प्रीती व सत्कर्मे करण्यासाठी उत्तेजन द्या—कशाप्रकारे?
“प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. . . . एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.”—इब्रीयांस १०:२४, २५.
१, २. (अ) आरंभीच्या ख्रिश्चनांना एकत्र आल्याने सांत्वन आणि उत्तेजन मिळणे महत्त्वाचे का होते? (ब) एकत्र मिळण्याच्या गरजेला पौलाच्या कोणत्या सल्ल्याने संबोधले?
ते दारे बंद करुन गुप्तपणे एकत्र जमले. बाहेर सर्व ठिकाणी अजूनही धोका होता. त्यांचा नेता, येशू याचा आताच जाहीरपणे वध केला होता आणि त्याने आपल्या अनुयायांना इशारा दिला होता की, त्याला जशी वागणूक मिळाली त्यापेक्षा चांगली वागणूक त्यांना मिळणार नव्हती. (योहान १५:२०; २०:१९) पण ते आपल्या प्रिय येशूबद्दल हळू आवाजात बोलत असताना एकत्र असल्यामुळे त्यांना निदान सुरक्षित वाटले असावे.
२ वर्षे उलटत असताना, ख्रिश्चनांना सर्व प्रकारच्या परीक्षा आणि छळाचा सामना करावा लागला. त्या पहिल्या शिष्यांप्रमाणे, एकत्र येण्याद्वारे त्यांनी सांत्वन आणि उत्तेजन मिळवले. यास्तव, प्रेषित पौलाने इब्रीयांस १०:२४, २५ मध्ये लिहिले: “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.”
३. ख्रिश्चनांनी एकत्र मिळण्याच्याबाबतीत इब्रीयांस १०:२४, २५ हे केवळ आज्ञेपेक्षा अधिक असे तुम्ही का म्हणाल?
३ नियमितपणे एकत्र येण्यासाठी ते शब्द आज्ञेपेक्षाही अधिक आहेत. कोणत्याही प्रसंगी ख्रिस्ती एकत्र संगतीत येतात तेव्हा—खरेपणाने ते सर्व ख्रिस्ती सभांसाठी एक दैवी प्रेरित दर्जा पुरवतात. यहोवाचा दिवस जवळ येत असल्याचे आपण स्पष्टपणे पाहतो तेव्हा, या दुष्ट व्यवस्थिकरणातील दबाव आणि धोके आपल्या सभा सुरक्षित आश्रयस्थानासारख्या, सर्वांसाठी शक्ती व उत्तेजनाच्या स्रोताप्रमाणे असण्यासाठी आज पूर्वीपेक्षा अधिक जरुरीचे बनवतात. याची निश्चिती करण्यासाठी आपण काय करु शकतो? तर मग, तीन मुख्य प्रश्न विचारुन आपण पौलाच्या शब्दांचे बारकाईने परीक्षण करु या: “एकमेकांकडे लक्ष” देण्याचा अर्थ काय होतो? एकमेकांना ‘प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन’ देण्याचा अर्थ काय होतो? शेवटी, या खडतर काळात आपण “एकमेकांस बोध” कसा करु शकतो?
‘एकमेकांकडे लक्ष द्या’
४. ‘एकमेकांकडे लक्ष देण्याचा’ अर्थ काय होतो?
४ पौलाने ख्रिश्चनांना “एकमेकांकडे लक्ष” देण्याचे आर्जवले तेव्हा त्याने “आकलन होणे” या सामान्य संज्ञेचे जोरदार रुप, कॅ·टॅ·नोई हे ग्रीक क्रियापद वापरले. दि थिओलॉजिकल डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट म्हणते की, याचा अर्थ “एखाद्या गोष्टीवर संपूर्ण मन लावणे होय.” डब्ल्यू. ई. वाईन यांच्या मते त्याचा अर्थ, “पूर्णपणे समजणे, जवळून विचारात घेणे” असा देखील होऊ शकतो. यास्तव, ख्रिस्ती लोक जेव्हा ‘एकमेकांकडे लक्ष देतात’ तेव्हा ते केवळ वरवरच पाहत नाहीत तर, ते आपल्या सर्व मानसिक कुवतींचा उपयोग करुन खोलवर पाहण्याचा प्रयत्न करतात.—पडताळा इब्रीयांस ३:१.
