूपयोगीपणाची कल्पना खंडणीची शिकवण या देव वचनाच्या सत्याच्या अंतःकरणालाच भोसकते. (योहान ३:१६) आपल्याला सार्वकालिक जीवनाची संधी विकत घेण्यासाठी—आपल्या पुत्राचे अमूल्य जीवन देऊन—देवाला इतकी मोठी किंमत भरावी लागली म्हणजेच त्याला आपल्यावर प्रेम असले पाहिजे; आपल्याला त्याच्या नजरेत नक्कीच काहीतरी मूल्य असेल!
५ शिवाय, देवाला आपण अप्रिय आहोत, आपल्या कोणत्याही प्रयत्नांची किंमत नाही असे वाटणे किती निरूत्साहजनक असेल! (पडताळा नीतीसूत्रे २४:१०.) असा नकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यामुळे, शक्य तेथे देवाची सेवा करण्यास आपल्याला मदत करणारे हितकारक उत्तेजन देखील काहींना दोषारोपासारखे वाटेल. आपला आंतरिक विश्वास आपल्याला असे भासवत असेल की, आपण जे काही करतो तेवढे पुरेसे नाही.
६. स्वतःच्या बाबतीत आपल्या अति नकारात्मक विचारांवर उत्तम उपाय काय आहे?
६ तुम्हाला स्वतःमध्ये अशा भावना जाणवत असल्या तर निराश होऊ नका. आपल्यातील पुष्कळ जण अधूनमधून स्वतःची अवाजवी टीका करत असतात. लक्षात ठेवा, देवाचे वचन “सुधारणूक” आणि “तटबंदी जमीनदोस्त” करण्यासाठी रचले आहे. (२ तीमथ्य ३:१६; २ करिंथकर १०:४) प्रेषित योहानाने लिहिले: “आपण सत्याचे आहो हे ह्यावरून आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.” (१ योहान ३:१९, २०) तीन मार्गांनी आपण यहोवासमोर मौल्यवान आहोत अशी बायबल शिकवण देते, तर आपण त्यांचा विचार करू या.
यहोवा तुम्हाला मौल्यवान समजतो
७. येशूने सर्व ख्रिश्चनांना देवाच्या नजरेतील त्यांच्या मोलाबद्दल कसे शिकवले?
७ पहिल्यांदा, बायबल प्रत्यक्षात शिकवते की देवाच्या नजरेत आम्हा प्रत्येकाचे व्यक्तिगत मूल्य आहे. येशूने म्हटले: “पाच चिमण्या दोन दमड्यास विकतात की नाही? तरी त्यापैकी एकीचाहि देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसहि मोजलेले आहेत. भिऊ नका; तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहा.” (लूक १२:६, ७) त्याकाळी, अन्न म्हणून चिमणी या पक्ष्याला सर्वात स्वस्त भावाने विकले जात असे, तरीही त्यातील एकही चिमणी तिच्या निर्माणकर्त्याच्या नजरेतून सुटली नाही. अशाप्रकारे, एका उत्तम विरोधाभासाचा पाया स्थापन केला आहे: मनुष्यांच्या बाबतीत—जे मूल्यवान आहेत—देवाला सविस्तर माहिती आहे. जणू काय आपल्या डोक्यावरचा प्रत्येक केस मोजलेला आहे त्यासारखेच हे आहे!
८. यहोवा आपल्या डोक्यावरील केसांचीसुद्धा गणती करु शकतो असा विचार करणे वास्तविक का आहे?
८ केस मोजलेले आहेत काय? येशूच्या उदाहरणातील हा पैलू काल्पनिक असल्याचा संशय तुम्हाला येत असल्यास या गोष्टीचा विचार करा: देव आपल्या विश्वासू सेवकांची इतकी आठवण ठेवतो की तो त्यांना पुनरूत्थित करू शकतो—त्यांना त्यांच्या प्रत्येक गुणासहीत, त्यांची गुंतागुंतीची आनुवंशिक सामग्री तसेच त्यांच्या इतक्या वर्षांच्या आठवणी आणि अनुभवासहित पुनःनिर्माण करणार आहे. या गोष्टीच्या तुलनेत आमचे केस (सर्वसामान्यपणे डोक्यावरील १,००,००० केस) मोजणे साधे महत्कृत्य असेल!—लूक २०:३७, ३८.
