एकाकीपणाला तुमच्या जीवनावर हानीकारक परिणाम करू देऊ नका
एकाकीपणा वृद्ध आणि तरुणांच्या जीवनावर एकसमान हानीकारक परिणाम करू शकतो. लालपुस्तक (इंग्रजी) मासिकात, ज्युडिथ व्हायर्स्ट ही लेखिका म्हणते की: “हृदयावर दगड ठेवल्यावर जसे जड वाटते तसेच एकाकीपणा भारावून टाकतो. . . . एकाकीपणा आम्हाला शून्य व निराश करतो. एकाकीपणामुळे आम्हाला मातृहीन मुलासारखे, वाट चुकलेल्या मेंढरासारखे वाटते. या अफाट व उपेक्षित जगात खूप लहान आणि हरवल्यासारखे वाटते.”—सप्टेंबर १९९१.
मित्रांपासून ताटातूट, अनोळखी परिसर, घटस्फोट, दुःख किंवा दळणवळणात खंड—या सर्व गोष्टी तुम्हाला एकाकी वाटण्यास कारणीभूत ठरू शकतात. इतर लोकांच्या सहवासात असताना देखील, काही तीव्रपणे एकाकी असतात.
तुम्ही काय करू शकता?
तुम्हाला एकाकीपणा जर आलाच तर तुम्ही एखाद्या असाहाय्य बळीप्रमाणे त्याच्या आहारी जावे का? हळूहळू तुमचा नाश करण्यास किंवा जगण्याच्या तुमच्या इच्छेला कमी करण्याचा प्रयत्न करणारा एकाकीपणा टाळण्यासाठी तुम्ही काही करू शकता का? होय, तुम्ही करू शकता. पुष्कळ मदतदायी सल्ला उपलब्ध आहे. शिवाय देवाचे प्रेरित वचन, पवित्र शास्त्रात योग्य सल्ले दिले आहेत. एकाकीपणाविरूद्ध लढण्यासाठी तुम्हाला कदाचित अशाचप्रकारच्या उत्तेजनाची गरज असेल.—मत्तय ११:२८, २९.
उदाहरणार्थ, तुम्हाला रूथविषयी वाचल्यावर उत्तेजनकारक वाटेल. ही तरुण स्त्री ३,००० वर्षांआधी मध्यपूर्वेत रहात होती. एकाकीपणाला ती अगदी सहजरीत्या बळी पडू शकत होती. तिच्या पतीच्या निधनानंतर, ती तिच्या सासूसोबत इस्त्राएलाच्या एका अनोळखी गावी राहावयास गेली. (रूथ २:११) ती तिच्या कुटुंबापासून आणि तिच्या पूर्वीच्या मित्र-मैत्रिणींपासून वेगळी झाली होती शिवाय एका अनोळखी गावात राहावयास आली असली तरी, तिने स्वतःला एकाकीपणाच्या आहारी जाऊ दिले असे पवित्र शास्त्रात कोठेही लिहिलेले आढळत नाही. तुम्ही तिचा वृत्तांत पवित्र शास्त्रातील रूथ नावाच्या पुस्तकात वाचू शकता.
रूथप्रमाणेच, तुम्हाला देखील एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. तुम्ही ज्याप्रमाणे गोष्टींचा किंवा घटनांचा विचार करता त्यानुसार एकाकीपणा उत्तेजित होऊ शकतो. ॲन नावाच्या एका स्त्रीने, दुर्बल करणाऱ्या रोगाने आजारी पडलेल्या तिच्या वडिलांची काळजी चार वर्षांसाठी घेतली तेव्हा याचा अनुभव घेतला. तिच्या वडिलांचे निधन झाल्यावर तिला तीव्र एकाकीपणा जाणवला. ती म्हणते, “मला असे वाटले की मी, शून्यवत, निरर्थक स्थितीत आहे—जणू काही येथूनपुढे कोणालाच माझी गरज नाही. परंतु, मग मी वस्तुस्थिती ओळखली की आता माझे जीवन बदलले आहे, व माझे मलाच माझ्या एकाकीपणाचा सामना करून, सध्या मी ज्या स्थितीत आहे त्याचा योग्य वापर केला पाहिजे.” कधीकधी तुम्ही तुमच्या परिस्थितींना बदलू शकत नाही, परंतु कदाचित त्यांच्याकडे पाहण्याची तुमची मनोवृत्ती तुम्ही बदलू शकता.
