नीतिमानांचे पुनरुत्थान होईल
“नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल . . . तीच आशा मी देवाकडे पाहून धरितो.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५.
१. आदाम आणि हव्वा पापात पडल्यापासून मानवजात कोणत्या परिस्थितीचा सामना करीत आहे?
“जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.” (उपदेशक ९:१०) या काही उचितपणे निवडलेल्या शब्दांमध्ये सुज्ञ शलमोन राजा, आपले पहिले पालक, आदाम व हव्वा हे पापात पडल्यापासून मानवजातीची प्रत्येक पिढी सामना करत असलेल्या परिस्थितीचे वर्णन करतो. मृत्यूने कालांतराने—श्रीमंत, गरीब, राजा आणि सामान्य मनुष्य, विश्वासू आणि विश्वासहीन अशा सर्वांना गिळंकृत केले आहे व हा काही अपवाद नाही. खरोखर, मृत्यूने “राज्य केले” आहे.—रोमकर ५:१७, पं. र. भाषांतर.
२. या अंतिम समयात काही विश्वासू जण हताश का झाले असतील?
२ वैद्यकीय शास्त्रामध्ये नवीन प्रगती झाली असूनही, मृत्यू आजही राज्य करीत आहे. यात आश्चर्य नसले तरी, शेवटी या दीर्घकालीन शत्रूच्या समोरासमोर आल्यावर काहीजण थोडेसे हताश झाले आहेत. का बरे? मागे १९२० च्या दशकात वॉचटावर संस्थेने “आता जिवंत असलेले लाखो जण कधीही मरणार नाहीत,” हा संदेश घोषित केला. हे लाखो जण कोण असतील? मेंढरे आणि शेरड्यांबद्दल येशूच्या विवेचनांमध्ये सांगितलेली “मेंढरे” होय. (मत्तय २५:३१-४६) मेंढरासमान लोक अंतासमयी प्रकट होतील असे भाकीत केले होते. त्यांना नंदनवनमय पृथ्वीवरील सार्वकालिक जीवनाची आशा असेल. काळ उलटला तसे, यहोवाच्या उद्देशांमध्ये या ‘मेंढरांच्या’ भूमिकेची चांगली समज देवाच्या लोकांना प्राप्त झाली. या आज्ञाधारक जणांना हट्टी “शेरडांपासून” वेगळे करायचे आहे याची जाणीव झाली. शेरडांचा नाश झाल्यावर, मेंढरे त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्याच्या पार्थिव ठिकाणाचे वारसदार होतील.
मेंढरासमान जणांचे एकत्रीकरण
३. सन १९३५ पासून देवाच्या लोकांनी कोणत्या कार्यावर लक्ष केंद्रित केले आहे?
३ सन १९३५ मध्ये सुरवात होऊन, ‘विश्वासू दासाने’ अशा मेंढरासमान जणांना शोधण्यात आणि त्यांना यहोवाच्या संघटनेकडे आणण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. (मत्तय २४:४५; योहान १०:१६) या इच्छुक शिकाऊ ख्रिश्चनांना, येशू आता यहोवाच्या स्वर्गीय राज्यात राज्य करीत आहे आणि या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या अंताचा तसेच नीतीमत्व वास करील असे नवीन जग आणण्याची वेळ वेगाने जवळ येत आहे याची जाणीव झाली आहे. (२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण १२:१०) त्या नवीन जगात, “तो मृत्यु कायमचा नाहीसा करितो,” हे यशयाचे उत्तेजनात्मक शब्द पूर्ण होतील.—यशया २५:८.
४. हर्मगिदोनात यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन पाहण्याची उत्सुकतेने आशा बाळगून असले, तरी इतर मेंढरांतील पुष्कळांचे काय झाले आहे?