यहोवा आपल्यामध्ये काय पाहतो?
९. (अ) यहोवा मोलाचे समजत असलेले काही गुण कोणते आहेत? (ब) तुम्ही हे गुण त्याच्यासाठी मौल्यवान आहेत असे का समजता?
९ दुसरी गोष्ट, बायबल शिकवते की यहोवा आपल्या कोणत्या गोष्टींना मोलाचे समजतो. सोप्या भाषेत सांगायचे तर त्याला आपले सकारात्मक गुण आणि आपले प्रयत्न पाहिल्यावर आनंद होतो. राजा दाविदाने त्याचा पुत्र शलमोनाला सांगितले: “परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात.” (१ इतिहास २८:९) हिंसा आणि द्वेषाने भरलेल्या जगात देव कोट्यावधी लोकांची अंतःकरणे पारखतो तेव्हा शांती, सत्य आणि धार्मिकतेची आवड बाळगणारे एखादे अंतःकरण आढळल्यावर त्याला किती आनंद होत असेल! (पडताळा योहान १:४७; १ पेत्र ३:४.) देवाला, त्याच्याबद्दल प्रीतीने ओतप्रोत भरणारे, त्याच्याविषयी शिकून घेण्याचा प्रयत्न करणारे आणि इतरांबरोबर या ज्ञानाचा सहभाग करणारे अंतःकरण आढळते तेव्हा काय होते? मलाखी ३:१६ मध्ये, यहोवा आपल्याला सांगतो की जे त्याच्याबद्दल इतरांना सांगतात अशांचे तो ऐकतो, शिवाय “परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन” करणाऱ्यांसाठी त्याच्याजवळ “एक स्मरणवही” देखील आहे. अशाप्रकारचे गुण त्याला मौल्यवान वाटतात!
१०, ११. (अ) यहोवा त्यांच्या चांगल्या गुणांना मोलाचे समजतो या पुराव्याला काही जण कमी कसे लेखू शकतात? (ब) चांगल्या गुणांचे प्रमाण कितीही असले, तरी यहोवा त्याला मोलाचे लेखतो हे अबीयाच्या उदारहरणावरुन कसे दिसते?
१० परंतु, स्वतःला दोषी ठरवणारे अंतःकरण देवाच्या नजेरत आपल्या मूल्याचा पुरावा पाहण्यास नकार दर्शवू शकते. ते नेहमी स्वतःशी पुटपुटेल, ‘पण माझ्यापेक्षा आणखी कितीतरी लोक त्या गुणांमध्ये अधिक उदाहरणीय आहेत. यहोवा माझी तुलना त्यांच्यासोबत करतो तेव्हा त्याला किती दुःख होत असावे!’ यहोवा आपल्या सेवकांची तुलना करत नाही, किंवा तो कठोर नाही, किंवा त्याचे दर्जे कठोर देखील नाहीत. (गलतीकर ६:४) तो अतिशय मार्मिकपणे आपल्या अंतःकरणांतील गोष्टी समजतो आणि सर्व प्रमाणात चांगल्या गुणांना मोलाचे समजतो.