५. एखाद्या व्यक्तीचे लगेच न दिसण्याजोगे काही पैलू कोणते आहेत आणि आपण याचा विचार का करावा?
५ त्याचे किंवा तिचे स्वरुप, कार्य किंवा दाखवत असलेले व्यक्तित्व या वरवरच्या गोष्टींना पाहून जे प्रकट होईल त्यापेक्षा ती व्यक्ती कशाप्रकारची आहे हे आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. (१ शमुवेल १६:७) बहुधा सौम्य स्वभाव, एखाद्याच्या वास्तविक खोल भावना किंवा हर्षदायक विनोदबुद्धीला लपवतो. तरी देखील प्रत्येकाच्या पार्श्वभूमीत बराच फरक असतो. काहींना त्यांच्या जीवनातील अत्यंत कठीण परीक्षेतून जावे लागले आहे; आता इतर जण कल्पना करवत नाही अशा परिस्थितींना सहन करीत आहेत. व्यक्तीच्या पार्श्वभूमीबद्दल किंवा परिस्थितींबद्दल आपण अधिक शिकतो तेव्हा कितीतरी वेळा असे घडते की, एखाद्या बंधू किंवा बहिणीच्या विशिष्ट सवयीबद्दल आपला संताप निवळतो.—नीतीसूत्रे १९:११.
६. एकमेकांना चांगले ओळखण्यासाठी काही मार्ग कोणते आहेत आणि त्यातून काय चांगले निष्पन्न होऊ शकते?
६ अर्थातच, न सांगता एकदुसऱ्यांच्या वैयक्तिक कारभारात आपण जवळून दखल देणे असा याचा अर्थ होत नाही. (१ थेस्सलनीकाकर ४:११) तरीही, आपण एकमेकांबद्दल व्यक्तिगत आस्था निश्चितच बाळगू शकतो. यामध्ये राज्य सभागृहात केवळ अभिवादन करण्यापेक्षा अधिक गोष्टींचा समावेश होतो. तुम्हाला एखाद्याबद्दल चांगली ओळख करून घ्यावयाची असल्यास त्याची निवड करुन त्याच्यासोबत सभेच्या अगोदर किंवा नंतर काही मिनिटे संभाषण करण्याचे का ठरवू नये? एक किंवा दोन मित्रांना तुमच्या घरी साध्या अल्पोपहारासाठी निमंत्रण देण्याद्वारे “आदरतिथ्य करण्यात तत्पर असा,” हे करणे अधिक लाभाचे असेल. (रोमकर १२:१३) आस्था दाखवा. ऐका. कशारीतीने त्या व्यक्तीला यहोवाची ओळख होऊन त्यावर प्रीती करू लागली, केवळ एवढेच विचारल्यावर तुम्हाला बरेच काही कळून येईल. असे असले तरी, घरोघरच्या सेवेत सोबत कार्य करण्याद्वारे तुम्ही अजूनही बरेच काही शिकू शकता. अशाप्रकारे एकदुसऱ्यांकडे लक्ष दिल्याने इतरांबद्दल अस्सल भावना किंवा समभावना विकसित करण्यास आपल्याला मदत होईल.—फिलिप्पैकर २:४; १ पेत्र ३:८.
‘एकमेकांस उत्तेजन द्या’
७. (अ) येशूच्या शिकवणीचा लोकांवर कसा प्रभाव पडला? (ब) त्याच्या शिकवणीला कशाने अधिक शक्तिशाली बनविले?