४ सैतानाच्या जगाचा अंत इतका समीप असल्यामुळे, मोठी बाबेल आणि सैतानाच्या उर्वरित भागावर क्लेश येतो तेव्हा यहोवाच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले जाईल त्या काळापर्यंत जिवंत राहण्यास मेंढरासमान ख्रिश्चनांना अतिशय आवडेल. (प्रकटीकरण १९:१-३, १९-२१) पुष्कळांबाबतीत तसे घडलेले नाही. कधीही मरणार नाही अशा “लाखो” जणांपैकी असण्याची आशा बाळगणारे पुष्कळ जण मरण पावले आहेत. काहींचा सत्यासाठी, तुरुंगात आणि छळ छावण्यांमध्ये किंवा धर्मवेड्यांच्या हातून वध करण्यात आला. इतरांचा अपघातांमध्ये किंवा तथाकथित नैसर्गिक कारणांमुळे—आजार आणि वृद्धापकाळामुळे मृत्यू घडला आहे. (स्तोत्र ९०:९, १०; उपदेशक ९:११) स्पष्टतः, अंत येण्याआधी पुष्कळांचा मृत्यू होईल. तर मग, असे लोक नीतीमत्व वास करणाऱ्या नवीन जगाच्या अभिवचनाची पूर्तता कशी पाहतील?
पुनरुत्थानाची आशा
५, ६. हर्मगिदोनाच्या आधी मरण पावणाऱ्या व पार्थिव आशा असलेल्यांना कोणते भवितव्य आहे?
५ प्रेषित पौलाने फेलिक्स या रोमी सुभेदारासमोर बोलताना याचे उत्तर दिले. प्रेषितांची कृत्ये २४:१५ मध्ये नोंदल्याप्रमाणे, पौलाने धैर्याने म्हटले: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल . . . तीच आशा मी देवाकडे पाहून धरितो.” पुनरुत्थानाची आशा आपल्याला सर्वात प्रतिकूल परिस्थितींमध्ये धैर्य देते. त्या आशेमुळेच, आजारी असणारे आणि आपण मरणार आहोत अशी जाणीव होणाऱ्या आपल्या प्रिय मित्रांचे धैर्य खचत नाही. काहीही झाले, तरी आपल्याला विश्वासूपणाचा मोबदला प्राप्त होईल हे त्यांना माहीत आहे. पुनरुत्थानाच्या आशेमुळे, छळकर्त्यांकडून मृत्यूचा सामना करीत असलेल्या आपल्या धीट बंधू आणि बहिणींना माहीत आहे, की त्यांचे छळकर्ते कोणत्याच प्रकारे विजयी होणार नाहीत. (मत्तय १०:२८) मंडळीत कोणी व्यक्ती मरण पावल्यावर, आपल्याला तिला गमावल्याचे दुःख होते. त्याच वेळी, तो किंवा ती इतर मेंढरांपैकी असल्यास, शेवटपर्यंत आपला समविश्वासू निष्ठावान राहिला आणि देवाच्या नवीन जगातील भवितव्याची खात्री असून तो आता विश्राम करीत आहे याचा आपल्याला आनंद वाटतो.—१ थेस्सलनीकाकर ४:१३.
६ होय, पुनरुत्थानाची आशा आपल्या विश्वासाचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. तथापि, पुनरुत्थानावरील आपला विश्वास इतका भक्कम का आहे तसेच ती आशा आणखी कोणाला आहे?
७. पुनरुत्थान काय आहे आणि त्याची निश्चितता व्यक्त करणारी काही शास्त्रवचने कोणती आहेत?
७ “पुनरुत्थान” यासाठी असणारा ग्रीक शब्द ॲ·नाʹस्टे·सीस याचा अक्षरशः अर्थ “उभे राहणे” असा आहे. मूलतः ते मृतातून उठण्याला सूचित करते. मनोरंजक गोष्ट अशी, की इब्री शास्त्रवचनांमध्ये “पुनरुत्थान” हा प्रत्यक्ष शब्द आढळत नाही, परंतु पुनरुत्थानाची आशा तेथे स्पष्टपणे व्यक्त केली आहे. उदाहरणार्थ, ईयोबाने त्याच्या दुःखाच्या वेळी काढलेल्या या शब्दांवरून आपण ते पाहतो: ‘तू मला अधोलोकात लपविशील, . . . माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करिशील!’ (ईयोब १४:१३) त्याचप्रमाणे, होशेय १३:१४ मध्ये आपण वाचतो: ‘अधोलोकाच्या तावडीतून मी त्यांना उद्धरीन; मृत्यूपासून त्यांना मुक्त करीन. अरे, मृत्यू, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? अरे अधोलोका, तुजकडून होणारा विनाश कोठे आहे?’ १ करिंथकर १५:५५ मध्ये प्रेषित पौलाने हे शब्द उद्धृत केले आणि पुनरुत्थानाद्वारे मृत्यूवर भाकीत केलेला विजय साध्य केला आहे हे दाखवले. (अर्थात, त्या शास्त्रवचनात पौल स्वर्गीय पुनरुत्थानाविषयी बोलत होता.)