११ उदाहरणार्थ, यराबाम राजाच्या संपूर्ण धर्मत्यागी राजघराण्याचा उच्छेद, म्हणजेच ‘शेणाप्रमाणे’ काढून टाकण्याचा हुकूम देताना यहोवाने आज्ञा दिली की, राजाच्या पुत्रांपैकी केवळ अबीयालाच योग्य मूठमाती दिली जावी. का बरे? “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यासंबंधाने . . . त्याच्याच ठायी काहीसा चांगुलपणा दिसून आला आहे.” (१ राजे १४:१०, १३) याचा अर्थ, अबीया यहोवाचा विश्वासू उपासक होता असा होतो का? तशी आवश्यकता नाही, कारण त्याच्या दुष्ट घराण्याप्रमाणेच त्याचाही मृत्यू झाला. (अनुवाद २४:१६) तरीही, यहोवाने अबीयाच्या अंतःकरणात “काहीसा चांगुलपणा” पाहून त्याला मोलाचे समजले आणि त्याप्रमाणे कार्य केले. मॅथ्यू हेन्रीज् कॉमेन्टरी ऑन द होल बायबल असे सांगते: “एखादी चांगली गोष्ट कितीही अल्प प्रमाणात असली तरीही ती सापडेल: त्यास शोधणारा देव, ती कितीही क्षुल्लक असली तरी तो पाहतो आणि खूष होतो.” देवाला तुम्हामध्ये अगदीच अल्प प्रमाणात एखादा चांगला गुण सापडल्यास, जोवर तुम्ही विश्वासूपणे त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करता तोवर तो त्या गुणाला वाढवू शकतो हे विसरु नका.
१२, १३. (अ) यहोवा आपल्या सर्व प्रयत्नांना मोलाचे समजतो हे स्तोत्र १३९:३ कसे दाखवते? (ब) यहोवा आपल्या सर्व वर्तनक्रमांना तपासतो असे कोणत्या अर्थाने म्हटले जाऊ शकते?
१२ यहोवा अशाचप्रकारे आपल्या प्रयत्नांना मोलाचे समजतो. स्तोत्र १३९:१-३ मध्ये आपण वाचतो: “हे परमेश्वरा, तू मला पारखिले आहे, तू मला ओळखितोस. माझे बसणे व उठणे तू जाणतोस, तू दुरून माझे मनोगत समजतोस. तू माझे चालणे व माझे निजणे बारकाईने पाहतोस. आणि माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.” अशारीतीने यहोवाला आपल्या सर्व वर्तनक्रमाची जाणीव आहे. परंतु त्याला केवळ जाणीवेपेक्षाही अधिक माहीत आहे. “माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे,” या इब्री वाक्यांशाचा अर्थ, “तू माझे सर्व वर्तनक्रम साठवले आहे” किंवा “तू माझ्या सर्व वर्तनक्रमांना प्रिय समजतोस.” (पडताळा मत्तय ६:१९, २०.) तर मग, आपण इतके अपरिपूर्ण आणि पापी असतानाही यहोवा आपल्या वर्तनक्रमांना प्रिय कसे समजू शकतो?
१३ यहोवाने दाविदाचे चालणे व त्याच्या विश्रांतीच्या काळाला ‘बारकाईने पाहिले’ असे त्याने लिहिले तेव्हा काही विद्वानांच्या मते इब्रीमध्ये त्याचा शब्दशः अर्थ, “चाळणे” किंवा “पाखडणे” असा होतो, हे मनोरंजक आहे. एका संदर्भाने असे निरिक्षिले: “त्याचा अर्थ . . . सर्व भूसकट पाखडून धान्य—मोलाचे असलेले ते शिल्लक ठेवणे होय. यास्तव येथे याचा अर्थ, देवाने जणू काय त्याला पाखडले. . . . त्याने सर्व भूसा किंवा निरुपयोगी असलेल्या गोष्टी वेगळ्या केल्या आणि उरलेले वास्तविक अणि खरे असलेले त्याने पाहिले.” स्वतःला दोषी ठरविणारे हृदय आपल्या वर्तनक्रमाला विरुद्ध पद्धतीने चाळेल. ते गतकाळातील चुकांबद्दल आपल्यावर निर्दयीपणे दोष लावते आणि आपल्या साध्यता काहीच नाहीत, असे समजून त्यांना दूर करते. परंतु आपण प्रामाणिकपणे आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप केल्यास आणि त्याच चुका पुन्हा न करण्याचा कसोशीने प्रयत्न केल्यास यहोवा आपल्याला क्षमा करतो. (स्तोत्र १०३:१०-१४; प्रेषितांची कृत्ये ३:१९) तो तपासतो आणि आपली चांगली कृत्ये आठवणीत ठेवतो. वस्तुतः, आपण जोवर त्याला विश्वासू राहतो तोवर ती कृत्ये तो आठवणीत ठेवतो. ती कृत्ये विसरुन जाणे अन्यायीपणाचे असेल या दृष्टीने तो त्याकडे पाहील आणि तो कधीही अन्यायी नाही!—इब्रीयांस ६:१०.