७ आपण एकमेकांकडे लक्ष दिल्याने एकमेकांना उत्तेजन देण्यास आणि कार्य करण्याचे आर्जवण्यासाठी योग्यप्रकारे सज्ज असतो. या बाबतीत ख्रिस्ती वडील विशेषपणे प्रमुख भूमिका पार पाडतात. येशू जाहीरपणे बोलला त्यावेळच्या एका प्रसंगाविषयी आपण वाचतो: “लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.” (मत्तय ७:२८) दुसऱ्या एका प्रसंगी, त्याला पकडण्यासाठी पाठवलेल्या काही सैनिकांनी देखील परतल्यावर असे म्हटले: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” (योहान ७:४६) येशूची शिकवण इतकी शक्तिशाली कशी होती? भावनावशतेच्या प्रदर्शनामुळे का? नाही; येशू अधिकाराने बोलला. तथापि, श्रोत्यांच्या हृदयाप्रत पोहंचण्याचे नेहमीच त्याचे उद्दिष्ट होते. त्यामुळे त्याने लोकांचा विचार केला, त्यांना कसे प्रवृत्त करावयाचे हे त्याला पूर्णपणे माहीत होते. त्याने दैनंदिन जीवनातील वास्तविकतेला प्रकट करणाऱ्या स्पष्ट, सोप्या दाखल्यांचा वापर केला. (मत्तय १३:३४) अशाचप्रकारे, आपल्या सभांमध्ये नेमणूका पार पाडणाऱ्यांनी प्रवृत्त करणाऱ्या हार्दिक, उत्साही प्रस्तुती देण्याद्वारे येशूचे अनुकरण केले पाहिजे. येशूप्रमाणे आपणही श्रोत्यांना लागू होणाऱ्या व त्यांच्या अंतःकरणाप्रत पोहंचणाऱ्या दाखल्यांना शोधण्यासाठी स्वतःला कामी लावू शकतो.
८. येशूने उदाहरणाद्वारे उत्तेजित कसे केले आणि या बाबतीत आपण त्याचे अनुकरण कसे करु शकतो?
८ देवाची सेवा करताना, उदाहरणाद्वारे आपण सर्वजण एकमेकांना उत्तेजन देऊ शकतो. येशूने निश्चितच आपल्या श्रोत्यांना उत्तेजन दिले. त्याला ख्रिस्ती सेवेचे कार्य आवडत होते आणि त्याने सेवेची स्तुती केली. त्याच्यासाठी ते अन्नासारखे होते असे त्याने म्हटले. (योहान ४:३४; रोमकर ११:३३) असा उत्साह संसर्गजन्य असू शकतो. अशाचप्रकारे तुम्ही सेवेमधील तुमचा आनंद इतरांसमोर प्रकट होऊ देता का? काळजीपूर्वकपणे बढाईखोर आवाज टाळून मंडळीत इतरांसोबत तुमच्या चांगल्या अनुभवांची सहभागिता करा. तुमच्यासोबत कार्य करण्यासाठी इतरांना तुम्ही आमंत्रित करता, तेव्हा आपला महान निर्माणकर्ता, यहोवाबद्दल इतरांशी बोलण्यात अस्सल आनंद घेण्यास त्यांना मदत करु शकता का हे पाहा.—नीतीसूत्रे २५:२५.
९. (अ) इतरांना उत्तेजन देणाऱ्या कोणत्या काही गोष्टींना आपण टाळले पाहिजे आणि का बरे? (ब) यहोवाच्या सेवेत स्वतःला कामी लावण्यासाठी कशाने आपल्याला प्रवृत्त केले पाहिजे?
९ तथापि, इतरांना चुकीच्या मार्गाने उत्तेजन न देण्याविषयी खबरदारी घ्या. उदाहरणार्थ, ते अधिक करत नसल्याबद्दल दोषी असल्याचे आपण कदाचित अनवधानाने त्यांना जाणवू देऊ. आपण कदाचित त्यांची तुलना जे अधिक क्रियाशील आहेत अशांसोबत करण्याद्वारे निर्हेतूकपणे त्यांना लाजवू शकतो किंवा कदाचित कठोर दर्जे बनवून जे त्याप्रमाणे नाहीत अशांना कमी लेखू शकतो. अशा कोणत्याही पद्धतीमुळे काही जण थोड्या काळापुरते कार्य करण्यास प्रवृत्त होतील, परंतु पौलाने, ‘दोषी असल्याचे भासवण्यास व सत्कर्मे करावयास उत्तेजन द्या’, असे लिहिले नाही. आपण प्रीती करावयास उत्तेजन दिले पाहिजे, मग चांगल्या हेतूमुळे नंतर कार्य होतील. एखाद्याने अपेक्षापूर्ती केली नाही तर त्याच्याबद्दल मंडळीतील इतर जण काय विचार करतील, खासकरुन अशा भावनेमुळे कोणीही प्रवृत्त होऊ नये.—पडताळा २ करिंथकर ९:६, ७.