फलदायी कार्यात मग्न राहणे, हे जरी साहाय्यक ठरले तरी ते, एकाकीपणाविरूद्ध लढत देण्यासाठी एकमात्र उत्तर नाही. विवाहानंतर केवळ सहा महिन्यात विधवा झालेल्या आईरीनला ही गोष्ट तिच्याबाबतीत खरी ठरलेली दिसली. “मला एकाकीपणा माझ्या फावल्या वेळेत अधिक जाणवत होता, म्हणून मी इतरांना त्यांच्या समस्यांचा यशस्वीरीत्या सामना करण्यास मदत देण्यात वेळ घालवण्याचा निश्चय केला.” इतरांना मदत केल्याने आनंद मिळतो व एकाकी ख्रिश्चनांना प्रभूच्या कामात पुष्कळ काही करण्यासारखे मिळू शकते.—प्रेषितांची कृत्ये २०:३५; १ करिंथकर १५:५८.
मित्रांना मदत करू द्या
“स्नेहभाव न मिळाल्यामुळे उद्भवणाऱ्या जखमांनी” मुले एकाकी होतात, असे द न्यूयॉर्क टाईम्स मॅग्झीन वर्णन करते. (एप्रिल २८, १९९१) तरुण आणि वृद्ध अशा दोघांही एकाकी लोकांना स्नेहभावाचा अभाव जाणवतो. तथापि, काळजी वाहणारी ख्रिस्ती मंडळी पुरवत असलेले खरे मित्रत्त्व मिळणे खरोखर लाभदायक आहे. मंडळीतील तुमचे मित्र वाढवा आणि त्यांना शक्य होईल त्या मार्गांनी तुम्हाला मदत देऊ द्या. यासाठीच तर मित्र असतात—संकटकाळी आधार देण्यासाठी.—नीतीसूत्रे १७:१७; १८:२४.
तुमच्या भावनिक वेदनेमुळे तुमच्या मित्रांना तुम्हाला मदत देण्यास कठीण होईल याविषयी जागृत राहा. ते कसे? जेफ्री यंग हा लेखक असे स्पष्टीकरण देतो: “काही एकाकी लोक . . . स्वतःच बडबड करून किंवा चीड आणण्याजोगे वा अयोग्य बोलून संभाव्य मित्र गमावतात. या नाही तर त्या मार्गाने, कायमचेच एकाकी असलेल्या लोकांची, जवळच्या नातेसंबंधात अडथळा निर्माण करण्याची प्रवृत्ती असतेच.”—यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट, सप्टेंबर १७, १९८४.
काही वेळा, तुम्ही स्वतःला इतरांपासून दूर करून परिस्थिती अधिकच बिकट बनवाल. पिटर नावाच्या एका गृहस्थाने, तो त्याच्या ५० शीत असताना असे केले होते. त्याच्या पत्नीचे निधन झाल्यावर, त्याला इतरांची गरज आहे अशी मनस्वी इच्छा होती तरीही तो स्वतःला त्यांच्यापासून दूर ठेवत आहे हे त्याला जाणवले. तो म्हणतो, “काही दिवसांसाठी मला इतरांचा सहवास आवडेनासा झाला, व मी लोकांपासून दूर गेलो हे मला जाणवले.” हे घातक असू शकते. एकांतवासाचे काळ फायदेकारक असले तरी, वेगळे होणे हानीकारक आहे. (नीतीसूत्रे १८:१) पिटरने हे ओळखले. तो म्हणतो: “मी सरतेशेवटी यावर मात केली, माझ्या परिस्थितीला धैर्याने तोंड दिले व माझ्या मित्रांच्या मदतीने माझे जीवन पुन्हा उभारू शकलो.”