१४. यहोवा आपल्या ख्रिस्ती सेवेतील कार्याला मोलाचे समजतो हे कशावरुन दिसते?
१४ देव मोलाची समजतो अशी काही चांगली कृत्ये कोणती आहेत? वास्तविकपणे त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताचे अनुकरण करताना आपण करीत असलेले सर्व काही. (१ पेत्र २:२१) यास्तव, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रसार करणे हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य होय. रोमकर १०:१५ मध्ये आपण वाचतो: “चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत!” सहसा आपण आपल्या साध्या पायांचा विचार “मनोरम” असल्याचे करीत नसलो, तरी पौलाने येथे जो शब्द वापरला तोच ग्रीक सेप्ट्यूजंट अनुवादात रिबेका, राहेल आणि योसेफ—यांचे वर्णन करण्यासाठी वापरला होता—हे तिघेही त्यांच्या सुंदरतेसाठी प्रसिद्ध होते. (उत्पत्ती २६:७; २९:१७; ३९:६) यास्तव, आपला देव, यहोवा याची सेवा करण्यात गुंतलेले असणे त्याच्या नजरेत अधिक सुंदर आणि मौल्यवान आहे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०.
१५, १६. यहोवा आपल्या धीराला मोलाचे का समजतो आणि स्तोत्र ५६:८ मधील राजा दाविदाचे शब्द या वस्तुस्थितीला कसे अधोरेखित करतात?
१५ देव मोलाचे समजत असलेला आणखी एक गुण म्हणजे, आपला धीर होय. (मत्तय २४:१३) यहोवाकडे तुम्ही पाठ फिरवावी अशी सैतानाची इच्छा आहे हे लक्षात ठेवा. यहोवाला तुम्ही एकनिष्ठ राहिलेला प्रत्येक दिवस सैतानाने केलेल्या निंदेचे प्रत्युत्तर देण्यास तुम्ही मदत केलेल्या आणखी एका दिवसाप्रमाणे आहे. (नीतीसूत्रे २७:११) काहीवेळा धीर धरणे ही सोपी गोष्ट नसते. आरोग्याच्या समस्या, आर्थिक ऋण, भावनात्मक दुःख आणि इतर अडथळे जाणाऱ्या प्रत्येक दिवसाला परीक्षा बनवू शकतात. अशा परीक्षांमध्ये दाखवलेला धीर खासपणे यहोवासाठी मौल्यवान असतो. याच कारणासाठी दावीद राजा आपल्या आसवांना लाक्षणिक “बुधलीत” भरून ठेवण्याची यहोवाकडे याचना करीत खात्रीने असे विचारतो, “तुझ्या वहीत ती नमूद झाली नाहीत काय?” (स्तोत्र ५६:८) होय, यहोवाला एकनिष्ठ राहत असताना गाळलेले अश्रू आणि सहन केलेले दुःख यांना तो साठवून ठेवतो आणि ते आठवणीत ठेवतो. ते सुद्धा त्याच्या नजरेत मौल्यवान आहेत.
१६ आपल्या उत्तम गुणांना आणि प्रयत्नांना अनुलक्षून यहोवाला आम्हा प्रत्येकात मोलाचे समजण्यासारखे अधिक काहीतरी दिसते हे किती स्पष्ट आहे! सैतानाच्या जगाने आपल्याला कशीही वागणूक दिली असली तरीही यहोवा आपल्याला मौल्यवान समजून “सर्व राष्ट्रातील निवडक वस्तु” याचा भाग आहोत ह्या दृष्टीने पाहतो.—हाग्गय २:७.
यहोवाने त्याची प्रीती दाखवण्यासाठी काय केले आहे
१७. यहोवा आणि येशू वैयक्तिकरितीने आपल्यावर प्रीती करतात याची खातरी ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाने का दिली पाहिजे?