१०. इतरांच्या विश्वासावर आपण सत्ता गाजविणारे नाहीत हे आपण लक्षात का ठेवले पाहिजे?
१० एकदुसऱ्यांना उत्तेजन देण्याचा अर्थ एकमेकांना काबूत ठेवणे असा होत नाही. प्रेषित पौलाला देवाने बराच अधिकार दिला होता, तरी त्याने करिंथकर मंडळीला नम्रपणे आठवण करुन दिली: ‘आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजविणारे नाही.’ (२ करिंथकर १:२४) यहोवाच्या सेवेत इतरांनी किती केले पाहिजे हे ठरविण्याचे किंवा त्यांच्याकरता वैयक्तिक निर्णयात त्यांच्या विवेकावर वर्चस्व गाजविण्याचे काम आपले नाही, हे त्याच्याप्रमाणेच आपण सुद्धा नम्रपणे समजून घेतले तर, आपण “फाजील धार्मिक,” दुःखी, कठोर, नकारात्मक किंवा नियमांवर केंद्रित असण्याचे टाळू. (उपदेशक ७:१६) असे गुण उत्तेजन देत नाहीत; तर ते खिन्न करतात.
११. इस्त्राएलाच्या निवासमंडप बांधकामाच्या दिवसात देणग्या देण्याला कशाने प्रेरणा दिली आणि ते आज आपल्या दिवसात कसे खरे ठरू शकते?
११ प्राचीन इस्राएलात निवासमंडपाच्या बांधकामासाठी देणग्या देण्याच्याबाबतीत ज्याप्रकारचा उत्साह होता त्याच उत्साहाने यहोवाच्या सेवेत सर्व प्रयत्न करण्याची आपली इच्छा असली पाहिजे. निर्गम ३५:२१ सांगते: ‘नंतर ज्यांच्या अंतःकरणात स्फूर्ति झाली व ज्या कोणाला मनापासून इच्छा झाली त्याने कामासाठी यहोवाला देणगी आणली.’ त्यांना बळजबरीने भाग पाडले नाही, तर आंतरिक शक्तीमुळे ते प्रवृत्त झाले. वस्तुतः, इब्रीमध्ये येथे शब्दशः असे वाचले जाते की, “ज्या प्रत्येकाच्या हृदयाने त्यांना उंचावले होते” त्यांनी अशा देणग्या दिल्या. (तिरपा टाईप आमचा.) पुढे पाहू जाता, जेव्हा जेव्हा आपण एकत्र असतो तेव्हा तेव्हा एकदुसऱ्यांच्या हृदयांना उंचावण्याचा प्रयत्न आपण करु या. यहोवाचा आत्मा बाकीच्या गोष्टी करू शकतो.
‘एकमेकांस बोध करा’
१२. (अ) “बोध” यासाठी अनुवादित केलेल्या ग्रीक शब्दाचे काही अर्थ कोणते आहेत? (ब) ईयोबाचे सांत्वनकर्ते त्याला उत्तेजन देण्यात अपयशी कसे झाले? (क) आपण एकमेकांचा न्याय करण्यापासून दूर का राहिले पाहिजे?
१२ ‘एकमेकांस बोध’ करण्याविषयी पौलाने लिहिले तेव्हा त्याने पॅ·रा·का·लेइओ या ग्रीक शब्दाचे रूप वापरले. त्याचा अर्थ ‘मजबूत करणे, सांत्वन देणे’ असा देखील होतो. ग्रीक सेप्ट्यूजंट व्हर्शनमध्ये, हाच शब्द ईयोब २९:२५ मध्ये वापरला होता. तेथे ईयोबाचे वर्णन, शोक करणाऱ्यांना सांत्वन देणारा असे करण्यात आले होते. उपरोधिकपणे, ईयोब स्वतः खडतर परीक्षेत असताना त्याला अशाप्रकारचे कोणतेही उत्तेजन मिळाले नाही. त्याचे तीन “सांत्वनकर्ते” त्याचा न्याय करण्यात आणि त्याला भाषण देण्यात व्यग्र असल्यामुळे ते त्याला समजून घेण्यात किंवा त्याच्याविषयी समभावना दाखवण्यात उणे पडले. वस्तुतः, त्यांच्या संपूर्ण भाषणात त्यांनी एकदाही ईयोबाचे नाव घेऊन त्याचा उल्लेख केला नाही. (तुलना करा ईयोब ३३:१, ३१.) स्पष्टपणे, त्यांनी त्याच्याकडे एक व्यक्ती असे पाहण्याऐवजी एक समस्या अशा दृष्टीनेच पाहिले. म्हणून “तुम्ही माझ्या ठिकाणी असता तर!” असे जे ईयोबाने निराशेत म्हटले यात काही आश्चर्य नाही. (ईयोब १६:४) अशाचप्रकारे आज, कोणाला उत्तेजन द्यावयाची तुमची इच्छा असल्यास, समभावना दाखवा! न्याय करु नका. रोमकर १४:४ म्हणते त्याप्रमाणे, “दुसऱ्याच्या चाकराला दोष लावणारा तू कोण आहेस? तो स्थिर राहिला काय किंवा त्याचे पतन झाले काय, तो त्याच्या धन्याचा प्रश्न आहे. त्याला तर स्थिर करण्यात येईल; कारण त्याला स्थिर करण्यास त्याचा धनी समर्थ आहे.”