परंतु, कोणत्या ना कोणत्यातरी मार्गाने मदत करणे हे इतरांचे कर्तव्य आहे, असे कधीही गृहीत धरू नका. हक्काने मागणी करणारे होऊ नका. कोणत्याहीप्रकारे दाखवलेली सहानुभूती आनंदाने स्वीकारा व त्याबद्दल तुमची गुणग्राहकता व्यक्त करा. सोबतच नीतीसूत्रे २५:१७ मध्ये आढळणारा योग्य सल्ला ध्यानात ठेवा की: “शेजाऱ्याच्या घरी आपले पाऊल विरळा टाक, नाही तर त्याला कंटाळा येऊन तो तुझा द्वेष करील.” फ्रान्ससच्या पतिचे निधन त्यांच्या विवाहाच्या ३५ वर्षांनंतर झाले तेव्हा तिला तीव्र एकाकीपणा जाणवला. तिला वाटते की ही खबरदारी महत्त्वपूर्ण आहे. ती म्हणते, “तुम्ही ज्याची अपेक्षा करता त्यात नेमस्त असा. इतरांकडून अधिक गोष्टींची अपेक्षा करू नका. सदान्कदा कोणाच्या दारी मदतीसाठी जाऊ नका.”
यहोवा काळजी वाहतो
मानवी मित्र कधीकधी तुम्हाला निराश करत असले तरी, यहोवा देव अजूनही तुमचा मित्र आहे. तो तुमची काळजी वाहतो याची खात्री बाळगा. त्याच्यावर तुमचा दृढ आत्मविश्वास ठेवा व त्याच्या संरक्षणात्मक सान्निध्यात सतत आश्रय घेण्याचा प्रयत्न करा. (स्तोत्र २७:१०; ९१:१, २; नीतीसूत्रे ३:५, ६) मवाबी रूथने असेच केले आणि तिला विपुल आशीर्वाद मिळाले. होय, ती येशू ख्रिस्ताची पूर्वज सुद्धा बनली!—रूथ २:१२; ४:१७; मत्तय १:५, १६.
यहोवाला नित्याने प्रार्थना करा. (स्तोत्र ३४:४; ६२:७, ८) मार्गरेट, एकाकीपणाचा सामना करताना प्रार्थना शक्तिवर्धक असल्याचे दिसून आले. तिने तिच्या पतीसोबत पूर्ण वेळेच्या सेवेत भाग घेतला होता. तो तरुण असतानाच त्याचा मृत्यू झाला. “मोठ्याने प्रार्थना करून यहोवाला माझ्या सर्व भीती आणि चिंता सांगणे मला अधिक बरे वाटले. त्यामुळे जेव्हा एकाकीपणा मला जाणवत असे तेव्हा योग्य समजबुद्धिने सर्व गोष्टी पार पाडण्यास मला मदत मिळाली. शिवाय, जेव्हा यहोवा माझ्या प्रार्थनेला उत्तर देत असे तेव्हा मला धीर मिळे.” “म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो,” या प्रेषित पेत्राने दिलेल्या सल्ल्याचे अनुकरण केल्याने तिला पुष्कळ फायदे प्राप्त झाले.—१ पेत्र ५:६, ७; स्तोत्र ५५:२२.
यहोवासोबतचा चांगला नातेसंबंध तुम्हाला, एकाकी लोक अनेकदा गमावतात तो अभिमान जपून ठेवण्यास मदत करील. कर्करोगाने तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा स्तंभलेखिका, जेनेट कुफरमॅनने “अल्पअभिमानी व निरुपयोगी भावना” यांच्याविषयी लिहिले. तिने म्हटले: “निरुपयोगतेची भावना, बहुतांश विधवांना आत्महत्या करण्याच्या खिन्नतेप्रत निरवते.”