१७ तिसरी गोष्ट म्हणजे, यहोवा आपल्यावरील प्रीती शाबीत करण्यासाठी अधिक काही करतो. आपण कवडीमोल किंवा अप्रिय आहोत या सैतानाच्या लबाडीला ख्रिस्ताचे खंडणी बलिदान निश्चितच अधिक जोरदार उत्तर आहे. येशूने वधस्तंभावरील जो यातनामय मृत्यू सहन केला तसेच, यहोवाने आपल्या प्रिय पुत्राचा मृत्यू होत असल्याचे पाहण्यात ज्या अधिक यातना सहन केल्या हे आपल्यावरील त्यांच्या प्रीतीचा पुरावा होता ही गोष्ट आपण कधीही विसरु नये. शिवाय, ती प्रीती वैयक्तिकरित्या आपल्याला लागू होते. याचप्रकारे प्रेषित पौलाने त्याकडे पाहिले. म्हणून त्याने लिहिले: ‘देवाच्या पुत्राने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.’—गलतीकर २:२०.
१८. यहोवा आपल्याला ख्रिस्ताच्या जवळ कोणत्या अर्थाने आकर्षित करतो?
१८ ख्रिस्ताच्या बलिदानाच्या फायद्यांचा लाभ मिळवण्यात व्यक्तिगतरीत्या मदत करण्याद्वारे यहोवाने त्याची आपल्यावरील प्रीती शाबीत केली. येशूने योहान ६:४४ मध्ये म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही.” आम्हाकडे वैयक्तिकरित्या पोहंचत असलेल्या प्रचारकार्याद्वारे तसेच आपल्या उणीवा आणि कमतरता असतानाही शास्त्रवचनीय सत्य समजण्यासाठी आध्यात्मिक सत्याचा अवलंब करुन यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मदत करुन त्याच्या पुत्राकडे आणि सार्वकालिक जीवनाच्या आशेकडे आकर्षित करतो. अशाप्रकारे, यहोवाने इस्राएलाच्या बाबतीत जे म्हटले तेच आपल्याही बाबतीत म्हणू शकतो: “मी सार्वकालिक प्रेमवृत्तीने तुजवर प्रेम करीत आलो म्हणून मी तुला वात्सल्याने जवळ केले आहे.”—यिर्मया ३१:३.
१९. प्रार्थनेच्या विषेशाधिकाराने आपल्यासाठी यहोवाच्या व्यक्तिगत प्रीतीची खातरी का दिली पाहिजे?
१९ तथापि, कदाचित प्रार्थनेच्या विशेषाधिकाराद्वारे आपण यहोवाची प्रीती अधिक जवळून अनुभवू शकतो. तो आपल्या सर्वांना त्याला “निरंतर प्रार्थना” करण्याचे आमंत्रण देतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१७) तो ऐकतो! त्याला ‘प्रार्थना ऐकणारा’ असे देखील म्हटले आहे. (स्तोत्र ६५:२) हे स्थान त्याने दुसऱ्या कोणाला, इतकेच नव्हे तर स्वतःच्या पुत्राला देखील दिलेले नाही. जरा विचार करा: विश्वाचा निर्माणकर्ता प्रार्थनेद्वारे त्याच्यासोबत मनमोकळेपणे बोलण्याचे आपल्याला आर्जवत आहे. तुमच्या विनवण्या, यहोवाने ज्या गोष्टी अन्यथा केल्या नसत्या अशा गोष्टी करण्यासाठी त्याला प्रवृत्तही करु शकतात.—इब्रीयांस ४:१६; याकोब ५:१६; पहा यशया ३८:१-१६.
२०. देवाची आपल्यावरील प्रीती आम्हा स्वतःला अधिक महत्त्व देणे किंवा आत्मस्तुतिप्रियता यासाठी सबब का नाही?