विश्वास ठेवणारे ‘नीतिमान ठरतात’
८, ९. (अ) नीतिमानांच्या पुनरुत्थानात अपरिपूर्ण मानवांचा भाग कसा असेल? (ब) मृत्यूने शेवट न होणाऱ्या जीवनाच्या आशेचा आधार काय आहे?
८ परिच्छेद ५ मध्ये फेलिक्सला उद्देशून केलेल्या विधानात, नीतिमान आणि अनीतिमान या दोघांचे पुनरुत्थान होईल असे पौलाने म्हटले. उठवले जातील असे नीतिमान जण कोण आहेत? कोणताही मनुष्य स्वाभाविकरित्या नीतिमान नसतो. आपण सर्वजण जन्मतःच पापी आहोत आणि आपल्या संपूर्ण जीवनात आपण पाप करत राहतो—हे आपल्याला दोन कारणांसाठी मरणास पात्र ठरवते. (रोमकर ५:१२; ६:२३) तथापि, बायबलमध्ये आपल्याला ‘नीतिमान ठरणे’ ही संज्ञा आढळते. (रोमकर ३:२८) अपरिपूर्ण असतानाही यहोवाने पापांची क्षमा केलेल्या मानवांना हे सूचित होते.
९ हे वक्तव्य मुख्यतः स्वर्गीय आशा बाळगणाऱ्या अभिषिक्त ख्रिश्चनांच्या बाबतीत वापरले जाते. रोमकर ५:१ मध्ये प्रेषित पौल म्हणतो: “म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपणाला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांति आहे.” सर्व अभिषिक्त ख्रिस्ती, विश्वासामुळे नीतिमान ठरवले जातात. कशावरील विश्वास? पौल रोमकराच्या पुस्तकात त्याची काही तपशीलवार माहिती देतो, की तो येशू ख्रिस्तावरील विश्वास आहे. (रोमकर १०:४, ९, १०) येशू एक परिपूर्ण व्यक्ती या नात्याने मरण पावला आणि त्यानंतर त्याला मृतातून उठवण्यात आले व आपल्यासाठी दिलेल्या त्याच्या मानवी जीवनाचे मूल्य सादर करण्यासाठी तो वर स्वर्गात गेला. (इब्रीयांस ७:२६, २७; ९:११, १२) यहोवाने ते बलिदान स्वीकारले, तेव्हा परिणामतः येशूने मानवजातीला पाप आणि मृत्यूच्या दास्यातून विकत घेतले. या व्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याचा पुष्कळ लाभ होतो. (१ करिंथकर १५:४५) त्या आधारावर, विश्वासू पुरुष आणि स्त्रियांना, मृत्यूसारखा भयंकर शत्रू कधीही शेवट करू शकणार नाही असे जीवन प्राप्त करण्याची आशा आहे.—योहान ३:१६.
१०, ११. (अ) विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चनांना भवितव्यात कोणते पुनरुत्थान आहे? (ब) पूर्वीच्या ख्रिस्ती उपासकांना कोणत्या पुनरुत्थानाची आशा होती?