१३, १४. (अ) आपल्या बंधू आणि बहिणींचे सांत्वन करण्यासाठी त्यांना कोणत्या मूलभूत सत्याची खातरी पटवून देण्याची आपल्याला गरज आहे? (ब) देवदूताने दानीएलाला कसे दृढ केले?
१३ दुसरे थेस्सलनीकाकर २:१६, १७ मध्ये पॅ·रा·का·लेइओ याच्या रुपाचा आणि त्याच्या संबंधीत नामाचा “सांत्वन” असाही अनुवाद केला आहे: “आपला प्रभू येशू ख्रिस्त हा, आणि ज्याने आपल्यावर प्रीति करुन युगानुयुगाचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हास स्थिर करो.” पौल आपल्या अंतःकरणांना सांत्वन मिळणाऱ्या विचारांचा मेळ यहोवा आपल्यावर प्रीती करतो या मूलभूत सत्याने घालतो याकडे लक्ष द्या. यास्तव, त्या महत्त्वपूर्ण सत्याची खात्री करुन घेण्याद्वारे आपण एकमेकांना उत्तेजन आणि सांत्वन देऊ शकू.
१४ भयभीत दृष्टांत पाहिल्यावर एके प्रसंगी संदेष्टा दानीएल फारच बेचैन होता तेव्हा त्याने म्हटले: “मी निस्तेज होऊन मृतप्राय झालो; मला काहीच शक्ती राहिली नाही.” यहोवाने देवदूत पाठवून दानीएल त्याच्या नजरेत “परमप्रिय” असल्याची अनेक वेळा त्याला आठवण करुन दिली. याचा परिणाम काय झाला? दानीएलाने देवदूताला म्हटले: “तू माझ्यात हिंमत आणिली आहे.”—दानीएल १०:८, ११, १९.
१५. वडील आणि प्रवासी पर्यवेक्षकांनी शाबासीचे संतुलन सुधारणूकीसोबत कसे ठेवले पाहिजे?
१५ तर मग, इतरांना बोध करण्याचा आणखी एक मार्ग येथे आहे. त्यांची प्रशंसा करा! कठीण, निष्ठूर होणे फारच सहज आहे. काही वेळा खासपणे वडील आणि प्रवासी पर्यवेक्षकांकडून सुधारणा जरुरीच्या असतात हे ग्राह्य आहे. त्यांची दोष काढण्याची प्रवृत्ती आहे याऐवजी ते उत्सुकतेने उत्तेजन देणारे आहेत अशारितीने त्यांची आठवण ठेवणे चांगले असेल.
१६. (अ) खिन्न झालेल्यांना उत्तेजन देताना यहोवाच्या सेवेत अधिक करण्यासाठी त्यांना केवळ आर्जवणे नेहमीच पुरेसे का असणार नाही? (ब) एलीया खिन्न असताना यहोवाने त्याला कशाप्रकारे मदत केली?