यहोवा तुम्हाला बहुमूल्य समजतो याची आठवण ठेवा. तुम्ही निरर्थक आहात असा तो कधीच विचार करीत नाहीत. (योहान ३:१६) देवाने प्राचीन काळी इस्त्राएलमधील त्याच्या लोकांना जसा आधार दिला त्याचप्रमाणे तो तुम्हालाही देईल. तो त्यांना म्हणाला: “मी तुझा त्याग केला नाही. तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यहि करितो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो.”—यशया ४१:९, १०.
देवाला दोष देऊ नका
सर्वांहून महत्त्वाची गोष्ट अशी की, तुमच्या एकाकीपणाबद्दल देवाला दोष देऊ नका. यहोवा जबाबदार नाही. तुम्ही सर्वांनी आनंदी, समाधानकारक संगतीचा आनंद लुटावा हा त्याचा एकच उद्देश तुमच्यासाठी आणि सर्व मानवजातीकरिता नेहमीच आहे. देवाने आदामाला निर्माण केले तेव्हा, तो म्हणाला: “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.” (उत्पत्ती २:१८) पहिली स्त्री हव्वा हिला त्याने निर्माण केले तेव्हा हीच गोष्ट केली. सैतानी बंडाळी झाली नसती तर, पुरूष, स्त्री आणि त्यांच्याद्वारे बनलेल्या कुटुंबांनी एकाकीपणाचा कधीच अनुभव घेतला नसता.
होय, यहोवाने दुष्टतेला दिलेल्या तात्पुरत्या परवानगीने एकाकीपणा वाढण्यास व इतर प्रकारचे दुःख घडण्यास अनुमती दिली आहे. परंतु हे लक्षात ठेवा की हे तात्पुरते आहे. देव तुमच्यासाठी त्याच्या नव्या जगात काय करणार आहे त्या अनुरोधाने पाहिल्यावर एकाकीपणाच्या परीक्षा कमी कठीण वाटतात. यावेळेपावतो, तो तुम्हाला आधार व सांत्वन देईल.—स्तोत्र १८:२; फिलिप्पैकर ४:६, ७.
हे कळल्यावर तुम्हाला शक्ती मिळेल. फ्रान्सस (आधी उल्लेखिलेली) विधवा झाली तेव्हा, स्तोत्र ४:८ मधील शब्दांमुळे तिला विशेषकरून रात्रीच्या वेळेस सांत्वन प्राप्त झाले. तेथे म्हटले आहे: “मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, [यहोवा, NW] तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस.” स्तोत्रसंहितेत आढळणाऱ्या अशा प्रकारच्या भावनांवर मनन करा. स्तोत्र २३:१-३ मध्ये व्यक्त केल्यानुसार देव तुमची काळजी कशी घेतो यावर विचार करा.
एकाकी लोकांना मदत कशी दिली जाऊ शकते?
एकाकी लोकांना मदत करण्याचा प्रथम मार्ग म्हणजे, त्यांना प्रीती दाखवा. पवित्र शास्त्र, वेळोवेळी देवाच्या लोकांना एकमेकांना विशेषकरून संकटसमयी असताना प्रीती दाखवण्याचे उत्तेजन देते. प्रेषित पौलाने लिहिले, “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा.” (रोमकर १२:१०) वस्तुतः, देवाचे प्रेरित वचन म्हणते की: “प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:८) मग, एकाकी असलेल्यांना तुम्ही प्रीती कशी प्रदर्शित करू शकाल?