१० येशूच्या खंडणी बलिदानाच्या मदतीने, विश्वासू अभिषिक्त जणांना नीतिमान ठरवले गेल्यामुळे येशूप्रमाणे अमर आत्मिक प्राणी या नात्याने पुनरुत्थित होण्याची निश्चित आशा आहे. (प्रकटीकरण २:१०) प्रकटीकरण २०:६ मध्ये त्यांच्या पुनरुत्थानाचा उल्लेख केला आहे, ते म्हणते: “पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करितील.” हे स्वर्गीय पुनरुत्थान आहे. तथापि, याकडे लक्ष द्या, की बायबल त्याला ‘पहिले पुनरुत्थान’ असे म्हणते. पुढे अजूनही पुनरुत्थान व्हावयाचे आहे असा अर्थ त्यातून ध्वनित होतो.
११ इब्रीयांस ११ अध्यायात पौलाने, यहोवा देवावर मजबूत विश्वास प्रकट केलेल्या देवाच्या पूर्वीच्या ख्रिस्ती सेवकांची मोठी यादी दिली आहे. यांचा देखील पुनरुत्थानावर विश्वास होता. त्या अध्यायाच्या ३५ वचनात, पौल इस्राएलाच्या इतिहासात घडलेल्या अद्भुत पुनरुत्थानांबद्दल बोलतो, तो म्हणतो: “स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सोसले.” प्राचीन काळातील ते विश्वासू साक्षीदार, उदाहरणार्थ, एलीया आणि अलीशा यांचा समावेश असणाऱ्यांपेक्षा उत्तम पुनरुत्थान मिळण्याची वाट पाहू शकत होते. (१ राजे १७:१७-२२; २ राजे ४:३२-३७; १३:२०, २१) देवाच्या सेवकांना त्यांच्या विश्वासासाठी छळण्यात येणार नाही अशा जगातील पुनरुत्थानाची आशा त्यांना होती. ते असे जग होते जेथे स्त्रिया त्यांच्या प्रियजणांना मृत्यूमध्ये गमावणार नव्हत्या. होय, आपल्याला आशा असणाऱ्या नवीन जगातच मृतातून उठण्याची वाट त्यांनी पाहिली. (यशया ६५:१७-२५) या नवीन जगाबद्दल यहोवाने आपल्याला जितके प्रकट केले आहे तितके त्यांना प्रकट केले नव्हते. तरीसुद्धा, ते येत आहे हे त्यांना माहीत होते आणि त्यात असण्याची त्यांची इच्छा होती.
पार्थिव पुनरुत्थान
१२. पूर्वीचे विश्वासू ख्रिस्ती जण नीतिमान ठरवले गेले होते का? स्पष्ट करा.
१२ पूर्वीच्या या विश्वासू ख्रिस्ती पुरुषांचे आणि स्त्रियांचे त्या नवीन जगातील उठणे नीतिमानांच्या पुनरुत्थानाचा भाग आहे असा विचार आपण करावा का? स्पष्टतः होय, कारण बायबल त्यांचा नीतिमान म्हणून उल्लेख करते. उदाहरणार्थ, शिष्य याकोब प्राचीन काळात, नीतिमान ठरवलेल्या एका पुरुष व स्त्रीचा उल्लेख करतो. तो पुरुष अब्राहाम होता व तोच इब्री जातीचा पूर्वज होता. त्याच्या बाबतीत आपण वाचतो: “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला, आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले; आणि त्याला ‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले.” ही स्त्री राहाब होती. ती गैर इस्राएली असून तिने यहोवावर विश्वास ठेवला आणि इब्री राष्ट्राचा एक भाग बनली. (याकोब २:२३-२५) अशाप्रकारे, यहोवावर आणि त्याच्या अभिवचनांवर मजबूत विश्वास प्रकट केलेल्या आणि मृत्यूपर्यंत विश्वासू राहिलेल्या प्राचीन काळातील पुरुष आणि स्त्रियांना त्यांच्या विश्वासाच्या आधारावर यहोवाद्वारे नीतिमान असे ठरवण्यात आले. ते निश्चितच, ‘नीतिमानांच्या पुनरुत्थानात’ वाटेकरी असतील.
१३, १४. (अ) पार्थिव आशा बाळगणारे ख्रिस्ती नीतिमान ठरवले जाऊ शकतात हे आपल्याला कसे ठाऊक आहे? (ब) त्यांच्यासाठी याचा काय अर्थ आहे?