२० संतुलन राखणारा कोणताही ख्रिस्ती, स्वतःला जणू काय अधिक महत्त्वपूर्ण व्यक्ती समजून उंचावण्याच्या दृष्टीने देवाच्या प्रीतीच्या अशा पुराव्याला सबब बनवणार नाही. पौलाने लिहिले: “मला प्राप्त झालेल्या कृपादानांवरुन मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की, आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना.” (रोमकर १२:३) आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रीतीचा उपभोग घेत असताना, आपण निकोप मनाचे असू या आणि देवाची प्रेमळ कृपा अपात्री असल्याची आठवण ठेवू या.—पडताळा लूक १७:१०.
२१. सैतानाच्या कोणत्या लबाडीला आपण सतत विरोध केला पाहिजे आणि कोणत्या दैवी सत्यावर आपण मनन केले पाहिजे?
२१ शेवटला श्वास घेत असलेल्या या जुन्या जगात सैतान चालना देत असलेल्या त्याच्या सर्व कल्पनांचा विरोध करण्यासाठी आपण प्रत्येकजण आपल्या वतीने सर्व परिश्रम घेऊ या. यामध्ये आपण कवडीमोल किंवा अप्रिय आहोत अशा विचारांना काढून टाकण्याचा समावेश होतो. या व्यवस्थीकरणातील जीवनाने, तुम्ही अशाप्रकारचे एक अडखळण आहात की, देवाच्या विस्तृत प्रीतीला देखील त्यावर मात करण्यास शक्य होणार नाही, किंवा त्याच्या सर्व-काही पाहू शकणाऱ्या डोळ्यांना तुमची चांगली कृत्ये देखील अतिशय क्षुद्र वाटतील, किंवा तुमची पातके इतकी आहेत की त्याच्या मौल्यवान पुत्राच्या मृत्यूने देखील ती झाकता येणार नाहीत, असे जर असेल तर तुम्हाला खोटे शिकवले गेले आहे. अशा तीव्र तिरस्कारास पात्र असणाऱ्या सर्व लबाड्या टाळा! आपण सर्वदा रोमकर ८:३८, ३९ मधील प्रेषित पौलाचे प्रेरित शब्द लक्षात ठेवू या: “माझी खातरी आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपति, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तु, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीति आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.”
[तळटीपा]
a वास्तविक पाहता ते गरीब लोकांना “ॲमहारेट्स्” किंवा “धरतीचे लोक” ही तिरस्करणीय संज्ञा वापरत असत. एका विद्वानानुसार, परूश्यांनी अशी शिकवण दिली की कोणीही या गरीबांजवळ मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी त्यांच्यावर भरवसा ठेवू नये, किंवा त्यांनी दिलेल्या पुराव्यावर विश्वास ठेवू नये, पाहुणे म्हणून त्यांचे स्वागत करू नये किंवा त्यांच्याकडे पाहुणे म्हणून जाऊ नये तसेच त्यांच्याकडून काहीच विकत देखील घेऊ नये. धार्मिक नेते म्हणत असत की त्यांच्यातील एखाद्या मुलीचा विवाह या लोकांपैकी कोणाबरोबर होणे जणू काय, श्वापदासमोर तिला बांधून असाहाय्य अवस्थेत ठेवण्यासारखे आहे.
तुम्हाला काय वाटते?
◻ सैतान आपण कवडीमोल आणि अप्रिय आहोत असे आपल्याला पटवण्याचा प्रयत्न का करतो?
◻ यहोवा आपल्या प्रत्येकाला मोलाचे समजतो हे येशूने कसे शिकवले?
◻ यहोवा आपल्या चांगल्या गुणांना प्रतिफळ देतो हे आपण कसे जाणतो?
◻ यहोवा आपल्या प्रयत्नांना साठवतो याबद्दल आपण शाश्वती कशी बाळगू शकतो?
◻ यहोवाने आम्हा वैयक्तिकांवरील प्रीती कशाप्रकारे शाबीत केली आहे?
[१३ पानांवरील चित्रं]
यहोवा आपल्या नावाचा विचार करणाऱ्या सर्वांकडे लक्ष देतो आणि त्यांना स्मरणात ठेवतो