अक्षय धैर्याचा स्रोत
“फुसकारण्याच्या आवाजाने आम्हाला आमच्या मार्गावरून अचानकपणे थांबवले. मग, आमच्या डावीकडील झुडपातून, दोन पक्षी आमच्या दिशेने त्यांचे पंख पसरून वेगाने धावून आले. आमच्यासमोर, दोन अंडी जमिनीवर निश्चिंत पडली होती. आमच्या न कळत त्यांच्या घरट्याला तुडवण्यापासून पक्ष्यांनी आम्हाला वाचवले होते. जेव्हा जेव्हा आम्ही ती तांबूस ठिपके असलेली अंडी पाहण्यासाठी त्यांच्याजवळ जाऊन त्यांचा एक फोटो घेऊ पाहात होतो तेव्हा तेव्हा ते पक्षी आम्हाला धमकी देत. ‘किती धैर्यवान,’ असा आम्ही विचार केला.”
ठिपके असलेल्या डिकॉप पक्ष्याच्या घरट्याजवळ जात असताना चार प्रौढांना हा अनुभव आला. त्यापेक्षाही एक लहान पक्षी आहे, ब्लॅकस्मित प्लॉवर. सर्वांचे दक्षिण ऑफ्रिकेतील पक्ष्यांचे मार्गदर्शक (इंग्रजी) या पुस्तकात, पक्षिविद्याशास्त्रज्ञ सिंक्लेर व मेन्डेलसोहन असे स्पष्टीकरण देतात: “नर व मादी असे जोडीने राहणारे पक्षी त्यांचे घरटे व त्यांच्या पिल्लांचे जोमाने संरक्षण करतात व जबरदस्तीने जवळ येण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर अतिशय आक्रमक होतात. अतिक्रमण करणारा, दिसायला कितीही धिप्पाड असला तरी ते निर्भयतेने त्याचा सामना करतात. कर्कश आवाज काढत उंच भरारी घेऊन वेगाने खाली येतात व त्याला आणखी पुढे न येण्याची ताकीद देतात.”
काहींनी, ब्लॅकस्मित प्लॉवरच्या घरट्याच्या दिशेने त्या पक्ष्याची प्रतिक्रिया काय आहे हे पाहण्यासाठी मोठ्या हत्तींना जाताना पाहिले. ते हत्ती बहुधा पुढे जाण्याऐवजी माघारी फिरतात.
पक्ष्यांना अशाप्रकारचे दिखाऊ धैर्य कोठून मिळते? ज्याने त्यांना निर्माण केले त्याच्याकडून ते येते. यहोवा देवाने या लहान प्राण्यांना, कोणताही मोठा प्राणी त्यांच्या घरट्यावर किंवा पिल्लांवर हल्ला करण्यापासून वाचवण्याच्या उपजत बुद्धीसह घडवले आहे.
ख्रिश्चनांसाठी धडा
केवळ उपजत ज्ञानाच्या धैर्याच्याही पलिकडे जाण्याची ख्रिश्चनांची इच्छा असली तरी ते यातून एक धडा शिकू शकतात. त्यांना त्यांचा स्वामी, येशू ख्रिस्त, ज्याने देवाच्या आज्ञांचे पालन निर्भयतेने केले याचे अनुकरण करण्यास सांगितले आहे. (इब्रीयांस १२:१-३) पवित्र शास्त्र, देवाची सेवा करण्यापासून मागे जाणाऱ्या भेकडांचा धिक्कार करते. (इब्रीयांस १०:३९; प्रकटीकरण २१:८) सोबतच, यहोवाला आमची अपूर्ण घडण समजते व आपण अनेकवेळा पाप करतो किंवा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमच्यामध्ये धैर्याची उणीव पडते हे त्याला माहीत आहे. (स्तोत्र १०३:१२-१४) एखाद्या व्यक्तीला योग्य ते करण्यापासून भय मागे ओढत असेल तर ती काय करू शकते?
एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने प्रार्थनापूर्वक, परीक्षांचा सामना करण्यासाठी व ईश्वरी इच्छा सतत करीत राहण्यासाठी शक्तिकरिता देवाकडे गेले पाहिजे. पवित्र शास्त्रात यहोवाच्या साहाय्यकारी मदतीचे हे खात्रीशीर अभिवचन आहे जे म्हणते: “तो भागलेल्यांस जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो. तरुण थकतात, भागतात; भरज्वानीतले ठेचा खातात; तरी परमेश्वराची [यहोवा, NW] आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करितील; ते गरुडांप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.” (यशया ४०:२९-३१) अनेक अपूर्ण मानवांनी या शब्दांच्या सत्याचा अनुभव घेतला आहे व ते “दुर्बळांचे सबळ झाले.” (इब्रीयांस ११:३४) ख्रिस्ती प्रेषित पौल एक उत्तम उदाहरण होता ज्याने लिहिले: “प्रभू माझ्याजवळ उभा राहिला; माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली.”—२ तीमथ्य ४:१७.