१३ तथापि, पार्थिव आशा बाळगून असणारे व यहोवाला स्वतःचे समर्पण करणाऱ्या आणि या शेवटल्या काळी विश्वासू राहून मरण पावणाऱ्या मेंढरासमान व्यक्तींबद्दल काय? नीतिमानांच्या पुनरुत्थानात त्यांचाही वाटा असेल का? बहुतेक तसेच असावे. प्रेषित योहानाने दृष्टांतात अशाच विश्वासू जणांचा मोठा लोकसमुदाय पाहिला. तो त्यांचे वर्णन कसे करतो याकडे लक्ष द्या: “मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा, शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते: ‘राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे.’”—प्रकटीकरण ७:९, १०.
१४ या लीन जणांना त्यांच्या तारणाची पूर्णपणे खात्री आहे आणि ते यहोवा आणि येशूला, म्हणजेच ‘कोकऱ्याला’ त्याचे श्रेय देतात. त्याशिवाय, ते सर्वजण शुभ्र झगे परिधान करून यहोवासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे राहतात. शुभ्र वस्त्रांमध्ये का? योहानाला स्वर्गीय प्राणी सांगतो: “ह्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत.” (प्रकटीकरण ७:१४) बायबलमध्ये, शुभ्र हे शुद्धता, नीतिमत्त्व ह्याचे प्रतीक आहे. (स्तोत्र ५१:७; दानीएल १२:१०; प्रकटीकरण १९:८) मोठ्या लोकसमुदायाने शुभ्र वस्त्रे परिधान केले आहे या वास्तविकतेचा अर्थ, यहोवा त्यांना नीतिमान लेखतो. ते कसे शक्य आहे? कारण त्यांनी कोकऱ्याच्या रक्तात आपली वस्त्रे धुतली आहेत. ते येशू ख्रिस्ताच्या ओतलेल्या रक्तावर विश्वास प्रकट करतात आणि अशाप्रकारे मोठ्या संकटातून वाचण्याच्या हेतूने त्यांना देवाचे मित्र म्हणून नीतिमान ठरवण्यात आले आहे. यास्तव, मोठ्या संकटाच्या आधी मरण पावणारा व आता ‘मोठ्या लोकसमुदायाचा’ भाग असणारा कोणताही विश्वासू समर्पित ख्रिश्चन नीतिमानांच्या पार्थिव पुनरुत्थानात भाग मिळवण्याची खात्री बाळगू शकतो.
१५. नीतिमान आणि अनीतिमान या दोघांचे पुनरुत्थान होणार असल्यामुळे नीतिमानांच्या पुनरुत्थानाचा काय फायदा आहे?
१५ त्या पुनरुत्थानाचे वर्णन प्रकटीकरण २० अध्याय आणि १३ व्या वचनात या शब्दांमध्ये दिले आहे: “समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यु व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले; आणि ज्यांच्या त्यांच्या कृत्यांप्रमाणे प्रत्येकाचा न्याय ठरविण्यात आला.” अशाप्रकारे, यहोवाच्या हजार वर्षीय न्यायाच्या महान दिवशी देवाच्या स्मरणातील सर्वांचे—नीतिमान आणि अनीतिमान यांचे पुनरुत्थान होईल. (प्रेषितांची कृत्ये १७:३१) तथापि, नीतिमानांसाठी हे किती चांगले असेल! त्यांनी आधीच विश्वासू जीवन व्यतीत केले आहे. यहोवासोबत त्यांचा आधीच नजीकचा नातेसंबंध आहे आणि त्याचे उद्देश साध्य होतील याची त्यांना खात्री आहे. ख्रिस्त-पूर्व युगातील नीतिमान साक्षीदार मृतातून उठतील आणि संतानाविषयी यहोवाची अभिवचने कशी पूर्ण झाली याबद्दल जाणून घेण्यास ते उत्सुक असतील. (१ पेत्र १:१०-१२) आपल्या दिवसात यहोवा ज्यांना नीतिमान लेखतो त्या इतर मेंढरातील लोक कबरेतून बाहेर येतील. या व्यवस्थीकरणात सुवार्तेची घोषणा करताना ते बोलत होते त्या नंदनवनमय पृथ्वीला पाहण्यास ते उत्सुक असतील. ती वेळ किती आनंदाची असेल!