१६ विशेषपणे खिन्न असलेल्यांना उत्तेजन देण्याची गरज आहे आणि विशेष म्हणजे आपण वडील असलो तर सहख्रिस्ती या नात्याने मदतीचा स्रोत असावे अशी अपेक्षा यहोवा आपल्याकडून करतो. (नीतीसूत्रे २१:१३) आपण काय करू शकतो? याचे उत्तर यहोवाच्या सेवेत अधिक करा असे त्यांना सांगण्याइतके सोपे असणार नाही. का बरे? कारण त्यावरुन त्यांची खिन्नता, ते पुरेसे कार्य करीत नसल्यामुळे आहे असे सूचित होईल. परिस्थिती नेहमीच अशी नसते. एके प्रसंगी संदेष्टा एलीया अतिशय खिन्न झाल्यामुळे त्याला मरण्याची इच्छा झाली; तरीपण, ही गोष्ट तो यहोवाच्या सेवेत अतिशय व्यग्र असलेल्या प्रसंगी घडली. यहोवाने त्याच्यासोबत कसा व्यवहार केला? त्याने व्यावहारिक मदत पुरवण्यासाठी देवदूताला पाठवले. एलीयाने यहोवाला आपल्या भावना व्यक्त केल्या. तो त्याच्या मृत वाडवडिलांसारखा निरुपयोगी, त्याचे कार्य पूर्णपणे निष्फळ ठरल्याचे आणि तो एकटाच आहे असे वाटल्याचे त्याने प्रकट केले. यहोवाने ऐकले व आपल्या अद्भुत सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याद्वारे त्याचे सांत्वन केले आणि तो एकटा मूळीच नाही तसेच त्याने सुरवात केलेले कार्य पूर्ण केले जाईल याची हमी दिली. यहोवाने एलीयाला सोबती देण्याचे देखील अभिवचन दिले. एलीयाने सोबत्याला तालीम दिल्यावर कालांतराने तो त्याची जागा घेणार होता.—१ राजे १९:१-२१.
१७. स्वतःविषयी अधिक कठोर असलेल्या व्यक्तीला एखादे वडील उत्तेजन कसे देऊ शकतील?
१७ किती उत्तेजनपर! अशाचप्रकारे आपल्यामधील भावनात्मकरित्या त्रस्त असलेल्यांना आपण उत्तेजन देऊ. ऐकण्याद्वारे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा! (याकोब १:१९) त्यांच्या वैयक्तिक गरजांनुसार शास्त्रवचनीय सांत्वन त्यांना द्या. (नीतीसूत्रे २५:११; १ थेस्सलनीकाकर ५:१४) जे स्वतःच्या बाबतीत अतिशय टिकात्मक आहेत अशांना यहोवा त्यांच्यावर प्रीती करतो आणि त्यांना मौल्यवान समजतो, याविषयी वडील दयाळूपणे शास्त्रवचनीय पुरावा देतील.a खंडणीची चर्चा, निरूपयोगी असल्याचे वाटणाऱ्यांना उत्तेजन देण्याचे शक्तिशाली साधन ठरू शकते. एखादी व्यक्ती गतकाळात केलेल्या पापांमुळे दुःखित असल्यास तिने खरा पश्चात्ताप केल्यास आणि अशा कोणत्याही सवयीला पूर्णपणे धिक्कारल्यास खंडणीने तिला शुद्ध केले आहे हे दाखवण्याची गरज असेल.—यशया १:१८.
१८. दुसऱ्याची शिकार झालेल्या व्यक्तीला, जसे की बलात्काराद्वारे बळी पडलेल्या व्यक्तीला उत्तेजन देण्यासाठी खंडणीच्या शिकवणीचा उपयोग कसा केला पाहिजे?