येशू ख्रिस्ताचे शिष्य होऊ इच्छिणारे नवे आस्थेवाईक लोक देखील अशा प्रकारच्या शक्तिदायक मदतीचा अनुभव घेऊ शकतात. दक्षिण आफ्रिकेतील हेन्री नावाच्या एका व्यक्तीचे उदाहरण घ्या. तो त्याच्या चर्चमध्ये खजिनदार होता आणि त्याच्या पाळकाच्या अगदी शेजारी राहत होता. हेन्री सत्य शोधत होता. चर्चसोबत त्याचा संबंध असतानाही, एके दिवशी त्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत मोफत गृह पवित्र शास्त्र अभ्यास करण्याचे स्वीकारले. काही काळानंतर, त्याने साक्षीदार होण्याची इच्छा व्यक्त केली व ते ध्येय प्राप्त करण्यासाठी त्याला कोणती पाऊले उचलावीत हे विचारले. त्याला पहिल्यांदा चर्चला राजीनामा द्यावा लागेल असे सांगण्यात आले. (प्रकटीकरण १८:४) पाळक त्याचा शेजारी आणि मित्र असल्यामुळे राजीनाम्याचे नुसते एक पत्र देऊन चालणार नाही तर त्याला समोरासमोर स्पष्टीकरण द्यावे असे हेन्रीला वाटले. त्याने हे धैर्याने केले.
पाळकाला हे ऐकून धक्काच बसला व चर्च कमिटीचे अध्यक्ष आणि इतर चर्च सदस्यांना घेऊन हेन्रीला भेटावयास गेला. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या धर्माकडे देवाचा पवित्र आत्मा नाही अशा धर्मात हेन्री चर्च सोडून का गेला हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा होती. हेन्री म्हणतो, “सुरवातीला मला त्यांना उत्तर द्यावयास भीती वाटली, कारण त्या सर्वांचा माझ्यावर नेहमी चांगलाच प्रभाव होता. परंतु मी यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली, व त्याने मला अशाप्रकारे उत्तर देण्यास साहाय्य केले: ‘सर्व आंतरराष्ट्रीय धर्मांमध्ये कोणता एकच धर्म देवाचे नाव यहोवा हे वापरतो? केवळ यहोवाचे साक्षीदारच नव्हेत काय? तुम्हाला असे वाटते का की, देव त्यांना त्याचे नाव धारण करू देईल पण त्याचा पवित्र आत्मा मात्र त्यांना देणार नाही?’” चर्च अधिकारी या युक्तीवादाचे खंडन करू शकले नाहीत. देव पुरवत असलेल्या ज्ञान आणि शक्तिमुळे हेन्री आता, यहोवाच्या साक्षीदारांसोबत दारोदारच्या सेवेत धैर्याने भाग घेत आहे.
होय, खरे ख्रिस्ती होण्यासाठी धैर्य लागते. या जगाचा अंत जसजसा जवळ येतो तसे, विश्वासाच्या परीक्षा वाढत राहतील. सैतान, देवाच्या सेवकांची यहोवाठायी जी सत्वनिष्ठा आहे ती तोडून त्यांच्याजवळ असलेली सार्वकालिक जीवनाची आश्चर्यकारक आशा त्यांच्याकडून हिरावून घेऊ इच्छितो. (पडताळा प्रकटीकरण २:१०.) परंतु आम्ही कधीही हार मानू नये. भयामुळे आम्हाला जरी तात्पुरती माघार घ्यावी लागली तरी, यहोवा आम्हाला त्यातून वर येण्यास मदत करू शकतो. त्याची इच्छा करत राहण्यासाठी त्याच्याजवळ सतत शक्तिसाठी मागणी करा. लक्षात असू द्या की, ज्याने निर्भय पक्ष्यांना बनवले तो अक्षय धैर्याचा स्रोत आहे. होय, खऱ्या ख्रिश्चनांनी “धैर्यवान होऊन म्हणावे: ‘यहोवा मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?’”—इब्रीयांस १३:६, NW.