देवाने आपले नशीब आधीच ठरवले आहे का?
“पूर्वनियती, ही नेहमीच गैरसमजूतीची संज्ञा कधीच वापरली नसती तर किती तरी कल्पित समस्या टाळता आल्या असत्या.” परंतु, तुम्ही “पूर्वनियती” हा शब्द वापरला किंवा वापरत असताना ऐकला असेल तर वरील वाक्याचा काय अर्थ होतो याचा कदाचित तुम्हाला विचार आला असावा.
थीओ या अलीकडच्या फ्रेंच कॅथलिक विश्वकोषानुसार, “पूर्वनियती” हा शब्द टाळलेलाच बरा. आणखी एक पुस्तक म्हणते: “आज, असे दिसते की पूर्वनियती वेदांत्तीय वादविवादाचा, तसेच प्रोटेस्टंट लोकांच्या शिकवणीचा देखील केंद्रभाग राहिलेला नाही.”
तरीसुद्धा, पूर्वनियतीच्या प्रश्नाने संपूर्ण इतिहासात अनेक लोकांना विचलित केले आहे. तो प्रश्न वादविवादाच्या अगदी केंद्रभागी होता ज्यामुळे धर्मसुधारणा उदयास आली, शिवाय कॅथलिक चर्चमध्ये देखील तो अनेक शतकांपासून संतप्त चर्चेचा विषय होता. आज त्याच्यावर कमी वादविवाद असला तरी, ती एक समस्याच राहिली आहे. एखाद्याची पूर्वनियती आधीच लिहिण्यात आली होती का हे कोणाला जाणण्यास आवडणार नाही?
पूर्वनियती—या शब्दाचा अर्थ
“पूर्वनियती” या शब्दाचा अर्थ अनेक चर्चमध्ये काय लावला जातो? डिक्शन्रे डी थिओलॉजी कॅथलिक त्याला “ज्यांना नावाने संबोधले आहे अशा विशिष्ट लोकांना, सार्वकालिक जीवनाप्रत आणण्याचा ईश्वरी हेतू” असे मानले जाते. सर्वसामान्यपणे असा विचार केला जातो, की ज्यांना “नावाने संबोधले आहे” ते निवडलेले लोक, प्रेषित पौलाने रोमकरांना लिहिलेल्या त्याच्या पत्रात ज्यांचा उल्लेख केला आहे त्यांना चित्रित करतात. पुढील शब्दामध्ये त्याने म्हटले: “देवावर प्रीति करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. . . . आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले; . . . ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणहि केले. ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानहि ठरविले; आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्यांचे त्याने गौरवहि केले.”—रोमकर ८:२८-३०, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.
काही लोकांना, स्वर्गामध्ये ख्रिस्ताच्या गौरवात सहभाग घेण्यासाठी त्यांचा जन्म होण्यापूर्वीच देवाने निवडले होते असे आपण गृहीत धरू या. ते आम्हाला त्या लांबलचक वादविवादाकडे निरवते की: देव ज्यांना वाचवू इच्छितो अशांना तो त्याच्या लहरीप्रमाणे निवडतो, की लोकांकडे त्याची मर्जी प्राप्त करण्याची व त्याला धरुन राहण्याची स्वतंत्र इच्छा आणि भूमिका आहे?
ऑगस्टीन, पूर्वनियतीचा जनक
इतर चर्च पाळकांनी पूर्वीच पूर्वनियतीविषयी लिहिले असले तरी, ऑगस्टीनने (सा. यु. ३५४-४३०) कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या दोन्ही चर्चसाठी ह्या शिकवणीचा पाया घातल्याचे सामान्यपणे मानले जाते. ऑगस्टीनप्रमाणे, धार्मिकांना चिरकालिक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवाने आधीच पूर्वनियत केले आहे. दुसऱ्या बाजूला पाहता, पूर्वनियती या शब्दाच्या अगदी अचूक अर्थानुसार देवाने ज्यांना पूर्वनियत केले नाही त्या अधार्मिकांना त्यांच्या पापासाठी दंड, ही योग्य शिक्षा मिळणार. ऑगस्टीनच्या स्पष्टीकरणाने स्वतंत्र इच्छेला कमी प्रमाणात विचारात घेतले, अशाप्रकारे अनेक वादविवादासाठी मार्ग मोकळा झाला.