१६. आपल्या समयात मरण पावणाऱ्यांच्या न्यायाच्या दिवसातील पुनरुत्थानाबद्दल आपण काय म्हणू शकतो?
१६ त्या हजार वर्षीय न्यायाच्या दिवशी, सैतानाच्या व्यवस्थीकरणाच्या या शेवटल्या वर्षांमध्ये जे विश्वासू राहून मरण पावले त्यांचे पुनरुत्थान नक्की केव्हा होईल? बायबल त्याबद्दल काही सांगत नाही. तथापि, नीतिमान ठरलेल्यांचे आणि आपल्या समयात मरण पावणाऱ्यांचे पुनरुत्थान लवकर होईल. अशाप्रकारे ते आधीच्या पिढींचे मृतातून स्वागत करण्याच्या कार्यात हर्मगिदोनातून बचावलेल्यांच्या मोठ्या लोकसमुदायासोबत भाग घेऊ शकतील असा विचार करणे रास्त ठरणार नाही का? होय, निश्चितच!
सांत्वन देणारी आशा
१७, १८. (अ) पुनरुत्थानाची आशा कोणते सांत्वन पुरवते? (ब) आपण यहोवाबद्दल काय घोषित करण्यास प्रवृत्त होतो?
१७ पुनरुत्थानाची आशा आज सर्व ख्रिश्चनांना बळकटी आणि सांत्वन देते. आपण विश्वासू राहिल्यास, कोणताही अकल्पित प्रसंग किंवा शत्रू आपले बक्षीस हिरावून घेऊ शकत नाही! उदाहरणार्थ, १९९२ यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक पुस्तक (इंग्रजी) याच्या पृष्ठ १७७ वर इथियोपियातील धैर्यवान ख्रिश्चनांचे फोटो आहेत जे आपल्या विश्वासाची हातमिळवणी करण्याऐवजी मरण पावले. मथळा असा आहे: “पुनरुत्थानात आपण पाहण्याची अपेक्षा करतो असे चेहरे.” अशांना तसेच मृत्यूचा सामना करताना अशाचप्रकारचा विश्वासूपणा दाखवलेल्या इतर अगणित लोकांना जाणून घेणे हा किती मोठा विशेषाधिकार असेल!
१८ वयोमान किंवा आजारपणामुळे मोठे संकट पार करता न येणाऱ्या आपल्या स्वतःच्या प्रियजनांबद्दल आणि मित्रांबद्दल काय? पुनरुत्थानाच्या आशेनुरुप ते विश्वासू राहिले, तर त्यांना एक सुंदर भवितव्य आहे. आपण देखील येशूच्या खंडणी बलिदानावर धैर्याने विश्वास प्रकट केला, तर आपल्याला एक सुंदर भवितव्य आहे. का बरे? कारण पौलाप्रमाणे “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल” अशी आपण आशा बाळगतो. आपल्या संपूर्ण अंतःकरणाने आपण या आशेबद्दल यहोवाचे आभार मानतो. निश्चितच ते आपल्याला स्तोत्रकर्त्याचे शब्द ध्वनित करण्यास उत्तेजित करतात: “राष्ट्रांमध्ये [देवाचे] गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुतकृत्ये जाहीर करा. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे.”—स्तोत्र ९६:३, ४.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
▫ पार्थिव पुनरुत्थानाच्या आशेची खात्री देण्यासाठी कोणती शास्त्रवचने मदत करतात?
▫ ख्रिस्ती आता कोणत्या आधारावर नीतिमान ठरवले जातात?
▫ पुनरुत्थानाची आशा आपल्याला धैर्य आणि ठाम निश्चयीपणा कशी देते?
[९ पानांवरील चित्रं]
पौलाप्रमाणे, अभिषिक्त ख्रिस्ती स्वर्गीय पुनरुत्थानाची आशा बाळगून आहेत