एकाकी लोकांचा धिक्कार किंवा त्यांना टाळण्याऐवजी, काळजी वाहणाऱ्या व्यक्ती, त्यांना होईल तेव्हा सहनशीलतेने मदत करून त्यांच्याबद्दल असलेला त्यांचा स्नेहभाव दाखवू शकतात. ते ईयोबासारखे होऊ शकतात ज्याने म्हटले: “करूणा भाकणारा दीन, अनाथ व निराश्रित यांचा मी उद्धार करी. . . . विधवेचे मन आनंदित होऊन तिला मी गावयाला लावी.” (ईयोब २९:१२, १३) ख्रिस्ती मंडळीतील नियुक्त वडील आणि दयाळू मित्र अशाचप्रकारे विचारीपणे वागू शकतात. समज, उबदारपणा आणि सांत्वन या मूलभूत मानवी गरजा ते त्यांना पुरवू शकतात. ते त्यांना सहानुभूती दाखवू शकतात आणि गरज लागली तर खाजगी बोलण्याची गरजही भागवू शकतात.—१ पेत्र ३:८.
अनेकदा, एकाकी लोकांसाठी त्यांचे मित्र ज्या लहानसहान गोष्टी करतात त्याच प्रामुख्याने महत्त्वाच्या ठरतात. उदाहरणार्थ, जेव्हा एक सहविश्वासू मृत्यूमध्ये त्याची प्रिय व्यक्ती गमावतो तेव्हा, खऱ्या मित्रत्त्वाच्या दयाळू कृत्यांतून पुष्कळ चांगल्या गोष्टी साध्य करता येतात. जेवणासाठी आमंत्रण देणे, दयाळुपणे ऐकणे, किंवा संभाषण प्रोत्साहित करणे या लहानसहान गोष्टीत दाखवलेला दयाळुपणा कमी लेखू नका. या गोष्टी एखाद्या व्यक्तीला एकाकीपणावर मात करण्यास अधिक प्रभावकारी ठरतात.—इब्रीयांस १३:१६.
अशाप्रकारे, आम्हापैकी सर्वजण एकाकीपणाच्या चढाओढीचा वेळोवेळी अनुभव घेतील. तरीही, एकाकीपणामुळे आमच्यावर आपत्ती होता कामा नये. तुमचे जीवन अर्थपूर्ण, उभारणीकारक कार्यांनी भरवा. मित्रांना होईल तेव्हा तुम्हाला मदत करू द्या. यहोवा देवावर भरवसा ठेवा. स्तोत्र ३४:१९ मधील उत्तेजनकारक अभिवचनाची नेहमी आठवण ठेवा की: “नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर [यहोवा, NW] त्या सर्वांतून त्याला सोडवितो.” मदतीसाठी यहोवाकडे वळा आणि एकाकीपणाला तुमच्या जीवनावर हानीकारक परिणाम करू देऊ नका.
[२४ पानांवरील चौकट]
एकाकीपणाविरूद्ध लढण्याचे काही मार्ग
▪ यहोवाच्या सान्निध्यात राहा
▪ पवित्र शास्त्राचे वाचन करून सांत्वन प्राप्त करा
▪ सकारात्मक ख्रिस्ती दृष्टिकोन टिकवून ठेवा
▪ अर्थपूर्ण कार्यात मग्न राहा
▪ तुमची मित्रमंडळी वाढवा
▪ तुम्हाला मदत करण्यास मित्रांना सोईचे बनवा
▪ स्वतःला वेगळे ठेवू नका, तर मैत्रीपूर्ण प्रीती विकसित करा
▪ यहोवा तुमची काळजी वाहतो हा भरवसा ठेवा
[२४ पानांवरील चौकट]
तुम्ही एकाकी व्यक्तीला कशी मदत करू शकाल
▪ समजूतदारपणा, उबदारपणा व सांत्वन द्या
▪ खाजगी बोलण्याची गरज भागवा
▪ मदतदायी ठरणाऱ्या लहानसहान गोष्टी करत राहा
[२३ पानांवरील चित्रं]
रूथ कठीण परिस्थितीत असतानाही, तिने एकाकीपणाला तिच्या जीवनावर हानीकारक परिणाम होऊ दिल्याचा कोठेही संदर्भ नाही