ऑगस्टीनचे वारस
पूर्वनियती आणि स्वतंत्र इच्छेबद्दलचा वादविवाद मध्य युगादरम्यान पुन्हा पुन्हा घडत होता आणि धर्मसुधारणेदरम्यान तो निकरावर आला. लुथरचा विश्वास होता की देव, निवडलेल्यांची भविष्यातील कार्ये किंवा सत्कर्मे आगाऊ न पाहता त्याच्या स्वतंत्र इच्छेनुसार पूर्वनियती ठरवतो. कॅल्वीन तर अधिकच मूलगामी समाप्तीस येऊन पोहंचला कारण पूर्वनियतीबद्दलच्या त्याच्या शिकवणीच्या दोन बाजू होत्या: काहींना चिरकालिक तारणासाठी व इतरांना चिरकालिक दंडासाठी पूर्वनियत केले आहे. परंतु कॅल्वीननेसुद्धा, देवाची निवड लहरीप्रमाणे, होय, अनाकलनीय असल्याचे समजले.
पूर्वनियतीचा वाद आणि त्याच्याशी जवळून संबंधित असलेल्या “कृपेचा” प्रश्न—देव लोकांना ज्या कृत्याच्या आधारावर तारतो आणि धार्मिक म्हणून घोषित करतो त्या कृत्यासाठी चर्चमध्ये वापरला जाणारा शब्द—इतका मोठा झाला, की १६११ मध्ये कॅथलिक पोपच्या सभेने पूर्वनियती या विषयावर संमतिविना काहीही प्रकाशित करण्यास मनाई केली. कॅथलिक चर्चमध्ये, ऑगस्टीनच्या शिकवणीला १७ आणि १८ व्या शतकाच्या फ्रेंच जॅनसेनीस्टकडून दृढ पाठिंबा मिळाला. त्यांनी ख्रिस्ती विश्वासाचे सर्वात कडक आणि उत्तम रूपाचे समर्थन केले आणि अमीर-उमरावांमध्ये त्यांचे शिष्य देखील होते. तरीही, या विषयावरचा वाद शांत झाला नव्हता. राजा लुईस चौदावा याने जॅनसेनीस्ट मताचा उगमस्थान, पोर्ट-रॉयलच्या मठाच्या नाशाचा हुकूम दिला.
प्रोटेस्टंट सुधारक चर्चमध्ये, या विषयावरच्या चर्चेचा शेवटच होत नव्हता. इतर धार्मिक गटांसोबत, जेकबस आर्मिनियसचे अनुयायी ज्यांना रेमोस्ट्रन्टस् म्हणतात ते असा विश्वास करू लागले, की मनुष्याला त्याच्या स्वतःच्या तारणासाठी झटावे लागते. डॉर्ड्रेच्य याच्या प्रोटेस्टंट सायनॉइडने कॅल्वीनच्या कडक कर्मठ रुपाचा स्वीकार केला तेव्हा हा प्रश्न तात्पुरता मिटला. लावेंचर डी ला रिफॉर्म—ली मॉन्ड डी जीन कॅल्वीन या पुस्तकानुसार, जर्मनीत पूर्वनियती आणि स्वतंत्र इच्छेवरील झगड्यामुळे “समेट करण्यासाठी केलेले दीर्घ पल्ल्याचे अपयशी प्रयत्न, तसेच वेदांत्तवाद्यांना अपशब्द बोलणे, तुरुंगवास आणि हद्दपारी” या गोष्टी अस्तित्वात आल्या.
पूर्वनियती की स्वतंत्र इच्छा?
सुरवातीपासूनच, पूर्वनियती आणि स्वतंत्र इच्छा या दोन अगदी विरूद्ध कल्पनांनी अनेक संतप्त वादांचा उद्रेक केला. ऑगस्टीन त्याच्या बाजूने या विसंगतीचे स्पष्टीकरण देऊ शकला नाही. कॅल्वीनला देखील असे दिसून आले की ते देवाच्या सार्वभौम इच्छेच्या अभिव्यक्तीप्रमाणे होते आणि यास्तव गूढ आहे.
परंतु देवाचे गुण आणि व्यक्तिमत्त्व याबद्दल बायबलचे प्रकटीकरण आम्हाला या प्रश्नांना अधिक स्पष्टरीत्या समजण्यास मदत करते का? पुढील लेख या मुद्यांचे आणखी सविस्तरपणे परीक्षण करील.
[४ पानांवरील चित्रं]
कॅल्वीन
लुथर
जेन्सन