१८ अर्थातच, त्या शिकवणीचा उचित वापर करण्यासाठी त्या विशेष बाबीकडे वडील लक्ष देतील. एका उदाहरणाचा विचार करा: मोशेच्या नियमशास्त्रातील पशू बलिदानाने ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणाला चित्रित केले. सर्व पापांच्या प्रायश्चित्तांसाठी याची जरुरी होती. (लेवीय ४:२७, २८) तथापि, बलात्कारास बळी पडलेल्या व्यक्तीला पापार्पण करण्याची अशी अट नव्हती. नियमशास्त्रात म्हटले होते की तिला शिक्षा देण्यासारखे “काही करू नये.” (अनुवाद २२:२५-२७) अशाचप्रकारे आज, एखाद्या बहिणीवर हल्ला करुन तिच्यावर बलात्कार झाला असला आणि यामुळे तिला मलिन व निरूपयोगी वाटत असल्यास त्या पापाच्या शुद्धीकरणासाठी खंडणीच्या गरजेवर जोर देणे उचित असेल काय? कदापि नाही. तिच्यावर हल्ला झाला, त्यात तिने पाप केले नाही. बलात्कारी व्यक्तीने पाप केले म्हणून शुद्धीकरणाची गरज त्याला आहे. तथापि, खंडणी पुरवण्याद्वारे यहोवा आणि ख्रिस्ताने जी प्रीती दाखवली तिचा पुरावा म्हणून वापर करून ती स्त्री, कोणाच्या पापामुळे देवाच्या नजरेत अशुद्ध झालेली नाही तर, यहोवाच्या नजरेत मौल्यवान असून त्याच्या प्रीतीत राहते, हे दाखवले जाऊ शकते.—पडताळा मार्क ७:१८-२३; १ योहान ४:१६.
१९. आपल्या बंधू व बहिणीसोबतचा आपला सर्व सहवास उत्तेजन देणारा असण्याची अपेक्षा आपण का करू नये, पण आपला निर्धार काय असला पाहिजे?
१९ होय, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कोणतीही परिस्थिती असली, त्या व्यक्तीचा गतकाळ कितीही दुःखदायक परिस्थितीने ग्रासलेला असला तरीही, यहोवाच्या लोकांच्या मंडळीत तिला उत्तेजन मिळाले पाहिजे. ही गोष्ट, आपण व्यक्तिगतपणे एकमेकांकडे लक्ष देण्याचा, एकमेकांस उत्तेजन देण्याचा आणि एकत्र भेटतो तेव्हा एकमेकांस बोध करण्याचा प्रयत्न केला तर असे निश्चितच घडू शकते. तरीही, अपरिपूर्ण असल्यामुळे काही वेळा आपण सर्वच असे करण्यात उणे पडतो. अपरिहार्यपणे आपण एकमेकांना नाराज करतो इतकेच काय पण कधी कधी दुःखही देतो. या बाबतीत इतरांच्या अपयशांवर केंद्रिभूत होण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही कमतरतांवर केंद्रित झाला, तर मंडळीच्या बाबतीत फाजीलपणे टीकात्मक होण्याची जोखीम पत्करता आणि विशेषकरुन आपले एकत्र मिळण्याचे सोडून देण्याच्या पाशात पडता जो टाळण्याची मदत करण्यासाठी पौल बराच आवेशी होता. असे कधीही न होवो! हे जुने व्यवस्थीकरण अधिक धोकेदायक व त्रासदायक होत आहे तसे सभेतील आपली संगती अधिक उभारणीकारक बनविण्यासाठी शक्य असलेले सर्वकाही करण्याचा दृढ निश्चय आपण करु या—आणि यहोवाचा दिवस जवळ येत असल्याचे पाहत असताना अधिक करु या!
[तळटीपा]
a एखादे वडील अशा व्यक्तीबरोबर टेहळणी बुरूज तसेच अवेक! नियतकालिकातील लेखांची चर्चा करतील. उदाहरणार्थ, “अपात्री कृपेपासून तुम्ही लाभ मिळवू शकता का?” आणि “खिन्नतेविरुद्धच्या झगड्यावर विजय मिळवणे.”—टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५ आणि मार्च १, १९९०.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ या शेवटल्या काळात आपल्या सभा आणि संगती उत्तेजन देणाऱ्या असणे महत्त्वाचे का आहे?
◻ एकमेकांकडे लक्ष देण्याचा अर्थ काय होतो?
◻ एकमेकांना उत्तेजन देण्याचा अर्थ काय होतो?
◻ एकमेकांस बोध करण्यात काय समाविष्ट आहे?
◻ खिन्न आणि दुःखी लोकांना उत्तेजित कसे केले जाऊ शकते?
[१६ पानांवरील चित्रं]
आदरातिथ्य एकमेकांना चांगल्यारीतीने ओळखण्यास आपली मदत करते
[१८ पानांवरील चित्रं]
एलीया खिन्न असताना यहोवाने दयाळूपणे त्याचे सांत्वन केले